romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins
Showing posts with label उत्सव. Show all posts
Showing posts with label उत्सव. Show all posts

Thursday, September 19, 2013

उत्सव आणि उन्माद

शहरातल्या सर्वप्रथम स्वयंघोषित ’नवसाला पावणार्‍या राजा’ च्या कार्यकर्त्यांच्या कृतीला उन्माद हे एकच विशेषण लावता येतं. विशेषणं भोंगळपणे  लावण्याची आपली प्रथा आहे. उन्माद ही केवळ एक मनाची अवस्था म्हणून या संदर्भात विचारात न घेता ती एक मानसिक विकृती म्हणून विचारात घेतली पाहिजे.
दुसरं, केवळ 'त्या' एका मंडळाचा जाहीर निषेध वगैरे करुन. आपल्याला मोकळंही होता येणार नाहीए!
बारकाईनं बघितलं तर चातुर्यानं बनवला गेलेला एक सांगाडा दिसतो. जो आता उघडपणे मिरवला जातोय. मंडळं हे एक संघटन असतं. गल्ली पासून दिल्ली पंथावरचा कुणी एक राजकारणी किंवा राजकारणी समूह हे संघटन पध्दतशीरपणे तयार करुन राबवत असतो. तो हे कशासाठी, कुणासाठी करतो? हे आपल्याला चांगलंच माहिती असतं. मग तरीही आपण त्यात सामील का होतो? आपणा सर्वांचेच हितसंबंध इथे गुंतलेले असतात.
तो कुणी एक किंवा तो कुणी समूह आपल्याच जीवाभावाचा 'वाटणारा' कुणी असतो. वाटणारा असं म्हणण्याचं कारण स्वार्थाची घडी आली की आपल्या आपल्यातच आपली कशी लठ्ठालठ्ठी चालते याच्याशीही आपण पूर्ण परिचित असतो. तरीही आपण तिथेच का रहातो? तर माझं काम होतंय ना मग झालं तर! बाकीच्या गोष्टींशी मला काय करायचंय? ही कामं म्हणजे अंत्यविधीला न सापडणारा क्रियाकर्म करणारा मिळवून देण्यापासून कुठलंही असू शकतं. ते ते त्यावेळी नक्कीच खूप महत्वाचं असतं.

आपल्याला आपल्या जमलेल्या समूहापासून दूर व्हायचं नसतं. नवा समूह आपल्याला तयार करता येत नसतो. दुसर्‍या कोणत्याही समुहात आपल्याला सहज सामावून घेतलं जाणार नाही याबद्दल आपले आपणंच ठाम असतो. मग अंतर्विरोध सांभाळत बसणं अपरिहार्य होऊन बसतं. मग आहे ते पटवून घेण्यात आपलं हित आहे हे आपल्याला आपोआप पटतं. नाहीतर सगळं भूमंडळ हादरवून थरकाप करून टाकणार्‍या डिजेंच्या तालावर इतक्या मोठ्या मिरवणुका दिसत्याच ना.
त्या तशा दिसण्याचं आणखी एक कारण म्हणजे तरुणाईला आपल्या ताणांचं विरेचन हवं आहे. कानात खुपसायला एफ एम आहे. प्रवास सुसह्य व्हायला, त्या व्यतिरिक्त जालावरची किंवा हातातल्या आयुधात जतन केलेली चित्रफीत आहे. आख्खं आंतरजाल, मल्टिप्लेक्सेस आहेत. झालंच तर तोंडी लावायला इडियट बॉक्स आहे. तरीही... आयुष्यच इतकं कठीण आहे की...
दुसरं, राजकारणी मग तो कुठल्याही दर्जाचा असो बावा, त्याच्याशी संगनमत पाहिजेच. मागच्या पिढीतल्यांसारखा नसता मूल्यामूल्य विवेक काय कामाचा? मग दारात वर्गणी मागायला, म्हणजे डिमांड करायला येतो तो उंची कपडे घालणारा, उच्चशिक्षित, नवश्रीमंत तरुण. जो इतकेच द्यायचे हं! असा सज्जड पण प्रेमळ दमही देतो. तो आपल्यातल्याच कुणाचातरी भाऊ, मुलगा, जावई इत्यादी असतो. आपण हसतो. देतो. मग कुरकुरतो. तेवढी मोठी रक्कम आपल्याला परवडणारी नसते असं नाही. पण हल्लीच्या ’कुणी उठतो स्पॉन्सर करतो’ च्या जमान्यात वैयक्तिक वर्गणीची गरज काय? ही आर्थिक उलाढाल नक्की काय होते? ती योग्य ठिकाणी की अयोग्य? हे विचारण्याचं धाडस आपल्यात नसतं. असलं तर येऊन ’स्वत्ता हिशोब तपासून घ्या!’चं आव्हान पेलायची ताकद आपल्यात असावी लागते...
'ते' स्वयंघोषित नवस मंडळही नाही का केवढी लोकोपयोगी कामं करतं, देणग्या देतं?... पण मग ढकलाढकली, हमरातुमरी, प्रत्यक्ष पोलिसांना मारहाण आणि इतर निषिद्ध बाजूंचं काय? यालाच मूल्यामूल्य विवेक म्हणता ना? आजच्या या ग्लोबल व्यामिश्र वास्तवात असा विवेक सांभाळत बसणं परवडणारं आहे? तुम्हीच तो सांभाळत बसणार असाल नं तर मग टाकतो तुम्हालाच वाळीत !!!
आणि काय हो, तुम्ही ऐन जोशात होता तेव्हा यातच सामील होतात. या उत्सवात! आणि आज असं बोलताय?...
हो! होतो ना? तेव्हा कळत असून वळवून घेतलं नाही. आता स्वत:पुरता वळलोय. तेव्हा फक्त माझ्या भावनांचं, माझ्या ताणांचं विरेचन म्हणून काही कृती घडल्या. त्याचा पश्चाताप झालाय. तेव्हा सुटा विचार होत होता. आता एकूणात विचार करतोय. त्यामुळेच खरं तर पोटतिडकीने लिहितोय...
हे एक बरं करताय की... झालं तर मग... म्हणजे आता ते त्यांचा गरबा चालू ठेवणार. दुसरे नव्याने ते काय ते छटपूजा की काय ते काढणार आणि आम्ही नववर्षाची शोभायात्राही काढायची नाही असं तुमचं म्हणणं असेल!!! विशेषत: प्रांतीय अस्मितेचा पुरस्कार करणारा तडफदार नेता आपल्याजवळ असताना?...
बघा बुवा! तेव्हा मी सुटा सुटा विचार करत होतो. आता तीच चूक तुम्ही तर करत नाही ना?...
...तर हे असं आहे... एकूणात की काय तो विचार करत रहाण्याचं...
ते कधी कधी करत रहायला हवंच की. एरवी आहेच. आत्मरंजन... आणि जनरंजनही...

Friday, September 28, 2012

उत्सव...४

इथे वाचा उत्सव १, उत्सव २, उत्सव ३ आणि त्यानंतर...
दुसर्‍याच म्हणजे दसर्‍याच्या दिवशी सकाळी वाजवणारी मंडळी दमून भागून वस्तीत परतली आणि कुणीतरी सांगत आलं, वस्तीपाठीमागच्या रेल्वेलायनीत कुणीतरी कटलं...
चिमणचा अंदाज खरा ठरला. ती रात्रीची मुलगी होती. चिमण हादरला पण यावेळी पोलिसांकडे सरकला आणि बायकोसकट वस्तीतल्यानी त्याला मागे खेचलं. कुणालाही मागे पोलिसांचा ससेमिरा नको होता. चिमणला त्यानी वस्तीत आणून डांबलं. चिमणची झोप उडाली...
वस्तीतल्यांचा भर ओसरल्यावर, मुलीचे दिवस उरकले आहेत हे बघून आतल्या आत धुमसणार्‍या चिमणनं सगळ्यांच्या नकळत त्या मुलीचं घर शोधून काढलं. आईवडलांना भेटला. मुलीला पळवून नेणार्‍यांचे चेहेरे लक्षात आहेत. आपण काहीतरी करू म्हणून विनवलं. ते सतत हात जोडत राहिले. मुलगी गेल्यावर त्यांची ताकदच गेली. कुठे विषयसुद्धा काढू नका म्हणून त्यानी चिमणलाच बजावलं आणि वाटेला लावलं. त्या दिवशी... चिमण पहिल्यांदा दारू प्याला आणि लास झाला...
त्यानंतर डुलकी जरी लागली तरी त्या मुलीचं लोकल खालचं शरीर डोळ्यासमोर येऊन तो दचकायला लागला...
पुढे मग मुलीची केसच उभी राहिली नाही. ती पोरं मानानं फिरू लागली. एवढंच काय वर्ष सरून पुढच्या नवरात्रीचा पेंडॉलसुद्धा पडला. रोषणाई झाली. वस्तीतला बाजासुद्धा रूजू झाला. चिमण त्यात नव्हता...
भान हरवणं आणि भानावर येणं हा खेळ चिमणला जास्त महत्वाचा वाटत होता. आपण त्या मुलीला सावध केलंय, त्या टग्या पोरांना पोलिसांची भीती घालून आवाज दिलाय, वस्तीतल्याना, बायकोला झुगारून पोलिसांत गेलोय, मुलीच्या आईवडलांना तयार केलंय, कमीतकमी, अंधारात त्या पोरांच्या गाडीवर उडी मारली आहे... मुलीला ट्रेनखाली उडी घेण्याआधी मागे खेचलंय... काहीही करून मुलीला वाचवलंय अशी दृष्यं नजरेसमोर आणत तो कुठेतरी नजर लाऊन बसत होता. स्वत;शीच हसत होता. भान हरवत होता...
भानावर आला की लोकांनी साजरी केलेली गटारी, श्रावणी सोमवारचे देवळातले अन्नकोट आणि बाहेर भिकार्‍यांची रांग, गोकुळाष्टमीतला रस्ताजाम आणि अडकलेल्या ऍंब्युलन्स, पितृपक्ष आणि सोनेखरेदीची झुंबड, दिवाळी, नाताळ, नववर्षाचे कानठळी फटाके... लग्नसोहोळे, वाढदिवस, जयंत्या, मयंत्या... पूजा... वेगवेगळे ’डे’ज, खेळातले विजय, निवडणुकीतले विजय, मिरवणुका, रथयात्रा, गौरवयात्रा... हे सगळं बघून पुन्हा भान हरवत होता...
...आत्ताही त्या रस्त्यावरचा माणसांचा पूर आटत नव्हता... कचर्‍याचा ओला लगदा कणकेसारखा मळत रस्ताभर पसरत होता... तीन चार फूट वर ध्वनीचा लगदा... वेगवेगळे लोक अजूनही गणपती आणत होते... सगळं जसच्या तसं होतं...
त्या सगळ्यात रूतलेला चिमण स्वत:शीच हसत होता... आत्ताच पुन्हा एकदा त्यानं त्या मुलीला वाचवलं होतं...
त्याच्या पुढ्यात अंथरलेलं गोणपाट तसंच होतं... त्यावर ऍस्टरच्या विटलेल्या निळ्या, जांभळ्या, राखाडी फुलांचे वाटे तसेच बेवारशासारखे विखुरलेले होते...      
(पूर्वप्रसिद्धी: "अक्षर" दिवाळी २००२, संपादक, निखिल वागळे)      

Thursday, September 27, 2012

उत्सव...३

इथे वाचा उत्सव १, उत्सव २ आणि त्यानंतर... 
... दरम्यान चाळीच्या किंवा सोसायटीच्या अंगणात मातीच्या घड्यात दिवा लाऊन, अंबेमातेची तसबीर लाऊन, ती पुजून त्याभोवती खेळलं जाणारं नवरात्र भल्या मोठ्या पेंडॉलमधे आलं. ड्रमसेट मधल्या पाच ड्रम्स बरोबर स्पर्धा करत चिमणचा बाजा तरीही टिकून राहिला खरा...
तरूण मुलामुलींचा उत्साह चिमण ढोल वाजवता वाजवता बघायचा. हळूहळू हा उत्साह प्रमाणाबाहेर वाढायचा. मुलामुलींची प्रकरणं व्हायची. त्रासदायक छेडाछेडी सुरू झाली की चिमणच्या कपाळावर आठी उमटायची. त्याला तसल्या त्या उद्दाम मुलांकडे दुर्लक्ष करता यायचं नाही. आतल्या आत संतापणं, जास्तच दिसलं तर संतापानं जळत रहाणं- आतल्या आत- याशिवाय चिमणसारखा माणूस करू तरी काय शकत होता?... बारीक लक्ष मात्रं ठेऊ शकत होता...
एका नवव्या रात्री याच त्याच्या बारकाईने त्याला मंडपामागच्या अंधारात खेचून आणलं. वाजवायचं सोडून देऊन. गेले आठ दिवस तीन चार पोरं एका शाळकरी पण बाई झालेल्या मुलीच्या मागे. हात धुऊन. त्या मुलीला सावध करावं तरी पंचाईत. आज त्या पोरांनी तिच्याभोवती कडं केलं. तिला ते मंडपामागे नेताहेत हे चिमणच्या नजरेतून सुटलं नाही. तो लगेच धावला. अंधारात कडमडला. दोन चार पोरांच्या लाथा, गुद्दे पोटात खाल्ले. त्या काळ्या अंधारात त्या पोरांच्या कारचा नंबरही बघता आला नाही. पोरीच्या तोंडावर आणि कमरेभोवती हात घालून गाडीत कोंबलंय हे न समजायला तो दुधखुळा नव्हता. तसाच पडत धडपडत तो मंडपात यायला बघतोय तर आता सिक्युरिटीवाला कुणास ठाऊक आडवा आला आणि चिमणलाच झापायला लागला. चिमणला कशीतरी स्बत:ची ओळख पटवायला लागली. ती सुरक्षारक्षकांनी सहजासहजी पटवून घेतलीच नाही. पुढे चिमण झाल्या प्रकाराबद्दल, अंधारातल्या, सांगायला लागला तर त्या रखवालदाराना वाद्यमेळाच्या आवाजाचं चांगलंच कारण मिळालं. प्रचंड डेसिबल्स गाठत असलेल्या. तरीही सांगायचा प्रयत्न करणार्‍या चिमणला त्यानी इतक्या जोरात मंडपात ढकललं की तो झेलपाटलाच. पुढे ते सुरक्षारक्षक त्याला कुठे दिसलेच नाहीत...
चिमणनं वाजवणार्‍या सहकार्‍यांना सांगायचा प्रयत्न केला. मंडळाच्या पदाधिकार्‍यांना शोधायचा, सांगण्याचा प्रयत्न केला. संबंध पेंडॉल फक्त बेहोषीत न्हाऊन निघालेला. त्यातून बाहेर पडायची कुणाचीच इच्छा दिसत नव्हती...
चिमणच्या डोक्यात वीज चमकली आणि त्यानं त्या मुलीबरोबरच्या ग्रुपकडे बघितलं. गायब. त्यानं शोध शोध शोधलं पण त्या मुलीबरोबरच्या ग्रुपमधलं कोणीही दिसत नव्हतं.
त्याचं पाऊल लाकडी खुर्च्यांमधे रेलून थंडा पिणार्‍या पोलिसांच्या दिशेनेही पडलं. पण तो अडखळला. मागच्याच वर्षी कुणी चाकू काढला म्हणून वाजवणार्‍यांनी पोलिसांना त्याची चेहेरेपट्टी सांगितली तर पोलिसांनी मेहेतर वस्तीत येऊन वाजवणार्‍या पोरांच्यातल्याच एकाला चांगलंच कानपटवलं, आतही टाकलं. चिमणला ते आठवून धीर होईना. तो सारखा पोलिसांपर्यंत जायचा. परत यायचा. स्वत:वरच चिडायचा. पोरीचं नाव गाव काही माहित नाही काय सांगणार पोलिसांना?...
रात्रभर जल्लोष चालू राहिला. वाजवणारे चेवून वाजवत राहिले. नाचणारे पृथ्वीतलावर राहिले नव्हतेच. गाणार्‍यांचे स्वर आकाशाला भिडलेले. ’अंबा मातं कीऽऽ... जयऽऽ’ या घोषानी आसमंत दणाणून जात होता आणि चिमण झुटुकपाण्या घालत होता. सहकार्‍यांपासून पोलिस बसले होते तिथपर्यंत आणि पुन्हा मागे सहकार्‍यांपर्यंत. सहकारी वाजवणं सोडत नव्हते आणि पोलिस वाजवतील या भीतीनं चिमणला त्याना भेटता येत नव्हतं. काय गरज होती चिमणला नाही त्या लफड्यात अडकायची? तो काय करू शकणार होता? एकटा! सगळं जग छान आनंदात होतं. चिमण एकटा स्वत:ला वांझ त्रास करून घेत होता...   क्रमश:    

Saturday, September 22, 2012

उत्सव...२

इथे वाचा उत्सव...१ हा या आधीचा भाग!
नवीन होता शहरात चिमण... बॅंडचा ठॅण ठॅण आवाज कानाचे पडदे चेपटून टाकणारा... ’मैं तो भूल चली बाबुल का देस...’ ही धून चिमणनं लगेच ओळखली. बॅंडवाले पुढे सरकतच नव्हते. पुढे हीऽऽ गर्दी. बॅंडवाले साधेसुधे नाहीत. लाल वेलवेटसारख्या कापडाच्या पॅंट्स. गमबुटासारख्या गुडघ्यापर्यंतच्या बुटांत खोचलेल्या. त्याना दोन्ही बाजूला सोनेरी पट्ट्या. पांढराशुभ्र जाड शर्ट पॅंटम्धे इन केलेला. त्या शर्टावर चामडी पट्ट्यांचं जाळं. खांद्यावर झुलणार्‍या झिरमिळ्या. झोकदार कॅपलासुद्धा झिरमिळ्या. हातात चमकणारी वाद्यं. चिमणची बोटं शिवशिवायला लागली. सगळ्यात शेवटचा, खांद्यावर हेऽऽ भलं मोठं ट्रंपेट घेतलेला नजरेपुढून नाहीसा होईपर्यंत चिमण डोळे फाडून त्या बॅंडकडे पहात राहिला. बॅंडमागे पुन्हा गर्दी...
ह्या मागच्या गर्दीतले उड्या मार मारून काहीतरी झेलत होते. झेलल्यावर झेलणारा आणि त्याच्या आजूबाजूचा घोळका हेऽऽहोऽऽ करून ओरडत होता. विकेट गेल्यासारखा किंवा गोल झाल्यासारखा. ते काय झेलताएत ते चिमण निरखून निरखून बघू लागला. काहीतरी झेलायला हपापलेली ती गर्दी पुढे सरकू लागली. चिमण वाकवाकून निरखू लागला. गर्दीत अचानक एक चांदीचा रथ आत्ताच अवतीर्ण झाल्यासारखा चकाकू लागला आणि चिमणचं झेलणार्‍या गर्दीवरचं लक्ष उडालं...
चांदीचं प्लेटिंग असलेली ती बग्गी होती. खाकी कपड्यातला चाबुकवाला आणि त्याच्या मागे तो होता. जाड काचांची नाजूक फ्रेम घातलेला. त्यानं वाकून, खाली हात घालून पटकन काहीतरी काढलं. ती फुलपॅंट होती. तिची भरभर गुंडाळी करून त्याने ती गर्दीवर भिरकावली आणि पुन्हा विकेट गेली.. किंवा गोल झाला... सीमारेषेवरून जिवाच्या आकांताने थ्रो करावा तसा तो जाड चष्मेवाला कपडे फेकत होता... झेलायला हपापलेली गर्दी ते सगळं सगळं हर्षोल्हासात झेलत होती... चिमणच्या तोंडाचा आ तसाच राहिला. हे नक्की काय? त्याला काही समजेना. तो आणखी पुढे होऊन बघायला लागला तेव्हा फाटकाच्या बाजूने ख्यॅऽऽक ख्यॅऽऽकऽ आवाज आला. दोन कॉलेजची पोरं ते बघत उभी होती.
"अर्‍ये असा काय हाऽऽ-" पहिला.
"चूप! चूप बस! आता संन्यास घेणार आहे तो म्हणून कपडे वाटतोय आपलेऽऽ" दुसर्‍यानं पहिल्याला दटावलं. चिमणला हे नवीन होतं. गर्दीतले सगळे पुरूष, बायका, मुलं थटून सजून मिरवत होती. त्या चष्मेवाल्याला निरोप देत होती. हपापल्यासारखे त्याचे कपडे झेलत होती. हातात झाडू घेऊन चिमण ती मिरवणूक पहात तसाच उभा होता... अवाक होऊन...
... मग दिवसभर त्याच्या डोक्यात गिरमिट फिरत राहिलं... संन्यास घ्यायचा मग तो एवढा वाजत गाजत का? बॅंडबिंड लाऊन? कपडे कशाला फेकायचे असे श्रीमंती गर्दीत?.. आणि गर्दीनेही ते झेलायचे?... एवढा सगळा गाजावाजा करून संसार सोडायचा?... शेवटी न रहावून त्याने बॅंकेतल्या त्या जाड्या हेडक्लार्कला विचारलंच. तो खेकसला, "तमे तमारा कामथी मतलब राखो ने झाडू मारवानू! होलो बेचारो सर्वसंगपरित्याग करे छे ने तमे पुछोछो एम केम? एम केम? झाडू मार सारी रितेऽऽ"...
चिमण ही आठवण झाल्यावर आता पुन्हा हसला. त्याला तो जाडा हेडक्लार्क पुन्हा पुन्हा आठवत राहिला. येणाजाणार्‍यावर सतत खेकसणारा आणि मग पर्युषणासाठी रजा घेणारा. नववर्ष सुरू होण्याआधीचे हे कडक उपास जाड्या कसा करत असेल? रजा घेऊन, घरी बसून? घरच्यांची हालतच... चिमण आता जरा जोरातच हसला. जाड्यानेही पांढरेशुभ्र बेदाग कपडे घातले असतील. टिळा लावला असेल. तोही- कचकन गर्दीतल्या कुणाचा तरी पाय चिमणच्या पायावर पडला आणि तो भानावर आला...
तरीही गणपती येतच होते... अवती भोवतीनं... मेरी गो राऊंडमधे बसल्यासारखे... चिमणभोवती फेर धरून...
चिमण निर्धाराने एकटक त्यांच्याकडे बघत बसला. अशाने कदाचित भोवंडल्यासारखं होणार नाही म्हणून... गणपतींचा फेर त्याला आता वाढल्यासारखा वाटायला लागला... नवरात्रीच्या गरब्याचा तो विशिष्ट ताल त्याला प्रतिध्वनीसकट ऐकायला यायला लागला... आणि चिमण पुन्हा आपलं भान हरवला... त्याचे हात ताल धरू लागले... हळूहळू आपल्या हातात ढोल वाजवायच्या वेताच्या छड्या आहेत असं त्याला वाटायला लागलं...
चिमणला त्याच्या एका गाववाल्यानं वापीहून इथे आणलं. इथल्या मेहतरांच्या वस्तीत तो सहज सामावून गेला. गाववाल्यानं त्याला कामालाही लावलं. अर्धवेळ सफाई कामगार म्हणून बॅंकेत. चिमण मग रात्रशाळेत गेला पण मॅट्रीक काही पास झाला नाही. पाच दहा वर्षांत बॅंकेत शिपाई मात्र झाला. मग ल्गेच लग्न. त्या मेहतरांच्या वस्तीत स्वत:चं झोपडं. आधी कच्चं बांधून घेऊन मग त्यावर सरकारचा नंबर पाडून घेऊन. चिमण स्मार्ट होता. नशिबानंही त्याला साथ दिली. तो काळ बरा होता.
जोडीला वस्तीतले मेहेतर नवरात्रीत वाजवायचे. त्यांचा बाजा होता. बेंजो होता. चिमण माणूसघाणा नव्हता. नसते कसलेही नाद लाऊन न घेता तो वस्तीत रूजला होता...                                                                                क्रमश:    

Monday, September 17, 2012

उत्सव...१

ब्लॉगवर लिहिण्याची एक पद्धत म्हणजे थेट लिहिणं. थेट लिहिता लिहिता चिकित्सा करत लिहिणं. एक एक मुद्दा घेऊन त्याचा वेगवेगळ्या अंगानं वेध घेत लिहिणं. बर्‍याच वेळा एकरेषीय होत जाणारं हे लिखाण. परखड, वास्तव, वाचणार्‍याला समृद्ध जरूर करणारं. वाचकाच्या माहितीत भर टाकणारं. पण काहीवेळा वाचकाचा संयम पहाणारं...
दुसरी पद्धत ललित अंगानं जाणारी. कदाचित समीक्षा करणार्‍यांशी जरा फटकूनच असणारी. रंजक म्हणून म्हणा किंवा इतरही काही असतील निकष. पण ललित लिहिताना लेखकाच्या बोध मनात असलेलं आणि नसलेलं महत्वाचंही काही अचानक सांडून जातं लिहिता लिहिता...  ललित हे कदाचित अनेक अंगानं जास्त फुलत जाणारं, अर्थबद्ध होत जाणारं.. कथा माध्यमातून महत्वाचा सामाजिक आशय व्यक्त होण्याची परंपरा तशी जुनीच..
दहा वर्षापूर्वी लिहिलेल्या कथेतलं वास्तवही आज जसंच्या तसं किंवा त्याहूनही गंभीर होत गेलेलं. ’उत्सव’ कथेचा हा भाग पहिला...


उत्सव... १

...शेवटी चिमणच्या बायकोनं चिमणला कुठूनतरी शोधून धंद्यावर आणून बसवलं तेव्हा चिमणच्या तोंडाला दारूची घाण मारत होतीच. आजूबाजूचे काही बाप्ये वेगळे नव्हते, ते ही तसलेच.
"बेहो अहिंयां हवेऽऽ.. बेहोऽऽ केऽऽम?ऽऽ.. जवानू नई किंयांऽऽ"
चिमणच्या बायकोनं चार चार वेळा बजावून सांगितलं आणि आपल्या झोपड्याकडे निघाली तेव्हाही तिला खात्री नव्हती चिमण उठून कुठे निघून जाणार नाही याची...
चिमण तोंडातली लाळ गिळत इकडे तिकडे पहात राहिला. मग हसला. कुणाकडे बघून नव्हे, असाच...
त्याच्या पुढ्यात अंथरलेलं गोणपाट. त्यावर निळ्या मेणकापडासारखं काहीतरी.. ऍस्टरच्या विटक्या निळ्या, जांभळ्य़ा, राखाडी फुलांचे वाटे त्या मेणकापडासारख्या अंथरीवर बेवारशासारखे विखुरलेले...
हे सगळंही क्षण दोन क्षण दिसणारं. त्या रस्त्यावर माणसांचा पूर लोटलेला. रस्त्याच्या जाळ्यात मासळीसारखी फडफडणारी असंख्य माणसं. फुलांचा, पानांचा, कागदांचा आणि आणखी कशाकशाचा कचरा तुडवत चालणारी. ओला लगदा कणकेसारखा मळत चाललेला रस्ताभर. त्याच्या मधोमध कुठेतरी बसलेला चिमण. तारवटलेल्या डोळ्यांचा. निगा न राखल्यानं पिंगट झालेल्या अस्ताव्यस्त केसांचा. पण दाढीमिशी सफाचट उडवलेला. गुळगुळीत चेहेर्‍याचा...
"गणपतीबाप्पाऽऽ मोरयाऽऽ... मोरयाऽऽ रेऽऽ बाप्पाऽऽ... मंगलमूर्तीऽऽ..." ... एकात एक मिसळलेल्या असंख्य घोषणा... "चलोऽ चलोऽऽ आगे चलोऽऽ पुढे बऽऽघऽऽ" असा ओरडाही त्यात मिसळलेला. रस्त्याच्या तीन चार फूट वर हा असा कचरा. ध्वनींचा. ओला लगदा. मधेच कुणी शेंबडं पोर "पुढच्या वर्षीऽऽ" असं म्हणून दात चावणारं. दर दोन तीन माणसांआडच्या माणसाच्या हातालाच जणू गणपती फुटलेला. तीही एवढीशी मूर्ती नव्हे! चांगली दोन सव्वा दोन फुटी मूर्ती. सगळ्या तेवढ्याच जवळ जवळ. वाट मिळावी म्हणून समोरच्या पाठीला स्पर्श करावा, तो मुर्दाडासारखा बाजू का होत नाही म्हणून पुढे डोकावण्याचा प्रयत्न करावा तर त्याच्या हातात गणपती. त्या गणपतीचा मुकुट जबड्यात रूतवून त्याचं वाट काढणं चालूच...
माणसांच्या पुराच्या रेट्यानं अदृष्य झालेला रस्ता. पुढे मागे सतत ढवळत चाललेला ओल्या कचर्‍याचा लगदा. त्यातच रूतून बसलेले धंदेवाले. काय काय बारीक मोठं विकायला घेऊन बसलेले. त्यांच्या वेड्यावाकड्या लाईनी. त्यामुळं फुटलेल्या असंख्य वाटा. वाळवीच्या अनेक शाखांसारख्या. त्यातनं, अशा सगळ्यामुळे झालेल्या जंतरमंतर म्धनं, इकडून तिकडे आणि तिकडून इकडे जाण्यासाठी हपापलेली माणसं. आडवी आडवीतिडवी होणारी. भलत्याच फुटपाथला लागणारी. दातओठ खात वाट काढणारी. अनेक वयोगटातली, गरीब, श्रीमंत, अधली, मधली, जाती, धर्मांची. आज सकाळी सगळी जणू त्याच रस्त्यावर लोटलेली...
त्या बेंबीच्या देठापासून होणार्‍या घोषणांमुळे, भयानक रेट्यामुळे चिमण हळूहळू भानवर येत असावा. भानावर येत रहाणं आणि भान हरवणं याची चांगलीच सवय झालेला चिमण. त्याची अंतराळी लागलेली नजर जागेवर आली आणि नकळत तो गर्दीतला एक एक माणूस न्याहाळू लागला. त्यात भय्ये होते, मारवाडी होते, नेपाळी होते आणि अनेक गुजरातीही होते. सगळ्यांकडे गणपती. तो वापीहून इथे आला तेव्हा मराठीच गणपती आणत होते.. तो पुन्हा शोधक नजरेने वेगळा कुणी दिसतो का म्हणून पहात राहिला.. मग हसला.. स्वत;शीच.. गणपती तो सबका भगवान है.. त्याच्या मनात पुन्हा एकदा, कुणास ठाऊक कितव्यांदा येऊन गेलं.. माणसांच्या चेहेर्‍यांवरची त्याची नजर केव्हा खाली उतरली त्यालाच कळलं नाही... त्याला लोटणार्‍या, ओलांडणार्‍या आणि प्रसंगी तुडवणार्‍या लोकाना सहन करत तो समोर बघत राहिला. एक एक गणपती एकेका माणसाच्या दोन हातांवरच्या पाटावर बसून पुढे पुढे सरकत होते. जरा वेळानं त्याला जाणवलं, अवतीभवतीनंच गणपतींची येजा चालू होतेय.. मेरी गो राऊंडमधे बसल्यासारखे गणपती. जरा वेळानं त्या गणपतींनी चिमणच्या भोवती फेरच धरला आणि त्याला भोवंडल्यासारखं झालं.. आपोआप त्याची नजर वळली आणि रस्त्याच्या या टोकापर्यंत फिरली...
रस्त्याच्या या टोकाला उड्डाण पुलाचा कठडा एखाद्या सिनेमाच्या पडद्यासारखा पसरलेला. कठड्याखाली प्रचंड जनसागर.. लोढेंच लोंढे.. त्यांचं मूळच त्याला दिसेना. नुसता माणसांचा धबधबा.. काहींच्या डोक्यालाच फुटलेले गणपती... त्याचे डोळे दिपल्यासारखे झाले. नजर जागेवर आणावी तर गणपतींचा फेर. त्याची नजर आपोआप रस्त्याच्या दुसर्‍या टोकाकडे वळली...
रस्त्याच्या या टोकाला माणसांच्या समुद्राला बांध घातला गेला होता चकचकीत पोलिसी वॅन्सनी. त्याना टेकून, आजूबाजूला, रांगडे शस्त्रधारी शिपाई, अधिकारी. लोंढे तिथपर्यंत येत, त्या बांधामुळे थबकत, एकमेकाला टकरत, एकमेकांवर आदळत आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या फुटपाथांकडे लोटले जात. दोन्ही फुटपाथांवर माणसं, धंदेवाले, स्टॉल्स, त्यामागच्या दुकानांची एक्सटेन्शन्स या सगळ्यामुळे ढकलाढकली. प्रत्येकाला वाट पाहिजे म्हणून चेंगराचेंगरी...
त्या पोलिसी बांधापलीकडे असलेला कबुतरखाना शांत वाटत होता म्हणून चिमणनं तिकडे टक लावली. कुणीतरी त्या शांतीदूतांनाही शांत बसू द्यायचं नाही असं ठरवल्यासारखी फाडफाड करत ती कबुतरं उडाली. उंच. काही समोरच्या जैन देरासरच्या सज्जात जाऊन बसली. ’मिच्छामि दुक्कडम’ लिहिलेल्या कापडी फलकावर. एक त्यावर शीटलंसुद्धा. चिमणला हसू आलं. त्या बिचार्‍या मुक्या जिवाला काय समजणार जैन नववर्ष सुरू झालंय ते! देरासरच्या सज्जावर तीन चार तसले फलक ताणून बसवलेले. नववर्ष शुभचिंतनाचे. खाली देरासरच्या आत काय गडबड चालली असेल हे चिमण कल्पनेनेसुद्धा पाहू शकत होता. पांढरेशुभ्र कपडे घातलेले अनेक बांधव लगबगीने येजा करत असतील. कपड्याचा परमोच्च पांढराशुभ्र रंग. पांढर्‍या रंगाची परम उत्कट छटा. डोक्याला, कपाळावर अष्टगंधी टिळे. देरासर गजबजलेलं असेल माणसांनी, ध्वनिक्षेपकावरच्या प्रार्थनांनी. प्रवेशद्वारावर जाकीट घातलेला धान्य विकणारा. त्याच्याकडचं धान्य विकत घेऊन ते कबुतरांवर उधळायचं की कबुतरं फडफडून उडणार आणि पुन्हा आधाशासारखी धान्याचे दाणे टिपण्यासाठी झेपावणार. पांढरेधोप कपडे घातलेली माणसं पुण्यवान होणार. चिमण पुन्हा हसला...
असा तो हसला की लोकं त्याच्याकडे विचित्र नजरेने बघायची. चिमणला त्याचं काहीच नसायचं, तो स्वत;शी आणखी हसत रहायचा. आत्ता, या क्षणी त्याला हसू आलं ते एका आठवणीमुळे.. तेव्हा तो पार्ट टाइम स्वीपर होता बॅंकेत. अर्धवेळ सफाई कामगार. सकाळी लवकर जाऊन बॅंकेची साफसफाई करत असताना एक दिवस कानठळ्या बसवणारा बॅंडचा आवाज आला म्हणून तो बाहेर आला...                                                                   (क्रमश:)