romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Monday, November 12, 2012

आमच्या मुलांना सांभाळा! (१८)

इथे वाचा भाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५, भाग ६, भाग ७, भाग ८,  भाग ९, भाग १०, भाग ११,   भाग १२भाग १३, भाग १४, भाग १५, भाग १६, भाग १७ आणि त्यानंतर... 
डोअरबेलच्या आवाजाने अंकितच्या टीव्ही बघण्यात व्यत्यय आलाय. तो जोरात ओरडतो.
"ममाऽ ममाऽ कचरेवाला! ममाऽ उघऽऽड!"
"आले रे आलेऽ कोण मेलं आता आलंय तडमडायलाऽ... आलेऽ आलेऽऽ..."
गौरी धावत पळत आतून येते. दार उघडते. दारात भैय्या. त्याला बघून ती चिडते.
"आओऽ आओऽ सब कचराही जमा हो गया हैऽ इदरऽ... लेके जाओऽऽ... सब कचराऽ हम कचराऽ हमारा नसीब कचराऽऽऽ-
"सुना- सुना हो- बहनीयां- सुना- हम कचरावाला नाही-"
"भैय्या आहेस ना?"
"हां... वह तो हम हुं..."
"मग? अरे हम काय? हुं काय? इथे आम्हाला भरलाय दम- हुं की चू काही करता येत नाही! आणि तू?... ज्याव रे बाबा आगे ज्याव!"
"बहनीयां... सुना हो- हम फोनवा करन रहिन- फोनवा-"
"अरे कसला फोनवा! फोनवा!- फोनवा? अं? म्हंज्ये फोन?"
"हां मैय्या... हम ऊही बालन लालन पालन संघ-"
"तुम भैय्या अऊर मैं मैय्या काय? लालन पालन?- वर बालन?- हां हां हां- आव अंदर आव- आव यार आव!- ये ये देखो क्या किया तुमारी वो मंजू टी ने-"
"टी मंजू-"
"अरे पुढे काय मागे काय टी च आहे नं? टीनपाट! एक मिनिट! म्येरे अवनीको ज्यरा पालनेमें रकती- हूं- हं... आव- अबी बेडरूममें आव- आव कोई नई है आव- ये- ये बेडरूममे तुमारा मंजू टी घुसा! ये- ये- ऐसा कपाट खोला-"
गौरीने भैय्याला ओढत घरात आणलंय. बेडरूममधे नेलंय. ती त्याला बेडरूममधलं कपाट उघडून दाखवतेय. भैय्या सगळं घर बारकाईने न्याहाळतोय. गौरी आता कपाटातली कॅश काढून दाखवतेय.
"ये- ये- ऐसा पैसा लिया- हमारे आदमी कोऽ क्या कुच पिलाके सुलाया- ये- ये इदर- और ओ- ओ भाग गई- गया-"
धावत धावत स्वत:च बेडरूमपासून हॉलपर्यंत जाते. दारापर्यंत. भैय्या तिच्यामागे.
"और क्या आश्चर्यऽ- गया गया वो गयाच- अरेऽऽ आदमी था ओ औरतके भेसमे... वो अच्चा हुआ... हमारा कडलेकाका करके है एक! है अच्चा है! बुढ्ढा है, अच्चा है! उसके वास्ते पैसा वापस मिलाऽऽ... मैं हात जोडती हूं... बस हमको अभी कुच नही चाहिएऽऽ"
त्या स्टोरीने भैय्या भावनाविवश होत खांद्यावरच्या पंच्याने डोळे पुसतोय.
"आपका... आपका गलतफहमी हुई गवा बहनीयां-"
"अरेऽऽऽ- वर हमकाच गलतफेहेमी?-"
भैय्या हात जोडतो.
"माफी करा हो मैय्या... हमार ऊहां टी मंजू कौनो ना रही-"
"ऑं?... म्हणजे रे- अरेऽऽ- म्हणजे ती भामटी- ठग-"
भैय्या आता तिला लोटांगणच घालतो.
"हमका माफी दै दो- मैय्या-"
"अरे ये- ये- क्या-"
भैय्या डोळे गाळत उठून उभा रहातो. हात जोडून.
"हमार नामपर उई ससुराईन मंजी धोखा दई गई आप लोगन को- लेकीन अब हम इहां कसम खाई रहिन माई... आपक सामने खडा रहिके के हम आपक बच्चनको पाली, पोसी, बडा करी-"
"म्हणजे नक्की काय करणार रे भैया?"
"हम संभालेगा बच्चोंकों!"
गौरी त्याला आपादमस्तक न्याहाळते, "तुम?"
भैय्या पुढे होतो, गौरी दोन पावलं मागे.
"हमार बहनीयांक खातिर हम जान भी दूं- ताऊजी कहां रहिन?"
"कोऽऽण ताऊजी?ऽऽ काय रे तुमची ही चिऊ काऊची भाषा?"
"चिऊ काऊ नाही! ताऊ- आपके हजबेंड!"
गौरी किचनकडे बघत रहाते...
"ओ- ओ- आई गं झोपला की काय हा बाथरूममधे?ऽऽ... महेऽऽश अरे ए-"
किचनच्या दाराजवळ ती पोचते न पोचते तोपर्यंत आतून महेश बाहेर येतो. केस पुसत. पूर्णपणे नॉर्मल. अगदी नॉर्मल असल्यासारखा तो फिसकारतो.
"काऽऽय आहे?ऽऽ"
"अरे- हा भैय्या-"
"कोणाचा?ऽऽ"
"अरे लालन पालन बालन संघाचा-"
महेश फिसकारत त्याच्याकडे बघतो. केस विंचरत दरडावतो.
"नाम क्या तुमारा?ऽ"
"श- श- शटल बिहारी-"
"अर्‍ये कोण बिहारी?ऽऽऽ"
"शटल बिहारी यादव! हमार परदादा अवध बिहारी बिहारवा से पहला शटल पकडभैके आवन रहिन ईहां... हमार नाम रख्खा-"
"शटल बिहारी?ऽऽ"
"यादव- हमार उपनाम!"
महेश त्याला न्याहाळू लागतो.
"दोन दोन नावं कायर्‍येऽऽ"
"नाही रे महेश एक नाव आणि दुसरं आडनाव-"
"माहितीए ते मला..."
एकदम भैय्याच्या अंगावर जातो.
"वोऽऽ टी मंजू मिली- मिला न मुझे तो मैं उसका खून पी डालूंगाऽ-"
"ऊ नाही मिली तो हमार पिजिए ताऊजी- हम आपक पांव पकडी- आपस बिनती करी- हात जोडी- माफी मांगी- ताऊजीऽऽऽ लेकीन आप हमका आपक चरनोंपर जगहा देई!ऽऽ"
"गौरी!... बघितलंस! कसे पाय पकडून पकडून मोठे होतात!- यानं माझे पाय खेचायच्या आत सांग याचं काय करायचं!" 
"अम्म्म... थोडे दिवस बघूया- नाहीतरी ती शेजारची पाळणाघरवाली निमडी जास्तच तोरा दाखवतेय- बरा दिसतोय- मैय्या म्हणाला मला-"
महेश गुरकावतो, "चांगलं चाललंय तुमचं... तो भैय्या तू मैय्या-"
गौरी खूष होते, "तेच म्हणाले मी- भैय्या! आप रह जाव कामपर- काम का क्या क्या है-"
"ऊ हम सब जानत रहीन जावडेकराईन... हमार काम पक्का ताऊ?"
महेश रूबाबात बेडरूमकडे निघालाय, "हांऽ-"
"अरे महेऽऽश... तू कुठे चाललास परत?"
"जातो मी- झोप पुरी व्हायचीय माझी- नाहीतर होईल परत माझा रोबो-"
"अरे-"
महेश चवताळतो, "च्याआयलाऽऽ रात्रपाळी, दिवसपाळी सारखी सारखी! झोप कधी पुरी करू?ऽऽ"
बेडरूममधे जातो. बेडवर अंग टाकतो. भैय्या इकडे तिकडे बघत हॉलमधेच. अंकित त्याला न्याहाळतोय आणि भैय्या त्याची नजर चुकवतोय. अंकित तोंडात अंगठा घालून त्याला जास्त जास्तच न्याहाळू लागलाय.
"ममा... याचा चेहेरा कुठेतरी पाह्यलाय ममा... ममाऽ-"
"तू गप रे- हां भैय्याजी! कलसे मैं कामपर जाऊंगी आप-"
भैय्याचं लक्ष अंकीतकडे. अंकित त्याचा पीछा सोडत नाही. भैय्या हैराण. तो गडबडीने खिशात हात घालतो.
"ऊ सब हम जानत रहिन मैय्याजीऽऽ... इ- इ रहा परशाद... हमार भौजाई गंगा ईस्नान कर आई... ऊ लडवा लाई आप लोगन के वास्ते... आ लई लो मैय्या... गंगामईया तोहरी पिहरी चढईबे... लो बिटवा लो... लो मईया.. ताऊजी- उनक डिसटरब ना करी मैय्या... उनका सोवन दो... आप लो मईय्या..."
भैय्या गौरी आणि अंकितच्या हातात एक एक प्रसादाचा लाडू ठेवतो. गौरी लाडू हातात घेऊन मनोभावे डोळे मिटते.
"असं का... अरे वा.. जय गंगा मैय्याऽऽ"
अंकित, गौरी पटापटा लाडू खातात. भैय्या पटकन किचनमधे घुसून पाणी आणतो, दोघांना देतो, टक लाऊन दोघांकडे बघत रहातो. दोघेही हळूहळू सुस्तावू लागलेत. ते सोफ्यावर रेलतात. भैय्या चपळाईने त्याना बसायला मदत करतो. ते बसतात आणि सोफ्याच्या काठांवर माना टाकतात. भैय्या पुन्हा त्याना न्याहाळतो. स्वत:वरच खूष होतो. बेडरूमकडे वळतो. बेडरूममधे येतो आणि झोपलेल्या महेशचा कानोसा घेतो. गौरीने मघाशी उघडून दाखवलेलं तेच पैशाचं कपाट उघडतो. पैशांची बंडलं, दागिने, कॅमेरा, मोबाईल असं मिळेल ते खिशात, धोतरात, पंच्यात खुपसतो. सावकाश कानोसा घेत हॉलमधे येतो. तिथल्या जमतील त्या वस्तू जमेल तिथे कोंबत विसावलेल्या अंकित, गौरीकडे बघत, सराईतपणे दाराबाहेर पडतो. बाहेर येऊन दबकत उजव्या बाजूला वळून धूम ठोकणार इतक्यात- मागून त्याच्या पाठीवर, त्याच्या मागावर दबा धरून बसलेले कडले झेप घेतात. कडलेनी भैय्याला पकडून धरून अगदी ज्याम करून टाकलंय...  ( शेवटचा भाग लवकरच...) 
       वाचक मित्रमैत्रिणींनो आपणा सगळ्यांना                       दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

Thursday, November 1, 2012

आमच्या मुलांना सांभाळा! (१७)

इथे वाचा भाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५, भाग ६, भाग ७, भाग ८,  भाग ९, भाग १०, भाग ११,   भाग १२भाग १३, भाग १४, भाग १५, भाग १६ आणि त्यानंतर...
जावडेकरांच्या घरात अवनी जोरजोरात रडतेय. गौरी बेफाम रडणार्‍या अवनीला थापटून झोपवतेय. अंकित हातात एक खेळण्यातली कार घेऊन तोंडाने घर्रऽऽ असा असह्य होणारा आवाज काढत सगळ्या घरभर धावतोय. महेश बेडवर पालथा झोपलेला. ढाराढूर. गौरी अत्यंत गांजलेली आहे.
"चूप गं बये अवनी आताऽऽ किती रडशीलऽ चूप!... येऽ कारट्याऽऽ... अंकिऽऽतऽ अरे बस एका जागीऽऽ आणि आधी ते तोंड बंद कर! बंद कर रे-"
"मीऽऽऽ चूऽऽपऽऽ हेहेहेहेऽऽ हऽअऽहऽ... घर्रर्रऽऽऽ..."
"कारट्याऽऽऽ ऐकेल तर शपत!.. येऽ अगं ए बाई- चूप गं चूप! काय करू काय आता तुलाऽ- ए महेशऽऽऽ एऽऽऽ- काय माणूस आहे- अरे ऊठ रे ऊऽऽठऽऽ... चार दिवस झाले झोपलाएस-"
महेश ऊंऽऽऽ असा आवाज काढून फक्त कूस बदलतो.
"अरे काय रे हे?... अरे काय करू मी एकटी? आय आय गं! ही दोघं बघ! तू असा झोपलेला- कूस बदलतोएस म्हणून म्हणायचं जिवंत आहेस! अरेऽऽ काय प्यालास काय तूऽऽ... हे काय झोपणं तुझं? चार दिवस-रात्र? रात्रंदिवस?
"ऊंऽऽऽ... मैं... कहां हूं..."
"मसणात! अरे डायरेक्ट पिच्च्यरमधे कुठे जातोस तू? तीऽऽ मंजू टी चोरटी निघालीऽ पळाली पैसे घेऊऽऽनऽ तुला काहीतरी पाजूनऽऽ... ती ती नव्हतीच, तो होता म्हणे तो!- तसा डाऊट खाल्लाच होता मी! अरे शेजारचे कडलेकाका होते म्हणून निभावलं बाबा- अरे ऊठ! ऊठ बाबा लवकर! चार दिवस जेवण नाही खाण नाही- काय रे हे- चल चल बस झालं आता- ऑफिसला चार दिवस माझी दांडी- बस झालं बाबा- पोरांना देऊन टाकू शेजारी- पाळणाघरात- त्या निमाच्या- मिटवून टाकू भांडण- पडू पाया- सांभाळा आमच्या मुलांना म्हणावं-"
महेश पुन्हा उपडा, झोपलेलाच, ऊंऽऽऽ करतो. गौरी आणखी वैतागलेली. अवनीचं रडणं, अंकितचं घर्रर्र चालूच.
"ऊठ रे ऊठ बाबाऽऽ... कंटाळले रे बाबा मी- काय करू एकटीऽ- वाजला वाजला मेला फोन- हॅ- हॅ- लोऽ कोण? कोन?- ये देखो बार बार फोन मत करो तुम इदर- तुम तुम समझताय क्या- हां हां तुमारा वहीच बालन लालन पालन संघ- हां- क्या किया वो मंजू टी ने?- नई नई हम क्यूं जायगा पोलिसमें? क्यूं जायगा? म- म- मंगताय तो तुम जाव- हमको क्यूं जबरदस्ती? ऑं? ऑं? क्या? क्या बोल्ताय? न- नई- नई- नई! इदर और किसीको अजिबात मत भेजो!- ह-हमारा हमार पैसा मिल गया हमको सब बाबा- हां हां भरून पावा- हमको सबकुच! और- और तुम सुनो- सुनो- सुनो- इदर फोन भी मत करना- वरना- वरना फोन परसेही तुम्हारा तंगडी तोड डालेगा हमारा आदमी- अभी सोया है वो- उठता नई- लेकीन वो- वो- तोडेंगा- गुस्सा आयेगा तो- उसके मनमें आयेगा तो- खाना खाया होगा उसने तो- ~ऒं- ऑं- ठ्येवला मेल्यांनीऽऽ... ऊठ रे! ऊठ! चल चल चल मी मदत करते तू- अरे आणखी किती वाकू?ऽऽऽ कडेवर अवनी आहे माझ्या बाबाऽऽऽ... हं हं जमतय तुला! अरे बाथरूमला उठत होतास तू चार दिवस! तसंच! हां! हां! चल आत! आंघोळच करून घे चल!... ए अंकिऽऽत- चल बंद कर- बंद कर आवाज- अरे आपल्या पप्पाला त्रास होतोय बाबाऽऽ उठत नाहिए तो चार दिवस माहिती नाहिए काऽऽ- अरे आता उठलाय बाबा पण तू आवाज बंद कर आधी- बंद कर!- चल- चल- चल महेश!"
अंकितचं घर्रर्र घर्रर्र आणखी चेकाळून चालू. महेश गौरीच्या खांद्यावर हात ठेवून आंधळ्या भिकार्‍यासारखा आत जातो. अंकित धावून धावून दमलाय. तो फतकल मारतो, टीव्ही ऑन करतो...
त्याचवेळी बाहेर सहनिवासाच्या आवारात एक भैय्या दमदार पावलं टाकत दाखल झालाय. भरघोस पांढर्‍या मिश्या, भरघोस सरळ पांढरे केस डोक्यावर. मळका धोतर-कुर्ता. खांद्यावर गमछा. येतो तो सरळ जावडेकरांची डोअरबेल वाजवतो. पुन्हा पुन्हा वाजवू लागतो... (क्रमश:)