romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins
Showing posts with label लेखन. Show all posts
Showing posts with label लेखन. Show all posts

Tuesday, February 10, 2015

ज्ञानपिठ...

प्रेषिताचेच काय
प्रत्येकाचेच पाय मातीचे
कुणी काय करायचं
ते आणखी कुणीतरी ठरवायचं
कोणात नक्की केवढं आहे तेही
एखादा वांड मुलगा असतो
मला वाटेल, पटेल ते मी
त्या त्या वेळी करीन
काय करायचं ते घ्या करुन म्हणतो
प्रत्येकाचा एक काळ असतो
वेळ असते
पाणी अमुक वळणावरच जातं
शिमगा जातो, कवित्व उरतं
विचार पक्के हवेत
विरुद्ध विचार पक्के हवेत
एकमेकांबद्दलचा आदर चिरंतन रहावाच
गळ्यात गळे, तत्व वेगळी
वर्ग की वर्ण संघर्ष डोकं वर काढत रहावा
अंतर्विरोध का काय तो असतोच
झुक्या... त्याला किती लवकर कळलं
पार नाहीसे झाले 
लोकलमधे चावडी कसली 
घुसमट शरीरांची, श्वासांची, प्रसंगी प्राणाची
वर्तमान पत्र बाद, संजयी वाहिन्या उद्बोधक
व्यक्त होण्याची, लढत रहाण्याची असोशीच असोशी
झुक्यानं सगळं घरात आणलं, हातात दिलं
त्याला किती लवकर समजलं
आयुष्य...

Wednesday, October 1, 2014

दिवेलागण...

त्या दिवशी अचानक दिवेलागण इस चीज का अहसास हुआ... बाहेर पडलो काही आणायला. साडेसहा संध्याकाळचे. उजेड होता पण दुकानांमधले, रस्त्यावरचे दिवे लागायला सुरवात झाली होती...
दिवेलागण... केरोसिनचा वास दरवळला अचानक मनात... राॅकेलचा... येशेल म्हणायची आजी ते गोडेतेलाला बहुतेक...
आजोळ जागं झालं पुन्हा... खूप दिवसांनी... माझं आजोळ...
चाळीस वर्षांपूर्वी गावात वीज नव्हती. निमशहरी गावाच्या दृष्टिनं चाळीस वर्षं म्हणजे फार मोठा काळ नव्हे. माझ्या आजोळच्या अनेक कारणांनी महत्व प्राप्त झालेल्या गावात तेव्हा तरीही वीज नव्हती हे खरं...
कंदील... तारांच्या सापळ्यात लंबगोलाकार काच बसवलेले, वर लावलेल्या तारेच्या लंबगोलाने तो कंदील स्वत:बरोबर कुठेही वाहून नेता यायचा...
चिमणी... लंबगोलाकार पितळेची छोटीशी बुधली. मोठी वात असलेली... काड्याचपेटीनं ती लावायची. मोठी ज्योत, त्यावर काजळीमय धुराची वर जात राहिलेली काळीभोर वळवळती जाड रेखा... चिमणी लवंडायची, कधी पेट घ्यायची... मोठ्या माणसांनी मुलांना सतत सावध करायचं. काम झालं की आजी हाताच्या एका फटका-यात शांत, गपगार करायची तिला... कुणाच्या नकळत किंवा कधी मी करतो, मी करतो म्हणून ती विझवायला- नव्हे शांत करायला गेलो तर हवेत वार केल्यासारखे कितीही हात मारले तर चिमणी ज्योत विरुद्ध दिशेलाच... मग फुंकरा मारायच्या. तसं करणं आणखी धाडसी. हे सगळं करत असताना मागावर असलेलं; आई, मावशी, मामी नाहीतर साक्षात आजी मागे यून उभी राहिली की मग कंबक्तीच.
या दिव्यांव्यतिरिक्त गोल बुधलीच्या तोंडावर गोलाकार दाते असलेली खाच. त्या खाचेत पेरुच्या आकाराची गोलाकार काच बसवलेले छोटे कंदील अधिक सुरक्षित... रात्रीच्या वेळी पायखान्यात न्यायला जास्त सोप्पे... बुट्टी असलेले पायखानेही किती दिवस होते वीज नव्हती त्या काळात... त्या बुट्ट्या खालच्या खाली ओढून मैला वहाणारे कर्मचारी... अंगावर शहारा येतो आज...
रात्र म्हणजे काळोखाचं साम्राज्य... निबिड काळोखाचं... आज चकचकाटाचं साम्राज्य आहे... दिवसाही विजेचा चकचकाट असतो अनेक ठिकाणी.
तेव्हा अंधार पडून निजेपर्यंत काय करायचं लहान मुलांनी?... मग मावशीनं सगळ्याना माडीवर न्यायचं. मोठ्या बुधलीवरचा अर्धा, पाऊणफूट उंचीचा स्टँड कंदील लावायचा... हा कंदील रोज अंधार पडायच्या आत साफ करण्याचं रोजचं एक मोठं काम असायचं. कंदीलाच्या काचेवरची काजळी साफ करायची. कापडानं पुसून जात नसेल तर राखेनं घासून पुसायची. खालची राॅकेलची टाकी भरायची. जाड आडव्या वातीची काजळी खुडून वात वर ओढायची...
हा मोठ्ठा कंदील लाऊन भोवतीनं बालगोपालांनी बसायचं. मावशीनं गोष्टी सांगायच्या. कधी इस्पिटानं- इश्पिटानं- पत्त्यानं खेळायचं... माडीच्या खाली काळोखं माजघर. तिथे दिवसाही डोळ्यात बोट घालूनही दिसायचं नाही. त्याच्या मागच्या अंगाला स्वैपाकघर. रात्रीचा चुलीचा धूर, त्याचा वास, अन्नपदार्थ शिजल्याचे वास माडीचर येत असायचे...
मावशीला डबलड्यूटी -दुहेरी काम असायचं. स्वैपाकघर ते माडी अशा तिच्या फेर्‍या चालू असायच्या...
तिच्या दोन येण्यांच्या मध्यंतरात वडील भावडं भिंतीकडे बोट दाखवायची आणि धाकल्यांना 'भूत भूत' करुन घाबरवायची... कंदीलाभोवतीनं बसलेल्या सगळ्यांच्या सावल्या दुप्पट, चौपट मोठ्या आणि काळ्याभोर होऊन, शेणाने सारवलेल्या, गेरु किंवा चुन्याचे हात फिरवलेल्या भिंतीवर; दबा धरुन बसल्यासारख्या दिसायच्या...
मावशी येऊन दांडग्यांना आवरेपर्यंत आणि लहानग्यांना जवळ घेईपर्यंत हा खेळ चालायचा. माझं आजोळ या इथेच या आधी लिहिलेल्या मालिकेतल्या एका नोंदीत मावशीच्या जाण्याचा उल्लेख आला आहे...
स्मरणातल्या त्याच त्या गोष्टी परत परत आठवत रहातात... शोभादर्शक यंत्रातून बांगड्यांच्या काचांच्या तुकड्यांची मांडणी दरवेळी वेगवेगळी दिसते तशा. पहिल्यापेक्षा नंतरची मांडणी वेगळी आणि आणखी मनोहर, सुंदर... काही वेळा व्याकूळ, अंतर्मुख करणारीही...
मावशी देवाघरी गेली. सगळी वडील भावंडे या ना त्या कारणाने दुसर्‍या शहरी स्थायिक झालेली... आजी-आजोबा एकटे आणि म्हातारपणी अपत्यमृत्यूचा चटका. मध्यरात्री आजीला दार ठोठावल्या्चे आणि 'आई दार उघड, मी आहे!' असे आवाज एकू येऊ लागले. एकदोनदा तिनं आजोबाना मध्यरात्री दार उघडायला लावलं... मग एके दिवशी आजोबांच्या धाकट्या भावानं हे बिर्‍हाड गावातच आपल्या शेजारी हलवलं...
आमचे काका आजोबा त्यावेळी एका चौसोपी वाड्याचं कारभारीपण पहात त्याच वाड्यात रहात होते...
पुढे गावात वीज आली...
काका आजोबा रात्री चौसोपी वाड्याच्या कानाकोपर्‍यातले लाईट्स बंद करायला खोलीबाहेर पडायचे तेव्हा त्यांच्या हातात कंदील हेलकावत असायचा. शेवटचा  विजेचा दिवा बंद केल्यावर गुडुप अंधारातून खोलीत परतताना हेलकावणारा कंदील हे एक प्रत्ययकारी दृष्य होतं...
मला हे समजलं एक कथा वाचताना. काका आजोबांच्या मुलीनं, माझ्या दुसर्‍या मावशीने लिहिलेल्या..,
ती कथा मी फारसं समजत नसताना एका मासिकात बघितलेली आठवते. वाचली पण वरच्या दृष्याखेरीज काही आठवत नाही. आईला वाचनाचं वेड होतं तिनं मला ती दाखवली होती. मावशीचा अशा कथांचा संग्रह प्रसिद्ध झाल्याचं कालांतरानं कळलं पण तो काही पहायला मिळाल्याचं आठवत नाही. बघायला मिळाला असेल तरी त्याचं महत्व त्यावेळी न कळण्याची अवस्था अस्मादिकाची होती...
मी लिहायला लागल्यावर तुझ्या कथा वाचायला दे म्हणून मावशीला विचारलं, मागे लागलो. माझ्याकडे काहीच नाही रे त्यातलं असं मावशी तिच्या गोड आवाजात, हसत सांगत राहिली. मी पुन्हा पुन्हा आठवण करत राहिलो.
मावशी आता एका विद्यापिठातून मुख्य ग्रंथपाल म्हणून निवृत्त झाली आहे.
मी मधल्या काळातल्या अभ्यासासाठी प्रदक्षिणाचे खंड आणले. कालाप्रमाणे साहित्यिकांची जंत्री, माहिती, महत्व अशा प्रकारानी हे खंड उपयुक्त आहेत. प्रदक्षिणा च्या दुसर्‍या खंडात ज्येष्ठ समीक्षक श्री. म. द. हातकणंगलेकर सरांचा लेख आहे. साधारण १९७५ च्या सुमाराला उदयोन्मुख असणार्‍या स्त्री कथालेखिकांमधे मावशीचं नाव आहे... सुमती जाधव
मी मावशीला हे सांगितलं... ती पुन्हा गोड हसली... कथासंग्रह आता मलाच शोधावा लागणार आहे...
माझ्य़ा आजोळच्या नात्यांचा आणखी एक कोन, आणखी एखादा पदर मला खुणावतो आहे, खेचतो आहे...
दिवेलागणीच्या या संवेदनेनं मला तिकडे चांगलंच ओढलं आहे...
माझं आजोळ हे माझं महत्वाचं संचित आहे... 
(सर्व छायाचित्रं आंतरजालावरुन साभार)

Friday, November 15, 2013

"शुभमंगल सावधान!" एकांकिका "कृष्णलीला" कार्यक्रमात...

कृष्णलीला, कृष्णलीला, कृष्णलीला... असा गजर घरी गेले कमीत कमी सहा महिने चालला होता... हे असं पहिलंच वाक्य तुम्हाला काय सांगायचं ते सांगून गेलंच असेल... तरीही... सांगतो... हा गजर तुम्ही ओळखला तिनेच म्हणजे आमच्या अर्धांगिनीने केलेला... तिच्या नृत्यवर्गाचा कार्यक्रम... सूत्र कृष्णलीला... तर तिला आमची एक एकांकिका त्यात बसतेय हे आठवलं आणि "कृष्णलीला" आमच्याही मागे लागली...
आता ताकाला जाऊन भांडं लपवायचं काही कारण नाही आम्हाला... आम्ही वाट बघत असल्यासारखेच... अशा संधीची केव्हापासून...
तर अशी झाली "शुभमंगल सावधान!" या एकांकिकेच्या सादरीकरणाची सुरवात...
"शुभमंगल सावधान!" लिहिली खूप आधी. मराठवाड्यातल्या एका गावातल्या एका आदिवासी तरुणीचं लग्न देवळातल्या श्रीकृष्णाच्या मूर्तीशी लावलं... अशी बातमी वर्तमानपत्रात वाचली. तिची कथा झाली. एकांकिका होईल असं नंतर कधीतरी वाटलं. मग सुनीता आणि श्रीकृष्ण असा कथेतला एकमेव प्रवेश एकांकिकेचा शेवटचा प्रवेश झाला. त्याआधीचे प्रवेश मग बांधले गेले. असं अस्मादिकानी केलं पहिल्यांदाच...
गेल्या वर्षी कन्या या लिखित, दिग्दर्शित दीर्घांकाची निर्मिती केली. यावर्षी भूमिकाही करा असा आग्रह झाला अर्धांगिनीकडून आणि आमच्या आतून तर तो होतच रहातो नेहेमी... मग जमवाजमव सुरु झाली...
ती एक मज्ज्याच असते. कलाकार निवडणं. मग त्यांनी गळणं. कुणी हो हो म्हणत अचानक कलटीची चाहूल देणं. आपण त्याना तयार करतोय असं आपल्याला वाटणं. मग नाद सोडून द्यावा लागणं. एखाद्याने घाबरून पळच काढणं इत्यादी... रिहर्सलसाठी जागा हा आणखी एक व्याप आणि ताप... असं करता करता यावेळची गंम्मत म्हणजे दोनच कलाकार उपलब्ध. त्यातले एक अस्मादिक. मग पुनर्लेखन. आशय तोच ठेवायचा. तांत्रिकता सांभाळायची. रचनेचा तोल बिघडू द्यायचा नाही... एकांकिका सोडूनच द्यायचा विचार पक्का होत चालला. पण घर आणि संच (इन मिन दोन कलाकार) यांकडून आग्रह होऊ लागला आणि अस्मादिकांना वाट सापडली पुनर्लेखनाची...
आता दोन्ही कलाकारांना पूर्णवेळ फलंदाजी... फूल फ्लेज्ड बॅटिंग... म्हणजे मेहेनत भरपूर... तीत कमी पडायचं नाही. तेवढंच एक हातातलं...
अनंत अडचणी. त्या येतातच. काही करायचं असलं तर येतातच. विचार येऊ लागला यापेक्षा भरपूर चिकित्सात्मक अभ्यास केला असता तर रोज एक पिल्लू सोडून घमासान चर्चांचे फड उभे केले असते सोशल नेटवर्कींग साईटवर तर केवढं काम झालं असतं. केवढ्याना कामाला लावलं असतं... पण काहीतरी प्रत्यक्ष करायची खाज ना? काय करणार?
संगीत, प्रकाश सगळ्यातल्या अडचणी, मोबाईल्स न उचलणं, अडलेल्याला नाडलं करुन सोडणं... सगळं नेहेमीसारखं... तसं निर्मितीतलं नवेपणही मधे मधे येऊन अडचणी वाढवणारं... शेवटच्या क्षणापर्यंत...
प्रयोगात मग नेहेमीचं थोडंसं इकडे तिकडे झालेलं सोडलं तर महत्वाची अडचण न येता पस्तीस ते चाळीस मिनिटं कधी गेली कळलं नाही...
अस्मादिक (हा शब्द या नोंदीत किती वेळा आला?.. ते तुम्ही मोजलं असेलच!) विनोदाचं धनुष्य पेलून पहिल्यांदाच. तीन भूमिका: सूत्रधार, गणा, श्रीकृष्ण. थोड्याशा वेशभूषा बदलानेच साकार होण्यासारख्या. सोबतच्या स्त्री सहकलाकाराचंही तसंच, तीन भूमिका: अप्सरा-नटी, लक्षुमी आणि सुनिता ... मी खूप वर्षांनी प्रत्यक्ष रंगमंचावर... त्या तुलनेने नवीन...
प्रेक्षकांचे अभिप्राय अंतिम. ते अजून येताहेत.
आमंत्रण बर्‍याच जणांना गेलेलं असतं. काहींच्या खर्‍याच अडचणी. काही न जमवणारे, मग काही करत नसताना ’सध्या काय चाललंय?’ असं थांबवून थांबवून विचारणारे. काही ’यानं प्रत्यक्ष काही केलं बरं का’ म्हणून हिरमुसणारे, सरसावून उगाच आपलं काहीतरी कुठेतरी दामटत बसणारे...
आपल्याला कुणी किती गंभीरपणे घेतंय हा विचार लोप पावलेला असतो प्रत्यक्ष काही करत असताना. आपलं असेल नसेल ते कौशल्य पणाला लाऊन काम पूर्ण करणं यात आनंद असतो. नक्कीच असतो...
तो या नोंदीद्वारे आपल्यापुढे सादर करतो... आभार!...
"शुभमंगल सावधान!" (एकांकिका) "अभिलेख" निर्मित, "नृत्यरंग" आयोजित 
लेखन, दिग्दर्शन: विनायक पंडित 
प्रकाशयोजना: वासुदेव साळुंके 
पार्श्वसंगीत: अरुण कानविंदे 
रंगभूषा: शशी सकपाळ, रमेश वर्दम आणि मंडळी 
वेशभूषा: वरदा पंडित 
कलाकार: प्रिया गडकरी, विनायक पंडित



Friday, December 21, 2012

"कन्या" दीर्घांकाची क्षणचित्रं!

"अभिलेख" प्रकाशित "कन्या" या दीर्घांकाचा शुभारंभ झाला त्याची क्षणचित्रं! 
दिनांक १६ डिसेंबर २०१२, रविवार, संध्याकाळी ५ वाजता, प्रबोधनकार ठाकरे लघुनाट्यगृह, बोरिवली इथे "कन्या" हा दीर्घांक सादर झाला. 
एका अत्याचारित महाविद्यालयीन युवतीची कहाणी मांडण्याचा हा एक प्रयत्न. 
दीर्घांकाचे मानकरी पुढीलप्रमाणे:
लेखन, दिग्दर्शन, निर्मिती: विनायक पंडित
प्रकाश: वासुदेव साळुंके
पार्श्वसंगीत: अरूण कानविंदे
वेशभूषा: वरदा पंडित
रंगभूषा: रमेश वर्दम
कलाकार
तेजश्री बोरकर
विद्या मुळगुंद
कविता नाडकर्णी
प्रिया गडकरी
मृणाल वझे

Wednesday, December 5, 2012

हार्दिक आमंत्रण "कन्या" दीर्घांकाचे!

हार्दिक आमंत्रण!
"अभिलेख" सादर करत आहे...
विनायक पंडित लिखित, दिग्दर्शित, निर्मित 
दीर्घांक "कन्या"
एका महाविद्यालयीन युवतीची ही गोष्टं!
सारिकावर अत्त्याचार झाला...
तिला तपासून घ्यावं लागलं आपलं आयुष्य,
आपल्या आधीच्या पिढीतल्या चार स्त्रियांशी...
काय होती या सगळ्यांची आयुष्यं?
सारिकाला काय मिळालं या अनुभवातून?
सारिकाचं पुढे काय झालं?

Thursday, September 15, 2011

राज्य (प्रकरण शेवटचे)

त्याचवेळी चार पाच भयानक गुंडं घरात घुसतात.बाप त्यांच्या मार्गातून आधीच बाजूला होतो.गुंडाना अडवायला पुढे झालेली आई अहोऽ अहोऽ असं म्हणेपर्यंत ते तिला बाजूला ढकलतात आणि भिंतीला लावलेला हाय डेफिनेशन उचकटू लागतात.या गलबल्यामुळे राजू जागा झालाय.
अहोऽ अहोऽ कुठे नेताय? आमचा.. आमचा आहे तो! तुम्ही-
त्या चारपाचांमधला एक दाढीवाला राजूला ढकलतो.
अरे!ऽ आईऽऽ बाबाऽ ते बघा आपला हाय डेफिनेशन-अरेऽ
राजू पुन्हा त्या चारपाचांना झटू लागतो.दुसरा एक दांडगा त्याच्या काडकन्आवाज काढतो.
अगाईऽऽगं! मारलंऽ मारलंऽऽ टीव्ही नेलाऽऽ टीऽव्ही नेलाऽऽ
आई राजूकडे धावत जाते.
मेऽलेऽ जळ्ळेऽऽ दिवसा ढवळ्या दरोडे! डोळ्यादेखत! अहोऽऽ तुम्ही-तुम्ही काय लपून बसताय मागेऽ घेऊन गेले ते टीव्ही! नवा कोराकरीत टीव्हीऽ तुम्ही काय, मजा बघताय?
बाप खिडकीतून, ते गेले त्या दिशेने पहातोय.वळतो.
भयंकर आहेत ते! काहीही करतील!
पोराला मारलं माझ्या! आणि तुम्ही मागे मागेच!
बाप हसतो.
हा-हासतो! हा माणूस हासतो! अरे काय माणूस आहेस की-
पुन्हा ते चारपाच गुंडं येतात.खुर्ची-टेबल उचलून बाहेर नेऊ लागतात.
अहोऽ अहोऽ ते बघाऽऽ आपलं सगळंच उचलूऽन- एऽऽ कोण? कोण आहात तुम्ही?
ओल्या टॉवेलमधे केस बांधलेली, गाऊन घातलेली गार्गी स्वैपाकघरातून बाहेर येते.प्रचंड घाबरलेली.
आई!.. काय झालंय?
आत जा तू!ऽ आत जा!ऽ येऊ नकोस बाहेऽर आत जाऽतूऽऽ
राजू रडत बसलाय.गार्गीला काय करावं कळत नाहीये.ती दोन पावलं बाहेर, दोन पावलं आत असं करत राहिली आहे.
अहोऽ अहोऽ त्याना आवराऽ पुन्हा येतील ते!ऽ आवरा आवरा त्याना!ऽऽ.. काय करताय तुम्हीऽऽ मजा बघताऽऽय!ऽऽ
बाप शांत.
काय करू मी? माझ्या हातात काय आहे!
हा बघ! हाऽऽबघ काय बोलतोय माणूऽऽस! आहो तुम्ही माणूस आहात की कोऽऽण!ऽऽ
बाप अजूनही शांत.
मी काय करू?
राजू रडत रडत बोलू लागतो.
अहो बाबाऽ काय करू म्हणून काय विचारताय? ते सगळं लुटून नेताएतऽ आणि तुम्ही काहीच करत नाही!.. मला कानपटवलं त्यानी! तुम्ही नुसते बघत राहिला आहातऽ
हे असं घडणारंच होतं! बाप ठाम.
आई पिसाळलीए.
काय बोलतो बघ!.. अहोऽपण तुम्हाला काहीच वाटत नाहीऽऽ एवढ्या स्वस्थपणे सांगताय!ऽऽ
राजू गर्भगळीत.
आई परत येतील का ग तेऽ
गार्गी आईला चिकटलीए.
बापरे! आईऽऽ
बाप सगळ्यांकडे पहातोय.पूर्वीच्याच थंडपणे.
तुम्हाला खरं नाही वाटणार पण हे असंच होणार आहे!
आईचा जीव कासावीस झालाय.
पण का?ऽऽ आम्ही कुणाचं काय वाईट केलंय? आमच्या वाटेलाच हे का-
गुंडू परागंदा झालाय!
काऽऽय?
आईसह गार्गी, राजू बापाकडे थिजल्यासारखे बघत राहिलेत.
पण.. म्हणजे.. का?.. कुठे?..
मलाही माहित नाही कुठे ते! पण तो एजंट आता त्याचे पैसे वसूल करणार!
राजूला धक्का बसलाय.
पैसे?ऽऽ
बापाच्या गूढरम्य चेहेरय़ावर आता स्मित विलसू लागलंय.
आणि.. आणि यातून.. आता फक्तं.. मीच तुम्हाला वाचवू शकतो!
तुम्ही काय बोलताय ते तुमचं तुम्हाला तरी-
बापाच्या तोंडावरचे भयंकर छद्मी हास्य बघून आई बोलायची थांबते.बाप तसंच हसत बोलायला सुरूवात करतो.
दोन दिवस फिल्डिंग लाऊन होतो.. गुंडूचं हे फार आधीपासूनचं आहे.. एजंटला हाताशी धरून, दादागिरी करूनच त्याने नोकरी मिळवली.ह ह.. या मेणचटाला घरी बाहेरचं कुण्णी कुण्णी आलेलं चालायचं नाही.. अगदी परगावातले जवळचे नातेवाईकसुद्धा.. निषेध! निषेध करायचा लगेच! ह ह.. आणि या एजंटला मात्रं आणून बसवलं घरात!.. राजूला बाहेर काढून!.. ह ह.. आणखी बरीच माहिती मिळवलीए मी! पण तूर्तास.. हा हा हा.. तुम्ही काय करताय सांगा!
तिघेही भयचकीत झालेत.
आम्ही?ऽऽऽ
हो!.. पंचेचाळीस लाख रूपये जमवलेत तर यातून सुटका होईल!
ऐकून दोन क्षण सगळंच स्तब्धं.मग आई ज्वालामुखीसारखी उसळते.
--पंचेचाळीऽऽसऽऽ.. काय वेडबीड लागलंय का तुम्हाला? तुम्ही-
पुन्हा ते भयंकर चारपाच आत घुसलेत.ते कॉटकडे धावतात.चादर उचकटतात.आता बाप पुढे होतो.त्यांच्या हातापाया पडतो.ते जुमानत नाहीत.तो क्षमायाचना करतो.गुंडांचा कॉटभोवतीचा फेरा उठतो.ते हळूहळू चालू पडतात.बाप दारापर्यंत जातो.मग वळतो.
बघा! ऐकलं नं त्यानी माझं? ऐकलं ना? चला! गार्गी तू किती देतेएस?
मी-मी.. आधी तुम्ही स्वत: किती-
मी? मला उलट विचारतेएस? ठीकएय!.. तू जर लग्नं केलंस त्या एजंटशी तर-
गार्गी घाबरलेली, झिडकारल्यासारखी बोलू लागते.
नाही! नाही! अजिबात नाही! मी-
नाही ना? मग!.. मी आहे कफल्लक माणूस! माझ्या हाती कटोरा! मी काय देणार? भिकेला लावलं नं मी तुम्हाला?.. काय राजू?
राजू रडतोच आहे.
बाबा काहीही करा पण-
राज्याऽऽ दिडक्या लागतात बाबा दिडक्या सगळ्या गोष्टींना! नुसती पुस्तकाची ढापणं लाऊन चालत नाही!.. उद्यापासून सुलेमानच्या कारखान्यावर जायला लाग कामाला! जुना हिशोब आहे त्याचा माझा-आणि- पडेल ते काम करावं लागेल! तो सांगेल तितका वेळ! ते केलंस तरच तो काहीतरी मदत करेल म्हणालाय! काय?
राजू चक्कं हात जोडतो.
होय बाबा! होय! ऐकीन मी! जाईन कामाला!..    
शर्टाच्या बाहीने डोळे पुसत तयार होतो.
हे घर राहिलं पाहिजे बाबा! आपलं घर राहिलं पाहिजे!
हो ना! हं!ऽ ह ह ह ह.. तुम्हीऽ राजूचे आईऽऽ ह ह.. तुम्ही तुमचे दागिने काढा बाहेर आता! अं हं! अंऽहं! मला नकोएत! त्या एजंटला हवेत पंचेचाळीस लाख! का येऊ देत त्याच्या माणसांना?ऽऽ
आई आता पूर्णपणे कोसळलीए.रडतेय.
नाही! नाही! पाया पडते तुमच्या! काय असेल ते आणून ओतते तुमच्या पायावर! पण हे घर वाचवा!
हो हो.. हा हा हा.. या राणीसरकार गार्गीबाई.. तुम्ही पुढे या! पंचेचाळीस काही पूर्ण होत नाहिएत यांच्याकडून! तुम्ही काय करताय?
गार्गी हात जोडते.
तुम्ही म्हणाल ते!
बाप अत्यानंदित.कॉटवर चढून उभा रहातो.आशिर्वाद दिल्यासारखे हात पसरतो.
वाऽवाऽवाऽऽ.. काय ही आपली युनिटी!ऽ आता अजिबात घाबरायचं नाही कुणी! बाकीचं सऽऽगळं आता मी पाहीन! आता राज्य.. माझं आहे! माझं राज्य आहे आता!ऽऽ..हा हा हा..
बाप वेड्यासारखा हसत, नाचत सुटलाय.कॉटवरच.बाकीचे सगळे त्याच्या पायाशी हात जोडून..

(खरं तर लिहिणारय़ानं लिहावं, स्पष्टिकरण देत बसू नये.तरीही..
              सर्वप्रथम क्षमा मागतो कुटुंब संस्थेची.कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबसंस्थेची.याच कुटुंबसंस्थेतून मीही आलोय. ’राज्यहे एक रूपक आहे.कनिष्ठ मध्यम वर्गाचं रूपक वापरून मनाला नको तेवढा छळणारा विचार मांडला गेलाय.हे कसं सुचलं माहित नाही.
राज्यकुणाचंही आलं तरी सामान्यातल्या सामान्याच्या जगण्यात काय फरक पडतो? हा तो विचार.
तो कसा मांडलाय हे अगदीच स्पष्टं करायचं म्हणजे बाप= प्रस्थापित सत्ता, आई= परंपरागत पिचलेली जनता, राजू= पिचलेल्या जनतेची तरूण पिढी, गार्गी= तळ्यात-मळ्यात असणारा प्रभावशाली घटक, गुंडू= नवी सत्ता, एजंट= पडद्यामागचा बोलविता धनी, मे बी किंगमेकर.. आणि कॉट= सत्तेची खुर्ची..
इथे राज्ययाचा अर्थ जनतेवर गाजवली जाणारी कुठल्याही प्रकारची सत्ता.वेळोवेळी समाजावर नको इतका पडणारा दूरगामी हानिकारक प्रभाव.
हे लिहायला प्रेरणा दिली इतिहासाने.महाराष्ट्राच्या नजिकच्या इतिहासाने आणि कदाचित जगाच्या इतिहासानेही.. त्या इतिहासाविषयी मन:पूर्वक कृतज्ञता व्यक्तं करण्यापलिकडे आपण काय करू शकतो?
मनापासून धन्यवाद आपल्या सगळ्याना.. तुमचा प्रतिसाद नसेल तर काही नवं मांडणं कठीण जातं असतं.. नमस्कार!)    

Thursday, September 8, 2011

राज्य (११)

भाग १० इथे वाचा!
गार्गी भानावर येते आणि ओरडतेच!
“आयलॉडऽऽ हायऽऽडेफिऽऽनेशन!ऽऽ आपल्याकडे?ऽऽ सॉलिऽऽडऽऽ गुंडूभाऊची कमाल्येऽऽ आईऽऽशप्पत!ऽऽ”
गुंडूचं नाव काढल्याबरोबर आई फुशारते.
“बघ! बघ! गार्गे!ऽऽ आहे की नाही!ऽऽ”
“ऑयलाऽ काय कलर दिसताएत टॉऽप! लयऽऽ भारीऽऽ थेटरमधे बसल्यासारखं वाटतं नाऽऽय?ऽऽ राजू! ते लाव नं तेऽ.. काय दिसतं याऽऽरऽऽ- अरे! अरे! हे काय केलंऽऽस!ऽऽ”
राजू रिमोटची बटणं दाबत राह्यलाय.मग रडवेला होतो.
“शी:ऽऽ हे काऽय? काय हेऽ असं काय झालं?ऽ काही दिसतंच नाही!ऽ शी:ऽऽऽ”
आई वैतागलीय.
“हळू हळू रे हळू! महागाची वस्तू आहे ती!ऽऽ काहीतरी करशील आणि-”
गार्गी सरसावते.
“दे इकडे दे! बघते मी!... हॉ हॉऽ हॉऽऽहॉऽ अरे यड्याऽऽ केबल उडालाऽऽ केबल! आता कसं दिसणार? यड्या सेट टॉप बॉक्स पायज्ये यालाऽऽ भाऊ कुठाय? गुंडू भाऊ कुठाय?”
आई हवालदिल.
“अय्योऽऽ म्हणजे?ऽऽ बिघडला टीव्ही?ऽऽ”
“बिघडला बिघडला काही नाही गं! केबल जुनं झालं आता! आता सेट टॉप बॉक्स! याच्यावर फ्री मिळतो यार! आपल्याला कसा नाही मिळाला?- बंद करते आता! केबलवाले झोपलेले असतात मेल्यासारखे!”
राजू ज्याम नर्वस झालाय.
“शीऽऽ बाबाऽऽ”
तो आपल्या नेहेमीच्या जागेवर जाऊन पुस्तक मांडीवर घेऊन बसतो.
“अरे हे काय कारट्या? जेव ना! एवढं वाढून आणलं मी!ऽऽ”
“जाऊ दे गं आई! भूक मेली माझी!”
गार्गी मोठ्याने हसते.
“तू गप गं! जेव रे!ऽ”
“मी नाय जा!”
आई ताट ठेवायला स्वैपाकघरात जातेय.
“दिवटा आहे दिवटा! पोटाला मारून घेतो कारटा!”
ताट ठेवते आणि बाहेर येते.
“अग बाई गार्गेऽ वाजले किती? ऑफिस सुटलंसुद्धा तुझं!ऽ”
गार्गी हसते.
“हंऽऽ म्हटलं तर सुटलं, म्हटलं तर नाही!”
“तुझं बाई भलतंय काय काय नेहेमी! म्हॅटॅलॅ तॅर सुटलॅ म्हणजे काय?”
“तुझा गुंडू म्हणतो.. नोकरी सोड!”
“कधी म्हणाला?”
“म्हणाला! माझ्या ऑफिसमधे आला होता! म्हणाला, मी अस्तॉनॉ तू नॉकरी कशॉलॉ कर्त्येयेस? तुलॉ येक श्टॉल द्येतॉ काडून फास्टफूडचॉ!”
“मग त्यात काय वाईट?”
“स्टॉल चालला नाही की मग काय?”
“असं कसं होईल? गुंडू काढून देतोय एवढा तर-”
“तू गप गं! तुला काय कळतंय!”
“बरं! पण त्याचा तुझा लवकर येण्याशी काय संबंध?”
राजू आता नेहेमीप्रमाणे पुस्तकातूनच सुरू होतो.
“जाऊ दे गं आई! तिची म्हणजे स्पेशल कॅटॅगीरी! वेगळंच सगळं! तिला सगळ्यात काळंच दिसणार!”
“तू गप रे ढापण्या!ऽ तुला सांगतेय मी?ऽ मी कायमची आऊटडोअर ड्यूटी घेतलेय! म्हणावं तर ऑफिसमधे आहे म्हणावं तर नाही!”
“म्हणावं तर स्टॉलवर आहे म्हणावं तर नाही! तळ्यात मळ्यात! नेहेमीची पॉलिसी!”
“त्यात काय वाईट? गट्स आहेत माझ्यात तेवढे राज्या!ऽऽ”
“हो! हो! त्याच्यावरच भाळलाय तो शेंडीवाला!ऽ”
“कोऽऽण?” आई ओरडतेच.
“शीऽऽ अगं तोऽगं! गुंडूभाऊचा पाहुणा! मेलाऽ कसा बघतोऽऽ ईऽऽ ऑक्ऽऽ”
“अग्गबाईऽऽ खरंऽच! माझ्या लक्षातच कसं नाही आलं? गार्गे! एवढा काय वाईट नाहीए हं तो!ऽऽ”
गार्गी कपाळावर हात मारून घेते.
“आयलाऽऽ तू पण काय आईऽऽ शी:ऽऽ”
“शीऽऽ शीऽऽ काय? तू लागून गेलीस अगदी रंभाऽउर्वशीऽऽ”
“ईऽऽ पण तो!ऽऽ ऑ-”
“घराला रंग द्यायला नको, त्याने पिचकारी मारली की झालं! तेल विकत आणायला नको, याच्या डोक्यावरनं रोज थोडं घेतलं की झालं!-”
गार्गी आता राजूवर धाऊनच जाते.
“राज्याऽऽ तुलाऽ मीऽऽ”
राजू जोरात हसत सुटलाय.आई गार्गीला अडवतेय आणि हसतेय.
“जाऊ दे गं! गंमत करतोय तो!”
राजू जोरजोरात दम लागेपर्यंत, डोळ्यातून पाणी येईपर्यंत हसत राहिलाय.गार्गी चरफडत रहाते.आईही हसत राहिली आहे.तितक्यात गुंडू बाहेरून हातात भलं मोठं पातेलं घेऊन येतो.
“काय? काय चाललंय एवढं? हसताय काय?”
“अरे!.. काही नाही रे गुंडू असंच! आणि.. तू एवढं काय आणलयंस?”
“चिकन बिर्याणी! दिल्ली दरबारची!”
“आय्याऽऽ गुंडूभाऊऽऽ”
“भाऊ मला! मला! खूप आवडते मला!”
गार्गी आणि राजूची रस्सीखेच चालू झालीय आणि गुंडू समजावतोय.
“अरे हो! हो!”
आई राजूकडे बघतेय.
“बघ! बघ! मगाशी जेवायला तयार नव्हता कारटा!”
राजू नाचतोय.
“आई मला दे! मला दे! मला आधी!”
तोपर्यंत गार्गीने स्वैपाकघरात जाऊन थाळे आणलेत.
“आई मला पण!”
आई आधी राजूला, मग गार्गीला, सगळ्याना वाढून देते.राजू त्याच्या नेहेमीच्या बसण्याच्या जागेवर जाऊन बकाबका खायला सुरवात करतो त्याचवेळी बाहेरून घरात येण्याच्या दरवाज्यात एजंट उभा.नेहेमीप्रमाणे पानाचा तोबरा, तेल लावलेले खुरटे केस आणि शेंडी इत्यादीसकट.मिष्कीलपणे हसतोय, दोन्ही हात दाराच्या चौकटीवर ठेऊन.
“आओऽऽ” गुंडू त्याचं स्वागत करतो.
खाणारय़ांचं लक्ष एजंटकडे गेलंय.आई एजंटकडे पहात रहाते.गार्गी झटका घेऊन त्याला पाठमोरी होते.राजू खाण्यात दंग.
सगळ्यांचं लक्ष आता राजूवर.खाता खाता राजूचं लक्ष एजंटकडे जातं.राजू खाणं सोडून देऊन हळूहळू उभा रहातो.
“आओऽऽ भाई आऽऽओऽऽ” गुंडू हसत एजंटला आत बोलावतोय.
एजंट हसत हसत आत येतोय आणि राजूनं मुक्कामासाठी बाहेर पॅसेजमधे जाण्याची तयारी सुरू केलीय..

Monday, September 5, 2011

राज्य (१०)

भाग ९ इथे वाचा!
दुपार झालीय.आई पदर बांधून खोलीतला केर काढतेय.राजूच्या नेहेमीच्या बसण्याच्या जागी त्याची पुस्तकं तेवढी दिसताएत.गठ्ठा केलेली.राजू बाहेरून आत येतोय.त्याच्या डोक्यावर तसाच मोठा गठ्ठा.दमलेला.डोळे लाल.आई त्याला बघते आणि जागच्या जागी उभी रहाते.
 “आलास राजूऽ तुझीच वाट बघत होते! सकाळी लायब्रीत कधी गेलास कळलंच नाहीऽ
राजू दाराजवळच्या खुर्चीजवळ ऍडजस्ट होतोय.
“काय करतो!.. रात्री काही अभ्यासच नाही मग- अगं आई गं! बसतो जरा!.. रात्रंभर अभ्यास होत नाही म्हणून तोंडात मारून घेत होतो-”
“आणिऽ_”
“डास मरत होते!.. माझ्या हातांचा आणि डासांचा पाठलाग! आणि येणारा जाणारा मी काय करतोय ते वाकून वाकून-”
वाकून वाकून दाखवतो मग त्यामुळे खोकल्याची उबळ आलीय ती आवरतो.आईचं झाडून झालंय.ती झाडणी कोपरय़ात ठेवते.
“झोप नाही ना अजिबात?”
“पण स्वप्नं होती पडत..”
“आं?”
“होय! मधेच लांबलचक शेंडी दिसायची.. नंतर कधीतरी घोड्याच्या तोंडाला बांधलेला नुसता तोबरा.. त्यानंतर नुसता लाल लाल रंग!”
“बाईऽऽ रक्ताचाऽऽ?”
“नाही! पानाच्या पिचकारय़ांचा.. पिचकारय़ा पिचकारय़ानी तयार झालेलं लालेलाल तळं!”
“तुला किती वेळा सांगितलं राज्याऽऽ? सारखं डोळ्याला पुस्तक लाऊन बसू नकोऽ
“काल कुठे वाचत होतो?”
“कालचं नाही रे सांगत! रोजचंच!”
“नाही नाही! असं कसं? पुस्तकं वाचल्यामुळेच अडीअडचणीच्या वेळी, संकटाच्या वेळी माणूस कसा ठाम उभा रहातो!”
खुर्चीतून उठून उभा रहातो.
“बस खाली!.. कोणी सांगितलं तुला?”
“आजोबानी!”
“त्याना नव्हता धंदा आणि काम करायचा वांधा! काय करतील? थोबाडासमोर पुस्तक धरणं सोपं सगळ्यात!”
“छे! छे! असं कसं? ते तर म्हणायचे- वाचाल तर वाचाल!”
“ते वाचले.. अरे गप झालास पटकनी! बोल ना! वाचले का ते? चचलेच न शेवटी वेळ आल्यावर?”
“आसं काय गं बोलतेस आई?”
“मग काय? व्यवहार पाहिजे बाबा माणसाला! व्यवहार!”
“ते खरं! पण आजोबा चचले- आपलं.. ते आजारी पडून वारले ते बाबांमुळे!”
आई कोपरापासून हात जोडते.तसं करत असताना तिची टाळी वाजते.मग जोडलेल्या कोपरांखालून डोकं बाहेर काढते.
“तुझ्या बाबाने.. सगळ्यांचे पांग फेडले रे बाबा!”
“नाही- एवढे आजारी होते ते आपल्या गावातल्या घरी, पण बाबांनी ज्याम त्याना इथं आणलं नाही!”
“ते वारल्यावर मग इस्टेटीसाठी मात्रं हाणामारय़ा केल्या! जाऊ दे!.. झालं ते झालं मेलं! तू जेवणार आहेस नं? भूक लागली असेल, रात्री जेवलासच नाहीस व्यवस्थित!”
स्वैपाकघरात जाण्यासाठी वळते आणि थबकते.
“अरे राजूऽऽ हेऽ बघितलंस का?ऽऽ
तिच्या ओरडण्याने राजू थबकून उभाच रहातो आधी, मग त्याचं लक्षं ती दाखवत असलेल्या भिंतीकडे जातं.
“बघण्यासारखं काय आहे आई त्यात! ताईला बघायला येणार आहेत ना? फोफडे उडालेल्या भिंती बघून परत जायचे म्हणून भिंतीवर चादर पसरलीएस तू! नेहेमीप्रमाणे!”
“हांऽऽ तेच! आता बघच तूऽऽ.. ढॅणऽ टऽ ढॅणऽऽ
भिंतीवरची चादर ओढून काढते आणि राजू टाळ्या पिटत नाचू लागतो.
“आईऽऽ आईऽऽ हाय डेफिनेशन! फ्लॅट स्क्रीन! स्मार्ट टीव्हीऽऽऽऽ ये ये ये येऽऽ काय काय आहे गं यात! आ हा हा हा.. वाऊवऽऽऽ मू मू मू मूऽआ..”
भिंतीवरच्या फ्लॅटस्क्रीन टिव्हीचे मुके घेऊ लागतो.
“आई आई आई! आता मॅचेस हरलो तरी बेत्तर! पण दिसतील कसल्या भारी! हूऽऽऽऽ
राजू वेडा झाल्यासारखा स्वत:च्या मांड्यांवर, पार्श्वभागावर जोरजोरात चापट्या मारून, जंगलातल्या वेगवेगळ्या प्राण्यांसारखा ओरडू लागलाय.
“येऽऽऽऽ आमच्याकडे पण आला लेटेष्ट एचडीऽऽ”
“राजूऽ अरे चल! जेऊन घेतोएस नं?”
राजू आईचा हात घट्टं पकडतो.
“नाईऽऽ आईऽऽ नाईऽऽ आधी लाऊया! आधी लाऊया नाऽऽ तू लाव आईऽ तुझ्या हस्ते लाव ना! ऑन तर कर तो! रिमोट माझ्याकडे दे! मी दाखवतो तुला! लाव!”
“अरे पण आधी जेवशील-”
“मरू द्ये गं! लाव तू! आधी लाव!”
आई टीव्ही ऑन करते.राजू तो ऑपरेट करण्याची हाय डेफिनेशन मजा चाखत असताना आई स्वैपाकघरात जाते आणि राजूचं ताट वाढून आणते.
“बघ बघ बघ आईऽ हा चॅनेल बघ! आईऽ.. आई हाऽ बघ!
“राजूऽ.. जेव आधी! कालपासून जेवलेला नाहिएस तू!”
“जेवतो गं! तू बघ नाऽऽ
“तो आधीचा लाव ना! अं हं! त्या आधीचाऽ आं!ऽऽ अगं बाई बापूऽऽ क्षमस्व परमेश्वर.. क्षमस्व परमेश्वर.. क्षमस्व परमेश्वर.. रोज येतात का रे हे इथे?”
“अगं रोज काय! चोवीस तास असतात इथे चोवीस तास! ठाण मांडून!”   
आईने मनोभावे हात जोडलेत.भावनाविवश.
“गुंड्याने माझ्या आगदी.. पांग फेडले बाबा!..”
डोळ्यातून ओघळणारं पाणी तिला पुसावं लागतं.मग ती पुन्हा हात जोडते.
“बघितलंस ना? मी म्हणत नव्हतो!.. बाबांनी ते आधीचं डबडं नुसतं रिपेअरसुद्धा करून आणलं नव्हतं! बघ! बघ!”
मायलेक भिंतीत नजर गुंतवून गुंग झालेत आणि ऑफिसमधून आलेली गार्गी त्यांच्या मागे येऊन उभी.डोळे विस्फारून त्या भिंतीकडे नुसती बघत राह्यलेली..