romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Wednesday, January 25, 2012

डेडलाईन (प्रजासत्ताकाची?).. भाग अखेरचा..


बसा! खाली बसा इटक्याल! फ्रीडम फायटर कोण आहे इथं? तुम्ही का मी?.. बसा!.. अहो भडकायला काय आता नवतरूण नाही राहिलात तुम्ही!
सॉरी सर! पण तुम्ही एकदम वेगळ्याच ट्रॅकवर-
हाच ट्रॅक खरा आहे इटक्यालसाहेव! हाच ट्रॅक! आणि आमचे आदर्श होते आमचे नेते!
काऽऽय? इटक्यालचं तोंडच विस्फारलं. राधाबाईंना त्याची काळजी वाटू लागली. दहिहंडीसाठी हुकमी उतरंड रचावी तसे आण्णा बोलत होते.
नारे द्यायचे आणि बाजूला व्हायचं! मग त्यात सत्राशेसाठ आहुत्या पडल्या की स्वदेशीची चळवळ सुरू करायची. ती लोकांनी डोक्यावर घेतली की अचानक मागे घ्यायची. वसाहत म्हणून मान्यता द्या, चालेल! संपूर्ण स्वातंत्र्य कशाला? पोरांना फाशी जाहीर झाली, त्यानी उपोषण केलं.. आपण आपल्याकडे लक्ष वेधून ठेवायचं देशाचं. आपल्यापेक्षा मोठं कोणी होता कामा नये. ते त्यांचं राष्ट्र मागताहेत, देऊन टाका झालं, उगाच.. हे.. माझे तरी आदर्श होते इटक्यालसाहेब आणि मी योग्य ते संकेत घेण्यात-
काय बोलताय तुम्ही हे? कुणाबद्दल बोलताय? हे-हे-हे कसं-
छापायचं! असं म्हणायचंय ना तुम्हाला इटक्याल?.. की खरंच तुमच्याकडे ती वस्तू आहे?.. सात्विक संताप का काय म्हणतात ती? आत्तासारखंच सगळं होतं तेव्हा.. दरोडे घातले जात होते, राजकारणात एकमेकांच्या अपेक्षांची कापाकापी होती, ताम्रपट वाटपात भ्रष्टाचार झाले ते पुढे पण चळवळीचं नेतृत्व कुणी करायचं-
हे..हे-हे-हे भयंकर आहे! भयंकर!.. तुमच्यासारख्या माणसानं हे असलं सगळं- मॅडम-हे-हे तुम्हीतरी-
हे जास्त सनसनाटी आहे नाही मिस्टर इटक्याल! खरं नाही वाटत तुम्हाला? की तुमच्या उपयोगाचं नाहीए हे?.. आता पुढे सांगतो. ब्रिटीश काही आपल्याला घाबरून नाही पळून गेलेऽ.. आपल्यासारख्यांच्या या अवलादीची पूर्ण कल्पना होती आणि खात्री होती त्याना-
क-कसली? कसली?
पुढच्या पन्नाससाठ वर्षांत पुन्हा देश विकायला ठेवणार आहे ही अवलाऽऽदऽ पुन्हाऽऽ.. आणि तेव्हा सगळी तरूण पोरं परदेशात स्थाईक झालेली असणार आहेत.. राहिलेली स्वत:त, चंगळवादात आणि बुवाबाजीत अडकलेली असणार आहेत.. घोटाळे हा सरकार आणि नोकरशाही यांचा हक्क होणार आणि.. उथळ मनोरंजन आणि सनसनाटी याशिवाय वर्तमानपत्रात काहीही उरणार नाही.. अन्य माध्यमांची बातच सोडा! छापणार आहात तुम्ही हे सगळं?
अचानक लालबुंद होऊन आण्णा थरथरत उभे राहिले. प्रतिध्वनिसारखा तोच तोच प्रश्नं विचारत राहिले, छापणार आहात तुम्ही हे सगळं?
इटक्याल अचानक शांत झाला. पत्रकारितेचं कातडं पांघरून तो पूर्ण भानावर आला. आपलं जे काही सामानसुमान होतं ते आवरून तो तितक्याच शांत, सावधपणे मार्गस्थ झाला तेव्हा आण्णासाहेब थरथरत होते. त्यांचा चेहेरा अजुनही तांबडालाल होता. राधाबाईंच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वहात होतं. आण्णासाहेबांना त्यांनी घट्ट धरून ठेवलं होतं.
इटक्याल रस्त्त्यावर आला. त्यानं तेच ते आपलं बहुउद्देशीय अत्त्याधुनिक यंत्र बाहेर काढलं. त्यावरचा एकच नंबर दाबला. त्या नंबराखाली प्रत्यक्ष संपर्क क्रमांक साठवलेला होता.
हॅलोऽहॅलो सर, म्हातारा बराच तिरसट निघाला. आपल्या लिस्टवर दुसरं नाव कुणाचं आहे सांगा. आज रात्रीची डेडलाईन आहे!”          (समाप्त? की पुढे असंच चालू? कधीपर्यंत?)

Tuesday, January 24, 2012

२) डेडलाईन (प्रजासत्ताकाची?)


इटक्यालला ’हो’ म्हणणं भाग पडलं. त्याला हे काम झटपट उरकायचं होतं पण म्हातारा खट वाटत होता. इतर फ्रीडम फायटर्ससारखा गलितगात्र नव्हता. उतावीळ नव्हता स्वत:बद्दल बोलायला. आण्णा त्याला निरखत होते
तुम्ही, इटक्याल, टेलिफोनबूथ वाटपाचं प्रकरण धसास लावलंत खरं पण तुमचे सहकारीच काय तुमचे मालकसुद्धा नाराज झाले तुमच्यावर. एकदम सगळ्यांपेक्षा खूपच मोठे झालात हो तुम्ही! ‍हाऽहाऽहाऽहाऽऽऽ.. शोध पत्रकारितेच्या महत्वाच्या खात्यातून तुम्हाला टाकलं जनरल इंटरव्ह्यू सेक्शनमधे. आमच्यासारख्या थडग्यांच्या मुलाखती घ्यायला! हा हाऽहाऽऽ.. राधाबाईंनी चपापून इटक्यालकडे पाहिलं. ही तर सुरवात होती आणि कदाचित इटक्यालच्या मदतीला राधाबाईच धावून येणार होत्या. इटक्याल काही लेचापेचा गडी नव्हता. त्याचा चेहेरा भावनाशून्य झाला. त्यानं आपलं ते भ्रमणध्वनिवजा अत्त्याधुनिक यंत्र टेबलावरून पुन्हा आपल्या हातात घेतलं आणि ज्याला आण्णासाहेब आजकालच्या जनरेशनचं मोबाईल टुचुक्‍ टुचुक्‍ करणं म्हणायचे तसं करत तो त्याच्याशी खेळू लागला. आण्णासाहेबांच्या ते लक्षात आलंच. हऽहऽहऽहऽऽ.. पत्रकारितेत गोपनीयता फारच महत्वाची असते नाही इटक्याल? तरीही विचारतो, ज्या मुलाच्या प्रतिज्ञापत्रावरून हा घोटाळा तुम्ही उजेडात आणलात त्या मुलाला मिळाला का हो बूथ?- म्हणजे भविष्यात तसं काही होण्याची शक्यता? हऽहऽ.. नाही!- जवानांच्या विधवा, अपंग, स्वातंत्र्यसैनिक या सगळ्यांचेच बूथ परत मागितलेत हो सरकारनं! त्या मुलाला प्रतिज्ञापत्र द्यावं लागलं म्हणजे असंख्य प्रयत्नं करून पैसे खरचून त्याला बूथ मिळालाच नाही, तेंव्हा-
मिस्टर कुरूंदवाडकर! मे वुई स्टार्ट वुईथ योर इंतरव्ह्यू? आज मला प्रजासत्ताकदिनाची अर्ध्याच्यावर पुरवणी कव्हर करायची आहे ऍंड यू नो आय ऍम अ सॅलरीड पर्सन. नोकरीवर लाथ मारणं हा वाक्प्रचार इतिहासजमा झालाय आता. उलट गदा येऊ नये म्हणून- तुम्ही जे काही विचारताय त्याचं उत्तर काळच देईल असं मला वाटतं. ’स्वातंत्र्य चळवळीतले तुमचे दिवस’ हा तुमच्या मुलाखतीचा विषय. जवळजवळ अर्ध पान तुम्हाला ऍलोट केलंय. तुम्ही प्रसिद्धीपासून सतत दूर राहिलात. महाराष्ट्रातल्या महत्वाच्या उठावांमधे तुमचं नाव सतत घेतलं जात होतं. महाराष्ट्रात ताम्रपट दिल्या गेलेल्या पहिल्या तुकडीत तुमचं नाव होतं. सत्तेत, पक्षकार्यात तुम्ही सामील झाला नाहीत. विधायक कार्यांना पाठिंबा देण्यात आणि विधायक विरोध करण्यात तुम्ही नेहेमीच आघाडीवर राहिलात. खरं तर पेपरवाल्याना उभं न करण्याबद्दल तुमची ख्याती पण निदान आम्ही तुमची भेट घेण्यात तरी यशस्वी ठरलो. आपण तुमच्याबद्दल बोलूया! चला! हे मी दाबलं या माझ्या यंत्राचं बटण. हे चालू झालं ध्वनिमुद्रण. बोला!
हाऽहाऽहऽहऽ.. इटक्याल गृहपाठ चांगला आहे तुमचा. खरंच चांगला आहे. चलाखही आहातच. एवढा.. घोटाळा उजेडात आणलाय तुम्हीऽ.. माझ्याबद्दल बरंच बोलायचंय मला.. कधी नव्हे ते! राधाबाई.. तुम्हीही ऐका.. हरकत नाही ना इटक्याल तुमची? राधाबाई इथे असल्यातर? आं?.. हाऽहाऽहऽहऽ.. तर.. ’चलेजाव’च्या वेळी मी जेमतेम वीस वर्षाचा होतो. नुकताच म्याट्रिक झालेला. कुणाचंही लक्ष वेधून घेण्याचं मला अप्रूप. कुणाचंही. मग काय करायचं?.. म्हटलं मारूया उडी. भित्रे काही कमी नव्हते गावात. म्हटलं उडी मारली चळवळीत तरच उठून दिसू! हाऽहाऽहाऽहाऽ..”
इटक्याल उडालाच. हे असलं काही अनपेक्षित होतं त्याला. तो राधाबाईंकडे बघायला लागला. राधाबाई विस्मयचकीत, डोळे विस्फारून आण्णांकडे बघत होत्या. आण्णासाहेब हसतच होते. इटक्यालला रहावलं नाही.
सर!.. म्हणजे राष्ट्रप्रेमानं भारून-
छ्याट्‍!.. अजिबात नाही! खोटंय ते!
आता दचकण्याची पाळी राधाबाईंची होती. त्यांनी पदर तोंडाला लावला.
काय कुणास ठाऊक कुठून माझ्यात ती लक्ष वेधून घेण्याची प्रवृत्ती आली. मी सतत बैचेन असायचो. अभ्यासात, खेळात फारशी गती नव्हती. ’चलेजाव’ आलं, मी वाटच पहात असल्यासारखं. मोठी रिस्क होती इटक्यालसाहेब मोठी.. पण मी घेतली. लाठ्या घेतल्या, काठ्या झेलल्या.. सगळे बरोबर आहेत ना हे बघून तुरुंगातही जाऊन आलो. अभ्यासाची पुस्तकं घेऊन.. लक्ष वेधून घेण्याचा आणखी एक प्रयत्न. अभ्यासात खंड पडू दिला नाही. इतरांची बैचेनी मला नव्हती. जलेजाव म्हणूनही ’ते’ जात नाहीएत, देशावरची गुलामगिरी संपत नाहिए.. गावाचं लक्ष मी माझ्याकडे वेधून घेतलं होतं, माझं काम मार्गावर होतं मला कसली बैचेनी?-
इटक्याल आता पॅनिक झाला. राधाबाईंचा तोंडावरचा हात आता कपाळावर गेला. आण्णा तंद्रित जाऊन स्वत:शीच हसत होते. वेड्यासारखे.
सर!.. सर!.. मग कलेक्टर कचेरीवर तिरंगा फडकवलात युनियन जॅक उतरवून त्या प्रसंगात तुमचं नाव अग्रेसर-
का असणार नाही? का असणार नाही! हाऽहाऽऽहाऽहाऽ कामाला होतो मी तिथेच. कलेक्टरला बदली हवी होती. त्याचं सगळं तुंबलेलं काम मी पूर्ण करून दिलं. ब्रिटीश असे होते, तसे होते, शिस्तीचे भोक्ते होते हे आपलं फुकाचं कौतुक! कंटाळला होता बिचारा. म्हणाला, मी जातो, पुढचा विलायतेहून यायच्या आत काय़ वाट्टेल ते करा. मी आतल्या गोटात लगेच खबर पोहचवली-
सर हे फार होतंय! म्हणजे हे तिरंगा फडकवणं, युनियन जॅक उतरवून, हे आजच्या कुठल्याही राजकीय नेत्यानं ध्वजारोहण करण्याइतकं सोपं होतं म्हणायचंय तुम्हाला? फ्रीडम फायटर्सनी जीवाची बाजी लावून-
इटक्याल संतापून कधी उभा राहिला हे त्याचं त्यालाच कळलं नाही. 
बसा! खाली बसा इटक्याल! फ्रीडम फायटर कोण आहे इथं? तुम्ही का मी?.. बसा!..”    (पुढे चालू)

Monday, January 23, 2012

१) डेडलाईन (प्रजासत्ताकाची?)

पत्रकार इटक्याल आण्णासाहेबांच्या घरी आला. आपल्या न्यूज एजन्सीनं दिलेलं पत्रं त्यानं आण्णासाहेबांना सादर केलं आणि काहीही न बोलता त्यानं खिशातलं अत्त्याधुनिक भ्रमणध्वनिवजा यंत्र बाहेर काढलं, त्यातल्या ध्वनिमुद्रण विभागाची कळ दाबली आणि म्हणाला, बोला!
आण्णासाहेब त्याच्याकडे पहात राहिले. हातातल्या पत्राची घडी टेबलावर ठेवून त्यानी शेजारच्या शिसवी खुर्चीकडे हात केला, म्हणाले, आधी बसून घ्या! इटक्याल तसाच घुम्यासारखा बसला. आण्णासाहेबांनी आतल्या खोलीच्या दारात उभ्या असलेल्या राधाबाईंकडे पाहिलं. त्या आत गेल्या. आण्णांनी तशीच दुसरी खुर्ची ओढून घेतली, आवाज न करता आणि तिच्यावर बसले. दोघांच्या मधे टेबलावर इटक्यालनं नुकताच ठेवलेलं त्या अत्त्याधुनिक ध्वनिमुद्रणयंत्राकडे निर्देश करत ते म्हणाले, सध्या बंद करा हे! इटक्यालनं तोंडानं मच्‍ असा आवाज करत ते यंत्र स्वत:जवळ ओढलं आणि ओढत असतानाच सफाईने ते बंद केलं. मग त्यानं आण्णांकडे पाहिलं. आण्णा त्याच्याकडे रोखून बघतच होते.
माफ करा पण आज तुम्ही मनापासून नाही आलाहात माझी मुलाखत घ्यायला!
तसं नाही सर.. असं म्हणत इटक्यालनं एक नि:श्वास टाकला.
तुमचं नाव इटक्याल. बरोबर आहे नं माझं उच्चारण?
हो सर!
म्हणजे.. मधे टेलिफोनबूथ वाटण्यासंदर्भातला घोटाळा बाहेर काढलात तो तुम्ही!
इटक्यालनं नुसतीच मान डोलावली. आण्णांनी त्याच्याकडे बघितल्यावर त्याला औपचारिक प्रेसछाप हसावं लागलंच.
मग बरोबर आहे! माझ्यासारख्या यकश्चित स्वातंत्र्यसैनिकाची मुलाखत घेण्यात तुम्हाला काय इंटरेस्ट असणार?
नाही! तसं ना-
नाही कसं? एक ढोबळ मुलाखत. उच्छृंखल रंगीत पुरवणी सजवण्यासाठीची. पार्श्वभागी तिरंगा. ऑफसेट सफाई. दरवर्षी एक नवीन स्वातंत्र्यसैनिक. घ्या! कॉफी घ्या!
पेपरचं काम म्हणजे.. पुन्हा प्रेसछाप हसत इटक्यालनं राधाबाईंनी नुकत्याच आणलेल्या ट्रेमधून कॉफीचा कप घेतला. आण्णांना एक कप देऊन राधाबाई दिवाणावर बसल्या. सगळ्यात आधी आण्णांनी कॉफीचा कप, ती जवळजवळ एका घोटात पिऊन खाली ठेवला आणि राधाबाई नेहेमीसारख्या हसल्या. खाकरत आण्णासाहेब म्हणाले,
इटक्याल.. तुम्ही डिसइंटरेस्टेड आहात.. याचं आणखी एक कारण सांगू?
इटक्यालला ’हो’ म्हणणं भाग पडलं. त्याला हे काम झटपट उरकायचं होतं पण म्हातारा खट वाटत होता. इतर फ्रीडम फायटर्ससारखा गलितगात्र नव्हता. उतावीळ नव्हता स्वत:बद्दल बोलायला. आण्णा त्याला निरखत होते…  (पुढे चालू)

Saturday, January 21, 2012

आमच्या मुलांना सांभाळाऽऽ (२)

              भाग १ इथे वाचा!               
दोन्ही पायांचं जवळ जवळ धनुष्य झालेली आजी डोलत डोलत आल्यासारखी येते. त्रासलेली.  “आले रे आले 
बाबा! काय बोंबाबोंब तुझी अंकित गावभर आय आय गंऽ?”  गुडघे दाबत फ्लॅटकडे जाणारय़ा पायरय़ा 
चढतेय. पॅसेजमधल्या कट्ट्याकडे बोट दाखवत अंकित आजीला खेचतो. 
आज्जी इकडे! इकडे!
आजी चिडलेली. आजूबाजूला बघत हतबल झालेली.
अंकित! काय हे अंकित! अरे कसा वागतोस! कसा ओरडतोस! अं?
आजी प्लीऽऽज! प्लीज ना! बसूया ना कट्ट्यावर!
नकोरे! संध्याकाळ झालीय डास फोडून खातील! आत चल!
नाऽऽईऽ इतेच! गोष्ट सांग!
आत चल आत. सांगते गोष्टं!
अंकित विचित्र आवाजात भोकाड पसरतो. आजी कानावर हात ठेवते.
बस रे बाबा! बस! थांबव! थांबव तुझं भेकणं!.. हे जातात ऑफिसमधे मजेत!
सांभाळायला आहे म्हातारी!.. थांब रे बाबा!.. अगं आईऽऽगं!
कट्ट्यावर बसते. अंकित स्वीच ऑफ केल्यासारखा शांत.
आहे? हे रडणं तुझं!.. हसतोय! अगं आई गं! आहे ते सगळं छान आहे!
अंकित आजीला बिलगून कट्ट्यावर बसतो.
आईबाप सुखी रे तुझे! मारत असतील मजा!
सांगू! ममी पपाला सांगू हे?
सांग! माझा सासरा ना तू?
गोष्टं सांग!
अगं आई गं! हे आले नरभक्षक!
म्हणजे कोण आजी?
अरे मेल्या डास! आणि कोण?
आजी गोष्टं!
अंगठा तोंडात घालून तिच्या मांडीवर डोकं ठेवतो.
याची गोष्टं म्हणजे मला शिक्षा!.. आई गं! हा आणखी एक म्येऽऽला!
अंकित स्वत:च्या पायाकडे हात करतो.
आज्जड! इथे इथे पण!
आजी चिडून त्याच्याकडे बघते. त्याच्या पायावरचाही डास मारते.
हं! कुठली गोष्टं बाबा?
कृष्णबाळाची!
हं! तर ते छोटं बाळ आपल्या घरी आलेलं पाहून यशोदेला खूप आनंद झाला!
वसुदेवानं, कृष्णबाळाच्या बाबानं मोठ्या विश्वासानं बाळाला यशोदेच्या हातात दिलं!
तिचं पण पाळणाघर होतं आपल्या या निमामावशीसारखं?
डोंबल!
आजी मला का नाही पाठवत तिच्याकडे?
यशोदेकडे? आजी हसते.
डोंबल!
आजी चिडते.
अं!
अगं शेजारच्या निमामावशीकडे गं!
कशाला?
केवढी मुलं असतात तिच्याकडे! खूऽऽप!
हे बघ अंकित! आईऽ हा बघ! आणखी एक म्येऽऽला!– अरेऽ त्या मुलांना आजी
नसते घरी सांभाळायला! लाड करणारी! निमामावशी किती रागावते माहितीये ना
मुलांना? पैसे किती घेते वर! आईंगं! चल बाबा आत चल या डासांचं काही खरं
नाही!
गोष्टं!
देवा! सोडव रे बाबा या गोष्टीतून!
खडखड खडखड असा आवाज येतो. अंकित उठू लागतो.
काय वाजलं आजी? काय वाजलं?
आजी हसते.
देवानं ऐकलं की काय?
पुन्हा खडखड.
देवाऽऽ
खडखड खडखड अंकितच्या काय ते लक्षात येतं. आजी भारावलेली.
देवा रे!
खडखडखडखड.
येडीये!
तसाच बसून रहातो. कडलेंच्या दाराबाहेर दिवा लागतो. कडले ग्रीलचा दरवाजा
उघडायच्या खटपटीत, मागे निमा. तिचा आवाज खडा.
अहो काय हे रितिक! साधं दार उघडता येऊ नये तुम्हाला? नावाचे रिकामजी
आहात रिकामजी!
कडले तरीही खडखड करत रहातात.
अहोऽऽ रितिकऽऽ-
काय निमू?
अन्नाडी आहात अन्नाडी!
आता काय झालं निमा?
अहो ग्रीलमधून हात घालून बघा ना बाहेर!
का- काय बघू?
माझं टाळकं!
ते तर इकडे आहे, या बाजूला!
निमा हातवारे करून ओरडायला लागते.
अहोऽ ग्रीलमधून हात घालून बाहेरची कडी काढा!
आयला! लक्षातच नाही आलं!
कशाला लावलीत बाहेरून कडी? 
मी-मी- मी कुठे लावली? 
मला कोण पळवून नेतंय?... आता काय होतंय?
विग अडकतोय ग्रीलमधे! कडले केविलवाणे झाले. निमा हातवारे करत ओरडू
लागते.
अहोऽ काढून हातात घ्या तोऽऽ
आयला रे! लक्षातच नाही आलं!
आता चला बाहेर!... अजून लक्षात येतंय की नाही?
आई गं! येतंय! येतंय! कडले बाहेर थेट उडी मारता.
माझ्याच लक्षात येत नाही मी कशाला लग्नं केलं!
पण कडी कुणी लावली?
तिरूपतीरावानी!
पण ते जाऊन तर दहा वर्षं झाली- माझे बाबा- ते कसे येतील?
भूत होऊन!
आयला! दोन दोन? घरात एक बाहेर एक?
काय म्हणालात?
नाही नाही काही नाही का- अरे शांताबाई! अशा काय बसला आहात आभाळाकडे
बघत? आले आले आलेऽ अंकुडीऽ अंकुडी- अंकुडी अंकुडी अंकुडी!
मागे व्हा मागे व्हा मागे व्हा!
कडले उड्या मारत मागे होतात.
आधी त्याना विचारा! बाहेरून कडी कुणी लावली?
अगं त्याना कसं माहित असणार?-
विचारा!
-बरं! बरं!
वळून जुळवाजुळव करत, लाचार हसत कडलेंचं सुरू होतं.
हऽहऽ शांताबाई! मी काय म्हणतो-
आजी- शांताबाई आधीच वैतागलेल्या. वर डासांचं आक्रमण चालूच.
अगं आई गं- मी काही वॉचमन नाही मी काही बघितलं नाही! 
अगं निमूऽऽ त्या म्हणतात-
अहोऽऽ त्याना विचाराऽऽ कोणतं भूत आलं होतं मग?
अंकित हसतो. निमा जळफळू लागते.
हा! हा! पोरटा! यानं लावली कडी!
शांताबाई वैतागलेल्या.       
एऽ पोरटा-बिरटा म्हणायचं काम नाही!
कडलेंचा सामोपचार सुरू होतो.
अगं असं काय करतेस? अंकुडी कसा लावेल? हात तरी पोचेल का त्याचा?
तुम्ही मला सांगा! चांगला पोचलेलाए तो!
शांताबाई उसळलेल्या.
एऽऽ तुझी पोरं- म्हणजे तुझ्या पाळणाघरातली पोरं काय कमी आहेत काय गं?
बोंबाबोंब काय! धडाधडा धावणं काय! रडणं काय!
माझ्या पोरांबद्दल बोलयचं काम नाही! तुमचा हा एकटा भारी आहे त्याना! पायात
पाय घालून त्याना कोण पाडतं? विचारा तुमच्या लाडक्याला! विचारा!
कडले अस्वस्थ.    
निमू जाऊ दे गं जाऊ दे! चल लवकर! ब्युटी पार्लर बंद व्हायचं नाहीतर!
शांताबाई चार्ज्ड झालेल्या.
काही विचारायला नकोय कुणाला! आख्या जगाला दिसतंय सगळं! मुलं सांभाळून
पैसे कमवायला लागलीस म्हणजे आभाळाला हात लागले काय गं?
पैसे कमवायला अक्कल लागते! असं नुसतं कट्टयावर बसून-
रिकामजीऽ
ओऽ
सांगून ठेव तुझ्या बायकोला! अक्कल काढतेय माझी!
रितिकऽ
ओऽगंऽ
पुन्हा बाहेरून कडी लावली तर परिणाम भयंकर होतील म्हणावं!
अगं जा ग! चल रे अंकित!
रितिक! फालतू वेळ नाहिये माझ्याकडे रिकामटेकडा!
ते तुझ्या या रिकामजीलाच सांग! रितिक म्हणे रितिक!
चला चला! बघून घेईन!
जाऊ दे गं निमू तू स्वत:ला-
तोपर्यंत निमा तरातरा निघून जाते, मागोमाग कडलेही. शांताबाई अजूनही
धुमसताएत.       
अगं जा गं जा! बघून घेईन म्हणे! पोटचं पोर नाही म्हणून माझ्या पोरावर दात
ठेऊन असते सारखी! चल रे!
पायरय़ा चढून फ्लॅटचं लॅच उघडतात. घरात येतात. पाठोपाठ रूबाबात चालणारा
अंकित. शांताबाई दार लाऊन घेतात.
काय रे तू लावलीस कडी?
हो!
तू पायात पाय घालून पाडतोस त्या मुलांना?
हो!ऽऽ
देवा रे!
आजी, आता काय वाजलं?
शांताबाई कपाळाला हात लावतात.
माझं नशीब! (क्रमश:)