romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Thursday, November 1, 2012

आमच्या मुलांना सांभाळा! (१७)

इथे वाचा भाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५, भाग ६, भाग ७, भाग ८,  भाग ९, भाग १०, भाग ११,   भाग १२भाग १३, भाग १४, भाग १५, भाग १६ आणि त्यानंतर...
जावडेकरांच्या घरात अवनी जोरजोरात रडतेय. गौरी बेफाम रडणार्‍या अवनीला थापटून झोपवतेय. अंकित हातात एक खेळण्यातली कार घेऊन तोंडाने घर्रऽऽ असा असह्य होणारा आवाज काढत सगळ्या घरभर धावतोय. महेश बेडवर पालथा झोपलेला. ढाराढूर. गौरी अत्यंत गांजलेली आहे.
"चूप गं बये अवनी आताऽऽ किती रडशीलऽ चूप!... येऽ कारट्याऽऽ... अंकिऽऽतऽ अरे बस एका जागीऽऽ आणि आधी ते तोंड बंद कर! बंद कर रे-"
"मीऽऽऽ चूऽऽपऽऽ हेहेहेहेऽऽ हऽअऽहऽ... घर्रर्रऽऽऽ..."
"कारट्याऽऽऽ ऐकेल तर शपत!.. येऽ अगं ए बाई- चूप गं चूप! काय करू काय आता तुलाऽ- ए महेशऽऽऽ एऽऽऽ- काय माणूस आहे- अरे ऊठ रे ऊऽऽठऽऽ... चार दिवस झाले झोपलाएस-"
महेश ऊंऽऽऽ असा आवाज काढून फक्त कूस बदलतो.
"अरे काय रे हे?... अरे काय करू मी एकटी? आय आय गं! ही दोघं बघ! तू असा झोपलेला- कूस बदलतोएस म्हणून म्हणायचं जिवंत आहेस! अरेऽऽ काय प्यालास काय तूऽऽ... हे काय झोपणं तुझं? चार दिवस-रात्र? रात्रंदिवस?
"ऊंऽऽऽ... मैं... कहां हूं..."
"मसणात! अरे डायरेक्ट पिच्च्यरमधे कुठे जातोस तू? तीऽऽ मंजू टी चोरटी निघालीऽ पळाली पैसे घेऊऽऽनऽ तुला काहीतरी पाजूनऽऽ... ती ती नव्हतीच, तो होता म्हणे तो!- तसा डाऊट खाल्लाच होता मी! अरे शेजारचे कडलेकाका होते म्हणून निभावलं बाबा- अरे ऊठ! ऊठ बाबा लवकर! चार दिवस जेवण नाही खाण नाही- काय रे हे- चल चल बस झालं आता- ऑफिसला चार दिवस माझी दांडी- बस झालं बाबा- पोरांना देऊन टाकू शेजारी- पाळणाघरात- त्या निमाच्या- मिटवून टाकू भांडण- पडू पाया- सांभाळा आमच्या मुलांना म्हणावं-"
महेश पुन्हा उपडा, झोपलेलाच, ऊंऽऽऽ करतो. गौरी आणखी वैतागलेली. अवनीचं रडणं, अंकितचं घर्रर्र चालूच.
"ऊठ रे ऊठ बाबाऽऽ... कंटाळले रे बाबा मी- काय करू एकटीऽ- वाजला वाजला मेला फोन- हॅ- हॅ- लोऽ कोण? कोन?- ये देखो बार बार फोन मत करो तुम इदर- तुम तुम समझताय क्या- हां हां तुमारा वहीच बालन लालन पालन संघ- हां- क्या किया वो मंजू टी ने?- नई नई हम क्यूं जायगा पोलिसमें? क्यूं जायगा? म- म- मंगताय तो तुम जाव- हमको क्यूं जबरदस्ती? ऑं? ऑं? क्या? क्या बोल्ताय? न- नई- नई- नई! इदर और किसीको अजिबात मत भेजो!- ह-हमारा हमार पैसा मिल गया हमको सब बाबा- हां हां भरून पावा- हमको सबकुच! और- और तुम सुनो- सुनो- सुनो- इदर फोन भी मत करना- वरना- वरना फोन परसेही तुम्हारा तंगडी तोड डालेगा हमारा आदमी- अभी सोया है वो- उठता नई- लेकीन वो- वो- तोडेंगा- गुस्सा आयेगा तो- उसके मनमें आयेगा तो- खाना खाया होगा उसने तो- ~ऒं- ऑं- ठ्येवला मेल्यांनीऽऽ... ऊठ रे! ऊठ! चल चल चल मी मदत करते तू- अरे आणखी किती वाकू?ऽऽऽ कडेवर अवनी आहे माझ्या बाबाऽऽऽ... हं हं जमतय तुला! अरे बाथरूमला उठत होतास तू चार दिवस! तसंच! हां! हां! चल आत! आंघोळच करून घे चल!... ए अंकिऽऽत- चल बंद कर- बंद कर आवाज- अरे आपल्या पप्पाला त्रास होतोय बाबाऽऽ उठत नाहिए तो चार दिवस माहिती नाहिए काऽऽ- अरे आता उठलाय बाबा पण तू आवाज बंद कर आधी- बंद कर!- चल- चल- चल महेश!"
अंकितचं घर्रर्र घर्रर्र आणखी चेकाळून चालू. महेश गौरीच्या खांद्यावर हात ठेवून आंधळ्या भिकार्‍यासारखा आत जातो. अंकित धावून धावून दमलाय. तो फतकल मारतो, टीव्ही ऑन करतो...
त्याचवेळी बाहेर सहनिवासाच्या आवारात एक भैय्या दमदार पावलं टाकत दाखल झालाय. भरघोस पांढर्‍या मिश्या, भरघोस सरळ पांढरे केस डोक्यावर. मळका धोतर-कुर्ता. खांद्यावर गमछा. येतो तो सरळ जावडेकरांची डोअरबेल वाजवतो. पुन्हा पुन्हा वाजवू लागतो... (क्रमश:)  
Post a Comment