romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Saturday, January 14, 2012

कॉमेडी शो: रिझर्वेशन!

शाहीर:   सोंगाडे सायेब ओ सोंगाडेसायेब अवं थांबा की वाईच!
सोंगाड्या: कश्यापाय थांबू?
शाहीर:   आवो आवो आसं आंगावर काय येताय?
सोंगाड्या: मंग काय करू?
               शाहीर:   आरं! आरं! काय झालंय काय मला सांगा! आवो संध्याकाळ झाली. दिस सरला. गुरं रानाकडनं घराकडं परतायला लागली –
सोंगाड्या: मला बी जाऊद्या
शाहीर:   काटी न घोंगडं घेटल्याबिगर जाऊद्या हा हा हा...
सोंगाड्या: (चिडवत) हॅ हॅ हॅ हॅ. शाईर तुमास्नी सांगतोय ही चेष्टा करायची येळ न्हाई!
शाहीर:   (हाताचा आंगठा वर करत) मग कस्ली येळ ह्ये?
सोंगाड्या: च्या मायला आता काय करू?
शाहीर:   थांब थांब थांब गड्या. वाईच निवांत हो. काय झालंय? कोन चचलं? का कुनी अपघातग्रस्त हाय का? कुनी आजारी हाय का माज्या सोन्या?
सोंगाड्या: (रडत) काय सांगू शाईर. मला रिजर्वेशन दिना हो कुनी!
शाहीर:   रिजर्वेशन? हातिच्या! आत्ता दिऊ की! काय म्हनून पायजी रिजर्वेशन? म्हंजी कुटल्या कॅटॅगरीत पायजी त्येवडं सांग! मी द्येतू रिजर्वेशन!
सोंगाड्या: म्हॅनॅ मॅ द्यॅतू! अवो काय द्येताय? सोपं हाय व्हय त्ये?
शाहीर:   आरं येकदम सोपाय. हा हा हा... आंदोलन करायचं. पब्लिकच्या मालमत्तेची लुस्कानी करायची. पत्रकारांच्या दरवाज्यावर डांबर ओतायचं. तुला सांगतो आग्दी म्येट्येकुटीला म्हन्त्यात बग – म्येट्ये –
सोंगाड्या: म्येटाकुटीला. काय शाईर तुमी आशुद बोलायलाय.
शाहीर:   आरं म्येट्ये का म्येटा कायतरी कुतीला- आपलं ह्ये कृतीला याचं- आन आरक्षन मिळवायचं म्हंजी मिळवायचंच. आरक्षन मिळवणं म्हंजी माजा जन्मसिद्द हाक्कं हाय आन त्यो मी –
सोंगाड्या: ओय. इस्टॉप. आगुदर ही गाडी थांबवा.
शाहीर:   आदी हात दाकवा. हात दाकवा –
सोंगाड्या: आन आवलक्षान करून घ्या-
शाहीर:   ये थोबाड फोडीन. हात दाकवा गाडी थांबवा.
सोंगाड्या: अव पर तुमची गाडी तर भरधाव पळायाच लाग्ली!
शाहीर:   आरं आरक्षन हा मुद्दाच तसाय बाबा. भल्याभल्यांची गाडी पळाय लाग्लीया. हाईस कुटं?
सोंगाड्या: शाईर मला माज्या फ्यामिलीला आरक्षन पायजी. पर ह्ये नव्हं.
शाहीर:   आरक्षन पायजी! ह्ये नव्हं! म्हंजी मी काय समाजलो न्हाई गड्या!
सोंगाड्या: मला उन्हाळ्याच्या रजंत बायकूपॉरास्नी आमच्या हीच्या म्हायेरी घिऊन जायाचं ह्ये. मला त्ये आरक्षन पायजी.
शाहीर:   आरं मग जा की! लाईनीत उबं राह्याचं. तिकीट काडायचं का सपलं!
सोंगाड्या: काय सपलं? सोपं हाय व्हय त्ये?
शाहीर:   जगात काय सोपं आस्तंय राव. म्हेनत! म्हेनत! ती करायाच लागती!
सोंगाड्या: तीच करून करून घ्येरी याला लाग्ली. आता घरी जायलाग्लोय.
शाहीर:   भ्येटलं रिजर्वेशन?
सोंगाड्या: भॅटलॅ? अव आसं भ्येटायला त्ये काय वरच्या आळीचं गंप्या हाय व्हय? सदानकदा आपलं चावडीवर पसारल्यालं.
शाहीर:   मग पॉईंटाचा मुद्दा काय ह्ये?
सोंगाड्या: तुमास्नी काय राव सरकारी कोट्यातून भ्येटत आस्तील तिकीटं. तुमी ये ग्रेड आर्टिश्ट. आमची तिच्या मारी ग्रेड कंदी ठर्नार कुनास ठाऊक!
शाहीर:   सोंगाडे! मुद्याचं बॉला!
सोंगाड्या: मुद्याचं काय ह्ये मुद्याचं? दिसभर लायनीत उबं
राह्यलो. मी ज्या लायनीत उभा राह्यलो त्या खिडकीवरचा बाबू म्हन्ला मी दीड वाजता म्हंजी दीड वाजता माजी खिडकी बंद करनार!
शाहीर:   लंच टाईम आसंल.
सोंगाड्या: अव लंचटाईमला खिडकी बंद आस्तानाच मी
जाऊन उभा राह्यलो. चाळीसावा.
शाहीर:   अव लवकर जायाचं. काम कुनाचं ह्ये?
सोंगाड्या: समदी कामं आपलीच की वो! ती करून जाऊन
उभा राह्यलो. चाळीसावा लंबर.
शाहीर:   मंग?
सोंगाड्या: मंग काय मंग? त्यो म्हने दीड म्हंजी दीडला-
शाहीर:   त्ये समाजलं. पर का?
सोंगाड्या: आमी समद्यानी इच्यारलं पर का? ह्येड बाबू म्हनला हिशोबासाटी बंद. बंद म्हंजी बंद! दुसरे खिडकीम्ये जाव!
शाहीर:   हिंदीत?
सोंगाड्या: दम द्याला हीच भाषा वापरतात समदी!
शाहीर:   दुसर्‍या खिडकीच्या सामनं किती मानसं?
सोंगाड्या: आनकी चाळीस पन्नास.
शाहीर:   अवं गप काय बस्लात! आंदोलन करायचं!
सोंगाड्या: कटाळलेत लोक शाईर कटाळलेत! घुसनारे
घुसले. आंदोलन करनारे भांडत बस्ले आनि लायनीला मुकले!
शाहीर:   आनी तुमी?
सोंगाड्या: रांगंच्या शेवटी जाऊन बस्ले. आमचा हिंसेवर इश्वास
न्हाई शाईर!
शाहीर:   मंग कश्यावर ह्ये?
सोंगाड्या: पेशनवर ह्ये शाईर प्येशनवर!
शाहीर:   म्हंजी वाट बघन्यावर!
सोंगाड्या: वाट लागस्तंवर वाट बघन्यावर!
शाहीर:   आसं म्हनू नगा सोंगाडे. अव मग दीड वाजल्यापास्नं आता ह्ये संद्याकाळपातुर काय क्येलंत?
सोंगाड्या: (दुर्वा उपटल्यासारख्या खुणा करत) लोक लायनीत
हुबं राहून करत्यात त्येच!
शाहीर:   अवं यापरीस मंग दुसरं काय तरी करायचं. येकादा एजंट गाठायचा. त्ये ई तिकीट का काय म्हन्त्यात त्ये काडायचं. अव मायंदाळ सोई हाईत हात जोडून!
सोंगाड्या: तुमास्नी हात जोडतो शाईर. आता तरी घरी
जाऊद्या.
शाहीर:   आरं पर त्या रिजर्वेशनचं काय झालं श्येवटी?
सोंगाड्या: टोकनं दिल्यात टोकनं उद्यासाटी. आता परत उद्या
भीक मागायची रिजर्वेशनसाटी!
शाहीर:   आर रा रा रा... काय रं ही सामान्यं मानसाची
आवस्था. सादं सुटीत गावाला सुकासुकी जाता यिनाऽऽ
सोंगाड्या: काय सांगू शाईर. काय तरी करा शाईर! तुमच्यासारक्या सरकारदरबारी वजन आसनार्‍या मानसानं कायतरी कराया पायजी!
शाहीर:   करतू मी . करतू मी. या आदीवेशनात मांडतू
मी. नायतर आसं करतो आमच्या निवडनूक जाहिरनाम्यात-
सोंगाड्या: त्यापरीस आसं करा माजं मानधनाचं पाकीट –
शाहीर:   (विंगेत हात उंचावून) आरं गनपा ये गनपा आरं तुजं काय जालं बाबा? तुजा काय प्राब्लम जालाय? आसं काय तुजं तोंड? (निघून जातात)
सोंगाड्या: (मागे धावत) शाईर! शाईर! माजं पाकीट! पाकीट! थूत तिच्या मारी! येकांद डाव त्ये रिजर्वेशन सहज भ्येटंल तिच्यामायला. पर गावाकडचं रिजर्वेशन आनि शाईरांकडनं पाकीट भ्येटनं म्हंजी-छ्या छ्या: च्या मारी... (कपाळ बडवून घेत उभा रहातो)  
        ह्याच प्रहसनाचं अभिवाचन ऐकण्यासाठी इथे टिचकी द्या!
Post a Comment