romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Tuesday, April 28, 2015

मित्र, सुहृद, मार्गदर्शक...

 खरं तर हा उलटा प्रवास आहे... इथे प्रकाशित केलेलं आणखी वाचकवर्गासाठी इतरत्र प्रकाशित करतो आपण. एकटं वाटण्याच्या अवस्थेत आणि एकाकी न होण्याच्या प्रयत्नात काही ऋणानुंबध आठवतात. ते सहज पोचण्यासाठी आभासी जगात जवळचे झालेले, ज्ञात जगात आभासी झालेले इत्यादी इत्यादी, त्यांच्या त्यांच्या सवडीने का होईना आणि आभासी का होईना सहवेदनेत सामील होत असतात... त्यातून नवीन वास्तवातले ऋणानुबंधही अस्तित्वात येतात.. जग जवळही येतं, ते लांबही असतं... आभासीही असतं आणि वास्तवही असतं... माणूस आहे तोपर्यंत भोवताल असणार, जग असणार... त्याच्या अस्तित्वातली व्यामिश्रताही असणार.
भूतकाळातल्या अनेक सुहृदांना बरंच काही सांगायचं राहून गेलेलं असतं, आत्ता आवर्जून सांगावं असं काही... त्यावेळी सहज वाटणारं काही आता कृतज्ञतेच्या स्वरुपात दाटून येत असतं...
तुकड्या तुकड्यानं व्यक्त होण्याची सवय भिनत चाललेली असली तरी ते सगळं कुठेतरी संग्रहित असावं असंही वाटत असतं...
मूळात व्यक्त व्हायला माध्यम सहज हाताशी असतं...
असे काही तुकडे जोडण्याचा प्रयत्न... पुन:प्रकाशित स्वरुपात... 


माणसं जमवणारा- पेक्षा मुलं जमवणारा, समूह तयार करणारा, संघटनकौशल्य असलेला आणि अर्थातच नेता असणारा एक मित्र... उत्तम व्यक्तिमत्व, उत्तम अभिनयाची उपजत देणगी असणारा, लेखक, दिग्दर्शक, निर्माता... उरापोटी धडपडून वर्षानुवर्षं प्रायोगिक संस्था चालवत रहाणारा... मी काहीही प्रयत्न न करता मला सामोरा आलेला, मला हाताला धरुन एकांकिकेच्या तालमीच्या हाॅलमधे घेऊन आलेला... मीच काय कोणीही बसून राहील, सहजासहजी उठणार नाही इतकं सहज मार्दव त्याच्या चालण्याबोलण्यात होतं... त्याचं बोट धरलं आणि मी त्या लखलखत्या गुहेत शिरलो...
त्यानं कै प्रा. कृ रा सावंत यांच्याकडे नाट्यशिक्षण घेतलं होतं... एकांकिका स्पर्धा तेव्हा उपनगरात जोशात होत्या... ग्रीक पद्धतीची नाटकं आणि पर्यायानं नाट्यशिक्षण हा सावंतसरांचा -आता ज्याला युएसपी असा शब्द आहे- तो होता... हा मित्र स्वत: हे रंगकर्मी अष्टपैलुत्व शिकला, त्याच्या शाळेतल्या त्याच्या बरोबरच्या, मागच्या वर्गातल्या, आमच्यासारख्या कित्येक, कुठलीही पार्श्वभूमी नसलेल्यांना रंगमंचावर आणलं, तयार केलंच पण माजी विद्यार्थी संघासारख्या संस्थेला कार्यरत ठेवून या मुलांना सामाजिक कामाची ओळख करुन दिली... नेता असूनही मित्रत्वाचं नातं संपर्कातल्या लहानथोरांशी आजतागायत टिकवणं ही तुझी खासियत... तुझा 'समुद्रशिकारी' नाटकातला न-नायक, तुझं लेखन, दिग्दर्शन, नेपथ्यसंकल्पना, उत्कृष्ट निर्मितीमूल्यं.. बघणा-या आम्हालाही स्वप्नवत होतं सगळं... शाळेच्या इमारत निधीसाठी त्यावेळी कोप-यातल्या उपनगरातल्या, आपल्या कोप-यातल्या वसाहतीत होणारे व्यावसायिक नाटकांचे प्रयोग म्हणजे पर्वणी असायची... 'समुद्रशिकारी' बघताना मला त्या नाटकांची आठवण झाली होती... मग 'संभूसांच्या चाळीत' बघतानाही... सरकारी पुस्तक आणि प्रकाशने खात्यात तू असताना, ओल्ड कस्टम्स हाऊसमधे, दुपारच्या भेटींदरम्यान तू सतत अस्वस्थ आहेस हे जाणवायचं... ती सुरक्षित नोकरी तू सोडलीस, नव्याने संघर्ष केलास... पत्रकारितेसारख्या, तुला आवडणा-या पण त्यावेळी बेभरवशाच्या असलेल्या क्षेत्रात शिरलास...
आज तू जो काही आहेस त्या आधीचा प्रवास आम्ही जवळून पाहिलाय आणि त्या प्रवासाचा आणि तुझा अभिमान वाटतो संजय डहाळे...


...आयुष्यातला काळोखी काळ असतो. मित्राच्या, आपल्या. घनिष्ठता निर्माण होते. तसा एक मित्र होता. 'नेमाडे' हे नाव त्याच्याकडून पहिल्यांदा ऐकलं.. दोघेही ओवरड्यू 'कारे'. मला असं काही जवळचं वाचायला पहिल्यांदा सापडलं. मग अनुक्रमे 'चातुष्टयं' वाचणं, भारावणं आलंच... या मित्रानं मला एका उपक्षेत्राचा परिचय करुन दिला. हाताला धरुन नेलं. ही व्यावसायिक कामं होती... वाचन, विचार करणं, एकूण भान, मनन ह्या दृष्टिनं मी एका निश्चित वळणावर त्याच्यामुळे आलो...
त्याचं दु:ख माझ्या मानाने खूपचखूप दारुण होतं... मी सुरक्षित वातावरणात होतो त्या मानाने...
दु:ख असणं, गहिरं असणं आणि नंतर ते आपण जास्त गडद करत नेणं, कुठेतरी आत्मकरुणा आपला कब्जा घेते आहे की काय?... असं त्याच्या बाबतीत जाणवायला लागलं. माझं दु:ख त्यामानाने जेमतेम असून मी आत्मकरुणेत वहावतोय की काय असं वाटायला लागलं...
कालांतराने दोन ओंडके वेगळे झाले. त्यानंतर काही काळाने मला कळलं, त्यानं मला 'डिलीट' केलंय. आता ब्लाॅक करतात तसं... तो नेहेमी म्हणायचा अमुक एक कालाने मी त्यावेळचे घनिष्ठ संबंध स्वत:हून तोडून टाकतो आणि नवीन संबंध जोडतो... पहिल्यापासून मला असं काही घाऊक स्वरुपात करणं अघोरी वाटायचं... हे शक्य असतं?... हे आपल्याला, इतरांना सोपं जातं?... भावस्थितीची मशागत करायला हा योग्य, उत्तम उपाय आहे?...
आज तो चांगल्या पदावर काम करतो. अचानक रस्त्यात भेटला आणि त्याचा 'डिलीट' प्रतिसाद बघून तो मला पूर्वीसारखाच वाटला...
बाबा, सतीश तांबे वरचे काही प्रश्नं... या घटनेतला मित्र तुझा चांगला मित्र होता. एका व्यावसायिक क्षेत्रात तू, त्याला आणलंस असं तो म्हणायचा... तू माझा शेजारी होतास. तुझ्या 'छापल्या कविता' तेव्हा प्रकाशित झाल्या होत्या. तू कवि आहेस, विद्यापिठाचा सुवर्णपदक विजेता आहेस आणि हे तू कशाकशातून जाऊन केलएस ह्या माहितीमुळे तुझ्याबद्दल आदरयुक्त भीती निर्माण झाली. मला नोकरी लागल्यावर तू मला बोलवून याच पदावर राहू नकोस. पुढची परिक्षा, त्याचे फायदे सांगितलेस. एक जाहिरात उतरवून घ्यायला सांगितलीस. तो जमाना कटपेस्ट, फाॅरवर्डसेंडचा नव्हता...
आपण तिघे, कालांतराने एकदा भेटलो. हे सगळं तुला आठवेलच असं नाही. या भेटीत मी एका क्षेत्रात वहावत जाणारे एका क्षणी विमनस्क होतात, तसा होतो. तू तुझ्या प्रश्नांनी मला स्वत:चं पुनरावलोकन करायला प्रवृत्त केलंस... ’तुझं वय काय? आता तू कुठे आहेस? जिथे जायचंय तिथे आता तू कुठे असायला हवंस?...’
भानावर आणणं हे ख-या मित्राचं  काम असतं. तू अनेकांशी या स्वरुपाचं वागला असशील.
घनिष्टता, जवळीकीसारख्या प्रसंगांबरोबर हे प्रसंग आठवतात. आपला परिचय तरी होता. काही वेळा अकस्मात जुजबी ओळखीचा किंवा पूर्णपणे अनोळखी कुणी ख-या मित्राचं काम बजावतो हे आठवलं, लक्षात आलं तेव्हा 'मैत्र जिवाचे' चा अर्थ नव्याने कळला. आज स्टे कनेक्टेड वर्च्युअली असं असलं तरी या भिंतीचा उपयोग असा संवाद साधायला होतो हे लक्षात येतं आणि आनंद होतो..


कुवतीप्रमाणे जमेल ते करत राहिलो असताना मुख्य, महत्वाचा जोडधंदा कुणातरी अवलियाला पकडून समूहानं ख्या ख्या खी खी करत रहाण्याचा राहिला... तेव्हाही उच्चभ्रू की कसले भ्रू नटवे, नटव्या 'काय ह्ये' म्हणून हिणवत राहिल्या तरी घेतला वसा सोडला नाही... सोडणार नाही...
गजू तायडे, तुमच्या पोष्टी वाचून मला गतायुष्यातल्या माझ्या दोन मित्रांची आठवण झाल्याशिवाय रहात नाही...
एक कै. सुहास बावडेकर, दुसरा रवि कुरसंगे...
सुहास जेजेला होता. कमल (शेडगे) त्याचा गुरु. त्याच्या खांद्यावर याचा हात. तो अरेतुरे करायचा म्हणून इथे शेडगेंचा उल्लेख एकेरी केला... एरवी त्यांचा मोठेपणा मी काय सांगू. ही दोस्ती टाइम्समधली. चित्रकार माळी, सायन्स टुडे करणारा नाना शिवलकर, अरविंद मुखेडकर... नानाचे भंकसचे किस्से रॅगिंगच्या जवळपास जाणारे. पायाला पँटवर दोरखंड बांधणारा... माळींच्या डब्यावर त्यानं काढलेलं हुबेहूब डालडाचं चित्रं, ते माळींना माहित नाही पण इतर सगळ्याना माहित. नानाची 'ष्टा' ने संपणारी अत्रंग म्हण... सुहास आमच्या परिसरातला भांडणाचा किस्सा सांगायचा. 'नून' हा शब्द एकानं वापरला म्हणून दुस-यानं वापरुन त्यात आख्खं खानदान कसं आणलं... आम्ही रिपीट प्रेक्षक रात्रीबेरात्री ख्या ख्या करत उभे...
दुसरा रवि... हाफ मर्डरमधे अंदर, आणिबाणीत समाजवाद्यांना भेटला जेलमधे... क्युबिझम चित्रशैलीत चित्रं काढायचा. 'झुलवा' चं नेपत्थ्य त्याने केलं. त्याहीपेक्षा धारावीतून जोगते, जोगतिणी तालमीत आणले त्याने... कीच, रांडपुनव हे त्या जमातीतले कुणालाही प्रवेश निषिद्ध असलेले विधी वामन (केंद्रे) ला दाखवले त्याने... संस्थेच्या डबक्यात इगोबिगोची लपडी होऊन वातावरण तंग झालं की तो संस्थेतल्या ए पासून झेड पर्यंत सगळ्यांच्या अप्रतिम नकला करायचा... आम्हाला ख्या ख्या पर्वणी... तो परे मधे कॅटरिंग इनचार्ज होता. दौ-यात जेवणाची सोय त्याची... सतीश काळसेकर, राजन बावडेकर यांनी भालचंद्र नेमाडेंची घेतलेली आणि नेमाडेंनी रिस्ट्रिक्ट केलेली पानबैठक चर्चगेटला कॅन्टिनवरच्या अर्ध्यामाळ्यावरच्या रविच्या केबिनमधे झाली होती. त्यात माझ्यासारख्याला प्रवेश मिळाला रविमुळे... चाळीशीनंतर त्यानं लफडं केलं, मग लग्न केलं दुसरं. सध्या मुक्काम 'मामाचा गाव' ला...
असे दोन अत्रंग... माझ्यावर जीव होता त्यांचा असं वाटून माझी छाती फुगवून आणि कितीतरी इंच होते...
आपण केलेलं काम दुस-याला दाखवायची हौस प्रत्येक काही करणा-याला असते... म्हणून असेल पण ज्या आपुलकीने हे माझे मित्र मला आपली कामं दाखवायचे त्यातून माझ्यासारख्या कलेशी काही संबंध नसणा-याला किंवा नंतर नटवा बनून चमकायचीच खुजली निर्माण होण्यासारखी परिस्थिती असताना, त्यांच्यामुळे मला वेगळं जग बघायला मिळालं...
सुहास आमच्या नगरातल्या गणेशोत्सवात वेगवेगळ्या गणेशमंदिरांच्या प्रतिकृती इतक्या बेमालूम करायचा की भल्याभल्यांची गर्दी जमायची आणि तो त्यांच्यासमोर आम्हाला त्यातले बारकावे समजाऊन सांगत असायचा... कमलच्या खांद्यावर जसा त्याचा हात असायचा तसा आपल्या अमोलच्याही. बाप लेकाच्या खांद्यावर हात टाकून त्याला गाण्याचे प्राथमिक धडे देत गल्ल्यांतून फिरतोय हे माझ्यासारख्यासाठी तरी विलोभनीय होतं... अमोलला नंतर त्याने वाडकरांकडे शिकायला पाठवलं. अभिषेकी नगरातले सामान्याना माहित नसलेले थोर गायक रत्नाकर पै यांच्याकडे गाणं शिकायला यायचे. त्या दोघांकडे सुहास शिकला होता...
रविचं झुलवापेक्षा अनिल बांदिवडेकरांच्या एकांकिकांचं नेपथ्य अफलातून असायचं. एका एकांकिकेत त्याने दोन दरवाज्यांच्या फ्रेम्स, सभोवताली अनेक सुशोभित कुंड्यांची रचना करुन टाळ्या घेणारा सेट बनवला होता. त्याहीपेक्षा त्याने त्यात निरनिराळ्या अभिनयक्षेत्रांचा विचार करुन मग एकसंध सेट तयार केला ह्याचं अप्रूप जास्त...
सुहासनंही शेवटच्या काही वर्षांत व्यावसायिक नाटकांसाठी नेपथ्यं केली होती...
वामन आमच्यासाठी हाडाचा शिक्षक, दिग्दर्शक राहिला. केवळ त्याच्यामुळे माझ्यासारख्याला अशोक रानड्यांच्या भाषा, वाणी शिबिरात प्रवेश मिळाला. पीटर ब्रुक महाभारत घेऊन आला तेव्हा त्याच्या वर्कशाॅपसाठी वामननं शिव्या घातल्या पण घरातल्या आजारपणामुळं ते हुकलं... त्या वर्कशाॅपमधे रविने त्याच्या भलत्या भाषेतल्या इंप्रोवायझेशन्सनी धमाल उडवली होती म्हणे...
सुहास आणि रविसारखी हरहुन्नरी, अप्रतिम विनोदबुद्धी आणि टॅलंट असलेली माणसं लवकर विस्मृतीत गेलेली बघून वाईट वाटतं...
आमच्यासारख्या को-यांवर त्यानी आपुलकीनं केलेल्या संस्कारातून त्यांची आठवण तरी निघावी...
सांगावं तेवढं कमी... दोघांबद्दल...
पिपल्स बुक हाऊस, फोर्ट मधे भारतीय बैठकीवर मर्यादित रसिकांसाठी कवि नारायण सुर्व्यांची मैफल झाली होती... तोंडाचा आ वासून सुर्व्यांना थेट बघितलं, ऐकलं ते रविमुळे... दिलिप चित्रे, अरुण कोलटकर त्याच्यामुळे माहित झाले.. फोर्टमधून जाताना त्याने लांबून कोलटकर दाखवून त्यांचे किस्से सांगितले होते. रविनं 'इंद्रियारण्य' नावाचा स्वत:चा कवितासंग्रह प्रकाशित केला स्वखर्चानं. त्या 'अविसुर' प्रकाशनातल्या वि मधे मी होतो. ’झाल पल्ल्यावर’ ही त्याच्या आदिवासी भाषेतली कविता त्यात होती. इराणचा म्हातारा, बशी हा संदर्भ सांगून त्याला जमेल तशी त्यानं केलेली एक कविता त्यात होती. चित्रे, सारंग मला माहित झाले त्याच्यामुळे... मी कवडा झालो तेव्हा माझ्यापेक्षा त्याला बापासारखा आनंद झाला होता. त्यानं वही घालून दिलेली मी जपून ठेवलीए अजून...
सुहासमुळे दूरदर्शन केंद्र बघितलं पहिल्यांदा. रमण रणदिवेंच्या कविता सुहासच्या आवाजात रेकाॅर्ड झाल्या. सुहासची ती पहिली स्वतंत्र दोन गाणी अजून माझ्या स्मरणात आहेत. निर्माता कै. अनिल दिवेकरसारखा अत्रंग माणूस त्यानं दाखवला... केंद्रावरच, नविन आहे म्हणून निश्चल आहे, अभिनय करत नाही हा जोकही ऐकवला... वर तो असे जोक करणा-या प्रथितयश साहित्यिकानं तो केला असता तर डोक्यावर घेतला गेला असता हे ही... ;)
सुहासचे आजोबा चं वि बावडेकर साहित्यसंघाशी संबंधित होते. त्यावेळचं एक प्रसिद्ध नियतकालिक- आलमगीर- त्याचे संस्थापक, संपादक. त्यांचा थेट फायदा सुहासला मिळाला नाही. मधली पिढी वेगळ्या क्षेत्रात. (अमोल पालेकर सुहासच्या वडलांचा मित्र झाला. त्याच्यावरुन या अमोलचं नामकरण) संगीत नट अरविंद पिळगावकर सुहासचे मामा अजून हयात आहेत...
रवि भटकाविमुक्त... तो या मातीतला नाहीच... त्याला त्या फ्रेंच की काय जीवनपद्धतीचं आकर्षण. तेव्हा ती त्याची चूष वाटायची पण तो जगला तसा. आताही एका अर्थानं कोप-यातल्या मामाच्या गावात मॅनेजरकी करताना तो आवर्जून मित्रांना बोलवतो. आम्हीच गद्धे अजून जात नाही... रविनं एक अबसर्ड नाटक लिहून, त्याचं वाचन करवलं होतं चर्चगेट बुकिंगच्या वरच्या मजल्यावरच्या त्याच्या विश्राम केबिनमधे. हे असं काही असतं ते त्याच्यामुळे कळलं. इथेच त्याचं क्युबिझम पेंटिंग होतं. हे तो कालिना चर्चमधल्या फादरकडून शिकला... कालिनातल्याच एका मारामारीत तो आत गेला... तेव्हा आणिबाणी होती... रविला आणिबाणीमधल्या बंदींची मैत्री लाभत गेली...
कवि भुजंग मेश्राम, युवराज मोहिते यांच्या भेटी त्यानं इथे घडवलेल्या आठवतात...
रविबद्दल माझ्यापेक्षा जास्त जवळ असणारा अजित आचार्य.
तर सुहासबरोबरचा सुरेश कुलकर्णी.
असो... आता खरंच इत्यलम्...
(चित्र: आंतरजालावरुन साभार...)

Wednesday, April 1, 2015

"मी मराठी Live" वर्तमानपत्रात "दिवेलागण" या "अभिलेख" वरील नोंदीची दखल...

मी मराठी Live हे वृत्तपत्र मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने सुरु झालं... १५ मार्च रोजी मी मराठी लाईव वृत्तपत्राच्या फीचर्स विभागाच्या उपसंपादक शीतल गवस यांचा ’दिवेलागण’ ही ’अभिलेख’ वरील नोंद रविवार मी मराठी लाईवच्या ’सप्तमी’ या सदरासाठी परवानगी मागणारा मेल आला. लगतच्या रविवारी २२ मार्च रोजी "दिवेलागण" लेख स्वरुपात प्रसिद्ध झालं...
मी मराठी लाईव आणि शीतल गवस यांचे अगदी मनापासून आभार...