romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Monday, December 27, 2010

'स्टार माझा’ वाहिनीच्या ’ब्लॉग माझा’ स्पर्धेतलं यश!


मित्रांनो! ’स्टार माझा’ वाहिनीच्या ’ब्लॉग माझा (पर्व तिसरे)’ ह्या स्पर्धेतलं यश!
स्टार माझा, माझे ब्लॉगर मित्रं आणि असंख्य वाचकहो! आपणा सर्वांचे मन:पूर्वक आभार!

Monday, December 20, 2010

शब्दगाऽऽरवा २०१०: वाटबघ्याचे दिवास्वप्न !

मित्रांनो! आमचा शब्दगाऽऽरवा २०१० हा डिजिटल हिवाळी अंक प्रसिद्धं झालाय! आणि हे आहे माझं, माझ्या एका कवितेचं अभिवाचन! इतर साहित्य वाचण्यासाठी जरूर भेट द्या आणि ही थंडी जागवा!

शब्दगाऽऽरवा २०१०: वाटबघ्याचे दिवास्वप्न !: "दोन जीव भेटणं.एकमेकांत गुंतणं.एवढं झाल्यावर सुरू होतो सिलसिला गाठीभेटींचा.दोघं चोरून भेटत असतील तर भेटण्याची ठिकाणं गुलदस्त्यात ठेवायची असता..."

शब्दगाऽऽरवा २०१०: रिझर्व्हेशन(आरक्षण) !

मित्रांनो! आमचा शब्दगाऽऽरवा २०१० हा डिजिटल हिवाळी अंक प्रसिद्धं झालाय! आणि हे आहे माझं एका प्रहसनाचं अभिवाचन! इतर साहित्य वाचण्यासाठी जरूर भेट द्या आणि ही थंडी जागवा!

शब्दगाऽऽरवा २०१०: रिझर्व्हेशन(आरक्षण) !: "शाहीर आणि सोंगाड्यामधला हा संवाद आहे...रिझर्व्हेशन(आरक्षण)बद्दल.            

Saturday, December 11, 2010

कॉमेडी शो! “फलाना… बिस्ताना…!”

“काय म्हणूया?... आपलं ते हे… फलाना… बिस्ताना…!”
मनू इंग्रजी शिकवणार.त्यासाठी शिबिर घेणार.त्या शिबिराला तो कार्यशाळा म्हणणार.असल्या या कार्यशाळेत शिकवताना तो अडला की विद्यार्थ्यांनाच विचारणार, “अमक्या ढमक्या इंग्रजी शब्दाचा अर्थ… काय म्हणूया? असेल आपलं ते हे… फलाना… बिस्ताना…”
मला वेड लागायचं बाकी होतं.मनूची मातृभाषा मराठी.आता मराठी माणसाचं इंग्रजी असून असून किती पावरफूल असणार? कुणाचं नसतं असं नाही.पण मनू? साक्षात मनू? हो मनूच!
आजकालच्या जमान्यात ज्याला ओ की ठो कळत नाही, येत नाही, त्यानं आपण सर्वज्ञानी आहोत असं सिद्धं करायचं असतं.होतकरू पोरांना काय कुणीतरी ’मास्तर’ हवाच असतो.असं काही करण्यात तर मनूचा हातखंडा.शाळा-कॉलेजात असताना संधी मिळाली की मनू उभा मग चेहेरा पा-पाडून, जिवणी फा-फाकवून, लाचार हसत तो वाटेल तसं, मनाला येईल तसं इंग्रजी फेकायचा.अहो, मायमराठीतच तो ’उपक्रम स्तूत्य आहे तुमचा!’ च्या ऐवजी ’उपक्रम सूस्त आहे तुमचा!’ असं म्हणाला होता एकदा म्हणजे मग इंग्रजीसारख्या वाघिणीच्या दुधाचं तो काय करत असेल त्याची तुम्हीच कल्पना करा म्हणजे झालं.काहीही असो, बोलतो ना! (म्हणजे आपल्यावर उभं राहून बोलायची पाळी येत नाही ना!) म्हणून पोरं खूष.सर खूष.
परवा त्याला हे सुचलं.शिबिराचं-चुकलो-हे कार्यशाळेचं.जगावेगळी आयडिया मलाच प्रथम सांगतोय या आविर्भावात त्यानं मला ती ऐकवली.मी म्हणालो, “मन्या हे फार होतंय! इंग्रजी शिकवणार? तू?” त्यानं माझं तोंड दाबलं.म्हणाला, “येड्या चूपचाप मला मदत कर.शंकाकुशंका काढू नकोस मध्यमवर्गीयासारख्या!” मी मनूला मित्र मानतो. “हो!” म्हणालो.
मनूनं जाहिरात दिली. ’फडाफडा इंग्रजी बोला! आधी आमच्या कार्यशाळेत चला!!” झालं! पूर्वी ’फाडफाड’ इंग्लिशच्या वर्गांना जाणार्याय आईबापांनी आपल्या मुलांना पाठवलं. ’फडाफडा’ म्हणजे निश्चित वेगळं काही असणार होतं.हीऽऽ गर्दी जमा झाल्यावर मनू माझ्या कानात म्हणाला, “बस! लिहून घे नावं! त्याना सांग! फक्तं चाळीस निवडणार!” मी सांगितलं.मरणाची झोंबाझोंबी झाली.मी चाट पडलो.मनूनं बरोब्बर कुणाचा बाप मंत्री, आमदार, सरकारी अधिकारी आहे हे बघितलं.कुणाचा बाप फॉरेनला असतो, किंवा येतो-जातो, मध्यवस्तीत कोणाची रहायची जागा रिकामी आहे, कोणाचा इंटिरिअरचा धंदा आहे ते पाहून यशस्वी ’चाळीस’ निवडले.बाकीचे बिचारे प्रचंड हिरमुसले.निवड अशी करायची?- मी चिडून मनूला हे विचारायला जातोय तर मनूभोवती त्या चाळीसांचा गराडा.मनू त्यांना अलिबाबाच्या सुरस आणि चमत्कारिक गोष्टी सांगत असल्याच्या अविर्भावात.ते डोलताएत.मिठ्ठास बोलणं, फक्त बोलणं ही मनूची जादूची पुंगी.सगळी बालकं डोलत मनूपाठोपाठ वर्गात दाखल झाली.मनूनं माझी बाही खेचली. “बस! या प्रत्येक ठोंब्याकडून पाचहजार वसूल करायचे!” मी जोरात ओरडलो, “पाऽऽच-” मनूनं मला पुढं बोलूच दिलं नाही.म्हणाला, “चूपचाप घे.मला द्ये.रिसीट नंतर- असं सांग!” मी भांबावलेला असलो की मनू माझा नेहेमीच मोरू करतो आणि मला राबवून घेतो.
दोनावर पाच पूज्यं हातात येईपर्यंत मनू इतका विनम्र होता, पैसा हातात पडल्यावर त्याच्या डोळ्यात वेगळीच चमक आली.त्याचे डोळे माजलेल्या राजकारण्यासारखे झाले.
मनूची ’कार्यशाळा’ सुरू झाली.मी दिमतीला होतोच.ती सगळी रंगीबेरंगी पोरं-पोरी, विशेषत: पोरी बघून मनूचा उत्साह वाढायचा.मग नाकावरचा चष्मा पालथ्या हाताने सरकवून, झब्याच्या बाह्या सरसावून बसता-उठता झब्याचा मागचा भाग फलकावून मनूचं अमकं, ढमकं आणि फलाना, बिस्ताना सुरू व्हायचं. “काय म्हणूया?” असं विचारत तो समेवर यायचा.इंग्रजी तर नुसतं फेकायचा, पण ते इतक्या सफाईनं की पोरं मास्तरवर खूष.कार्यशाळेचा तास संपला की पाया पडायची बिचारी.मी एका कोपर्यातत बसून ते अचाट इंग्रजी, त्याचे मनूनं सांगितलेले अफाट अर्थ ऐकून चाट पडायचो.सामान्य मराठी माणूस असल्यामुळे पुढ्यात आलेला चहा गिळून मुकाट बसायचो.एक-दोन महिन्यात, महिना दोन पेट्यांचं तेज मनूवर चढलं.आता तो रंगात आला की दोन्ही हात पक्षाच्या पंखांप्रमाणे आखडून घेत तमाशातल्या नाच्याप्रमाणे डोलत-चालत मुलांना शिकवू लागला.चांगली मुलगी दिसली की त्याचे डोळे चमकायचे आणि ओठांचा चंबू व्हायचा.मुलगी बिचारी इकडे तिकडे बघायची.वर्ग संपेपर्यंत शरमून मान खाली घालून बसायची.
मी बिनपगारी फुलहजेरी कामगार म्हणून मला प्रवेश सुलभ होता.माझी उत्सुकता वाढत चालली होती.मनूनं कार्यशाळेतल्या मुलांच्या जीवावर मध्यवस्तीत किरायानं का होईना फ्लॅट घेतला.त्याचं फुकट इंटिरियर करून घेतलं.मंत्र्यांकडून, सरकारी अधिकार्यांलकडून सगळी कामं करून घेतली.पोरं सतत मास्तर मास्तर करत पाया पडत होती ती वेगळीच.नुसतं ’काय म्हणूया?... फलाना बिस्ताना…’ या भांडवलावर माणूस काय करू शकतो याचं मूर्तीमंत उदाहरण माझ्यासमोर होतं आणि उद्योग नसलेले आईबाप आपल्या उद्योग नसलेल्या मुलांना पदरची दक्षिणा देऊन कसे मार्गी लावतात याचंही.
मुद्दलातच खोट असलेल्या मनूच्या इंग्रजीबद्दल फक्त मलाच माहित होतं.मी पडलो सामान्य, मराठी मध्यमवर्गीय.मला काय आवाज उठवता येतो? मी स्वत:ला फक्त कोसत राहिलो.मनू माझं कधीच ऐकणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ होती.एक दिवस राष्ट्रीय पातळीवर इंग्रजी शिकवणारा कार्यशाळाशिक्षक म्हणून मनूची निवड झाली.अटकेपार झेंडे लावले म्हणून मनूचं सगळ्यांनी कौतुक केलं…

Sunday, December 5, 2010

भलताच क्लायमॅक्स?...

क्लायमॅक्स?... की?...
खरं तर क्लायमॅक्सला पर्यायी शब्द आहे उत्कर्षबिंदू.माझ्या आयुष्यात मात्र भलताच क्लायमॅक्स आला होता.
मी नाटकात अपघाताने ओढला गेलो.एकामागोमाग अशा संधी येत गेल्या की शहरातल्या मुख्य प्रवाहाजवळ येऊन ठेपलो.दूरदर्शनवर नाटक जाहीर झालं.ते दोनदा रद्द झालं.पुढे ढकललं गेलं.नंतर ते सादरही झालं.जेमतेम दोन प्रसंग.तेही नवखेपणाने सादर केलेले.पण परिचितांनी कौतुकही केलं.सर्वसाधारण तरूणच आहोत अशी बोच मनाला होती.ती नाहीशी होतेय असं चित्रं दिसायला लागलं.
राज्य नाट्यस्पर्धा जाहीर झाली.संस्थेचं महत्वाकांक्षी नाटक उभं रहाणार अशा हालचाली सुरू झाल्या.रूपांतरित नाटक.रूपांतरकाराशी चर्चा.वाद.संवाद.सगळी तयारी जोशात सुरू झाली.नाटकाचा दिग्दर्शक निवडला गेला.भूमिका ठरवल्या गेल्या.नाटकात डबलरोल होता.जमिनदाराची दोन तरूण मुलं.या भूमिकेसाठी माझी निवड झाली.शोषण करणारा निर्दयी जमिनदार आणि शोषित अतिवृद्ध शेतकरी असा संघर्ष होता.मरणाला टेकलेला हा अतिवृद्ध हळूहळू जवान होऊ लागतो आणि जमिनदारासमोर उभा ठाकतो अशी ब्लॅक ह्यूमर पद्धतीची नाटकाची थीम होती.व्यंगचित्रात्मक पात्रं, उपरोधिक भाषा असलेलं परिणामकारक असं नाटक होतं.
तालमी सुरू झाल्या.दिग्दर्शकानं पहिल्या दिवशी वाचन घेतलं.माझ्या वाचनावरून माझी मनसोक्त हजेरी घेतली.हा दिग्दर्शक सर्वार्थानं रांगडा होता.त्यानं नेपथ्याचा प्लान समजवला.हे मला नवीन होतं.तो नीट लक्षात ठेव असं त्यानं मला बजावलं.माझी भूमिका कोणती हे त्याने सांगितलं.एक अर्कचित्रात्मक रंग असलेला उत्साही कार्यकर्ता आणि एक मुजोर जमिनदारपुत्र असा तो डबलरोल होता.दोघे जुळे भाऊ अर्थातच एकाचवेळी दिसणार नव्हते.
“या आधी तू एकांकिका केलीस नं! तो काय तो अनाथाश्रमाचा ट्रस्टी केला होतास आणि असं बोल्ला होतास-” अशी सुरवात करून रांगड्या दिग्दर्शकानं मला मी कसा बोललो होतो, उभा राहिला होतो याची नक्कल करून दाखवली. “ते तसलं मला नाय चालणार! कळलं ना?” असा दमही दिला.मी पुरता ब्लॅंक झालो आणि तो काय सांगतो याच्याकडे जीवाचा कान करून धडपडू लागलो.
रात्री उशीरा घरी येत होतो.आल्यावर जेवता-झोपताना नाटकाचाच विचार, प्लान, डोळ्यासमोर, हातात असायचा.घरात काहीतरी घडत होतं.काय ते माझ्यापर्यंत पोचेल अशी माझी मनस्थिती नव्हती.आईचं कसलं तरी मेडिकल चेकप होत होतं.फार गंभीरपणे ते माझ्यापर्यंत पोचत नव्हतं कारण मी वेगळ्याच जगात वावरत होतो.मला कसं सांगायचं या पेचात घरचे वडिलधारे असावेत.रात्री हे (म्हणजे मी सध्या करतोय ते) बास झालं वगैरे कळकळीने मला सांगून झालं.मी तो नेहेमीचा माझ्या नाटकांना विरोध म्हणून घेतलं.मान डोलावून पुन्हा माझ्या जगात वावरू लागलो.मग मला आईच्या चेकअपबद्दल सांगितलं गेलं.प्राथमिक रिपोर्ट आला होता.तो चांगला नव्हता.काय आहे ते उच्चारायचं धाडस कुणाच्यातच नव्हतं.घरात मी मोठा.हा रिपोर्ट नक्की काय आहे हे समजाऊन घेण्यासाठी मी मित्राच्या फिजीयोथेरपीस्ट बायकोकडे गेलो.तिनं ज्या स्त्री डॉक्टरनं रिपोर्ट दिला होता तिला फोन लावला. “मी काय झालं ते त्या बाईंबरोबर जे आले होते त्याना सांगितलंय” असं त्या स्त्री रोग तज्ज्ञानं सांगितलं.माझ्याकडे वळून माझ्या मित्राची बायको म्हणाली, “सीए आहे रे!” मी विचारलं, “सीए म्हणजे?” मित्राची बायको ब्लॅंक होऊन माझ्याकडे बघत राहिली.मला खरंच काही माहिती नाही असं तिच्या लक्षात आलं आणि तिनं काय झालंय ते सांगितलं.माझ्या पायाखालची जमिन सरकली.गर्भाशयाचा कॅन्सर. “ट्रीटमेंट आहे ना त्याच्यावर?” तरीही मी जोर लावला. “बिनाईन नाही मॅलिग्नंट आहे.खूप वरची स्टेज आहे.काहीही होऊ शकणार नाही हे लक्षात घे.जेवढ्या लवकर हे पचवशील तेवढं चांगलं.तू पचव आणि इतरांनाही समजव!” तिनं मनापासून सल्ला दिला.खूप मोलाचा सल्ला होता हा आणि आचरणात आणायला तितकाच कठीण.पण माझ्या समोरचं चित्रं पूर्णपणे स्पष्टं होत होतं.समोरचं चित्रं स्पष्टं होत असलं तरी घरी गेल्यावर समोर दिसणार्याा आईला फेस करणं महाकठीण होतं.
“सगळ्यात आधी संस्थेच्या कार्यवाहाला जाऊन सांगून येतो नाटक करता येणार नाही म्हणून!” अशी पळवाट काढून आईच्या नजरेला नजर न देता मी बाहेरची वाट धरली.खरं तर त्या अर्थानं ती पळवाट नव्हतीही.संस्थेला सर्वप्रथम सांगणं जरूरीचं होतं.आईला पुढची ट्रीटमेंट देणं आवश्यक होतं.त्या ट्रीटमेंटचा काहीही उपयोग नाही हे मला आधीच माहित होतं.एका जबरी तिढ्याला मी आयुष्यात पहिल्यांदा सामोरा जात होतो.आई मला प्रचंड जवळची होती.माझ्या दृष्टीनं सगळंच संपलं होतं.
तासाभराचा प्रवास करून संस्थेच्या कार्यवाहाच्या घरी पोचलो.रविवार होता.सगळं जग त्या मूडमधे आणि प्रवासात मी माझ्या गतआयुष्यात कुठे कुठे जाऊन परत येत होतो.शाळेत असताना मी कशावरूनतरी आईवर रूसलो होतो.तिच्याशी बोलणं बंद केलं होतं.डबा न घेताच गेलो होतो.मधली सुट्टी झाली.मी धुमसतच होतो.तसाच इतर मुलांबरोबर शाळेतल्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीजवळ येऊन नळाला तोंड लावत होतो.इतक्यात आई कडीचा डबा घेऊन आली.त्यात पोळीचे लाडू होते.आई आग्रह करकरून मला डबा घे, डबा घे म्हणून विनवत होती.मी हट्टाने तो घेत नव्हतो.आईकडे बघतसुद्धा नव्हतो.मित्र म्हणाला, “अरे घे! असं काय करतोएस?” मग मी तो घेतला.बर्या च वेळा आईच्या डोळ्यात पाणी यायचं आणि तिच्या जिवणीच्या कडा खाली झुकायच्या.आईकडून डबा घेताना त्या मला दिसल्या.मी मख्खंच राहिलो होतो त्यावेळी.पण या क्षणी मला आवरत नव्हतं.निराधार होण्याचं फिलींग पचवण्याचा माझा प्रयत्न त्याचवेळी सुरू झाला असावा.
कार्यवाहाच्या घरी पोचलो.मला बघून तो चकीत झाला.काय झालं ते मी सांगितल्यावर त्याचा आ वासला.महाप्रयत्नाने त्याने सगळं नाटक जमवत आणलं होतं. “मला बदली दे” असं तो मला वेगवेगळ्या तर्हे ने सांगून बघत होता.आता मी काहीच करू शकत नाही, हा माझा हेका कायम होता.मी त्याच्याकडून निघालो तेव्हाही तो आ वासून माझ्याकडे बघत राहिला होता.
त्याच्याकडून निघालो तेव्हा मी पूर्णपणे रितं होणं म्हणजे काय हा अनुभव घेत होतो.एका बाजूला माझं रक्ताचं माणूस माझ्यापासून कायमचं लांब जाणार होतं आणि दुसरीकडे अपघातानं माझ्याजवळ आलेलं माझं संचित मी माझ्यापासून लांब करून टाकलं होतं.सगळंच संपलं होतं.भलताच क्लायमॅक्स माझ्या आयुष्यात आला होता…

Friday, December 3, 2010

’बुक गंगा’ या साईटवर माझी पुस्तकं!

मित्रांनो!
www.bookganga.com
या संस्थळावर माझी पुस्तकं विक्रीसाठी ठेवली गेली आहेत.तसंच
मी...झाड...संध्याकाळ... (कविता)
Nanadan A Film Script (इंग्रजीतली चित्रपटसंहिता)
पुलाखालून बरंच... (नाटक)
संघटन (नाटक)
स्मरणशक्ती वाढीसाठी! (व्यक्तिमत्व विकास)
ही ई-पुस्तकं सुद्धा विक्रीसाठी उपलब्ध आहेत!
दुवा आहे:
http://www.bookganga.com/eBooks/Books?AID=5081606839785976727

Tuesday, November 30, 2010

कॉमेडी शो “लोकांच्या सेवेसाठी…”

रविवार सकाळ.सकाळचे दहा वाजलेले.मी कधीही न मिळणारय़ा साखरझोपेत.जोरजोरात वाजणारा रिक्षाचा हॉर्न.तो कानठळ्या बसवणारा असूनही अजून मी उठत नाही म्हणून चवताळलेली बायको.असे सगळे पापग्रह राशीला एकत्र आल्यानंतर मला अंथरूण सोडावच लागलं.
खिडकीबाहेर पहातो तर नवी करकरीत रिक्षा.बाजूला उभा स्वच्छ पांढरय़ा कपड्यातला तिचा मालक कम चालक.नेव्हीमधल्या पायलट, कमांडरसारखी त्याची कॅप.दोन्ही हातांचा कर्णा करून माझ्या खिडकीच्या दिशेने त्याच्या माझ्या नावाने हाका.डोळे चोळत ते आऊट ऑफ फोकस, अंधुक दिसणारं दृष्य दिसावं म्हणून मला माझी झोप उडवावीच लागली शेवटी.
मी पुन्हा नीट पहातोय खिडकीतून तर आता कमांडर गायब.मी मनाशी म्हणतोय- अरे, हे काय दिवास्वप्न?- तर दारावर बेल.दार उघडतो तर समोर ’कमांडर’! मी (नेहेमीच्या) भांबावलेल्या चेहेरय़ाने काही विचारणार इतक्यात त्याने कॅप काढली आणि मी उडालोच! मनू!! मी आश्चर्यानं विचारलं, “हे रे काय?” जिवणी फाकवत, फवारा उडवणारं हास्य करून तो म्हणाला, “लोकांच्या सेवेसाठी!” मी म्हणालो, “सोडलीस नोकरी?” मला टप्पल मारून तो म्हणाला, “अरे नोकरी करून लोकं काय काय करतात! शिकतात.खरवस विकतात.शेअर्सची उलाढाल (!) करतात.एजन्सी चालवतात.राजकीय पक्षांचे संघटक होतात.मी रिक्षा घेतली.परप्रांतीयांना ठसन द्यायची आणखी एक संधी! चल!” असं म्हणून तो मला ओढायलाच लागला.मी माझी सुटणारी लुंगी सावरतोय.भोकाभोकांचा बनियन लपवायची धडपड करतोय हे लक्षात यायला त्याला वेळ लागला.माझ्या पार्श्वभागावर चापट मारून त्यानं मला मग आत ढकललं.मी कसाबसा शर्ट चढवला.पॅंट कमरेवर सरकवली नाही तोपर्यंत बायकोने डाव्या हातात पिशव्या आणि उजव्या हातात पैसे कोंबले.एकबाजूने मनू ओढतोच आहे.नेहेमीसारखा, कुठेलेही पर्याय नसलेला मी मनूच्या रिक्षेसमोर उभा ठाकलो.तिला घातलेला हार, लावलेले गोंडे न्याहाळतोय तोपर्यंत मनूनं मला सीटवर ढकललंच.रिक्षाच्या आत लावलेले गोंडे, झिरमिळ्या माझ्या नाकातोंडात जाऊन मी सटासटा शिंकतोय न शिंकतोय तोपर्यंत ढॅण ढॅणऽऽ ढॅण असा राक्षसी संगीताचा तुकडा माझ्या उजव्या कानात गिरमिटासारखा फिरतोय.बॅलन्स (माझा) डावीकडे केला तर डाव्या कानात गिरमिट.माझा चेहेरा आधीच केविलवाणा.आता सिनेमातल्या ए के हंगलपेक्षा बापुडवाणं होऊन मी समोर पाहिलं तर समोरच्या, मागचं ट्रॅफिक दिसावं म्हणून लावलेल्या आरशात दिसतोय मीच पण माझे ओठ लालचुटुक! डोळे फाड-फाडून पहातोय तर आरशावर नुसतेच ओठ.अलिबाबाच्या गुहेत शिरल्यासारखा मी मनूच्या रिक्षाचं ते अंतरंग बघायला लागलो.बघायला काय लागलो? ते सगळं माझ्या डोक्यात, डोळ्यात आणि कुठे कुठे आपोआपच घुसत होतं म्हणा! आता संगीत आणखी वाढलं.त्यापेक्षाही वाढला त्या कुठल्याशा एफेम वरच्या, त्या आरज्ये की डीज्येचा भेसूर हिंदी कम इंग्लिश कम कुठल्याशा भाषेतला तारस्वर.मी डोळे मिटले तरी ते किलेकिलेच रहात होते.दोन्ही कानांवर गच्च हात ठेवले.मला तसं बघून मनू नेहेमीसारखा विजयोन्मादानं हसला आणि त्यानं माझं लक्षं वेधून घेतलं. “कशी आहे?” माझ्या कानाजवळ आपलं थोबाड आणून तो ओरडला.एका कानावरचा हात सोडून मी दोन बोटं जुळवली आणि ’छाऽऽन!” अशी खूण केली.मनूनं उजव्या हाताच्या तर्जनीचा- पहिल्या बोटाचा- आकडा केला.तो दोन डोळ्यांच्यामधे लावला.मग तोच आकडा ओठाजवळ नेऊन त्याचे मुके घेतले आणि वाकला.स्टार्टर हाताने वर ओढल्याबरोबर मला कानावरचे दोन्ही हात सोडून मिळेल तो आधार पकडावाच लागला नाहीतर मी रिक्षाबाहेर फेकलाच गेलो असतो.मनूची रिक्षा नुसती सुरूच झाली नव्हती तर ती हवेत जणू उडायलाच लागली.मी पिशव्या आणि पैसे गच्च मांडीत धरून बसलो.लहानपणी जत्रेत गोल गोल फिरून चक्कर आणणारय़ा घोड्यावर कसंबसं गच्च बसत होतो, जीव मुठीत धरून.त्याची आठवण येऊन मजा येत होती.हे मेरी गो राऊंड आत्ता तरी फुकट होतं.
माणसं, रस्ता, दुकानं, इतर वहानं भिरीभिरी मागे पडत होती.सोबतीला झिनच्याक एफेम.सगळंच झिंग आणणारं होतं.मला हे अभूतपूर्व स्वप्नं दाखवणारा जादूगार माझ्या पुढेच बसला होता.आरशातून माझ्याकडे आणि बाहेरच्या त्या जुलमी दुनियेकडे हसत हसत पहात पुढे पुढे जात होता.
रिक्षा पुढे येईल ते भेदत जात होती.वळणावरच्या आजीआजोबांना तिचा अंदाजच आला नाही.ते भेलकांडले.आता काय होतंय म्हणून मी वाकून पहातोय तो रिक्षा पुन्हा वळली आणि त्या आजीआजोबांचं काय झालंय हे पहाण्यापेक्षा स्वत:ला सावरण्याच्या कामात मी गुंतलो.मनूच्या चेहेरय़ावर विजयी हास्य कायम होतं.आता रिक्षा करकचून थांबली.काहीही प्रयत्न न करता मी रस्त्यावर आलो.मनूनं माझी गचांडीच पकडली, म्हणाला, “कॅय? कशी वाटली सफर?” मी पुन्हा दोन्ही बोटं घट्टं जुळवून छाऽऽन! अशी खूण केली.
एखादा डिस्कोबार असावा रिक्षांचा तसा तो रिक्षास्टॅंड होता.एका खांबावर भला मोठा युनियनचा बोर्ड.रंगीत.रिक्षांच्या तीन चार रांगा.तरी माणसं उभीच.स्टॅंडवर रिक्षा आली रे आली की तिच्याभोवती घोळका जमायचा.लहान मुलंबाळं कडेवर असलेले घामाघूम बायका-पुरूष, म्हातारे कोतारे, आजारी, अपंगांना घेऊन येणारे गरजू.सगळ्यांचे चेहेरे भिकारय़ांपेक्षा लाचार.मला कळेना पैसे द्यायची तयारी असूनही ह्यांचे चेहेरे हे असे का?
एक आजी मनूकडे आल्या.मिनिमम भाडं.मनू म्हणाला, “एरिया माहित नाही!” आजी म्हणाल्या, “कशाला चालवतोस?” मनूनं शांतपणे पुढच्या रिक्षाकडे हात केला.आजी धावल्या.
कडेवर बाळ, हातात बॅग असलेली बाई पुढे झाली.रस्त्याचं काम चालू.मनू म्हणाला, “रिक्षा उधरकी नही!” बाई म्हणाली, “फिर क्या लंडन जाओगे?” मनू हसला.म्हणाला, “हो!”
एवढ्यात एक पायानं अधू माणूस कसाबसा पुढे झाला.त्याच्या हातात पुस्तकांचा भलामोठा गठ्ठा.मनूनं मान हलवली- नाही! लंगडा म्हणाला, “का?” मनू म्हणाला, “वजन आहे!” लंगडा म्हणाला, “मग काय हत्तीवरून नेऊ?” मनू हसला.म्हणाला, “तुझी मर्जी!”
आता घोळका वाढला.मनू शांतपणे मान हलवत राहिला.
घोळक्यातून एक रागावलेला तरूण सरसावला.त्याची बहीण आजारी.तरूण मनूच्या अंगावर आला.मनूनं त्याला एक लावली.तरूण उताणा पडला.वर पहातो तो युनियनचा बोर्ड!
शेवटी एअरपोर्टचं भाडं मिळालं.मनूनं मला पुढे त्याच्याजवळ बसवलं.मी स्वप्न भासणारय़ा जत्रेत नव्यानं शिरणार होतो आणि मनूची रिक्षा लोकांच्या सेवेसाठी धावणार होती.

Tuesday, November 23, 2010

स्टार माझा ची ब्लॉग माझा-३ स्पर्धा!

स्टार माझा च्या ब्लॉग माझा-३ या स्पर्धेत भाग घेतलेल्या तसंच यश मिळवलेल्या सगळ्याच विजेत्यांचं मन:पूर्वक अभिनंदन!
’अभिलेख’लाही या स्पर्धेत यश मिळालंय!माझा हा ब्लॉग २००७ मधे मी सुरू केला तेव्हा मला ब्लॉग चे बी च काय पण ऑर्कुटचे ऑ, जीमेलचे जी ही माहित नव्हते.याहूवरचा माझा ईमेल आयडी बनवण्यासाठीही मला बरेच प्रयत्न करावे लागले.हे सगळं आत्ता वाचताना नक्कीच हास्यास्पद वाटेल!परिचयातलं कुणीही तसं या माध्यमाची ओळख असलेलं नव्हतं.धडपडा आणि शिका हा मंत्र आयुष्यात पहिल्यापासून मार्गदर्शक ठरलाय!ब्लॉगरवर जातानाही उलटीकडून सगळं शोधत आज जे काही इथे मांडलंय ते दिसतं आहे.तांत्रिक ज्ञान काय होतं किंवा आहे ते जाणकार ओळखतीलच.नाटक, साहित्य यांच्याशी असलेला संबंध इथेही प्रतिबिंबित होणार हे उघड आहे.तरीही यश मिळालंय याचा खूप मोठा आनंद आहे!!!
मात्र अनेक अनोळखी जे केवळ या माध्यमामुळे मित्र झाले त्या सगळ्यांनी दिलेलं प्रोत्साहन ’अभिलेख’ला इथपर्यंतची मजल मारायला कारणीभूत ठरलेलं आहे.या सगळ्या मित्रांचे अगदी अगदी आतून आभार!
मन:पूर्वक आभार स्टार माझाचे प्रसन्न जोशी यांचे आणि परिक्षक श्रीमती लीना मेहेंदळे,श्री विनोद शिरसाठ आणि श्री माधव शिरवळकर यांचे!
आपण सगळ्या मित्रांनी, तज्ज्ञांनी आणि स्टार माझाने खूप बळ दिलंय पुढची वाटचाल जोमदारपणे करण्यासाठी.मी कृतज्ञ आहे!!!
संपूर्ण निकाल पहा: http://www.starmajha.com/MajhaBlog.aspx?BlogID=1669 या दुव्यावर!

दूरदर्शनची ओळख!

एक मध्यमवयीन ख्रिश्चन जोडपं.मूलबाळ नसलेलं.नवरा कामगार.जवळच्या जंगलात शिकारीला जाणारा.त्यात रमणारा.मूल नाही म्हणून घरातली स्त्री व्याकुळ झालेली.आणि त्याचवेळी एक गोंडस पोर जोडप्याला सापडतं.ते त्यांच्या घरात राहू लागतं.घरातली स्त्री त्याला आपलं मूलंच मानू लागते आणि अनाथाश्रमाचे ट्रस्टी येऊन तो मुलगा परदेशी दत्तक जाणार हे नक्की झाल्याचं जाहीर करतात.मुलावरून जोडप्याचे आपापसात निकराचे वाद होतात.स्त्री कोलमडून पडण्याच्या अवस्थेत आहे.मुलाला आपलं घर म्हणून हेच आणि आई म्हणून हीच हवी आहे पण… अनाथ मुलानं कुठे स्थिरावायचं हे त्या मुलाच्या मर्जीवर अवलंबून आहे की समाजातल्या तथाकथित व्यवस्थेच्या मर्जीवर?...
एकाच बीजावर अनेक ग्रुप्सनी एकांकिका रचायच्या आणि सादर करायच्या अश्या स्वरूपाची ती स्पर्धा.उपनगरातले सर्वसाधारणपणे तीन ग्रुप्स आणि इतर भागातला एखादा अश्या ग्रुप्सची शहरातल्या सगळ्याच एकांकिका स्पर्धांवर मोनोपोली असण्याचे ते दिवस.एकापेक्षा एक तगडे विषय.आज सेलिब्रिटी म्हणून सिद्ध झालेले अभिनेते, दिग्दर्शक, लेखक, तंत्रज्ञ यांनी गाजवलेली ती स्पर्धा.
माझ्या आठवणीप्रमाणे आमच्या या एकांकिकेला बक्षिसं मिळाली पण आम्ही ’चोपलं’ वगैरे नाही.आमच्या दिग्दर्शकानं केलेल्या कुठल्याही एकांकिकेची दखल मात्र नेहेमीच घेतली जायची तशी ती घेतली गेली.मी त्या अधिक वरच्या वर्तुळात बुजलो होतो.माझ्या वाटणीच्या त्या दोन प्रसंगात मी काय बोललो, केलं ते मला ठार आठवलं नाही, आठवत नाही.केस आणि मिश्यांवर हेऽ पावडरचा मारा केल्यामुळे दिसत पण विचित्र असलो पाहिजे.
स्पर्धा पार पडली.आमची आमच्यातच हवं तसं यश न मिळाल्याची रूखरूख, ठूसठूस पार पडली.आणखी काही चांगलं करण्यासाठी ती निश्चितच आवश्यक असते.मी उत्तम श्रोता म्हणून वावरत होतो.ती एक भूमिका मला बरी जमते असं माझं मत आहे.
आम्हाला दूरदर्शन केंद्रावरून ती एकांकिका दूरदर्शनवर सादर करण्याचं आमंत्रण आलं!
हे आमंत्रण संस्थेला पैसा आणि प्रसिद्धी मिळवून देणार होतं.प्रमुख कलाकारांनाही चांगली ओळख त्यामुळे मिळणार होती.हा पैसा, प्रसिद्धी आजच्यासारखी नव्हती हे उघड आहे.पै पै जमवून ’activity’ करण्यारय़ा संस्थेला जे मिळेल ते खूप होतं.
एक प्रतिथयश निर्माता, दिग्दर्शक, नट त्यावेळी दूरदर्शनवर नाटकाचं खातं सांभाळत होता.आमची सगळी टीम त्याला भेटायला केंद्रावर पोचली.आमच्या एकांकिकेवर तो खूष असल्याचं दिसलं.दूरदर्शनवर सादर करण्यासारखा विषय होता म्हणून त्यानं बोलावलं असावं.तो पैसे नीट देईल का? आपण बसवलेल्या एकांकिकेत किती फेरफार होतील? हे सगळे प्रश्न निकालात निघत गेले.केंद्रावर एका हॉलसदृश्य खोलीत टीव्ही कॅमेरय़ाच्या अनुषंगाने रिहर्सल्स झाल्या.मोजकेच बदल दूरदर्शनवरच्या दिग्दर्शकाने केले.त्यावेळचं केंद्र मला वेगळंच काही आणि दिपवणारं वगैरे वाटलं तरी ते त्या अर्थानं मध्यमवर्गीयच म्हटलं पाहिजे.चकचकीतपणा फारसा कुठेच नव्हता आणि कार्यक्रमांचा दर्जा मात्र वाखाणण्यासारखा होता.लोकाभिमुख माध्यम असलं तरी ते लोकानुयायी झालेलं नव्हतं.कार्यक्रम ठरवणारे, ते कार्यक्रम तडीला नेणारे आणि त्या कार्यक्रमात सहभागी असणारे सगळेच या ना त्या नात्याने रंगभूमीशी संबंधित होते.काही तर चांगलेच जाणकार होते.दूरदर्शनचा रंग अजून पांढरा-काळाच होता पण आशय भिडणारा होता.
या माध्यमात माझी अवस्था जत्रेत हरवलेल्या पोराप्रमाणे होती.रिहर्सलला कॅमेरा या इथे असणार म्हणून दूरदर्शनवरचा दिग्दर्शक दोन्ही हात एकमेकांत गुंफून किंवा दोन्ही हातानी नागाचा फणा तयार करून दाखवायचा.कॅमेरा तिथे असला तरी त्या पोझिशनला अजिबात बघायचं नाही.रंगमंचावर काम करताना प्रेक्षकात बघायचं पण बघायचं नाही तसं काहीसं हे होतं.प्रेक्षाकांच्या डोक्यावरची एक रेषा आपल्या नजरेने पकडायची आणि ती न सोडता आपली भूमिका मांडायची.कॅमेरा माध्यमात कॅमेरय़ाच्या नक्की कुठे नजर ठेवायची हे कॅमेरा हाताळणारा दाखवायचा.एखादी गोष्टं करायची नाही असं सांगितलं की लहान मुलाचं जसं होतं तसं माझं व्हायचं.
रंगमंचावर काम करत असताना तुम्ही ती प्रेक्षकांच्या डोक्यावरची अदृष्य रेषा पकडण्यात हयगय केली तर जो काही त्रास होईल तो तुमच्या एकट्यापुरता मर्यादित असतो.कॅमेरा माध्यमात मात्र नंतर तो कार्यक्रम प्रसारित होताना असं कॅमेरय़ात बघितलेलं चटकन लक्षात येतं.मी दिलेल्या आज्ञा पाळायच्या असं ठरवलं आणि मग कॅमेरा चालू आहे याचं फारसं टेन्शन न घेता काम करायचं असं ठरवलं.अज्ञानी असताना आपण आपल्या नकळत सफाईदार होत असतो बहुतेक.आणखी एक गोष्टं माझ्या पथ्यावर पडली.रंगमंचावर माझा आवाज खरं तर बरय़ाचवेळा टेन्शनमुळे पाहिजे तेवढा स्पष्टं यायचा नाही.भूमिका म्हातारय़ाची असल्यामुळे आणि मी नवीन असल्यामुळे घोटवून घेतलेल्या बोलण्यावर आणि हातवारय़ांवर सगळी भिस्त होती.
दूरदर्शन माध्यमात हातवारय़ांची फारशी गरज असत नाही.चेहेरय़ावर मोजकेच भाव असावे लागतात.आवाज जास्तीत जास्त नेहेमीसारखा असावा लागतो.रंगमंचासारखी आवाजाची लांबवर फेक वगैरेची आवश्यकता नसते.माझ्या अज्ञानामुळे, नवखेपणामुळे आणि अर्थात अगदीच छोटी भूमिका असल्यामुळे माझं निभावलं.
टीव्हीवरचं चित्रण यशस्वीपणे पार पडलं.एकांकिकेतल्या, अर्थातच आता दूरदर्शनवरच्या या नाटकातल्या, लहान मुलाचे प्रसंग, त्याचा क्लोजअप, त्याचे डोळे अप्रतिम दिसले.चित्रण चालू असताना चित्रण आणि नंतर त्या प्रसंगाचं चित्रमुद्रण मॉनिटरवर पुन्हा बघता येणं आणि वाटल्यास पुन्हा चित्रीकरण करता येणं हा या माध्यमाचा विशेष.अर्थात हे सगळं बजेट सांभाळून.
पुन्हा एकदा माझा आनंद गगनात मावेना.एवढ्या कमी अवधीत कुठपर्यंत पोचलो वगैरे डोक्यात यायला मग वेळ लागत नाही.दूरदर्शन हे त्यावेळी सामान्य माणसाच्या दृष्टीनं खूपच लांबचं माध्यम होतं.
दूरदर्शनवर नाटक जाहीर झालं.पोटात आनंदाच्या उकळ्या फुटायला लागल्या.ऑफिस नंतरचा बराचसा वेळ बाहेरच जात होता.वसाहतीतल्या घरी परतायला मध्यरात्र व्हायची.पूर्वीचं कुणी भेटायचं बंद झालं होतं.नाटक दूरदर्शनवर जाहीर होण्याच्या काळात कुणी भेटलं तर त्यांचे चेहेरे बघण्यासारखे असायचे.त्याना माझा चेहेरा बघण्यासारखा वाटत असेल.काही जण मनात काय येतं ते समोरच्याला सुनवायचंच! अश्या स्वभावाचे असतात.इतरांपेक्षा तुम्ही पुढे-बिढे जाताय असं त्याना वाटायला लागलं की त्यांचे प्रतिसाद जाणवायला लागतात.आम्ही कसे इतके वर्षं घासतोय वगैरे त्यांना सांगावसं वाटतं.ते बोलूनही दाखवतात.माणसामाणसातलं नातं ओव्हरऑल कितीही चांगलं राहिलं तरी छोट्यामोठ्या गोष्टीतून एक तणावाची रेषा त्या नात्यातून सतत वहात असते.माणसाचा अपरिहार्य इगो हे या रेषेचं कारण असतं.ते वावगंही नसतं.कुणी स्थानिक बुजुर्ग मला मी सध्या काम करत असलेल्या दिग्दर्शकाच्या नावाचं विडबंन करून माझ्या पाठीमागे मला जोरजोरात हाका मारू लागला तेव्हा ती मस्करी की नक्की काय हे समजेना.टीव्हीवर येण्याचा प्रसंग माणसाच्या आयुष्यात काय एकदाच येतो, सारखासारखा मुळीच येत नाही! असा ठाम अध्यात्मिक विचारही एका नोकरदार वडिलधारय़ानं दिला.
पुढची मजा अशी की आमचं नाटक दूरदर्शनवर दोनदा जाहीर झालं आणि दोनदा ते रद्दं झालं! ते आता होतंय की नाही अशी धाकधूक मला लागली आणि आता काय होणार! (म्हणजे आता काही ते होणार नाही!) असा काहीसा भाव समोरच्या चेहेरय़ांवर दिसायला लागला…

Monday, November 15, 2010

कॉमेडी शो “सेवक”

ढाम ढाम तिडकिट तिडकिट… डोक्यात घण बसायला लागले आणि मी उठलो.घड्याळात बघतो तर अडीच.हे कधीचे अडीच? अरे ही तर रात्र! भर मध्यरात्र! गणेशोत्सव गेला, नवरात्र सरली, दिवाळी आली कधी गेली कधी? मग आता एवढ्या रात्री हा नाशिकबाजा कुणाचा? खिडकी बंद करून घेतली.नोव्हेंबर अर्धा सरत आला तरी ती बंद करायला लागत नव्हती.थंडी आता पुढच्याच वर्षी पडणार बहुतेक! तर खिडकी बंद केली.पंखा फूल्लं आहे ना? चार-चारवेळा बघितलं! ढाम ढामच्या कानठळ्या तसाच! या आवाजांची सवय कशी होत नाही आपल्याला? आणि हे डेसिबलचं क्रुसिबल मिरवणारे सगळं होऊन गेल्यावर कसे जागे होतात? तात्विक प्रश्न उभे राहिले.असले प्रश्न उभे करून काही उपयोग असतो का? माझं झोपेतंच असलेलं सुप्त मन मलाच छळायला लागलं.शेवटी खिडकी उघडून शिव्यांची लाखोली वहात (स्व त: ला च!) बाहेर डोकावलो.
मनूच्या सोसायटीतून आवाज येत होता.चार-पाच इमारतींच्या त्या सोसायटीत असंख्य हॅलोजनांच्या प्रकाशात गुलाल उधळून पोरं मनसोक्तं नाचत होती.त्यांच्या तारूण्यातल्या कैफाचा हेवा करावा तेवढा थोडाच.तेच माझ्या हातात होतं.माझा कैफ, वास्तवाचे चटके बसून बसून (ते कुठे बसले हे वेगळं सांगायला पाहिजे का?) कुठल्या कुठे नाहीसा झाला होता.छातीतल्या कफाने उचल खाल्ली.सळसळत्या तारूण्याचा तो अविष्कार डोळे फाड-फाडून बघत, कान खाजवत मी तसाच उभा राहिलो.दिग्मूढ की काय म्हणतात त्या अवस्थेत.पण आता माझ्याच काना-डोक्यातून ढाम ढाम आवाज यायला लागले.खिडकी बंद करून अंथरूणावर येऊन झोपलो तर चादरीतून, गादीतून ढाम ढाम.बाजूला सहचारिणी.तिला ढाम काय किंवा तडाम काय सगळं सारखंच.तिचं घोरणंही आता ढाम- आपलं हे- चांगलंच ठाम स्वरात चालू राहिलं.आता उजाडल्यावर मनूची खबरबात घेणं भाग होतं.
सकाळी उठून मनूच्या सोसायटीचं गेट पार करतो न करतो तोच मागून गलका ऐकू आला- साहेब आले! साहेब आले! मागे बघतो तर हीऽऽ गर्दी!
गर्दीतल्या एकानं कंपाऊंडवर ढकललंच मला आणि सिनेमातल्यासारखी एक अलिशान गाडी सोसायटीच्या आवारात उभी राहिली.एखाद्या महाकाय पक्षाचे पंख हवेत उघडावेत तशी तिची दारं वर उचलली गेली.पांढराशुभ्र हाफशर्ट, पांढरी फूलपॅंट, पांढरय़ा चपला घातलेले मनूसाहेब एका दरवाज्यातून बाहेर आले.कपाळावर भलामोठा उभा कुंकवाचा पट्टा आणि हाताला जाडजूड लाल धागे बांधून नुकतेच देवदर्शन (देव कुठला हे ज्याचं त्यानं ओळखायचं) करून आलेले.दुसरय़ा दरवाज्यातून उतरले काळ्या कपड्यातले दोघे.एके ४७ की ५१ की ५७ की काय ते घेऊन.साहेबांचा जयजयकार संपला आणि काय आश्चर्य! साहेब माझ्याकडेच झेपावले.मला मिठी मारली.कोण म्हणतं साहेब झाल्यावर साहेब जनतेला विसरतात? सुदाम्यासारखं माझ्या डोळ्यात पाणी तरारलं.माझ्या विरलेल्या पॅंटीच्या खिश्यात पोहे सापडताएत का ते मी चाचपू लागलो.
साहेब जिवणी फाकवून हसत विचारत होते, “कॅऽऽय…कसं काय? हे नेहेमीसारखं वेषांतर नाहीए हं! निवाससेवक झालोय मी निवाससेवक!”
अधिक भाबडा(?) होऊन माझ्यातल्या सुदामानं विचारलं, “म्ह-म्हणजे?”
साहेब म्हणाले, “वागाच्ये पंजे… अरय़े यड्या, आमच्या सोसाय्टीनं मला येकमुखानं निवडलंय निवाससेवक म्हणून! आता मी उद्धार करणार!”
मला उद्धार करणं म्हणजे लाखोली वहाणं हेच माहित.मी आ वासला नेहेमीप्रमाणे.
साहेब म्हणाले, “तोंड मिट.आता सगळ्या सोसाय्टीचं कल्याण!” असं म्हणून त्यांनी गाडीकडे बघितलं.म्हणाले, “कशी आहे?” मी सोसायटीकडे बघत होतो.इमारतींचा रंग उडालेला.भिंतींना भेगा.वरच्या मजल्यावर रहाणारे पावसात भिजत नसतील, स्लॅबमधून पाऊसच आत येत असेल.साहेबांनी माझं तोंड खासकन वळवलं, ओरडले, “अरे इकडे बघ! मुद्दाम सफेत गाडी घेतली, नाय तर लोक म्हणायचे काळ्या पैशाची म्हणून!” “तू-तुम्ही घेतली? माझा अडाणी प्रश्न… माझ्या डोक्यावर टप्पल मारून साहेब म्हणाले, “सामान्यच रहा तू नेहेमी.सोसायटीवाल्यांना घ्यायला लावली.नाय तर म्हणालो, कुटलीच कामं होणार नाहीत!”
मनूसाहेबांच्या भाषेत आता बरय़ापैकी रांगडेपणाही आला होता.साहेबांनी माझ्या खांद्यावरून हात घालून मला पुढे ओढलं. “चल!” म्हणाले.मधेच थांबून जयजयकार करणारय़ांना हात दाखवला.भाडोत्री मोर्चेवाल्यांसारखे हात दाखवणारेही थांबले. साहेबांचं चालू झालं, “साल्यांना एकत्र यायला नको कधी.कामं कोणी करायची यावरून नेहेमी हमरातुमरी.सोयी सगळ्या पाहिजेत.संडासची टाकी वहायला नको.पाणी वर चढवायचा पंप बिघडायला नको.चोरय़ा व्हायला नकोत.भिंतीतून, छपराच्या स्लॅबमधून गळती नको.इमारतींच्या आवारात कचरा नको.अरे म हवंय काय?” गुटख्याची पुडी करकचून फाडून तोंडात रिकामी करायला म्हणून साहेब थांबले आणि मी डाव साधला- “पण सहजासहजी घेऊन दिली त्यांनी गाडी?” साहेबांनी तोंड वर केलं. “सॅहॅजॉसॅहॉजी…” तोंडातला गुटखा जिभेने एका बाजूला करून ते पुढे म्हणाले, “त्यांचे सगळे प्रॉब्लेम्स आणखी कठीण करून ठेवणं भाग पडलं!” मी विचारलं, “म्हणज्ये?” बावळट ध्यानाकडे बघावं तसं माझ्याकडे बघत साहेब म्हणाले, “ड्रेनेजचं काम चालू केलं, अर्धवट ठेवलं.पंप नुसता खोलूनच ठेवला.भिंतींना पराती बांधून भर दुपारी ठोकाठोक चालूच ठेवली.पण लोकांची सहनशक्ती चिकार!” असं म्हणून त्यांनी गुटख्याची पिचकारी मारली.पायरीवरच.पुढे बोलायला लागले, “मी त्यांच्यापेक्षा चिवट.शेवटी खोललेल्या ड्रेनेजच्या झाकणात एक म्हातारा पडला आणि एका बाईच्या पाठीत भिंतीवर भर दुपारी ठोकाठोक करणारय़ांची छिन्नी बसली आणि माझं काम सोप्पं झालं!”
आता मी संवाददाता झालो.म्हणालो, “मुदत किती?”
साहेब म्हणाले, “पाच वर्षं!”
मी विचारलं, “त्यानंतर?”
साहेब म्हणाले, “पुन्हा प्रॉब्लेम्स आणखी कठीण!”
“मग?” –मी विचारलं.
ते म्हणाले, “मुदतवाढ!”
“मुदतवाढीच्या टर्ममधे नवीन काय?” मी विचारलं.
ते म्हणाले, “मला नवीन फ्लॅट आणि निवाससेवक परिषदेची स्थापना!”
मी विचारलं, “त्याने काय होणार?”
ते म्हणाले, “प्रगती!”
मी दुरूस्ती केली, “निवाससेवक परिषदेच्या स्थापनेनं काय होणार?”
“तेच सांगतोय ना! निवडणूक होणं बंद!” मला मूर्खात काढत ते म्हणाले.
मी तरीही घेतला वसा सोडला नाही, विचारलं, “त्यानंतर?”
ते म्हणाले, “एक इमारत माझ्या नावावर!”
मी म्हणालो, “शाब्बास!”
ते म्हणाले, “मग आख्खी सोसाय्टी- हा सहनिवास- माझ्या मालकीचा!”
साहेब आणखीही पुढे बरंच म्हणत होते आणि मी श्वास घ्यायला जागा शोधत होतो!

Friday, November 12, 2010

’स्मरणशक्ती वाढीसाठी’ ई-बुक स्वरूपात प्रसिद्ध झालंय मित्रांनो!


माझं ’स्मरणशक्ती वाढीसाठी’ हे मैत्रेय प्रकाशननं प्रकाशित केलेलं पुस्तक ई-बुक स्वरूपात प्रसिद्ध झालंय मित्रांनो! जरूर पहा, वाचा, प्रतिक्रिया द्या!
http://www.sahityasampada.com/

Tuesday, November 9, 2010

प्रायोगिक संस्थेत प्रवेश!

एकांकिका नंबरात आली नाही तरी तिच्याबद्दल बहुतांशी रंगकर्मीच असलेल्या प्रेक्षकांनी बरं बोलणं, प्रमुख भूमिकेला बक्षिस मिळणं हे आमच्या आम्ही चाकरी करत असलेल्या आस्थापनातल्या ग्रुपसाठी खूप होतं.काही काळ आम्ही सगळेच पहिलं बक्षिस मिळाल्यासारखे तरंगत राहिलो.अश्याच माझ्या एका (नशापाणी न करता) तरंगत्या अवस्थेत एकांकिका दिग्दर्शित केलेल्या आमच्या बुजुर्ग दिग्दर्शकाच्या सहाय्यकाने आमच्या प्रायोगिक संस्थेत काम करशील का? असं मला विचारलं.तरंगणारय़ा मला वर आभाळ दोन बोटं उरल्यासारखं झालं.प्रायोगिक संस्था म्हणजे नक्की काय? मला ज्या संस्थेत बोलावलं गेलंय ती नक्की कशा पद्धतीने काम करते? तिचं सध्याच्या प्रवाहात स्थान काय? वस्तू घेण्यासाठी फिर फिर फिरून फेरिवाल्यांकडून भाव करून घेऊनच मग पाच रूपयाची का असेना ती वस्तू घेणं या स्वरूपाच्या महाभागांमधे मी कधीच मोडला जात नव्हतो.त्यामुळे असले प्रश्न माझ्या मनात आलेच नाहीत.मला जणू काही झोकून देण्यासाठी असं काही हवंच होतं.इथे झोकून देणं हे सीमीत अर्थाने आहे हे मी कबूल करतो.नोकरी ह्या दगडावर एक पाय होता.संसार ह्या दुसरय़ा दगडावर पाय ठेवायची मनीषा होतीच.रंगभूमीची काही पार्श्वभूमी असती तर कदाचित आवश्यक चोखंदळपणा आला असता.ज्याच्या याच पायरीवर नव्हे तर पुढल्या प्रत्येक पायरीवर मला उपयोग झाला असता.तरीही सीमीत अर्थाने का होईना आपल्याला त्याक्षणी आवडेल ते करून टाकणं या माझ्या स्वभावानं इतर काही नाही तरी या जगाचं रंगीबेरंगी दर्शन घडवलं.कुठल्याश्या एका कोपरय़ातल्या वसाहतीतून आलेल्या आणि कॉलेजपर्यंत वसाहतीबाहेरचं विश्वच न बघितलेल्या मला ठेचा लागल्या पण स्वत:बाहेरच्या जगाची ओळख झाली.
मी आनंदाने सहाय्यक दिग्दर्शकानं मला दिलेल्या आमंत्रणाची वार्ता आमच्या बुजुर्ग दिग्दर्शकाच्या कानावर घातली. “कुणी विचारलं तुला?” त्यानं विचारलं.मी म्हटलं, “तुमचा अमुक अमुक नावाचा सहाय्यक! मी तयार आहे तुमच्या ग्रुपमधे यायला!” बुजुर्ग म्हणाला, “त्याचा ग्रुप वेगळा.माझा वेगळा.खरं तर मला तुला माझ्या ग्रुपमधे घ्यायचं होतं! तू ताबडतोब त्याला नाही म्हणून सांग! माझ्या ग्रुपमधे यायचा निर्णय तू तुझ्या मनाने, अकलेने घेतलाएस असं त्याला सांगायचं!” मी लगेच पडत्या फळाची आज्ञा शिरसावंद्य मानून तसं त्या सहाय्यकाला सांगितलं.पुढे मला खूप प्रयत्नांनंतर समजलेल्या आणि पचनी पडलेल्या ’हिंदी इंडस्ट्री’ स्टाईलने ’दादाऽऽ’ वगैरे म्हणत सहाय्यकानं माझ्या गळ्यात हात घालून पाठीवर गोंजारून ’आम्ही सगळे एकच आहोत रे!” वगैरे समतागीत सादर केलं.
रंगभूमीसंदर्भातलं शिक्षण हे फक्त ज्याला प्रोसेनियम आर्क म्हणतात त्या रंगमंचाच्या कमानीपुरतं केवळ नाट्यविषयक थेअरीचं किंवा सादरीकरणाच्या प्रत्यक्ष प्रयत्न, अनुभवांचं असत नाही.त्या अनुषंगानं बरंच काही प्रत्यक्ष आयुष्यात शिकवलं जात असतं.दृक श्राव्य माध्यमाच्या ह्या क्षेत्रात लहानथोर माणसांकडून आजही बरंच पदरात पडतं.विशेषत: सेलेब्रेटी या सदराखाली जो बराच मोठा वर्ग आजच्या सर्वव्यापी मालिका क्षेत्रामुळे निर्माण झाला आहे त्यांच्याकडून.आजच्या मालिकांचं हे समाजाला फार मोठं योगदान आहे.
विनोदाचा भाग बाजूला ठेवला तर मला त्या बुजुर्ग दिग्दर्शकाच्या ग्रुपमधे जायला मिळणं हा मोठा योग होता.मुख्य प्रवाहाशी संबंध येणार होता.मुख्य प्रवाहात याक्षणी नक्की काय चाललंय हे बघायला मिळणार होतं.
संस्थेत आलो.ओळखी झाल्या.नवीन स्पर्धा जाहीर झाली.शोमनशीप आणि दर्जा यांचा उत्कृष्टं मिलाफ असलेली सर्जनशील स्पर्धा असा ह्या एकांकिका स्पर्धेचा बोलबाला होता.संस्थेत आल्याआल्याच भूमिका वगैरे मिळेल अशी माझी अजिबात अपेक्षा नव्हती.माझी उमेदवारी करायची तयारी होती.पण मला लगेचच्या निर्मितीत घ्यायचंच असं संस्थेच्या सर्वेसर्वा बुजुर्ग दिग्दर्शकाला वाटत असल्याचं दिसलं.ते का असावं? अशी एक चुटपुटती शंका मला चाटून गेली पण प्रत्येक बाबतीत उगाच संशयाचा घोळ घालत आपल्याच मनात डोलारा उभारण्याचा माझा स्वभाव नसावा.शिवाय समोरून आलेली संधी एकतर नाकारण्याचं, नाकारून उगाच आपण नको तेवढे स्मार्ट (खरे, तत्ववादी हे खूपच मोठे शब्द त्याऐवजी स्मार्ट) आहोत असं चित्र निर्माण करण्याचं किंवा मग त्यांनी ठरवलेलंच असेल तर आपला खरा नकार आढेवेढे स्वरूपात पुढे आणण्याचं त्याक्षणी मला जमलं नाही.भूमिका अनाथाश्रमाच्या ट्र्स्टीची होती.माझ्या आधीच संस्थेत असलेला कार्यकर्ता नट खरंच त्या भूमिकेला सर्वार्थानं योग्य होता.भूमिका दोन छोट्या प्रवेशांची होती.मीच ती करायची असं ठरलं.माझ्या चुटपुटत्या शंकेचं रूपांतर जरा मोठ्या शंकेत झालं.मी हातचा जाईन म्हणून असं झालंय?
या संदर्भात पुढे दोन प्रसंग घडले.एक, संस्थेतल्या एका वरिष्ठानं असं सांगितलं की त्याचवेळी माझ्या व्यक्तिमत्वासारखं व्यक्तिमत्व असलेला एक नट संस्था सोडून गेला होता.मी सापडल्यावर मला ग्रुम करता येईल असा विचार झाला होता.दुसरा, एका नाट्यगृहात मला एका बुजुर्ग निर्मात्या, अभिनेत्यानं ओळखलं आणि तो त्यावेळी बसवत असलेल्या नव्या व्यावसायिक नाटकातल्या अनेक तरूण भूमिकांपैकी एकासाठी त्याने मला विचारलं.हे लक्षात येताच मला जोरात हाका मारून त्याच्यापासून लांब बोलावलं गेलं.तोपर्यंत नाटक म्हणजे फक्त रिहर्सलची मेहेनत आणि प्रयोग एवढंच डोक्यात असलेल्या मला या माध्यमातल्या वेगळ्या पैलूची ओळख व्हायला सुरवात झाली होती.
रिहर्सल सुरू झाली.एखादा विषय देऊन त्यावर अनेक एकांकिका स्पर्धा स्वरूपात सादर होणार होत्या.एक मध्यमवयीन ख्रिश्चन जोडपं.मूलबाळ नसलेलं.नवरा कामगार.जवळच्या जंगलात शिकारीला जाणारा.त्यात रमणारा.मूल नाही म्हणून घरातली स्त्री व्याकुळ झालेली.आणि त्याचवेळी एक गोंडस पोर जोडप्याला सापडतं.ते त्यांच्या घरात राहू लागतं.घरातली स्त्री त्याला आपलं मूलंच मानू लागते आणि अनाथाश्रमाचे ट्रस्टी येऊन तो मुलगा परदेशी दत्तक जाणार हे नक्की झाल्याचं जाहीर करतात.मुलावरून जोडप्याचे आपापसात निकराचे वाद होतात.स्त्री कोलमडून पडण्याच्या अवस्थेत आहे.मुलाला आपलं घर म्हणून हेच आणि आई म्हणून हीच हवी आहे पण… अनाथ मुलानं कुठे स्थिरावायचं हे त्या मुलाच्या मर्जीवर अवलंबून आहे की समाजातल्या तथाकथित व्यवस्थेच्या मर्जीवर?...

Thursday, October 28, 2010

कॉमेडी शो “दिवाळीचा सीझन”

दिवाळीचा सीझन हा आपल्या मनूच्या दृष्टीने फार मोठा असतो.जवळजवळ महिनाभर मनू त्याच धुंदीत असतो.एखाद्या अट्टल नशेकरय़ासारखा.त्याच्या गोड बोलण्याला यावेळी ऊत येतो.मी सतत त्याच्याबरोबर असूनही मला मधूमेह कसा होत नाही याचंच मला नवल वाटतं.या महिन्याभरात मनू कुठेही केव्हाही दिसतो.परमेश्वरासारखा तो सर्वत्र संचार करत असतो.परमेश्वर सर्वत्र संचार करून नक्की काय करतो हे मी पामर काही जाणू शकत नाही.मनू सर्वत्र संचार करून नक्की काय करतो हे मला पक्कं ठाऊक असतं.तो करतो ते मी करू शकत नाही म्हणून त्याच्या दृष्टीने मी सतत पामर ठरत आलो आहे.
शाळेत असताना मी ’बॉयस्काऊट’ मधे होतो.वर्षातून एकदा आम्ही घरोघर फिरून, पडेल ती कामं करून पैसे कमवत असू.त्याला ’खरी कमाई’ असं नाव होतं.मनू आमच्यात नसे.तो नाक्यावर उभा राहून कुणी कुणी टाकलेली सिगारेटची थोटकं शोधे आणि आम्हाला हसे.खरय़ा कमाईतून आम्ही शाळेसाठी देणगी म्हणून काही वस्तू आणत असू.मनू बापाच्या खिश्यातून चोरलेल्या बिड्यांचा धूर काढत आम्हाला मूर्खात काढत असे.आज तो एकही पैसा खर्च न करता दिवाळी साजरी करतो.वाण्याचे, दुधाचे, विजेचे, गॅसचे, अशी असंख्य बिले इमानदारीत भरून आलेली दिवाळी कधी निघून जाते याचा मला थांगपत्ता असत नाही.दिवाळीत माझ्या पाठीचा काटा ढिला झालेला असतो.मनू मात्र टेचात असतो.रोज रंगीबेरंगी वेष्टन असलेले गिफ्ट बॉक्सेस मिरवत, आपलं सुप्रसिद्ध हास्य फाकवत विजेत्याच्या रूबाबात घरी जात असतो.
मनूला सगळ्या कला अवगत आहेत.अडिअडचणीत असलेला माणूस तो आधीच हेरतो.माझ्यासारखा सदैव आणि सर्वत्र अडचणीत पडलेला कफल्लक माणूस त्याच्या कामाचा नसतो.’हेरतो’ म्हणजे तो नेमकं काय करतो ते आता तुम्हाला कळलं असेलच.त्याच्या भाषेत या प्रकाराला फिल्डिंग लावणं असं म्हणतात.मनूला बरोबर माहित असतं की कामाची माणसं या सीझनमधे स्वत: बाहेर पडत नाहीत.आपल्या नोकरांना, चाकरांना पुढे करतात.समोर आलेल्या या प्रतिनिधींना कसं वेठीला धरायचं हे मनूचं ठरलेलं असतं.माझं काय करणार? (म्हणजेच माझ्यासाठी काय आणणार?) हे मनू वेगवेगळ्या पद्धतीने विचारतो.ते पहाणं खूपच गमतीदार असतं.तो कुणाला हात हलवून ओळख दाखवता दाखवता हातानेच ’काय?’ असं विचारतो.कुणासाठी नुसती भुवयांची हालचाल उपयोगी ठरते.मनूचे बोलके डोळे या सीझनमधे बरंच काम करून जातात.रात्री तो ते एका बंद पेटीत काढून ठेवत असावा असा माझा दाट संशय आहे.त्याशिवाय ते दुसरय़ा दिवशी काम करणारच नाहीत.
कुणाला हात मिळवून तो हळूच दाबणं, “याद है ना?” “काय करताय?” असं चक्कं विचारणं, या सगळ्या प्रकारांनी साधलं नाहीच तर गुरकावणं हे मनूचं दिवाळी भेट मिळवण्याचं अस्त्रं असतं.नेहेमी दिवाळी न देणारय़ांना या सीझनमधे तो हाडवैरय़ासारखा वागवतो.नेहेमी देणारे हे त्याच्या दृष्टीने परमेश्वर असतात.ज्याने मूक होकार दिलाय त्याला मनू बरोबर हेरतो.या हेरण्यावरून मला नेहेमी वाटतं की मनू पोलिसात किंवा सीबीआयमधे असायला हवा होता.गुन्हेगार शोधण्याचं मरू द्या हो, मनू एव्हाना करोडपती तरी झाला असता.बिना लाईफ लाईन के! तर अश्या हेरलेल्या सावजाचा माग काढत त्याच्या ऑफिसपर्यंत जाणं आणि दिवाळी पदरात पाडून घेणं ही मग फारशी कठीण गोष्टं रहात नाही.
मनूचं हे सगळं मला अजिबात पटत नाही.माझ्या नेहेमीच्या केविलवाण्या पद्धतीने मी या सगळ्याचा त्याच्याजवळ निषेध व्यक्तं करायचा प्रयत्न करतो. “तुला हे जमत नाही ना म्हणून तुझी जळते!” हे मनूचं त्यावरचं उत्तर.त्यानंतरचं त्याचं ते सुप्रसिद्ध फवारा उडवत कुत्सित खिदळणं.माझी तळपायाची आग मस्तकाला भिडते.मग मी हजारापासून उलटे अंक मोजायला सुरवात करतो.यावेळी मनूने तीही संधी दिली नाही आणि मी उसळलोच, “अरेऽऽ भीकेची लक्षणं आहेत हीऽऽ…” ओरडल्यावर मी नेहेमीप्रमाणे चपापून इकडेतिकडे बघितलं.प्रत्येकजण आपापल्या सावजाला आपल्याला पद्धतीने पटवून दिवाळी गटवण्याच्या खटपटीत असलेला मला दिसला.मग मी मनूकडे पाहिलं.तो हसला.त्याचं हे हसणं भयानक असतं.इथे माझा जीव जात असतो.सात्विक संताप अनावर झालेला असतो.मनू पुन्हा हसतो.मला हसावं की रडावं कळत नाही.माझा हात धरून तो मला खाली बसवतो.कुणाच्या तरी नावावर चहा मागवतो आणि आपल्या अत्यंत मृदू, मुलायम आवाजात प्रवचन सुरू करतो.एव्हाना मला तो कुणी ’बापू’ किंवा ’महाराज’ सारखा दिसायला लागतो. “पोस्टमन काय करतात? पालिकेचे कामगार काय करतात? बेस्टवाले, रेल्वेवाले आणि आणखी कुठलेही वाले काय करतात?- दिवाळी आली की ’बंद’ करतात! आपली जनता वर्षानुवर्षं या ’बंद’ च्या कडीकुलपात अडकलेली अडकते.काय बोलते का ती? तोंड आहे का तिला? करं कोण भरतं? त्या भरलेल्या कराचा फायदा कोणाला? मूकबधीर जनतेला कुठल्या डॉक्टरकडे न्यायचं?”
च्यामारी! मी काही वेगळंच बोललो होतो आणि मनूची गाडी नेहेमीप्रमाणे वेगळ्याच रूळावर? मी पुलावर आणि तो रूळावर? माझा ’आ’ वासलेलाच राहिला.
“यड्याऽऽ यातले दोन बॉक्स तूही घेऊन जा!” असं म्हणून मनूने मला टप्पल मारली तेव्हा जगातला सर्वात मूर्ख माणूस मीच याची पूर्ण खात्री मला पटली!

Saturday, October 23, 2010

नाटक_एकांकिका स्पर्धा!

स्थानिक पातळीवर एकांकिका, नाटक करत असताना त्याचंच कंटिन्युएशन व्हावं, तेच मागील पानावरून पुढच्या अधिक आकर्षक पानावर चालू रहावं अशी स्थिती मी काम करत असलेल्या कार्यालयात निर्माण झाली.माझ्याच शाखेत एक चळवळ्या निघाला.चांगलाच चळवळ्या.स्वस्थं बसला असला तर मोठ्या आवाजात गप्पा, कुणाला तरी सुनावणं.नाहीतर सारखी धावपळ.पक्षकार्य, संघटनाकार्य.नाटकाच्या बाबतीत इतका विरळा की तुम्ही नाटकात काम करा मी बाकीचं बघतो! असं म्हणणारा! अशी माणसं दुर्मिळ!
पण…या त्याच्या कार्यबाहुल्यामुळेच आंतरकार्यालयीन स्पर्धेतली आमची एकांकिका न होण्याची पाळी आली होती.ह्या आंतरकार्यालयीन स्पर्धेला रंगभूमीसंदर्भात खूप मानाचं स्थान होतं.चांगले, वेगवेगळे प्रयोग जसे या स्पर्धेने दिले तसे चमकणारे अनेक तारे ह्या स्पर्धेने पुढे आणले.काही कार्यालयांचे स्पर्धेतले प्रयोग, विशेषत: स्पर्धेची अंतिम फेरी हाऊसफूल्ल होत असे.स्पर्धेला आता टीव्ही मालिकांना असतं त्यापेक्षाही जास्त ग्लॅमर होतं.आमच्या शाखेतला तो चळवळ्या प्रचंड बिझी.लोकसंग्रह खूप.कुणाच्याही अडिअडचणीला धावून जाण्याचा स्वभाव.आमच्या आस्थापनातला प्रायोगिक रंगमंचावर कार्यरत असलेला एक रंगकर्मी नुकताच काळाच्या पडद्याआड गेलेला.स्पर्धेत उतरण्यासाठी बाहेरचा चांगला अनुभवी व्यावसायिक दिग्दर्शक पैसे देऊन आणायचा ही आयडिया आमच्या संघटकाच्याच डोक्यातली.त्यानं त्याप्रमाणे फिल्डिंग लावली.सगळं ठरलं.आता दिग्दर्शक येणार, व्यवहाराचं फायनल होणार त्यादिवसात आमचे हे साहेब गायब.नक्की काय झालं हे आमच्या गावीच नाही! आम्ही बाकीचे सगळे जमलो.दिग्दर्शक येणार नाही असा निरोप.दुसरय़ा दिवशी आमचे संघटक जाणार दौरय़ावर.ते रजेवरच.निरोप नाही काही नाही.मग मी जाऊन पोचलो.कसातरी धीर एकवटून.काय बोलायचं असतं अशावेळी काही अनुभव नाही.दिग्दर्शक सांगितलेल्या ठिकाणी वेळेवर.माझी हजेरी!
“काल येऊन तासभर वाट बघून गेलो. ×× बनवायचे धंदे कशाला करता? कधी भेटणार तुमचा तो संघटक? आजचा शेवटचा दिवस.आज तो भेटला नाही तर मी करत नाही!” हे ऐकून मी संपलोच.अजीजीने आम्हा सगळ्या नव्या मुलांचा इंटरेस्ट किती आहे ते सांगितलं.संघटक नाही.सगळं जमत आलेलं एवढ्यावरच थांबतं की काय?
पण आमचा संघटक खराच संघटक.म्हटलं तर चतुर.म्हटलं तर सारवासारवीला उत्तम.कसाही त्यावेळी तो वाटला तरी नाटकाबद्दल त्याला प्रचंडच.पडद्यामागे काय झालं माहिती नाही पण आमची एकांकिका पडद्यावर येण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या.मी त्या दिवशी त्या दिग्दर्शकाला भेटलो नसतो तर मॅटर पुढे सरकलं नसतं असं आपलं मला वाटलं.
वेळेवर काय बरय़ाच वेळा वेळेच्या आधीच येणं या (दुर)गुणापासून मी कधी मुक्त होणार कुणास ठाऊक? आपल्याकडे भारतीय प्रमाणवेळेचंच महत्व अधिक.दिग्दर्शक वेळेचा भोक्ता.दिग्दर्शकासह आम्ही चार-दोन टकली वेळेवर.इतरांची डोळ्यात प्राण आणून वाट बघत.
वेळेवर येण्याबरोबर आपल्याला खरंच जिथे शिकायला मिळतंय असं दिसतं तिथे स्मार्टनेस दाखवायचा नाही.उगाच पुढे पुढे करायचं नाही.हे दोन्ही या क्षेत्रात (दुर)गुणंच! पण यावेळी तरी मला वेळेवर येणं, सांगितलं जाईल ते मन लाऊन करणं यामुळे एका छोट्या सीनचे दोन मोठे सीन्स करायला मिळाले.एक अतिउत्साही नट, आमचा सिनीयर, विनोदाचा बादशहा(?) करत असलेला एक सीन केवळ तो आगाऊ असल्यामुळे आणि वेळेवर न येण्याचा, न सांगता न येण्याचा भोक्ता असल्यामुळे आऊट झाला.दिग्दर्शक शिस्तीचा वाटत होता.करत असलेल्या कामाबाबत चांगलाच गंभीर दिसत होता.या व्यतिरिक्त दिग्दर्शकाला विनोदाची उत्तम जाण दिसत होती.पूर्णपणे नव्या मुलांकडून काम करून घेणं प्रचंड डोकेफोडीचं काम.पण दिग्दर्शक चांगला शिक्षकही दिसत होता.
ही एकांकिका एक समूहनाट्य होतं.एका कारकूनाचा व्यर्थ दिनक्रम उपरोधिक विनोदी पद्धतीनं मांडला होता.लेखक नावाजलेला विनोदी एकांकिकाकार होता पण व्यसनानं घेरलेला.समूहाच्या रचनांनी एक एक प्रवेश बसत होता तसं तसं आम्ही सगळी नवीन मुलं त्यात रंगून जात होतो.विनोदी प्रसंगांची उतरंड होती आणि दिग्दर्शक त्यात आणखी हशे मिळवण्यासाठी सुयोग्य ऍडिशन्स देण्यात मास्टर होता.
एका प्रवेशात मी नायक कारकूनाचा बाप झालो होतो.तोंडासमोर सतत पेपर धरलेला.आपलं ठाम मत लादून झाल्यावर कारकून, कारकूनाची आई यांच्या बोलण्यावर फक्त हां! हूं! अशा रिऍक्शन देणारा.दिग्दर्शकाने या रिऍक्शन्सवर हशे अर्थात लाफ्टर्स योजले होते.तो हे सगळं कसं करायचं हे मला समजावून सांगत होता आणि मला काही केल्या काय करायचं, ते कसं करायचं हे समजत नव्हतं.
हा प्रवेश हातचा निसटून जाईल या भीतीने असेल कधीही स्वत:हून न बोलणारा, विचारणारा मी यावेळी बोललो.त्यावेळी व्यावसायिक रंगमंचावरचं एक नावाजलेलं शोकांत नाटक नुकतंच टीव्हीवर दाखवलं गेलं होतं.म्हातारा, म्हातारी या दोनच पात्रांच्या हलक्याफुलक्या संवादांतून ही शोकांतिका फुलत जाते.त्यात म्हातारय़ाची भूमिका करणारय़ा बुजुर्ग नटाची बोलायची एक लक्षणीय स्टाईल होती.ती मी माझ्या प्रवेशातल्या मी करत असलेल्या बापाच्या भूमिकेत करू का? असं दिग्दर्शकाला धाडस करूनच विचारलं.तो एव्हाना कंटाळला असावा.त्यानं होकार दिला.
माझा तो प्रवेश छोटासाच होता पण दिग्दर्शकानं योजलेल्या माझ्या भूमिकेतल्या त्या सगळ्या जागांना चांगलेच लाफ्टर्स मिळाले.मी खूष! स्पर्धेतल्या विनोदी एकांकिकांना त्यावेळी बहुतेकवेळा पहिल्या तीन नंबरात स्थान मिळत नसे.आमच्या एकांकिकेला ते मिळालं नाही पण कारकूनाची मुख्य भूमिका करणारय़ा आमच्या मित्राला नंबरात स्थान मिळालं.दिग्दर्शकालाही बक्षिस मिळालं.नव्या ग्रुपच्या मानाने हे चांगलंच होतं.
मी माझ्या भूमिकेत चक्कं नक्कल केली होती.आजच्या कॉमेडीच्या जमान्यात ती वर्ज्य मानली जात नाही पण मी त्यावेळी सहज सापडलेला मार्ग अनुसरला होता.मी शोधला असता तर मला आणखी वेगळा आणि चांगला मार्ग सापडला असता.पण मी नवीन होतो.
या सगळ्या घडामोडीतून मलाही माझं बक्षिस मिळालं.पण त्याविषयी पुढच्यावेळी!

Thursday, October 21, 2010

’दीपज्योती’ डिजीटल दिवाळी अंकात माझ्या कथा!

मित्रांनो! जालरंग प्रकाशनचा ’दीपज्योती’ दिवाळी अंक प्रकाशित झालाय.कथा, कविता, अनुभव, पुस्तक परिचय इत्यादी विविध साहित्यप्रकारांनी नटलेल्या या अंकात माझ्या ’डॉक्टर’ आणि ’समशेर’ या दोन कथा सामील झाल्या आहेत.’दीपज्योती’अवश्य वाचा आणि प्रतिक्रिया द्या! दुवा आहे: http://diwaaliank.blogspot.com/search/label/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95%20%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%A4

Wednesday, October 20, 2010

मनू, मी आणि दिवाळी अंक!

मनू हा माझा मला न टाळता येणारा सहचर आहे हे वाक्य जेव्हा मला सुचलं तेव्हा मी स्वत:वर जामच खूष झालो.नाहीतरी काळ्यावर पांढ- माफ करा- पांढरय़ावर काळं करणारे किंवा आजच्या जमान्यात हवेतल्या हवेत ब्लॉगपोस्ट्सरूपी बार उडवणारे स्वत:वर खूष असतातच म्हणे!
एरवी जगात इतक्या वेगवेगळ्या नात्यांमधे मनू मला भेटतो की तो म्हणजे कोण याची व्याख्या करणं कठीण.ह्या नात्यांच्या गुंतागुंतीत अडकून माझाच मनू होतोय की काय असं वाटायला लागलं आहे.
मी लिहितो.आपल्या भाषेलाच घरघर लागली आहे असं म्हणताना मी काय तारे तोडतोय ते तुमच्या समोर आहेच.तारे तोडता येईनात आभाळच वाकडं अश्या एका संभ्रमित सर्जनावस्थेत (?) मी एक कादंबरीच लिहिली आहे असा एक दिवस माझा समज झाला.सालं हे एक मोठं धाडसंच होतं.झालं! मला झोप लागेना.
याच दरम्यान कधीतरी मनूची आणि माझी भेट झाली.
“दिवाळी अंकाची तयारी करतोय!” चेहेरा लांबट करून तो तसाच ठेवत, केसांच्या रूपेरी बटांशी खेळत तो म्हणाला आणि टक लाऊन माझ्याकडे पहात राहिला.
“व्वा! व्वा! अरे तू म्हणजे-” भानावर येऊन मी म्हणालो.
“तू नाही! तुम्ही-तुम्ही!!” आख्ख्या डाव्या हाताने बटा कपाळावरून डोक्यावर सरकवत तो आत्मविश्वासाने म्हणाला.हसलाही नाही.
“हो…हो…तुम्ही-तुम्ही...अभिनंदन…आणि-आणि ऑल द बेस्ट!” एवढं बोलून झाल्यावर मनूच्या एकूण अवतारा-अविर्भावाकडे बघून मी गप्पच झालो.तो टक लाऊन बराच वेळ माझ्याकडे पहात राहिला आणि गाल वाकडा करणारं संपादकीय स्माईल करून दिसेनासा झाला.
मजा म्हणजे त्या दिवसांत आम्ही बरय़ाच वेळा भेटलो.वेगवेगळ्या छायाचित्रणस्थळी त्याच त्या संवादांचे प्रसंग सादर व्हावेत तसे तोच तोच सीन सादर होऊ लागला.मनू तसाच करडी टक लाऊन ’दिवाळी अंकाची तयारी करतोय’ असं सांगतोय, त्याच्या टक लावण्याने हैराण होऊन मी गप्पं होतोय, तो दिसेनासा होतोय!
बरय़ाच गोष्टींचे अर्थ मला झोपेतून दचकून जाग आल्याशिवाय कळतंच नाहीत.मनूच्या टकीचा अर्थ असाच लागला. ’मी माझं लिखाण तुला देऊ का?’ असं मी होऊन मनूला विचारायला हवं होतं.मी प्रथितयशच काय एखादा बनचुकाही लेखक झालेला नसल्यामुळे मी गरीबडा बापडा गप बसत होतो.त्यात मी आधीच केलेलं नको ते धाडस.हातातल्या लिखाणाला कादंबरी समजण्याचं.
मनू माझा जिवलग.तो मला थेट का विचारत नव्हता?... याचा अर्थ मला गरज होती!!! हा साक्षात्कार झाल्यावर मात्र मी बैचेन झालो.संधी एकदाच येते व दार ठोठावते हे व अशा अर्थाची देशी मॅनेजमेंट गुरूंची अनेक मुक्ताफळं माझ्याभोवती दिवसरात्र पिंगा घालू लागली.शेवटी मी मनाचा हिय्या केला.मागच्या अनेक वेळच्या तू-तुम्ही मुळे मनूला प्रत्यक्ष भेटण्याचं धाडस म्हणजे आणखी एक नको ते धाडस आणि मी पडलो मध्यमवर्गीय.शेवटी हो-ना करता करता माझी कादंबरीची संहिता कुरियरद्वारे मनूच्या पत्त्यावर पाठवून दिली.अर्थात तू-तुम्हीच्या खेळामुळे हा कोण? असा वाजवी प्रश्न पडून संहिता न वाचताच (केराच्या टोपलीत) पडू नये म्हणून सोबत माझा परिचयही जोडला.
आठ दिवसातच स्वत: मनूचा फोन आला आणि माझा आनंद गगनात मावेना.परिचय जोडण्याचा विक्षिप्तपणा का केलास म्हणून त्याने सर्वप्रथम माझी हजेरी घेतली.मी ते ही वाचलं असं त्यानं मुद्दाम नमूद केल्यासारखं सांगितलं.माझ्या अक्षराचं त्यानं मनापासून कौतुक केलं.हा मनू की डेल कार्नेजी ते मला कळेचना.तो मला चक्कं अहो-जाहो करत होता.मी ताबडतोब हरभरय़ाच्या झाडावर चढलो.
“पण सॉरी… माझं या वर्षीच्या अंकाचं काम झालंय-”
“एवढ्यातच?ऽऽऽ” मी जोरात किंचाळून खजुराच्या झाडावर लटकलो.
“यावेळी काय? नेहेमीच! एक दिवाळी अंक छापून आला की लगेच पुढच्या अंकाची तयारी!”
“सहा महिने आधीच अंकाचं काम पूर्ण?” माझ्या पडण्याला आता बुचकळाही कमी पडत होता.
“माझी पद्धतच आहे तशी! न छापलं गेलेलं चांगलं साहित्य मी पुढच्या वर्षीसाठी राखून ठेवतो.” मनूचा स्वर अधिकाधिक मृदू, मुलायम होत होता.अशावेळी आवाजात थोडी बायलेपणाची छटाही डोकावते.माझ्या डोळ्यासमोर अंधारी येत होती.
“मग?” मनूनं जरा चढ्या स्वरात विचारलं.
“…पण…कसं वाटलं तु-तुम्हाला?” मी.
“चांगलंए…वेगळंए…पण कायए…पुढच्या वर्षीचंसुद्धा प्लानिंग झालेलंए त्यामुळे-”
अरे बापरे! मी मनातल्या मनात म्हणालो.मनूच्या अंकाला खरंतर बाजारात कोणी विचारत असण्याची शक्यता कमी होती.खरं तर म्हणूनच मी एवढं मोठं धाडस करायला धजलो होतो.मग मी फोन ठेवण्याच्या बेताला आलो.
“तरीही मला भेटा तुम्ही…संहिता परत घेऊन जा.आणखी कुठे जरूर प्रयत्न करा…संहिता घ्यायला प्रत्यक्षच आलात तर बरं होईल…कायए…दुसरा एक अंक काढतोय…कृषीविषयक…द्या तीन-चार पानी काही.चांगलं लिखाणए तुमचं…अक्षर सुंदरए-”
“कृषीविषयक काहीही लिहिता येणार नाही हो मला! काळ्या आईचा आणि माझा आयुष्यात कधी संबंधच आलेला नाही!” मी केविलवाणा होऊन कळवळून म्हणालो.
“मला भेटा!” आयुर्विमा एजंटच्या अविर्भावात मनू म्हणाला, “सोपं आहे हो मी तुम्हाला ब्रीफ करीन.काही कठीण नाही.तुम्ही सहज लिहाल.” मनूनं मला डायरेक्ट पंखाखालीच घेतलं पण माझं मन मला शंभर पानांवरून एकदम चार पानांवर येऊ देईना.शिवाय मागणीनुसार लेखन अर्थात ऑन डिमांड रायटिंगमधे सापडून डोक्याचं जे भजं होतं त्याच्याशीही मी परिचित होतो.
“केव्हा भेटता?” –मनू
“भेटतो…लवकरच…” –मी
“हं!...एरवी काय करता?”
“नोकरी”
“कुठे?”
“सरकारी खात्यात आहे…कारकूनच…नुकताच जाहिरात आणि प्रसिद्धी विभागात बदलून आलोय…” “तिथे ते हे आहेत का हो अजून…”
मी हो हो म्हटल्यावर मनूने मग ते कसे माझ्या चुलतबहिणीच्या मामेनणंदेचे मावसदीर आहेत, माझ्या चांगल्या ओळखीचे आहेत वगैरे पद्धतीने हळदीकुंकवाचा कार्यक्रम मांडला.मला हो ला हो करणं भाग होतं.
“एनी वे…भेटा मला.बोलू आपण.”
“थॅंक्यू व्हेरी मच साहेब! हल्लीच्या साभार पोच इत्यादी सगळं काही नामशेष झाल्याच्या जमान्यात आपण आवर्जून फोन केलात त्याबद्दल!”
मनू मनापासून कौतुकाने हसला.या! असं म्हणून त्याने फोन ठेवला.
नकार पचवणं खूप अवघड असतं.तुम्ही सामान्य असलात तरीही.नैराश्याचं मळभ दाटून रहातं.अश्यावेळी मी अधिक सर्जनशील कामांकडे वळतो.कपड्यांच्या घड्या घालणं, घरातला पसारा आवरणं, मुलाचा अभ्यास आता मी घ्यायलाच पाहिजे असं स्वत:च्या मनाशी म्हणणं…
यावेळी बाहेरगावीच जायचं असल्यामुळे निर्धास्त झालो.त्या आधी मनूच्या घरी माझ्या कादंबरीची संहिता परत घेण्यासाठी फोन केला.मनूच्या कोण्या नातेवाईकाने तो घेतला.चुकतमाकत अमुक वाजता या, भेट होईल, संहिता मिळेल असा निरोप त्याने दिला.घरी गेलो.मनू नाही.दुसरय़ाच दिवशी गावी जायची तयारी बाकी असल्यामुळे अजून अर्धा तास वाट बघणं मला शक्य नाही.मग भ्रमणध्वनीचा सहारा.संहितेची शोधाशोध.संहितेचं सापडणं (एकदाचं!) आणि शोधणारय़ा पात्राचे आभार मानून माझं तिथून निघणं.बाहेरगावी जाणं आणि सगळं विस्मृतीत ढकलणं जाणं…
“हॅलोऽ–”
“हॅलो…”
“हॅलो मी बोलतोय!”
“कोण मी?” बाहेरगावाहून आल्यापासून हा तिसरा प्रथमपुरूषी एकवचनी.दोघांना मी आधीच गारद केलेलं.आता मी हातघाईवर.
“मीच!”
“च्यामारी-”
“कृषीविषयक लिखाणाचं कुठपर्यंत आलंय?” आधी पारा चढू द्यायचा मग त्यावर बायकी शैलीत पाणी- संपादकी हतकंडे- माझ्यातला होतकरू आणि जागरूक लेखक लगेच जागा झाला.
“सा- साहेब- झालाच-झालाच आहे- शेवटचा हात फिरवतोय-” माझी लोणकढी.
“हं…दोनच पानी झाला असता-”
“हो- होईल-” माझ्यातला अगतिक लेखक.
“पण माझं त्या पुढच्या वर्षाचंही काम झालंय…”
आता माझ्यातला होतकरू, जागरूक, अगतिक लेखक इतकंच काय सज्जन माणसाचाही कडेलोट झाला आणि माझ्या मनात फुल्या फुल्या आणि फुल्याच.त्यात मध्यमवर्गी विवेकाचं आगमन.या सगळ्यामुळे माझ्याकडून भला मोठ्ठा पॉज.
“ऑफिस काय म्हणतंय?” मनूचा आवाज आणखी बायकी.आणखी खवचट.
यापुढे मात्र चमत्कार झाला.माझ्यातोंडून दत्तगुरू वदले असतील- नसतील- आमच्या गल्लीतले बापू तरी नक्कीच वदले असणार!
“एक जाहिरातदार भेटले होते ऑफिसात.कुणी दिवाळी अंक काढत असेल-” माझी लोणकढी मला पूर्ण करावीच लागली नाही.
“आहात तिथेच थांबा.मी ताबडतोब येतोय!” खट्ट!- रिसीवर आपटल्याचा आवाज!
पर्वतच महंमदाकडे येत होता.
यशस्वी साहित्यिकाची सगळी बीजं माझ्यात होती तर!
निदान कृषीसाहित्यिकाची तरी!
संमेलनाध्यक्ष होणं आता मला अजिबात कठीण नव्हतं!
मी लगेच स्वत:वर खूष झालो आणि माझ्यातल्या साहित्यधर्माला जागलो!

Tuesday, October 19, 2010

’बुक गंगा’ वर माझी तीन पुस्तकं!

आता बुक गंगा या ऑनलाईन बुक स्टोअरवरही माझी आवर्त (नाटक), पुलाखालून बरंच (कादंबरी), स्मरणशक्ती वाढीसाठी (स्वयंविकास) ही पुस्तकं रूजू झाली आहेत!
पहा: http://www.bookganga.com/eBooks/Books?AID=5081606839785976727

Sunday, October 17, 2010

बंद...आयुष्य...

झापडबंद आयुष्यांनी
कानात इअरपीस खोचून
स्वत:ला साफच
डबाबंद करून घेतलेलं...

Thursday, October 14, 2010

नाटक आणि मुख्य प्रवाह!

रंगमंचावर भर प्रयोगात ब्लॅंक होणं ही एक शोचनीय अवस्था असते.अभिनेत्यासाठी एक मरणप्राय स्थिती.अचानक वीजेचा प्रवाह खंडित व्हावा आणि डोळ्यासमोर काहीच दिसू नये तसं मेंदूत होतं.भानावर येईपर्यंत स्मृतिभ्रंश म्हणजे काय त्याची प्रचीती येते.पण म्हणून त्याचा ताण घेऊन काहीच होत नाही.ब्लॅंक होणं अभिनेत्याच्या हातात नाही.मग अभिनेत्याच्या हातात काय आहे?
याबाबत थोर अभिनेते डॉक्टर श्रीराम लागू एका तत्वाबाबत सांगतात ते आठवतं.थोर बंगाली दिग्दर्शक शंभू मित्रा यांनी हे तत्व डॉक्टरांना सांगितल्याचं डॉक्टर सांगतात.
“अभिनेता हा एकाच वेळी athlete आणि philosopher दोन्ही असायला हवा!” ब्लॅंक होण्याच्या संदर्भात याचा असा अर्थ लागतो की अभिनेत्यानं आपलं शरीर एका खेळाडूसारखं लवचिक ठेवायला हवं आणि त्याचवेळी त्याचं वाचन, चिंतन आणि मनन हे प्रगल्भ होत रहावं.यामुळे अभिनेत्याची एकाग्रता विकसित होऊ लागते आणि रंगमंचावर ब्लॅंक होणं, संवाद न आठवणं, संवादातला एखादा शब्दं न आठवणं किंवा “बघ! कसा घमघमलाय चाफा!” असा एक रोमॅंटिक डायलॉग बोलताना एका प्रयोगाला माझ्या तोंडून “बघ! कसा चमचमलाय गाफा!” असं निघून गेलं, असे अपघात होण्याचं टळतं.अपघात आपल्या हातात नसतात पण ते कमीतकमी व्हावेत यासाठी पूर्वयोजना करता येते.या ही पुढे जाऊन एक सुप्रसिद्ध वचन अभिनयासंदर्भात सांगितलं जातं ते म्हणजे “इतर कलांसारखं वादक वेगळा आणि वाद्य वेगळं असं अभिनयात नसतं.अभिनेता हा स्वत:च वाद्य असतो आणि तो स्वत:च या वाद्याचा वादक असतो!” एखादा तंबोरा लावणं किंवा ट्यून करणं आणि अभिनेत्यानं स्वत:ला ट्यून करणं ही दोन्ही कौशल्य मागणारी काम आहेत.अर्थात स्वत:च स्वत:ला ट्यून करणं हे जास्त कठीण आहे.ती एक सततची प्रक्रिया आहे.
मी त्यावेळी नवा होतो.स्थानिक रंगमंचावर काम करत होतो.वरचं सांगितलेलं सगळं मी वाचलेलंही नव्हतं.विज्ञान आणि जीवनात घडणारय़ा अतार्किक घटना असा झगडा नाटककारानं मांडला होता.पांगळ्या मुलाच्या बापाच्या भूमिकेत मी होतो आणि अतार्किक घटनांना अंधश्रद्धा म्हणत होतो.नाटककारांनं या अतार्किक घटनांना वलय दिलंय असं जाणवत होतं.आपल्या पांगळ्या मुलाचे पाय बरे व्हावेत म्हणून अवैज्ञानिक उपाय योजून, मुलाशी खोटं बोलून त्याला बरं करावं हे बापाच्या तत्वात बसत नव्हतं.हॉस्पिटलचा डीन विज्ञानाचा विद्यार्थी असूनही ’रूग्ण बरा करण्याचा उपाय कुठल्या प्रकारचा आहे हे महत्वाचं नसून तो पूर्ण रोगमुक्त होणं जास्त महत्वाचं आहे’ या विचाराचा.तो एका कॅन्सर पेशंटला मुलाचा दिवंगत आजोबा बनवून मुलाला बरं करायचा घाट घालतो.बाप आडकाठी करतो.मुलासमोर पेशंटचं खरं स्वरूप उघड करायचा प्रयत्न करतो.तो पेशंट तिथून निघून जाणार इतक्यात मुलगाच तो जाणार या धक्क्याने धावत ’आजोबा’ म्हणत त्याला बिलगतो.शेवटचा परिणामकारक धक्का.मुलाचे पाय बरे होतात पण ते असे!
प्रयोग जवळ आला आणि पेशंटची महत्वाची भूमिका करणारा मित्र प्रचंड आजारी पडला.त्याला अंथरूणातून उठताच येईना.त्याचा ताप उतरेना.दोन दिवस हॉस्पिटलमधे दाखल करावं लागलं.मी आणि दिग्दर्शक रंगमंचावरची आणि बॅकस्टेजची तयारी करण्यात गुंतलो होतो.दिग्दर्शक एकाच वेळी गणोशोत्सवाच्या डेकोरेशनसकट सगळ्याच गोष्टीत बिझी होता.पेशंटच्या भूमिकेतल्या मित्राच्या प्रकृतीची गंभीर स्थिती बघता नाटक कॅन्सल करावं लागेल असं वाटायला लागलं पण जोपर्यंत ’ती’ वेळ येत नाही तोपर्यंत नाटक रद्द करायचं नाही असं दिग्दर्शकानं ठरवलं.दिग्दर्शकासारख्या नेत्याची अशा आणिबाणिच्या प्रसंगीची भूमिका खूप महत्वाची असते.आमचा दिग्दर्शक त्याच्या या भूमिकेवर ठाम होता.
आमचा तो प्रचंड आजारी मित्र घरच्यांचा विरोधालाही न जुमानून उभा राहिला.त्याचा प्रवेश झाला की रंगमंचामागे जाऊन तिथे ठेवलेल्या कॉटवर तो झोपत होता आणि पुढचा प्रत्येक प्रसंग सादर करत होता.आम्ही सगळेच टेन्शनमधे होतो.आम्हीच काय नाटक वसाहतीतच असल्यामुळे मुख्य नट आजारी आहे हे सगळ्यानाच माहित होतं.नाटकातल्या संघर्षाला, नाटकातल्या पुढे काय होतंय या उत्सुकतेला आमचा हा मित्राच्या आजारामुळे आणखी एक उत्सुकता जोडली गेली.
आमच्या त्या मित्राला हॅट्स ऑफ! शेवटचा महिनाभर रिहर्सल मिळालेली नसताना, प्रचंड आजारपणाचा सामना करावा लागलेला असताना, प्रयोगाच्या आधी इंजक्शन्स आणि प्रयोग चालू असताना गोळ्या औषधांचा मारा चालू असतानासुद्धा आमच्या त्या मित्राने नाटक नुसतं पार पाडलं असं नाही तर आपली भूमिका उत्तम पार पाडली.पर्यायानं नाटक उत्तम झालंच.नाटकातल्या पेशंटचा पार्ट त्याला सोपा गेला असेल असं कुणीतरी विनोदानं म्हणालं पण तसं अजिबात नसतं.माणसाची इच्छाशक्ती त्याला डोंगराएवढं बळ देत असते. मी हे सगळं इतक्या जवळून बघत होतो.
ब्लॅंक होणं हा एक प्रकार आणि प्रचंड इच्छाशक्तीनं असा डोंगर उचलणं हा दुसरा प्रकार.दोन्ही प्रकारातला माणूस सारखाच.ब्लॅंक होणं आपल्या हातात नाही पण इच्छाशक्ती लाऊन आपलं काम चांगलं करण्याचा ध्यास केव्हाही आपल्या हातातलाच!
माझ्या भूमिकेचं काय झालं? या आधी एक एकांकिका (पहिलीच) केली होती त्यावेळसारखाच अनुभव.माझ्याकडून कुणीतरी करून घेतल्यासारखं माझं काम कुठेही न थांबता पार पडलं.माझी वेशभूषा अगदीच नेहेमीची होती ती जरा ग्लॅमरस हवी होती असं एक मत आलं.त्यासाठी आपण स्वत:ही जागरूक असायला हवं असं वाटून गेलं.मी केलेल्या त्या पहिल्या एकांकिकेचा दिग्दर्शक म्हणाला “टेन्शन! टेन्शन! सगळ्या बॉडीत टेन्शन जाणवत होतं! उभा असताना! हालचाली करताना!” ते ऐकल्यावर ’हे टेन्शन आता आणि कसं घालवायचं?’ या विचाराचा भुंगा माझ्या मागे लागला.टेन्शन जाणवत होतं म्हणजे नक्की काय होत होतं?...
योगायोग म्हणा, सगळं जमून येतं म्हणा, अमूक एक पिरियड फेवरेबल असतो म्हणा; स्थानिक पातळीवर मी इथपर्यंत आलो असताना याचंच कंटिन्यूएशन होण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली.मी काम करत असलेल्या कार्यालयात एक चळवळ्या निघाला आणि मी रंगभूमीच्या मुख्य प्रवाहापर्यंत पोचलो.तिथपर्यंत पोचायला कुणा कुणाला कशाकशातून जावं लागत असतं हे मला तेव्हा कधीच जाणवलं नाही…

Tuesday, October 12, 2010

कॉमेडी शो ’मतदारराजा!’

या वेळी मी मनूला लगेच ओळखलं.नेहेमी वेगवेगळी सोंगं काढून मला उल्लू बनवणं हे त्याचं कामच झालं होतं.या वेळी पांढरेधोप कपडे घालून तो दारात उभा राहिला.डोक्यावर गांधीटोपी घातलेला.दोन्ही हात जोडून.मला म्हणाला, “मी उभा आहे!” – “ते दिसतंच आहे!” मी म्हणालो आणि खवचट हसलो.त्याचं ते फवारे उडवून हसणं, जिवणी फा-फाकवणं, वा-वाकून कृत्रिम अभिवादन करणं, तोंडावर दुनियेभरची लाचारी आणणं हे सगळं नसतानाही मी त्याला ओळखलं म्हणून मनातल्या मनात मी स्वत:चीच पाठ थोपटून घेतली.
तो पुन्हा म्हणाला, “मी उभा आहे!” मी म्हणालो, “च्यायला मग बस की! आज काय पहिल्यांदाच आलाएस?” – “मला वेळ नाहिए बसायला, मी उभा आहे!” तो म्हणाला.मी मनूकडे निरखून बघितलं.अजिबात कुत्सितपणा नव्हता त्याच्या बोलण्यात.मीच जरा तिरकस झालो.म्हणालो, “काय? कुठलं घोडं मारायला जायचंय आज?” मनू आणखी गंभीर झाला.म्हणाला, “राज्या, ही चेष्टेची वेळ नाहिए.बरीच कामं पडलीएत.महापालिकेची निवडणूक लढवणं म्हणजे घोडं मारायला जाणं नव्हे.तुझ्यासारखा सुजाण मतदार जर असा बोलायला लागला-” मी उडालोच! म्हणालो, “थांब! थांब! थांब मनू! काय म्हणालास? तुला तिकीट मिळालं शेवटी? कुणी दिलं? कुणी दिलं सांग मनू? सांग!” सिनेमातल्या बालनटानं हिरोच्या हाताला हिसके मारावेत तसे मी मनूच्या हाताला मारू लागलो.सिनेमातल्या निर्विकार ’मनमोहन कृष्ण’ने डोळे आणखी निर्विकार (?) करत नजर वळवत पुटपुटावं तसं मनू पुटपुटला, “कठीण आहे! या महानगरातली जनता प्रौढ झालीए असं मला वाटत होतं.मनूचे ते डोळे माझ्याकडे वळले आणि मनू बोलू लागला, “अरे कुणाकडून तिकीटं घ्यायची? सगळे राजकिय पक्ष कसे आहेत?” मी उदगारलो, “सगळे एकजात एका माळेचे मणी!” मनू म्हणाला, “आहेत ना? त्यांनी काय भलं केलंय?” माझ्यातला मतदारराजा आता चवताळलाच, “गटारीत टाकलं रे महापालिकेच्या.ते ही अंडरग्राऊंड!” मी म्हणालो.मनूनं विचारलं, “पोरांना खेळायला ग्राऊंड्स आहेत?” मी विचारलं, “अंडरग्राऊंड?” मनू समजूतदारपणे म्हणाला, “नाही रे राजा, प्लेग्राऊंड!” माझ्यातली सद्सद का कसली विवेकबुद्धी आता जागृतच झाली.मी तडफडून म्हणालो, “नाही रे सगळी मैदानं बिल्डर्सच्या घश्यात घातली.हेच नगरसेवक.हेच बांधकामव्यावसायिक.आता आमची पोरं सतत त्या टीव्हीच्या डोक्यावर तरी बसतात किंवा आमच्या तरी!” मनूनं विचारलं, “बरं अत्यावश्यक सेवांचं काय?” मी करवादलो, “अरे सेवा कसल्या? मेवा खायला कुठून कुठून जमा झालीएत सगळी!” मनूनं विचारलं, “कुठून?” मी म्हटलं, “उमेदवारांची यादी बघ यावेळची! अर्ध्याच्या वर परप्रांतीय आहेत! अर्धे उमेदवार पूर्वी असलेल्या नगरसेवकांचे पित्ते आहेत.बायका-मुलं, आया, बहिणी आहेत.जवळजवळ सगळ्यांचं विभागातलं कार्य म्हणजे विभागात रहाणं, तिथेच धंदा करणं, आनंदमेळे भरवणं, वेगवेगळ्या उत्सवांना लोकांकडून देणग्या वसूल करून ते प्रायोजित करणं, झेंडे लावणं, मोठमोठी कामं केली म्हणून बोर्डावर लिहून स्वत:चंच अभिनंदन करणं.त्या बोर्डाला शंभर रूपयांच्या नोटांचा हार घालणं, ’आमचं नेतृत्व’ म्हणून दाखलेबाज चेहेरय़ांच्या पिलावळीनं दादा-भाऊ-साहेबांसकट आपलेही फोटो फ्लेक्सबोर्डांवर झळकवणं, भिंती रंगवणं, हॅंडबिलं वाटणं.हे यांचं सामाजिक काम?” मी मनूलाच लांबलचक प्रश्न विचारला.
मनूनं माझ्या थरथरत्या खांद्याला थोपटलं आणि शांतपणे म्हणाला, “कुणी बदलायचं हे चित्रं?” मी पटकन विचारलं, “कुठलं?” मनू म्हणाला, “अरे असं काय करतोस? हे असं नुसतं बोलून पेटून उठणं सोपं असतं राजा.दर निवडणुकीला असा शाब्दिक पेटून उठतोसच तू.पण तुझ्या हातातच खरी शक्ती आहे बाबा!” मी माझ्या दोन्ही हातांकडे बघायला लागलो! मनू म्हणाला, “हे आहे! प्रत्येक शब्दाचा शब्दश: अर्थ घेतोस तू!” मी गोंधळून मनूकडे बघितलं.त्यानं माझा हात हातात घेऊन पालथा केला.पहिल्या बोटाच्या नखावर दाबत म्हणाला, “इथे फक्त एक शाईचा ठिपका उमटून घ्यायचा.हिच तुझी शक्ती!” मी कळवळून म्हणालो, “अरे नेहेमी उमटवलाय रे! लांबलचक लाईनीत उभं राहून.कुठल्याही पक्षाचा चहा, वडापाव, पुरीभाजी न खाता.आपल्याला हवं तसं सत्याचं राज्य यावं म्हणून.या एकाच हक्कानं आपलं आयुष्य आपल्याला बदलता येईल नाही तर काहीच नाही.फक्त अंधार.एवढी जाणीव ठेऊन.पण भलभलतेच निकाल लागतात रे! वडापाव, पुरीभाजीच काय, दारूसकट सगळंच देणारे निवडून येतात.निवडून आले की आम्हा सामान्य माणसांना ते काय लक्षात ठेवतात? अरय़े महापालिकेसारख्या निवडणुकीच्या निकालाला लगेच चाकू-सुरे निघतात.हे सर्वसामान्यांचं प्रतिनिधित्व करणार काय रे सभागृहात बसून?” मला पुढे बोलवेचना.मनूच्याही डोळ्यात पाणी तरारलं.आज हे सगळं काही नवीनच होतं.
मनूनंच मला धरून खुर्चीवर बसवलं.शेजारी तो बसला.समजूतदार आवाजात म्हणायला लागला, “राजा, झालं ते झालं.अरे आपण, तू आणि मी मिळूनच हे सगळं बदलू शकतो.फक्त आपला विश्वास पाहिजे.स्वत:वर.एकमेकांवर.आणि विश्वास पाहिजे हे सगळं एक दिवस बदलणारच आहे या गोष्टीवर!” माझ्या खांद्यावर हात दाबत तो म्हणाला, “हे बघ! मी अपक्ष म्हणून उभा रहातोय.स्वखर्चानं.माझी निशाणी आहे आकाश.मोकळं आकाश! तेव्हा तू डोळे पूस आणि मला-” मनूचं वाक्य पुरं व्हायच्या आधीच माझा आनंद गगनात मावेनासा झाला.मी हाताची मूठ वर करून जोरात ओरडलो, “ताई माई आक्काऽऽ मोकळ्या आभाळावर-” माझी मूठ वरच राहिली.कुणीतरी घट्टं पकडून ठेवलेली.मी हिसके मारायला लागलो.शेवटी जागा झालो.लोकल ट्रेनमधे होतो.कामावरून घरी परतताना झोप लागली होती.शेजारी बसलेला मनू माझी मूठ धरून उठवत मला म्हणत होता, “अशी स्वप्नं बघायची सोडून द्ये राज्या, नायतर येडा होशील!”
मी खरंच येड्यासारखा मनूच्या चेहेरय़ाकडे बघत राहिलो.मला सत्य काय स्वप्नं काय काहीच समजत नव्हतं!

Sunday, October 10, 2010

नाटक आणि ब्लॅंक होणं…

नाटकाची तालिम करताना शब्दोच्चार कसे हवेत, हावभाव कसे हवेत हे मोठे प्रश्न नवोदितासमोर उभे रहातात.शब्दोच्चार स्वच्छ करणं- विशेषत: प, फ, म, भ ही अक्षरं नीट उच्चारणं आवश्यक आहे.जी अक्षरं, व्यंजनं, शब्दं एरवीच्या बोलण्यात हळूवारपणे उच्चारली जातात ती रंगमंचावरून प्रेक्षकांत नीट ऐकू जातील याची काळजी घेणं आवश्यक आहे.आवाज प्रेक्षागृहाच्या शेवटच्या रांगेपर्यंत ऐकू जाईल याचा सराव करणं आवश्यक आहे.चेहेरय़ावरचे भाव थोडे जास्त हवेत अर्थात तेही दोन-चार रांगांच्या पलिकडे दिसत नाहीत.जेश्चर्स- अर्थात हातवारे, मान, डोके यांच्या हालचाली ठळक हव्यात, त्या शेवटच्या रांगेतल्या प्रेक्षकाला जाणवू शकतील अश्या हव्यात आणि तरीही त्या खरय़ा वाटायला हव्यात.
असं सगळं थिअरी म्हणून जरूर मांडता येतं पण अनुभव असा आहे की नवोदितानं दिग्दर्शकाची जास्तीत जास्त मदत घेणं चांगलं.तुम्ही नाट्यविषयक प्रशिक्षण घेत असाल तर उत्तम.ह्या प्रशिक्षणामुळे तुमचा प्राथमिक तयारीचा खूपसा वेळ वाचतो आणि थेट भूमिकेच्या तयारीवर, तिच्या अभ्यासावर आणि ती अंगात मुरवून घेण्यावर भरपूर वेळ देता येतो.एकदा तुमची भूमिका तुम्हाला 'सापडली' की शब्दोच्चार, हावभाव, हालचाली ह्या त्या भूमिकेतूच येतात.त्या तश्या येणं ही सर्वात योग्य गोष्टं आहे.
तुम्ही रंगमंचावर कसे उभे रहाता.तुम्ही प्रेक्षागृहातल्या कानाकोपरय़ातल्या प्रेक्षकाला दिसता का? वळताना तुम्ही कसे वळता? या नवोदिताला तांत्रिकदृष्ट्या सतावणारय़ा महत्वाच्या गोष्टी असू शकतात.मग आमचे तालिममास्तर-दिग्दर्शक आमच्यावर ओरडायचे, “अरय़े लोक काय तुझं ××× बघायला जमणार आहेत?”
मी नवोदित होतो.प्रशिक्षण नव्हतं.दोन अंकी नाटकात महत्वाची भूमिका करत होतो.नाटक स्थानिक पातळीवर होणार होतं पण ते आमच्या गणेशोत्सवात होतंय याचं मला अप्रूप होतं.
नाटकात विज्ञान श्रेष्ठ की आपल्या आयुष्यात घडणारय़ा अतार्किक गोष्टी श्रेष्ठ असा एक झगडा थोर कलंदर प्रतिभेच्या कवी, कादंबरीकार, नाटककाराने मांडला होता.पांगळ्या झालेल्या मुलाला विज्ञानात बसतील त्याच उपायांनी बरं करायचं असं ठामपणे सांगणारय़ा मुलाच्या बापाच्या भूमिकेत मी होतो.हॉस्पिटलचा डीन, हॉस्पिटलमधल्याच एका दुर्धर रोग झालेल्या पेशंटला मुलाच्या आजोबांचा गेटअप देऊन मुलाला बरं करण्याचा निर्णय घेतो.डीनही खरं तर विज्ञानमार्गी पण एखाद्या लहान मुलाचं आयुष्य उभं करण्याचा उपाय कसलाही असो तो करायचाच या विचारांचा.बाप विज्ञानावर आदर्शवादी विश्वास ठेवणारा तर डीन प्रॅक्टीकल.तेव्हा असा आणखी एक उपसंघर्षही या नाटकात होता.
या नाटककाराची भाषा काही ठिकाणी चांगलीच अलंकारिक.ह्यावर आमच्या दिग्दर्शकाचं म्हणणं नाटककारानं लिहिलेली भाषा जड असेल, अलंकारिक असेल तर अशी वाक्य अत्यंत साधेपणानं बोलावीत.वाक्यातच बरंच काही असल्यावर ती शैलीदारपणे उच्चारणं हे अती होतं, भडक दिसतं, खोटं वाटतं.नाटक हे जरी सगळंच थोडं जास्त करून व्यक्त करायचं माध्यम असलं तरी ते वास्तव वाटलं पाहिजे, खोटं वाटता कामा नये.
“’र’ ला ’ट’ लक्षात ठेऊन, ’आणि’ नंतर ’पाणी’ आहे असं पाठ करून कधीही वाक्यं लक्षात ठेऊ नका!” दिग्दर्शक ओरडायचा.एका रिहर्सलला मला याचा चांगलाच अनुभव आला.नाटकातल्या क्लायमेक्स- परमोच्चबिंदू- असलेला प्रवेश होता.बाप, आजोबांचा गेटअप केलेल्या त्या रूग्णाकडून, आपल्या मुलासमोर, तो आजोबा नसून एक पेशंट आहे हे वदवून घेण्याच्या प्रयत्नात आहे.मुलाचा, हेच आपले आजोबा आहेत यावर ठाम विश्वास.मुलाचं वाक्यं होतं, “पण त्याना कुठे आहेत आजोबा, तुमच्यासारख्या पांढरय़ा पांढरय़ा मिश्या?” त्यावर मी, त्याचा बाप त्या आजोबारूपी रूग्णावर “याच्या या मिश्याऽऽ” असं ओरडत धाऊन जातो.एका रिहर्सलला तो मुलगा ’तुमच्या या पांढरय़ा पांढरय़ा मिश्या’ असं म्हणण्याऐवजी ’तुमच्या या पांढरय़ा मिश्या’ एवढंच म्हणाला.त्या गाळलेल्या एका ’पांढरय़ा’ या शब्दाने मी साफ ब्लॅंक झालो! मला पुढचं आठवेचना! नेहेमी व्यवस्थित होणारा सीन.मी विसरलो कसा याचंच इतरांना आश्चर्य वाटलं.मी साफ थांबलेला बघून इतरांनी प्रॉम्प्ट करायला सुरवात केली पण मी ढिम्म! भानावर यायलाच मला वेळ लागला.” हे काय रे?” असं दिग्दर्शकानं विचारल्यावर मला काही सांगताही येईना.घरी गेल्यावर, झोपेनं असहकार पुकारला.काय नक्की झालंय हे कळायला सकाळ उजाडली! “दुसरय़ाचं वाक्यं नीट ऐका! मग तुमचं बोला- प्रत्येकवेळी!” दिग्दर्शक सारखा सांगत होता तेही आठवत राहिलं.फायनल प्रयोगाला असं झालं तर! या विचाराने माझी झोप त्यानंतरही उडत राहिली.
फायनलच्या प्रयोगात माझं तसं काही झालं नाही पण नंतर प्रायोगिक, व्यावसायिक नाटकांच्या प्रयोगांत ह्या ’ब्लॅंक’ होण्यानं मला सतावलं.
एका सामाजिक समस्येवरच्या नाटकात संगीताचा तुकडा संपल्यावर नायिकेला मर्दानी हाळी देत मी रंगमंचावर प्रवेश केला आणि काय झालं कुणास ठाऊक? पुढे माझी वाक्यं काय आहेत ते मला आठवेचना.अशावेळी सहकलाकार काय प्रॉम्ट करतो, बॅकस्टेजकडून काय प्रॉम्ट केलं जातंय हेही डोक्यात घुसत नाही असा माझा अनुभव आहे.मग आठवत गेलं तरी सीनचा टेंपो पूर्णपणे ढूऽऽस्स! झालेला असतो.
त्याही आधी एका विनोदी नाटकाच्या कॉन्ट्रॅक्ट शोला एका रिहर्सल न दिलेल्या बुजुर्ग विनोदी नटानं पदरची वाक्यं बोलायला सुरवात केली आणि अस्मादिक पुढचं सगळं विसरले ते विसरलेच.बॅकस्टेजवरून ओरडून दिलं गेलेलं प्रॉम्टिंग प्रेक्षकात पोचलं असावं पण मी काही पुढे सरकलो नाही.शेवटी त्या बुजुर्गालाच आणखी काही पदरची वाक्यं बोलून मला यातून सोडवावं लागलं.एका व्यावसायिक नाटकाच्या प्रयोगाला एका प्रवेशाआधी बॅकस्टेजवाल्यानं सांगितलं, फोन वाजेलच असं सांगता येत नाही, तो वाजला असं समजून उचला आणि प्रयोग पुढे न्या.मी प्रवेश केला टेलिफोन वाजायची वेळ आली.तो चक्कं वाजला आणि मी ब्लॅंक! सहकलाकाराने पुढे ढकल्यावरच अश्यावेळी पुढे जाता आलं.बरय़ाच वेळा सहकलाकारालाही तुमचं पुढचं वाक्यं काय आहे ते आठवत असतंच असं नाही.प्रचंड गोऽऽची होत असते अश्यावेळी.
एका ’स्मार्ट’ व्यावसायिक नटाला तर म्हणे चक्कं माफी मागून पडदा पाडावा लागला होता- पुढचं काही म्हणता काही आठवत नाही म्हणून!

Thursday, October 7, 2010

कॉमेडी शो “तिकीट”

“मला तिकीट हवंय यार! मला तिकीट हवंय!” सकाळपासून मनू पाचव्यांदा म्हणाला.आज कधी नव्हे ते तो नर्वस दिसत होता.बरोबर मी असतानाही स्वत:शीच बडबडत होता.शेवटी त्याला ’लक्ष्मीविलास’ मधे नेलं.भजी मागवली.चहा मागवला.पैसे अर्थात मीच देणार होतो.मनूनं ताव मारायला सुरवात केली. “तिकीट हवॉय यॉर मॉलॉऽ” हादडतानाही तोंडातलं तिकीट, तिकीट सुटत नव्हतं.
मी समजुतदारपणे विचारलं, “कुठलं तिकीट हवंय मनू तुला?” वेड्यानं मानसोपचारतज्ज्ञाकडे बघावं तसं माझ्याकडे बघून तो पुन्हा शून्यात गेला आणि भजी चावायला लागला.मला त्याची दया आली, विचारलं, “पोस्टाचं तिकीट देऊ? स्टॅंप की रेवेन्यू स्टॅंप देऊ? रेल्वेपासच्या मागे ठेवलेले असतात मी.थांब बघतो हं!” - “यडा आहेस यार तू!” भजी गिळत मनू ओरडला, “काय कळतं काय तुला? मला तिकीट हवंय यार! छ्या: तिकीट! तिकीट! तिकीट हवंय!” चहावाल्या भटाच्या बर्नरच्या आवाजाने माझी लाज राखली नाहीतर लोक जमलेच असते भोवती.बघ्यांना काय हव्याच असतात अश्या गोष्टी.मी समजुतदारपणा सोडला नाही.सामान्य मध्यमवर्गीय असल्यामुळे मी तो सहसा सोडत नाहीच.म्हणालो, “मग बसचं देऊ का? शाळेत असताना दहा पैशाचं तिकीट होतं बसचं.ते पण जपून ठेवलंय.पुढे बरं असतं रे पोरा-नातवंडांना महागाईच्या गोष्टी सांगायला.ते देऊ की कालचं आठ रूपयाचं देऊ?”- “मरू दे रे!” मनू पुन्हा खेकसला.डॉक्टरनं वॉर्डबॉयकडे न बघता बोलावं तसं तो म्हणाला, “तुझं म्हणजे नं-” आणि पुन्हा तो शून्यात गेला. “तिकीट हवंय! तिकीट हवंय यार!” हे चालूच होतं.
मी आज समजुतदारपणाची एक एक पायरी चढायचं ठरवलंच होतं.पुन्हा विचारलं, “का रेल्वेची देऊ तिकीटं? पोरानं जमवलीएत खूप! दहा-पंधरा वर्षांपूर्वी हनिमूनला गेलो होतो, ऑफिसमधून पैसे उचलून, ती सुद्धा आहेत तिकीटं जपून ठेवलेली.म्हटलं पुन्हा कधी लांबच्या ठिकाणी जायला जमणार नाही.नुसतं तिकीट बघून समाधान तरी मिळेल.ती देऊ? का पासच देऊ जुना? गेल्या महिन्याचा? तो पण असतो माझ्याकडे.नाही तर असं करतो, कुपन्स काढलीएत बघ रेल्वेनं! दिसायला आणि वापरायला साधी.सोपी.मशिनमधे घालायची.एका स्टेशनवरचं पाचापैकी एक तरी मशिन कधी कधी चालू असतंच बघ.ती देऊ?” आता मनूनं नुसतंच माझ्याकडे बघितलं.कीव, राग संताप, किळस असे अनेक भाव त्याच्या चेहेरय़ावर आले आणि गेले. “हूंऽऽ” असा आवाज काढून तो पुन्हा शून्यात गेला.
मी त्याच्यापुढ्यातला भरलेला चहाचा ग्लास त्याच्या आणखी जवळ सरकवला.मला मनूकडे बघवत नव्हतं.त्याच्या डोक्यात सॉलिड कुरतडत असावं.मला त्याची आणखी काळजी वाटायला लागली.समोरचा चहाचा भरलेला ग्लास तोंडावर बसेल हा धोका पत्करूनही मी आणखी समजुतदार झालो.म्हणालो, “नायतर असं करू का मनू, माझ्या बायकोच्या आतेभावाच्या मावसबहिणीचा चुलत मेव्हणा कलमाडींच्या ऑफिसात आहे, त्याच्या ओळखीने सवलतीत किंवा कदाचित फुकटसुद्धा कॉमनवेल्थचं चालू तिकीट मिळेल.जातोस? त्वरा करावी लागेल.पुढचं बांधकाम कोसळायच्या आत आणि भारताला पदकं मिळणं बंद व्हायच्या आत जावं लागेल! जातोस? –म्हणजे आपण प्रयत्न करायचे.उद्या आणखी पदकं मिळाली की कलमाडी त्याचं श्रेय स्वत: लाटणार किंवा पदकं बंद झाल्यावर राष्ट्रप्रेमाचं काय करायचं असा नवीन प्रश्न निर्माण होणार आणि तेव्हा तिकीट मिळणार नाही! मग काय करू? की थांबूया पुढच्या ऑस्ट्रेलियाबरोबरच्या टेस्टपर्यंत? की पुढच्या आयपीएल पर्यंत थांबायचं? की ट्वेंटीं ट्वेंटीपर्यंत थांबायचं? की एकदम वर्ल्डकपचं हवंय तुला तिकीट?” माझ्या मनूविषयीच्या काळजीने पोटतिडीकीची कमाल मर्यादा ओलांडली होती.मी काय काय करणार होतो माझं मलाच कळत नव्हतं.मनूनं आता गरागरा डोळे फिरवले, खेकसला, “तुज्यायलाऽऽ गप बसायला काय घेशील?” आणि मनूनं चहाचा ग्लास गटागटा घशात रिकामा केला.सिनेमातल्या गममधे असलेल्या हिरोनं रमचा रिकामा करावा तसा.मी गप बसून चहाचा एक एक घोट घेऊ लागलो. “तिकीट हवंय यार! तिकीट हवंय! मला!” मनू पुन्हा संतापाने पुटपुटला.उठला.लक्ष्मीविलास हॉटेलमधून चालू पडला.कसेबसे पैसे देऊन मीही त्याच्यामागे कल्टी खाल्ली आणि माझी ट्यूब पेटली, “मनू तुला निवडणुकीचं तिकीट हवंय का?ऽऽ”
माझ्याकडे कुत्सितपणे बघत, संतापाने लाल होत, डोळे फिरवत त्याने विचारलं, “तू देणार? तू काय स्वत:ला मैद्याचं पोतं समजतोस? का वाघ समजतोस? की वाघाचा छावा? की छाव्याचा चुलतभाऊ? की वाघाच्या गुहेत गुदमरून झाल्यावर घड्याळाच्या गुहेत येऊन गुदमरणारा निळा कोल्हा? की जन्मानं परदेशी आहेस तू? आणिऽऽ ते तिकीट घ्यायला मी काय कुणा मंत्र्याचा, खासदाराचा, आमदाराचा नातेवाईक आहे की लोंबत्या आहे? की आरक्षित वॉर्डमधे उभं रहायला मी स्त्री आहे की रिझर्व कोट्यातला आहे? माझ्याकडे रग्गड पैसा आहे? मी इंडस्ट्रियालिस्ट आहे? अनेकांनी टेकू देऊन उभा केलेला दलित नेता वाटलो काय मी तुला?ऽऽ तू तिकीट देणार आणि मी घेणार!” असं म्हणून मनू भर रस्त्यात डोक्यावर परिणाम झाल्यासारखा हसायला लागला.
माझ्या सहनशक्तीचा, समंजसपणाचा कडेलोट झाला आणि मी रस्त्यातच थयथय नाचत त्याला विचारलं, “अरे मग तुला हवंय तरी कसलं तिकीट?”
मनू म्हणाला, “हां!... मला हवंय तिकीट भरपूर पैसे मिळवून देणारं! खून केले तरी ते पचवून टाकणारं! मला हवी असलेली कुठलीही बाई देऊन टाकणारं! मला हवंय तिकीट शत्रूशी मैत्री आणि मित्राशी शत्रुत्व केलं असं लोकांना भासवणारं!- मला हवंय-” मनू नटसम्राट नाटकातला म्हातारा झाला होता.मी काय करणार होतो? दिवेलागण झाली होती.घरी मुलाला शुभंकरोती शिकवायची होती.मी घरचा रस्ता पकडला.

मित्रांनो! चार ई-बुक्स प्रकाशित झाली!!!

मित्रांनो! माझी संघटन, आवर्त, पुलाखालून बरंच (तीनही नाटकं) , मी झाड संध्याकाळ (कवितासंग्रह), अशी चार ई-बुक्स नुकतीच प्रकाशित झाली आहेत साहित्यसंपदा डॉट कॉम या साईटवर! साहित्यसंपदा डॉट कॉम ही Fuzzysoft Software, Aurangabad यांची साईट आहे.तिला भेट दिल्यावर ही पुस्तके बघायला, वाचायला, खरेदी करायला ...मिळतील! भेट द्या आणि प्रतिक्रियाही! लिंक आहे: http://www.sahityasampada.com/index.jsp

Tuesday, October 5, 2010

नाटकातले धडे

नाटक करताना पहिला धडा शिकलो उच्चारणाचा.आज अनेक विद्यापीठांमधे नाट्यशिक्षणाचा अभ्यासक्रम आहे.नाटक आणि पर्यायाने मालिका, चित्रपट यात करियर करू शकतो हे आजच्या तरूणाला ठरवता येतं आणि निश्चित धोरण आखून यश मिळवता येतं.त्यावेळी नाट्यशिक्षणाबद्दल तेवढा अवेअरनेस नव्हता.दिल्लीची राष्ट्रीय नाट्य शाळा सामान्य मुलापासून सगळ्याच अर्थाने दूर होती.आधीच्या पिढीतले आणि बरोबरीचेही पडत धडपडत शिकत होते.आपली जागा तयार करत होते.नाटक आणि पर्यायाने येणारय़ा करियर्स असू शकतात यावर विश्वास ठेवण्यासारखी परिस्थिती नव्हती.पुष्कळसे नोकरीचा किनारा पकडून नाटकात पोहायला बघणारे.जे मोजके यात त्यावेळीही पूर्णवेळ झोकून देत होते.त्यांना हॅट्स ऑफ! त्यातल्या काहींनी आपली जागा नक्कीच निर्माण केली.काहींनी जम बसताच नोकरीच्या किनारय़ाला बाय बाय केलं.
नाटक करत असतानाचं शिकणं खरं शिकणं आहे असा जोरदार मतप्रवाह त्यावेळी होता.
मी करत असलेल्या नाटकाच्या तालमींमधे उच्चारणाचे धडे घेत होतो.नाटक मराठीतल्या विलक्षण उत्स्फूर्त प्रतिभा असलेल्या कलंदर कवी, कादंबरीकार, नाटककाराचं होतं.शब्दरचना मोहक.अलंकारिक.लक्षात ठेवायला अवघड.दिग्दर्शक स्वत: चित्रकार, गाणारा, साहित्यप्रेमी त्यानं सगळ्याच पात्रांच्या उच्चारणावर जाणिवपूर्वक मेहेनत घेतली.एका आंतरकार्यालयीन नाट्यस्पर्धेत त्याला हे नाटक बघायला मिळालं.आवडलं. ’स्वीकार’ या शब्दाचा उच्चार नेमका कसा करायचा?... र्हस्वदीर्घ आजपर्यंत शाळेत नुसतं शिकलो होतो.या दिग्दर्शकानं ते नेमकं काय असतं ते सांगितलं.
सुरवातीला वाक्यं हातात आलेली नसताना मी जास्त वेगानं वाक्य बोलत असे.नंतरही बराच काळ या दोषानं सतावलं.वाक्य पाठ नसताना आत्मविश्वास कमी असतो मग उरकून टाकण्याच्या सहज प्रवृत्तीने वाक्य बोलण्याचा वेग नकळत वाढतो असं माझ्या लक्षात आलं.
या नाटकात पाय लुळ्या पडलेल्या मुलाचा विज्ञाननिष्ठ बाप त्याला अवैज्ञानिक वाटणारे उपाय हॉस्पिटलचा डीन अवलंबतोय हे पाहून बरय़ाच प्रसंगात चिडत असतो.वाद घालत असतो.चिडलेल्या स्वरातली वाक्य बोलताना माझा बोलण्याचा वेग वाढायचा.वाक्यांमधून भावना जाणवायला हव्यात पण भावनेच्या भाराखाली वाक्यातले शब्दच प्रेक्षकांना ऐकू आले नाहीत असं होता कामा नये.
वाक्याचा योग्य अर्थ पोचवण्यासाठी वाक्यांमधल्या कुठल्या शब्दावर योग्य जोर द्यायचा.असा योग्य जोर दिल्यामुळे वाक्याच्या शेवटी येणारे हेल कसे काढून टाकता येतात, वाक्यांचा अर्थ समजून ती कशी बोलायची याचा प्राथमिक पाठ या दिग्दर्शकाकडे गिरवला गेला.
या नाटकात मी माझ्या त्यावेळच्या वयापेक्षा दहा-बारा वर्षांनी मोठ्या असलेल्या एका बापाची भूमिका करत होतो.लहान-मोठी स्वगतं या भूमिकेत होती.दिग्दर्शकानं या स्वगतांची वेगळी तालिम माझ्याकडून करून घेतली.प्रत्येक स्वगत नाटकात केव्हा आहे, त्यावेळचा भाव काय?... इतकं समोरून येत होतं, त्यातलं किती माझ्या त्यावेळच्या बुद्धित शिरत होतं, कुणास ठाऊक? पाया मात्र तयार होत होता.पुढे प्रत्येक दिग्दर्शकानं या गोष्टींवर जोर दिलाच.
सेट, लाईट्स, सेटवरच्या इतर वस्तू- ज्यांना प्रॉपर्टी म्हटलं जातं या सगळ्याची जमवाजमव सुरू झाली आणि मीही त्यात रूजू झालो.दिग्दर्शक कमर्शियल आर्टिस्ट आणि नाटकाचा नेपथ्यकारही.सगळ्या बारीक बारीक गोष्टी त्याच्या पद्धतीने समजावून सांगणारा.विनोद करणारा.गोष्टीवेल्हाळ.चांगला संघटक.संघटन करणं आणि त्या संघाचं नेतृत्व करू शकणं हे दिग्दर्शकामधे आवश्यक असे मूलभूत गुण.हे या दिग्दर्शकामधे आणि या आधीच्या दिग्दर्शकामधेही चांगलेच जाणवले.त्यानंतर आपल्याला हवं असलेलं समोरच्याकडून काढून घेणं हा आवश्यक गुण.भूमिका समजवत असताना प्रसंगी ती करून दाखवण्याचीही तयारी त्याच्यामधे हवी.दिग्दर्शकाला नाटकातलं सगळंच यायला हवं.त्यासाठी इतर कला, वाचन, समज हे सगळं हवंच.
सेटचे तराफे, लाईटचे स्पॉट्स, डीमर्स ओळखीतून कुठून कुठून जमवायचे. लोकलट्रेनमधे, ट्रकमधे घालून आणायचे.दिग्दर्शकाच्या ओळखी खूप.नाटक गणेशोत्सवात होणार होतं.दिग्दर्शक स्वत: गणपतीचं डेकोरेशनही करत होता.शिवाय नाटकात डीनची महत्वाची भूमिकाही.एका वेळी एका माणसानं किती कामं करावी? तो इतका बिझी की नंतर नंतर आमच्या दोघांचे सीन्स, इतर कामं करताना, लोकल ट्रेन्समधून जाता येताना आम्हाला बोलून घ्यावे लागायचे.त्यात नाटकात पेशंटचीमहत्वाची भूमिका करणारा आमचा एक मित्र चांगलाच आजारी पडला.अंथरूणातून उठता येत नाही, ताप उतरता उतरत नाही अशी परिस्थिती…
नाटकात शेवटी काय होतं?... आजोबांचं रूप घेतलेला तो रूग्ण आजोबांची भूमिका इतकी बेमालूम वठवतो की पांगळ्या लहान मुलाला तो आजोबा वाटायला तर लागतोच पण रुग्णाला आपल्या दुर्धर आजाराचा विसर पडतो.त्याही पुढे रूग्णाला आजोबाचा आत्मा आपल्या शरीरात शिरून सगळं करून घेतोय असं वाटायला लागतं.तो आजोबा आणि मुलाच्या आयुष्यातले, त्या दोघांनाच माहित असलेले संदर्भ इतके अचूक सांगतो की मुलाची आई आश्चर्यचकीत होते.बापाकडे हे कसं यावर उत्तर नसतं.त्याचा राग आणि सगळ्या प्रकाराबद्दलची घृणा वाढायला लागते.बाप रूग्णावर फसवणुकीचा आरोप करतो.विज्ञान हेच एकमेव सत्य यावर तो कर्मठपणे ठाम आहे.बाप शेवटी मुलासमोर या आजोबांचं खरं स्वरूप उघडं करायला त्यांच्या अंगावर धावून जातो.आजोबाना ते सहन होत नाही.ते तिथून निघतात.मुलगा त्याना अडवायला धावतो… मुलाचे पाय त्याला परत मिळालेले आहेत…

Monday, October 4, 2010

कॉमेडी शो “सहकारी पतपेढी अमर्यादित!”

असं काही असलं की मनू सर्वात आधी माझ्याकडे येतो.आधी न हसता म्हणतो, “तू मला लकी आहेस रे! तुझ्यापासून सुरवात म्हणजे माझी भरभराट!” मग जिवणी फाकवून हसत म्हणतो, “अतिशय साधा आहेस रे तू! सुरवात तुझ्यापासूनच!” अतिशय साधा म्हणजे मनूच्या भाषेत बावळट हे मला पक्कं माहित असतं पण प्रत्येक वेळी तो डाव साधतोच.या वेळीही अतिशय साधा म्हणून त्याने एका अर्जावर माझी सही घेतलीच.
मनूच्या पुढाकाराने गल्लीत सहकारी पतपेढी चालू करायचं ठरलं.ठरलं म्हणजे काय मनूनंच ठरवलं.रोजच्या झकाझकीत असली झेंगटं करायला वेळ कुणाला आहे? असं मी मनातल्या मनात म्हणालो पण मनू मनकवडा आहे.त्यानं माझ्या डोक्यात टप्पल मारली आणि म्हणाला, “झेंगट! पतपेढीला, या सहकारी पतपेढीला झेंगट म्हणतोस?” अशी सुरवात करून मला जांभई येऊन माझी मान सारखी कलायला लागेपर्यंत भलमोठं लेक्चर दिलं.सहकारी चळवळीबद्दलचं.मनूचं बोलणं सुरू झालं की घड्याळाचे काटेही संथ होतात.मला पूर्णपणे पिळल्याशिवाय तो थांबत नाही.फारच थोड्या काळात तो सहकार महर्षी होणार याबद्दल माझ्या काय, गल्लीतल्या कुणाच्याच मनात आता संदेह राहिला नाही.मी सही केल्यावर प्रत्येकानं त्या पतपेढीच्या अर्जावर सही केली.
’चळवळ सहकारी पतपेढी मर्यादित’ असं डॅशिंग नाव मनूनं शोधून काढलं आणि एका बुजुर्ग गल्लेकरय़ाच्या हातून मुहुर्ताचा नारळ फुटला.पटापट प्रत्येकानं खातं उघडलं.मनू पैसे मोजत राहिला.सहा महिने झाले आणि मनूनं प्रत्येक खात्यावर व्याज तर दिलंच पण आम्हा प्रत्येकाला बोलावून, आहेर देतात तसं, एक हात पुसायचा टॉवेल आणि बॉलपेनही दिलं.आम्हा सभासद मंडळींचा आनंद गगनात मावेना.अजूनही आम्ही त्याच टॉवेलनं हात पुसतो.बॉलपेनं आम्ही तेव्हाच शोकेसमधे ठेवली.
वर्षं झालं तेव्हा मनूनं गांधी जयंतीला स्थानिक नगरसेवकाच्या हस्ते सत्यनारायण पूजा घातली.दोन वर्षं झाली तेव्हा विनोबा जयंतीला गृहराज्यमंत्री आणि तीन वर्षं झाली तेव्हा जयप्रकाश नारायण जयंतीला डायरेक्ट महसूल मंत्र्यांनाच बोलावलं.एव्हाना चांगला महसूल गोळा झाल्यामुळं ’चळवळ’चं आणि मनूचं दोघांचंही चांगलंच नाव झालं होतं.
मनू सरकारदरबारी मांडीला मांडी लावून बसायला लागला.त्याच्याबरोबर चार्टर्ड अकाऊंटंट्सचं एक आख्खं पथक असायच.सभासद पतपेढीला खजिना समजायला लागले.व्याजाची मलई खाऊन शांत झोप लागत होती.बाकी झकाझकीचं सगळं मनू बघत होता.सभासदांनी सगळे अधिकार मनूच्या हातात दिले.मनू बोले आणि ’चळवळ’ हाले अशी परिस्थिती होती.
मग मनूनं आणखी एक पाऊल पुढे टाकलं.’फायनान्स अनलिमिटेड’ नावाची आणखी एक कंपनी काढली.लोकांना घरासाठी कर्ज देणारी.गल्लीतले आम्ही घरात रहातच होतो.कुठल्याही माईच्या लालमधे नवीन जागा घेण्यासाठी ताकद कुठून येणार? कर्ज घेतलं तरी ते फेडावंच लागणार.सामान्य असल्यामुळे आम्हाला ते फेडल्याशिवाय चैन पडणार नाही.मग घ्याच कशाला ते! गल्लीतल्या लोकांसाठी स्थापन झालेल्या पतपेढीतले पैसे या नवीन कंपनीत फिरवले जावेत ही मनूची आयडिया.त्याचा आम्हाला काय फायदा होणार होता? भाजीवाल्याशी एक-दोन रूपयांसाठी घासाघाशी करणारे आम्ही, आमची पतपेढी मनूच्या घशात सारून रिकामे झाले होतो.एवढ्या तेवढ्यावरून एकमेकाशी अरे ला कारे करणारय़ा एकाही शहाण्याने या व्यवहारात काही गैर आहे असं म्हटलंच नाही.मनू तोपर्यंत एका मजबूत राजकारणी पक्षाच्या कमिटीमधे जाऊन बसला.
एके दिवशी अचानक पतपेढीत मरणाची गर्दी झाली.ती बघितल्यावर मग आमची धावाधाव सुरू झाली.लोक पटापट पैसे काढून घेण्याच्या खटपटीत होते.कुणी कुणाला काय झालंय ते सांगत नव्हता.’माझे’ पैसे मिळाल्याशी मतलब.पतपेढी बुडणार हे आता गुपित राहिलं नाही.’कुणाचेही पैसे बुडणार नाहीत’ असा फलक पतपेढीच्या दारात लागला आणि आम्हाला कळलं पतपेढी बुडाली.
एक मात्र झालं.कधी नाही ते आमच्या गल्लीचं नाव पेपरात आलं.कधी नाही ते मनूचा घारय़ा डोळ्याचा, दाढी वाढवलेला फोटो पेपरच्या पहिल्या पानावर झळकला.मनूच्या कारकिर्दीतली ही केवढी मोठी अचिव्हमेंट.जेमतेम गल्लीला माहीत होता तो तो एकदम दिल्लीपासून जागतिक बॅंकेपर्यंत सगळ्याना माहिती झाला.पतपेढी बुडवण्यासाठी त्याने नक्की काय केलं ते आमच्या कुणाच्या नक्की ध्यानात आलं नाही पण त्यानं आमचे पैसे खाल्ले.आम्ही दिवसरात्र डोक्याला हात लावून बसू लागलो.चुकून झोप लागली तर दचकून जागे होऊन आपापसात चर्चा तेवढ्या करत राहिलो.आमच्या हातात आणखी काय होतं? मनूच्या हातात बेड्या पडाव्यात असं मात्र मनापासून वाटत होतं.मनूविरूद्ध साक्ष द्यायला सांगितली असती तर प्रत्येकानं तोंडात मिठाची गुळणी धरली असती.पैसेही नकोत आणि कोर्टाची पायरही चढायला नको!
सगळीकडे बभाल झाल्यावर नाईलाजाने विरूद्ध पक्षाने आमच्या या पतपेढीचा प्रॉब्लेम ताणून धरला.सत्तारूढ पक्षाला नाईलाजाने कृती करणं भाग पडलं.मोठ्या थाटामाटात मनूच्या अटकेचं नाटक पार पडलं.मनूच्या समर्थकांनी यावेळी वाटेत येईल त्याला वार्ताहर, प्रेस फोटोग्राफरपासून रस्त्यावरचा भाजीवाला आणि कामावर चाललेल्या आमच्या गल्लीतल्याच काही जणांना यथेच्छ बुकललं आणि मनूवरची आपली निष्ठा प्रकट केली.
त्यानंतर मग नाटकाचे इतर प्रवेश सुरू झाले.अटकपूर्व जामीन, मनूला प्रकृती अस्वास्थ्यामुळे हॉस्पिटलमधे भरती करणं, मग दोन वर्षांनी खटल्याची तारीख पडणं, साक्षीदारांच्या साक्षी, त्यांचं उलटणं, सत्तारूढ आणि विरोधी यांची ’तू मार मी रडल्यासारखं करतो’ अशी लुटुपुटुची युद्धे, सहकारक्षेत्र बजबजलेले आहे काय? यावर मान्यवरांचे परिसंवाद.आम्ही त्यात इतके गुंतून गेलो की आपले पैसे आता काशीत गेलेत याचं भानही राहिलं नाही.
यथावकाश मनूची ’निर्दोष’ सुटका झाली तेव्हा आमचेच काही गल्लीकर त्याच्या स्वागताला गेले.
आता मनू बाजूच्याच गल्लीत नवी पतपेढी उघडणार आहे.
तो आला की तुम्ही नक्की अर्ज भरणार याची मला खात्री आहे.
पतपेढ्या मर्यादित असल्या तरी आपला त्यांच्यावरचा विश्वास अमर्यादित आहे हे नक्की!

Saturday, October 2, 2010

नाटकं न कळणारी/कळणारी आणि नाटकात गुंतत जाणं…

नाटक हे दृष्यांचं माध्यम आहे.ही दृष्यं जर परिणामकारक असतील तर न कळणारी नाटकंही आपल्याला खिळवून ठेवू शकतात.ती संपेपर्यंत आपण दाखवलेल्या दृष्यांमधे चांगलेच गुंतून रहातो.
चित्रकला, नृत्य या एकट्याने सादर करण्याच्या कला आहेत.बरय़ाचवेळा चित्रप्रदर्शनं, नृत्याचे कार्यक्रम बघताना ते कळतात असं होत नाही.या कला अप्रत्यक्षपणे काही सांगतात.जाणिवेपेक्षा नेणिवेच्या पातळीवर त्या काही सांगतात.बघितल्यानंतर आपल्याला नक्की काय कळलं हे आपण सांगू शकत नाही.पण आपल्याला काहीतरी निश्चित असं भावलेलं असतं.
नाटकातही सबटेक्स्ट आणि बिट्विन द लाईन्स असं काही सांगितलं जातं.हे पूर्णपणे समजणारय़ावर अवलंबून रहातं.ते कळतं किंवा कळत नाही.कळणारय़ा प्रत्येकाला ते वेगवेगळ्या अर्थाने कळलेलं असतं.
लेखक एक नाटक लिहितो आणि बघणारे ते बघत असताना आपापल्या मनात वेगवेगळं नाटक बघत असतात.सुप्रसिद्ध नाटककार विजय तेंडुलकर यांनी दिल्लीच्या श्रीराम सेंटरमधे दिलेल्या व्याख्यानांमधे याचं खूप सुंदर विवेचन दिलेलं आहे…
अभिनेत्याला चॉईस असतोच असं नाही.नवोदित असताना बरय़ाचदा तो नसतोच.आपण करत असलेलं काम शिकणं महत्वाचं असतं.त्याचा सराव होणं महत्वाचं असतं.आपण काम करतोय हे क्षेत्रातल्या दिग्दर्शकांना समजावं म्हणून कामं करत रहावी लागतात.पर्यायानं आणखी चांगली कामं मिळावीत आणि आणखी काही शिकायला मिळावं हा हेतू असतो.
मी नवोदित असताना माझ्यापुढे संधी येत गेल्या.मागे म्हटल्याप्रमाणे या क्षेत्रात काही करून दाखवायचंय असं धोरण अर्थातच नव्हतं.माझ्यासारखी बरीच मुलं होती.प्रत्यक्ष रंगमंचावर काही करायला मिळतंय हा आनंद होता.त्यात नेहेमीच्या बघण्यातलं नसलेलं काही करतोय याचं अप्रूप होतं.माझं वाक्य नसतानाही मी एकांकिकेत एकाग्र असतो अशी एक कॉमेंट एका तश्या न कळणारय़ा एकांकिकेच्या तालमीनंतर मला मिळाली.याचा अर्थ मी त्या एकांकिकेत समरस झालो होतो.
पहिली एकांकिका केली ती स्थानिक पातळीवर सादर झाली.शाळेचे माजी विद्यार्थी हे तिचे प्रेक्षक.यातून पुढे आणखी काही होईल असं मला वाटलं नव्हतं.पण ती बघून एका स्थानिक बुजुर्गानं मला एका मोठ्या नाटकाविषयी विचारलं आणि मी तीन ताड उडालो! हे नाटक तो येणारय़ा गणेशोत्सवासाठी बसवणार होता आणि त्या नाटकातल्या मुख्य भूमिकांपैकी एक भूमिका मला करायची होती.ज्यांची गणेशोत्सवातली नाटकं बघून वाढलो त्यातल्या एकाबरोबर गणेशोत्सवाच्या रंगमंचावर काम करायला मिळणार! माझं एक न बघितलेलं स्वप्नं साकार होणार होतं!
एक लहान मुलगा.बिचारय़ाचे पाय लुळे.त्याला त्याच्या आजोबांचा खूप लळा.एका हॉस्पिटलमधे मुलाच्या पायावर ट्रीटमेंट चालू होते आणि त्याचवेळी आजोबांचं निधन होतं.हॉस्पिटलचे डीन म्हणतात, “मुलाला आजोबा गेल्याचं कळलं तर त्या धक्क्याने तो आयुष्यात पुढे कधीच चालू शकणार नाही!”
त्याच हॉस्पिटलमधे कॅन्सरचा एक पेशंट.काही दिवसांचा सोबती.योगायोग म्हणजे हा पेशंट तरूण पण दिसायला अगदी त्या मुलाच्या आजोबांसारखा.मुलगा सारखा ’आजोबा मला भेटायला का येत नाहीएत?’ असा घोषा लावून बसलेला.डीन त्या पेशंटला आजोबा बनवून मुलाच्या समोर नेण्याचं ठरवतात.
मुलाचा बाप या सगळ्या प्रकाराच्या विरूद्ध.विज्ञाननिष्ठ.आपल्या मुलाला खरं काय ते सांगून टाकावंच या मताचा.डीनला फोर्स करणारा.डीनसारख्याने असं करणं म्हणजे गुन्हा आहे असं त्याचं ठाम मत.बाप एखाद्या खलनायकासारखा.एक संघर्ष उभा ठाकतो.
दिग्दर्शकानं बापाच्या भूमिकेसाठी मला निवडलं.मला सर्वप्रथम त्याने नाटकाची सगळी गोष्टं समजाऊन सांगितली.माझी भूमिका सांगितली.माझ्या वयापेक्षा दहा-बारा वर्षांनी मोठा असलेला त्या मुलाचा बाप साकारायचा या विचाराने मी अवघडून गेलो.मी सांगतो, तू कर- दिग्दर्शकानं सांगितलं.मी तयार होतोच.
कोणीही आपली भाषणं घोकायची नाहीत.तो सांगत होता.आपण उभे आहोत त्या जागेचं अवधान ठेवणं महत्वाचं.त्या अवधानानं वाक्य लक्षात ठेवायची.आपण कुठे आहोत, तिथे कुठलं वाक्य बोललो, कुठे गेलो, इथून तिथे जाताना कोणतं वाक्यं बोललो, पोहोचल्यावर कुठलं वाक्य अशी हालचालींप्रमाणे वाक्यं लक्षात ठेवायची.मला वेगळा अनुभव आला.दोन-चार रिहर्सलमधे मुवमेंट्स लक्षातही न ठेवता माझी भूमिका पाठ झाली.मला आश्चर्य वाटलं.
रोज वेळेवर रिहर्सलला हजर रहायचं.कलाकारांचे सीन्सप्रमाणे ग्रुप्स केले जातील.ज्याला त्याला ज्या त्या दिवशी हजर रहाता येईल.ज्याला सगळ्या रिहर्सल्सना उपस्थित रहावंसं वाटेल त्याने रहावं.सगळ्यांनी शक्यतो सगळ्याच रिहर्सल्सना हजर रहावं.दिग्दर्शकाला सगळं विस्तारानं सांगायची सवय होती.मी सगळ्याच रिहर्सल्सनाच उपस्थित राहू लागलो.मी ज्यात नव्हतो ते सीन्स बसवत असताना निरीक्षण करू लागलो.व्यवस्थित आणि काटेकोरपणे रिहर्सल्स चालू झाल्या.दिग्दर्शक स्वत:च नेपथ्यकार होता.तो कमर्शियल आर्टिस्ट होता.एरवी रंगमंचावर मांडलेलं घर किंवा घरातला हॉल आपल्याला नैसर्गिक वाटतो.त्यामागे नेपथ्यकारानं काय विचार केलेला असतो हे पहिल्यांदा समजलं.एक अतिशय महत्वाची गोष्टं शिकलो.ते म्हणजे शब्दांचं उच्चारण.उच्चारणाचे धडे मी पहिल्यांदा या दिग्दर्शकाकडे शिकलो.पुढे प्रत्येक दिग्दर्शकाने या उच्चारणाच्या धड्यांवरच जोर दिला…

Friday, October 1, 2010

न कळणारी नाटकं…

प्रत्येक माणूस शंभर टक्के प्रेक्षक असतो.नवोदित म्हणून या माध्यमात सुरवात करताना हाच प्रेक्षक नाट्यकर्मी म्हणून घडू लागतो.सुरवात करणारय़ा या प्रेक्षकाला आपण जे नाटक करतो आहोत ते कळतंय का? आवडतंय का? हे समजलं तर चांगलं.बरय़ाच वेळा समोर आलेलं काम करणं हेच आपल्या हातात असतं.नवोदितालाच काय कित्येक वेळा अनुभवी माणसाला चॉईस असत नाही.
कळणं हे मी इथे रूढार्थानं म्हणतोय.रंगमंचावर काय चाललं आहे हे प्रेक्षक म्हणून कळतंय का? नाटक सहज कळण्यासारखं असू नये का? एखादी गहन गोष्टं सोपी करून सांगावी की ती आणखी अवघड करून सांगावी? मुद्दाम एखादी गोष्टं अवघड किंवा अनाकलनीय, समजायला बोजड करण्याचं कारण काय?
अनेक नवोदितांप्रमाणे त्यावेळी मला हे प्रश्न पडले.फक्त हे प्रश्न आता इतक्या वर्षांनंतर मी हे लिहित असताना मांडू शकतोय.तेव्हा ते जाणवत नक्की होते.
मला पहिली एकांकिका मिळाली त्यात मृत्यू संदर्भातलं काही लेखकाला सांगायचं होतं.लेखक हाच दिग्दर्शक होता.अभिनेत्याला रंगमंचावर काही करायला मिळालं तर नुसता आनंदच असतो.रंगमंचावर येणं हे प्रलोभन नक्कीच आहे.वाक्यं चांगली असली, ती बोलताना मजा आली, सांगितलेल्या कृती वेगळ्या असल्या, या कृतींमधून कुठल्याही वस्तूंचा आधार न घेता काही दाखवण्याचं आव्हान असलं तर अभिनेता या व्यापात गुंतून जातो.पण या सगळ्यातून नक्की काय सांगितलं जातं आहे? हा प्रश्न पिच्छा पुरवतो.
पुढचे प्रश्न असे असतात की नाटकातून जे सांगितलं जातं ते चमच्याने भरवणं अश्या स्वरूपाचं असावं का? प्रेक्षकांची नाटकातून नुसती करमणूक व्हावी की उदबोधन व्हावं? नाटक बघून झाल्यानंतरही ते नाटक प्रेक्षकांच्या मनात रेंगाळत रहावं का? प्रेक्षकांनी नाटक बघितल्यानंतर अस्वस्थं व्हावं का? हे अस्वस्थ होणं नुसतच असावं की त्यातून काही कृती करण्यासाठी एखाद्यानं प्रवृत्त व्हावं?
या प्रश्नांची व्याप्ती मोठी आहे.त्यांची उत्तरं एकसारखी नाहीत.वेगवेगळे मतप्रवाह या प्रश्नांच्या उत्तरांसंबंधात आहेत.
मी नवीन होतो.पहिल्या एकांकिकेत मृत्यूबद्दल लेखक-दिग्दर्शकाला नक्की काय सांगायचंय ते मला समजलं नाही.याच लेखक-दिग्दर्शकाचं पूर्ण लांबीचं नाटक मला पहायला मिळालं.जहाजाचा कप्तान आणि रंगमंचावर न दिसणारा देवमासा हा संघर्ष मला समजला.पटला.आवडला.देवमासा म्हणजे नियतीचं रूप असेल हे त्यावेळी कळलं नाही.या नाटकातल्या भावना माझ्या जवळच्या होत्या.यातली माणसं मला माहित असल्यासारखी बोलत वागत होती, भावना व्यक्तं करत होती.हे नाटक रंजक होतं.यातले देखावे, पेहेराव, रंगभूषा आकर्षक होती.तरीही हे नाटक मी त्यावेळी पहात असलेल्या व्यावसायिक नाटकांपेक्षा वेगळं होतं!
यानंतर एका वेगळ्य़ा दिग्दर्शकाकडे मी एक प्रायोगिक एकांकिका केली.माझा पहिला मेन रोल म्हणून मी अत्यंत खूष झालो होतो.एकांकिका त्यावेळी स्पर्धांमधून गाजली होती.ही एकांकिकाच काय तर ही एकांकिका लिहिणारय़ा त्या प्राध्यापक लेखकाची अनेक नाटकं त्यावेळी राज्यनाट्यस्पर्धेत गाजत होती.
एकांकिकेत दोन पात्रं.एक सामान्य पण त्याच्या बोलण्यावरून बुद्धिमान असेल असं वाटणारा माणूस आणि एक विदूषक.त्यांचे संवाद.प्रश्नोत्तरं.नायक कुठलं तरी द्वार उघडण्याच्या मिशनमधे आहे पण आधी ते कुठे आहे ते त्याला समजत नाही.विदूषकाद्वारे त्याचा पत्ता लागल्यावर तो ते उघडण्याचा प्रयत्न करतो.झटतो.सरतेशेवटी धडका मारतो पण ते द्वार काही उघडत नाही!
हा दिग्दर्शकही परिचयाचा.प्रेमळ.सगळं समजाऊन सांगणारा.नाटकाआधी, नाटकानंतर नाटकावर आणि इतरही गोष्टी समंजसपणे बोलणारा.मी हे नाटक केलं.ते करत असताना येत नाही म्हणून शिव्या खाल्ल्या.पण खरंच सांगतो, त्यावेळी मी करतोय ते का करतोय? या सगळ्याचा अर्थ काय? आपण काम करताना जी एनर्जी लावतोय ती बरोबर आहे का? तिची गरज आहे का? या प्रश्नांनी माझा सतत पाठपुरावा केला.आपण ज्या वातावरणातून आलेलो असतो त्यातून आपली समज तयार होत असावी.पुढे अनुभवाने ती घडत असावी.
पुढे एक ग्रीक पद्धतीची एकांकिका करायला मिळाली.यात ग्रीकांसारखे- म्हणजे मुलींच्या स्लिवलेस फ्रॉकसारखे कॉस्च्यूम्स होते.चार सामान्य माणसं आणि एक त्यांचा मुखिया- मीडीया.मीडीयाच्या पोषाख तसाच.रंग वेगळा.चार जण साधारण तरूण.मीडीआ म्हातारा.या एकांकिकेचे चार-पाच एकांकिका स्पर्धेत प्रयोग झाले.ढोल आणि मोठी झांज असं या एकांकिकेला पार्श्वसंगीत होतं.या एकांकिकेत चार जणांपैकी एक अशी भूमिका मी केली.लेखक दिग्दर्शक मीडीया झाला होता.पुढे आणखी एका वेगळ्या अभिनेत्याने हा मीडीआ साकारला.नंतर मलाही एकदा हा मिडीआ करायला मिळाला.माणसाने केलेला निसर्गाचा नाश माणसावरच उलटतो हा या एकांकिकेचा विषय होता.चार जणांचे एकेका ओळीचे एकामागोमाग येणारे यमकबद्ध संवाद.त्यावर मीडीयाचं निरूपण.जंगलातून चाललेला सगळ्यांचा प्रवास.दिवसा.रात्री.संवाद हे या एकांकिकेचं वैशिष्ट्यं.विशेषत: मीडीयाची स्वगतं.ती बोलताना खूप भारावून गेल्यासारखं वाटायचं.हा मिडीआ वेगवेगळ्या मार्गाने मला बघायला मिळाला.एकांकिका करताना खूप एनर्जी लागायची.सगळेच जण आदिमानवासारखे दिसणारे म्हणून की ग्रीक एकांकिकेचं स्वरूप म्हणून, पण हे सगळं लाऊड होतंय हे करताना जाणवायचं. बघायला आलेले मित्रं, लोक एकांकिका संपल्यावर आम्हा सगळ्य़ांकडे आ वासून बघत रहायचे.आम्ही काय सॉलिड करतोय म्हणून हे असे बघताएत की यांना काहीच कळलं नाही म्हणून? की हे सगळं कश्याला करायचं असं यांना वाटतंय? एकांकिका करताना मजा यायची करून झाल्यावर प्रश्नं पडायचे…

Thursday, September 30, 2010

चोर मचाये शोर!

तुम्ही म्हणाल मनू गमतीदार आहे.कबूल.पण तेवढाच तो विचित्रही आहे.मनूच्या घरी एके रात्री चोर शिरला.मनूच्या सांगण्याप्रमाणे, मनूच्या त्या फेमस खांद्याला लावायच्या कातडी बॅगेतून चोराने रोख रक्कम, घड्याळ असा जवळजवळ पाच-सहा हजाराचा ऐवज लंपास केला.तेवढंच घेऊन चोर सटकला असता तर तो चोर कसला! जाता जाता त्यानं मनूच्या तोंडावर काहीतरी मारलं.मनूचा समोरचा एक दात काळा-निळा.चोरावर दातओठ खायचीसुद्धा पंचाईत.मनूचं सुरू झालं, “×××! काय झाडाला लागतात पैसे! वर हे रे! या दाताचं आता काय करू?”
मनूनं मग पोलिस कंप्लेंट केली.मनूला जिवणी फाकवून तोंड भरून हसायची सवय.हसला की काळा दात दिसला.हसायची चोरी! त्यानं दातही बदलला.
तिकडे पोलिसांना काही नेहेमीप्रमाणे चोर सापडेना.चार-पाच हजारांची चोरी काय शोधणार ते? त्यांना भलतीच कामं.खंडणीविरूद्ध पथक मजबूत करणं, शाळेसाठी देणग्या गोळा करणं.मनू आधीच एक नंबरचा फुकट्या.स्वत:च्या गेलेल्या चार-दोन हजारांवर तो पाणी सोडणार? त्यानं गल्लीत रात्रीची गस्त घालायची टूम काढली.मी लांबून सगळं बघत होतो.आपण काय करणार? मनूच्या दृष्टीनं मी म्हणजे फद्या!
मनू भलताच शहाणा.रात्रीच्या गस्तीसाठी त्यानं रिकामटेकडी, स्वेच्छानिवृत्ती घेतलेली, म्हातारीकोतारी बरोबर टाळली.तरूण मुलं, मुली जमवल्या.गस्त सुरू झाली.मनू वयस्कर.चोरी झालेली.रात्रीच्या धुंद वातावरणात तरूणाईचा सहवास.मनू समोरचा खोटा दात जिभेवर काढून दाखवतोय.पुन्हा जागच्या जागी लावतोय.जादू! तरूण पोरी खूष! मनू चेकाळतोय.रात्रीचं जागरण आणि दिवसा कामावर जाणं.झोपेची काशी.मग मनू उन्हात काळा होणारा चष्मा घालायला लागला.दिवसा-रात्री कधीही झोप अनावर व्हायची.डुलकी लागायची.ती दिसू नये.चष्मा नाकावरच फुटू नये म्हणून आता तो चष्म्याला दोरी बांधायला लागला.रात्री गल्लीतल्या पोरींना आणि दिवसा गल्लीतल्या महिलांना ज्योक सांगू लागला.त्यांचे ज्योक ऐकून उगाचच “च्यांगलं आहे! च्यांगलं आहे!” म्हणत हॅऽऽहॅऽऽहॅऽऽ करत नंदिबैलासारखं डोकं हलवून दाखवू लागला.सामान्य माणसाच्या अतिचाणाक्ष नजरेने मी ते सगळं बघत, ऐकत होतो.चोर शोधण्याचं काम, त्यात तरूण पोरं-पोरी एकत्रं आलेल्या.मनूनं मला वेड्यात काढलेलं.व्हायचं तेच झालं.
एका देखण्या पण अबोल असं डेडली कॉंबिनेशन असलेल्या मुलाभोवती पोरी जमायला लागल्या.त्यातली एक जादा उत्साह दाखवायला लागली.मनूसारख्या बुजुर्गानं खरं तर त्या फंदात पडायचं नाही.तरूण पोरं पडत धडपडत शिकणार.त्यांची जबाबदारी त्यांच्यावर.मनू भडकला.त्या देखण्या, अबोल पोराच्या मागे लागला.ज्यादाच उत्साह दाखवणारी मुलगी मनूच्या मनात भरली होती.तीच काय! हल्ली मनू, दिसली मुलगी की… काय बोलणार? गल्लीत हीऽ बोंबाबोंब.चोर सापडायची बोंब.ती पोरगा-पोरगी कुठे गूल झाले? म्हणून मनूची बोंब! ते दोघे तिथेच! इतर पोरं-पोरी मनूचा अवतार बघून कलटी खायच्या मार्गावर.मनूला गममधे जायला एक कारण मिळालं.मुलगी हातातून सटकल्याचं.आधीच मर्कट, त्यात प्रेमभंगाचा गम, त्यात चोरीचा विंचू चावलेला.चोर सापडत नाही.पोरगा-पोरगी दाद देत नाहीत.मनू सैरभैर.
आता त्याने काय करावं? एके दिवशी त्याने एका पोलिसाचीच गचांडी धरली.पोलिस काय ऐकतात! त्यांनी मनूला आत टाकलं.चोपलं.समोरचा खोटा दात जिभेने हलवत राहिलं तर पोरी एक वेळ भाळतील पण पोलिस ते पोलिस. “माझी चोरी झालीये.ती मी शोधणारंच.मी रामशास्त्री प्रभूणे आहे रामशास्त्री प्रभूणे!” असं मनू चौकीत रात्रभर बरळत राहिला.पोलिसांच्या हातात दंडुका असतोच.सकाळी वेडा म्हणून त्याला सोडून देण्यात आलं.
मनूला आता लायसन्सच मिळालं.मनूनं आता त्या देखण्या अबोल पोराच्या नावाने पत्रं लिहिलं.त्या पत्रात त्या पोराच्यामागे ज्यादा उत्साह दाखवणारय़ा आणि मनूच्या हातून सटकलेल्या पोरीची छीऽथू केली.दिलं पेपरला पाठवून.ते छापून आलं आणि लागले सगळे त्या देखण्या, अबोल पोराच्या मागे.मला मनूनं बाजूलाच सारलेलं.लोकांची मजा अशी की मनूला सपोर्ट करणारय़ांचीच संख्या अधिक. ’त्याच्याकडे चोरी झालीए’ ही सहानुभूतीची लोकभावना प्रबळ.मनू मग भरकटलाच.ठार वेडा व्हायचा बाकी राहिला.
रात्रीच्या धुंदीत त्याने अनेक चाळे केले.एकदा रस्त्याच्या कडेला दोन-चार परप्रांतीय पाठमोरे रिलॅक्स होत होते.मनूनं कशाला त्यांच्या मागे लागायचं? ते पोलिसांच्या वरताण.त्यांनी मनूला उभा-आडवा फोडला.मनू डायरेक्ट इस्पितळात.तेही गल्लीतल्या आमच्या एका मित्रानं थर्डशिप वरनं परतताना, त्याला रस्त्याच्या कडेला व्हिवळत पडलेलं बघितलं म्हणून.मनूला आता तोंड दाखवायची चोरी.थोबाड सुजलेलं.त्यानं दाढी वाढवली.ती कराकरा खाजवत तो आपली दैनंदिन आणि दीनवाण्या रात्रीतली कामं उरकतच होता.अनेक व्याप करून ठेवत होता.आपणच बरोबर, बाकी सगळे मूर्ख या नात्याने.
पुढची बातमी ऐकली आणि मी चाटच पडलो.मनूच्या मानसिक अवस्थेविषयी काळजी वाढवणारी ती बातमी.पेपरात छापून आलेली.मनूने म्हणे एका अल्पवयीन मुलीलाच आपलं लक्ष्य बनवलं होतं! मनूला आता माझी नव्हे तर मानसोपचारतज्ज्ञाची आवश्यकता होती.
पोलिसांनी आता मात्र मनूची चोरीपासूनची सगळी प्रकरणं गांभीर्यानं घ्यायला सुरवात केली.नवा उमदा सीआयडी कामाला लागला.मांडवळ हा शब्द, अपवादाने असेल, पण त्याच्या शब्दकोषात नव्हता.त्यानं मूळ चोरीच्या प्रकरणालाच हात घातला.सगळे धागेदोरे त्यानं शांतपणे जुळवले.कधी नव्हे ते मीही निश्चिंत झालो.वाटलं, मनू माणसात येणं शक्य होईल.ज्याच्या पायी एवढं सगळं रामायण झालं तो चोर नक्की सापडेल.
पुराव्यानिशी असं सिद्धं झालं की मनूच्या त्या कातडी बॅगेत काहीच नव्हतं.चोर आलाच नव्हता.चोरी झालीच नव्हती.चोर कुणी असलाच तर तो मनूच होता.जो मनू इतके दिवस उलट्या बोंबा ठोकत होता.
हे सगळं माझ्यासाठी कल्पनेपेक्षा विलक्षण होतं.मी भाबडेपणानं रिएलीटी शो बघायला निघालो होतो.मनूनं मला मद्रासी सिनेमा दाखवला होता…

Wednesday, September 29, 2010

कॉमेडी शो “शिक्षण!”

मनू काय करेल ते ब्रह्मदेवाच्या बापालासुद्धा कळणार नाही.हल्ली तो सतत मुलांच्या गराड्यातच असतो.शाळा-कॉलेजमधल्या मुलांच्यामधे राहून त्याला ’चाचा नेहरू’ व्हायचं असावं असं वाटून सुरवातीला मी त्याचं हे वागणं मनावर घेतलं नाही.पण मग तो फारच चेकाळला.शाळा, कॉलेजमधल्या मुलांसारखे टाईट, तोकडे, चित्रविचित्र छापांचे आणि रंगांचे शर्टस, टी शर्टस तो घालायला लागला.चकचकीत घट्टं पॅंटी आणि डोक्यावर उलटी कॅप घालून मिरवू लागाला.त्याने जेव्हा लांबलचक कल्ले- साईडलॉक्स- वाढवले, ओठाखाली केसांचा पुंजका ठेवला आणि काळे निळे गॉगल्स घालू लागला तेव्हा मला रहावलंच नाही.पोरंटोरं शाळा-कॉलेजात जायचं सोडून आपली मनूच्याच अवतीभवती!
एकदा सकाळी सकाळीच दबा धरून बसलो.मनू घराबाहेर पडतच होता.त्याला बाजूला खेचला आणि काट्यावरच घेतला.म्हणालो, “मन्या साल्या शोभतं काय तुला? अरय़े शतकातून एखादाच चाचा नेहेरू होतो! साल्या वासरात लंगडी गाय शहाणी आणि अंधोमें काना राजा, दोन्ही व्हायला बघतोस काय एकदम? एकाचवेळी!” मनू लहान मुलाकडे -केजीतल्या- बघावं तसं माझ्याकडे बघायला लागला.मला त्याने ओळखलं हे माझं नशीब.त्याला हल्ली हे जग फक्त लहान मुलांचच आहे असं वाटत होतं. “काय झालं बाबा?” टीचरनं स्टुडंटला विचारावं तसंच त्याने विचारलं.मी म्हणालो, “मन्याऽ कुठे फेडशील हे पाप? अरे पोरं शाळेला- कॉलेजला दांड्या मारताएत.त्यांचे आईबाप त्यांच्या नावाने कोकलाताएत आणि तू उलट्या टोप्या काय घालतोएस! घट्टं चकचकीत पॅंटी काय घालतोएस! बाबा, मुलं शाळाकॉलेजात गेली नाहीत तर करतील काय?” मनूतला हजरजबाबी बिरबल लगेच जागा झाला.म्हणाला, “आता काय करतात?” मी सुद्धा बिरबलाचा बाप बनलो.म्हणालो, “तुझ्याबरोबर गावभर उंडारतात! त्यांचे आईबाप शाळा, कॉलेजांच्या फिया भरतात.मनू, मनू अरे या उद्याच्या नागरिकांना शिक्षणापासून वंचित करतोएस तू! लाज वाटायला पाहिजे तुला!” माझ्यातला सात्विक का कसला पणा आता चांगलाच उसळ्या मारायला लागला.कधी नव्हे ते मनूनं माझ्यासमोर पडतं घेतलं होतं, सध्या तरी.मी सुटलोच, “मन्या मन्या अरे शिक्षणावरचा लोकांचा विश्वास उडेल! शाळाकॉलेजं ओस पडतील! पुढच्या जन्मी निरक्षर, आंगठेबहाद्दर होशील! आपल्यासारख्यांना शिक्षण ही एकच गोष्टं घेण्यासारखी राहिलीए आणि तुझं हे काय? तू किती वेळा बसून वारावीचं वर्षं पक्कं केलंस हे काय मला माहित नाही? कृपा कर! हात जोडतो! पण पोरांना शिक्षण घेण्यापासून तोडू नकोस रे!”
जुन्या हिंदी सिनेमातल्या गरीब हिरॉईनच्या अत्यंत गरीब (म्हणजे भिकारी?) बापाच्या डोळ्यांत जसे अश्रू उभे रहातात तसे माझ्या डोळ्यांतले अश्रू बघून मनूला बोलणं भागच पडलं.त्यानं पंधरावेळा मान वेळावत विचारलं, “तुला काय वाटतं, तू म्हणतोएस तिथे त्यांना शिक्षण मिळतं?” मी आश्चर्यचकीत झालो उद्गारलो, “म्हणजे?”
मनूची प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली, “मुलगा कितवीत?”
मी उत्तरलो, “दुसरीत!”
“डोनेशन किती दिलंस?”
“पन्नास हजार!”
“फी कीती?”
“महिना दीड हजार!”
“टर्म फी?”
“अधिक दीडहजार!”
“बसची फी?”
“महिना सातशे!”
“युनिफॉर्म किती?”
“दोन दोन! वेगवेगळे!”
“युनिफॉर्म, पुस्तकं, वह्या, दप्तर कुठून घेतोस?”
“शाळेतूनच! आणखी पाच-सात हजार मोजून!”
“शाळेत मराठी शिकवणारय़ा बाईला ’न’ आणि ’ण’ मधला फरक कळतो?”
“बहुतेकवेळा कळतोच असं ठामपणे म्हणता येणार नाही!”
“मागच्या वेळेला तुझी बायको पालक मेळाव्याला गेली तेव्हा ही बाई काय म्हणाली?”
“बाई म्हणाली, तुमच्या मुलाचा अभ्यास घरी नीट करून घ्या.त्याची तयारी झालेली नाही.तो नापास झाला तर त्याला शाळेतून काढून टाकू!”
“तुझी बायको काय करते?”
“कॉलसेंटरमधे नोकरी करते! सेंटरनं तिला रात्रंदिवसासाठी विकत घेतलंय!”
“बरं! शाळेची पिकनिक वगैरे?”
“वर्षातून चारदा.पिकनिकला न गेल्यास हजार रूपये दंड!”
“शाळेचे विश्वस्त काय करतात?”
“बांधकाम व्यावसायिक.बिल्डर आहेत ते!”
“मुख्याध्यापक, इतर शिक्षक फावल्या वेळात काय करतात?”
“म्हणजे काय? शिकवतात!”
“तसं नाही रे! त्या व्यतिरिक्त काय करतात?”
बरंच काही.खाजगी शिकवण्या घेतात.व्यवसाय पुस्तिकांसाठी लिहून कमावतात.टीव्ही सिरियल्समधे कामं करतात.निरनिराळ्या गेम शोजमधे भाग घेतात.”
मनू आता फूल फार्मात आला.म्हणाला, “आता मला सांग, मी या शाळाकॉलेजातल्या मुलांमधे मिसळतो.त्यांच्याशी गप्पा मारतो.त्यांची मनं मोकळी करतो.त्यांना चार भिंतींबाहेरचं हे जग दाखवतो.त्यांच्यासारखाच रहातो.व्यवहार म्हणजे काय हे त्याना प्रॅक्टिकली शिकवतो, म्हणजे मी कुठलं पाप करतो?”
माझ्या डोक्यात लख्खं प्रकाश पडला.मी मनूला साष्टांग लोटांगण घातलं.माझं नेहेमीच असं होतं.कुठल्याही विषयाला दुसरी बाजू असते हे मी लक्षात घेतच नाही! तोंडात मारून घेत मी म्हणालो, “मन्या सरकारपर्यंत तुझं हे काम पोचलं तर तुला नक्की ’शिक्षणमहर्षी’ करतील,मला माफ कर.चुकलो मी!”
मनू हसला.जरा जोरातच.म्हणाला, “कुठल्यातरी कोपरय़ातून कुणीतरी माट्या येतो.कोचिंग क्लासेस काढून उखळ पांढरं करून घेतो.आपण का मागे रहायचं? माझ्या कामाचेही मी पैसे घेणार.पण माझं टेक्निक वेगळं आहे,अरे, शेवटी धंदा आहे हा आणि यात सगळं माफ असतं!”
जगातल्या सगळ्यात उत्तुंग इमारतीत शिरावं आणि नेमकं तिच्यावरच एखादं विमान येऊन आदळावं तसं माझं झालं…