romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Friday, September 28, 2012

उत्सव...४

इथे वाचा उत्सव १, उत्सव २, उत्सव ३ आणि त्यानंतर...
दुसर्‍याच म्हणजे दसर्‍याच्या दिवशी सकाळी वाजवणारी मंडळी दमून भागून वस्तीत परतली आणि कुणीतरी सांगत आलं, वस्तीपाठीमागच्या रेल्वेलायनीत कुणीतरी कटलं...
चिमणचा अंदाज खरा ठरला. ती रात्रीची मुलगी होती. चिमण हादरला पण यावेळी पोलिसांकडे सरकला आणि बायकोसकट वस्तीतल्यानी त्याला मागे खेचलं. कुणालाही मागे पोलिसांचा ससेमिरा नको होता. चिमणला त्यानी वस्तीत आणून डांबलं. चिमणची झोप उडाली...
वस्तीतल्यांचा भर ओसरल्यावर, मुलीचे दिवस उरकले आहेत हे बघून आतल्या आत धुमसणार्‍या चिमणनं सगळ्यांच्या नकळत त्या मुलीचं घर शोधून काढलं. आईवडलांना भेटला. मुलीला पळवून नेणार्‍यांचे चेहेरे लक्षात आहेत. आपण काहीतरी करू म्हणून विनवलं. ते सतत हात जोडत राहिले. मुलगी गेल्यावर त्यांची ताकदच गेली. कुठे विषयसुद्धा काढू नका म्हणून त्यानी चिमणलाच बजावलं आणि वाटेला लावलं. त्या दिवशी... चिमण पहिल्यांदा दारू प्याला आणि लास झाला...
त्यानंतर डुलकी जरी लागली तरी त्या मुलीचं लोकल खालचं शरीर डोळ्यासमोर येऊन तो दचकायला लागला...
पुढे मग मुलीची केसच उभी राहिली नाही. ती पोरं मानानं फिरू लागली. एवढंच काय वर्ष सरून पुढच्या नवरात्रीचा पेंडॉलसुद्धा पडला. रोषणाई झाली. वस्तीतला बाजासुद्धा रूजू झाला. चिमण त्यात नव्हता...
भान हरवणं आणि भानावर येणं हा खेळ चिमणला जास्त महत्वाचा वाटत होता. आपण त्या मुलीला सावध केलंय, त्या टग्या पोरांना पोलिसांची भीती घालून आवाज दिलाय, वस्तीतल्याना, बायकोला झुगारून पोलिसांत गेलोय, मुलीच्या आईवडलांना तयार केलंय, कमीतकमी, अंधारात त्या पोरांच्या गाडीवर उडी मारली आहे... मुलीला ट्रेनखाली उडी घेण्याआधी मागे खेचलंय... काहीही करून मुलीला वाचवलंय अशी दृष्यं नजरेसमोर आणत तो कुठेतरी नजर लाऊन बसत होता. स्वत;शीच हसत होता. भान हरवत होता...
भानावर आला की लोकांनी साजरी केलेली गटारी, श्रावणी सोमवारचे देवळातले अन्नकोट आणि बाहेर भिकार्‍यांची रांग, गोकुळाष्टमीतला रस्ताजाम आणि अडकलेल्या ऍंब्युलन्स, पितृपक्ष आणि सोनेखरेदीची झुंबड, दिवाळी, नाताळ, नववर्षाचे कानठळी फटाके... लग्नसोहोळे, वाढदिवस, जयंत्या, मयंत्या... पूजा... वेगवेगळे ’डे’ज, खेळातले विजय, निवडणुकीतले विजय, मिरवणुका, रथयात्रा, गौरवयात्रा... हे सगळं बघून पुन्हा भान हरवत होता...
...आत्ताही त्या रस्त्यावरचा माणसांचा पूर आटत नव्हता... कचर्‍याचा ओला लगदा कणकेसारखा मळत रस्ताभर पसरत होता... तीन चार फूट वर ध्वनीचा लगदा... वेगवेगळे लोक अजूनही गणपती आणत होते... सगळं जसच्या तसं होतं...
त्या सगळ्यात रूतलेला चिमण स्वत:शीच हसत होता... आत्ताच पुन्हा एकदा त्यानं त्या मुलीला वाचवलं होतं...
त्याच्या पुढ्यात अंथरलेलं गोणपाट तसंच होतं... त्यावर ऍस्टरच्या विटलेल्या निळ्या, जांभळ्या, राखाडी फुलांचे वाटे तसेच बेवारशासारखे विखुरलेले होते...      
(पूर्वप्रसिद्धी: "अक्षर" दिवाळी २००२, संपादक, निखिल वागळे)      
Post a Comment