romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Thursday, September 27, 2012

उत्सव...३

इथे वाचा उत्सव १, उत्सव २ आणि त्यानंतर... 
... दरम्यान चाळीच्या किंवा सोसायटीच्या अंगणात मातीच्या घड्यात दिवा लाऊन, अंबेमातेची तसबीर लाऊन, ती पुजून त्याभोवती खेळलं जाणारं नवरात्र भल्या मोठ्या पेंडॉलमधे आलं. ड्रमसेट मधल्या पाच ड्रम्स बरोबर स्पर्धा करत चिमणचा बाजा तरीही टिकून राहिला खरा...
तरूण मुलामुलींचा उत्साह चिमण ढोल वाजवता वाजवता बघायचा. हळूहळू हा उत्साह प्रमाणाबाहेर वाढायचा. मुलामुलींची प्रकरणं व्हायची. त्रासदायक छेडाछेडी सुरू झाली की चिमणच्या कपाळावर आठी उमटायची. त्याला तसल्या त्या उद्दाम मुलांकडे दुर्लक्ष करता यायचं नाही. आतल्या आत संतापणं, जास्तच दिसलं तर संतापानं जळत रहाणं- आतल्या आत- याशिवाय चिमणसारखा माणूस करू तरी काय शकत होता?... बारीक लक्ष मात्रं ठेऊ शकत होता...
एका नवव्या रात्री याच त्याच्या बारकाईने त्याला मंडपामागच्या अंधारात खेचून आणलं. वाजवायचं सोडून देऊन. गेले आठ दिवस तीन चार पोरं एका शाळकरी पण बाई झालेल्या मुलीच्या मागे. हात धुऊन. त्या मुलीला सावध करावं तरी पंचाईत. आज त्या पोरांनी तिच्याभोवती कडं केलं. तिला ते मंडपामागे नेताहेत हे चिमणच्या नजरेतून सुटलं नाही. तो लगेच धावला. अंधारात कडमडला. दोन चार पोरांच्या लाथा, गुद्दे पोटात खाल्ले. त्या काळ्या अंधारात त्या पोरांच्या कारचा नंबरही बघता आला नाही. पोरीच्या तोंडावर आणि कमरेभोवती हात घालून गाडीत कोंबलंय हे न समजायला तो दुधखुळा नव्हता. तसाच पडत धडपडत तो मंडपात यायला बघतोय तर आता सिक्युरिटीवाला कुणास ठाऊक आडवा आला आणि चिमणलाच झापायला लागला. चिमणला कशीतरी स्बत:ची ओळख पटवायला लागली. ती सुरक्षारक्षकांनी सहजासहजी पटवून घेतलीच नाही. पुढे चिमण झाल्या प्रकाराबद्दल, अंधारातल्या, सांगायला लागला तर त्या रखवालदाराना वाद्यमेळाच्या आवाजाचं चांगलंच कारण मिळालं. प्रचंड डेसिबल्स गाठत असलेल्या. तरीही सांगायचा प्रयत्न करणार्‍या चिमणला त्यानी इतक्या जोरात मंडपात ढकललं की तो झेलपाटलाच. पुढे ते सुरक्षारक्षक त्याला कुठे दिसलेच नाहीत...
चिमणनं वाजवणार्‍या सहकार्‍यांना सांगायचा प्रयत्न केला. मंडळाच्या पदाधिकार्‍यांना शोधायचा, सांगण्याचा प्रयत्न केला. संबंध पेंडॉल फक्त बेहोषीत न्हाऊन निघालेला. त्यातून बाहेर पडायची कुणाचीच इच्छा दिसत नव्हती...
चिमणच्या डोक्यात वीज चमकली आणि त्यानं त्या मुलीबरोबरच्या ग्रुपकडे बघितलं. गायब. त्यानं शोध शोध शोधलं पण त्या मुलीबरोबरच्या ग्रुपमधलं कोणीही दिसत नव्हतं.
त्याचं पाऊल लाकडी खुर्च्यांमधे रेलून थंडा पिणार्‍या पोलिसांच्या दिशेनेही पडलं. पण तो अडखळला. मागच्याच वर्षी कुणी चाकू काढला म्हणून वाजवणार्‍यांनी पोलिसांना त्याची चेहेरेपट्टी सांगितली तर पोलिसांनी मेहेतर वस्तीत येऊन वाजवणार्‍या पोरांच्यातल्याच एकाला चांगलंच कानपटवलं, आतही टाकलं. चिमणला ते आठवून धीर होईना. तो सारखा पोलिसांपर्यंत जायचा. परत यायचा. स्वत:वरच चिडायचा. पोरीचं नाव गाव काही माहित नाही काय सांगणार पोलिसांना?...
रात्रभर जल्लोष चालू राहिला. वाजवणारे चेवून वाजवत राहिले. नाचणारे पृथ्वीतलावर राहिले नव्हतेच. गाणार्‍यांचे स्वर आकाशाला भिडलेले. ’अंबा मातं कीऽऽ... जयऽऽ’ या घोषानी आसमंत दणाणून जात होता आणि चिमण झुटुकपाण्या घालत होता. सहकार्‍यांपासून पोलिस बसले होते तिथपर्यंत आणि पुन्हा मागे सहकार्‍यांपर्यंत. सहकारी वाजवणं सोडत नव्हते आणि पोलिस वाजवतील या भीतीनं चिमणला त्याना भेटता येत नव्हतं. काय गरज होती चिमणला नाही त्या लफड्यात अडकायची? तो काय करू शकणार होता? एकटा! सगळं जग छान आनंदात होतं. चिमण एकटा स्वत:ला वांझ त्रास करून घेत होता...   क्रमश:    

No comments: