romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Saturday, June 2, 2012

एक बाग...

एक मंदिर ह्या, या आधीच्या लेखांकानंतर एक बाग हा लेखांक अगदी अपरिहार्य. असं माझ्या मनात होतं. दोन्ही लेखांकातला अवकाश मात्र चांगलाच लांबला. तर.. ही एक बाग त्या एका मंदिरा पासून अगदी हाकेच्या अंतरावर. तिथे प्रत्यक्ष गेल्यावर हा, या दोन स्थळांच्या जवळीकीचा योगायोग जरा स्तिमितच करतो. मग एक सूक्ष्म विचार येतो अमृतसर या शहराच्या भागधेयाचा.

एक बाग..  एक मंदिर.. 
एक धर्म.. एक स्वातंत्र्य.. 
आणि बाकी इतिहास.. 
कशाचा?... सामान्यांच्या संहाराचा??..

धर्मयुद्धाचा किंवा स्वातंत्र्ययुद्धाचा एखादा महत्वाचा तुकडा असलेल्या घटना. जालियांवाला बागेतला जनरल डायरचा हैदोस असेल किंवा ऑपरेशन ब्ल्यू स्टार असेल. या घटना परिस्थितीचा अपरिहार्य परिपाक असतात. एकूण इतिहासात अशा घटनांची कमी नाही. या दोन्ही घटनांची तुलना करायची का? तेही या लेखांकाचं लक्ष्य नाही. पण जाणवणारं साम्यही नाकारता येत नाही. विशेषत: सामान्यांचा संहार. सगळ्याच दृष्टिनं होणारा. त्रासदायक होऊ लागतो. ते अमुक एका ध्येयाच्या मार्गावरचं बलिदान जरूर ठरत असेल. त्याचं दु:ख बोचत रहातं खरं..
जालियांवाला बागेच्या कमानीतून प्रवेश करतानाच ते ठळकपणे जाणवू लागतं. सुरवातीच्या मार्गिकेत आहेत त्या नरसंहारी इतिहासाचे पुरावे. इथे फोटो काढायला मज्जाव आहे. जालियांवाला बागेतला नरसंहार, पेटून होळी झालेलं शहर, नागरिकाला जवळ जवळ नग्न करून त्याच्या पार्श्वभागावर ब्रिटीश सैनिकांचे उठत असलेले कोरडे, भर रस्त्यातली फाशी अशा कृष्णधवल छायाचित्रांच्या मोठ्या प्रतिमा इथे लावलेल्या आहेत. जुनी पत्रं आहेत. हरामखोर ब्रिटीश अधिकार्‍यांची, सरकारची. तसंच स्वातंत्र्य सैनिकांचे, नेत्यांचे लेख आहेत जुन्या वर्तमानपत्रांमधले. स्कॅन इमेजेस लॅमिनेट करून दर्शवलेल्या स्वरूपात. पुस्तकात वाचलेल्या इतिहासापेक्षा या प्रतिमांमधून दिसणारा इतिहास अंगावर काटा आणतो. रक्त खरंच पेटवतो. त्या छोट्या, अंधार्‍या मार्गिकेत तयार झालेल्या प्रदर्शन स्वरूपातल्या सभागृहात आपण उजवीकडून डावीकडे कधी फिरत गेलो ते कळत नाही. एवढा मोठा पल्ला पार पाडताना श्वास रोखलेला रहातो. आपण गांधीजींचं निवेदन वाचतो. जनरल डायरचं त्या घटनेच्या कितीतरी नंतरचं ’शक्य असतं तर अजून माणसं मारली असती!’ असलं पराकोटीचं राक्षसी वक्तव्य वाचतो. त्याचा म्हातारा झालेला फोटो- स्कॅन प्रतिमा- बघतो. सरतेशेवटी क्रांतिकारी उधमसिंगाचा फोटो आणि त्याचं कार्य वाचतो. हिंसेला अखेर हिंसेनंच प्रत्त्युत्तर द्यावं लागतं हे ऐतिहासिक सत्य डोळ्यासमोर उभं रहातं. मग मनात एका बाजूला सुभाषबाबू उभे रहातात. एका बाजूला गांधी...
आजवर अनाम असलेले अनेक क्रांतिकारी इथे नावानिशी आणि प्रतिमांनिशी आपल्या चक्षूंसमोर उभे केलेले आहेत. एकादोघांची तर अंत्यदर्शनं आहेत. या एवढ्याशा अंधार्‍या मार्गिकेत माझ्यासारखे अनेक सामान्य अचंबित होतात, भेदरतात, राष्ट्रप्रेमाने भारून जातात, ब्रिटीश सत्तेबद्दल आणि पर्यायाने शोषणकर्त्यांविरूद्धचा पराकोटीचा तिरस्कार मनात भरून रहातो. बरोबरीने आत्ममग्न व्हायला होतं. आजूबाजूला गर्दी आणि आपण स्वत:च्या आत अगदी खोलवर पोचलेलो असतो. 
मनाचं खरंच काही खरं नसतं. त्या मार्गिकेतून पाय निघत नसतो आणि कुठेतरी गोध्रा दंगलीतला तो डोळ्यात पंचप्राण आणि अश्रू आलेला, हात जोडून भीक मागणारा, जखमी दंगलग्रस्त अगदी क्षणभरासाठी का होईना डोळ्यासमोरून तरळून जातो..
मागून रेटा चालू होतो. स्थलदर्शन पूर्ण व्हायचं असतं. अंधार्‍या मार्गिकेतून आता पुढे जाण्याची सूचना होत असते. मूळात बाग नसलेली एक बाग. जालियांवाला बाग. वस्तीतल्या काही घरांमधली मोकळी अंगणवजा जागा. ज्यात वस्तीकर या ना त्या सभेसाठी जमायचे.
आज एक प्रदर्शनस्थळ म्हणून उभ्या केल्या गेलेल्या प्रकाशमान हिरव्यागार बागेकडे आपण प्रस्थान करतो. अंधार्‍या मार्गिकेतून उन्हानं चांगल्याच उजळून निघालेल्या हिरव्याकंच बगिच्याकडे. एरवी सरकारी अखत्यारीतल्या स्थळांचं काही खरं नाही असं आपण म्हणतो. पण इथे रचनाच अशी झाली आहे- ती हेतूपूर्वक केली असेल असं वाटत नाही- की पाताळलोकातून भूलोकात यावं आणि आशेच्या किरणांवर स्वार होऊ लागावं तसं काहीसं होऊ लागतं. भविष्यात चांगल्या गोष्टीही असतात याची ग्वाही देणारी ही रचना वाटते खरी. हे सगळं माणूससापेक्षही असतं. त्या त्यावेळच्या आपापल्या भावना, स्थळांचे ते ते अर्थ लावत असतात.
खरंतर भरवस्तीतली ही बाग. पण यात खार भेटते, सुंदर पक्षी सुद्धा भेटतात. बागेच्या भोवतालात उभ्या असलेल्या विटांच्या भिंतीतली त्यावेळच्या अमानुष गोळीबाराची छिद्रं लक्ष वेधून घेतात. ती रेखांकीत केलेली आहेत. बागेचं प्रवेशद्वार रोखून केलेल्या या गोळीबाराचा लांबलचक पल्ला जाणवतो. अमानुष हिंसेच्या त्या अप्रत्यक्ष दर्शनानं पुन्हा मन पेटून उठतं.
 तोपर्यंत आपण त्या शहीदी कुव्याजवळ आलेलो असतो. गोळीबार सुरू झाल्यानंतर काय काय होईल या भीतीने अनेक महिलांनी आपापल्या मुलींसकट, बाळांसकट या कुव्यात उड्या ठोकल्या!
अलिकडचा.. रहावत नाही.. पण संदर्भ मनात जागून जातो.. अलिकडच्या एका दंगली जळीतात विशिष्ट धर्माच्या गरोदर महिलेवर बलात्कार करून तिचा गर्भ बाहेर काढून तो भाल्याच्या का तलवारीच्या पात्यावर टोचून मिरवला गेला होता.. वृत्तपत्रांच्या भाषेत इथे कथित महिला, कथित घटना इत्यादी म्हणायचं! आणि मिरवणार्‍यांना काय म्हणायचं? कथित राक्षस, कथित धर्मांध? आणि तो कथित की कसला पराकोटीचा धर्मांधी अविष्कार कुणा एका असहाय्य गरीब मातेवर? त्या महिलेला असला एखादा कुऑं जवळ करता आला असता तर किती बरं झालं असतं असं वाटलं नसेल?
जालियांवाला हत्याकांडातल्या हुतात्म्यांचं स्मारक आणि सरतेशेवटी एका खाजगी आस्थापनानं, स्वत:च्या जाहिरातीसाठी का होईना तेवत ठेवलेली अखंड अमरज्योति दिसते..
निघायची वेळ झालेली असते. मनातलं सगळं झाडून टाकून आपण पुन्हा एकदा हिरव्यागार, पशुपक्षी असलेल्या, उत्तम हुतात्मा स्मारक आणि प्रतिकात्मक ज्योत असलेल्या बागेवर नजर फिरवतो...
सुरवातीच्या त्या अंधार्‍या मार्गिकेतून आल्यामुळे असेल, नंतरची ही बाग आणखीनच उजळलेली वाटू लागते..
दुसर्‍या दिवशीचा कार्यक्रम आठवू लागतो.. अमृतसर शहराचं भागधेय पुन्हा एकदा जाणवतं. शहरापासून फक्त पस्तीस किलोमीटरवर आहे अत्तारी गाव. भारताच्या सीमेवरचं शेवटचं गाव आणि मग अत्तारी-वाघा बॉर्डर.
कुंडलीवर विश्वास असेल आणि शहराचीही एखादी कुंडली असत असेल तर अमृतसर शहराची कुंडली एकदा तपासून बघायला हवी..    

        

No comments: