romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Thursday, January 12, 2012

स्कीट: बाटली आणि बाईसुद्धा!

बंडू आणि गुंडू अजूनही नववर्षाच्या जल्लोषात नेहेमीप्रमाणे फूल टाईट होऊन बारच्या बाहेर झुलत आहेत.बंडूला सॉलिड काहीतरी सांगायचंय पण गुंडू वाकून वाकून रस्त्यावरून जाणार्‍या व्यक्तींच्या चेहेर्‍याकडे, त्या उजवीकडून डावीकडे दिसेनाश्या होईपर्यंत आशाळभूतपणे बघतोय.

बंडू:   हाहाहाहा!(तोंडावरून हात फिरवत, डोळे स्थिर करण्याच्या प्रयत्नात) च्यामारी चांगला झाला सेशन!(ढेकर देतो) ए! ए! तू कुटे ग्येलास? ए! ए!
गुंडू:   (वाकूनच) छया! छया! छया छया छया!
बंडू:   अर्‍ये कुटे, काय, काय छया? (वाकून शोधत) अर्‍ये इथे आहेस तू? वाकून वाकून काय शोधतोयस असा? तुला दिसतंय? दिसतंय तुला आजुबाजूचं? (डोळे चकणे होताहेत) अर्‍ये मला तर, (आंगठा वर करून) तर्रर्र तर्रर्र काहीच दिसत नाय एकतर्रर्र झाल्यावर नायतर्रर्र तर्रर्र चार चार दिसतात च्यामारी! ए! तू खरा कुटला ए! पयला? ए! दुसरा? ए! खर्रर्र! हे आपलं तर्रर्र! ए यार बोअर करू नको यार!
गुंडू:   (कॉन्सन्ट्रेट करण्याच्या प्रयत्नात, तोंडावर बोट ठेवताना त्रास होतोय) शू:ऽऽऽ (नजर रस्त्यावरच्या व्यक्तींना फॉलो करतेच आहे)
बंडू:   (आपल्या बुडाशी बघत) ए! ए! हवा कोणी सोडली यार! ए! मी? ए! तू? (वैतागत) ए! शी: शी: यार! शी:ऽऽऽ तू यार हे काय लावलंएस आज?
गुंडू:   शू:ऽऽ (हाताचा आंगठा उंचावत) तू लावलंएस तेच! आपण आत्ता आतमधे सोबतच लावत बसलो होतो ना रे ए! थांब यार मला जरा कॉन्सन- कॉन्सन- ते हे-
बंडू:   तेच तेच म्हणतोय मी मगासपास्नं! तुला काय कॉन्सनशेश- कॉनशेश- कॉन छया: यार! (कंटाळून गुंडूची गचांडी धरत) च्या मारी! तू काय शोधतोएस मगासपास्नं? (त्याची नक्कल करत) अथ अथ करून? ते कॅलिडो कॅलिडो त्ये बांगडयांच्या काचा घालून फुटया- फुटयाच्या सुरनळी- सुरनळीत घालून लहानपणी फिरवायचो त्ये, रंगीत नक्षी बघायचो ना आपण कॅलिडो! कॅलिडो! शी: यार स्कोपच द्येत नाय! च्या मारी कॅलिडोस्कोप! आठवलं! एऽऽ
गुंडू:   एऽऽ शू: शू: थांब यार! शू: शू: ऽऽ
बंडू:   (करंगळी वर करत) तुज्या येऽऽ तू जाऊन नाय आला काय आत? शूशूशूशू कॅय? जाऊन ये तू!
गुंडू:   शू:ऽऽऽ
बंडू:   आता फार झालं ये फार्रर्र फार्रर्र (स्वत:शीच) नाय नाय यार! जरा डिप्लोमॅटिकली घेतलं पायजे हां हां यार! आख्खी आख्खी ही येवडी डिप्लोमॅट घश्यात खाली केलीय शी: (डोकं झटकत) तू साल्याऽ (वाकून गुंडू कुणाकुणावर नजर फिरवतोय ते बघून चकीत होत) बाब् बाब् बाब् बाब्! अर्‍ये ह्ये काय करतोएस तू?ऽऽऽ तू साल्या नजर ठेऊन राहतोएस? (सात्विक संतापाने बेभान होत) वाईट नजर! वाकडी नजर! या आयाबहिणींवर! आपल्या! तुझ्या माझ्या! अर्‍ये आदीच आपण बदनाम झालोय! ब्येवडे म्हणून! ब्येवडे! ब्येवडये म्हणतात लोक आपल्याला! बाटलीत बुडालेले आणि तू आता बाईच्याही मागे लागलाएस! शिव शिव शिव शिव! शांतम पापम! आणि पुढे काय? (जोरात गुंडूला धरून आपल्याकडे वळवत) एऽऽ तुला बोलतोय मी तुला! अर्‍ये हा आपला टॉवरवर उभा! दुर्बिण फिरवत! एऽ उभा र्‍हा! उभा र्‍हा आधी! असा! माझ्याकडे तोंड वळवून! असा नाय र्‍ये! असा माझ्या तोंडावर भपकारा सोडून नाय र्‍ये! असा! हां हां असा! तू ह्या- ह्या- (खूप प्रयत्न करून उजव्या नाकपुडीवर बोट टेकवत) ह्याच्याही मागे लागलास? बाईच्या? अर्‍ये-
गुंडू:   (भेसूर आवाजात रडत) मग काय करू दादा!ऽऽ
बंडू:   दादा? अर्‍ये! काय करू म्हणजे? काय करू म्हणे काय करू? अर्‍ये जिंकू किंवा मरूच्या लेवलला जाऊन ह्ये आसं दुर्बिण लाऊन बसतोएस? आपली काय लेवलबिवल आहे की नाय? का आपलं काहीही ऍवेलेबल आहे म्हणून फोकस लाऊन उभं र्‍हायचं? ह्ये असं? अर्‍ये तुला काय लाज, शरम, बेशरम! (चिडत) नामोहरम करून टाकीन तुला हरमखोर!- हे आपलं- हरामखोर!
गुंडू:   (डोळे पुसत) काय करू र्‍ये मी! मी काय करू?
बंडू:   पर्रर्रत त्येच! आर्‍ये लाज वाटते र्‍ये मला तुझी! लाज! आपल्या जातीला- ब्येवडयांच्या- कलंक आहेस तू कलंक! अगदी कळकट कलंक! शी:
गुंडू:   (ओक्साबोक्शी रडत) मला कळतं र्‍ये दादा! मला कळतं
बंडू:   (दोन्ही हातांनी जोरात स्टेअरिंग व्हील फिरवल्यासारखं करून तोल सावरत) मग वळव! वळव स्वत:ला! तसं नव्ह्ये र्‍ये बाबा माज्या सोन्या तसं नव्ह्ये उजवीकडून डावीकडे हा असा फोकस धरून नव्ह्ये! च्य्! च्यक्! च्यक्! (कपाळाला हात लावत) कसं सांगू तुला यार! (पटकन उडी मारत) कसं काढू तुला या चिखलातून बाह्येर! कसं काढू! की (हात उंचावत) येकच काढू तुज्या कानाखाली? गणपती? संताप! संताप होतो र्‍ये मला! संताप! तुज्या असल्या करणीमुळे! अर्‍ये लोक काय म्हणतील मला? येवडं माजं स्टेट-स्टेट-स्टेटस आहे! (मागच्या बाजूला हात करत) आतमधे! तो वेटर काय म्हणेल? तो चकणा आणणारा काय म्हणेल? तो बेचेनवाला काय म्हणेल? आईस आणणारा काय म्हणेल? ढूस झालो फूल टू की ग्लासात पाणी ओतणारा आणि ग्लास तोंडाजवळ आणून आपल्याला पाजणारा तो काय म्हणेल? अर्‍ये येवडंच काय बाह्येर- बाह्येर- तो (घडयाळात बघण्याचा प्रयत्न करत) आत्ता आत्तापर्यंत उघडा असणारा, मावा, शिग्रेट द्येणारा तो लोंढयांबरोबर आलेला परप्रांतीय काय म्हणेल? तो गल्ल्यावरचा आण्णा काय म्हणेल? (हळू आवाजात) बिल भरलंयस न तू आत्ताचं? (गुंडू रडत रडत मान डोलावतो) तू यार काळीमा फासलास यार! आपल्या ब्येवडयांच्या जातीला! छया!
गुंडू:   दादू!
बंडू:   (उचकी देत) दादू?
गुंडू:   मला माप कर यार! माप कर! पण मला सुदरत नाय यार! गल्ली, मार्ग, रस्ता, वे, हाय वे, एक्सप्रेस वे काय काय काय पण सापडत नाय यार!
बंडू:   म्हणून सागरी सेतू शोधलास तू? हा! (वाकून कुतर्‍यासारखी जीभ बाहेर काढून हलवत, उजवीकडून डावीकडे नजर फिरवून गुंडूची नक्कल करत) अर्‍येऽ टोल द्यावा लागेल! टोल! टोलवाटोलव करशील तू तेव्हा? असं तुला वाटतं? अर्‍ये आसं रस्त्यावरच्या प्रत्येक बाईवरनं नजर फिरवत तिचा मागोवा घेत उभं र्‍हाणं बेकायदेशीर आहे! गुन्हा आहे तो गुन्हा! आत टाकतील तुला! वर फटके द्येतील!
गुंडू:   (रडत भेकत) अर्‍ये मला माहित का नाही दाद्या!ऽ
बंडू:   म्हंजे? माहित का नाही म्हंजे? माहित आहे का नाही? नसेल तर का नाही आणि असेल तर- द्येऊ काय तुज्या आता येक थोतरीत ठयेऊन! द्येऊ?
गुंडू:   (ओक्साबोक्शी रडत) माहितीये र्‍ये मला ह्ये सगळं मलामाहित्येय
बंडू:   (प्रचंड चकीत होऊन डोळे गरागरा फिरवत) माहित्येय? तुला माहित्येय? आणि तरीही? छया छया छया आआक् थू थू थू! अर्‍येऽ छी थू होईल र्‍ये तुझी थू!ऽऽ थू थू थूत् तुझ्या जिनगानीवर! मला येक सांग (खांद्यावर हात ठेवत) शायनी व्हायचंय तुला? शायनी? आं? पोलिस तर फोडतीलंच, आतमधे ते ढुपर असतात ना! हाप मर्डर, फूल मर्डर, गेम वाजवलेले, अतिरेकी, दहशतवादी! ते पण फोडतील!
गुंडू:   होर्‍ये!
बंडू:   (पुन्हा डोळे गरागरा फिरवत) होर्‍ये?
गुंडू:   होर्‍ये म्हणजे माहिती आहे र्‍ये! पण नाय र्‍ये! पण मला कंट्रोल नाय करता येत र्‍ये स्वत:ला!
बंडू:   (पुन्हा प्रचंड चकीत होऊन डोळे गरागरा फिरवत) कंट्रोल करता नाय येत? नाय येत? ब्येवडयांच्या जातीला डांबर फासलंस र्‍ये डांबर! ब्येवडा असून कंट्रोल नाय? मी बघ! (तोल जातो, घश्यात उलटी येऊ लागते) ऑऽ- आहे की नाय कंट्रोल! आहे की नाय घट्टं उभा! स्वत:च्या पायावर! आणि तू हे काय चालवलंयस! फ्रस्ट्रे- फ्रस्टे्र- फ्रस्ट्रे-
गुंडू:   स्टेशन!
बंडू:   आलं? स्टेशन आलं? च्यक्! अर्‍ये अजून लोकलमधे बसलो पण नाय 
              आपण छया! शीट यार!
गुंडू:   सहन होत नाय आणि सांगता पण येत नाय यार मला! 
              (बंडूच्या खांद्यावर डोकं ठेऊन रडू लागतो)
बंडू:   (डोळे पुन्हा मोठे आणि चकणे होतात) बाब् बाब् बाब् बाब्! म्हणजे येवडी प्रगती क्येलीस तू या क्षेत्रात? मला न विचारता? ए बाजूला हो! बाजूला हो! सहन होत नाय, सांगता येत नाय म्हंज्ये तुला येडस् झालाय ए येडस्! (बंडू गुंडूला एकसारखा झिडकारू लागतो आणि त्यामुळे गुंडू आणखी भावनाविवश होऊन बंडूला बिलगू लागतो) आर्‍ये हाड! हाड! हाड! हाड! (गुंडू भडक साऊथ इंडियन सिनेमातल्यासारखा साऊथ इंडियन भाषेत आतडं पिळवटून रडू लागतो तो रडताना काय बोलतोय हे न कळून बंडू आणखी हैराण आणखी वैतागलेला) अर्‍ये मर्‍हाटीत मर्‍हाटीत बोल! मर्‍हाटीत बोल नायतर मी मनसे- आयशप्पत मनसे फोडीन तुला!ऽऽ
गुंडू:   (फायनली मर्‍हाटीत रडत) तुला काय वाटलं रे ए ए ए! मी येणार्‍या जाणार्‍या बायकांना त्यानजरेने बघतोय येवडं कॉन्सन्- कॉन्सन्-
बंडू:   स्टेशन!-
गुंडू:   आलं? लोकलमधे बसल्याशिवाय? तू कन्फ्यूज करून माजा फ्यूज उडवू नको ए! मी त्या नजरेने बघतो असं वाटलं तुला? तुला? ए राम आणि श्याम, चंगू आणि मंगू, बंडू आणि गुंडू अशी आपली नामचीन जोडी असूनसुध्दा? तुला आसं वाटलं?
बंडू:   येऽऽऽ मेलोड्रामा बंद कर तुझा! डेलिसोपमधेसुध्दा बरं रडतात, भेकतात र्‍ये याच्यापेक्षा! म मला सांऽग! भर रात्री, असा फोकस लाऊन, भर रस्त्यात तू कुठल्या नजरेने बघत होतास तुज्या आय- तुज्या आया भयणींकडेऽऽऽ
गुंडू:   त्येच ना त्येच ना! तुला काय माहित माझं दु:ख काय आहे तेऽऽ
बंडू:   ओक र्‍ये माझ्या बाबा ओक आता काय त्ये!
गुंडू:   मला शायनी म्हणालास तू शायनी
बंडू:   मग काय बाबा रामद्येव म्हणू?
गुंडू:   र्‍येऽ बाबाऽ रामाऽ द्येवाऽ येक बाई टिकत नाय रे घरात कामवालीऽऽ
बंडू:   अर्‍ये ह्ये तर शायनीपेक्षा खतरनाक झालंऽऽ
गुंडू:   तू शायनी मारायच्या बंद कर यार! माझं ऐक! किती कामवाल्या बायका लागतात घरी! येक जेवण बनवायला, येक वॉशिंग करायला! येक भांडी घासायला! येक पोराला आंघोळ घालायला, एक आंघोळ झाल्यावर पुसायला, एक पुसून झाल्यावर त्याला भरवायला-
बंडू:   म तुझी आई आणि तुझी बायको काय करतात
घरात बसून?
गुंडू:   भांडतात र्‍ये भांडतात त्या! आईला ही बाई नको, बायकोला तीच पायजे! बायकोला दुसरी नको तर आईला तीच पायजे! र्‍येऽ ह्ये सगळं आता आईच्या मावस चुलती पर्यंत आणि बायकोच्या चुलत मामे खापरपणजीपर्यंत गेलंय! ह्या सगळया मिळून फुल्या मारतात र्‍ये मी कष्टाने शोधून आणलेल्या कामवाल्या बायकांवर!
बंडू:   बाब् बाब् बाब् बाब्! असा प्रॉब्लेम आहे काय तुझा?
गुंडू:   तुला बरंय र्‍ये तुझं सगळं गावाला पाठवून तू मोकळा! मी काय करू? कुठून शोधून आणू सकाळसंध्याकाळ नवीन नवीन कामवाली बाई? म्हणून फोकस लाऊन उभा होतो! अर्‍ये शायनीचं आणि माझं वेगळं आहे र्‍ये
बंडू:   आं? म्हंज्ये?ऽऽ
गुंडू:   तसं नाय यार! समजून घ्ये तू तरी! समजून घ्ये!
बंडू:   उगी उगी उगी! उपाय आहे आपल्याकडे! चल्! परत आत चल्! आणखी दोनचार टाकू घश्यात! चल्! 
गुंडू:   (डोळे पुसत) चल्!
      (दोघेही पुन्हा बारच्या दरवाज्याकडे जातात.) 
          

No comments: