romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Friday, June 24, 2011

सिरसी: सहस्त्रलिंग आणि झुलता पूल!

पर्यटनाला गेल्यावर आपण अनेक स्थळांना भेट देत असतो.हे स्थळ त्यावेळी कसं वाटतं हे त्या त्या वेळच्या वातावरणावर, परिस्थितीवर, तुम्ही तिथे पोचता त्या वेळेवर तसंच तुमच्या मनस्थितीवरही अवलंबून असतं.सिरसी या उत्तर कर्नाटकातल्या गावापासून जवळंच असलेल्या सहस्त्रलिंग या ठिकाणाबद्दलची माहिती दिली गेली तेव्हा ते पहाण्याची प्रचंड उत्सुकता निर्माण झाली.नदीच्या पात्रातल्या अनेक, म्हणजेच सहस्त्र पाषाणांवर एकेक, अशी कोरलेली हजार शिवलिंगं इथे बघायला मिळतात असं ऐकल्यावर कधी एकदा ते बघतो असं होऊन गेलं होतं.त्यावेळच्या एका राज्यकर्त्याला मूलबाळ होत नव्हतं म्हणून त्यानं शिवाची आराधना केली तेव्हा त्याला स्वप्नात अशी आज्ञा झाली की सहस्त्रलिंगं कोरून घे आणि पूज! तुझी इच्छा पूर्ण होईल! राजानं तसं करून घेतलं आणि सगळीकडे आनंदीआनंद झाला!
ही जातककथा ऐकल्यावर प्रत्यक्ष काय झालं असेल? इतक्या सगळ्या कारागीरांनी, आजच्या भाषेत हे सगळं प्रोजेक्ट कसं पूर्ण केलं असेल, नक्की सांगितलं जातं तेच कारण असेल की आणखी काही? असे प्रश्न मनात आलेच.
प्रत्यक्ष सहस्त्रलिंग या जागी पोचलो तेव्हा संध्याकाळ झाली होती.मळभ असलेली उदास संध्याकाळ.नदीकिनारी बांधलेल्या सिमेंटच्या पायरय़ांपर्यंत पोचलो तेव्हाच साठलेल्या पाण्याचा कुबट असा वास यायला लागला.आदल्याच दिवशी सातोडी फॉल्स या धबधब्यावर नि:संकोच भिजलो होतो.धबाधबा कोसळणारय़ा स्वच्छ निर्मळ पाण्याचा अनुभव मनसोक्त घेतला होता.त्याच्या आदल्या दिवशी सिरसी गावाच्या अगदी जवळ असलेल्या एका नदीच्या पात्रात संध्याकाळी मुलांना डुंबण्यासाठी नेलं होतं.तीही जागा वहात्या पाण्याची होती.स्वच्छ होती.सहस्त्रलिंग या ठिकाणी तसं वाटलं नाही.मे महिन्याचा मध्य म्हणजे वहात्या पाण्याची अपेक्षा करू नये पण इतर ठिकाणी आश्चर्यकारकरित्या तसं पाणी मिळालं होतं.सहस्त्रलिंग असलेल्या पात्रात मात्र नाल्यासारख्या ठिकाणी येतो तश्या पुंगस वासामुळे पायरय़ा उतरून खाली जाववेना.काही जण तरीही पाणी, पाणी करत उतरले.एकूण जराश्या मळभ आलेल्या आणि अजिबात हवा नसलेल्या वातावरणात जीव रमेना.इतकंच काय एकेका लहान मोठ्या दगडावर असलेलं एक एक शिवलिंग बघून त्याचं छायाचित्र काढायचंसुद्धा माझ्या मनात आलं नाही हे कबूल करावं लागेल.सगळंच काही अगदी वाईट होतं असा याचा अर्थ नाही पण कधी कधी आपली मनस्थिती आपल्याला भोवतालाबद्दल उदास रहायलाही प्रवृत्त करत असावी.
यामुळे सहस्त्रलिंग या स्थानाचा हा जालावर मिळालेला दुवा इथे उधृत करतो आहे, मी काढलेलं छायाचित्र नसल्यामुळे तेही इथे शेअर करता आलेलं नाही.
तिथून माझा पाय लगेच काढता झाला याला आणखी एक कारण म्हणजे आमच्या अनुभव ट्रॅवल्सचे आमच्याबरोबर असलेले एक मार्गदर्शक श्री पटकुरे आपल्या कारवारी-कोकणी मिश्रित मराठीत “पुडे च्यला! लक्ष्मण झूला हाये लक्ष्मण झूला!”असं ओरडायला लागले.माझ्यासारखी रेंगाळणारी आणखी काही मंडळी लगेच पुढे सरसावली.दोन चार पावलावर त्याच नदीच्या पात्रावर एक झुलता पूल दिसला.लहान मुलाच्या चपळाईने लगेच धावलो.खरं तर ह्या पूलाचा उपयोग कृत्रिमरित्या बनवलेलं स्थलदर्शनाचं ठिकाण म्हणून केला असावा असं दिसत होतं.पण कर्नाटकातल्या पद्धतीने छान रंगरंगोटी करून व्यवस्थित राखलेल्या या पूलानं आमचं लक्ष वेधून घेतलं.तोपर्यंत कुठुनसं सूर्यदर्शनही होऊ लागलं होतं.मगासचं उदास वातावरण जाऊन आम्ही त्या पुलावर हेलकावे खाण्याचा आनंद लुटायला लागलो.लांबवर दिसत होते सहस्त्रलिंगावरच्या प्रत्येक पाषाणावर जाऊन त्या त्या लिंगावर नतमस्तक होणारे स्थानिक आणि पर्यटक.साचलेल्या पाण्यातलं निर्माल्य दिसत होतं.जवळच एके ठिकाणी साचलेल्या पाण्यात काहींचा जलविहार(!)ही चाललेला होता.आम्ही पुलावरचे, हलत्या पुलावरून, उंचावरून दिसणारं नदीचं पात्रं, भोवतालची झाडी, सहस्त्रलिंगांभवतीची गर्दी न्याहाळत होतो.त्या पुलाच्या छायाचित्रांची ही एक मालिका! तुमच्यासाठी!
Bridge near Sahastralinga, Sirsi

P200511_18.12

P200511_18.13

P200511_18.16

P200511_18.19

2 comments:

rohini gore said...

Are vaa! Kiti chhan aahe ha jhulta pool!! javese vatat aahe.

विनायक पंडित said...

रोहिणीजी अभिलेखवर तुमचं मनापासून स्वागत! आम्हाला खरंच तिथून परत येऊच नये असं वाटत होतं!:)प्रतिसादाबद्दल धन्यवाद!