romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins
Showing posts with label समाज. Show all posts
Showing posts with label समाज. Show all posts

Sunday, February 8, 2015

समृद्ध व्यक्तिमत्व कार्यशाळा...


व्यक्तिमत्वाची समृद्ध जडणघडण नाट्य आणि साहित्य या माध्यमांतल्या घटकांचा प्रत्यक्ष उपयोग करुन दिलेल्या प्रशिक्षणामुळे परिणामकारकपणे होत असते...
सभाधीटपणा, संवादकौशल्य, संघभावना, भाषेची ओळख, शब्द, शब्दांमागचे विविध अर्थ, भाव, भावना प्रकटन... 
अशा गोष्टींचं प्राथमिक शिक्षण देण्यासाठी "अभिलेख" येत्या उन्हाळ्याच्या सुट्टीत श्रीकृष्णनगर, बोरिवली (पूर्व) परिसरात 'समृद्ध व्यक्तिमत्व कार्यशाळा' आयोजित करत आहे...

Sunday, October 12, 2014

घरात हसरे तारे...

दया तिचे नाव भूतांचे, पाळण आणिक निर्दाळण कंटकांचे...
भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे...महाराजा... 
काय?... हो ऐकलं...
असतील शिते तर जमतील भुते...
आता भुते वर आणखीही श्लेषही साधू?... जगद्जननीचे भुते... दिवट्या, संबळ घेऊन जगद्जननीला आळवणारे...
सर्वत्र असा माहोल भरुन राहिलेला माहाराजा...
सगळ्याच वोळी कुठेनंकुठे कुणालानकुणाला लागू पडत असलेल्या...
भाषा वाकवावी तशी वाकते आणि विचार वळवावे तसे वळतात... महाराजा...
होय! होय!... येतोच आहोत शीर्षकाकडे... सुरवात बरी वाटली म्हणून सुटलो झालं...
खरं तर आता सुटका येत्या १९ तारखेनंतरच...
आधी सुटका लोकशाहीची आणि मग कुणा रायबागोयबाची... महाराजा...
महाराजा, महाराजा करतोय म्हणजे आम्ही कोण म्हणूनी कशास पुसता?... आम्ही असू लाडके... तर ते ही नाही आणि काय पुसता दाताड वेंगाडुनी... असंही आम्ही म्हणणार नाही...
आम्ही कुणीच नाही म्हणून आम्हालाच आम्हाला आम्ही म्हणावं लागतंय... एरवी पोटार्थीपण कुणाला चुकलंय?... होय.. तेच म्हणणार होतो मी महाराजा...
तर... घरात हसरे तारे असता, मी पाहू कशाला नभाकडे अशी कर्त्या गृहिणीसारखी अवस्था होऊन बसलेली महा- आता महाराजा ह्या पालुपदाचा जिम्मा तुमचा बरंका...
आता म्हणाल मध्ययुगीन काव्यपंक्तींकडून स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या भावगीत रम्य स्वप्नांकडे कसे आणि कशाकरिता वळलात?
वळणं, वाकणं बरीच आहेत... पुढे ध्येनतनान! ध्येनतनान! असा कमीना गजरही कदाचित होईल...
विकास महत्वाचा, तो कसा होतो, कोण करतं हे महत्वाचं नाही. आधुनिक समाजमाध्यमं महत्वाची. अशा विकासाबरोबर काय काय येणार हा विचार करायची उसंतच आम्हाला नाही... तेवढा, जेवढ्यातेवढ्यापुरताच विचार बहुमती सरकार आणतो का?... ते आपण अलिकडेच बघितलं...
पुन्हा पुन्हा शीर्षकाची आठवण करुन द्या... आताशा विस्मरणातच रमावसं वाटतं....स्मरणरंजनापेक्षा ते बरं... असं कुणीही म्हणेल...
इकडे तारे, तिकडे तारे सगळीकडे तारेच तारे...
तारेत बडबडतो आहोत ते असल्यातसल्या नव्हे मूलभूत हक्क बजावण्याच्या... सततची तार सटकत रहाण्यापेक्षा आणखी एखाद्या तारेच्या आधीन होणं केव्हाही महत्वाचं... व्यवहार्य...
स्टार उमेद्वार, स्टार प्रचारक, स्टार कार्यकर्ते, स्टार तुम्ही आम्ही... ही वेगळ्याच एका स्टार गुटख्याची मांदियाळी...
स्टार उमेद्वारांपर्यंत पोहोचणं सामान्याला कितपत शक्य? आम्हाला तरी नाही. ते येण्याची वाट पहातो आहे. दाराशी. हात जोडून. आमच्या. ही एकच वेळ त्यांची. मग आमचेच हात जोडलेले रहाणार. तेथे कर माझे जुळती....
अशांचा उल्कापात झाला तरच ते दिसणार. पानाच्या ठेल्यावर आणि कुठे कुठे... नको त्या ठिकाणी. 
नुसतं उभं राहूनही काहींचं भलं झालेले असणार की. ते जातील वरच्या आणखी कुठल्या चलनी पायरीवर...
स्टार प्रचारक... त्या, संघापासून गल्लीतल्या कबड्डी इत्यादी संघांपर्यंत पसरलेले... कोण, कुणाचा, कुठुन, कसला प्रचार करतोय हे समजणं दुरापास्त आहे बाॅ यंदा... हा नेहेमीच्यांच्या गटातला म्हणावा तर त्याच्यावर वरुन कुणी भलताच लादलेला...
स्टार कार्यकर्ता... जरा जास्त जवळचा. म्हणजे तो आपल्याला काय करत नाही जवळ. आम्ही आपले घाबरुन रहातो जवळ. त्याला गुरकवायची सवय, आम्हाला घाबरायची...
असला एक, एरियात दिसेचना. उमेद्वार जाहीर झाला तेव्हा भेटला. घुश्शातच होता. नेहेमी काय शोधत बसणार अशांच्या घुश्शाचं कारण. रात्री झोपताना तरी काढून ठेवत असावेत हे आपल्या घुश्शाचं आवरण. शुद्धीत असत असले तर. नाहीतर काय, ते सक्षम नरास सांगणे नलगे...
परवा एरियातल्या कोपच्यात वडापाव खाताना किंवा वडापाव खाताना कोपच्यात पकडला. वडापाव घुसला असल्यामुळे बोलता येत नव्हतं. घुश्शात बिश्शातची नाटकं झाली. आम्ही काही समोरुन हललो नाही.
आहेस कुठे?- आम्ही विचारलं.
"..ष्ठा!!!!" एवढाच उच्चार कानी आला आणि भलतंच मुळाक्षर कानामात्रेसकट आमच्या मनात उतरलं... आमचे डोळे विस्फारले. ते कधी नसतात विस्फारलेले? म्हटलं हा गडी सुप्रभाती करायच्या गोष्टी आत्ता काय करतोय. मग मी सहानुभूतीवर उतरलो, म्हटलं थांब आणतो पाणी. म्हणून मिनरल वाॅटरवाल्या केमिस्टाकडे झेपावलो. तो हातवारे करु लागला. मग तो आजुबाजूच्या अनेक अनेकरंगी टोप्यावाल्यांच्या कोलाजकडे बघू लागला. त्याचा अगदी बर्फी सिनेमा झाल्यावर माझ्या लक्षात आलं, कुठल्याही टोपीवाल्याकडे पाणी माग. रंग वेगवेगळे असले तरी अजून वेळ झाली नाहिए, पाणी बिनरंगीच असणार.. असं सुचवतोय तो... 
हो! या काळात विकत का घ्यायच्या वस्तू? राहता राहिला प्रश्न विविधरंगी टोप्यांचा. तर, एक तर त्या घालायच्याच असतात राजकारणात आणि अवघे धरु सुपंथ हे तर राजकारण्यांचं मूलतत्वच की...
वडापावच्या लगद्यासकट पाणी गिळून झाल्यावर माझा गैरसमज दूर झाला, अच्छा म्हणजे निष्ठा म्हणतोय हा... 
"अरे पण मग तू इथेच असायला हवंस आपल्या एरियात?"
"तू पण काय भाई! तो त्यांचा!"
"अरे पण तुझ्या- (इथे मी जीभ चावली) म्हणजे आपल्याच पक्षाचा ना?"
च्यक् असा आवाज करुन त्याने एकाच झटक्यात दोन्ही दाढांत रुतलेला लगदा आणि मी, सगळ्यांनाच साफ करुन मागे सारलं आणि कुठल्याशा टोपीवाल्याच्या बाईकमागे सरुन पुढे सरकला... तो दुसर्‍या त्याला मान्य असणार्‍या आणि त्याचं संचित भक्कम करणा-या स्टार उमेद्वाराच्या मागे लागला होता...
तुम्ही आम्हीही स्टारच की... १९ तारखेपर्यंत. उमेद्वारराजे म्हणून. तुमची आमची अवस्था काय?
ते आम्ही सांगू बरोबर. वर झालं असेल कनफ्युजन आमच्या समजण्यात... युत्या,  आघाड्याच जिथे च्यूत झाल्या- ही शिवी नाही हो- कर्तव्यात चुकल्या, समन्वयाच्या,  तर असं होणार की... सवय झालेली हो आम्हातुम्हाला, याने, त्याने आणि त्याने, ह्याने एकत्र रहाण्याची... मग आतून ते कसेही असोत. तो त्यांचा खाजगी मामला.
स्टार तुमच्या आमच्यांपैकी अनेकांना विकासाचा मुद्दा ज्याम पटलाय. पूर्वपीठिका या शब्दावरच त्यांचा विश्वास नाही. तो त्याना मान्य नाही आणि ते विजयी झाले आहेत... हा सूर्य हा जयद्रथ या न्यायाने... त्यांचा- तुम्ही त्याला काहीही म्हणा- सूर्य किंवा जयद्रथ, तो जन धन, जन गण करत चांगलाच तळपतो आहे... लोकशाहीच्या मार्गाने...
तरीही आम्ही ठोकतच रहाणार... जे जे मूलतत्ववादी आहे ते आम्ही धुत्कारतच रहाणार... ते सगळे मिळून शेवटी सगळे सारखेच असले तरी आम्ही अरेला कारे करतच रहाणार... पर्याय काय?... ते नका विचारु आम्हाला... एकाला पकडून झोडत रहाणार... जेवढे तुम्ही चढवणार तेवढे आम्ही बडवणार.. त्या एका ऐवजी काय? ते नका विचारु... ते आमचं काम नाही. दुसरा पडद्याआड तेच करतोय की आणखी काय, ह्याचा विचारच आम्ही विचार करणारे करणार नाहिओत तर! आता भोंगळपणा बस्स झाला. एक बाजू लावून धरायची म्हणजे धरायची बस्स!... कळलं? हा एक प्रवाह...
तरल बुद्धिमत्ता फार छळते. आर्त बनवते. नको नको ते दिसू लागतं. दिसणारं प्रखर, कटू वास्तव असतं पुन्हा... ते स्वत:ला मांडून घेण्यासाठीही छळून त्राही त्राही भगवान करुन सोडतं. भगवानावर विश्वास असो नसो... फार कठीण अवस्था. ते मांडून मोकळं होता येत नाही. टकमक टोकावर हत्तीच्या पायी जावं लागावं असं काही... फारांना ते समजतही नाही... आमच्यासारखा यकश्चित ब्लाॅगर आणखी काय थांग लावणार या अवस्थेचा?
त्यापेक्षा सोयीप्रमाणे सगळ्यातून स्वत:ला वजा करणं आणि सोयीप्रमाणे जोडून घेणं बरं.. इथे हे चित्र दिसलं, तिथे ते. हा माझ्याशी असं बोलला, मग तो. मी स्वत: या सगळ्या गुंत्यातून, पसार्‍यातून मोकळा... दिलकी भडास निघाली बस झालं.. मला स्वत:ला काय लागू आहे? लोकशाही आहे. पटेपर्यंत राहू नाहीतर आहेतच अनेक तारांगणे या पृथ्वीतलावर विचरायला प्रतिभाबले... आम्हाला वगळा झणी गतप्रभ होतील अशी जी... ग्लोबल नेटिझन्स झालोच आहोत, ग्लोबल सिटिझन्सही होऊ... ती जास्त मोठी लोकशाही... असेना का! जबाबदारी कोणावर आहे? आम्हाला काय लागू?... लांबचा विचार आम्ही केलाच आहे जास्त विचार न करता... परदेशस्थ हे देशस्थ, कोकणस्थ इत्यादींसारखं वर्गवैभव केव्हाच होऊन बसलंय की... तेवढ्यापुरताच विचार करुन दूरदेशी की दूरदर्शी- ते तुम्ही सांगा बुवा- आम्ही पडलो विंग्रजीमाध्यमी- होता येतं ते असं...
तेवढ्यापुरता विचार किती बरा... ते तरुण आहेत, छान आहेत, पूर्वजांचा प्रभाव असणारच की... कुणी बोलत नाही, ते बोलतात तरी, मुद्याचं, विकासाचं... बोलतात हेच खूप... तेवढाच विचार सध्या करु... चेहेर्‍यामागचा चेहेरा, खरा हेतू यांचा आत्ताच कशाला पसारा...
त्या पुढे...
सर्व सामान्य स्टार... पादचारी... अल्पसंख्येत गेलेले... शारीरीक कारणांसाठी चालण्याचा व्यायाम घेणारे का असेना... त्यांचं काय? त्यांचं थोडक्यात असं-
तो चालत चालत वळला. त्याच्या पुढ्यात अ‍ॅक्टिवा. तीवर तीनचार टीनएजर्स. दोघांच्यामधे लाठ्यांचा गठ्ठा आडवा लावलेला. कसलासा संकेत घेत असल्यासारखे, ते अ‍ॅक्टिवाचं नाक फुटपाथला लावून. फुटपाथवर इमारतीच्या तळमजल्याआत खोलवर, आरपार घुसलेलं कसलंसं प्रचार कार्यालय. 
तो निर्विकार विमनस्कतेने सगळ्याला सामोरा. सगळ्याला. शून्य नजर वळवून मार्गस्थ. प्रगत झाल्यावर सद्यस्थितीतल्या प्राप्त मार्गावर... अचानक त्याच्या रस्त्याकडच्या उजव्या कोपराच्या आणि पंजाच्या मधल्या फोरआर्मवर जबरदस्त दणका. बाईकवाल्यांचं काही नवीन नाही म्हणून त्यांची 'चोरी तो चोरी औ फुकटकी सीनाजोरी' म्हणून त्यांच्याकडे चिडकं  केविलवाणं दुर्लक्ष करण्याच्या प्रयत्नात तो. तर समोर वेगाने पुढे चाललेलं ते चौबल सीट नेतृत्व संकेत मिळवून मार्गस्थ झालेलं. त्याच्याकडे वळून वळून पहात. तो त्यांच्या नजरेतला अर्थ जाणून घेण्यापेक्षा त्या लाठ्यांच्या आडव्या गठ्यावर एकाग्र. 
'एक लाठी उतनी असरदार नही होती... आईए, लाठिओंका गुच्छ बनाएँ... ताकत बढाएँ...' लहानपणी ऐकलेलं त्याच्या मनात रुंजी घालू लागतं... कशासाठी?... ह्या झेंड्यांच्या ओक्याबोक्या लाठ्या? की कापडी फलकांचा दोन्ही बाजूचा आधार?... की भलत्याच कशासाठी?... पापभीरुरुपी अहिंसा त्याचा कब्जा घेते... कान, तोंड यांच्यावर झडपा बसल्याच आहेत. डोळ्यांवरच्या नैसर्गिक झडपांच्या जलद हालचालींआधीच समोरच्या लाठ्याकाठ्या वेगाने अदृष्यमान होतात. मनुष्याने अ‍ॅक्टिवासारखी अस्त्रे बनवली त्याबद्दल तो भवतालाचे आभार मानतो...
तो पुन्हा वळतो. एक फकीर महापालिकेच्या दिव्याच्या चंदेरी खांबावरच्या उभ्या आयताकृती पेटीवर आपलं धुनीपात्र ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. तो चरकतो. अशावेळी अशा कृतींना चटकन रोखायचं असतं हा विचार त्यानं अंगी बाणवलेला नसतो...
विचाराने छळून घेण्यातच धन्यता मानणारा तो. यावेळी तो पुढे जात राहिला पण पुन्हा पुन्हा मागे वळून तो त्या फकीरी कृतीकडे पाहू लागला. फकीराला शरीरधर्म जास्त अनावर झाला असावा. धुनीपात्र जमिनीवर ठेवणं धर्मात बसत नसावं, अशी आपल्या धर्मातल्यासारखी त्याने आपली समजूत करुन घेतली. मार्गातल्या पुढच्याच खांबावर एक उमेद्वार लटकला होता. बांधणीच्या तुर्रेदार फेट्यातून त्याचं भूमिपुत्रपण लपत तर नव्हतंच- त्याला काही अमुक एका रंगाची, पॅटर्नची गरज नसते आता. हे एक महत्वाचं कार्ड आणि आता खुर्ची माझीच असा झळकणारा आत्मविश्वास त्याच्या चेहेर्‍यावर मोहोर उठवून होता. स्टुडिओवाल्याला फ्लॅशचीही गरज लागली नसेल... तो त्या उमेद्वारावरुन पुढे आला आणि चरकला. समोरच होतं उमेद्वाराचं कार्यालय. भल्या मोठ्या वॅनमधेच... ओसंडणारं... आत काळोख... त्यात सावल्या... काही मोजताएत त्या?... काय? ... त्यांच्या हातात असेल नसेल ते त्याला अधांतरी अंधारात दिसू लागतं... साक्षीदारपणा नको भलता म्हणून तो नजर काढून घेतो... समोर नाक्यावर दंडुकेधारी घोळका... वॅनला पाठमोरा... तो मनात म्हणतो, यार याना तर धाड घालायला ठेवलंय. हे पाठमोरे काय मोजताएत... टोकाचा सडेतोडपणा त्याला झेपत नाही. मग तो कासव होतो... अंग चोरत अबाऊट टर्नच्या धंद्याला लागतो....
... मगाशी त्या फकीराला रोकलं असतं, टोकलं असतं आणि ते या ओसंडत्या पित्त्यांपैकी कुणी बघितलं असतं आणि ते तसले मूलतत्ववादी की कुणी असले... निष्क्रियता ही कृती किती योग्य असते यावर त्याचा पुन्हा एकदा ठाम विश्वास बसतो...
आपल्या चालण्याच्या व्यायामावरुन परतताना त्याला वेगळ्या जागी पुन्हा तो फकीर दिसतो. कॉंक्रिट जमिनीवर उकिडवा बसलेला. धुनी जमिनीवर ठेवून. हात्तिच्या.. ठेवतात तर ह्यांच्यातही जमिनीवर... त्याच्या एका बाजूला रेडिमेड धुपाची पावकिलोची प्लास्टिक पिशवी,  धुपानं धुरकटलेला चमचा पडलेला. ओकीबोकी धुनी होतीच. लांबलचक अंगरख्याच्या खिशात हात घालून तो माचिस शोधत असावा. आज जुम्मा, दिवेलागण... शरीरधर्म आणि जिवीतकार्यकारण कुणालाच चुकत नसतं... असं फिलाॅसाॅफिकल झाल्यावर त्याला खूप बरं वाटतं. आध्यात्मिक झाल्यावरही त्याला असंच वाटत असतं. या दोहोंत फरक काय? हा नवा किडा सोडून घेऊन स्वत:त, तो चालण्याच्या व्यायामाच्या सुफळ संपूर्णतेकडे कधी वळतो, त्याचं त्यालाच कळत नाही...
...तेव्हा, या बहुस्टारी प्रवचनानंतर... सर्वांभूती सहानुभूती निर्माण झाली आहे देवा...
नभाकडे पहावंसुदीक वाटत नाही... आता कसलीच काळजी उरली नाही...
फक्त एकोणावीस हा आकडा दिसतो आहे. तो विदर्भाकडे निर्देश करतो आहे का? ते तुम्ही पहा...
विजय होणार, पराजय होणार... सेलिब्रेशन्स होणार त्यावेळी जेते आणि जीत गळामिठी घालणार. घोडेबाजाराची हीच तर सुरवात असं तुम्ही आम्ही म्हणत रहाणार...
मग आहे दिवाळी... सण मोठा नाही आनंदा तोटा... तेव्हा नो कटुता...
मग ख्रिसमस... अल्पसंख्याकांचा सण...
मग वर्षाखेर... बहुसंख्याकांचा पिण्याचा सण...
घोडेबाजाराला पुरेसा अवकाश- अशी तुम्ही आम्ही तरीही कुरापत काढू... राजकारण्यांचं दु:ख तुम्हाआम्हाला कधी कळलंय? पाण्यातल्या माशाचे अश्रू कोणाला दिसतात?.... कोण- कोण म्हणालं ते नेटवरच्या दिसतात?... काय? नेटमधल्या?... तुम्हीही या बोटावरची त्या बोटावर करायला लागलात तर?... हेच मला तुमचं आवडत नाही!...
तर, वर्षारंभ... संक्रांतीपर्यंत तेच तर चालू राहील... मग संक्रांत येईल... कुणावर नव्हे! सण म्हणून येईल... तेव्हा शुभमुहुर्ती छत्रपतींची साथ कुणाला हे दृगोचर होईल...
अगदी ग्रहबलावरच रहायचं तर नंतर शिमगा... एका वर्षात एकच शिमगा व्हावा, नाही?... दाकृ काय म्हणतात, विचारावं लागेल...
आरे पण पाडवा आहेच की गाढवा- हे आम्ही स्वत:शीच म्हणतोय- पाडवा आहेच... नव वर्ष... आपलं... भूमिपुत्रांचं... गुढ्यातोरणांचं... आणि अर्थातच रामराज्याचं.... रामराज्य येणार, राममंदिराचं काय ते तुम्ही शोधत रहा...
रामराज्य येणार तोपर्यंत सगळ्या सेटलमेंटी संपलेल्या असणार...
नवी विटी नवे राज्य... विटी तीच ती धार काढलेली असली तरी राज्यकारभार धारदार असणार ही तुम्ही आम्ही खात्री बाळगू...
स्वप्नांच्या नभांगणांतून आता सत्यात उतरु. सत्य म्हणजे नक्की काय, कुठलं वगैरे खोलात नको जाऊया...
जोडून सुट्टी नाही तेव्हा बाहेरगावी नको जाऊया... साफसफाई होतच राहील दर दिवाळीला. आधी लगिन लोकशाहीचं लावूया...
एक मूलभूत हक्क बजावू... तो कितव्या महत्वपूर्ण स्थानावर आणून ठेवला गेलाय, याचा विचार सोडून देऊ...
निळं बटण दाबू... त्याआधी ते कुणासमोर आहे त्याला मात्र नीट पारखून घेऊ... लोकशाहीचं निळं निरभ्र आकाश दिसू लागण्यासाठी तो एकमेव आधार आहे तुम्हाआम्हाकडे...
निरभ्र नभातले चमकणारे तारे आणि या घरातले हसरे तारे तेव्हाच कदाचित एकरुप होतील सारे...

Thursday, July 4, 2013

कथा: भूक (११)

भाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५, भाग ६, भाग ७, भाग ८, भाग ९ आणि भाग १० इथे वाचा!
बाळ बाहेर येतंय!... धडका मारत!... असह्य होतंय!... मी ओरडतेय... पण माझा आवाज मलाच ऐकू येत नाहीये!... डोळ्यासमोर फक्त लाल लाल काजवे चमकल्यासारखे! दुसरं काहीच नाही!... नुसता घाम... घाम अंगावरून वहातोय!... मला घट्ट धरून ठेवलंय सगळ्यांनी आणि बाळ धडका मारतच आहे!... माझं शरीर चरकात घातल्यासारखं पिळवटतंय!... पण माझं मन मात्र... हसतंय... गातंय..., नाचतंय... झालंऽऽ झालंऽ... झाऽऽलं!...
आता... सगळं... शांत आहे!... ही... ही खरी शांती!... सत्यम शिवम सुंदरम... हेच असेल का?... रितं रितं... पण खूप सुख... आनंद!... त्या बेहोशीत मी तशीच पडून रहाते!... किती वेळ?... कुणास ठाऊक?...
हळूच डोळे उघडले माझे!... आपोआप... पहिल्या वादळी पावसानंतरची सकाळ... अशीच असते! ताजी! नवं आयुष्य... माझं आणि माझ्या- हे- हे- काऽऽय?... माझं बाळ- हे- असं- उखळासारखं डोकं आणि- आणि- मुसळासारखं शरीर- आणि ते ही- वळवळणारं!???... हे... हे... माझं बा-ळ-ईऽऽईऽऽऽऽ...
ती धडपडत उठून तशीच उभी रहाते!... अंथरूण घामानं भिजलेलं... धडपडतच ती... तिच्या नवर्‍याच्या डोक्याशी पालथ्या पडलेल्या घड्याळाचा गजर गप्प करते!... घोरण्याचे आवाज चारही बाजूंनी... ते कसे गप्प करणार?... अजूनही सगळं भयाण... गरगरणारं... डोकं आणखी दाबून धरून ती उभी अंथरूणातच... आणि तिच्या धडपडीनं कुणीच जागं होत नाही!... एक दिशा सापडते तिला!... ती धावत मोरीत शिरते. दार लाऊन घेते. केस सोडते. अंगावरचे घामाने चिकटलेले कपडे, त्वचा ओरबाडून काढल्यासारखे ओढून काढते. आणि... तशीच... नळाखाली फतकल मारून बसलेली ती... अजूनही परग्रहावरच्या एकट्याच सजीवासारखी!...
जळजळणार्‍या निखार्‍यांवर... जोरात पाणी ओतल्यावर श्शशशशऽऽऽ असा आवाज... आणि मग वर आसमंताच्या पोकळीत... वर झेपावणार्‍या पाण्याच्या वाफेसारखी... तिच्या सगळ्या शरीरातून वर वर येणारी हाक... ऽऽयेऽरेऽयेऽऽ चिलयाऽऽयेऽऽऽ...

(सदर कथा "आर्त" या नावाने (संपादकानी परवानगी घेऊन दिलेलं नवं नाव)  "मैत्रेय प्रकाशना"च्या "मुक्तसंवाद दिवाळी २००८" या दिवाळी अंकात या आधी प्रकाशित झाली होती) 



    

Friday, June 28, 2013

कथा: भूक (१०)

भाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५, भाग ६, भाग ७, भाग ८ आणि भाग ९ इथे वाचा!
...मॅटर्निटी होममधल्या बेडवर पडलेय मी!... सारं कसं शांत वाटतंय... आजूबाजूला नर्स, मेट्रन, डॉक्टरांची हालचाल आहे, बोलणं आहे... मला मात्र सगळं मूक चित्रपटासारखं दिसतंय... डोळे मिटताहेत... ग्लानी येतेय मला... मान वळवून मी बेडच्या उजव्या बाजूला पहातेय... आई बसलीये स्टुलावर... उघडून डोळ्यासमोर धरलेल्या तिच्या पुस्तकावरून तिचा चष्मा दिसतोय... उजव्या गालावर पंजा रेलून ठेवल्यामुळे तिच्या गालावर पडलेल्या वळ्या दिसताहेत... पुस्तकाचं नाव पहाता पहाता माझे डोळे मिटू लागतात... कसा असतो नाही हा अनुभव? आत... पोटात... हालचाल जाणवते... मधेच खच्चदिशी आत बसलेला धक्का... माझ्या बाळाने दिलेला?!... मी खुदकन हसते आणि ’आई ग!’ अशी कण्हते... आतमधे लाथ लागल्याचा त्रास होतो पण नंतर जी सुखद लहर पसरते सगळ्या अंगातून!... "फक्त थोडाच वेळ! थोडाच वेळ थांब आता!" मी स्वत:ला, बाळाला- दोघानाही समजावते आहे... शांत पडून रहायचा प्रयत्न करते आहे... चलबिचल चालूच... आत... वेळ भरत आलीय तसं वाढणारं टेन्शन... ते ही हवहवंसं वाटणारं... इतके दिवस... आणि अजूनही!... नकळत माझा जप सुरू होतो... हरे राम हरे हरे... हरे कृष्ण हरे कृष्ण... कृष्ण कृष्ण.... कृष्ण?... हां!... हां!... कृष्णबाळ... मी पुन्हा हसते... त्या ग्लानीतसुद्धा आईचं वाचन डिस्टर्ब होऊ नये म्हणून हसू आवरते... श्रीकृष्णपुराणातल्या बाळलीला आठवू लागतात... कृष्ण मोठा होतो... होत जातो... आणि... अचानक हा सांब यादव कुठून आला?... आणि हे यादव लोक त्या ऋषीची अशी थट्टा का करताहेत?... सांबाला साडी नेसवून, त्याच्या पोटाशी काहीतरी बांधून त्याला ऋषींच्या पुढे का ढकलताहेत!... आणि हसताहेत!... पुरे पुरे बाळांनो!... थांबत कसे नाहीत हे हसण्याचे आवाज?... बाजूच्या बेडवरच्या कोळणीला भेटायला आलेले लोक निघताहेत वाटतं!... हरे कृष्ण हरे कृष्ण... मला ग्लानी येतेय...
ढकलल्यासारखं होतं आणि मी जागी होते!... पांढरं स्वच्छ सिलींग... त्यात बसवलेल्या न दिसणार्‍या ट्यूबलाईट्स... पांढर्‍या भिंती... मी आजूबाजूला पहातेय... डोळे, डोकं जड झालंय... माझं डोकं मलाच, कुणीतरी उचलून ठेवल्यासारखं, वळवल्यासारखं वाटतंय... लेबररूमपर्यंतचा प्रवास शेवटी करतेच आहे मी!... माझ्या चेहेर्‍यावर हास्य... समाधानाचं- गर्वाचं नव्हे!... आमचे दाढीदिक्षित... त्याना कुणी सांगितलं म्हणे... दोघांनाही मंगळ आहे म्हणे कडक! असला काही चान्स घ्यायचा म्हणजे... मी नाहीच ऐकलं! काय झालं?... दोन महिनेसुद्धा कॅरी करू शकणार नाही म्हणे!... झालं आता! झालं!... भरली घटिका!... सलाईनमधून तो द्राव... सहज डिलीव्हरी होण्यासाठीचं ड्रग... हळू हळू सोडलं की... यांना मात्र फोन करायला सांगितलं पाहिजे! घरी- पुरश्चरण चालू असेल यांचं जोरात!... होऊ दे बाबा... आता एकदा होऊनच जाउदे!...   (क्रमश:)

Monday, June 24, 2013

कथा: भूक (९)

भाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५, भाग ६, भाग ७ आणि भाग ८ इथे वाचा!
आईऽऽ आईऽऽ हे बघ काय?ऽऽ अगं आई हा माझा हात- कुठे... कुठे जायचंय आपल्याला? अगं आधी कोयता झालेला माझा हात- अं? आत्ता? पण- पण मला अजून तसं काहीच- अगं दीड एक महिना आहे अजून! तू अशी काय- थांब! थांब जरा!... मला आईला काही सांगायचंय! अगं थांब!... तुला आठवतंय आई?... मी आठ नऊ वर्षाची होते... मी किती वेळा तुला सांगायचे, ’मला आत्ताच्या आत्ता घेऊन चल!’ पहिल्या वेळी तू घाबरलीस... मलाच ओरडलीस, ’हे कुणी शिकवलं तुला?’ अगं मला खरंच तेव्हा वाटायचं की मला बाळ- मला खोदून खोदून सगळं विचारलंस... मी तुला कितपत काय सांगितलं कुणास ठाऊक! पुन्हा मी तुला ’घेऊन चल’ म्हणाले की तू ’हूं... हूं...’ करत नेहेमीसारखं पुस्तकात डोकं खुपसून बसायचीस... मी जास्तच केलं तर तू रागवायचीस... एवढा राग यायचा तुला? तुझं वाचन डिस्टर्ब केल्याचा? मी चिडून पुस्तकावरचं नावच तेवढं वाचायचे!... लांबून!... पुस्तकाला हात लावायची छाती कुठे होती?... चांगलं लक्षात आहे माझ्या, पुस्तकावरचं नाव... ’शिक्षण आणि समाजकारण’...
तुम्ही कुणी नसताना एकदा... आपल्या बिल्डिंगमधला तो... खरखरीत दाढीचा माणूस... आणि त्यानंतर मला नेहेमीच... तसं वाटायला लागलं... कुठेही पुन्हा तो दिसला की मला धडकीच भरायची... त्या दिवशी जेमतेम त्याला ढकलून मी बाहेर पळाले... पुन्हा जेव्हा जेव्हा घरी एकटी रहायचे तेव्हा माझं काय व्हायचं- जाऊ दे... पण मग मल सारखं वाटायचं... मला बाळ होणार- तसलं... तसलं काही त्यानं केल्यामुळे बाळ होत नाही हे माझं मलाच कळलं पण फार उशीरा... त्यामुळे मी किती वर्षं तशीच सैरभैर... पुस्तक संपवून, हाताचा अंगठा आणि तर्जनीने चष्मा वर करून डोळे मिटून डुलक्या काढणार्‍या तुझ्याकडे मी नुसती पहात रहायचे!... तुला उठवून काही सांगितलं तर तू काय करशील!.. त्यापेक्षा सगळं आतच ठेवलेलं बरं!... खोल कप्प्यात!... आणि.. आणि आज तू एवढी घाई करतेयस! मला घेऊन जायची!... हॉस्पिटलमधे!!... आई, एक मिनीट!... मला त्या... त्या प्रसंगानंतर लग्नच करावसं वाटत नव्हतं!... मी टाळाटाळ करायचे आणि स्थळांकडे दाखवायला मला तू जबरदस्ती घेऊन जायचीस नं!... त्याची... त्याची आठवण होतेय मला... आता... तू अशी मला नेतेयस नं! तेव्हा...
मला लग्न करावसं वाटत नव्हतं पण... पण बाळ व्हावसं मात्र वाटायचं!... अगदी हवहवसं- म्हणजे ते... बाळ होणार आहे असे भास व्हायचे मला म्हणून म्हणत नाही मी!... मला कळतच नाही!... त्या एका प्रसंगाने... मला लग्न करू नयेसं वाटायचं पण बाळ होऊ नये असं मात्र कधीच- आणि लग्न झाल्याशिवाय माझ्या लेखी बाळ होणं... आई... आई... एक सेकंद प्लीज... आई, मी होण्याच्या वेळी तुला कसं वाटत होतं गं? काय वाटत होतं? डोहाळे कसले होते? नॉशिया कसला होता?... शहाळ्याचं पाणी पीत होतीस का ग तू?... आणि...
 (क्रमश:)   

Thursday, June 20, 2013

कथा: भूक (८)

भाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५, भाग ६ आणि भाग ७ इथे वाचा!
शेजारी... तो घोरतोय... मंद्र, तार सगळ्या सप्तकातून लीलया वर वर पोहोचत... तो बाजूलाच आहे याची निदान जाणीव... सतत... सुरवाती सुरवातीला तर ती रडत रहायची. पुन्हा हुंदके बाहेर पडू नयेत म्हणून कोशिश करायची. पण दमून झोप तरी लागायची... नंतर नंतर... रडूही येईनासं झालं... अजून आपण भमिष्ठ कशा होत नाही!... खरंच!... मधे कधीतरी त्याने विचारलं होतं, "अशी दोन्ही गुडघे पोटाशी आवळून घेऊन का झोपून रहातेस तू?"... काय सांगणार?... नकळत तिच्या तोंडून ’हॅ’ असा ध्वनी बाहेर पडला. तिनंच दचकून आजूबाजूला पाहिलं. सगळं काही शांत... फक्त घड्याळाची टिक टिक... वेगवेगळ्या घोरण्याचे आरोह अवरोह... त्या सगळ्यात ती एकटी... परग्रहावर असलेल्या एकट्याच सजीवासारखी... लांबवरच्या त्या झिरोच्या बल्बकडे, सावली पडलेल्या देव्हार्‍यातल्या तसबिरींकडे आलटून पालटून पहात... लवकर सकाळ झाली तर निदान आजूबाजूला सगळं हालतं तरी होईल! आख्खी रात्र आपल्यावर दाटून आलेली... काही केल्या डोळे मिटत नाहीत... मिटले की भीती वाटायला लागते... पापण्यांच्या पडद्यावर दिसणार्‍या सततच्या चलतचित्रांची! अखंड चित्रं!... कुठूनही सुरू होणारी... आणि मग चालूच रहाणारी... कापूस कोंड्याची गोष्ट!... निरर्थक, निष्क्रीय, बेचव, रंगहीन... विशेषणंच कमी पडतील अशी!... निर्धारानं तिनं पोतडीतून आणखी एक उपाय काढला. आज सकाळपासूनचं दिवसातलं सगळं आठवायचा... क्रमाक्रमाने... घटना नाहीतच!... भूतकाळातल्या घटनांच्या नुसत्या सावल्या... फेर धरून नाचणार्‍या... पडसाद... आठवणी... अथक विचार... तरीही...
आज आपला आरसा किती स्वच्छ दिसतोय! नुकताच पारा लावल्यासारखा!... त्याचा तो जुनाटपणा, जळमटाचे फराटे, वेडीवाकडी गुंतागुंत, वाळवीची घरं टोकरून काढल्यानंतर खाली नुसत्याच रहाणार्‍या ठशांच्या ओळीसारखी नक्षी... कुठे गेली?...
मला हसू येतंय... इतकं स्वच्छ, स्पर्श केला तर नुसतेच तरंग उमटून पुन्हा स्थिर होणारं माझं मन... कुठे होतं इतके दिवस? मी आणखीनच हसते... स्वत:ला निरखून निरखून पहाते आहे पुन्हा पुन्हा... मी एवढी स्पष्ट कधी दिसले ह्यात?... आज माझी मलाच मी- गालावर गाल चढलेत! कोपरापासूनचा माझा हात केळीच्या कोकासारखा दिसतोय... पिवळा धमक... चेहेरा कधी नव्हे एवढा तेजस्वी!... का नाही? आता फक्त थोडेच दिवस... एखाद- दीड महिना... खुषीची अंतिम पायरी काय असू शकते? तेवढी मी आनंदी!... माझ्या पोटावरून- पोटातल्या माझ्या आनंदगर्भावरून हात फिरवतेय... जणू त्यालाही निरखतेय या आरशात!... मी स्वत:ला नीट बघायला थोडी मागे सरकते आणि... आरशात आणखी कुणी?... हो! माझ्या मागेच... माझ्या गर्भाकडे एकटक मूक पहाणारं... मी माझ्या आरशातून त्याच्याकडे पहातेय... ते माझ्या चेहेर्‍याकडे पहातं... केविलवाणी नजर पुन्हा माझ्या गर्भाकडे?... मला रागच येतो!... अरे! एक तर तुला बोलता येत नाही... आमच्या दाढीदिक्षितांनी मोठ्या माजात सांगितलं, ’मला पोरांचं लेंढार नको!’ मग काय हवंय? मग कशाला करायचं हे सगळं? जवळ येतानासुद्धा धास्तावल्यासारखं करायचं?... मला तर वेगळाच संशय... म्हणून म्हणून दत्तक घेतलं तुलाऽ... आरशातून माझ्याकडे पहातोएस नाऽ तुलाच!... तू सततचा मूकच... काय पहातोस असा?... बापरे!! म्हणजे माझ्या- माझ्या गर्भावर तुझी नजर! चलऽ चऽऽल चालता होऽ हो चालताऽऽ... आता मला तुझी गरज नाहीऽ माझ्या गर्भावर डोळा ठेवणार्‍या कुणाचीच नाही! चऽलऽ... मी त्याच्यावर हात उगारते... उगारते आणि हाताकडेच पहात रहाते! कोपरापासूनचा माझा हात म्हणजे... लखलखीत कोयता?!?! आईऽऽ आईऽऽ हे बघ काय?ऽऽ अगं आई हा माझा हात- बघ! आईऽऽऽ...    

Tuesday, June 18, 2013

कथा: भूक (७)

भाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५ आणि भाग ६ इथे वाचा!
रात्री सगळे एकत्र जेवायला बसल्यावरसुद्धा सुरवाती सुरवातीला तिचा घास घशाखाली उतरायचा नाही! सगळे गप्प. हाताचं काम चालू यंत्रवत आणि नजर घड्याळाकडे. भांडी घासणारी बाई यायच्या आत आटपायला पाहिजे हा दंडक. चार जणांची तोंडं चार दिशेला... माहेरीही इन मिन तीन माणसं. पण जेवणापेक्षा गप्पाच भरपूर. त्याला बंधन नाही- विषयाचं, लहानमोठ्याचं- कशाचंच नाही... बंधन नाहीच!... इथे... इथे जेवणं आटोपली की तिची आवराआवर. तोपर्यंत तो सुवासिक बार भरून गॅलरीत गुणगुणत, कट्ट्यावर हातानी ताल धरत, रंगात येऊन... अशावेळी अंदाज घ्यायचा दारात उभं राहून. त्यानं वळून बघितलं न बघितल्यासारखं केलं तर पुढे जायचं नाही... कधी कधी मात्रं त्याचं स्वत:हून आत डोकवत रहाणं, तिचं आटपतंय का ते बघणं, तिनं ते ओळखायचं. साडीला हात पुसत त्याच्या बाजूला जाऊन उभं रहायचं. कट्ट्यावर दोन्ही हात रेलून. मग त्याच्या गंमती जंमती सांगणं... जोक्स, ऑफिसमधल्या नमुन्यांची वर्णनं, चाळीतल्या कॅरेक्टर्सच्या कथा... मग त्याच्या बोलण्याला खंड नसायचा... त्या रात्री ती समाधानानं झोपायची... तो तिच्याही आधी डाराडूर, जवळ जवळ रोजच... पण त्या तेवढ्या गप्पांनीही ती टवटवीत व्हायची... आणि खूश व्हायची ते त्याला आपली काळजी आहे, आपल्या मूडवर त्याचं लक्ष असतं हे बघून. भले त्यानं ते दर्शवू नये, मूड चांगला होण्यासाठी प्रयत्न करू नये... मूड चांगला रहाण्याची... तरीही... आज आपली हालत काय असती एरवी?... कल्पना करवत नाही!... आई, बाबा तेव्हा ठाम उभे राहिले. डिव्होर्सच्या वेळी. नंतरही त्यांची सगळी धडपड चालायची ती त्या भयानक प्रकारातून गेलेल्या आपल्या मुलीला भलत्या विचारांपासून सतत दूर ठेवायची!... शेवटी शेवटी त्याचंच आपल्याला ओझं व्हायला लागलं आणि हे स्थळ आलं. त्याला सगळं सांगितलं. त्यानं नेहेमीच्या शांतपणे आपल्याला करून घेतलेलं... दुसरेपणाची असूनही!... हे कितीही झालं तरी...
त्या विचारानीसुद्धा ती ताजीतवानी झाली. फरशी पुसता पुसता तिनं बाहेर पाहिलं. जेऊन, सुवासिक बार घोळवत तो गॅलरीत उभा होता. गुंग. जोरजोरात कट्ट्यावर तबल्याचा ताल धरत. तोंडाने तालाचा आवाज काढत... हातानी आवर्तनाची, समेवर आल्याची हालचाल करत...
सगळं आटपून ती दाराजवळ बराच वेळ रेंगाळली. मग पेंगणार्‍या सासूच्या खाकरण्याने भानावर आली. पुढे सासूचं पेंगता पेंगताही सुरू झालंच होतं... गुणगुणणं... "रे छबिल्या... राघू मैना निजल्याऽऽ..." सुनेचं लक्ष गेलंय हे कळल्यावर सासूचा व्हॉल्यूम आणखी वाढला!... हे असं... लक्ष गेलंय हे कळल्यावर तर जास्तच... मुद्दाम... कान कितीही बहिरे केले तरी उकळत्या तेलासारखे आत घुसणारे शब्द... तिनं आधी स्तोत्रं काढून लक्ष एकाग्र करण्याचा प्रयत्न केला. मग सासर्‍यांच्या सारख्या आतबाहेर चाललेल्या फेर्‍या वाढल्यावर उठून अंथरूणं टाकायला सुरवात केली...
ही सर्वात कठीण वेळ... अंथरूणावर नुसतं पडून रहायची... या कुशीवरून त्या कुशीवर... सारखे दोन्ही गुडघे पोटाशी धरून ठेवायचे... रग लागली की लांब करायचे, पुन्हा... भिंतीवरच्या देव्हार्‍यावर लावलेल्या झिरोच्या बल्बकडे बघत... देव्हार्‍याच्या महिरपीच्या सावलीने झाकल्या गेलेल्या देवांच्या तोंडाकडे पहात... आठवतील तशी स्तोत्रं म्हणत, जप करत... मग उलटे आकडे म्हणत... हजारापासून सुरवात करायची तरीही... मग विचारांची तंद्री आणि ओढून ताणून येणारी डोळ्यावरची झापड यांचा खेळ अव्याहत... सकाळचा कर्कश्श गजर होईपर्यंत...   (क्रमश:)       

Sunday, June 16, 2013

कथा: भूक (६)

भाग १, भाग २, भाग ३, भाग ४ आणि भाग ५ इथे वाचा!
तो यायच्या वेळेवर त्याची चाहूल लागूनच की काय तिची पुन्हा धावपळ सुरू... इतका वेळ वरून तरी शांत दिसत असलेल्या गूढ डोहात एकदम चार पाच खडे पडल्यासारखं... सगळीकडे गोमूत्र शिंपडून, लादी पटापटा पुसून घेऊन... उशा, चादरी, गाद्या, नॅपकीन्स, टॉवेल्स, पंचे सगळे कळकट, कुबट पण सर्वत्र गोमूत्र शिंपडणं अव्याहत... पिणंसुद्धा...
आता संध्याकाळी तो ऑफिसमधून आल्यावर तोच दिनक्रम! मधल्या काही कृती उलटसुलट... फक्त आता त्याची नजर दमलेली आडमुठी... पुन्हा आंघोळ करून... आसन घालून... अडम तडम...
पुन्हा भगवी लुंगी चढवल्यावर... सोवळं सोडून... सुवासिक बार भरून... दिवाणाच्या कप्प्यातला तबला डग्गा... खाली बसून हळूवारपणे बाहेर... रियाझ चालू... पूर्ण स्वत:तच... डोळे आता मिटलेले... ब्रह्मानंदी टाळी आता खरी लागलेली...हात सफाईदारपणे तबल्यावर... स्पष्ट बोल... डग्ग्याचा घुमारा... मधेच कुठेतरी आत आर्त कळ आल्यासारखा चेहेरा... मग हळूहळू पीळ सुटत गेल्यासारखा... शांत... मग गुंगी आल्यासारखा...
तिचं स्वैपाकाचं चालूच... खोबरं किसत ती सुद्धा त्या तबल्याच्या तालात दंग... त्याच्याकडे पहात... त्याच्या चेहेर्‍यावर उमटणारी कळ आणि सुटत जाणारा पीळ याचा खेळ बघत... नेहेमीसारखी... मग तिला वाटलं... आज इतकी वर्षं बायकोनं नवर्‍याकडे अशी नुसती पहात काढावीत?... माणूस स्पष्ट काही बोलेल तर बरं!... तोंडाला कुलूप... क्वचित बोलला तर मग सतत पाण्याच्या प्रवाहासारखं बोलणं... पण काही जवळचं विचारायला गेलं, गाभ्यातला काही विषय निघतोय असं वाटलं की लगेच अळी मिळी गूप चिळी... "मला इतरांसारखं लेंढार वाढवायचं नाहिए!" असं एकदाच पण ठामपणे सांगितल्यावर पुन्हा कशाला काय?... काही वागणं, बोलणं, सांगणं म्हणजे वज्रलेप... तो विषय कायमचा बाद... आयुष्यातूनच!... कित्येकदा तिला वाटायचं हेच खरं कारण की... मग विचारगर्तेत धबाधबा कोसळणं... त्यापेक्षा घरकाम, धुणं पुसणं, देवाला जाणं, जप करणं, स्तोत्र म्हणणं यात मन रमवलेलं बरं!... सोईस्कर!!... पण तेही किती खरं?...
सुरवातीला त्याला आवडेल म्हणून आपण देवाची स्तोत्रं वाचायला लागलो, जप करायला लागलो. त्याला बरं वाटलं की नाही कळलं नाही. नजर आडमुठी निर्विकार. आपल्याला मात्र बरं वाटलं. मनातला काळपट हिरवा झालेला भविष्यकाळ खरवडून निघेल अशी खात्री वाटायला लागली. जसजसे दिवस उलटत गेले, महिने उलटत गेले तसं तसं मात्र...      (क्रमश:)  

Wednesday, June 12, 2013

कथा: भूक (५)

भाग १, भाग २, भाग ३ आणि भाग ४ इथे वाचा!
आताही त्या मळ चढलेल्या मोठ्या आरशात कितीतरी वेळ हातातल्या पंचानं ती तोंड पुसत राहिली. उंचावरून गढूळ पाण्यात जेमतेम् प्रतिबिंब दिसावं तसा चेहेरा त्या जुन्या आरशात निरखत राहिली. तिच्याच ते लक्षात आलं. मग तिनं विस्कटलेल्या केसांचे पेड बांधले. लग्नानंतरच ती हे शिकली होती. तेल लावणं, वेणी घालणं, मोठं कुंकू लावणं, साडी नेसणं... तिला स्वत:च्याच अडॅप्ट होत जाण्याच्या सवयीची कमाल वाटली! किती? आणि कुणाशी?... कसं?... का?... तिनं पुन्हा एकदा चेहेरा आरशात निरखला... बॉब केलेले, उडत रहाणारे केस. जेमतेम पिन केलेले. कपाळ मोकळच बर्‍याच वेळा... आणि आता... हूंऽऽऽ... स्वत:शीच कडवट हसून तिनं फ्रीझ उघडला. अगदी खालचा, भाजीचा ट्रे काढला. पडवळाचे तुकडे बाहेर ठेवले. विळी घेऊन भिंतीकडे तोंड करून चिरत बसली...
समोर फोफडे  उडालेल्या भिंती. वरच्या बाजूला डोक्याला लावलेल्या तेलाचे उमटलेले ठसे. रांगेत. जणू  भुतांच्या सावल्याच. पंक्तीला येऊन बसलेल्या... या घरातही- दुसर्‍या लग्नानंतरच्या, काही फार वेगळी परिस्थिती नव्हती. सासू आणि सून हे नातं प्रेमाचं कधी असतं?...
त्या पहिल्या घरी सगळंच अशुद्ध आणि अवघड. आईवेडा मुलगा... आणि आई... हो! वेडीच म्हणायला पाहिजे... मीच कशाला... तिचेच जवळचे... मुलगा आज्ञाधारक श्रावणबाळ... लग्नाच्या रात्रीसुद्धा सगळ्या वर्‍हाडातच झोपणारा आणि त्यातच- शी:ऽऽ किळस किळस... दुसरं काहीच नाही!... तिचं अंग आता भाजी चिरता चिरताही शहारलं...
किती निरर्थक असावा एखादा माणूस?आणि तरीही त्यानं माजावर आलेल्या, लाल तुर्‍याच्या कोंबड्यासारकं मान टेचात मिरवत फिरावं? कसला अभिमान? कुठल्या विश्वात रहाणारी ही माणसं? आणि तरीही भुलवणारी?... हो! आपण नाही भुललो?... ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा... काय भुललासी वरलिया रंगा...
शेवटी सगळंच भिजत पडलेल्या घोंगड्यासारखं झालं... त्या सगळ्यातून किती दिवस जात राहिलो आपण? आपल्या स्वभावानुसार सहन करत... सहन करण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्यासारखं!... आणि एवढं सगळं सहन करूनही... जरी... डॉक्टरकडे चेकींगला जाऊन आलो... एकदा, दोनदा!... आपला काहीही प्रॉब्लेम नाही!... मग त्याचं चेकींग... चेकींगला न तयार होण्याइतका तरी तो पुरूष होता... त्याचं चेकींग... मग त्याचं ते निरर्थक ऑपरेशन... विशेष म्हणजे एवढ्या सगळ्यातून जाऊनही त्याला अजूनही न शिवलेली मॅच्युरिटी... शेवटी अगदी सहन होईना, अंगातला ताप जाईना, छातीतला कफ संपेना तेव्हा... तेव्हाही शांतपणेच माहेरी परत...
विचारानं एक स्थानक गाठलं. गाडी थांबल्यासारखी झाली. तिनं समोरच्या ताटात पाहिलं. पडवळाचे बारीक तुकडे... विचारांच्या नादात पुन्हा पुन्हा बारीक झालेले... ती उठली. चिरलेली भाजी ओट्यावर ठेवली. हात धुताना घड्याळात पाहिलं. ट्रान्झिस्टर ऑन केला. आणखी एक विचार विरोधक उपाय...           (क्रमश:)   

Thursday, June 6, 2013

कथा: भूक (४)

भाग १, भाग २ आणि भाग ३ इथे वाचा!
... सगळं आटपून साटपून तिनं जमिनीवर सतरंजी अंथरली. उशी टाकून आडवी झाली...
मोच्याकडे चप्पल शिवता शिवता त्याने प्रस्ताव मांडला आणि आपण हबकूनच गेलो!... लग्न करायचंच नाही असा स्पष्ट निर्धार होता. इतर मुलींसारखं जोडी जमण्या- जमवण्याच्या दृष्टीनं पहाणं हा प्रांतच नव्हता. त्या सगळ्या पलिकडे स्वत:ला आणून ठेवलं. असा काही प्रस्ताव समोरून आल्यावर काय वेगळी प्रतिक्रिया असणार होती?... तो इतके दिवस घिरट्या घालतोय हे सुद्धा जिथे लक्षात येत नव्हतं तर...
उमदाच म्हणायचा तसा. दिसायला. वागायला. बोलायला. चेहेरा सतत हसरा... आणि आयुष्यात स्वप्नं तर किती? रोज काहीतरी त्याच्या त्या खड्या आवाजात ऐकवत रहायचा. तोंडावरचा, कपाळावरचा, मानेवरचा घाम पुसत रहायचा. रूमाल पिळून काढेपर्यंत. रूमाल पिळून झाल्यावर तिच्याकडे बघून हसायचा. एक पैसा खर्चून द्यायचा नाही तिला!... त्याचं पान खाणं तिनं कधी बंद केलं आणि त्याच्याबरोबर त्याच्या वडलानी त्याच्यासाठी घेतलेला फ्लॅट सजवण्याची स्वप्नं कधी बघू लागली?... तिलाच कळलं नाही!... वास्तवाचं भान असणारी, विकत घेतलेली नवनवीन पुस्तकं रात्र रात्र जागून वाचणारी, त्यावर चर्चा करणारी, काही समजलं नाही तर खोदून खोदून क्लिअर करून घेणारी ती... आता स्वप्नात रममाण झाली. पूर्णपणे. आता ते दिवस आठवले, त्या वेळची आपली अवस्था आठवली की काळ्या ढगाला सोनेरी किनार असल्यासारखं तिला वाटायचं...
"देवीऽऽ देवीऽ ऊठ ऊऽठ! मी स्वत: आलोय देवीऽ"
"अं?... मी... मला... आपण कोण आहात? आणि मला-"
"देवीऽ... मलाच तर आळवत होतीस नं?... इतक्या आकांतानं?... आणि मला ओळखलंच नाहीस?... मला वाटलं होतं मी तुला दिलेला वर तू विसरून गेलीस आणि म्हणून मी स्वत: तुला- इतके दिवस अतृप्त आहेस तू! तरी किती सावरलं आहेस स्वत:ला! कौतुक वाटतं तुझं! तुझी खडतर तपस्या पाहून मी प्रसन्न झालोय! माग! तुला हवंय ते माग!"  
"देवन! मला काय हवंय ते तुम्हाला..."
"कळलंय! कळलंय सारं मला बरं! तुझ्या इतक्या असोशीनंतरच तुझी इच्छा पूर्ण व्हायला हवी! तू... तयार आहेस ना?"
"म्हणजे... मी... मला... कृपा व्हावी! अनुग्रह व्हावा!"
"चल तर मग!"
"... कुठे?... मला... मी काही समजले नाही! आपण मंत्र देताहात नं? कृपा व्हावी! मी आजन्म आपल्या पायाशी आहे!.. इथे, या पवित्र स्थळी देऊ शकत नाही का तुम्ही मंत्र?"
"मंत्र? हाऽहाऽहऽहऽह... हे तुला कुणी सांगितलं?ऽ..."
"क्षमा असावी देवन... वरच असा आहे नं की मंत्राचा अनुग्रह होईल आणि मग-"
"मूढ आहेस! असं काही होत असतं का? तुझ्या वराच्या- स्वामीच्या हतबलतेची तुला खात्री झाली आहे का?... की नाही?... सगळं योजित असतं देवी. त्यासाठीच तर तुला वरदान दिलं गेलंय... चल! उशीर नको देवी! मी प्रसन्न आहे तुझ्या-"
"न- नाही- क्षमा असावी देवन- नाही! हे असलं मला नाही जमणार! मला संतानसुख हवं आहे- हवंच आहे! माझं जीवन तेच आहे. पण या मार्गानं मी- मला- मला- असं काही करा- म्हणजे- दुसरा काही उपाय असेलच नं देवन? मला- आपण असे का बघताहात माझ्याकडे?- नको- नको- असं रोखून माझ्या सगळ्या शरीराकडे- नाहीऽ देवनऽऽ मीऽऽऽ..."
घामाघूम होत ती दचकून उठून उभीच राहिली!... सासू तक्क्याला रेलून बसली होती. उजव्या पायावर डावा पाय ठेऊन तो हलवत. उभ्या असलेल्या तिच्याकडे बघायला लागली. तिच्या पायाजवळ गोल गोळा झालेल्या सतरंजीकडे बघायला लागली. मान डोलावत, तोंडातल्या पानातली उरलेली सुपारी जिभेने घोळवत घोळवत. हॅ हॅ हॅ हॅ करत हसत राहिली. हसणं संपल्यावर हं!ऽऽ असा लांब हुंकार देत जमिनीवर हात आपटत राहिली...
दचकून उभी राहिली तरी ती भेदरल्यासारखीच होती... भानावर आल्यावर तिनं झटका बसल्यासारखी साडी- पदर नीट केला. पदरानं घाम पुसून काढायचा प्रयत्न केला. सासूची आणखी काही रिऍक्शन व्हायच्या आत मोरीत धावली... नळ सोडला. फसाफसा हातापायावर, तोंडावर, मानेवर, पाण्याचे सबकारे मारून घेतले. जणू स्वत:ला लवकरात लवकर स्वच्छ करून घेणं आवश्यक होतं! ख्ररं म्हणजे डोक्यावरूनच पाणी ओतून घ्यावसं वाटत होतं पण मग पुन्हा-
शीऽऽ... हे असलं काय हे?... काही समजत नाही... कळत नाही... अजून आपण भमिष्ठ कशा होत नाही?...     (क्रमश:)   

    

Wednesday, June 5, 2013

कथा: भूक (३)

भाग १  आणि भाग २ इथे वाचा!
मान खाली घालून ती तशीच चालती झाली... रस्त्यावरच्या गोणपाटातून, पाट्यांतून, टोपल्यांतून जेवणासाठी बंद होणारा बाजार बघत बघत. घराकडे. घर... घराबद्दल- आपल्या- फार इमले रचले होते का आपण?... तसे सर्वसाधारणच तर होते! की ते सर्वसाधारण होते म्हणूनच... हे असं... तिची पावलं अडखळायला लागली...
छान कुटुंब असावं. छोटं, मोठं, कसंही. एवढं शिकून, उदार वातावरणात वाढून आपला ट्रडिशनलपणा सुटला नव्हता. परंपरागतता की परंपराप्रियता... अमुक एका करियरमागे धावायचं वेड नव्हतंच. सगळ्यात रस होता. स्वैपाक, घर आवरणं, मोठ्यांची, नवर्‍याची सेवा, त्याशिवाय स्वत;चं वाचन, शिवण, नाटक, सिनेमा बघणं... एवढंच नाही तर गप्पांमधे एखाद्या विषयावर आपलं मत ठामपणे मांडणं, चर्चा करणं... असं देव देव तरी आपण करू असं आपलं आपल्यालाच कधी वाटलं होतं?... परवा उषा राजेंद्रन भेटली तर बघतच बसली. कॉलेजमधे असताना आपण तिला सल्ला द्यायचो- भले देवावर विश्वास ठेव पण इतकं... आणि आता आपणच?...
ती घरात शिरायला आणि सासू दारातून बाहेर पडायला नेहेमीसारखी गाठ पडली. सासूनं हात उलटा करून तळव्याखाली मनगटावर बांधलेल्या घड्याळात निरखून निरखून पाहिलं. हुऽऽश्श! केलं. डाव्या तळव्यावर उजव्या हाताची आडवी मूठ आपटून टॉक टॉक असा आवाज करत, "कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या, आम्हाला मात्र-" असं म्हणत पुढे गेली...
तिनं कान लक्षपूर्वक बधीर करून घेतले होते. आत आली. सासरे पेपर वाचत बसले होते. तिला बघून हसले. "जेवायला वाढू का?" असं तिनं विचारल्यावर, "असू दे! असू दे! वेळ आहे अजून. तुम्ही बसा!" म्हणाले...
ती मोरीत गेली. हातपाय धुतले. बाहेर येऊन देवासमोर आसन मांडलं. देव्हार्‍यातला स्तोत्रांचा गठ्ठा काढला. जपाची माळ काढली. वेलवेटच्या हातमोज्यासारख्य़ा पिशवीत हात घालून- दत्तगुरू, दत्तगुरू... मोकाट सुटलेल्या आठवणी त्रास देऊ नयेत म्हणून जप करायचा, नुसतं शंखासारखं बसून रहाता येत नाही म्हणून जप करायचा, नुसता जप करायचा म्हणूनही जपच... जप करताना तंद्री लागली की पुन्हा भूतकाळ, अपूर्ण वर्तमानकाळ, भविष्यातला काळोख आणि जगणं हे असं... मरण्याचं धाडस नाही म्हणून... असलं सगळं दुष्टचक्र. ते आजवर इतक्या वेळेला फिरून फिरून अजिबात थकलेलं नाही. आणि आपण?... निदान एक घर मिळालं... नाहीतर आईबापाचं घर सुटलेलं, दुसरं आपण सोडलेलं म्हणजे लांडग्यांना पर्वणीच. लांडग्यांच्या नजरा आता हातात मंगळसूत्र धरलं तर आपल्यालाच सौम्य तरी वाटतील... एरवी काय झालं असतं?... लग्नाचं घर तुटलं म्हटल्यावर गरती बाई हा शिक्का पुसायला जग तयारच होतं- "हलवा परशुरामाला मी बैसले जपाला, बोला हो कुणी बोला..." भसाड्या आवाजातलं गाणं... दारातून येणार्‍या सासूबरोबर... मागोमाग ते टिपिकल हसणं... तिच्या कानात सुरीसारखं शिरलं. एरवी बधीर कानानं तशीच बसून रहाणारी ती, उठली. तेवढ्यापुरतीच आत आलेली सासू, "ए म्हसण्याऽऽ" असं कुणालातरी हाक मारत खिदळली, चालती झाली...      
(क्रमश:)   

Saturday, May 11, 2013

बेटं तर झाली... पुढे?

लहानपणी पहिल्यांदा ’माणूस नावाचे बेट’ असा उल्लेख कुठेतरी वाचला.
म्हणजे काय? हे म्हणजे काहीतरीच! असे भाव दाटले. चेहेर्‍यावर राहिले.
नंतर कधीतरी ते नाटक आहे, तेंडुलकर नावाच्या सदीच्या महानायक नाटककाराचे ते आहे हे कळलं. ते बघायचा योग आला नाही पण वाचायला मिळालं.
माणूस म्हणजे बेट झालंय हे त्यानी साठोत्तरी दशकात जाहीर केलं. दुसर्‍या महायुद्धानंतर लिहित्या झालेल्या ’नव’ कथा, कविताकारांना माणूस एकाकी आहे हे जाणवलं होतंच. सगळ्या जगभर या गोष्टी दोन्ही महायुद्धानंतरच्या उलथापालथीनंतर दृगोचर होऊ लागल्या.
ही बेटं प्रत्यक्षात बघता, अनुभवता आली नव्हती. माझ्यापर्यंत ती थेट पोचली नसावीत. खरं म्हणजे मी अशा अनुभवांपर्यंत थेट पोचलो नव्हतो असं म्हणायला पाहिजे. अनेक घटना, भावना, विचारांच्या धुक्याआड अनेक गोष्टी त्यांची त्यांची वेळ आल्यावर जाणवत, लक्षात येत असाव्यात.
हल्ली त्या प्रकर्षानं जाणवू लागल्या आहेत.
माणसं, अनेक वर्षांची सवय असलेले मित्र अचानक समोरून अनोळखी होऊन निघून जातात. मी खुळ्यासारखा बघत रहातो. हसलेला असतो, हात दाखवलेला असतो, कधी चौकशी करायला थांबलेलोही असतो. पोपट होतो. पोपट झाला की राग येतो. समोरून अचानक असा प्रतिसाद येण्यासारखं मी काहीच केलेलं नाही असा पहिला विचार येतो. मग असं का? या विचाराचा भुंगा खायला सुरवात करतो. त्याची सुई नेहेमीप्रमाणे मी स्वत:च असतो. मग स्वत:ला पोखरून पोखरून झाल्यावर लक्षात येतं, अरे! त्या तसल्या प्रतिसादाचं केंद्र तर समोर होतं! मग मी कशाला माझ्या दिमागचं दही करून घेतोय! हा झाला माझा प्रवास.
बरेचसे, जा! गेलास उडत! असे असतात. त्यांचा हेवा वाटायला लागतो. पण आत कुठेतरी वर्षानुवर्षाचे बंध तुटल्यामुळे खुपत राहतं. माझ्या दृष्टीने माझी चूक नसताना. समोरच्याने मात्र ’ठान’ लेली असते. मी असाच वागणार! त्याना आत काही खुपत नसेल? का करत असतील असं हे? न्यूनगंडातून? अहंगंडातून? प्रचंड संकटं आल्यामुळे? की परिस्थितीवश एखादा दिवा तेल आणि वात कमी कमी होऊन विझत जावा तसे विझत जात असावेत हे आतून? किंवा भडकत, मी! मी! माझं! माझं! असं करत आणखी आणखी मिळवतो आहे याची नशा चढवत असावेत हे?
गरज नाही समोरच्याची म्हणून त्याच्याशी असं वागत असावेत हे? काय असावं?
मग मी माझाही झाडा घेऊ लागतो. मी भूतकाळात नव्हतो का काही कारणानी कासव झालो होतो? आत आत मान घालून जगाशी संबंध तोडून घेत होतो. काही काळ असं वागणं शक्य असावं.
मग मला मागचे काही संबंध संपल्यासारखे नाही का वाटायला लागले. एका मोठ्या वयाच्या मित्राला विचारल्यावर तो म्हणाला होता, लहानपण एकसारखं असतं, मोठं झाल्यावर प्रत्येक माणूस वेगवेगळ्या दिशेने वाढतो. मग समानधर्मी काहीच रहात नाही. मग बालपणीचे ते रम्य इत्यादी दिवस गतरम्येतेतच रहातात. समोरासमोर आलो की काय बोलावं तेच कळत नाही, गतरम्यताच उगाळली जात रहाते.
अलिकडे जे जाणवलंय ते थोडसं मध्यमवयीन अडचणी- middle life crisis च्या दिशेने गेल्यासारखं वाटतंय. पण ते तेवढंच नाही. कॉर्पोरेटी झगमगाटातल्या तरूणांचंही असं होतंय असं दिसतं.
एखादा स्तरच असा आहे की हे सार्वत्रिक आहे? मग सोशल नेटवर्कींग साईट्सनी ही दरी काही प्रमाणात तरी बुजवली आहे की बुजवलेली ही दरी आभासमय आहे?
मतं पटत नाहीत म्हणून, स्वभाव म्हणून अंतर राखून राहणं समजून घेता येईल. पण हे जाणवलेलं वेगळं आहे. इथे अचानक, माझ्या दृष्टीने, समोरच्याच्या दृष्टीने नियोजित असा पूर्ण बहिष्कारच व्यक्त होताना दिसतोय. अनेक वेळा तो वैयक्तिक नाही तर सार्वजनिक आहे असंही दिसतंय.
कदाचित हे असं चालूच असेल. माझं लक्ष आज तिथे वळलं असेल.
काळजी वाटते. मीही काही खूप सोशल, सदैव भेटीगाठी करत असणारा माणूस नव्हे. काही कारणांनी, काही वेळा बहिष्काराचा अवलंबही करावा लागलाय मला. काळजी आपण तसे झालोत, होऊ, ही नाही. एकूणच हे बेट प्रकरण बेटं माझ्या मनात हल्ली चांगलंच रूजून बसलंय.
दुसरीकडे वैद्यकीय सल्ला सतत हा दिला जातोय की सतत माणसं जोडा, मित्रं जोडा, माणसात रहा! तुमच्या अनेक रोगांचं मूळ तुमच्या एकटेपणात आहे.
माणूस मुळातच एकाकी आहे. कुटुंबसंस्थेत रमलेला दिसला तरी.
यातून मला जाणवलेला धडा मी घेतोच आहे.
बेटं तर झाली... पुढे? हा विचार मात्र खाऊ लागला आहे हे खरं!      

Saturday, May 4, 2013

कथा: भूक (२)

भाग १ इथे वाचा!
तर... त्याच्यासाठी नाश्ता तयार... म्हणजे जवळ जवळ जेवणच. पेज, मऊभात असं. ते त्यानं ओरपून ओरपून खायचं. खाणं म्हणजे, जेवणं म्हणजे एकापाठोपाठ एक नुसती हातांची हालचाल. तोंडाकडे. मग त्या घाईमुळे शितं किंवा सदृश द्राव मिशांवर, जवळ जवळ छातीपर्यंत वाढलेल्या- वाढवलेल्या दाढीवर. ते पुसून हातांचं काम पूर्ववत...
हात धुऊन झाल्यावर... ताटातच... बायकोनं तत्परतेने ताब्यांच्या कलशातून आणलेलं पाणी गटागटा पिऊन.. हात भगव्या लुंगीला पुसत... हूऽऽ अफ असे आवाज काढत... तोंडाने... ढेकर असावेत... दारामागच्या सुवासिक तंबाखूचा डबा काढून काम चालू... बाहेर दाराच्या बाजूला, वाट्याला आलेल्या चाळीच्या गॅलरीतून... मच मच असं करत... रस्त्यावरची वर्दळ बघत... उदबत्तीच्या उरलेल्या काडीने दात कोरत...
आता पोटात गेल्यामुळे थोडी तृप्त थोडी आडमुठी नजर. नजरेतला आडमुठेपणा कायम. कधी मधेच मोकळं हास्य, चेहेरा ’हो, हो’ या अर्थानं हलवत. पण तेही लक्षात येऊन की काय पुन्हा नजर आडमुठी. ती चेहेर्‍यातच स्थिरावलेली. कायम.
तोपर्यंत ती... वर ठेवलेली त्याची ऑफिसची बॅग काढून... तोंडानं तिचंही स्तोत्र म्हणणं चालूच. स्वैपाक करत असल्यापासूनच... जेवणाचा डबा बॅगेत भरून आता त्याचे दारामागचे सॅंडल्स काढून फडक्याने पुसत...
त्याचं अजूनही काहीतरी बाकीच. आता काचेच्या शोकेसच्या दाराआडून... धार्मिक ग्रंथ. जाडजूड. पत्र्याच्या खुर्चीत बसून वाचत... उजवा पाय डाव्या पायावर ठेऊन... घोट्याजवळ चोळत... खाजवत... इतका वेळ मांडी ठोकून बसल्यामुळे होणारा त्रास...
बरोब्बर आठ वाजता पुस्तक- ग्रंथ बंद. कपडे करणं, आधी भगवा मुंडा घालून मग त्यावर शर्ट. पॅंटमधे इन करून. मानेपर्यंत वाढवलेल्या केसांवरून, लांब दाढीवरून कंगवा फिरवत. आरशासमोर. ठसठशीत लावलेलं लाल कुंकू. आडव्या फासलेल्या भस्माच्या पट्ट्यांवर. ते आरशात न्याहाळत...
लगबगीनं ती पार्टीशनवजा पडदा ओढून. रंगहीन. हुक्सवर फाटलेला. कुबट वास येणारा. साडी बदलून ती तयार. हा एकटाच बॅग घेऊन पुढे... आठमुठा नजरेतला आता शार्प. त्याच्या पाठोपाठ ती. त्याच गडबडीनं. जरा पाऊल कमी जास्त पडलं तर मार बसेल या भीतीवजा नजरेनं... असावी... चालत...
नजर सतत खाली. इतकी की भाजी, प्लॅस्टिकची खेळणी, किसण्या, बरण्य़ा, फळं अशा विकायला ठेवलेल्या वस्तूंवरूनच नजर फिरायची. त्या विकणार्‍यांचे चेहेरे तिनं कधी बघितलेच नसावेत. पसरलेल्या तुटक्या चपला, बूट, गढूळ पाण्याचं रबरी खोकडं, चपला ठोकून ठाकून शिवणारे काळे बरबटलेले हात दिसले की वळायचं हे-
अरे!... हे... फताडे पाय आणि शिऊन शिऊन तुटलेल्या की तुटून तुटून शिवलेल्या चपला... तोच आहे का ते बघावं? शी:ऽऽ त्याचं तोंडसुद्धा पहायचं नाहीये!... मान खाली घातलेला तिचा चेहेरा आणखी आत... कासवानं आपलं डोकं आत आत घ्यावं तसा! किती आत?... सगळं शरीरच जावं आत कुठेतरी... पाताळात...
ज्याचं तोंडसुद्धा बघायचं नाही त्याचे पाय बघायला लागले!... हे असं आपल्याच बाबतीत... न्यूनपणाच्या गर्तेत कोसळता कोसळतानाच स्वत:ला सावरायचे कसेबसे प्रयत्न... तिची नेहेमीची धडपड... हो! त्याच्याच चपला त्या! त्याच्याच!...
किती दिवस काढले त्याच्याबरोबर? वर्ष दोन वर्षं... त्या लग्नाआधीचं जवळ जवळ वर्ष आणि नंतर वर्षभरच... नको त्या आठवणी!... सगळ्या चपलांसारख्याच तुटक्या, फाटक्या, विटलेल्या, नाहीतर... पुन्हा पुन्हा शिवलेल्या... त्यानं स्वत:हून विचारलं म्हणून आपण एवढ्या... की सगळं सर्वसाधारण मिळालं ह्यातच समाधान... आपल्याला हे कमीत कमी गोष्टीत आनंद मानून घ्यायचं कुणी शिकवलं? का स्वभावत:च...
दत्तगुरू दत्तगुरू... आडव्या आलेल्या मोकाट गाईंच्या झुंडीसारख्या आठवणी घालवायला तिनं जप सुरू केला...  कायद्यानं जरी वेगळे झालो तरी आठवणी कशा मनावेगळ्या करणार?... तिची पावलं मंदावली. त्यानं- तिच्या आत्ताच्या नवर्‍यानं- मागे वळून पाहिलं... कपाळावरची त्याची शीर ठळक दिसली तशी तिच्या पावलांनी वेग घेतला...
देवळात ती डोळे मिटून शांत बसली रोजच्यासारखी. तरीही मिटल्या पापणीवर- पडद्यावर दिसावेत तसे- फताडे पाय आणि तुटलेली अंगठ्याची वादी... मग मळकट कपडे- सततच्या घामामुळे दोन दिवसात कळा आलेले- तिनं मोठ्या हौसेने, नव्या फॅशनचे, त्याच्यासाठी शिऊन घेतलेले... त्यात कोंबलेला, पोट पुढे काढून चालणारा तो... सततचं हसणं... आव आणून आणून बोलणं... ऊतू जाणारं प्रेम... आणि वागणं?... झटपट सगळं उरकून बाजूला होणं... फक्त भाव करणं आणि नंतर पैसे देणं नाही- एवढाच काय तो फरक... बाकी सगळं तसंच!... शी:‌ऽऽऽ... तिने   डोळे उघडले. दचकून उठून उभी राहिली. चमकून इकडे तिकडे पाहिलं. नवरा रस्त्यावर दूर... पाठमोरा... हातात बॅग घेऊन ऑफिसला...                                                                                          (क्रमश:)       

Monday, March 18, 2013

कथा: भूक (१)

...चला बाई! आज एवढ्या ह्या जेवणावळी झाल्या की सांगता झाली या व्रताची! यथासांग सगळं पार पडतंय. शेजारणी चिडवत होत्या सारख्या. मुलगा झाला तेव्हाही एवढ्या टवटवीत दिसत नव्हता म्हणे!... मुलगा काय, मूल झालं हेच केवढं मोठं सुख!... मग मागितलेलं मिळालं म्हटल्यावर व्रताचं उद्यापन. त्याच्या या जेवणावळी. जास्तीत जास्त माणूस जेऊन जायला हवं! काही कमी पडता उपयोगी नाही! महादेवानं काही कमी पडू दिलं नाहिये मग-
"माई, कुणी बैरागी आलेत दारावर ते-"
"अगं बोलाव, बोलाव नं त्याना आता! दारात कशाला तिष्ठवलंस? बोलावं!"
"माई ते तुम्हाला भेटायचं म्हणतात!"
"मला?... बरं... हे घे! हे पात्रं आत देऊन ये बरं तू!"
दारात दोन बैरागी. एक प्रौढ- पांढर्‍या मिशा, पांढर्‍या जटा, दोन्ही वयापेक्षा लवकरच पिकलेल्या. कपाळावर भस्माचे पट्टे. गंधसुद्धा. नजर रागीट आडमुठी... दुसरा पोरगेलासा. तो हसला. निरागस. हसणं तसंच चेहेर्‍यावर. त्यामुळे वेडगळ वाटणारं. चेहेर्‍यावर सतत वहाणारा घाम. तो म्हणाला, "बाई, माई, ताई, आई- भिक्षा!" आणि स्वत:च ठसका लागल्यासारखा हसला. अभिप्रायार्थ बरोबरच्या प्रौढ बैराग्याकडे नजर टाकली. प्रौढ तसाच एकटक, निर्विकार, ऑलप्रुफ- नजर. कोर्‍या कापडाच्या चिंधीसारखा फाटत जाणारा स्वर-
"आम्हाला हवी ती भिक्षा मिळेल?"
"महाराज, आज घरात काही कमी नाही! आज महाव्रताची सांगता-"
"बाई पुन्हा विचारतोय, आम्हाला हवी ती-"
"जरूर महाराज! आज्ञा व्हावी!"
"मुसळ आणा!"
"महाराज मु-"
"उखळ कुठे आहे?"
"महा- हे का- चलावं... स्वयंपाकगृहाकडे चलावं!"
दुसरा, तो तरूण बैरागी हसतोय तसाच- मघासारखा. त्याच्याकडे पाहिल्यावर- ’तुम्हाला कळणार नाहीऽ गंमत आहे आमची!’- अशा अर्थाचं हसणं... पानचट... या बैराग्यांना काय हवंय?"
"चल रे चल स्वैपाकघरात!"
बाईऽऽऽ... माझ्या मुलाला नेतोय हा आत? स्वैपाकघरात?... आई गऽऽऽ... त्या हसणार्‍या, घामेजलेल्या तरूण बैराग्याने माझ्या मुलाल उचललंय आणि- आणि- त्या उखळात-
ती जागी झाली! धडपडतच!... तो पत्र्याच्या खुर्चीवर बसलाय. तांब्याच्या मोठ्या भांड्यातून पाणी पितोय. तिच्याकडे बघून हसला. हसणं कमीच. कुणाची फजिती झाली तरच. एरवी... घाईघाईत तिनं सगळं उरकलं... तशीच मोरीत शिरली. दरवाजा लावला... थंडगार पाणी रोजच्यासारखं डोक्यावर ओतून घेतल्यावरच ती तयार झाली. दिनक्रमासाठी... आंघोळबिंघोळ आटपून त्याचंही सुरू झालेलं साग्रसंगीत... ठाण मांडून... खोलीच्या मध्यभागीच. लोकरी आसनावर...
अरविंदमादोम... अथम सोमो कृतम सोमो... सोमाय नम:... मैत्र मैत्रवान भवति... मैत्र मैत्र...
मधेच जांभई आल्यावर चक चक असा डिस्टर्ब झाल्यासारखा आवाज काढत, अंगाला आळोखेपिळोखे देत पण तोंडानी सतत मंत्रसदृश- मंत्रच असावेत, असे एकावर एक चढत गर्दी करणारे उच्चार... मधेच चुटकी, टाळी वाजवून, दोन्ही हात जोडून ते गोफण फिरवल्यासारखे डोक्यावर फिरवत...
दीड- दोन तासाने सगळं संपल्यावर मन:पूर्वक हात जोडून आचमन. ताह्मणातलं पाणी तुळशीला. सूर्याला हात जोडून मनोभावे नमस्कार. मग भगवी लुंगी नेसून... जरा चमत्कारिकच वाटावी अशी नजर. आपण जे काही करतोय त्याच्या अभिप्रायार्थ किंवा मग स्वत:तच... दुसरीकडे कुठेही नाही... आडमुठ्यासारखं किंवा...
ती... घाईघाईत... रोजच. वाघ मागे लागल्यासारखी... स्वैपाकाचं नीट जमतंय का नाही असं... किंवा... गेले साधारण नऊ- दहा वर्षं... हे लग्न झाल्यापासून... असंच...                    (क्रमश:)   

Thursday, October 27, 2011

माध्यमं.. मुलं.. समाज..

कार्टून फिल्म्स ज्यांच्या अत्यंत आवडत्या होत्या ती बालकं कालांतराने टीव्हीवरच्या कौटुंबिक मालिकांमधे रमली.आता ती बालकं सोशल नेटवर्कींग साईट्सच्या आहारी गेली आहेत.वेगवेगळी सर्वेक्षणं आणि त्यांचे प्रसिद्ध होत रहाणारे निष्कर्षं मनोरंजक असतात.त्यांमधे तथ्यंही असतंच.
लहान मुलं दूरचित्रवाणी मालिकांमधे काय बघत असतात, किंवा होती? चकचकीत घरं? सतत लग्नंसमारंभातले कपडे घालून वावरत असलेले स्त्रीपुरूष? त्यांची भांडणं? कट आणि डावपेच? असंख्य विचित्र नमुने एकत्र असलेली कुटुंबं? त्यातला कमीतकमी एखादा ते अनेक विकृत?... की मालिकांमधे दाखवल्या गेलेल्या लग्नसंस्थेतला किंवा कुटुंबसंस्थेतला अत्यंत महत्वाचा घटक अर्थात विवाहसंबंध?... आपण जाणते आहोत.जाणत्या लोकांसाठी त्यांच्यातल्याच जाणत्यांनी सार्वजनिक माध्यमांचा आसरा घेऊन केलेली प्रत्येक कृती भावी समाजमनावर परिणाम करणारी आहे हे आपल्या लक्षात येत नाही? की डेलिसोपवाल्यांनी, कॉमेडी शोजवाल्यांना, माईंडलेस (?) कॉमेडीवाल्यांनी रिऍलिटी शोजवाल्यांना बोल लावायचे आणि त्यांनी न्यूज चॅनल्सना? आणि मग त्यानी चित्रपट उद्योगाला? कलाकृती मांडण्याचं स्वातंत्र्य- फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आणि सामाजिक जाणीव यांची सांगड कोणी आणि कशी घालायची? साधारणत: दूरचित्रवाणीवरून सादर होणारय़ा सरासरी कार्यक्रमांना ’एक्सप्रेशन’ चा दर्जा देता येईल? असं प्रकटीकरण की ज्याचं स्वातंत्र्य धोक्यात आलं म्हणजे फार मोठा आघात झालाय मानवी मूल्यांवर वगैरे?...
एकीकडे विवाहबाह्य संबंध अपरिहार्य आहेत असं चित्र दाखवायचं आणि दुसरीकडे निरांजनातली ज्योत विझणं, करवा चौथच्या दिवशी (हा हल्ली मराठी मालिकांमधेही सर्रास साजरा होतो) नेमकं अघटित घडणं, यासारखे तेच ते अपशकुन, यातून आपली बालकं काय बोध घेणार आहेत? विनोदासाठी कुटुंबातल्या एखाद्या आदरस्थान असलेल्या माणसाची संवंग पद्धतीने खिल्ली उडवणं यातून ही मुलं काय शिकणार आहेत? माणसाचं सबंध आयुष्य घडवणारय़ा सुरवातीच्या वर्षांत, संस्कारक्षम मुलांना जे बघायला लागतंय त्याची जबाबदारी आपल्यावर नाही? ती पार पाडायला आपण पालक हतबल आहोत, असमर्थ आहोत? मुलांनी बघू नयेत असे कार्यक्रम मुलांच्या तोंडावर बंद करण्याचं धारिष्ट्य आपल्याजवळ आहे? जरा जाणत्या मुलांना ’सोशल नेटवर्कींग साईट्सची सफर बस्स झाली आता! या महाजालातून आता लवकर बाहेर पड!’ असं सांगणं आपल्याला जड जातंय? मुळात आपलं आपल्या मुलांच्या हालचालींवर योग्य लक्षं आहे का? ते नक्की काय बघतात यावर आपण सतत लक्षं ठेऊ शकतो का? नाहीतर मग काय?..
विषयाला हात घालताना असे अनेक प्रश्नं समोर येतात.नेहेमीचेच वाटणारे पण नेहेमीच अनुत्तरित रहाणारे..
मुलं कार्टून बघत होती.त्यात दाखवलेल्या अतिरिक्त हिंसेमुळे मुलं हिंसक बनतात असं मत मांडलं गेलं.ही मुलं मग दूरचित्रवाणीवरच्या मालिका बघण्यासाठी आटापिटा करू लागली. ’सतत विवाहबाह्यसंबंध ठेवायचे, मग विवाह का करायचा? संबंध असेच का नाही ठेवायचे?’ असे प्रश्नं त्यांच्या मनात, डोक्यात आणि मग कदाचित ओठांवर येऊ लागले.आता तर वर्ल्ड वाईड वेब त्यांच्यासमोर खुलं झालंय.. आता ती परस्परांमधे चॅट करतात.पडणारे प्रश्नं ते आपापसात सोडवतात.काय असतात त्यांची सोल्यूशन्स? कशावर आधारित असतात त्यांची मतं? माध्यमलोंढ्यातल्या त्या हातोडाबाज (हॅमरिंग) मतांवर? असलं हॅमरिंग की जे कुठल्यातरी वाहिनीचा, कुठल्यातरी व्यक्तीचा, कुठल्यातरी अतिरेकी राजकारणी, अतिरेकी धार्मिक समुदायाचा अल्पकाळाचा स्वार्थ साधणारं आणि सगळ्या समाजाच्या दूरगामी तोट्याकडे हेतूपूर्वक/अहेतूपूर्वक दुर्लक्ष करून सवंग पद्धतीने मांडलेलं असतं? जे कदाचित समाजाला खड्ड्यात लोटणारं असू शकतं?
मुलं परिपक्व होतील, योग्य, अयोग्य त्याना समजू शकेल अशा पद्धतीचे संस्कार आपणंच त्याना देऊ शकतो.माध्यमांमधलं चांगलं काय हे आपण मुलांना सांगू शकतो.त्याना त्या दिशेने वळवू शकतो.आपल्या डोळ्यांसमोर त्यांच्याकडून तसं होतंय की नाही हे बघू शकतो.आपल्या दृष्टीआड असलेल्या सृष्टीबद्दल काय? जरा जाणती मुलं आपण दृष्टीआड होण्याचीच वाट बघत असल्यासारखी बसून असतात.त्याना स्वत:च्या बळावर, त्याना संपूर्ण मुक्त झालेल्या सृष्टीची मन:पूत सफर करायची असते.मग काय? त्याना तसं करू द्यायचं? असं करत करत, पडत, ठेचकाळतच ती शिकतील हे मान्य करायचं? मुलांना शिस्त कशी लावायची? मारणं, झोडणं कितपत योग्य आहे? आजच्या काळात? मग त्यांना मारण्याझोडण्या व्यतिरिक्त शिक्षा करायची? काय शिक्षा करायची?
मुलांना सतत कुठल्या न कुठल्या सकारात्मक कामात गर्क ठेवायचं!.. म्हणजे? त्यांना अनेक ऍक्टीविटी क्लासेसना, संस्कारवर्गांना घालायचं.शाळा, शिकवणीवर्ग आणि मग संस्कारवर्ग असं वेळापत्रक सेट करायचं? बस्स! मग काय चिंता? हा योग्य उपाय आहे? तो किती प्रमाणात व्यवहार्य आहे? सगळं करून झाल्यावरही आजकाल वेळ उरतोच मुलांना म्हणे! मग विरंगुळ्यासाठी त्यांनी नाही वळायचं माध्यमांकडे?..
पूर्वी वर्तमानपत्रं येतंच होती की घरी! त्यात नव्हते चोरय़ा, डाके, बलात्कार, खून? वर्तमानपत्रंही खुलीच होती की? चित्रपटही होते.नंतर ते दूरचित्रवाणीवरही आले.. पुस्तकं, मासिकं यायची की! वडलांच्या, आजोबांच्या खोलीत, कपाटात, टेबलावर विराजमान असायची! मुलं बागडायचीच की घरभर!..
जग बदलत चालंलय! मूल्यं बदलताएत! मूल्यांचा र्‍हास होत चाललाय! आणि त्याचवेळी जग आणखी आणखी जवळ येत चाललंय! एकत्र कुटुंब पद्धती उतरणीला गेलीय.कुटुंब लहान सुख महान म्हणत म्हणत घर म्हणजे एकट्या, एकाकी जीवांसाठीच्या प्रयोगशाळा झाल्या आहेत.कॉंक्रिटची जंगलं तयार झालिएत.यात रहाणारय़ा जीवांचं विरेचन कसं व्हायचं? त्यांनी व्यक्तं कसं व्हायचं? मुलांमधे जी प्रचंड उर्जा असते तिची घुसमट या मुलांना, आपल्याला, या समाजाला कुठे नेणार?
वळण, शिस्त लावणारी पालक मंडळी आहेत.टोकाची, प्रसंगी घरात टिव्ही, कॉम्प्युटरच न ठेवणारी पालकमंडळीही आहेत.वाचन, चित्रकला, नृत्य, वाद्यवादन असे छंद; छंद म्हणून जोपासायला उद्युक्त करणारी पालकमंडळी आहेत.त्यांच्या संख्येत वाढ होतेय.पण सर्वसाधारण चित्रं काय दिसतं? ’तुला शिकवणीवर्गासाठी लांब जावं लागतंय, घे हा मोबाईल!’ असं म्हणून त्याच्या हातात एकविसाव्या शतकातलं, नव्या सहस्त्रकातलं असं प्रभावी आयुध दिलं की आपलं त्या मुलावर, त्याच्या हातातल्या त्या वस्तुच्या वापरावर कितपत नियंत्रण रहातं? अपरिहार्य व्यवहारातून निरोगी मानसिकता कशी घडवायची?
मुलं चांगली असतात.समंजस असतात.पुढची पिढी अधिक समंजस आहे.त्याना जास्त कळतं.आपण सगळेच दिवसेंदिवस अंगावर येणारय़ा वेगवेगळ्या माध्यमप्रवाहांच्या लोंढ्यांशी स्वत:ला जुळवून घेत जगू शकू.आपल्या वातावरणाशी, सभोवतालाशी जुळवून घेत मानवजात आगेकूच करतेय.त्यातलं जे चिरकाल टिकणारं असेल, मानवाच्या पुढील प्रवासाला अनुकूल असेल ते टिकेल; बाकीचं नष्टं होत जाईल.
डार्विनचं तत्वज्ञान इथे लावता येईल?