romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins
Showing posts with label अभिनय. Show all posts
Showing posts with label अभिनय. Show all posts

Monday, January 18, 2016

नजरेतून अभिव्यक्त होणं...

नजरेतून व्यक्त होणं हा कॅमे-यासमोरच्या अभिनयाचा महत्वाचा भाग आहे.
नजरेतून व्यक्त होणं, चेहे-यातून व्यक्त होणं, आवाजातून व्यक्त होणं, हातवारे, हालचालीतून व्यक्त होणं हे सोईसाठी सुटंसुटं समजलं गेलं तरी संपूर्ण देहातून व्यक्त होणं हे अभिनयाचं मर्म आहे.
एरवी एखादा एखाद्या अंगाने आपसुकच चांगला व्यक्त होत असतो. या कामात आपण यशस्वी होतोय हे त्याला जाणवू लागतं. तो बनचुका होऊ लागतो.
व्यावसायिक क्षेत्रात अशा एखाद्या यशस्वी अंगाची शैली बनते. लोक त्यावर फिदा होत असतात. ते करणारा स्वत:वर फिदा होऊ लागतो. मग ते हास्यास्पद होऊ लागतं.
पूर्णपणे भूमिकेत शिरणं, स्वत:चा संपूर्ण कायापालट करणं ही खूप मोठी साधना आहे. काही जणांमधे असं करण्याची क्षमता उपजतच असू शकते पण म्हणून सततच्या साधनेचं महत्व कमी होत नाही.
सर्वसाधारणत: भूमिका वठवण्याच्या दोन ठळक पद्धती मानल्या जातात. भूमिका काय आहे हे समजल्यावर आतूनच तिची तयारी चालू होणं. आधी आत्मा गवसणं आणि मग भूमिकेला शरीर मिळणं अशी एक पद्धती मानली जाते तर भूमिकेबद्दलच्या कलाकाराच्या आकलनानुसार  शरीर, आवाज, हावभाव आधी नक्की करुन भूमिकेच्या आत्म्यात शिरायचा प्रयत्न चालू करणं ही दुसरी पद्धती मानली जाते.
अभिनयात तंत्राचा भाग खूप आहे. केवळ उत्स्फूर्ततेवर कायम अवलंबून रहाता येणं शक्य नाही.
अभिनयासंदर्भात काही जण केवळ उत्स्फूर्ततेचा उच्चार करत असले तरी त्यानी तंत्र घोटवून अगदी सहज वाटावं इथपर्यंत मुरवलं असल्याचं ध्यानी येतं.
नजरेतून यथार्थपणे व्यक्त होण्यासाठी संपूर्ण कायापालटाची गरज असते तरी नजरेचा वापर कसा करावा याचीही तंत्रे आहेत.
मी शिकलो ते एकांकिका नाटकं करत करतच. प्रत्यक्ष नाट्यशिक्षणवर्गातून शिकणं कायम मला हुलकावणी देत राहिलं.
पण मला सुरवातीलाच एक हाडाचा शिक्षक म्हणा, तालिम मास्तर म्हणा लाभला. नवीन माणूस अभिनयाला जरासा अनुकूल वाटला तर त्याला त्याच्या स्वभावधर्माप्रमाणे कसा तयार करायचा हे कसब त्याच्याकडे होतं.
एका जुन्या जमान्यातली कालांतराने पडझड होऊन अज्ञातवासात गेलेली चित्रपटनायिका प्रमुख पात्र असलेल्या एकांकिकेत मी एक फारसा वाव नसलेली भूमिका करत होतो. लेखक-दिग्दर्शक तुलनेनं नवीन होता. माझ्याकडून त्याला हवं ते काढून काढून तो दमला. त्याचं आणि वर वर्णन केलेल्या हाडाच्या शिक्षक- तालिम मास्तराचं याबद्दल काही बोलणं झालं असावं. तालिममास्तर दुस-या दिवशी तालमीला आला. माझ्या सीनची तालिम सुरु झाली. चार पाच वाक्यांचा माझा काही भाग होता. ती वाक्यं मी कशी अभिव्यक्त करायची हे सांगत असताना त्याने नजरेचा प्रवास उलगडूनच दाखवला.
मी करत असलेलं पात्र नायिकेशी बोलत असतं असा प्रसंग होता. सुरवातीला त्या पात्राची नजर नायिकेच्या चेहे-यावर आहे. तिच्याशी बोलत असताना ते पात्र त्या दोघांच्या गतायुष्यात शिरतं. पात्राचा चेहेरा आणि त्याची नजर नायिकेच्या चेहे-यावरुन निघून प्रेक्षागृहावर प्रवास करु लागते. त्यानंतर ते पात्र त्या आठवणींमधे रमतं. नजर प्रेक्षागृहावर एका काल्पनिक बिंदूवर स्थिरावते. हरवते. या तंत्राचा सराव करायला लागल्यावर माझा ताण बराच कमी झाला. त्या प्रसंगापुरतं तरी मला भूमिकेच्या अंतरंगाकडे जाणं सोपं वाटू लागलं.
भूमिका केवळ ती सादर करणा-यालाच पटून चालत नाही तर समोरच्या प्रेक्षकांना ती पटवून द्यावी लागते. नजरेच्या प्रवासासंदर्भात पात्र गतकालात गेलं आहे, ते विचारात पडलं आहे, ते तंद्रावस्थेत गेलं आहे अशा छोट्या छोट्या गोष्टी यथार्थपणे सादर करण्याचं तंत्र असं एकिकडे पात्राला भूमिकेत शिरायला मदत करतं आणि प्रेक्षकाला वास्तवाजवळ नेतं. तालिममास्तर हे अचूक करुन दाखवायचा. समजावून सांगायचा...
कालांतराने एका मालिकेत काम करत असताना एका देखण्या नटाला कॅमे-यामागे आणि कॅमे-यासमोर पहाण्याची संधी मिळाली. कॅमे-यामागे तो सतत वात येईल इतपत बडबड, चेष्टामस्करी करत असायचा. हातात सीनचे कागद असायचे. कॅमे-यासमोर गेल्यावर मात्र त्याच्यात आमूलाग्र बदल झालेला असायचा. भावदर्शन तर तो उत्तम करायचाच पण प्रेक्षकाला टीव्हीची चौकट नेमकी केवढी दिसते याचं चांगलं भान त्याला असावं. आपण कल्पिलेल्या त्या चौकटीच्या अवकाशात तो नजरेचा प्रवास मांडायचा. माॅनेटरवर तो सीन बघताना त्या सीनमधे तो करत असलेल्या पात्राला काय म्हणायचं आहे ते अचूक कळत असे. पुढे त्याला हिंदी महामालिका मिळाली. त्यात त्याचा हा प्रवास बघणं रंजक तर होतंच पण शिकवणारंही होतं...
नजरेत भय, आश्चर्य, भेदकता, अंगार इत्यादी ढोबळ भावना दाखवून लोकप्रिय होण्याचा एक काळ होता. त्याकालातले हरवलेले काही आजही सापडतील. पण नजरेतून व्यक्त होणं हे केवळ तेवढंच नक्कीच नाही.
नजरेचा यथार्थ वापर अभिनयात करताना, नजरेच्या प्रवासाचं हे तंत्र अभिनय करणा-याला भूमिकेच्या विचाराच्या सतत सान्निध्यात ठेवायला मदत करणारं आहे.
हे सगळं आठवलं एका ताज्या मालिकेतल्या एका तुलनेने नवोदित अभिनेत्रीला नजरेचा वापर यथार्थपणे करताना बघून... जे या माध्यमात विरळाच बघायला मिळतं...
(छायाचित्र आंतरजालावरुन साभार)

Monday, September 22, 2014

सावधान!

भारत हा कृषिप्रधान देश आहे. भारत खेड्यांमधे वसलेला देश आहे. खेड्याकडे चला... अशी विधानं, आवाहनं आपण गेली कमीत कमी साठ वर्षं तरी ऐकतो आहोत.
दरम्यान पुलाखालून, पुलावरुन बरंच पाणी वाहून गेलंय...
आता जागतिकीकरणाच्या जमान्यात जग हेच एक खेडं झालंय असं म्हटलं जातं.
मोबाईल, इंटरनेट अगदी शेवटच्या माणसापर्यंत पोहोचलं पण वीज, पाणी ह्या मूलभूत गोष्टी अजून खेड्यांतच काय शहरातल्या, महानगरांतल्या कानाकोपर्‍यांतही पोचल्या आहेत का?...
दुसरी गोष्ट अंधश्रद्धांची...
बरंच पाणी वाहून गेलेल्या अशाच एका पुलावर एका अंधश्रद्धा निर्मुलनासाठी आयुष्य वेचणार्‍याचं आयुष्य हिरावून घेतलं तर गेलंच पण हे कोणी केलं याचा मागमूसही लागून दिला जात नाहीए...
माहितीचा अधिकार मिळाला पण त्या आधाराने अन्यायाला वाचा फोडणार्‍या कार्यकर्त्यांच्या जीवावर बेतलंच. कुणाच्या खुनाला वाचाच फुटली नाही तर कुणाचे खटलेच रद्दबातल ठरताएत...
तुम्ही नकारात्मकच चित्रं दाखवू नका हो! सकारात्मक काहीच बोलत नाही तुम्ही!.. असा उद्गार समोरुन लगेच येतो.
आहे ना नाही कोण म्हणतोय? पुढची पिढी खर्‍या अर्थाने हुशार आहे. प्रगती, विकास तर ती साधतेच आहे पण रचनात्मक कामही ती करताना दिसतेय. पहिल्यापासून झोकून देऊन किंवा चाळीशीनंतर संपूर्णपणे. सर्वप्रकारच्या संशोधनात चमकते आहे...
दोन टोकामध्ये दरी आहे हे तर मान्य करुया...
अर्धा भरलेला ग्लास असतो. त्याच्या दोन्ही बाजू वास्तव असतात. एक बाजू नि:संशय उजवी असते पण डावं कितीही झाकत राहिलं तरी डाचत रहातं. रहातं ना?...
बसमधला, खंडहर झालेल्या मिलच्या जागेवरचा बलात्कार, दलित युवक जळीत प्रकरण अशी प्रकरणं व्हायची थांबत नाहीत.
अशावेळी काय करायचं?... ज्याला बोलता येतं त्याने योग्य असेल ते योग्य ठिकाणी, योग्य प्रकारे बोलायचं.. याच धर्तीवर लिहिणार्‍याने लिहायचं. कलेच्या माध्यमातून सांगणणार्‍यानं सांगायचं...
२०१२ आणि २०१३ या दोन वर्षी "अभिलेख" उपक्रमाअंतर्गत असा योग जुळून आला. २०१२ ला बलात्कारीत युवतीच्या प्रश्नावरचा दीर्घांक "कन्या" सादर करायला मिळाला.
२०१३ म्हणजे गेल्यावर्षी "शुभमंगल सावधान!" ही एकांकिका सादर करायला मिळाली. अनेकांच्या सहकार्याने आपल्यापरीने प्रश्न मांडता आले. त्या प्रश्नांचे सकारात्मक कोन दाखवण्याचा प्रयत्न करता आला...
शुभमंगल सावधान आणि कन्या बद्दल या आधी इथे लिहिलंच आहे. कन्याचं ध्वनिचित्रमुद्रणही सादर केलंय.
अभिलेखच्या वाचकांसाठी इथे सादर आहे शुभमंगल सावधान या एकांकिकेचं दोन भागातलं ध्वनिचित्रमुद्रण...






Friday, November 15, 2013

"शुभमंगल सावधान!" एकांकिका "कृष्णलीला" कार्यक्रमात...

कृष्णलीला, कृष्णलीला, कृष्णलीला... असा गजर घरी गेले कमीत कमी सहा महिने चालला होता... हे असं पहिलंच वाक्य तुम्हाला काय सांगायचं ते सांगून गेलंच असेल... तरीही... सांगतो... हा गजर तुम्ही ओळखला तिनेच म्हणजे आमच्या अर्धांगिनीने केलेला... तिच्या नृत्यवर्गाचा कार्यक्रम... सूत्र कृष्णलीला... तर तिला आमची एक एकांकिका त्यात बसतेय हे आठवलं आणि "कृष्णलीला" आमच्याही मागे लागली...
आता ताकाला जाऊन भांडं लपवायचं काही कारण नाही आम्हाला... आम्ही वाट बघत असल्यासारखेच... अशा संधीची केव्हापासून...
तर अशी झाली "शुभमंगल सावधान!" या एकांकिकेच्या सादरीकरणाची सुरवात...
"शुभमंगल सावधान!" लिहिली खूप आधी. मराठवाड्यातल्या एका गावातल्या एका आदिवासी तरुणीचं लग्न देवळातल्या श्रीकृष्णाच्या मूर्तीशी लावलं... अशी बातमी वर्तमानपत्रात वाचली. तिची कथा झाली. एकांकिका होईल असं नंतर कधीतरी वाटलं. मग सुनीता आणि श्रीकृष्ण असा कथेतला एकमेव प्रवेश एकांकिकेचा शेवटचा प्रवेश झाला. त्याआधीचे प्रवेश मग बांधले गेले. असं अस्मादिकानी केलं पहिल्यांदाच...
गेल्या वर्षी कन्या या लिखित, दिग्दर्शित दीर्घांकाची निर्मिती केली. यावर्षी भूमिकाही करा असा आग्रह झाला अर्धांगिनीकडून आणि आमच्या आतून तर तो होतच रहातो नेहेमी... मग जमवाजमव सुरु झाली...
ती एक मज्ज्याच असते. कलाकार निवडणं. मग त्यांनी गळणं. कुणी हो हो म्हणत अचानक कलटीची चाहूल देणं. आपण त्याना तयार करतोय असं आपल्याला वाटणं. मग नाद सोडून द्यावा लागणं. एखाद्याने घाबरून पळच काढणं इत्यादी... रिहर्सलसाठी जागा हा आणखी एक व्याप आणि ताप... असं करता करता यावेळची गंम्मत म्हणजे दोनच कलाकार उपलब्ध. त्यातले एक अस्मादिक. मग पुनर्लेखन. आशय तोच ठेवायचा. तांत्रिकता सांभाळायची. रचनेचा तोल बिघडू द्यायचा नाही... एकांकिका सोडूनच द्यायचा विचार पक्का होत चालला. पण घर आणि संच (इन मिन दोन कलाकार) यांकडून आग्रह होऊ लागला आणि अस्मादिकांना वाट सापडली पुनर्लेखनाची...
आता दोन्ही कलाकारांना पूर्णवेळ फलंदाजी... फूल फ्लेज्ड बॅटिंग... म्हणजे मेहेनत भरपूर... तीत कमी पडायचं नाही. तेवढंच एक हातातलं...
अनंत अडचणी. त्या येतातच. काही करायचं असलं तर येतातच. विचार येऊ लागला यापेक्षा भरपूर चिकित्सात्मक अभ्यास केला असता तर रोज एक पिल्लू सोडून घमासान चर्चांचे फड उभे केले असते सोशल नेटवर्कींग साईटवर तर केवढं काम झालं असतं. केवढ्याना कामाला लावलं असतं... पण काहीतरी प्रत्यक्ष करायची खाज ना? काय करणार?
संगीत, प्रकाश सगळ्यातल्या अडचणी, मोबाईल्स न उचलणं, अडलेल्याला नाडलं करुन सोडणं... सगळं नेहेमीसारखं... तसं निर्मितीतलं नवेपणही मधे मधे येऊन अडचणी वाढवणारं... शेवटच्या क्षणापर्यंत...
प्रयोगात मग नेहेमीचं थोडंसं इकडे तिकडे झालेलं सोडलं तर महत्वाची अडचण न येता पस्तीस ते चाळीस मिनिटं कधी गेली कळलं नाही...
अस्मादिक (हा शब्द या नोंदीत किती वेळा आला?.. ते तुम्ही मोजलं असेलच!) विनोदाचं धनुष्य पेलून पहिल्यांदाच. तीन भूमिका: सूत्रधार, गणा, श्रीकृष्ण. थोड्याशा वेशभूषा बदलानेच साकार होण्यासारख्या. सोबतच्या स्त्री सहकलाकाराचंही तसंच, तीन भूमिका: अप्सरा-नटी, लक्षुमी आणि सुनिता ... मी खूप वर्षांनी प्रत्यक्ष रंगमंचावर... त्या तुलनेने नवीन...
प्रेक्षकांचे अभिप्राय अंतिम. ते अजून येताहेत.
आमंत्रण बर्‍याच जणांना गेलेलं असतं. काहींच्या खर्‍याच अडचणी. काही न जमवणारे, मग काही करत नसताना ’सध्या काय चाललंय?’ असं थांबवून थांबवून विचारणारे. काही ’यानं प्रत्यक्ष काही केलं बरं का’ म्हणून हिरमुसणारे, सरसावून उगाच आपलं काहीतरी कुठेतरी दामटत बसणारे...
आपल्याला कुणी किती गंभीरपणे घेतंय हा विचार लोप पावलेला असतो प्रत्यक्ष काही करत असताना. आपलं असेल नसेल ते कौशल्य पणाला लाऊन काम पूर्ण करणं यात आनंद असतो. नक्कीच असतो...
तो या नोंदीद्वारे आपल्यापुढे सादर करतो... आभार!...
"शुभमंगल सावधान!" (एकांकिका) "अभिलेख" निर्मित, "नृत्यरंग" आयोजित 
लेखन, दिग्दर्शन: विनायक पंडित 
प्रकाशयोजना: वासुदेव साळुंके 
पार्श्वसंगीत: अरुण कानविंदे 
रंगभूषा: शशी सकपाळ, रमेश वर्दम आणि मंडळी 
वेशभूषा: वरदा पंडित 
कलाकार: प्रिया गडकरी, विनायक पंडित



Sunday, October 20, 2013

प्रस्थापित (७) : भाग अखेरचा...

भाग १, भाग २भाग ३, भाग ४, भाग ५ आणि भाग ६ इथे वाचा!
... प्रयोग चांगलाच रंगला... नेहेमीप्रमाणे स्त्री कलावंत नेहेमीच्या जागी चुकली. पुरुष कलाकारानं शिरीषचे लाफ्टर्स खाण्याच्या प्रयत्न केला. शिरीषने अर्थात ते चोख वसूल केले. तो कुठेही चुकला नाही. सगळं नेहेमीप्रमाणे...
पण नेहेमीप्रमाणे शिरीष प्रयोगात रंगून गेला नव्हता. कुठेतरी कायतरी चुकचुकत होतं. प्रयोग चालू असतानाही. मनाच्या मागे, प्रयोग चालू असतानाही. मनाच्या मागे, प्रयोग चालू असतानाही, काहीतरी वेगळं चालू होतं, हे शिरीषसाठी नवीन होतं...
कसे आलो आपण इथे?... नोकरी करणार नाही असं घरी सांगितल्यावर वडील चिडले होते. त्यांनी सतत मनधरणी करूनही, आपण सतत नाही! नाही! असं ठाम सांगत राहिल. तुच्छतेने?... मग आई हादरली. मागचे भाऊ, बहीण वेळेआधीच धडपडू लागले. आपण ते सगळं पहात स्ट्र्गल करत राहिलो. या इंडस्ट्रीत... सतत वाक वाक वाकण्याचा?... अपमान, उपेक्षा सहन करण्याचा?...
आणि... आज काय करतो आहोत आपण? रोजंदारीवर असलेल्या कामगारासारखे नाईटच्या पाकीटाची वाट पाहात? प्रथितयश निर्मात्याला बांधून घेऊन? कुबेर आणि कर्ण असलेला तो वेळप्रसंगी करवादत नाही आपल्यावर बॉससारखा? काय करतो आहोत आपण? सोडून जातो?...
एवढं सगळं करून दुसर्‍या फळीपर्यंत आलो आपण... आपल्यापुढचा दिग्दर्शक निर्मात्याचा नातेवाईक. तो आपल्याला पोचून देईल आणखी वर? एक नंबरवर?...
लग्न करायचं नाही ठरवलं आपण... तत्व जपल्यासारखं. सांभाळल्यासारखं. लग्न न करता कुणा कुणाबरोबर राहिलो... काय झालं? नातं नवरा- बायकोसारखं... कधी मी चुकायचं कधी तिनी. कधी दोघांनी. मग पुन्हा नवीन... पण लग्नासारखंच... संसारासारखंच... वेगळं काय?...
प्रयोग संपल्यावर मग शिरीष जास्तच बैचेन झाला. विशेषत: स्वत:ला जबरदस्तीने आरशात बघताना, टिश्यू पेपरने खरवडून खरवडून मेकप काढताना... त्यासाठी स्वत:ला आरशात न्याहाळताना...
हे सगळं आज दारूत बुडवणं अशक्य आहे, जोर करून बुडवायला गेलो तर जास्तच भडकून उठेल हे लक्षात आल्यावर तो आणखी खचला...
सगळं झालं ते त्या चष्मेवाल्यामुळं... संसारी, नोकरदार, अभिनयात सो कॉल्ड यश न मिळवल्यानं लेखनात स्ट्रगल करू पहाणार्‍यामुळं... प्रामाणिक, मॅनर्स पाळणार्‍या आणि स्वाभिमान न सोडणार्‍यामुळं... हे जाणवल्यावर मग शिरीषला आपलं ग्लॅमरस भणंगपण जास्त जास्तच खुपायला लागलं...         (समाप्त)
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
...खरं म्हणजे कथा लिहावी, तिच्याबद्दल काही लिहित बसू नये... हा अपवाद...
या कथेला "साप्ताहिक सकाळ" च्या कथास्पर्धेत ’तिसरं बक्षिस’ मिळालं. हा अनुभव माझ्यासाठी तरी प्रचंड सुखद होता...
पहिलं म्हणजे कथा निकाल असलेल्या साप्ताहिक सकाळच्या ४ ऑक्टोबर २००३ च्या अंकात प्रसिद्ध झाली. एका मित्राने ती बघितली. वाचल्याचं कळवलं. साप्ताहिकाचे अंक प्रसिद्ध तारखेच्या आधी दोनचार दिवस प्रसिद्ध होत असतात. त्यामुळे अशा पद्धतीने कळल्याने, तसं काही लिहिणारा अपेक्षित करत असल्याने, आनंद झाला. तो बाजारात जाऊन दोनचार प्रती घेऊन साजरा केला... दसराच होता... हात पाय पसरून पसरलो...
आस्थापनामधून फोन... बक्षिस घ्यायला या... परगावी... मी त्यावेळी नको तितक्या अडचणीत. कुठेतरी पहिलं बक्षिस न मिळाल्याची रुखरुख असावी. अपरिहार्य कारण पुढे करून येणं शक्य नसल्याचं नम्रपणे सांगितलं. पुन्हा फोन... जाण्यायेण्याचं भाडं देतो पण बक्षिस स्विकारायला याच... लिहिणार्‍याला हा तर पराकोटीचा आनंद! भाडं दिलं नाही, देतो म्हटलं तरी लिहिणारा खूष... आता जाणं भागच...
बक्षिस समारंभ अत्यंत नेटकेपणानं आयोजित केलेला. एका प्रख्यात पर्यावरणतज्ज्ञ बाईंचं व्याख्यान. आयोजकांनी स्वागत करणं... जाताना भेटून मग जा असा आग्रह... पहिल्या रांगेतली खुर्ची... उत्तम व्याख्यान... थोड्याफार गप्पा- कारण परतण्याची घाई, दुसर्‍या दिवसाचं रुटीन...
परतताना मी बसमधे नव्हतोच... चार बोटं नव्हे चांगलाच वर... प्रतिकूल काळात खूप वाट पाहून आलेला असा सुखावह अनुभव... संबंधितांचे आभार मानावे तेवढे थोडे...
परतल्यावर दोन दिवसांनी फोन... त्याच गावातून... नावं मुद्दाम टाळतोय... प्रसिद्ध व्यक्तिचं नाव घेऊन फुशारक्या नकोत आणि प्रतिसाद न देणार्‍यांची उगाच नावानिशी दखल कशाला?... अशा मोडवर सध्या आहे... तर फोन... नाव ऐकल्यावर मी चाट! असं होतं... अपेक्षा नसताना... ते नावाजलेले नाट्यसमीक्षकही. त्याना कथा प्रचंड आवडल्याचं ते सांगतात. त्यावर उत्तम एकांकिका होईल असं सांगतात. तुम्ही तसा काही विचार केला आहे का? म्हणून मित्रत्वाच्या नात्याने विचारतात. भारावून जाणं आभार मानणं यातच मी गुंतलेला असताना ते ज्या प्रायोगिक संस्थेशी संबंधित असतात त्यातला एकाचा संपर्क क्रमांक देऊन, याना फोन करा आणि मला येऊन भेटा पुढचं काय ते बोलू असं आमंत्रणही देतात... मी सातव्या आसमानात पोचलेला... ते शांत, मृदू...
मी उत्साहाने त्या संपर्क क्रमांकावर फोन करतो... पलिकडे,  त्याला कल्पना असावी असा आणि मला कल्पना नाही असा रुक्ष आवाज... विरोधी आवाज लगेच ओळखता येतात... माझं त्याना भरभरून सांगणं... येऊ ना? म्हणून विचारणं... ते नकारघंटा हातात घेऊन बसल्यासारखे... हो ही नाही आणि नाही ही नाही... पण म्हणजे नाहीच!...
वाईट वाटतं... पण काळ जातो तसं आयरनी वगैरे आठवायला लागते...
एका नकारात्मक अनुभवावर लिहिलेली कथा. अपेक्षा घेऊन चांगली नाटकं लिहून ती कुठे होत नाहीत तर तद्दन नाटक लिहून प्रयत्न केला तर तिथे प्रतिसाद हा असा... त्यावर कथा लिहिली, त्याला बक्षिस मिळालं, त्यानंतर एका प्रथितयश नाट्यसमीक्षकाला त्यात एकांकिकेचं बीज दिसलं, ते प्रायोगिक रंगकर्मींनी नुसतं पारखण्याचंही टाळलं... असा हा अनुभव किंवा अनुभवांची शृंखला...
करत रहाणं आपल्या हातात असतं. त्यानंतर येणारा अनुभवरूपी प्रतिसाद, त्याला काही लॉजिक नसतंच... मग आपल्याला जे वाटतं ते आपण स्वत:च करायचं. आपल्याला शक्य असेल तसं. पण करायचंच... असो!      
 

Tuesday, September 24, 2013

प्रस्थापित (६)

भाग १, भाग २भाग ३, भाग ४ आणि भाग ५ इथे वाचा!
शिरीष समोरच्या चष्मेवाल्याशी आपलं नेहेमीचं डोळ्याला डोळा न भिडवण्याचं तंत्र चालू ठेऊनच होता. त्यानं आपल्या बॅगेतला हात बाहेर काढला.
"हे बघा- ही दोन-"
"मला कल्पना आहे हो-" चष्मेवाला सौम्य हसत म्हणाला.
"बघा ना- या संहितेबरोबर असलेल्या या पत्रावरची तारीख- सहा महिने होऊन गेलेत. या आणखी दोन संहिता. आधी आता या घेऊन बसायला-"
"मला पूर्ण कल्पना आहे त्याची. माणसं बिझी असतात. तुम्ही माझं पुस्तक चाळलं का?"
"हो ना! हो! हो!" शिरीषनं ठोकून दिलं.
"मग त्याच्या मलपृष्ठावर माझा बायोडेटा आहे. मी यातच होतो हो इतके दिवस. तुमच्यासारख्या भूमिका केल्या प्रायोगिक- व्यावसायिकला- अर्थात तुमच्यासारख्या यशस्वी नसतील त्या- मला माहितेय. माणसं बिझी असतात. त्यांना अजिबात वेळ नसतो. परवा आलो तेव्हाच माझ्या लक्षात आलंय!"
अजिबात न हालता शिरीष हातातल्या संहितांकडेच बघत राहिला.
"नाही- बघा ना- आता हे ह्यानी- सहा महिने आधी-"
"आरामात हो! मला अजिबात घाई नाही. आरामात वाचा. माझं पुस्तकही सवडीने वाचा- आणि मला सतत फोन करून, सतत भेटायला येऊन त्रास द्यायला खरंच आवडत नाही. इरिटेट होतो हो समोरचा माणूस. मला कल्पना आहे!"
"नाही- काय आहे- मला जर फोन करून आठबण केली नाहीत नं तर-" शिरीषनं नेहेमीचा धोबीपछाड टाकला. फोन नाही केलास ना तर तुझंच नुकसान आहे चष्मेवाल्याऽ- तो मनात म्हणाला.
"सतत नाही करत मी फोन. बिझी माणूस वैतागतो. वाचा तुम्ही सावकाश. चला. थॅंक यू!" चष्मेवाला निघाला. मेकपमनला, व्यवस्थापकाला हात करून तो निघाला आहेहे शिरीषनं नजरेच्या कोपर्‍यातून बघितलं, पण संहिता परत बॅगेत ठेवताना बॅगेत घातलेलं डोकं त्यानं अजिबात बाहेर काढलं नाही. चष्मेवाल्याच्या थॅंक यू लाही त्याने अर्थातच प्रतिसाद दिलाच नाही. गेला *****! असं मनाशी म्हणत त्यानं खर्रकन बॅगेची चेन ओढून बंद केली. चेहेरा अतिशय शांत ठेवून.
प्रयोग एक्च्यूअली सुरू व्हायला अजून अर्धातास तरी सहज होता. ऑफिशयल पंधरा आणि वर पंधरा मिनिटं. इस्त्री करून ठेवलेले कपडे बघून ठेवणं, तोंड धुणं, गप्पा मारणं इत्यादी प्रयोगाआधीची कामं यांत्रिकपणे करत तो रंगपटात स्थिरावला. काहीतरी त्याला खुटखुटायला लागलं. ते मनाच्या मागे ढकलून तो निग्रहाने हास्यविनोद करत राहिला. शेवटी वेळ झाल्यावर आरशासमोर बसला. आज मेकपमनला थांबवून त्यानं स्वत:चा मेकप स्वत:च करायला सुरवात केली. स्वत:चा चेहेरा रंगवताना त्याला काहीतरी वेगळं जाणवायला लागलं. मगासारखं... खुटखुटल्यासारखं... कॉन्फिडन्ट वाटत नाहीए आपल्याला आज? हं!... पावणेचारशेवा प्रयोग... यंत्र झालंय आता सगळं... वाचेचं, चेहेर्‍यावरच्या रेषांचं, हातवार्‍यांचं, हातचालींचं, विनोदाच्या जागाचं, लाफ्टरसाठी थांबण्याचं... तो स्वत:शीच हसला. पूर्ण एकाग्र होऊन, मेकपकडे लक्ष देऊन खुटखुटणं विसरण्याचा प्रयत्न करू लागला...     (क्रमश:)


 

Saturday, September 7, 2013

प्रस्थापित (५)

भाग १, भाग २भाग ३ आणि भाग ४ आणि  इथे वाचा!
शिरीषच्या घाईघाईला तोंड देत चष्मेवाल्याने सुरवात केली, "आणलंय मी... दुसरा अंक लिहिला नाहीये अर्थात... म्हणजे... कॉमेडी आहे... आजकालच्या रिवाजाप्रमाणे बरेच बदल करण्यासाठी... तुम्ही वाचा... तुम्हाला चांगलं... बरं... बरं वाटलं तर गाइड करा मग-"
"द्या, द्या फोन नंबर लिहिलाय नं?" शिरीष जरा ओरडतच म्हणाला. चष्मेवाल्याने तत्परतेनं लिहिलेला पत्ता, फोन नंबर दाखवला.
"दोन दिवसानी फोन करतो!" असं म्हणत शिरीष रंगपटाकडे निघालाच.
"तुम्हाला माझं नाटकाचं पुस्तक... द्यायचं-" चष्मेवाला पुस्तकावर शिरीषचं नाव लिहिण्यासाठी धडपडू लागला. पुस्तक ठेवायला जागा नाही. इस्त्रिवाला सरसावून मग्न. शिरीषला हसू आलं. त्यानं संभावितपणे इस्त्रिवाल्याला दम दिल्यासारखं करून जागा करायला सांगितली. त्यानं जागा करून दिल्यासारखी केली.
चष्मेवाला आता शिरीषच्या भाषेत चांगलाच फंबलला. शि च्या जागी गि वगैरे कसरती करून घाईघाईत नम्रपणे पुस्तक शिरीषला अर्पण केलं.
चष्मेवाल्याला घाम फुटला. कृती लवकर आटपली नाही तर शिरीष काय बोलेल, करेल याचा त्याला भरवसा नसावा.
"दोन दिवसात ह्स्तलिखित एक अंक वाचून होईल. फोन करतो दोन दिवसांनी!" रंगपटाकडे वळत मुद्दाम जरा जोरातच शिरीष म्हणाला. आपणच फोन करतो असं म्हटलं की प्रश्न मिटतो. वाट बघून गरजू फोन करत रहातो. मोबाईल आपलाच. आपल्याच हातात. अगदीच नाही तर बदलला नंबर. शिरीषचं समीकरण सोपं होतं.
"दोन दिवसांनी प्रयोग आहे तुमचा. तेव्हा जर आलो-"
"अरो हो! गुरुवारी! या ना या!- आता बसताय प्रयोगाला?" खिजवल्यासारखं वाटावं, वाटू नये अशा स्वरात शिरीषनं विचारलं.
"नाही... म्हणजे काम आहे... होतं दुसरं... तुमच्या कामाप्रमाणे ऍडजेस्ट केलंय- करणार- होतो... परवा येतो!"
हो ही नाही आणि नाही ही नाही, त्यामधलं काहीतरी एक्सप्रेशन देत नट आणि दिग्दर्शक (दुसर्‍या फळीतला) शिरीष रंगपटात शिरला, विसावला. रंगपटातली, नाटकातली पात्रं आणि इतर पात्रं यांच्याशी जरूरीप्रमाणे कमी, जास्त, अजिबात नाही, अशा प्रकारे कम्युनिकेट करू लागला.
हातातलं हस्तलिखित आणि पुस्तक त्याने केव्हाच मेकपच्या टेबलावर फेकलं होतं. नाटक सुरू व्हायला तब्बल पंधरा मिनिटं बाकी होती...
त्या गुरुवारी शिरस्त्याप्रमाणे शिरीष नाटक सुरू होण्याआधी, पंचवीस मिनिटं  ते अर्ध्यातासाच्या बेचक्यात त्या नाट्यगृहाच्या पॅसोजमधे शिरला. एकच भला मोठ पॅसेज. समोर कपडेपट. डाव्या हाताला रंगपट, अशी त्या नाट्यगृहाची रचना, तर समोर हसत चष्मेवाला.
"सॉरीऽ आजही मी तुमच्या आधी येऊन तुम्हाला सामोराऽ"
मोकळा झालाय, याला दाबायला पाहिजे, शिरीषनं लगेच ताडलं, "होऽ होऽ होऽ होऽ- जरा एक मिनीट-" असं म्हणत शिरीष कपडेपटात शिरला. व्यवस्थापकीय सहायकाला खुणेने कपडेपटाचं दार पूर्ण बंद करायला सांगितलं.
चष्मेवाला पॅसेजच्या भिंतीला टेकून वाट बघत उभा राह्यलाय हे नजरेच्या कोपर्‍यातून बघताना त्याला बरं वाटलं.
घातलेल्या शर्टची वरची दोन बटणं उघडून, आरामशीर हातातली भलीमोठी बॅग टेबलावर ठेवून तिची चेन उघडताच त्यानं आत बघितलं. थोडा वेळ तसाच जाऊ दिला. मग खुणेने व्यवस्थापकीय सहायकाला बाहेर पाठवून चष्मेवाल्याला आत बोलवायला सांगितलं. चष्मेवाला विनम्रपणे आत आला. तो आपल्यापर्यंत पोहोचेपर्यंत शिरीषनं त्याच्याकडे ढुंकुनही बघितलं नाही. आपल्या बॅगेतले कपडे वरखाली करत, एक शर्ट बाहेर काढून ठेवत, तो बॅगेतच बघत राहिला. आत दोन स्क्रीप्ट्स- नाटकाच्या संहिता आहेत ना याची पुन्हा एकदा त्याने खातरजमा करुन घेतली.
"हे बघा- हे-"
"अगदी आरामात. अगदी आरामात. मला काहीही घाई नाहीये!"
अचानक दोन्ही हात फैलावत चष्मेवाला म्हणाला. शिरीषनं आश्चर्यानं त्याच्याकडे बघितलं. त्याला हे अनपेक्षित होतं. पण ते चेहेर्‍यावर कसं दाखवायचं नाही हे तो शिकला होता. तो हलला नाही...        (क्रमश:)

Thursday, August 29, 2013

प्रस्थापित (४)

भाग १, भाग २भाग ३ इथे वाचा!
बिनफ्रेमच्या चष्म्याची नजर दीनवाणी  नव्हती. तो हिरमुसून घड्याळात बघत दूर जाऊन उभा राहिला आहे हे शिरीषनं डोळ्याच्या कोपर्‍यातून बघून घेतलं. चष्मेवाला घड्याळात बघत उभा राहिला.
मग पाच मिनिटांनी झटका आल्यासारखं वळत शिरीष नाट्यगृहाचा तो लांबलचक जिना चढू लागला. चार- पाच पायर्‍या चढल्यावर त्याच्या डोळ्यांच्या कोपर्‍यातला बल्ब पुन्हा पेटला. चष्मेवाला चूपचाप त्याच्यामागे चालू लागला होता. चष्मेवाला जिना चढतोय याची खात्री झाल्यावर मगच शिरीषनं मागे न बघता, उलटा पंजा मागे नेऊन हाताची बोटं हलवून आपल्या मागोमाग येण्याची खूण केली. चष्मेवाल्याचा पडलेला चेहेरा बघायची त्याला आता गरज नव्हती.
शिरीष नंतर बुकींगजवळ गेला. नेहेमीप्रमाणे आत वाकून बघितलं. प्लानवर. हाताची बोटं उंचावून पासांची खूण केली. एका ओळखीच्याने थांबवलं. त्याच्याशी बोलला. मागचा चष्मेवाला प्रत्येकवेळी जर्क बसून थांबत होता. अडखळत होता. पास किती ठेवायचे हे बुकींगला सांगितल्यानंतर मगच शिरीषनं चष्मेवाल्याकडे बघून ’बसणार का’ असं अत्यंत कोरड्या आवाजात विचारलं. चष्मेवाला अर्थातच नाही म्हणाला. आपलं काम घेऊन आलेला माणूस पहिल्या भेटीतच फ्री पासवर नाटकाला बसणार नाही, याची शिरीषला खात्री होती.
नाट्यगृहाच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत शिरताना द्वारपालाचा सलाम घेऊन शिरीषनं वेग वाढवला. चष्मेवाला फरफटल्यासारखा त्याच्या मागे. या सगळ्या प्रवासात कामाचं काय बोलायचं ते बोलून शिरीष प्रामाणिकपणे चष्मेवाल्याला वाटेला लावू शकला असता. पण शिरीषनं ’काय कसं काय?’ अशा पद्धतीचं बोलणंही टाळलं. शिरीष काही केल्या बोलत नाही म्हणून तो मर्यादापुरूषोत्तम चष्मेवाला शिरीषचा माग काढण्यातच धन्यता मानत होता. एखादा आगाऊ बोलबच्चन असता तर त्यानं शिरीषला एव्हाना हैराण केलं असतं.  पुढे जाऊन आपल्याला अडचणीचं ठरेल असं काहीही करायची चष्मेवाल्याची तयारी दिसत नव्हती. ’काढू दे अजून कळ!’ असं स्वत:शी म्हणत शिरीष वाटेतल्या कॅन्टीनजवळ थांबला. वडा कधी, कसा पाठवायचा हे त्यानं आवर्जून नक्की केलं. पुढे चाललेल्या कलाकाराबरोबर डिसकस केलं आणि थोडा वेग वाढवून त्यानं तो उभा पॅसेज पार केला.
आडवा पॅसेज पार करून दोन-तीन दारं पार करत तो रंगपटात पोहोचला. वाटेतल्या दारांना वर चाप लावले होते. मागून येण्यार्‍यासाठी दार उघडून धरण्याचीही शिरीषला आवशकता नव्हती. चाप लावलेली दारं फटाफट बंद होत होती. ती पुन्हा उघडत जाऊन चष्मेवाला रंगपटाच्या दाराशी येऊन घुटमळला. आत नेहेमीचे यशस्वी, त्याना भेटायला आलेले काही तुलनेने अयशस्वी, काही लोंबते अशी सगळी फौज जमली होती.
आत गेल्यावर उपचार म्हणून तरी शिरीषनं ’आत या’ असं म्हणावं ही चष्मेवाल्याची अपेक्षा असावी. घुटमळून, वाट बघून चष्मेवाला शेवटी रंगपटात शिरला. तो आला आहे याची खात्री झाल्यावर शिरीष त्याला ’या’ म्हणाला. बसा म्हणाला नाही. चष्मेवाला बसला. त्याने अपेक्षेने शिरीषकडे बघितलं. शिरीषने ताबडतोब त्याची नजर टाळून चष्मेवाल्याच्या बाजूला बसलेल्या खुळचट हसणार्‍या माणसाकडे मोर्चा वळवला. काहीतरी गंभीर घडल्यासारखी जुनीच घटना नव्याने सांगू लागला. खुळचट हसणारा मांडीवरच्या ऍटॅचीवर हाताचे दोन्ही कोपरे टेकवून मोबाईलवर खेळत आणखी खुळचट हसत ते सगळं ऐकत होता.

मग त्या खुळचटचं लक्ष चष्मेवाल्याकडे गेलं. ’अरे तू कसा काय इकडे?’, असं विचारून खुळचट तोंड पसरून हसला. शिरीष लगेच सावध झाला, "चला, चला आपण आपलं-" घाईघाईत शिरीषनं चष्मेवाल्याला उठवलं. ओळख बिळख म्हणजे नस्तं काहीतरी चालू झालं असतं.
घाईघाईत शिरीषनं चष्मेवाल्याला कपडेपटात आणलं. नेहेमीप्रमाणे खुर्च्यांमधे कपडे.
"द्या! द्या! आणलंय नं तुम्ही?" जरा तावदारल्यासारखं करतच शिरीषनं पुन्हा घाई केली...   (क्रमश:)  

Saturday, August 17, 2013

प्रस्थापित (३)

भाग १, भाग २ इथे वाचा!
संध्याकाळी सातच्या सुमाराला शिरीष नाट्यगृहाच्या फाटकातून आत शिरला. नेहेमीसारखा रिलॅक्स्ड. फाटकाला लगटून आणि आत आवारात अनेक ठिकाणी पुंजके उभे होते. शिरीषच्या भाषेत दोन- चार नट आणि अनेक बोल्ट्स. अंगविक्षेप करून ग्लॅमर खेचणारे. मोठमोठ्याने बोलून टाळ्या घेणारे. कुणी बाहेर जाऊन सिगरेट शिलगावून आत येणारे.
शिरीष कुणाला हात करत, कुणाशी हसत, कुणाला हाय करत, हात मिळवत आणि प्रसंगी फिल्मी आलिंगन देत- जरूरीप्रमाणे- अर्थात शिरीषच्याच- आवारात आला. ज्याच्याकडून काही अतिमहत्वाचं काम होण्याची शक्यता होती त्याला शिरीषनं स्वत: त्याच्याजवळ जाऊन अटेंड केलं. हे सगळं करत असताना त्याच्या डोळ्यांच्या कोपर्‍यात धोरणीपणाचा बल्ब लागलेलाच होता. त्या बल्बनी तो आसमंत न्याहाळत होता. हवी ती हालचाल दिसत नव्हती.
मग तो भेटायला आलेल्या नाट्यव्यवस्थापकाशी बोलायला लागला. व्यवस्थापकानं त्याला कोपर्‍यात घेतलं. शिरीषनं दोन- चार मोबाईल कॉल्स करून व्यवस्थापकाला तारखा देण्यासंबंधीची व्यवस्था केली. या सुमारास नाट्यगृहासमोर नाट्यगृहात जाणार्‍या भल्यामोठ्या जिन्याच्या वरच्या टोकाला त्याला अपेक्षित हालचाल दिसली. तिथे एक बिनफ्रेमचा चष्मेवाला घुटमळत होता. याचा अर्थ तो रंगपटात जाऊन आला असावा. शिरीषनं पाठमोरं होऊन त्या व्यवस्थापकाला आणि त्याच्या सहाय्यकाला आणखी कोपर्‍यात घेतलं. बिनफ्रेमचा चष्मा ते बघून घुटमळत थांबला. याचा अर्थ तो भिडस्त आहे, मर्यादा पाळणारा आहे, हे शिरीषनं नमूद करून घेतला.
कोपर्‍यातली चर्चा आटोपतेय असं लक्षात आल्यावर शिरीष मोबाईलवर कॉल लावत एकटा आणखी कंपाऊंडच्या भिंतीजवळ गेला. बिनफ्रेमच्या चष्म्यानं ओळखलं असावं साहेब इतक्या लवकर रंगपटात येत नाहीत. तो जिना उतरू लागला. ते बघून शिरीष मोठ्याने हाका मारत एका नव्या कोंडाळ्यात सामील झाला. नुकताच चरित्रचित्रपट मिळालेला एक नट उत्साहाने आपले अनुभव सांगत होता. बिनफ्रेमचा चष्मा जिना उतरून खाली आवारात उतरला. साहेबांना भेटायचा त्याला धीर होत नसावा. त्याच्यासमोर प्रोफाईल फ्रेममध्ये असलेला शिरीष गप्पा रंगवत होता. बिनफ्रेमचा चष्मा जराशाने कोंडाळ्याला वळसा घालून जरा दूर जाऊन उभा राहिला. शिरीषने त्याला नीट बघून घेतलं. गृहस्थ संसारी, नोकरी करणारा, त्याच्या वयाचाच वाटत होता. राहू दे उभा असं स्वत:च्या धोरणीपणाशी म्हणत शिरीषनं कोंडाळ्यातल्या संवादातला आपला अभिनय चालू ठेवला.
बिनफ्रेमच्या चष्मेवाल्याने घड्याळात पाहिलं. मगापासून चौथ्यांदा. पावणेआठ- भेटीची वेळ. मग तो पुन्हा एक वळसा घेऊन शिरीषजवळ येऊन उभा राहिला. त्याच्याकडे बघत शिरीषने आपली नजर लगेच काढून घेतली. एखादं लाचार पोर दीनवाणं होऊन दात्याची नजर आपल्याकडे कधी वळेल याची नुसती वाट बघत उभं राहतं तसा बिनफ्रेमचा चष्मेवाला बाजूला येऊन उभा आहे हे शिरीषला जाणवलं.
"एक्सक्युज मी... एक्सक्युज मी... मी... अमुक अमुक... सकाळी... दुपारी... फोन केला होता. तुम्ही-"
"आपण जरा नंतर-" असं म्हणून वाक्य तोडून, दोन मिनिटं या अर्थाची दोन बोटं हवेत उडवून शिरीष कोंडाळ्यातल्या उत्साही चरित्रनायकाकडे नुसताच बघत राहिला. कमरेवरची बॅग, खांद्यावरचा तिचा पट्टा मानेजवळ आणखी वर ढकलून खिशात हात घालत...  (क्रमश:) 
   

Saturday, August 10, 2013

प्रस्थापित (२)

भाग १ इथे वाचा! 
...पुन्हा वेगवेगळा कोलाज बघत शिरीषला डुलकी लागली आणि मोबाईल पुन्हा वाजला. पुन्हा मंगलाष्टकं, तोच अनोळखी नंबर... कट. झोप.
तिसर्‍या वेळी त्यानं मोबाईल थंडपणे ऑफच करून टाकला. झक मारत गेले महत्वाचे कॉल्स. येणार असेल काही काम, मिळणार असेल, तर मिळेलच. नाही तर जाऊ दे झन्नममध्ये! असा विचार आल्यावर त्याला गाढ झोप लागली.
दुपारी बारानंतर कधीतरी पोटातल्या भुकेने शिरीषला जाग आली. नेहेमीप्रमाणे मोबाईल चार्ज करायला ठेवून तो बाथरूममध्ये शिरला.
सगळं आटोपल्यावर त्यानं बाहेरच्या कडीला असलेल्या दुधाच्या पिशवीतली दुधाची थैली फ्रिजमध्ये ठेवली. मोबाईल ऑन करून खिशात सरकवला. पोटातली आग शांत करायला बाहेर पडायला, कळवळत.
रिक्षात बसल्यावर सीटखालीच कळ असावी तसा सीडीप्लेअर चालू झाला. त्याच्यावर लेटेस्ट म्युझिक अल्बममधलं अत्यंत लेटेस्ट पॉप्युलर गाणं. शिरीषचा मोबाईल वाजला. शिरीष खिशातून तो काढेपर्यंत रिक्षावाल्यानं गाण्याचा आवाज चक्क कमी केला. शिरीष रिक्षावाल्याकडे बघतच राहिला. असेही रिक्षावाले असतात?
भुकेने कळवळलेला शिरीष मोबाईल स्क्रिनकडे बघत होता आणि स्क्रिन तो सकाळचा अनोळखी नंबर पुन्हा एकदा दाखवत होता. शिरीष वैतागला.
"हॅलोऽऽऽ... बोला!... बोला! बोला!..."
"मी अमुक अमुक बोलतोय शिरीषजी... मी एक... एक लेखक... लेखक-"
"हां! हॅलोऽऽ हॅलो‌ऽऽ बोलाऽऽ- कट!"
शिरीष आणखी वैतागला. कुणीतरी होतकरूऽऽ... आता हा काय पिछा सोडत नाय आणि पुन्हा मंगलाष्टकांची धून वाजली.
"हां! हॅलोऽऽ हो! हो! कळलं मला तुम्ही लेखक आहात ते!... या! याना! कधीही... प्रयोगाला या... हं! ऑं?"
"मी अलीकडेच प्रयोगाला येऊन गेलोय. एक नाटक लिहिलंय ते तुम्हाला दाखवायचं होतं. तुमचं मार्गदर्शन..."
आता शिरीषला पुढे बोलत रहाणं भागच होतं.
"हां! आंऽ वन लाईन काय आहे?... हां!... (*‌%!?!ऽ*)... हां हां ( *‌%!??!ऽ**%!)... हां! (*‌%!ऽ*?*%!!?) हां! ( *‌%!ऽ**%!?????!!!*ऽ) का- काय आहेऽ... इतरवेळी भेट ठरवली आणि नेमका वेळउशीर झाला तर पंचाईत होते म्हणून प्रयोगाला या!"
"कधी येऊ?"
"आं? आंऽ आज आज या ना, पण साडेसात पावणेआठपर्यंत या!"
"येऊ? मग येतो मी, थॅंक यू! साडेसात पावणेआठपर्यंत येतो. तुम्हाला दाखवतो. तुम्ही गाईड..."
शिरीष हं हं असा रिस्पॉन्सच न देत राहिल्यामुळे होतकरूला काहीच कळेना. फोन चालू आहे की कट झालाय, नक्की साडेसात पावणेआठला भेट होणार की... शिरीष मोबाईल तसाच होल्ड करून होता. गपचूप. होतकरू गोंधळला, भांबावला. शेवटी कंटाळला, स्वत:वरच वैतागला आणि त्याने फोन डिसकनेक्ट केला.
फोन डिसकनेक्ट झालाय अशी पूर्ण खात्री झाल्यावर मगच शिरीषनं आपला मोबाईल ऑफ केला आणि मनातल्या मनात होतकरूला आणि पोटातल्या भुकेला असंख्य फुल्या फुल्या वाहत रिक्षातून बाहेर बघत राहिला. रेस्टॉरंट यायची वाट पहात...                                                                             (क्रमश:)  

Monday, August 5, 2013

प्रस्थापित (१)

शिरीष नट होता आणि दिग्दर्शकही, रंगभूमीवरचा. दुसर्‍या फळीतला. दुसर्‍या फळीतून पहिल्या फळीत स्थान मिळवणं त्याला तितकसं कठीण नव्हतं. चांगली संस्था हाताशी होती. निर्माता कुबेर आणि कर्ण असा दोन्हीही. अर्थात इथपर्यंत पोहोचणं शिरीषला सोपं नक्कीच नव्हतं. काय काय व्याप ताप करून तो इथे पोहोचला हे त्यालाच माहीत.
प्रायोगिक संस्था, स्पर्धा यातच आयुष्याची तिशी उलटून गेली. कनिष्ठ मध्यमवर्गीय पालक, हातातोंडाची गाठ जेमतेम पडत होती इतकंच. कुठूनतरी नाटकाचं वेड शिरीषच्या डोक्यात आलं, एकदा आलं की ते सहजासहजी जात नाही.
शिरीष दिसायला असातसा. त्याच पंचविशीतच पोट आलं. बुटका, चेहेरा विनोदी कामांसाठी उपयुक्त. जाडा सुद्धा. पण सिन्सियर. झपाटलेला.
पस्तीशीत त्याला समजलं की हे स्पर्धा, बक्षिसं वगैरे काही खरं नाही. आयुष्यभर नाटक किंवा तत्सम क्षेत्रात रहायचं म्हणजे व्यावसायिक व्हायला पाहिजे. पण घरात नाटकाचं वातावरण नाही, कुणी गॉडफादर नाही. ठसणारं व्यक्तिमत्त्व नाही, टॅलेंट सर्वसाधारण योग्यतेचं. फक्त पुरेसं गांभीर्य, मेहनतीची तयारी, झपाटलेपण, दिग्दर्शनासाठी आवश्यक संघटन कौशल्य इतकं होतं. पण त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे शिरीषकडे धोरणीपणा हा गुण होता. तो आपल्याकडे आहे हेही त्याला वेळीच समजलेलं. त्यामुळे कुठे पोचायचं, तिथे जाण्यासाठी चॅनल्स कुठले. त्यातला कुठला प्रथम वापरायचा. मग कुठला. आणीबाणीच्या वेळी या चॅनल्सचा क्रम कसा बदलायचा हे त्याच्या डोक्यात खूप कमी अवधीत तयार व्हायचं. बर्‍याचवेळी नशीबाची साथ मिळायची. असं होत होत मजल दरमजल करत अनेक ठिकाणी डिप्लोमॅटीकली वाक वाकून तो सद्यपरिस्थितीपर्यंत पोहोचला. अर्थात अनेक अपमान पचवून, प्रसंगी ते दारूच्या पेल्यात बुडवून.
जवळ जवळ क्रमांक एकचं दिग्दर्शकपद. व्यायसायिक स्पर्धेत पुढे धावणारा एकमेव दिग्दर्शक. आताच्या नाटकातला शिरीषचा रोल तसा नाटकातला तिसर्‍या-चौथ्या क्रमांकाचा. पण मुख्य भूमिकांपैकी. टिपिकल पण चोख हसे वसूल करणारा. टायमिंगचं कौशल्य शिरीषचं. सव्वातीनशे- साडेतीनशे प्रयोग म्हणजे पैसे, लोकप्रियता इ. इ. दृष्टिने चांगलेच. सामान्य प्रेक्षकही आता शिरीषला ओळखायला लागलेले.
कुणामधे गुंतणं वगैरे प्रकार शिरीषनं ठेवलेच नाहीत. शिरीषमधे कुणी गुंतणं तसं लांबच. आली तर आली. राहिली तर राहिली. गेली तर गेली. ही गेली तर दुसरी, तिसरी... नाही!... तर आहेच!...
चाळिशीनंतर शिरीषसारख्यासाठी एकूण स्थिती समाधानकारक नव्हे तर चांगलीच म्हणायला पाहिजे. देण्याची तयारी असली की मिळतं. नशीब साथ देत असलं की मिळतंच मिळतं. काय काय द्यायची तयारी आहे त्यावर सगळं अवलंबून.
शिरीष आहे त्यात अवघडलेला नव्हता. बर्‍यापैकी रिलॅक्सड होता. धावपळ, दगदग, मेहनत चुकत नव्हती. धोरणीपणाचा बल्ब मेंदूत सतत पेटवून ठेवावा लागे. पण आता रिटर्नस मिळत होते. अपेक्षेपेक्षा जरा जास्तच आणि तेही नुसत्या नशिबाच्या शिक्क्याचे नव्हे. शिरीषला त्याचा अभिमान होता.
आठवड्यातून एकदा शहराबाहेर प्रयोग लागत. असे एक-दोन प्रयोग आटपून, अतिशय शिस्तीत चौथा अंक संपवून, खरं तर या दिवसांत तिसरा म्हणायला पाहिजे. तो सकाळी परत आला. लुंगी लावून झोपला. फ्लॅटच्या कडीला अडकवलेल्या पिशवीत हात घालून दुधाची थैली बाहेर काढणं नेहेमीप्रमाणे जीवावर आलेलं.
सुखद गुंगी, रंगलेला प्रयोग, मिळालेले हशे, जमलेलं, विस्कटलेलं टायमिंग, प्रयोगात झालेल्या गोच्या, गमती, गप्पा, विंगेतल्या, दारूकाम, जेवण, बस, विनोद, चर्चा, बसमधली हेरगिरी असं सगळं कोलाज होऊन झोपेतही डोक्यात फिरत होतं. सुखद गुंगी उतरत आणि हॅंगओवर चढत. नेहेमीप्रमाणे. आणि मोबाईल वाजला. बराच वेळ मंगलाष्टकाची धून वाजल्यावर त्याला जाग आली. त्यानं मोबाईल चाचपडला, शोधला आणि तो चिडला. एकतर कुणीतरी जबरदस्तीनं ऍडजस्ट केलेली ती धून आणि अनोळखी नंबर. काय संबंध आपला आणि मंगलाष्टकाचा? आणि या नंबराचाही? घाणेरडी शिवी हासडून त्यानं नंबर कट केला. मोबाईलच ऑफ करून ठेवणं म्हणजे महत्वाच्या कॉल्सची गोची. तो पुन्हा झोपला...                                    (क्रमश:)

                    

Monday, April 2, 2012

पहिलं फोटोसेशन.. जाहिरात.. इत्यादी..

खरं तर लिहू की नको असं झालंय या पोस्टबद्दल.. असं होत नाही कधी.. या आधी ’इंद्रधनुच्या गावा’ या बालनाट्याबद्दल आणि ’झुलवा’ या नाटकाच्या प्रवासाबद्दल लिहिलं. त्याही आधी आकाशवाणी संबंधात लिहिलं होतं. या सगळ्या प्रवासाची सुरवात इथून झालेली होती.
या वाटचालीबद्दल लिहिताना मला स्वत:लाच काही गोष्टी नव्याने कळल्या. त्यावेळी मी त्या त्या घटनांमधे प्रत्यक्ष सहभागी होतो. नाही म्हणायला आता मी बर्‍यापैकी तटस्थपणे या सगळ्या प्रवासाकडे पाहू शकतोय.
मला ठाऊक आहे हे जे मी केलंय ते खूप काही नक्कीच नाही. पहिलं म्हणजे हे करत असताना मला स्वत:ला ते पूर्णपणे नवीन होतं. दुसरं म्हणजे फारसा कसला आधार नसताना, एकदम वेगळ्याच क्षेत्रात, त्यावेळी, वाटचाल करताना सहप्रवासी दोस्त खूप महत्वाचे ठरतात असा अनुभव आला. मी जे केलं त्यातून खूप मोठं म्हणता येईल असं काही अजून उभं झालं नसेल पण त्या त्या वेळी मला हे दोस्त लाभले त्यांची आठवण मनात घर करून राहिली. पूर्णपणे अनिश्चिततेच्या काळात जवळपास माझ्यासारख्याच अवस्थेत असलेल्या दोस्तांनी मला खूप आश्वस्त केलं होतं आणि ते माझ्या दृष्टीनं आजही महत्वाचं आहे.
’झुलवा’ नाटकाचा बहर ओसरला होता. खरंतर माझ्या मनात तो आजही ताजाच आहे. पण व्यवहारात बघायचं झालं तर आता पुढे काय? असा प्रश्न माझ्यासारख्या नवोदितासमोर त्यावेळी उभा होता. हा प्रश्न नवीन काही नाटक करायला मिळणं, नवीन काही शिकायला मिळणं या स्वरूपाचा होता. डोक्यात प्रायोगिक नाटक करायचं पक्कं होतं. व्यावसायिक नाटक करण्याइतकी आपली तयारी झाली आहे का याची खात्री होत नव्हती. दुसरं काहीच नाही, नाटकच करायचं असं डोक्यात पक्कं असल्यामुळे एखादं नाटक करणं चालू नसेल तर प्रचंड अस्वस्थता मनात दाटत असे. काही शक्यता पडताळल्या. त्या शक्यतांनी काही मूर्त स्वरूप घेतलं नाही. आता नव्यानं काही सुरवात करणं भाग होतं. पण ते मनातल्या मनातच रहात असे. भिडस्तपणा आडवा येत असे. ’झुलवा’ नाटकादरम्यान कधीतरी चर्चगेट स्टेशन ते एनसीपीए अश्या चालत्या बोलत्या प्रवासात ’तुझ्यासारख्या अंतर्मुख माणसानं बहिर्मुख व्हायचा प्रयत्न करणं आवश्यक आहे’ असं वामननं (वामन केंद्रेनं) प्रेमानं आणि अधिकारानं सांगितलं होतं. अंतर्मुख आणि बहिर्मुख अशा दोन्ही प्रकारच्या व्यक्तींनी या दोन्ही स्वभावांची सांगड घालणं कसं आवश्यक असतं हे स्पष्टीकरणही त्यासोबत होतं. ते पूर्णपणे पटणारं होतं. फक्त ते प्रत्यक्षात येण्यासाठी प्रयत्नांची आवश्यकता होती. 
अशा पद्धतीने मनाची तयारी होत असताना कधीतरी चंद्रशेखर गोखले भेटला. हो! तोच तो, ’मी माझा’ हा सुप्रसिद्ध चारोळी कवितासंग्रह लिहिणारा. त्यावेळी ’मी माझा’ ची पहिली आवृत्ती प्रकाशित होत होती. मला प्रत्यक्ष शेखरकडून ’मी माझा’ ची प्रत मिळाली होती. पुढे ’मी माझा’ च्या अनेक आवृत्त्या, पुढचे अनेक भाग प्रकाशित झाले. 
मी  कविता करायला लागलो तेही शेखरच्या कविता वाचून, भारावून जाऊन.
त्यावेळी शेखर, मी, आम्ही आपापली वाट शोधत होतो. शेखर त्यावेळी मॉडेल कोऑर्डिनेटर म्हणून कार्यरत होता.
साधा, सरळ स्वभाव, ऋजू व्यक्तिमत्व, वागण्याबोलण्यात मार्दव आणि हे सगळं अगदी खरं. जेन्युईन. शेखरच्या पार्ल्याच्या घरी कित्येक गप्पा झालेल्या आठवतात. शेखर हा व्यवसाय करत होता आणि तो चांगल्या अर्थाने व्यावसायिक होता. खरंतर फोटोसेशन करायचं असं माझ्या मनात नव्हतं पण शेखरनं मला ते कसं आवश्यक आहे हे समजावलं. मालिकांचं युग नुकतंच सुरू झालं होतं. चांगल्या नाटकांचा काळ चालू होताच. त्यानं आशिश सोमपुरा ची ओळख करून दिली आणि माझं पहिलं फोटोसेशन पार पडलं. शेखरनं अगदी त्याचा शर्ट मला घालायला देण्यापासून सगळी मदत केली. आशिश हा प्रथितयश फोटोग्राफर. त्यावेळी त्याची सुरवात होती. त्याच्या स्टुडिओतले त्याने काढलेले चित्रा देशमुख अर्थात नंतर झालेल्या कांचन अधिकारी आणि दुर्गा जसराज यांचे अप्रतिम फोटो अजून आठवतात. शेखरने सुरवातीला अनेक फार्मास्युटिकल ऍड्ससाठी माझं नाव सुचवलं. त्यातली एक इप्का या औषधी कंपनीची होती. यात वेगवेगळ्या वयातल्या डॉक्टरच्या वेशात माझी छायाचित्र घेतली होती. बॅरेटो नावाचा छायाचित्रकार आणि सेशन झालं होतं काचपाडा, मालाड इथल्या एका तयार होत असलेल्या सदनिकेत. त्या छायाचित्रांच्या प्रती मला संग्रहासाठी हव्या होत्या. पण अशा छायाचित्रांच्या प्रती दिल्या जात नाहीत. त्याचं ब्रोशरही बनलं असेल पण ते कदाचित खाजगी वापरासाठी असेल.
काही औषधी कंपन्यांच्या जाहिराती केल्यावर शेखरनं अपोलो टायर्सच्या जाहिरातीसाठी माझं नाव सुचवलं. जाहिरात क्षेत्रातले सुनील रानडे आणि सुप्रसिद्ध नेपथ्यकार प्रदीप मुळे या जाहिरातीचं संयोजन करत होते. अस्मादिकांचं तेव्हा बिर्‍हाडबाजलं पाठीवर बांधलेलं. पुरेशी तयारी करताच आली नाही. त्यात अपोलो ऍंटी स्कीडटेक टायरचा ३३ अंशाचा कोन! या जाहिरातीत मी ज्या खुर्चीवर बसलोय ती त्या कोनात कललेली दिसते हा आभास नाही! तांत्रिक करामतही नाही! मी माझ्या बुटांच्या टाचांवर खुर्चीला आणि स्वत:ला तोलत ज्याम घामाघूम होत होतो आणि प्रदीप आणि सुनील माझा होसला वाढवत (?) होते. अगदी खरं सांगायचं तर मी दाणकन खाली पडेन म्हणून आणि चांगलीच फजिती होईल म्हणून माझी भीतीनं ज्याम गाळण उडाली होती त्यावेळी! शेखर एवढं करून थांबला नाही तर त्यानं त्यावेळी ’साप्ताहिक लोकप्रभा’ साठी माझी छोटीशी मुलाखतही घेतली होती! फोटोसेशन आणि जाहिरात माझ्या आयुष्यात आलं ते केवळ आणि केवळ शेखर गोखलेमुळे. संघर्षाच्या काळात एक चांगला मित्र तर मिळालाच! पुढे विनय आपटेंबरोबर ’रानभूल’ हे व्यावसायिक नाटक करत असताना त्यांच्या ’ऍडडिक्ट’ या जाहिरातसंस्थेतून एका राजकीय पक्षाच्या निवडणूक जाहिरातीत काम करायला मिळालं. ’टाटारोगोर’ या कीटकनाशकाच्या जाहिरातीत काम करायला मिळालं. ही जाहिरात जालंधर वगैरे प्रदेशात प्रामुख्याने दाखवली गेली.  पूर्वीच्या प्रसिद्ध स्ट्रॅंड सिनेमाच्या जवळ, कुलाब्याला, आरटीव्हीसी- रेडिओ टीव्ही कमर्शियल्स-  नावाची कुसुम कपूर ह्यांची जाहिरातसंस्था होती. या जाहिरातसंस्थेसाठी मला एक विडिओवॅन फिल्म करायला मिळाली. महाराष्ट्र सरकारच्या ’महाबीज’ बियाणांची प्रसिद्धी करणारी, ग्रामीण भागातल्या शेताशेतांमधून दाखवण्यासाठी बनवलेली ही विडिओवॅन फिल्म होती. पारंपारिक मराठी चित्रपटासारखीच कथा घेऊन ही फिल्म बनवली गेली होती. दिग्दर्शक होते, सुरेंद्र हुलस्वार. या जाहिरातपटात जमिनदार खलनायक मला करायला मिळाला होता. जवळजवळ आठदहा दिवस कोल्हापूरला जयप्रभा स्टूडिओ आणि आजूबाजूच्या ग्रामीण भागात याचं चित्रिकरण झालं. या जाहिरातपटाची विडिओकॅसेट मात्र मिळाली पण त्यावेळी एका पावसाळ्यात अशा कॅसेट्सची बहुदा वाट लागत असे तशी तिची वाटही लागली. 
मी शुटिंगमधे अडकलेलो आणि माझी होणारी पत्नी मुंबईत माझी वाट बघणारी.  लग्नाला महिनाभरसुद्धा उरला नव्हता..
आरटीवीसीमधे मला नेलं त्यावेळचा माझा मित्र सुरेश चांदोरकरनं. त्यानं मला रेडिओस्पॉट्ससुद्धा मिळवून दिले. त्यातला एक व्हिक्स वेपोरबचा रेडिओस्पॉट विनय आपटेंबरोबर होता. त्यात एक गाणं- जिंगल होतं. ते सुरेशनंच रचलं. त्याचं ध्वनिमुद्रण त्यानेच जमवून आणलं. सुप्रसिद्ध गायक रविंद्र साठे ती जिंगल गायले. आमच्याकडे सगळंच तुटपुंजं होतं पण रविंद्र साठेंनी अगदी तुणतुणं जुळवण्यापासून इतकी मदत केली की त्यांचे केवळ आभारच मानले पाहिजेत! व्यावसायिकतेचा- चांगल्या व्यवासायिकतेचा हा आणखी एक अनुभव..
आरटीवीसीमधे कुमार हुलस्वार नावाचे ध्वनिमुद्रक होते. त्यानी माझ्या आवाजाचा नमुना खास ध्वनिमुद्रित करून घेतला. त्या बळावर मला हिंदी रामायणाच्या रेडिओ मालिकेत वॉईसिंग करायची संधीही मिळाली. या वाटचालीत शेखर, आशिश, सुरेश, कुमार हुलस्वार, विनय आपटे यांचे आभार मानावे तेवढे थोडेच!
अगदी अलिकडे दोन वर्षांपूर्वीच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी एका राजकीय पक्षासाठीच्या ऍडकॅम्पेनसाठी अचानक रात्री नऊदहा वाजता बोलवलं गेलं. एक उद्योगपती सरकारच्या धोरणांबद्दल (चांगलं) बोलतो. सत्ताधारी पक्षासाठीची जाहिरात. हा अनुभव मात्र त्रासदायक होता. रात्रभर चित्रिकरण होत राहिलं. मी आणि बोलवलेला मॉब रात्रभर त्याच त्या ओळी अक्षरश: रटत राहिलो. मला इतकं रटत, बोलत ठेवलं की मध्यरात्रीनंतर कॅमेरा ऑन झाल्यावर मला काही आठवतच नाही असं माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच झालं. हे त्या रात्री बराचवेळ होत राहिलं. त्या अमुक एवढ्या सेकंदांत जाहिरातपट, निवेदन बसवण्याचा आटापिटा करत असलेला तो दिग्दर्शक बघून मला हसावं की रडावं तेच कळेनासं झालं. आयुष्यात पहिल्यांदा, कधी एकदाचं हे सगळं संपतय, असं सतत वाटत राहिलं. पुढे ही ऍड कॅंपेन- म्हणजे उद्योगपती, नोकरदार, गृहिणी, शेतकरी वगैरे असलेली ही जाहिरातमालिका, टीव्ही वाहिन्यांवर प्रकाशित झाली. माझा भाग, मला धरून काही जणांना बघायला मिळाला.. असं हे सगळं जाहिरात, फोटोसेशन जगतातलं माझं एक्सकर्शन (?) :D  
     



 

Thursday, March 1, 2012

'झुलवा' चा प्रवास...

’झुलवा’ १९८७-८८ ला संगीत नाटक ऍकेडमी, दिल्ली या मान्यवर संस्थेच्या त्यावर्षीच्या राष्ट्रीय लोककला महोत्सवात सादर झालेलं नाटक! या नाटकानं त्यावर्षी महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं. डिसेंबर १९८७ मधे पश्चिम विभागीय महोत्सवात ते भारत भवन, भोपाळ इथे सादर झालं. त्या विभागीय महोत्सवातून ’झुलवा’ची राष्ट्रीय महोत्सवात निवड  झाली आणि जानेवारी १९८८ मधे ’झुलवा’ दिल्लीला कमानी ऑडिटोरियम या विशाल नाट्यगृहात सादर झालं. माजी मंत्री कै. वसंत साठे त्यावेळी आवर्जून हजर होते.
मुंबईत नरिमन पॉईंटला एनसीपीए अर्थात नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्सच्या प्रायोगिक नाट्यगृहात या नाटकाचे बरेच प्रयोग झाले. कै. पु.ल. देशपांडे हे त्यावेळी एनसीपीएचे संचालक होते. स्वत: पुलं, अटलबिहारी वाजपेयी, प्रसिद्ध जर्मन नाट्य दिग्दर्शक फ्रीत्झ बेनिवित्झ- असे अनेक मोठे पाहुणे आम्हाला या दरम्यान प्रेक्षक म्हणून लाभले होते.
मुंबईला त्यावर्षीच्या राज्यनाट्य स्पर्धेत हे नाटक अंतिम फेरीतही पोहोचलं. तसंच मुंबईच्या त्यावेळच्या कार्यरत आणि गजबजलेल्या छबिलदास प्रायोगिक रंगमंचावर त्याचे अनेक प्रयोग झाले. एकूण चाळीस जणांचा संच, त्यात माझ्यासारखे नवोदित अनेक. छबिलदास रंगमंचावर सतत गर्दीत हे नाटक होत राहिलं. इतक्या गर्दीत की त्यावेळी गमतीनं असं म्हटलं जायचं, छबिलदासला झुलवाचं तिकीट मिळालं नाही म्हणून (आणि आज नाटक बघायचंच आहे असं ठरवलेला) प्रेक्षक मग शिवाजी मंदिर या व्यावसायिक नाटकं सादर होणार्‍या नाट्यगृहाकडे वळत असे. छबिलदास शाळेच्या नाट्यगृहात किश्श्यावर किस्से घडत. एक ज्येष्ठ रंगकर्मी, निवेदक त्यावेळी एका प्रतिथयश वृत्तपत्रात नाट्यसमीक्षा लिहित. प्रयोग सुरू होण्याआधीच नाट्यगृह तुडुंब भरलेलं असे. दारात गर्दी जमलेली असे. तसे हे मान्यवर काही अपरिहार्य कारणाने उशीर झाल्यामुळे दारातल्या गर्दीपुढे सरकू शकलेच नाहीत. नाटकात भूमिका करायला सगळे नट तत्परच असतात. वानवा असते ती रंगमंचामागे काम करणार्‍यांची. कार्यकर्ते इतके कमी पडले की प्रेक्षकांची आसनव्यवस्था बघायला ज्यांचा नाटक माध्यमाशी दुरान्वयेही संबंध नव्हता अशांना बोलवावं लागलं. ते बिचारे नाटकातल्यांच्या मैत्रीला इमानेइतबारे जागत प्रेक्षागृहात राबत होते. त्यांच्यापैकी कुणी आलेल्या त्या मान्यवरांना ओळखलंच नाही! ते बिचारे मी अमुक अमुक म्हणून सांगत राहिले आणि आता पुढच्या प्रयोगाला या म्हणून कार्यकर्ते त्याना न ओळखताच वाटेला लावू लागले. सुदैवाने एका जाणकाराने हा प्रकार पाहिला आणि त्या मान्यवरांना प्रेक्षागृहात कशीबशी जागा करून दिली!  

माझ्या या ब्लॉगवर मी या आधी झुलवा या नाटकावर लिहिलं आहेच. माझ्या आयुष्यात झुलवा नाटकाला अनन्यसाधारण महत्व आहे असे मी मानतो. मी या नाटकाच्या प्रवासात काय शिकलो नाही? लोकांनी मला काय काय शिकवलं नाही? एक समूह, ग्रुप म्हणजे काय मजा असते, ती अमुक एका वयात आपल्याला सर्वतोपरिने कशी सांभाळते, आधार देते हे खूप समाधानानं अनुभवलं. या नाटकाचे झालेले दौरे चिरस्मरणीय राहिले आहेत. या संबंधात  कलकत्त्याजवळच्या बेलूर मठबद्दल या पूर्वी लिहिलं आहे.
नेपथ्यकार हा भारतीय रेल्वेत खानपान सेवेत वरच्या पोस्टवर होता. रेल्वेच्या आरक्षणात मदत करण्याबरोबर ग्रुपच्या खानपानसेवेबद्दल तो चांगलाच (!) जागरूक असायचा! एका लांबलचक प्रवासात, धीरे धीरे मार्गक्रमण करणार्‍या पॅसेंजरीत तो जेवणखाणाची वेळ झाली की पुढच्या स्थानकावरच्या खानपान विभागाशी संपर्क साधून जेवणखाण तयार ठेवायला सांगत असे आणि ते स्थानक आलं की आमचा ग्रुपमधला खानपान विभाग भली मोठी पातेली, जी त्यानेच आमच्या बरोबर बाळगली होती, ती घेऊन उतरत असे. त्वरेने स्थानकावरच्या खानपान विभागात जाऊन जे मिळेल ते गोळा करत असे. लगबगीने गाडीत येऊन सहकार्‍यांमधे त्याचे वाटप करत असे. सरतेशेवटी आमच्या जागेवर भल्यामोठ्या पातेल्यावरच्या एका भल्यामोठ्या झाकणावर उरलेलं, बाजूला ठेवलेलं  बरंच काही एकत्र करून इफ्तार पार्टी करून हादडत असे आणि खाणंजेवण संपवलेले इतर असूयेने आमच्याकडे पहात असत.
अशा मजा, गंमती किती सांगाव्यात? रात्रंदिवस सलग रेल्वेप्रवासातल्या कित्त्येक अंताक्षरी, बाहेरगावी प्रयोग संपल्यानंतरच्या पहाट होईपर्यंत रंगलेल्या गप्पा, मग पहाटे चहा, जिलेबी इत्यादीचा फराळ. नाटक लोककला प्रकारातलं असल्यामुळे प्रवासात ढोलकी, हार्मोनियम, चंडा इत्यादी साईड रिदम आणि कितीतरी स्वयंघोषित गायक यांच्या मैफिली तर अवर्णनीय झाल्या असतील! रेल्वेच्या बोगीत आजूबाजूचे प्रवासी प्रेक्षक होत आणि आमच्या तालमी- ज्याला बैठ्या रिहर्सली म्हणत त्या चालत. धमाल धमाल म्हणजे काय असते ही त्यावेळी अनुभवली. आजही असं वाटतं की अमुक वयात अमुक असं वातावरण मिळणं हा भाग्ययोग असतो. ’झुलवा’ या नाटकाचा विचार करताना मी स्वत:ला चांगलाच भाग्यवान समजतो. केवळ त्या नाटकाचं त्या काळात बरंच नाव झालं, नाटकातले लोक आमच्यासारख्या नवोदितांना ओळखू लागले यासाठी नाही तर समवयस्क ग्रुप मिळाला. भारतभरच्या अनेक महोत्सवात जाता आलं. महाराष्ट्राचं अभिमानानं प्रतिनिधित्व करता आलं म्हणून. भोपाळला भारतभवन, दिल्लीला कमानी ऑडिटोरियममधे प्रयोग आणि बरोबरच राष्ट्रीय नाट्यशाळा अर्थात नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (एनएसडी) बघायला मिळाली म्हणून, कलकत्त्याला रवींद्रभवनमधे प्रयोग करायला मिळाला म्हणून.  
माझ्या वैयक्तिक जीवनात या निमित्ताने आणखी एक भाग्ययोग अवतरला. एका कोजागिरीच्या रात्री नाटकातल्याच एका मैत्रिणीच्या गच्चीत आमचा सर्व ग्रुप ती व्यवस्थित साजरी (!) करण्यासाठी जमला. रात्रीला चांगलाच (!) रंग चढत होता. त्यात मी नुकत्याच कविता करू लागलोय हे माझ्या एका मित्रानं जाहीर केलं. खरंतर आम्ही, मी, ठरवून कवितांची वहीबिही घेऊन तयारीतच होतो. रंगलेल्या ग्रुपचा आग्रह सुरू झाला कविता म्हणण्याचा. रंगलेला (!) मी कविता वाचू लागलो. माझ्या ग्रुपनं त्या अथ पासून इतिपर्यंत ऐकल्या. आग्रह करकरून ऐकल्या. कविता करतो म्हणवून घेणार्‍याला आणखी काय हवं? आयुष्यातला सर्वोच्च क्षण!
खरी मजा तर पुढेच झाली! झालं गेलं सगळं विसरून आणि आणखी रंगात येऊन आमच्या सबग्रुपनं- हो भल्यामोठ्या ग्रुपमधे असे सबग्रुप असतातच, हा सबग्रुप माझ्यासारख्या तेव्हाच्या- ज्याला भालचंद्र नेमाडे ’कारे’ म्हणतात- अशांचा होता. सबग्रुप थेट गच्चीवरच्या पाण्याच्या टाकीच्या खाली (खाली का? वर का नाही? का वरच? काहीच आठवत नाही अशी त्यावेळची अवस्था!) आणि भलतंच रंगातआल्यावर त्यावेळी जसं करत असत तसा कोळीगीत, नृत्यांचा खाजगी कार्यक्रम (!) सुरू केला. ग्रुपमधलाच प्रेक्षक आमची यथेच्छ टिंगल करायला भोवताली जमला  होताच. अचानक दिग्दर्शकाची पत्नी सरसावली. रंगात रंगून गेलेल्या मला तिनं कसं बाजूला काढलं माहित नाही आणि मला माझ्या आयुष्यातलं पहिलं आणि एकमेव प्रपोजल सजेस्ट केलं. वर ’तुझं काय म्हणणं आहे? मुलगी आपल्या ग्रुपमधलीच आहे!’ अशी पुस्ती पुढे जोडली. मी ’आत्ता तुला या प्रपोजलबद्दल काही सांगायचा अवस्थेत नाही!’ असं खरंच कसबसं मला तिला सांगावं लागलं, ती माझ्याकडे बघून वेड्यासारखी हसत सुटली!
आणि काय सांगावं महाराजा! कॉलेजवयात जो सिलसिला सुरू झाला नव्हता तो तिशी उलटत असलेल्या माझ्या आयुष्यात सुरू झाला! पुढे आयुष्य सुफळ संप्रूण (!) होतंच आहे हे काही तुम्हाला सांगायला नकोच! :D
झुलवा नाटकाची बरोबरी त्यावेळी पुण्यातल्या घाशीराम कोतवाल या नाटकाशीही काही लोकांनी केली इतकी लोकप्रियता त्या नाटकाला त्यावेळी मिळाली होती. व्यावसायिक प्रयोग करण्यासाठी निर्मातेही सरसावले होते. पण तसं झालं नाही. एकूण शंभरएक प्रयोगांमधे वर्ष-दीड वर्षाचा खंड पडला. झुलवा पुन्हा काही जुन्या, काही नव्या अशा कलाकार संचात सुरू राहिलं. दूरचित्रवाणीवर झुलवाचं नाट्यावलोकनही सादर झालं! त्यात मान्यवरांचं त्या नाटकाविषयीचं भाष्य होतं. दृष्य, नृत्य, गाणी यातील भाग होते. तो विडिओ कॅसेट्सचा जमाना होता. माझ्याकडची विडिओ कॅसेट कालौघात टिकली नाही. ती सीडीमधे रूपांतरीत करता आली नाही याची रूखरूख राहिली.. काय काय झालं? काय आधी झालं? काय नंतर?...
माझी अवस्था चार आंधळे आणि हत्तीच्या दृष्टांतामधल्या त्या आंधळ्यांसारखी होते! पुन्हा पुन्हा झुलवा मनात रूंजी घालत रहातं.. सोबत कात्रणं दिली आहेत तुमच्याबरोबर शेअर करण्यासाठी..

      

Sunday, February 26, 2012

वाचकसंख्या ३००००! सर्वांचे आभार!

नमस्कार वाचकहो! ’अभिलेख’ या माझ्या ब्लॉग अर्थात जालनिशीने वाचकसंख्या ३०००० हा महत्वाचा टप्पा ओलांडला आहे! आपले आभार! आभार!! आभार!!!
’अभिलेख’ ची सुरवात झाली १३ फेब्रुवारी २००८ या दिवशी! चार वर्षं उलटून गेली. एवढ्या काळात खरंतर अनेकांनी हा टप्पा आधीच पार केलाय. काही तर लाखाच्या आणि त्यापुढच्या घरात गेलेत. त्यामुळे अप्रूप नाही पण तीस हजारचा पहिला टप्पा पार केल्याचं समाधान जरूर आहे! ही सुरवात आहे. कशी झाली सुरवात?
तुम्ही म्हणाल झालं स्मरणरंजन सुरू! स्मरणरंजनात रमण्याबद्दल अनेक प्रवाह आणि प्रवाद आहेत. आपल्याला बुवा आवडतं त्यात रमण्यात आणि रमतो तर रमतो असं कबूल करायलाही आवडतं.
’अभिनयातून लेखनाकडे’ असा ’अभिलेख’ चा अर्थ मला अभिप्रेत आहे. केवळ रोजच्या जगण्यामधनं मी बाहेर पडलो ते अपघातानं अभिनय करायला लागल्यामुळं. लिखाणाचं बीज आत कुठेतरी होतं. ते माझ्या आईमुळेच पडलं असा माझा ठाम विश्वास आहे. संघर्ष करणं आणि त्यातून बाहेर पडणं असं चक्र माणसाच्या आयुष्यात सतत चालूच असतं. पुढे एक टप्पा असा आला की एका गर्द काळोख्या काळात अचानक कविताच फुटून बाहेर येऊ लागल्या. त्या कविता गोष्टरूप होताएत असं माझ्या लक्षात यायला लागलं. मग कथा- जशा जमतील तशा लिहिणं सुरू झालं.
दुसर्‍या बाजूला, साधारण दहा-एक वर्षाचा अभिनयाचा अनुभव असेल म्हणून म्हणा, कथेत संवाद येऊ लागले. मग कथा लिहिण्यापेक्षा नाटक लिहिणं जास्त सोपं (?) असं काहीतरी मनानं घेतलं आणि नाटक लिहिलं, ते चांगलं वाटलं म्हणून राज्यस्तरीय नाट्यलेखन स्पर्धेला पाठवलं. तिथे ते पहिलं आलं. राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेला ते पात्र ठरलं आणि प्रकाशित झालं! ते नाटक म्हणजे आवर्त!
हे नाटक लिहिताना किंवा या लेखनाचं पुनर्लेखन करताना असं लक्षात आलं कि पुन्हा पुन्हा लिहिणं फार जिकीरीचं काम आहे आणि आता संगणकाशिवाय पर्याय नाही. पण संगणक घेणं परवडत नाही अशी परिस्थिती. लिखाण चालूच राहिलं. मुद्रित माध्यमात ते छापून येण्यासाठी प्रयत्न चालू झाले. मुद्रित माध्यमातही परिचयाचं कुणीच नव्हतं, नाट्यमाध्यमात तरी कुठे कोण होतं? नियतकालिकांमधे लेख छापून येऊ लागले, दिवाळी अंकात कथा  येऊ लागल्या. पुलाखालून बरंच... ही छोटी कादंबरीही प्रकाशित झाली. पुनर्लेखनाचं कसं तरी जमवावं लागत होतं किंवा मग एकटाकी लिहूनच त्याचं काय ते करावं लागत होतं. छापून आणण्यातलं परावलंबनही जाणवत होतं.
मग एके दिवशी तडक कर्ज घेऊन संगणक घेतला! हा क्रांतीकारी निर्णय असावा! :)
घेतला खरा पण तो चालवायचा कसा माहित नव्हतं. मराठी फॉन्ट्स कसा मिळवायचा माहित नव्हतं. तो सर्वत्र दिसण्यासाठी युनिकोड पद्धतीचा असावा लागतो हे माहित नव्हतं. एवढंच काय माझा पहिला मेल आयडी मी एका जुजबी ओळखीच्याला बोलावून करवून घेतला. तो बिचारा माझा मित्र झाला आणि त्यानं आयडी तयार केला, तो कसा करायचा ते दाखवलं. मग झुंज सुरू झाली. आधी सीडॅकचं iLEAP मिळालं! झुंज पराकोटीला गेली. मग शिवाजी फॉन्ट एका भावानं शोधून दिला आणि टाईप करणं सुसह्य झालं.
माझ्या कविता लोकांसमोर यावात असं खूप मनापासून वाटत होतं. एकतर त्या अतिसंघर्षाच्या काळात झाल्या होत्या आणि त्या बर्‍या आहेत असं मला वाटत होतं, तसे अभिप्रायही इतरांकडून मिळाले होते. ते कसं करायचं?
मग नेटवर शोधताना सुषमा करंदीकर या नाशिकच्या ब्लॉगर बाईंचा पाचोळा हा कवितांना वाहिलेला ब्लॉग सापडला. ब्लॉगचं झालेलं हे पहिलं दर्शन. हे असं करता येतं तर! मग अभ्यास सुरू झाला. उलट उलट जात, शोधत बराहा हे सॉफ्टवेअर एकदाचं मिळालं आणि मग सुटलोच!
..मध्यंतरी कुणीतरी- आता कुणीतरी म्हणजे कुणी जाणकारच असणार म्हणा- ब्लॉगची क्रमवारी की काय ती लावली. त्यात त्याने म्हणे कविता, कथा इत्यादी म्हणजे- ललितलेखनाचे ब्लॉगच वर्ज्य ठरवले म्हणे! अशी क्रमवारी-ब्रिमवारी लावण्याचा अधिकार कोण कुणाला देतो? आणि तो अमुक वर्ज्य, तमुक त्यज्य असं कसं काय ठरवतो? असा प्रश्न पडला. विचार करता असं उत्तर सापडलं की ब्लॉग किंवा आंतरजाल हे असं माध्यम आहे की इथे ’सामर्थ्य आहे चळवळीचे! जो जो करील तयाचे!’ ह्या उक्तीप्रमाणे काहीसं आहे. अर्थात मी ब्लॉग लिहितो म्हणजे काही चळवळ करतोय असं म्हणण्याचं धाडस मी अजिबात करणार नाही पण मी हेच लिहितो कविता, कथा, लेख, नाटक वगैरे. मग माझ्या ब्लॉगवर तेच दिसणार. दुसरं असं आहे की माणूस आला की व्यक्त करणं आलं. व्यक्तं करणं आलं की गोष्टं आलीच. बघा पटतंय का, पण प्रत्यक्ष संवाद, लेखन आणि इतर माध्यमातून कुणीतरी कसलीतरी गोष्टंच एकमेकाला सांगतो की! असो! निंदा अथवा वंदा आमचा आपला सुचेल ते लिहिण्याचा धंदा! अर्थातच ’अभ्यासोनि प्रकटावे!’ हे आम्ही विसरणार नाही!
ज्याचा त्याचा पिंड असतो. ज्याचा त्याचा वाचकवर्ग असतो. कुणी एकाच विषयावर लिहितं. तेच बरोबर असं सांगतं. माझ्यासारख्या अनेकांना माणसं, त्यांचे स्वभाव, मन, नाटक, चित्रपट असं आवडतं. माझ्या आत आणि माझ्या सभोवताली काय चाललंय याकडे बघायला आणि जमेल तसं व्यक्तं व्हायला आवडतं. मी ते करतो. विषयाचं अमुकच असं बंधन नाही. असो!
या प्रवासातला आणखी एक टप्पा म्हणजे ’अभिलेख’ ची स्टार माझ्या वाहिनीच्या ’ब्लॉग माझा’ स्पर्धेत झालेली निवड! या निवडीनं मला ब्लॉगर मित्रमैत्रिणी दिल्या. त्यातल्या काहींनी त्याआधी ’अभिलेख’ वर येऊन माझा हुरूप वाढवला होताच. मग आंतरजालावरच्या विशेषांकांतून लिहिता आलं. देवकाकांनी ध्वनिमुद्रणाचं तंत्र शिकवलं... शिकण्याचा प्रवास चालू राहिला. हा प्रवास असाच चालू राहो! असं आज अगदी मनापासून वाटतं. सर्वात महत्वाचं म्हणजे अनेक वाचकांनी ’अभिलेख’ ला भेट दिली. अभिप्राय देणार्‍यांचे आभार. असं लक्षात येतं की अभिप्राय न देताही अनेक वाचक इथे येत असतात. नेमानं वाचत असतात. त्या सर्वांचे, सर्वांचे मनापासून आभार! सरतेशेवटी मला हवं ते, हवं तेव्हा, व्यक्तं करू देण्याचं स्वातंत्र्य आणि त्याच बरोबरीनं येणार्‍या जबाबदारीचं भानही देणार्‍या या माध्यमाचे शतश: आभार! धन्यवाद!


Saturday, October 29, 2011

विस्मृतीच्या पडद्याआड गेलेल्या खरय़ाखुरय़ा नायकास...

प्रिय अरुण,
                 तू माझ्या वयाचा नव्हेसच, खरं तर माझ्या वडलांच्या वयाचा.तुला काय म्हणून संबोधायचं इथपासून माझी तयारी.बरं तुझी व्यक्तिगत माहिती काहीच नाही, म्हणजे तुझा जन्म कधीचा, तू.. तू गेलास ती तारीख.परवा तुझा सिनेमा बघितला एक चॅनलवर.खरय़ा अर्थाने तो तुझा सिनेमा नव्हता अर्थात. पण तुझं ते फेटा, जाकीट घातलेलं, धोतर नेसलेलं रूप.पडद्यावरचं ते तुझं अप्रतिम ढोलकी वाजवणं.तुझ्या मनगटावरचा काळा धागा.. तुझा हातखंडा असलेला नायिकेबरोबरचा तुझा प्रेमप्रसंग.. तुझं हसणं, तुझं बोलणं.. त्या तुझ्या सहजतेला अभिनय म्हणणंसुद्धा व्यर्थ वाटलं.तुझं आणि माझं गाव एक हा फक्तं बादरायण संबंध जोडून तुला लिहायला बसणं अपरिहार्य झालं मला.हा भावनेचा खेळ तूच समजून घेशील.
                 तुझा सगळ्यात अप्रतिम सिनेमा कोणता? माहित नाही.तुझं पडद्यावरचं दिसणं अधिक चांगलं की हसणंच चांगलं, तुझा आवाज उत्तम की तुझं बघणं, तुझी नजर वेधून घेणारी.तुझं गावरान रूप अधिक चांगलं की शहरी जास्त प्रभावी.असलं काहीही मला डिफरंशिएट करता येणार नाही.मा.विठ्ठलना मी अगदीच थोडं बघितलं, तुला जास्त बघितलं ते माझ्या लहानपणी पण त्यानंतर ’नायक’ म्हणून कुणीच रूचलं नाही.तुम्ही दोघेच फक्त.अभिनेत्यांची यादी डॉ.लागू, निळू फुले, विक्रम, नाना, अशोक सराफ, दिलिप प्रभावळकर अशी लांबलचक होईल.पण नायक तुम्ही दोघंच.हे माझं मत.
                 तुझ्या एवढी प्रचंड सहजता आणि चार्म अरूण, नाही बघितला कुणात.तू आज असतास तर अनेक प्रश्नं विचारता आले असते प्रत्यक्ष.तू हिंदीत का गेला नाहीस? आपण आंतरराष्ट्रीय दर्जाचे नायक, अभिनेते आहोत असं तुला वाटतं का? तू ’तुघलक’ केलंस पण तेंडुलकरांचं तुझ्यासाठी लिहिलेलं ’अशी पाखरे येती’ तू नाकारलंस हे खरं का?.. 
                 तुझी कोणतीही विशिष्टं लकब नव्हती, जशी बलराज सहानी, मोतीलाल यांचीही सांगता येणार नाही.आता इथेच थांबतो.तुझी अमुक कुणाशी तुलना करायची नाहिए पण माझ्यामते तू उत्तम अभिनेता होतास.स्टाईलाईज्ड न होता व्यावसायिक चित्रपटांमधून तू लोकप्रिय झालास.
                ’थांब लक्ष्मी कुंकू लावते’ लहानपणी थिएटरमधे बघितलेला तुझा पहिला चित्रपट.मग टिव्हीवर बघितलेले ’संथ वाहते कृष्णामाई’, ’घरकुल’, ’मुंबईचा जावई’, ’सिंहासन’ शिवाय नाव न आठवणारे काही ग्रामीण चित्रपट, तमाशापट.हवालदार नायक आणि त्याच्यासारखाच दिसणारा नायिकेचा पाठलाग करून तिचा खून करू पहाणारा खलनायक असा दुहेरी रोल असलेला चित्रपट.. सिनेमांच्या नावापेक्षा तू लक्षात राहिलास.तुझ्या नायिकांची तुझ्याबरोबर प्रेमप्रसंग करताना काय अवस्था होत होती?
                 तुझा नायक मिष्कील असायचा.तो कधी व्यसनी व्हायचा, मग पश्चातापदग्धही व्हायचा.तो गर्विष्ठही असायचा आणि त्यात खलनायकी रंगही कधी असायचा.हे सगळं तू तुझ्या डोळ्यातून, आवाजातून आणि मुख्य म्हणजे सर्वांगातून आणायचास.आणायचास! दाखवायचास नव्हे! तुझ्या भूमिकांमधून चांगलंच वैविध्य असायचं.तुझ्या प्रेमात असल्यामुळे कदाचित पण तू खूप चांगला माणूसही असावास या माझ्या मतावर मी ठाम आहे.मध्यंतरी, जयश्रीबाई असताना, एका मुलाखतीमधे तुझ्याबद्दल बोलताना त्यांचा गळा भरून आल्याचं मला आठवतंय.तू चांगला माणूसही असल्याचं त्या सांगत होत्या.संभा ऐरा नावाचा तुझा सहकारी तुझ्या माणूसपणाबद्दल खूप आवर्जून बोलला होता माझ्याशी तेही आठवतं.कचकड्याच्या या दुनियेत, मिन्टामिन्टाला रंग बदलणारय़ा सरड्यांमधे तू कसा वावरला असशील? पण तू खरंच मर्दानीही होतास.राजामाणूस होतास.तुझं स्थान तू निर्माण केलंस.
                 सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक निवृत्तीबुवा सरनाईकांचा तुला वारसा.तू गाण्याकडे का तितकंस लक्ष दिलं नाहीस? ’घरकुल’ मधलं ’पप्पा सांगा कुणाचे’.. त्यातलं तुझं गाणं आणि विशेषत: गात गात हसणं.सहज हसणं.हसणं हा कितीतरी अभिनेत्यांचा आजही प्रॉब्लेम आहे.’चंदनाची चोळी..’ मधलं तू गायलेलं ’एक लाजरा न साजरा मुखडा’, ते सुद्धा सुप्रसिद्ध पार्श्वगायिकेबरोबर.कोण विसरू शकेल? ’मुंबईचा जावई’ मधलं रामदास कामतांनी म्हटलेलं ’प्रथम तुज पाहता’ पडद्यावर तुझ्याइतकं चांगलं कोण म्हणू शकलं असतं? तू मात्रं तुझ्यातलं गाणं फारसं मनावर घेतलं नाहीस!- आणि आज गाणं न येणारेही गात सुटलेत.स्वत:चे ढोल तू स्वत:च कधी बडवले नाहीस.तुला त्याची गरज नव्हती.पण तू विस्मृततही लवकर गेलास.तुझा जन्मदिवस, तुझा मृत्यूदिन कोणीही नुसता उधृत केलेलाही आठवत नाही.तुझ्यावर कुणी पुस्तकही लिहिलं नाही.तू मागे सोडलेल्या तुझ्या एकट्या लेकीकडे तुझं बरचसं संचित असेल.ते ती जपत राहिली असेल.
                आजच्या भाषेत सांगायचं तर तू तेव्हा नंबर वन होतास मराठी चित्रपटात.तसं असूनही केवळ शोबाजी केल्यासारखं न करता इमानदारीत नाटकंही केलीस. ’लवंगी मिरची कोल्हापूरची’, ’अपराध मीच केला’, ’तरूण तुर्क म्हातारे अर्क’, ’गुड बाय डॉक्टर’, आणि अगदी ’गोष्टं जन्मांतरीची’सुद्धा.तू छबिलदासला ’तुघलक’ही केलास, जो बघायला मिळाला नाही म्हणून मी आजही हळहळतोय.
                 मी एकदाच तुला हाताच्या अंतरावरनं पाहिलं.एका नाटकाच्या कॉन्ट्रॅक्ट शोच्या वेळी स्वत: बसमधून उतरून तू बस वळवून घ्यायला मदत करत होतास...
                तू आणखी जगला असतास तर काय काय केलं असतंस? मालिकांमधे काम केलं असतंस? जे काय केलं असतंस ते नक्कीच दर्जेदार केलं असतंस.तू चांगल्या चरित्रभूमिका केल्या असत्यास ’सिंहासन’ मधल्या मुख्यमंत्र्यासारख्या आणि आंगापेक्षा बोंगा जड विग लाऊन, आरडत, ओरडत, छातीवर हात दाबून किंचाळी, कंठाळी अभिनय करणारय़ा नेहेमीच्या यशस्वी चरित्र अभिनेत्याना धडे दिले असतेस.कुणीही शेंबडकोंबड्यानं उठून नायक बनण्याच्या आजच्या जमान्यात खरा नायक कसा असतो हे आजच्या तुझ्यासारख्या म्हातारय़ाकडे बघून कळलं असतं त्याना.कळलं असतंच पण वळलं असतं की नाही याची मात्रं मी काहीही खात्री देत नाही.तू आज असतास तर बरंच काही झालं असतं.मुख्य म्हणजे मला खूप बरं वाटलं असतं.पण तू गेलास.गेलास तो ही..
                 काही वर्षांपूर्वी एका आत्मचरित्रात तुझ्याबद्दलचा एक प्रसंग वाचून वाईट वाटलं होतं.पुण्याला तुझ्या नाटकाचा प्रयोग आणि तू पूर्णपणे ’आऊट’.प्रयोग रद्द करण्याशिवाय गत्यंतर राहिलं नाही.वाईट वाटलं.तुला खरंच खूप दु:ख होतं? कुठली चूक झाली होती तुझ्या हातून डोंगराएवढी म्हणून तू स्वत:वर आणि तुझ्या चाहत्यांवर सूड उगवत होतास? की कलाकार आणि व्यसन ह्यांचं अद्वैत असल्याचा न्याय तूही सिद्ध करत होतास?.. काहीही असलं तरी अगतिक व्यसनाधिनता ही कुणीही मान्य करण्यासारखी गोष्टं अजिबात नाही!
                 नियतीचा डावही असा की या व्यसनातूनही तू पूर्णपणे बाहेर आलास आणि ’पंढरीच्या वारी’ला निघालास. त्याचवेळी एका निर्घृण अपघातात तुला काळानं ओढून नेलं.तुला, तुझ्या पत्नीला, तुझ्या मुलग्यालासुद्धा! त्या भीषण अपघातात आपल्यालाही का नेलं नाही असं मागे राहिलेल्या तुझ्या मुलीला वाटलं असेल.तुमची मरणं अनुभवल्यानंतर ती आजतागायत काय जगली असेल याची मी फक्तं कल्पनाच करू शकतो.
मग हे अरूण नुसतं स्मरणरंजन नाही रहात.मग प्रश्न पडायला लागतात.कलावंताचं कलेसारखं त्याचं आयुष्यसुद्धा नाट्यमय किंवा सिनेमॅटिकच असतं का?.. कलाकार खरंच कलंदर असतो?.. कला शापित असते?.. की मरण अटळ असतं?.. संदर्भ असलेले, नसलेले असंख्य प्रश्नं..
                एका सिनेमात तुला अचानक पाहिलं.वावटळीसारखा माझ्या आठवणींमधे घुसलास तू.माझा नेहेमीचा हळवेपणा म्हणून अनेकवेळा तुझ्या आठवणींना काढून टाकण्याचा प्रयत्न केला.घुसमटत गेलो.तुला लिहायलाच बसलो.ते अपरिहार्य झालं.मला समानधर्मी मिळण्याचे अनेक चान्सेस दिसायला लागले, तुझ्याबद्दल माझ्यासारखंच वाटणारे.
                 अरूण.. तेव्हा.. वेगळ्या रूपात पृथ्वीवर आला असशील तर भेटूच! अन्यथा.. जरूर भेटू!
                 मी निदान तुझ्या गावचा आहे हे पुन्हा एकवार आठवून द्यायची आणखी एक संधी मी निश्चितच सोडू शकत नाहीए.तू काहीही म्हण!
                                                                    तुझा
                                                                              मी

Wednesday, August 31, 2011

’डेस्पेरेडो स्क्वेअर’ अर्थात ’संगम’

आशियाई चित्रपट महोत्सवाबद्दल या आधी लिहिलं ते द सिरियन ब्राईड आणि मुतलुलुक- ब्लिस या चित्रपटांबद्दल.मुंबईत दरवर्षी थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव होत असतो.या वर्षी तो २२ डिसेंबर २०११ ते २९ डिसेंबर २०११ या कालावधीत साजरा होणार आहे.२००५ सालापासून या महोत्सवात बरेच चांगले चित्रपट बघायला मिळाले.यातल्या पटकन‍ आठवणार्‍या आणखी दोन चित्रपटांबद्दल केव्हापासून लिहायचं होतं.राहून गेलं.यातला एक चित्रपट ’डेस्पेरेडो स्क्वेअर’ हा इस्त्रायली चित्रपट! एक भारतीय चित्रपटांचा प्रेक्षक असलेल्या मला हा अतिसुखद धक्का होता.मी हा चित्रपट मस्त एंजॉय केला.
१९६४ साली आलेला राजकपूरचा संगम बहुतेकांनी पाहिला असेलच.तो कुणाला खूप आवडला.कुणाला आवडला नाही.चित्रपटातली गाणी हा राजकपूरच्या चित्रपटांचा मुख्य गुणविशेष! ती गाणीही बहुतेकांना आठवत असतीलच.चित्रपट आवडो न आवडो यातल्या गाण्यांवर अनेकांनी समरसून प्रेम केलंय हे नाकारता येत नाही.
१९६४ साली आलेला संगम हा १९४९ साली आलेल्या मेहेबूब खान या चित्रसम्राटाच्या अंदाज या चित्रपटाचा रिमेक होता.या चित्रपटातली गाणीही अविस्मरणीय होती.राजकपूर, दिलिपकुमार, नर्गीस हे मेहेबूब खान यांना गुरूस्थानी मानत.मेहेबूब खानचा १९५७ साली आलेला मदर इंडिया कोण विसरू शकेल? तो त्यानेच १९४० साली बनवलेल्या औरत या चित्रपटाचा रिमेक होता! आता या रिमेकच्या खेळातून जरा बाहेर पडूया!
’संगम’ किंवा तो ज्यावरून घेतला तो ’अंदाज’ या चित्रपटांची मूळ गोष्टं कुणाची होती माहित आहे? 
’तीन मुले’ ही ती मूळ गोष्टं होती, पांडुरंग सदाशिव साने अर्थात आपल्या परमपूज्य साने गुरूजींची!
असो!
’डेस्पेरेडो स्क्वेअर’ ह्या इस्त्रायली चित्रपटाचा विषय असा.
इस्त्रायलमधलं एक जमान्यापासून बंद पडलेलं एक सिनेमागृह.त्या सिनेमागृहाचा मालक मरण पावलाय.त्याला दोन तरूण मुलं.त्यातल्या धाकट्याच्या स्वप्नात बाबा येतात आणि कायमचं बंद पडलेल्या त्या सिनेमागृहाचे पुनरूज्जीवन करा! असा आग्रह धरतात.त्या मुलांचा काका त्यांच्यापासून लांब गेलाय तो ते सिनेमागृह बंद पडल्यापासूनच.त्याच्याही स्वप्नात त्याचा वडीलभाऊ येऊन बंद पडलेल्या सिनेमागृहाचे पुनरूज्जीवन करण्याची गळ घालतो.
मुलं ते कायमचं बंद पडलेलं सिनेमागृह चालू करण्याचा विडा उचलतात.पण पहिला चित्रपट कुठला लावायचा? ते काकाला विचारतात.काका म्हणतो आपण हा प्रश्नं ’इस्त्रायल’ ला विचारू.’इस्त्रायल’ ही नमुनेदार व्यक्ती आहे या कुटुंबाचा जीवलग.तो अफलातून हेअरडू करतो.स्वत:ला राजकपूर समजतो.सतत आपल्या दुचाकीवर राजकपूरच्या सिनेमातली गाणी वाजवतो! तो म्हणतो बंद पडलेल्या चित्रपटगृहाची सुरवात करायची तर ती ’संगम’ याच चित्रपटाने.
इस्त्रायल आणि अरॉन-मुलांचा काका या दोघांनाही मदर इंडिया, संगम या चित्रपटांची स्टार कास्ट, गाणी यांचं अक्षरश: वेड लागलेलं आहे. इस्त्रायल गोपाल, राधा, सुंदर यांची ( तीन मुलांची?) गोष्टं अर्थात पिच्चरची थीम सांगतो.  त्या मुलांसमोर ’दोस्त दोस्त ना रहा’ हे गाणं गाऊन दाखवतो! काका-अरॉनही त्याला साथ देतो.धाकटा मुलगा मोठ्या भावाला म्हणतो. अरे! हेच संगीत मी माझ्या ’त्या’ स्वप्नात ऐकलं होतं! आता बोला!!
पुढे काय होतं? ते पहाण्यासारखं आहे! चित्रपटाचं कथानक त्या बंद पडलेल्या चित्रपटगृहाच्या पुनरूज्जीवनाबरोबर पुढे सरकू लागतं आणि एक वेगळंच इमोशनल नाट्य उभं रहातं.त्यात गुंतागुंत होते.ती गुंतागुंत संपते की नाही? चित्रपटगृह पुन्हा चालू होतं की नाही? हे बघत आपला जीव वरखाली होत रहातो!...
यूट्यूब वरचा या चित्रपटातल्या महत्वाचा सीन तुम्हा सगळ्यांशी इथे शेअर करतोय! तो बघितल्यावर तो डालो करायचा की नाही? याचा निर्णय तुम्हालाच घेता येईल! काय? :-) 
डाऊनलोड केलात तर मला दुवा- लिंक हो!- द्यायला विसरू नका! तुम्ही माझ्यापेक्षा सहजतेने अशी लिंक शोधू शकता, मला माहिती आहे!
मागच्या पिढीतल्या लोकांजवळ लहानपणी गणेशोत्सवात आपण रस्त्त्यावरच्या पडद्यावर चित्रपट बघत होतो याच्या मनोरंजक आठवणी असतील.काळाचा महिमा अगाध आहे.आज आपण डालो करून हवे ते सिनेमे सहज बघू शकतो! नाही?
      आपल्या सगळ्यांना गणेशोत्सवाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!