romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Tuesday, March 22, 2011

ती, तिचा शोना आणि मी!

प्रवाहाविरूद्ध (!) पोहायचं ठरवलं आणि मग लोक ऑफिसेसना पोचायला घाईगडबडीत असतात तेव्हा आम्ही घरी जायला लागलो.अधिकृतपणे एवढंच सांगू शकतो यार! महानगरातल्या अतिमहत्वाच्या लोकलस्थानकाकडे जायचं.लोकल पकडायची.ती बडा फास्टच असते.झोपून जायचं.त्यादिवशी तिनं आणि अर्थात तिच्या निरूपद्रवी शोनानं माझी झोप उडवली.लोकल सुरू झाली माझे नेत्रं अर्धोन्मिलीत वगैरे झाले (राजा रविवर्माच्या चित्रांचे होतात तसे) आणि समोरच्या विंडोत एक युगुल येऊन बसलं.बसल्याबसल्या तिनं लगेच त्याचा हात हातात घेतला.त्यांची कुजबूज चालू झाली आहे हे बघून मी डोळे मिटले.डोळे, कान टवकारणं अशावेळी प्रशस्त वाटत नाही.

“असं नाई करायचं शोनाऽऽ”स्वर जरा वरच्या पट्टीतला होता आणि माझी समाधी भंगली.च्याआयला या शोनाच्याऽ आता या वेळी काय केलं यानेऽ– माझा आत्मा अस्वस्थ झाला.माझे डोळे अजून मिटलेलेच होते.पण त्या वाक्यानं डोळेही डळमळीत व्हायला लागले.तसलं काही कोणताही शोना अशा या वेळी करायचा नाही याची खात्री वाटत होती.अजूनही हे महानगर देशाच्या राजधानीपेक्षा सुरक्षित आहे.मी मनाला बजावत होतो.

“असं करता बाबा तुमीऽऽ असं नाई करायचंऽ पपा असं कदीच करत नाईऽऽत”
अरे बापरे! माझं मन आता माझ्या डोळ्यांच्या झापडांशी झटू लागलं पण सद्सद्विवेक (की सतसद्विवेक?) म्हणाला, एकदम खाडकन् उघडू नकोस झापडं! बरं दिसत नाही ते चारचौघात! नशीब! माझ्या मनानं ते ऐकलं.नायतर नेमकं ते बंडाच्या सीमारेषेवर असतं अशावेळी.आधी अर्धजागृत आणि मग जागृत मनानं डोळे उघडले.अंत:चक्षू (!) मगासपासून जागे होतेच.
समोर ती.गोरी, नकटी, मेकप केलेली.जीन्स, टॉप वर स्टोल घेतलेला.आपल्या असंख्य नाजूक, बारीऽऽक अंगठ्या घातलेल्या हाताची करंगळी त्याच्यासमोर धरत होती.
“आमी नाई बाबाऽऽ असं करता तुमीऽऽ”
तो माझ्यासारखा असावा.त्यानं छातीशी घडी घातलेल्या हातांतून उजवा हात खाड्कन सोडवला आणि गरबा खेळणारे रांगडे टिपरी जशी दाण्कन् आपटतात तशी स्वत:ची करंगळी तिच्या करंगळीवर आपटली.तिनं त्याच्याकडे असं काय बघितलंय म्हणता! तिचे गाल मेकपने आधीच आरक्त वगैरे होतेच.डोळे असे काय रोखले होते तिनं! त्यानं तिच्याकडे बघितलंच नाही.पुन्हा तलवार म्यान करावी तसा त्याने उजवा हात दोन्ही हातांच्या छातीवर असलेल्या घडीत पूर्ववत घुसवला.मला तिची दया आली.ती विंडोतून बाहेर बघत आपल्या दु:खाला वाट वगैरे करून देत असावी.मी माझ्या झोपेला वाट करून देण्यासाठी डोळे मिटले.समाधी लागली.कुजबूज पूर्ववत सुरू झालीए हे माझ्या अंत:चक्षूंनी मी न विचारताही मला सांगितलं.

“माज्या बायकोला कोण असं काय बोल्ललं ना तर मी ऐकून नाय घ्येणार!”
“असं नाही शोना! मी असं कसं वागीन!”
“नाय आपल्याला आवडत.आपण आदीच काय ते व्येवस्थित वागतो!”
“मला माहिती नाहीए का शोना! माझी खात्री नाहीए तुम्हाला!”
आता या ’तुम्हाला’ नं माझी झोप उडवली.आजवर मी शोना म्हणजे अरेतुरेतला समजत होतो.मनानं विवेकाबिवेकाचं न जुमानता खाड्कन् डोळे उघडले.मग विवेकानंही उघडले.विवेक मला थेट तिच्याकडे, शोनाकडे (शोनांकडे-आदरार्थी) बघू देत नव्हता.जराश्यानं मी विवेकाला चुकवलं.समोर नजर वळवली.समोरच्या आघाडीवर शांतता होती.शोनाच्या हाताची छातीवरची घडी सुटली होती.त्याचा एक हात तिच्या हातात होता.ती खिडकीबाहेर बघत होती.तिचा चेहेराच समंजस असल्यासारखा.तो गंभीर.तोही खिडकीबाहेर बघू लागला.

“पपाना समजतंय.आपण भेटतो ते!”
तिनं अभिप्रायार्थ त्याच्याकडे बघितलं तो घुम्यासारखा.तसाच.
“पाणी भरताना विचारत होते.कुट्ये जायची घाई चाललीए?”
“तू काय सांगितलं?”तो रूक्ष.तिच्याकडेही न बघता.
“सांगितलं मैत्रिणीकडे जाते.शोना! तुम्ही रागवू नका! आता ठरल्यासारखंच आहे आपलं पण असं पपाना दुकवायला मला आवडत नाही.आईला सगळं माहितीए” तिनं त्याच्याकडे बघितलं.त्याची नजर जराशी हलल्यासारखी.तिच्याकडे न बघता आता त्याच्या हात तिच्या खांद्यावर गेला.तिचा चेहेरा आनंदला.कुजबूज सुरू होणार! मला विवेकानं इशारा केला.मी गपकन् डोळे मिटले.शहाण्या मुलासारखे.

“शोना! हे तुमी बरं नाई केलंत हां!”
माझा जीव कळवळला.आता या शोनांनी काय केलं? एकदा कोपच्यात घ्यायला पायजे याना!
“मी येवडी धावत पळत आले स्टेशनला.तुमी थांबलाच नाईत?”
“मी पात मिन्टं वाट बगतो कुणाची पण! त्याच्यापुडे नाय् बगत! सरळ कल्टी खातो!”
“आसं नाई करायचं शोना! वाट बगायची! मी क्लासला गेले होते ना! धावत पळत निघाले.स्टेशनला हीऽऽ गर्दी.वाट मिळत नव्हती!”
“किती वातता पोचली?”
“शोना साडेपाच-सहा वाजले असतील!”
“टाईम कितीचा ठरला होता?”
“पाच!”
“म?”

पुन्हा शांतता झाली.कदाचित माझ्या झोपेने मला वेढून टाकलं असेल.गचागच हादरे बसले आणि मी ओळखलं नेहेमीसारखे रूळ बदलत गाडी माझ्या स्थानकावर पोहोचते आहे.मी उठलो.उठताना अनवधानानं माझे डोळे ती आणि तिच्या शोनांकडे वळवले.त्यांचं स्थानक अजून यायचं होतं.काहीतरी कुजबूज चालू होतीच.मी उतरणार्‍या गर्दीच्या पाठीवर हात ठेवला.गर्दीनं मला उतरवलं.बाहेर सगळं तसंच होतं.चढणारी गर्दी.इतस्तत: धावणारी गर्दी.ठॉक् ठॉक् करणारे बुटपॉलिशवाले.लाल, पिवळी, निळी सरबतं विकणारे कॅन्टिनवाले...वर्षानुवर्षं सगळं तसंच रहात आलेलं आहे...

4 comments:

आल्हाद said...

शोना
वैयक्तिक तरीही प्रचंड प्रातिनिधिक...

विनायक पंडित said...

आल्हाद! तुमचं स्वागत! तुम्ही प्रतिक्रियाही मार्मिक शब्दात देता! आभार!

रुही said...

मस्त!

विनायक पंडित said...

रूही तुमचं मन:पूर्वक स्वागत! मार्मिक प्रतिक्रिया! लगेच तुमचा ब्लॉग चाळला.अशा ब्लॉगरकडून कमेंट मिळाल्यावर खरंच मस्त वाटलं.आभार! :)