romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Wednesday, January 18, 2012

आमच्या मुलांना सांभाळाऽऽ (१)

निमामावशीच्या पाळणाघरासमोर लागलीए रांग. रांगेतले पुरूष वेगवेगळ्या वयाचे रंगेल, अपटूडेट पोषाखातले, केसांचे कोंबडे वगैरे काढलेले. निमामावशीच्या पाळणाघराचे लोखंडी ग्रील उघडून शिडशिडीत, उंच असे रिकामजी तिरूपती कडले बाहेर येतात. डोक्यावरच्या फॅशनेबल विगमुळे त्यांचं नक्की वय कळत नाहीए. तलवारकट मिशी आणि हातात रंगीबेरंगी वेष्टन असलेली वेताची छडी आहे.
“चला! चला! ऑफिस क्लोज्ड! आता आपली भेट उद्या सकाळी नऊ वाजता!”
हात जोडून दोन पाय एकमेकांना क्रॉस ठेऊन वाकतात.
“तो पर्यंत कळावे लोभ असावा ही विनंती!”
रांगेतल्या लोकांमधे कुजबुज सुरू होते.
“थांबा! थांबा!- म्हणजे तुमचं बोलणं थांबवा!”
जीभ चावतात आणि “ईऽऽक!” असा आवाज काढून उडी मारतात. कपाळावर हात ठेऊन न्याहाळतात.
“एवढी मोठी लांबलचक रांग! काय आहे काय आज?”
“ओ कडलेसाएब! निमाताईंना आणा ना बाहेर!” रांगेतला पहिला.
कडले पुन्हा उडी मारून वेताची छडी नाचवतात.
“एऽऽयऽऽ काय आणा? कुठे आणा? माझ्यासाठी आणलीये मी तिला! तुमच्या निमा’ताई’ला! हॅ हॅ हॅ हॅ.. पंधरा वर्षापूर्वी! तुम्ही निघायचं बघा! ऑफिस बंद झालं आता! किती वाजलेऽ हां! पाच वाजून पाच मिन्टं एकोणपाच- आपलं हे एकोणपन्नास सेकंद!-”
रांगेतला दुसरा आता पुढे झालाय.
“असं काय करता सायेब! दुपारी दोन वाजल्यापासून लाईनीत उभे आहोत आम्ही
आणि आता असेच कटवताय?”
कडलेंची सटकलीए. ते त्या माणसाजवळ जातात. त्याला न्याहाळतात.
“असेच म्हणजे? असेच म्हणजे? निमाताईंना भेटल्याशिवाय अं?.. मूल केवढं आहे
तुमचं?”
रांगेतला दुसरा लाजतो, “पाच.. सहा वर्षाची मुलगी आहे..”
कडलेंची आणखी सटकते.
“लाजताय? वयात आलेल्या मुलीसारखे?… आणि हे काय? हा फॅशनेबल शर्ट!
पार्क अवेन्यू!- अं? आणि ही चुण्या न पडणारी चकचकीत पॅंट? केसांचा हा कुठला
कट? चमकायला, शाईन मारायला येता काय इते? आंऽऽ- एऽऽ काय आहे? काय
आहे?”
रांगतेला तिसरा केव्हांपासून चुलबुळतोय. ’काय आहे?’ असं ऐकल्यावर तो पुढे
होतो. त्याचा आवाज चांगलाचा वरच्या पट्टीतला.
“ओऽऽ काय उद्येग न्हाईत काय आम्हास्नी?-”
“एऽऽ-” इति कडले.
“ओऽऽ जोकर!ऽऽ” तिसरा कडलेनी उगारलेली वेताची छडी पकडून धरतो,
“जो-जो-जोकर?” कडले वेताची छडी सोडवायच्या प्रयत्नात आहेत,
“अहोऽ सोडा! सोडा!... सोडा! सोडाना!...”
कडलेंचा आवाज आर्जवी झाल्यावर तिसरा छडी सोडून देतो आणि घाबरलेले कडले
धडपडून कसेबसे सावरतात.
“आदूगर बाईस्नी बोलवा!”
“त्याचं काय आहे घाटीसाहेब- आपलं हे घाटेसाहेब-”
“घाटे न्हाई धोटे! धोऽहोऽट्ये!ऽऽ”
“हं! धोटे!.. त्याचं काय आहे-”
“कऽऽहाऽऽय ह्ये?ऽऽ”
“अ-ब-ब-ब-अहो-अहो ऑफिस झालंय आता बंद! आता उद्या सकाळी उघडणार ते!
 तेव्हा-”
“मग काय उद्या सकाळी यू?” धोटे अंगावर येतात. मग रांगेतला पहिलाही पुन्हा
सरसावतो.
“अहो कडले, दोन दिवस झाले दांड्या होताएत ऑफिसला! आता पुन्हा उद्या?”
“आता उघडा!” इति दुसरा.
“काऽय?” व्हिलनीश कडले छडी नाचवत ओरडतात आणि स्वत:च दचकतात.
“अहो दार उघडा! आमचे अप्लिकेशन्स भरून घ्या-” इति दुसरा.
कडले आता संगीत संयोजकासारखी हवेत छडी हलवत नकारार्थी मान हलवताएत.
“नो! नो! अजिबात नो! आता टुमारो! टुमारो ऑल्वेज कम्स यार!”
आता धोटेंचा प्येशन संपलाय.
“येऽऽ चला रंऽऽ घुसूयाऽऽ हेऽऽऽ”
सगळे धावत जाऊन निमामावशीच्या पाळणाघराच्या लोखंडी ग्रीलशी झटू
लागलेत. कडले गर्भगळीत होत सैरावैरा नाचू लागलेत.
“एऽऽ ओऽऽ अरय़ेऽऽ अहोऽऽ माझं ऐकाऽ माझं ऐकाऽऽ मंडळी! मंडळी!.. बापरे!
आता माझ्या घराच्या दाराचं काय होणार? आतल्या माझ्या नवसानं लाभलेल्या
अतिसुंदर निमाचं काय होणार? आणि हे सगळे वळू आत घुसले तर?-”
कडले जोरात “अगं आई गं!ऽ” अशी आरोळी ठोकतात. छातीशी हात धरत खाली
पडतात.
“आईऽऽ आई गं!ऽ”
मग एक डोळा मिटून कानोसा घेतात. सगळे धावत त्यांच्या जवळ.
“आईऽऽ आईऽ मि-मित्रांनो माझं ऐका! आता काय मी फार दिवस जगत नाय!”
सगळे आनंदाने उड्या मारत एकमेकाला टाळ्या देतात, “होऽऽ”
कडले दचकून उठून बसलेत.
“नाही! एवढ्या लवकर काय मी जात नाय! तुमच्या खुषीचं कारण कळलंय मला!
जरा हात द्या! तु-तुम्ही नको! फार ओरडता तुम्ही! हां! तुम्ही- अगं आई गं! हात
जोडतो! माझ्या मित्रांनो उद्या सकाळी सात वाजता ऑफिस उघडतो!”
सगळे नाही! नाही! अशी ओरड करतात. कडले आपली छाती चेपताएत.
“अगं आई गं!.. अं.. तुमच्या निमाताईला बरं नाहिए आज!”
“काय झालंय? काय झालंय?” सगळे उत्साहाने आणखी जवळ आलेत.
“आई गं! भलतेच उत्साही दिसताएत हे! आई!ऽ नाही! तेवढं काही सिरियस
नाहिए!”
खिशातून कागदाची टोकन्स काढतात.
“मित्रांनो! माझ्यावर दया करा! ही टोकन्स घ्या नंबराची आणि उद्या या! प्लीज!”
धोटेच्या अक्षरश: पाया पडतात. उठून टोकन त्याच्या हातात कोंबतात.
धोटे दाराकडे बघतो, “शी:!”असा उद्‍गार काढतो, निघू लागतो. कडले एकेकाच्या
हातात टोकन्स कोंबताएत तसतसे जमलेले सगळे पाळीपाळीने दाराकडे वळून पहात
नर्वस होऊन निघू लागलेत. कडले रांगेत टोकन्स वाटत रांगेच्या बाजूबाजूने बरेच
पुढे आलेत.
“चोर साले! मुलांना पाळणाघरात ठेवायला येतात की पाळणाघरवालीला पहायला
येतात!- नाही! नाही तुम्हाला नाही!- हो! हो! येईल ना! उद्या येईल तुमचा नंबर! या!
या आता!- आशाळभूत साल्ये!- घ्या! घ्या!”
घाम पुसतात. कपाळावर हात ठेऊन रांग न्याहाळतात. त्याचवेळी घरातून
खणखणीत हाक ऐकू येते.
“रितिकऽऽ आवरलं का तुमचं?”
“हो! हो! आलो! आलो! झालं हं! -तुम्हाला नाही! मला! मला! रितिक नाम है मेरा!
रिकामजी तिरूपती कडले!”
घाम पुसत टोकन्स मोजताएत.
“घ्या! पंचाण्णव, शहाण्णव- अगं आई गं- नव्याण्णव-”
थकले भागलेले कडले टोकन वाटप संपवून घराच्या दरवाज्याकडे निघतात. ते
दरवाजा उघडून आत शिरून सेकंद दोन सेकंद झाले नाहीत तोवर अगदी शेजारच्या
फ्लॅटमधल्या जावडेकरांचा पाच-सात वर्षाचा अंकित शाळा सुटून धूम ठोकून पळत
पळत आलाय. आपल्या घरासमोरच्या पॅसेजमधल्या कट्ट्यापर्यंत येऊन तो दम
खात थांबतो. मागे वळून बघत हसतो.
“हऽहऽ.. आऽजीऽऽ हाऽहाऽएऽऽ आज्जडऽ येऽ लवकर येऽ”
आजीच्या चालण्याची नक्कल करतोय.
“चाललीए आपली डोलत डोलत! हा हाऽऽ हाऽ एऽ आज्येऽ”
लांबवरून येत असलेल्या आजीचा ’आल्ये रेऽऽ’ असा पतिसाद त्याला ऐकू आलाय.
अंकित हसत इकडे तिकडे पहातो. त्याचं लक्ष निमामावशीच्या पाळणाघराच्या
ग्रील्सच्या दरवाज्याच्या कडीकडे गेलंय. आजी अजून लांब आहे असं पाहून तो
पाळणाघराच्या आतला कानोसा घेतो आणि पटकन ती कडी बाहेरून लावून घेतो.
हसत हसत पुन्हा आपल्या घराच्या बंद दाराकडे येतो. अजून लांबच असलेल्या
आजीकडे बघत मोठमोठ्याने हसू लागतो, “होऽऽ आज्याऽहोऽऽ”        
(क्रमश:)           


No comments: