romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Friday, June 24, 2011

सिरसी: सहस्त्रलिंग आणि झुलता पूल!

पर्यटनाला गेल्यावर आपण अनेक स्थळांना भेट देत असतो.हे स्थळ त्यावेळी कसं वाटतं हे त्या त्या वेळच्या वातावरणावर, परिस्थितीवर, तुम्ही तिथे पोचता त्या वेळेवर तसंच तुमच्या मनस्थितीवरही अवलंबून असतं.सिरसी या उत्तर कर्नाटकातल्या गावापासून जवळंच असलेल्या सहस्त्रलिंग या ठिकाणाबद्दलची माहिती दिली गेली तेव्हा ते पहाण्याची प्रचंड उत्सुकता निर्माण झाली.नदीच्या पात्रातल्या अनेक, म्हणजेच सहस्त्र पाषाणांवर एकेक, अशी कोरलेली हजार शिवलिंगं इथे बघायला मिळतात असं ऐकल्यावर कधी एकदा ते बघतो असं होऊन गेलं होतं.त्यावेळच्या एका राज्यकर्त्याला मूलबाळ होत नव्हतं म्हणून त्यानं शिवाची आराधना केली तेव्हा त्याला स्वप्नात अशी आज्ञा झाली की सहस्त्रलिंगं कोरून घे आणि पूज! तुझी इच्छा पूर्ण होईल! राजानं तसं करून घेतलं आणि सगळीकडे आनंदीआनंद झाला!
ही जातककथा ऐकल्यावर प्रत्यक्ष काय झालं असेल? इतक्या सगळ्या कारागीरांनी, आजच्या भाषेत हे सगळं प्रोजेक्ट कसं पूर्ण केलं असेल, नक्की सांगितलं जातं तेच कारण असेल की आणखी काही? असे प्रश्न मनात आलेच.
प्रत्यक्ष सहस्त्रलिंग या जागी पोचलो तेव्हा संध्याकाळ झाली होती.मळभ असलेली उदास संध्याकाळ.नदीकिनारी बांधलेल्या सिमेंटच्या पायरय़ांपर्यंत पोचलो तेव्हाच साठलेल्या पाण्याचा कुबट असा वास यायला लागला.आदल्याच दिवशी सातोडी फॉल्स या धबधब्यावर नि:संकोच भिजलो होतो.धबाधबा कोसळणारय़ा स्वच्छ निर्मळ पाण्याचा अनुभव मनसोक्त घेतला होता.त्याच्या आदल्या दिवशी सिरसी गावाच्या अगदी जवळ असलेल्या एका नदीच्या पात्रात संध्याकाळी मुलांना डुंबण्यासाठी नेलं होतं.तीही जागा वहात्या पाण्याची होती.स्वच्छ होती.सहस्त्रलिंग या ठिकाणी तसं वाटलं नाही.मे महिन्याचा मध्य म्हणजे वहात्या पाण्याची अपेक्षा करू नये पण इतर ठिकाणी आश्चर्यकारकरित्या तसं पाणी मिळालं होतं.सहस्त्रलिंग असलेल्या पात्रात मात्र नाल्यासारख्या ठिकाणी येतो तश्या पुंगस वासामुळे पायरय़ा उतरून खाली जाववेना.काही जण तरीही पाणी, पाणी करत उतरले.एकूण जराश्या मळभ आलेल्या आणि अजिबात हवा नसलेल्या वातावरणात जीव रमेना.इतकंच काय एकेका लहान मोठ्या दगडावर असलेलं एक एक शिवलिंग बघून त्याचं छायाचित्र काढायचंसुद्धा माझ्या मनात आलं नाही हे कबूल करावं लागेल.सगळंच काही अगदी वाईट होतं असा याचा अर्थ नाही पण कधी कधी आपली मनस्थिती आपल्याला भोवतालाबद्दल उदास रहायलाही प्रवृत्त करत असावी.
यामुळे सहस्त्रलिंग या स्थानाचा हा जालावर मिळालेला दुवा इथे उधृत करतो आहे, मी काढलेलं छायाचित्र नसल्यामुळे तेही इथे शेअर करता आलेलं नाही.
तिथून माझा पाय लगेच काढता झाला याला आणखी एक कारण म्हणजे आमच्या अनुभव ट्रॅवल्सचे आमच्याबरोबर असलेले एक मार्गदर्शक श्री पटकुरे आपल्या कारवारी-कोकणी मिश्रित मराठीत “पुडे च्यला! लक्ष्मण झूला हाये लक्ष्मण झूला!”असं ओरडायला लागले.माझ्यासारखी रेंगाळणारी आणखी काही मंडळी लगेच पुढे सरसावली.दोन चार पावलावर त्याच नदीच्या पात्रावर एक झुलता पूल दिसला.लहान मुलाच्या चपळाईने लगेच धावलो.खरं तर ह्या पूलाचा उपयोग कृत्रिमरित्या बनवलेलं स्थलदर्शनाचं ठिकाण म्हणून केला असावा असं दिसत होतं.पण कर्नाटकातल्या पद्धतीने छान रंगरंगोटी करून व्यवस्थित राखलेल्या या पूलानं आमचं लक्ष वेधून घेतलं.तोपर्यंत कुठुनसं सूर्यदर्शनही होऊ लागलं होतं.मगासचं उदास वातावरण जाऊन आम्ही त्या पुलावर हेलकावे खाण्याचा आनंद लुटायला लागलो.लांबवर दिसत होते सहस्त्रलिंगावरच्या प्रत्येक पाषाणावर जाऊन त्या त्या लिंगावर नतमस्तक होणारे स्थानिक आणि पर्यटक.साचलेल्या पाण्यातलं निर्माल्य दिसत होतं.जवळच एके ठिकाणी साचलेल्या पाण्यात काहींचा जलविहार(!)ही चाललेला होता.आम्ही पुलावरचे, हलत्या पुलावरून, उंचावरून दिसणारं नदीचं पात्रं, भोवतालची झाडी, सहस्त्रलिंगांभवतीची गर्दी न्याहाळत होतो.त्या पुलाच्या छायाचित्रांची ही एक मालिका! तुमच्यासाठी!
Bridge near Sahastralinga, Sirsi

P200511_18.12

P200511_18.13

P200511_18.16

P200511_18.19

Wednesday, June 22, 2011

ऋतू हिरवा २०११ डिजीटल वर्षा विशेषांक प्रसिद्ध झालाय!

मुसळधार पावसात.....
गरमागरम कुरकुरीत कांदाभजी
आणि
वाफाळत्या कडssssssक
चहाबरोबर
ऋतू हिरवा ह्या अंकाचा
आस्वाद घ्या.

संपादकीय : देवदत्त गाणार, संपादन सहाय्य : प्रमोद देव, अंक सजावट : श्रेया रत्नपारखी
अंकातले मानकरी : दीपक परूळेकर, क्रांति साडेकर, हर्षा स्वामी, विनायक पंडित, अलका काटदरे, श्रेया रत्नपारखी, अपर्णा संखे-पालवे, नरेंद्र गोळे, हेरंब ओक, विशाल कुलकर्णी, सुधीर कांदळकर,देवेंद्र चुरी, भक्ती आजगावकर, निशिकांत देशपांडे, शुभा रत्नपारखी, सुहास झेले, देवदत्त गाणार, मैथिली प्रधान, समीर नाईक, आनंद घारे, संकेत पारधी,विद्याधर भिसे,उल्हास भिडे, मंदार जोशी, महेंद्र कुलकर्णी,
जयंत कुलकर्णी

सोबत देतोय ऋतू हिरवा२०११ या अंकातला माझ्या शांत हवेच्या कानात, दवबिंदू आणि पाऊस या कविता माझ्या आवाजात!

शांत हवेच्या कानात!


दवबिंदू!


पाऊस!

Monday, June 20, 2011

सिरसीजवळचे भस्माचे डोंगर – ’याणा’!

Photo0053सिरसीजवळ भस्माचे डोंगर आहेत हे ऐकल्यापासून उत्सुकता ताणली गेली होती.ते कसे असतील या कल्पनेने वेगवेगळी दृष्यं नजरेसमोर उभी रहात होती.पुराणकाळात अनेक वर्षं यज्ञयाग चालल्यामुळे हा असा भस्माचा साठा जमला वगैरे गोष्टीही ऐकल्या.भरगच्च कार्यक्रम असलेल्या सिरसी आणि आसपासच्या अनुभव ट्रॅव्हल्सच्या सहलीच्या कार्यक्रमात ’याणा’ला भेट द्यायचा दिवस उजाडला.’याणा’ अर्थात Yana हे ठिकाण सिरसी ह्या उत्तर कर्नाटकातल्या गावापासून ८६ किमी अंतरावर आहे.हे ठिकाण पर्यटकांनी फारसं भेट न दिलेलं असं ठिकाण आहे.या परिसरात खूप मोठी जंगलं आढळतात हे यापूर्वीच्या या संबंधातल्या लिखाणातून आलेलं आहेच.या जंगलांमधून टेंपो ट्रॅवलर्सनी प्रवास करणं जास्त सोयिस्कर आहे.अशा जंगलातून वाट काढत आपण याणाजवळ पोहोचतो आणि लांबूनच हॅरी पॉटरच्या चित्रपटातल्या हॉगवर्ट मॅजिक स्कूलची आठवण करून देणारी स्ट्रक्चर्स दिसायला लागतात.कातळांचे पातळ पातळ पापुद्रे एकमेकाला चिकटत आकाशात उंचच उंच झेपावलेले आहेत.असे तीन-चार तरी डोंगर इथे आहेत.एका डोंगराखाली महादेवाचं मंदिर आहे.महादेवाचा आणि भस्माचा खूप जवळचा संबंध.मंदिरात नेहेमी देतात तशा फलकावर एक पुराणजन्य कथा आहेच.आपल्या मनातलं भस्म न दिसल्याचं कोडं नंतर उलगडतं.खरं तर लाखो वर्षांपूर्वी झालेल्या ज्वालाभूमीच्या उद्रेकातून ही भलीमोठी कातळशिल्प उभी राहिली आहेत.
P200511_11.53
ती भव्य आणि मोहक तर दिसतातच पण या डोंगरांच्या पोटातल्या घळी किंवा गुहा या जास्त प्रेक्षणीय वाटतात.काही गुहांमधल्या सिलींगवर एखादा पाषाण अधांतरी राहून गेलाय आणि त्यानं निर्माण केलेल्या फटींमधून ऊन आत येतं.छायाप्रकाशाचा अप्रतिम खेळ इथे बघायला मिळतो.
P200511_12.05
आणि खाली दिलंय तसं एक छायाचित्र.आमचा लहानगा मित्र अनिमेष कर्णिक एका गुहेतून पळत पळत आत जाताना पकडला गेलाय अगदी अनवधानाने! त्याच्या आणि माझ्या!
P200511_12.06
ह्या गुहांमधून पुढे जाणारा महादेवाला प्रदक्षिणा घालणारा प्रदक्षिणामार्ग आहे पण तिकडे न वळता भाविकपणे या गुहांमधेच रमलो हे कबूल करतो!
निसर्गाने केलेली कमाल हेच ’याणा’ ह्या स्थळाचं वैशिष्ट्यं सांगता येईल!

Monday, June 13, 2011

धबधबे! सिरसीतले!

धबधबे अर्थात वॉटर फॉल्स ही निसर्गातली अशी आश्चर्यजनक गोष्टं आहे की जिच्या मोहात कोण पडत नसेल तरच नवल! मुळात पाण्यात खेळणं हीच माणसाच्या दृष्टीनं आनंदाची गोष्टं.आज तो वॉटर पार्कस् निर्माण करून त्यात जाऊन बारा महिने त्याचा आस्वाद घेतोय.पाणी ह्या वस्तूचं स्वरूप दिवसेंदिवस कसं होत जाणार आहे ह्याचा विचार या आनंदाच्या वेळेला नको करूया! सध्या अनेक ग्रुप्स् पावसाळा सहलीसाठी नेहेमीच्या किंवा नव्या, फारशी ये-जा नसलेल्या धबधब्यांच्या शोधात निघाले आहेत, त्या सगळ्यांना मन:पूर्वक शुभेच्छा!P180511_17.43
मे महिन्याच्या मधल्या आठवड्यात सिरसी या उत्तर कर्नाटकातल्या गावाला आणि आजूबाजूच्या परिसराला भेट दिली, अनुभव ट्रॅवल्सच्या कूलर समर दौरय़ात.दोन केवळ वाहणारय़ा पाण्याची ठिकाणं आणि दोन धबधबे बघितले, अनुभवले!
अनेक धबधब्यांच्या या परिसरात जोग फॉल, अनचेली फॉल आणि सातोडी फॉल हे तीन धबधबे बघायची योजना होती.यापैकी जोग फॉलला पाणी नाही म्हणून तिकडे जाणं रद्द झालं.P180511_11.10 अनचेली फॉल हा नुसता बघण्याचा धबधबा आहे.टेंपो ट्रॅवलर्स थेट अनचेली फॉलपर्यंत जातात पण तरीही पुढे जंगलातली वाट चालत मार्गक्रमण करावं लागतंच.मोठ्या बसेस टेंपो ट्रॅवलर्स पोचतात तिथपर्यंतही पोचत नाहीत.पुढचा मातीचा रस्ता चालून जातच अनचेली फॉल गाठावा लागतो.जंगलाने वेढलेला हा रस्ता.परिसरातल्या या आणि इतर कुठल्याही निसर्गरम्य ठिकाणी जाताना जंगलातून वाट काढणं अपरिहार्य आणि तितकंच आनंददायी आहे.ह्या वाटा आणि ही जंगलं इतकी व्यवस्थित कशी काय राखली गेली आहेत याचं राहून राहून आश्चर्य वाटतं.ती निसर्गानं स्वत:च राखली आहेत!
अनचेली फॉलकडे जाणारा रस्ता हा चांगलाच उताराचा आहे.अर्धा रस्ता आपण चालून जातो आणि उरलेला अर्धा रस्ता आपल्याला अक्षरश: दरीकडे नेतो.या ठिकाणी व्यवस्थित पायरय़ा आणि दोन्ही बाजूला लोखंडाचं दणकट रेलिंग आहे.P180511_11.25हे रेलिंग संपल्यावर समोर हीऽऽ मोठी दरी आणि समोर दिसणारय़ा अनचेली धबधब्याच्या सतत वहाणारय़ा दोन-तीन शाखा.मे महिन्याच्या मध्यावरही संततधार असलेल्या.हे दृष्यं मनोरम आहेच पण त्यापेक्षाही हुरहूर लावणारं आहे कारण त्या धबधब्यापर्यंत आपण पोचू शकत नाही!
ही हुरहूर प्रमाणाबाहेर भरून काढतो तो सातोडी फॉल!खरंतर हा फॉल अनुभव ट्रॅवल्सच्या शेड्यूलमधे नव्हता.सातोडी फॉलची छायाचित्रं खूप लांबून घेतली आहेत.या फॉलमधून सातोडी नदी उगम पावते आणि या नदीत मे महिन्याच्या मध्यावर इतकं पाणी बघून चकीत व्हायला होतं.विशेषत: पाण्याची कमतरता असलेल्या प्रदेशातून येणारय़ा लोकांना! एक मस्त आखीवरेखीव पायवाट, निसर्गानंच निर्माण केलेली, मस्त जंगलातून जाणारी, दोन्ही बाजूला वाहणारे ओहोळ असलेली पार केल्यावर एक चबुतरा बांधलेला आहे, सामान, कपडे आणि ज्येष्ठं नागरिकांना विश्रांती घेण्यासाठी.सातोडी फॉलचं लांबून दर्शन घेताना कधी एकदा तिथे पोचतोय असं होतं! कारण धबधब्याखाली आबालवृद्धांचा आनंदोत्सव साजरा होत असतो.आपण अतिउत्साहानं दरीत उतरतो.भले मोठे पाषाण आणि दोन पाषाणांमधे तेवढ्याच मोठ्या खाचा असलेला हा रस्ता पार करताना नाकेनऊ येतात.पाषाणांवरून पाय घसरत असतात, वर ऊन तळपत असतं, खाचेमधे घाण पाणी साचलेलं असतं. कधीकधी दोन शिळा पार करताना मधे आडवा ओंडका टाकलेला असतो.त्यावरून हे अंतर पार करणं हे शहरातल्या फूटपाथ संस्कृतीतल्या नागरिकांना, विशेषत: ’विशाल’ महिलांना चांगलंच जड जातं.
P190511_14.25
खाली बघत हे सगळं पार करत आपण एकदम धबधब्यासमोर येतो आणि पंचमहाभूताचं हे चार पुरूष उंच कातळावरून धबाधबा कोसळणारं रूप बघून दिग्मूढ होऊन उभेच रहातो! यात पुढे जावं की इथेच दर्शन घेत रहावं हा भीतीचा भाग असतोच.कुटुंबातल्या लहानथोरांचं एकमत होतं आणि मग भल्यामोठ्या दगडांमधून आधी घोट्यापर्यंत, मग कमरेपर्यंत, मग छातीपर्यंत पोचणारय़ा पाण्यात आपण उतरू लागतो.दोन भल्या मोठ्या पाषाणांमधून वाट काढू लागतो.ते पंचमहाभूत आपल्याला ओढून घेतंय की काय असं वाटत असतं.आपोआप एकमेकांचे हात धरून साखळी केलई जाते.आपली शहरी अदब अजूनपर्यंत राखून ठेवलेले, रिझर्व्ड अर्थात स्पष्टं शब्दात सांगायचं तर माणूसघाणे शहरी आता पूर्णपणे एकमेकांच्या परिचयाचे होतात.निसर्गं काय काय घडवून आणतो?P190511_15.15
आजूबाजूच्या पाण्यात इंद्रधनुष्यं बघून लहानांइतकेच थोरही लहान होतात.त्या चार पुरूष उंच कातळाला टेकतात.वरून पाठ सडकवून काढणारं पाणी बदाबदा अभिषेक करत असतं.आधी डोकं आणि मग पाठ, मग सगळं शरीर आणि अर्थात त्याआतलं मन हा अवर्णनीय सोहळा साजरा करत रहातं.लहान मूल घाबरून बाहेर निघाली तरी मोठी मंडळी लहानाहून लहान होतात.आणखी कोपरे, दगडातल्या बसायच्या जागा शोधू लागतात.त्याना तासभर झाला तरी या सगळ्यातून बाहेर यायचंच नसतं.कुणाला छायाचित्रं घ्यायची असोशी उरलेली नसते.कुणाला परतण्याची घाई नसते.शहरातल्या चिंता कुठल्यातरी खुंटीला टांगून सगळे जीव या स्वर्गीय वर्तमानात पंचमहाभूताच्या सान्निध्यात रममाण होऊन गेलेले असतात!
मग कधीतरी भूकेची जाणीव होते.वर चबुतरय़ाकडे जाऊन कोरडं व्हायचं असतं.कुलकर्णी बाईंनी केलेल्या मिष्ठानंयुक्त भोजनाचा आस्वाद घ्यायचा असतो.अनुभव ट्रॅवल्सने हे पर्यटकांच्या सुग्रास जेवणाचं व्रत इथेही सांभाळलेलं असतं!
P190511_15.15_[01]

Thursday, June 9, 2011

गोकर्ण महाबळेश्वर आणि मुर्डेश्वर!

सिरसीपासून ८०-९० किलोमीटरवर असलेली ही दोन वेगवेगळी स्थळं.एकमेकांच्या अगदी विरूद्ध असलेलं त्यांचं रूप.
गोकर्ण महाबळेश्वर अनेकांचं तीर्थस्थळ.मुर्डेश्वरही.रावणाची ती प्रसिद्ध गोष्टं या परिसरात वारंवार उल्लेखली जाते.अघोरी तपश्चर्येने भोळ्या सांबाला प्रसन्न करून घेणारा रावण.त्याला शिवलिंग हवंय.वारंवार येणारय़ा, आणल्या गेलेल्या अडचणींतून तो तपश्चर्या पूर्ण करतो.शिवलिंग मिळवतो.तो सर्वेसर्वा होणार म्हणून नारद ते शिवलिंग त्याच्याकडून काढून घेण्याच्या प्रयत्नात.गणपतीला या मोहिमेवर पाठवण्यात येतं.रावणाला वराबरोबर शिवलिंग जमिनीवर ठेवलंस तर शिवलिंगाला मुकशील अशी अटही मिळालीय!
रावण स्वगृही निघालाय.संध्याकाळ.रावणाच्या संध्येची वेळ झालीय.नेमाने संध्या करणारा रावण.आता काय करायचं? लिंग खाली ठेवावं लागणार या विवंचनेत तो असताना ब्राह्मण, बटूच्या रूपातला गणेश त्याला दिसतो.तो गणपती आहे हे रावणाला कळत नाही.संध्याकर्म संपेपर्यंत शिवलिंग तुझ्याकडे धरशील का? या रावणाच्या विनंतीवर गणपती म्हणतो, मी तुला तीन हाका मारीन.तिसरय़ा हाकेपर्यंत तू लिंग ताब्यात घेतलं नाहीस तर मला ते नाईलाजाने खाली जमिनीवर ठेवावं लागेल.शिवलिंग सुपर्द करून रावण संध्येला लागतो.ठरलेल्या बेताप्रमाणे त्याचं संध्याकर्म उरकण्याच्या आत गणपतीनं तीन हाका मारून शिवलिंग जमिनीवर ठेवलंय.रावण येऊन ते पहातो.ते जमिनीत आत जाऊ लागलंय.रावण ते खेचायचा प्रयत्न करू लागतो.जोर लावतो.लिंगाचा काही भाग हातात येऊन जोर लावल्यामुळे आसमंतात फेकला जातो.लिंगाचे चार भाग चार दिशांना जाऊन पडतात.त्यातलं एक स्थान मुर्डेश्वर आणि जिथे लिंग ठेवलं गेलं ते स्थान, तीर्थस्थान म्हणजे गोकर्ण महाबळेश्वर!
गोकर्ण महाबळेश्वराला कारवार-धारवाड परिसरात खूपच महत्व आहे.गोकर्ण महाबळेश्वराचं देवालय खूप जुनं.अजून त्याच प्राचीन अवस्थेत असल्यासारखं.या देवालयाचे पुजारी, त्या सगळ्यांची आडनावं ’मुळे’.ह्यातलेच काही ’आदी’- Adi असंही नाव लावतात.हे मुळे संपूर्ण नावामुळे मुळचे महाराष्ट्रातले वाटतात.वरची हकीकत आम्हाला सांगणारे देवळातले गुटगुटीत पुजारीही मुळेच.मी मराटी नाई.कन्नड आहे.तुमी मला समज्यून घ्येईल- असं बोलत त्यांनी वरची हकीकत सांगितली.
देवळात फोटो काढायला परवानगी नाही.पुरूषांनी अंगावरचा शर्ट काढूनच दर्शन घ्यायला आत शिरायचं.आत जेमतेम जमिनीवर असलेलं लिंग, इतर शिवलिंगाप्रमाणे त्याचा आकार दिसत नाही.सतत अभिषेक चाललेला असतो.खाली बसून जमिनीवरच्या छोट्या गोल खाचेत हात घातल्यावर आपल्या हाताला शिवलिंगाचा वरचा अर्धाकृती भाग लागतो.दर्शनाला इतर ठिकाणांसारखी घाईगर्दी मात्रं नाही!
त्या बटूनं- बटू स्वरूपातल्या गणपतीनं फसवलं म्हणून रावणानं गणपतीच्या डोक्याच्या वर, मध्यावर प्रहार केला तिथे गणपतीला एक खड्डा पडला.गोकर्ण महाबळेश्वराचं दर्शन घेऊन आल्यानंतर बाहेर त्या गणपतीचंही देवालय आहे.यातल्या उभ्या गणपतीच्या डोक्यावर खाच आहे.ह्या खाचेत हात घालून या गणपतीचं दर्शन घेतलं जातं...
गोकर्ण महाबळेश्वर देवालय म्हणजे परंपरेचा अस्सल नमुना तर मुर्डेश्वर म्हणजे आधुनिकता.मुर्डेश्वर फोटोंमधून अधिक बोलतं.देवालयच्या वर १२० फूटाची ध्यानस्थ शंकराची फायबरमधली असावी, मूर्त आहे.डोळे दिपवणारी.
P170511_16.26

तिच्या खाली ध्वनिप्रकाशाचा खेळ चालत असलेलं म्युझियम आहे! यात वर सांगितलेली गोष्टं देखाव्यांच्या स्वरूपात अप्रतिमरित्या मांडलेली आहे.यातला रावण बघण्यासारखा.खरं तर दक्षिणेत रावणाला मानही आहे.या देखाव्यांमधला रावणाचं शरीरषौष्ठव वाखाणण्यासारखं मूर्तीबद्ध केलंय आणि तरीही त्याचा चेहेर्‍यावरून त्याचं राक्षसपणही जाणवतं.
Murdeshwar_ Light & Sound Show

या सगळ्यात रमून आपण बागेसारख्या बनवलेल्या परिसरात फिरत विविध देवालयात जाऊन दर्शन घेतो.समोर तामिळनाडूत मदुराई वगैरेत असतात तसं गोपुरम् आहे.ते ही उंच पण शंकराच्या आवाढव्य मूर्तीपेक्षा छोटं.त्यात दिल्लीच्या कुतुबमिनाराप्रमाणे वरवर जाता येतं.वरून देवालयाच्या मागेच असलेला सुंदर समुद्रकिनारा न्याहाळता येतो.
Gopuram at Murdeshwar

या सगळ्या आधुनिक रचनेत गुंतून आणि नंतर देवळामागच्या बीचवर जायची घाई मागे लागून नेमक्या मुर्डेश्वर देवालयाकडे थोडं दुर्लक्षंच होतं खरं.काही उत्साही बीचवर जाऊन आल्यावर मग दर्शन घेऊ म्हणून थेट बीचंच गाठतात.
बीचवर जाण्याआधी बीचलगत उंचावर असलेलं उपहारगृह आहे, तिथेही पर्यटकांची गर्दी होते.या उपहारगृहाच्या बाल्कनीत खुर्च्याटेबलांवर बसून सगळा समुद्र न्याहाळता येतो.
P170511_18.04

मुर्डेश्वरचा समुद्रकिनारा अप्रतिम आहे.स्वच्छता वाखाणण्यासारखी आहे.पर्यटकही शिस्तीत मजा लुटत असतात.सगळ्यावर कडी म्हणजे बीचलगत स्त्रीपुरूषांसाठी स्नान करण्यासाठी सोय आहे.फिरती स्नानगृह इथे पार्क करून ठेवलेली आहेत.त्यामधे भरपूर पाणी आहे.स्वच्छता आहे.बीचमधल्या खारय़ा पाण्यातून बाहेर पडून स्वच्छ कोरडं व्हायला मिळाल्यावर कोण खूष होणार नाही!
Murdeshwar Beech

Saturday, June 4, 2011

सिरसीतल्या सुपारय़ा, मिरी आणि कॉफी, आंब्याच्या बागा

अनुभवच्या अरूण भटांचं निसर्गावरचं प्रेम सतत जाणवतं.मधुकेश्वर मंदिराला जातानाच्या रस्त्यावर त्यानी सर्वप्रथम उतरवलं ते या सुपारीच्या बागेत! सिरसीत सुपारीचं उत्पादन खूप.ही सुपारीच गुटख्यामधे वापरली जाते.सुपारीच्या सडसडीत उंच झाडाना वेढून असते मिरीची वेल.मिरीचंही उत्पादन इथे खूप आहे.सुपारीची झाडं विशिष्टं पद्धतीनं लावली जातात.दोन झाडांमधे विशिष्टं अंतर असतं आणि ही झाडं कुठल्याही दिशेने बघा, ती एका रांगेत असतात.एखादं झाड वठलं तर त्याच जागी दुसरं रोप लावलं जातं.अरूण भटांनी सगळ्या मुलांचं, जी शहरात संगणक, दूरचित्रवाणीला चिकटून असतात, त्यांचं एक छोटसं बौद्धिक घेतलं.त्याना संपूर्ण बाग फिरायला सांगितलं आणि मुलं उधळली!
सुपारीला साथ करतात ही कॉफीची बुटकी झाडं.झुडपासारखी.दक्षिणेतल्या कॉफीची चव काही न्यारीच असते नाही?

Coffee_Sirsi
आणि हे आहे आंब्याचं झाड(?)... स्थानिक, चोखून खाण्याचे हे आंबे! कमी उंचीची झाडं आणि फळं अक्षरश: जमिनीवर लोळणारी!Mango_Sirsi इथे उतरवून आम्हाला एक प्लास्टिकच्या ट्रेमधे ठेवलेले आंबे मनसोक्त खायला सांगितलं जातं.आम्ही अशा गोष्टीसाठी सदैव तैयार! याच बागमालकाला नंतर हॉटेलवर बोलवलं होतं.त्याच्याकडे कर्नाटकात आणून लावलेला देवगड हापूस, पायरी आणि रायवळ आंबे! पुण्या-मुंबईतल्या लोकांनी किलोवर खरेदी केले आणि नेले.असं फळ मुंबईत क्रॉफर्ड मार्केटशिवाय कुठेही दिसत नाही.आम्ही घेतलेल्या हापूसची चव माझ्या लहानपणीच्या आंब्यांची आठवण देऊन गेली.कोकणातल्या सावंतवाडी, दापोली कृषिविद्यापिठांमधे प्राध्यापक असणारा माझा मामा दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्हा पंधरा-वीस जणांना महिना-दीड महिना, रोज कमीतकमी दोन पुरतील इतके आंबे, आंब्यांच्या पेट्या आणायचा.फणस, काजू, कोकम-रातांबेही! मामा हे सगळं कसं करत असेल? तेव्हा खाणंच माहित होतं आता किमतीचा विचार प्रथम करावा लागतो.
ही वाट दूर जाते... सिरसी