romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Sunday, June 17, 2012

’"झुलवा" देवदासींच्या समस्येवरचं नाटक’ नावाचा समूह!

  • मित्रमैत्रिणींनो नमस्कार!
    गेल्याच आठवड्यात ८ जूनला ’"झुलवा" देवदासींच्या समस्येवरचं नाटक’ या समूहाची सुरवात फेसबुकवर केली आहे आणि आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा हव्या आहेत!
    "अभिलेख" वर मी या आधी झुलवा नाटकाबद्दल लिहिलं आहेच. पण ते अगदी वैयक्तिक स्वरूपाचं लेखन आहे. त्यापेक्षा सघन काही करावं, त्याची नोंद आंतरजालावर रहावी अशा इच्छेने मी त्यानंतर झपाटत गेलो. त्यात अनेकांना सहभागी करून घेणं आवश्यक आहे असं जाणवत गेलं. 
    आजच्या आशयघन नाटकांच्या पडत्या काळात एका कादंबरीवरून रूपांतरीत केलेलं, लोककलाप्रकाराच्या वेगळ्या बाजात बसवलेलं, पदार्पणातच राष्ट्रीय पातळीवर सादर झालेलं, नृत्य, संगीत, नाट्य याचबरोबर देवदासींची समस्या, त्यांच्या नुसत्या शोषणाची समस्या नव्हे तर त्यातल्या एका तरूणीची शिक्षण घेण्यासाठीची धडपड, तगमग "झुलवा" त मांडली गेली आहे. 
    हे नाटक १९८७ सालापासून साधारण २००५ पर्यंत एकूण चारवेळा रंगमंचावर आलं! वेगवेगळ्या संचात! 
    २०१२ साल हे "झुलवा" रंगमंचावर येऊन गेल्याचं पंचविसावं- रौप्यमहोत्सवी वर्षं!
    प्रायोगिक मराठी रंगभूमीच्या प्रवासातलं "झुलवा" हे एक महत्वाचं नाटक आहे. 
    चार पर्वात विस्तारलेले "झुलवा" शी संबंधित कलाकार, तंत्रज्ञ, संस्था, प्रेक्षक यांच्यात एक समन्वयाचं साधन तयार व्हावं, त्यांना नाटकासंबंधी विचार, आठवणी प्रकट करता याव्यात, त्यांनी वेळोवेळी केलेलं काम सूचिबद्ध व्हावं, आंतरजालावर या नाटकासंबंधातली माहिती संग्रहित व्हावी, इच्छुक नव्या पिढीला ती उपलब्ध व्हावी. नाटक विषयाचा अभ्यास करणार्‍याला त्यातून निश्चित लाभ व्हावा. सरतेशेवटी या सगळ्याच्या संदर्भाने देवदासींच्या समस्येवर आणखी विचारमंथन व्हावं असं मनापासून वाटलं. 
    "झुलवा" देवदासींच्या समस्येवरचं नाटक- या नावाचा समूह सुरू करण्याचा उद्देश हा असा होता.
    देवदासींच्या समस्येवरचं हे पहिलंच मराठी नाटक आहे का? आज या समस्येवरचा माध्यमांमधला प्रवास सातत्याने अशा विषयांवरच्या येत असलेल्या चित्रपटांची सुरवात करून देणारा ठरला का?.. यावरही यामुळे प्रकाश पडू शकेल.
    "झुलवा" नाटकाच्या संदर्भातूनच केलेलं लेखन, प्रतिक्रिया, छायाचित्रं इत्यादी साहित्य ही या समूहाची आवश्यकता!
    हा ओपन ग्रुप आहे. नियमावली प्रमाणे तो चालवाला जाईल. तो कुणा एकाची जबाबदारी राहू नये, रहाणार नाही.
    यात वैयक्तिक दोषारोप, हेवेदावे यासंदर्भातलं लेखन अजिबात नको! मूळ धागा सोडून केलेल्या निष्फळ चर्चा नकोत! सकारात्मक टीका, समीक्षा, चर्चा असायला काहीच हरकत नाही!  
    "झुलवा" या नाटकासंबंधी एक डेटाबेस तयार व्हावा ही इच्छा सगळ्या "झुलवा" प्रेमींच्या मनात आहे असं वेळोवेळी जाणवलं आहे. वेगवेगळ्या ग्रुपमधे वेगवेगळ्या वेळी झुलवा नाटक सादर केलेले कलाकार आणि प्रेक्षक यांचं इथे अत्त्यंत मन:पूर्वक स्वागत!
    हळूहळू हा समूह आकार घेईल तेव्हा इथे माहितीचा साठा तयार होईल. अभ्यासकांनाही यातून लाभ होऊ शकेल. 
    तेव्हा मंडळी, ’"झुलवा" "Zulwa" देवदासींच्या समस्येवरचं नाटक’ हा समूह खाली दिलेल्या दुव्यावर साकार होत आहे: https://www.facebook.com/help/groups
    समूह सुरू होतो. तो वाढण्यासाठी आवश्यकता असते अनेकांच्या शुभेच्छांची, पाठिंब्याची, सहकार्याची.
    आपल्या सूचनांचं आणि दुरूस्त्यांचं मनापासून स्वागत!
    आभार!

2 comments:

Asha Joglekar said...

झुलवा साठी खूप खूप शुभेच्छा .

काहीं दिवसां पूर्वी या समस्ये वरचा एक सिनेमा ही पाहिला. नाव आता आठवत नाही पम फारच सुंदर होता जोगवा बहुतेक .

विनायक पंडित said...

आशाजी तुमचं स्वागत! अभिप्रायाबद्दल मन:पूर्वक आभार!