romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Thursday, September 15, 2011

राज्य (प्रकरण शेवटचे)

त्याचवेळी चार पाच भयानक गुंडं घरात घुसतात.बाप त्यांच्या मार्गातून आधीच बाजूला होतो.गुंडाना अडवायला पुढे झालेली आई अहोऽ अहोऽ असं म्हणेपर्यंत ते तिला बाजूला ढकलतात आणि भिंतीला लावलेला हाय डेफिनेशन उचकटू लागतात.या गलबल्यामुळे राजू जागा झालाय.
अहोऽ अहोऽ कुठे नेताय? आमचा.. आमचा आहे तो! तुम्ही-
त्या चारपाचांमधला एक दाढीवाला राजूला ढकलतो.
अरे!ऽ आईऽऽ बाबाऽ ते बघा आपला हाय डेफिनेशन-अरेऽ
राजू पुन्हा त्या चारपाचांना झटू लागतो.दुसरा एक दांडगा त्याच्या काडकन्आवाज काढतो.
अगाईऽऽगं! मारलंऽ मारलंऽऽ टीव्ही नेलाऽऽ टीऽव्ही नेलाऽऽ
आई राजूकडे धावत जाते.
मेऽलेऽ जळ्ळेऽऽ दिवसा ढवळ्या दरोडे! डोळ्यादेखत! अहोऽऽ तुम्ही-तुम्ही काय लपून बसताय मागेऽ घेऊन गेले ते टीव्ही! नवा कोराकरीत टीव्हीऽ तुम्ही काय, मजा बघताय?
बाप खिडकीतून, ते गेले त्या दिशेने पहातोय.वळतो.
भयंकर आहेत ते! काहीही करतील!
पोराला मारलं माझ्या! आणि तुम्ही मागे मागेच!
बाप हसतो.
हा-हासतो! हा माणूस हासतो! अरे काय माणूस आहेस की-
पुन्हा ते चारपाच गुंडं येतात.खुर्ची-टेबल उचलून बाहेर नेऊ लागतात.
अहोऽ अहोऽ ते बघाऽऽ आपलं सगळंच उचलूऽन- एऽऽ कोण? कोण आहात तुम्ही?
ओल्या टॉवेलमधे केस बांधलेली, गाऊन घातलेली गार्गी स्वैपाकघरातून बाहेर येते.प्रचंड घाबरलेली.
आई!.. काय झालंय?
आत जा तू!ऽ आत जा!ऽ येऊ नकोस बाहेऽर आत जाऽतूऽऽ
राजू रडत बसलाय.गार्गीला काय करावं कळत नाहीये.ती दोन पावलं बाहेर, दोन पावलं आत असं करत राहिली आहे.
अहोऽ अहोऽ त्याना आवराऽ पुन्हा येतील ते!ऽ आवरा आवरा त्याना!ऽऽ.. काय करताय तुम्हीऽऽ मजा बघताऽऽय!ऽऽ
बाप शांत.
काय करू मी? माझ्या हातात काय आहे!
हा बघ! हाऽऽबघ काय बोलतोय माणूऽऽस! आहो तुम्ही माणूस आहात की कोऽऽण!ऽऽ
बाप अजूनही शांत.
मी काय करू?
राजू रडत रडत बोलू लागतो.
अहो बाबाऽ काय करू म्हणून काय विचारताय? ते सगळं लुटून नेताएतऽ आणि तुम्ही काहीच करत नाही!.. मला कानपटवलं त्यानी! तुम्ही नुसते बघत राहिला आहातऽ
हे असं घडणारंच होतं! बाप ठाम.
आई पिसाळलीए.
काय बोलतो बघ!.. अहोऽपण तुम्हाला काहीच वाटत नाहीऽऽ एवढ्या स्वस्थपणे सांगताय!ऽऽ
राजू गर्भगळीत.
आई परत येतील का ग तेऽ
गार्गी आईला चिकटलीए.
बापरे! आईऽऽ
बाप सगळ्यांकडे पहातोय.पूर्वीच्याच थंडपणे.
तुम्हाला खरं नाही वाटणार पण हे असंच होणार आहे!
आईचा जीव कासावीस झालाय.
पण का?ऽऽ आम्ही कुणाचं काय वाईट केलंय? आमच्या वाटेलाच हे का-
गुंडू परागंदा झालाय!
काऽऽय?
आईसह गार्गी, राजू बापाकडे थिजल्यासारखे बघत राहिलेत.
पण.. म्हणजे.. का?.. कुठे?..
मलाही माहित नाही कुठे ते! पण तो एजंट आता त्याचे पैसे वसूल करणार!
राजूला धक्का बसलाय.
पैसे?ऽऽ
बापाच्या गूढरम्य चेहेरय़ावर आता स्मित विलसू लागलंय.
आणि.. आणि यातून.. आता फक्तं.. मीच तुम्हाला वाचवू शकतो!
तुम्ही काय बोलताय ते तुमचं तुम्हाला तरी-
बापाच्या तोंडावरचे भयंकर छद्मी हास्य बघून आई बोलायची थांबते.बाप तसंच हसत बोलायला सुरूवात करतो.
दोन दिवस फिल्डिंग लाऊन होतो.. गुंडूचं हे फार आधीपासूनचं आहे.. एजंटला हाताशी धरून, दादागिरी करूनच त्याने नोकरी मिळवली.ह ह.. या मेणचटाला घरी बाहेरचं कुण्णी कुण्णी आलेलं चालायचं नाही.. अगदी परगावातले जवळचे नातेवाईकसुद्धा.. निषेध! निषेध करायचा लगेच! ह ह.. आणि या एजंटला मात्रं आणून बसवलं घरात!.. राजूला बाहेर काढून!.. ह ह.. आणखी बरीच माहिती मिळवलीए मी! पण तूर्तास.. हा हा हा.. तुम्ही काय करताय सांगा!
तिघेही भयचकीत झालेत.
आम्ही?ऽऽऽ
हो!.. पंचेचाळीस लाख रूपये जमवलेत तर यातून सुटका होईल!
ऐकून दोन क्षण सगळंच स्तब्धं.मग आई ज्वालामुखीसारखी उसळते.
--पंचेचाळीऽऽसऽऽ.. काय वेडबीड लागलंय का तुम्हाला? तुम्ही-
पुन्हा ते भयंकर चारपाच आत घुसलेत.ते कॉटकडे धावतात.चादर उचकटतात.आता बाप पुढे होतो.त्यांच्या हातापाया पडतो.ते जुमानत नाहीत.तो क्षमायाचना करतो.गुंडांचा कॉटभोवतीचा फेरा उठतो.ते हळूहळू चालू पडतात.बाप दारापर्यंत जातो.मग वळतो.
बघा! ऐकलं नं त्यानी माझं? ऐकलं ना? चला! गार्गी तू किती देतेएस?
मी-मी.. आधी तुम्ही स्वत: किती-
मी? मला उलट विचारतेएस? ठीकएय!.. तू जर लग्नं केलंस त्या एजंटशी तर-
गार्गी घाबरलेली, झिडकारल्यासारखी बोलू लागते.
नाही! नाही! अजिबात नाही! मी-
नाही ना? मग!.. मी आहे कफल्लक माणूस! माझ्या हाती कटोरा! मी काय देणार? भिकेला लावलं नं मी तुम्हाला?.. काय राजू?
राजू रडतोच आहे.
बाबा काहीही करा पण-
राज्याऽऽ दिडक्या लागतात बाबा दिडक्या सगळ्या गोष्टींना! नुसती पुस्तकाची ढापणं लाऊन चालत नाही!.. उद्यापासून सुलेमानच्या कारखान्यावर जायला लाग कामाला! जुना हिशोब आहे त्याचा माझा-आणि- पडेल ते काम करावं लागेल! तो सांगेल तितका वेळ! ते केलंस तरच तो काहीतरी मदत करेल म्हणालाय! काय?
राजू चक्कं हात जोडतो.
होय बाबा! होय! ऐकीन मी! जाईन कामाला!..    
शर्टाच्या बाहीने डोळे पुसत तयार होतो.
हे घर राहिलं पाहिजे बाबा! आपलं घर राहिलं पाहिजे!
हो ना! हं!ऽ ह ह ह ह.. तुम्हीऽ राजूचे आईऽऽ ह ह.. तुम्ही तुमचे दागिने काढा बाहेर आता! अं हं! अंऽहं! मला नकोएत! त्या एजंटला हवेत पंचेचाळीस लाख! का येऊ देत त्याच्या माणसांना?ऽऽ
आई आता पूर्णपणे कोसळलीए.रडतेय.
नाही! नाही! पाया पडते तुमच्या! काय असेल ते आणून ओतते तुमच्या पायावर! पण हे घर वाचवा!
हो हो.. हा हा हा.. या राणीसरकार गार्गीबाई.. तुम्ही पुढे या! पंचेचाळीस काही पूर्ण होत नाहिएत यांच्याकडून! तुम्ही काय करताय?
गार्गी हात जोडते.
तुम्ही म्हणाल ते!
बाप अत्यानंदित.कॉटवर चढून उभा रहातो.आशिर्वाद दिल्यासारखे हात पसरतो.
वाऽवाऽवाऽऽ.. काय ही आपली युनिटी!ऽ आता अजिबात घाबरायचं नाही कुणी! बाकीचं सऽऽगळं आता मी पाहीन! आता राज्य.. माझं आहे! माझं राज्य आहे आता!ऽऽ..हा हा हा..
बाप वेड्यासारखा हसत, नाचत सुटलाय.कॉटवरच.बाकीचे सगळे त्याच्या पायाशी हात जोडून..

(खरं तर लिहिणारय़ानं लिहावं, स्पष्टिकरण देत बसू नये.तरीही..
              सर्वप्रथम क्षमा मागतो कुटुंब संस्थेची.कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबसंस्थेची.याच कुटुंबसंस्थेतून मीही आलोय. ’राज्यहे एक रूपक आहे.कनिष्ठ मध्यम वर्गाचं रूपक वापरून मनाला नको तेवढा छळणारा विचार मांडला गेलाय.हे कसं सुचलं माहित नाही.
राज्यकुणाचंही आलं तरी सामान्यातल्या सामान्याच्या जगण्यात काय फरक पडतो? हा तो विचार.
तो कसा मांडलाय हे अगदीच स्पष्टं करायचं म्हणजे बाप= प्रस्थापित सत्ता, आई= परंपरागत पिचलेली जनता, राजू= पिचलेल्या जनतेची तरूण पिढी, गार्गी= तळ्यात-मळ्यात असणारा प्रभावशाली घटक, गुंडू= नवी सत्ता, एजंट= पडद्यामागचा बोलविता धनी, मे बी किंगमेकर.. आणि कॉट= सत्तेची खुर्ची..
इथे राज्ययाचा अर्थ जनतेवर गाजवली जाणारी कुठल्याही प्रकारची सत्ता.वेळोवेळी समाजावर नको इतका पडणारा दूरगामी हानिकारक प्रभाव.
हे लिहायला प्रेरणा दिली इतिहासाने.महाराष्ट्राच्या नजिकच्या इतिहासाने आणि कदाचित जगाच्या इतिहासानेही.. त्या इतिहासाविषयी मन:पूर्वक कृतज्ञता व्यक्तं करण्यापलिकडे आपण काय करू शकतो?
मनापासून धन्यवाद आपल्या सगळ्याना.. तुमचा प्रतिसाद नसेल तर काही नवं मांडणं कठीण जातं असतं.. नमस्कार!)    
Post a Comment