गोकर्ण महाबळेश्वर अनेकांचं तीर्थस्थळ.मुर्डेश्वरही.रावणाची ती प्रसिद्ध गोष्टं या परिसरात वारंवार उल्लेखली जाते.अघोरी तपश्चर्येने भोळ्या सांबाला प्रसन्न करून घेणारा रावण.त्याला शिवलिंग हवंय.वारंवार येणारय़ा, आणल्या गेलेल्या अडचणींतून तो तपश्चर्या पूर्ण करतो.शिवलिंग मिळवतो.तो सर्वेसर्वा होणार म्हणून नारद ते शिवलिंग त्याच्याकडून काढून घेण्याच्या प्रयत्नात.गणपतीला या मोहिमेवर पाठवण्यात येतं.रावणाला वराबरोबर शिवलिंग जमिनीवर ठेवलंस तर शिवलिंगाला मुकशील अशी अटही मिळालीय!
रावण स्वगृही निघालाय.संध्याकाळ.रावणाच्या संध्येची वेळ झालीय.नेमाने संध्या करणारा रावण.आता काय करायचं? लिंग खाली ठेवावं लागणार या विवंचनेत तो असताना ब्राह्मण, बटूच्या रूपातला गणेश त्याला दिसतो.तो गणपती आहे हे रावणाला कळत नाही.संध्याकर्म संपेपर्यंत शिवलिंग तुझ्याकडे धरशील का? या रावणाच्या विनंतीवर गणपती म्हणतो, मी तुला तीन हाका मारीन.तिसरय़ा हाकेपर्यंत तू लिंग ताब्यात घेतलं नाहीस तर मला ते नाईलाजाने खाली जमिनीवर ठेवावं लागेल.शिवलिंग सुपर्द करून रावण संध्येला लागतो.ठरलेल्या बेताप्रमाणे त्याचं संध्याकर्म उरकण्याच्या आत गणपतीनं तीन हाका मारून शिवलिंग जमिनीवर ठेवलंय.रावण येऊन ते पहातो.ते जमिनीत आत जाऊ लागलंय.रावण ते खेचायचा प्रयत्न करू लागतो.जोर लावतो.लिंगाचा काही भाग हातात येऊन जोर लावल्यामुळे आसमंतात फेकला जातो.लिंगाचे चार भाग चार दिशांना जाऊन पडतात.त्यातलं एक स्थान मुर्डेश्वर आणि जिथे लिंग ठेवलं गेलं ते स्थान, तीर्थस्थान म्हणजे गोकर्ण महाबळेश्वर!
गोकर्ण महाबळेश्वराला कारवार-धारवाड परिसरात खूपच महत्व आहे.गोकर्ण महाबळेश्वराचं देवालय खूप जुनं.अजून त्याच प्राचीन अवस्थेत असल्यासारखं.या देवालयाचे पुजारी, त्या सगळ्यांची आडनावं ’मुळे’.ह्यातलेच काही ’आदी’- Adi असंही नाव लावतात.हे मुळे संपूर्ण नावामुळे मुळचे महाराष्ट्रातले वाटतात.वरची हकीकत आम्हाला सांगणारे देवळातले गुटगुटीत पुजारीही मुळेच.मी मराटी नाई.कन्नड आहे.तुमी मला समज्यून घ्येईल- असं बोलत त्यांनी वरची हकीकत सांगितली.
देवळात फोटो काढायला परवानगी नाही.पुरूषांनी अंगावरचा शर्ट काढूनच दर्शन घ्यायला आत शिरायचं.आत जेमतेम जमिनीवर असलेलं लिंग, इतर शिवलिंगाप्रमाणे त्याचा आकार दिसत नाही.सतत अभिषेक चाललेला असतो.खाली बसून जमिनीवरच्या छोट्या गोल खाचेत हात घातल्यावर आपल्या हाताला शिवलिंगाचा वरचा अर्धाकृती भाग लागतो.दर्शनाला इतर ठिकाणांसारखी घाईगर्दी मात्रं नाही!
त्या बटूनं- बटू स्वरूपातल्या गणपतीनं फसवलं म्हणून रावणानं गणपतीच्या डोक्याच्या वर, मध्यावर प्रहार केला तिथे गणपतीला एक खड्डा पडला.गोकर्ण महाबळेश्वराचं दर्शन घेऊन आल्यानंतर बाहेर त्या गणपतीचंही देवालय आहे.यातल्या उभ्या गणपतीच्या डोक्यावर खाच आहे.ह्या खाचेत हात घालून या गणपतीचं दर्शन घेतलं जातं...
गोकर्ण महाबळेश्वर देवालय म्हणजे परंपरेचा अस्सल नमुना तर मुर्डेश्वर म्हणजे आधुनिकता.मुर्डेश्वर फोटोंमधून अधिक बोलतं.देवालयच्या वर १२० फूटाची ध्यानस्थ शंकराची फायबरमधली असावी, मूर्त आहे.डोळे दिपवणारी.
तिच्या खाली ध्वनिप्रकाशाचा खेळ चालत असलेलं म्युझियम आहे! यात वर सांगितलेली गोष्टं देखाव्यांच्या स्वरूपात अप्रतिमरित्या मांडलेली आहे.यातला रावण बघण्यासारखा.खरं तर दक्षिणेत रावणाला मानही आहे.या देखाव्यांमधला रावणाचं शरीरषौष्ठव वाखाणण्यासारखं मूर्तीबद्ध केलंय आणि तरीही त्याचा चेहेर्यावरून त्याचं राक्षसपणही जाणवतं.
या सगळ्यात रमून आपण बागेसारख्या बनवलेल्या परिसरात फिरत विविध देवालयात जाऊन दर्शन घेतो.समोर तामिळनाडूत मदुराई वगैरेत असतात तसं गोपुरम् आहे.ते ही उंच पण शंकराच्या आवाढव्य मूर्तीपेक्षा छोटं.त्यात दिल्लीच्या कुतुबमिनाराप्रमाणे वरवर जाता येतं.वरून देवालयाच्या मागेच असलेला सुंदर समुद्रकिनारा न्याहाळता येतो.
या सगळ्या आधुनिक रचनेत गुंतून आणि नंतर देवळामागच्या बीचवर जायची घाई मागे लागून नेमक्या मुर्डेश्वर देवालयाकडे थोडं दुर्लक्षंच होतं खरं.काही उत्साही बीचवर जाऊन आल्यावर मग दर्शन घेऊ म्हणून थेट बीचंच गाठतात.
बीचवर जाण्याआधी बीचलगत उंचावर असलेलं उपहारगृह आहे, तिथेही पर्यटकांची गर्दी होते.या उपहारगृहाच्या बाल्कनीत खुर्च्याटेबलांवर बसून सगळा समुद्र न्याहाळता येतो.
मुर्डेश्वरचा समुद्रकिनारा अप्रतिम आहे.स्वच्छता वाखाणण्यासारखी आहे.पर्यटकही शिस्तीत मजा लुटत असतात.सगळ्यावर कडी म्हणजे बीचलगत स्त्रीपुरूषांसाठी स्नान करण्यासाठी सोय आहे.फिरती स्नानगृह इथे पार्क करून ठेवलेली आहेत.त्यामधे भरपूर पाणी आहे.स्वच्छता आहे.बीचमधल्या खारय़ा पाण्यातून बाहेर पडून स्वच्छ कोरडं व्हायला मिळाल्यावर कोण खूष होणार नाही!
1 comment:
क्या आप हमारीवाणी के सदस्य हैं? हमारीवाणी भारतीय ब्लॉग्स का संकलक है.
हमारीवाणी पर पोस्ट को प्रकाशित करने की विधि
किसी भी तरह की जानकारी / शिकायत / सुझाव / प्रश्न के लिए संपर्क करें
Post a Comment