romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Friday, October 1, 2010

न कळणारी नाटकं…

प्रत्येक माणूस शंभर टक्के प्रेक्षक असतो.नवोदित म्हणून या माध्यमात सुरवात करताना हाच प्रेक्षक नाट्यकर्मी म्हणून घडू लागतो.सुरवात करणारय़ा या प्रेक्षकाला आपण जे नाटक करतो आहोत ते कळतंय का? आवडतंय का? हे समजलं तर चांगलं.बरय़ाच वेळा समोर आलेलं काम करणं हेच आपल्या हातात असतं.नवोदितालाच काय कित्येक वेळा अनुभवी माणसाला चॉईस असत नाही.
कळणं हे मी इथे रूढार्थानं म्हणतोय.रंगमंचावर काय चाललं आहे हे प्रेक्षक म्हणून कळतंय का? नाटक सहज कळण्यासारखं असू नये का? एखादी गहन गोष्टं सोपी करून सांगावी की ती आणखी अवघड करून सांगावी? मुद्दाम एखादी गोष्टं अवघड किंवा अनाकलनीय, समजायला बोजड करण्याचं कारण काय?
अनेक नवोदितांप्रमाणे त्यावेळी मला हे प्रश्न पडले.फक्त हे प्रश्न आता इतक्या वर्षांनंतर मी हे लिहित असताना मांडू शकतोय.तेव्हा ते जाणवत नक्की होते.
मला पहिली एकांकिका मिळाली त्यात मृत्यू संदर्भातलं काही लेखकाला सांगायचं होतं.लेखक हाच दिग्दर्शक होता.अभिनेत्याला रंगमंचावर काही करायला मिळालं तर नुसता आनंदच असतो.रंगमंचावर येणं हे प्रलोभन नक्कीच आहे.वाक्यं चांगली असली, ती बोलताना मजा आली, सांगितलेल्या कृती वेगळ्या असल्या, या कृतींमधून कुठल्याही वस्तूंचा आधार न घेता काही दाखवण्याचं आव्हान असलं तर अभिनेता या व्यापात गुंतून जातो.पण या सगळ्यातून नक्की काय सांगितलं जातं आहे? हा प्रश्न पिच्छा पुरवतो.
पुढचे प्रश्न असे असतात की नाटकातून जे सांगितलं जातं ते चमच्याने भरवणं अश्या स्वरूपाचं असावं का? प्रेक्षकांची नाटकातून नुसती करमणूक व्हावी की उदबोधन व्हावं? नाटक बघून झाल्यानंतरही ते नाटक प्रेक्षकांच्या मनात रेंगाळत रहावं का? प्रेक्षकांनी नाटक बघितल्यानंतर अस्वस्थं व्हावं का? हे अस्वस्थ होणं नुसतच असावं की त्यातून काही कृती करण्यासाठी एखाद्यानं प्रवृत्त व्हावं?
या प्रश्नांची व्याप्ती मोठी आहे.त्यांची उत्तरं एकसारखी नाहीत.वेगवेगळे मतप्रवाह या प्रश्नांच्या उत्तरांसंबंधात आहेत.
मी नवीन होतो.पहिल्या एकांकिकेत मृत्यूबद्दल लेखक-दिग्दर्शकाला नक्की काय सांगायचंय ते मला समजलं नाही.याच लेखक-दिग्दर्शकाचं पूर्ण लांबीचं नाटक मला पहायला मिळालं.जहाजाचा कप्तान आणि रंगमंचावर न दिसणारा देवमासा हा संघर्ष मला समजला.पटला.आवडला.देवमासा म्हणजे नियतीचं रूप असेल हे त्यावेळी कळलं नाही.या नाटकातल्या भावना माझ्या जवळच्या होत्या.यातली माणसं मला माहित असल्यासारखी बोलत वागत होती, भावना व्यक्तं करत होती.हे नाटक रंजक होतं.यातले देखावे, पेहेराव, रंगभूषा आकर्षक होती.तरीही हे नाटक मी त्यावेळी पहात असलेल्या व्यावसायिक नाटकांपेक्षा वेगळं होतं!
यानंतर एका वेगळ्य़ा दिग्दर्शकाकडे मी एक प्रायोगिक एकांकिका केली.माझा पहिला मेन रोल म्हणून मी अत्यंत खूष झालो होतो.एकांकिका त्यावेळी स्पर्धांमधून गाजली होती.ही एकांकिकाच काय तर ही एकांकिका लिहिणारय़ा त्या प्राध्यापक लेखकाची अनेक नाटकं त्यावेळी राज्यनाट्यस्पर्धेत गाजत होती.
एकांकिकेत दोन पात्रं.एक सामान्य पण त्याच्या बोलण्यावरून बुद्धिमान असेल असं वाटणारा माणूस आणि एक विदूषक.त्यांचे संवाद.प्रश्नोत्तरं.नायक कुठलं तरी द्वार उघडण्याच्या मिशनमधे आहे पण आधी ते कुठे आहे ते त्याला समजत नाही.विदूषकाद्वारे त्याचा पत्ता लागल्यावर तो ते उघडण्याचा प्रयत्न करतो.झटतो.सरतेशेवटी धडका मारतो पण ते द्वार काही उघडत नाही!
हा दिग्दर्शकही परिचयाचा.प्रेमळ.सगळं समजाऊन सांगणारा.नाटकाआधी, नाटकानंतर नाटकावर आणि इतरही गोष्टी समंजसपणे बोलणारा.मी हे नाटक केलं.ते करत असताना येत नाही म्हणून शिव्या खाल्ल्या.पण खरंच सांगतो, त्यावेळी मी करतोय ते का करतोय? या सगळ्याचा अर्थ काय? आपण काम करताना जी एनर्जी लावतोय ती बरोबर आहे का? तिची गरज आहे का? या प्रश्नांनी माझा सतत पाठपुरावा केला.आपण ज्या वातावरणातून आलेलो असतो त्यातून आपली समज तयार होत असावी.पुढे अनुभवाने ती घडत असावी.
पुढे एक ग्रीक पद्धतीची एकांकिका करायला मिळाली.यात ग्रीकांसारखे- म्हणजे मुलींच्या स्लिवलेस फ्रॉकसारखे कॉस्च्यूम्स होते.चार सामान्य माणसं आणि एक त्यांचा मुखिया- मीडीया.मीडीयाच्या पोषाख तसाच.रंग वेगळा.चार जण साधारण तरूण.मीडीआ म्हातारा.या एकांकिकेचे चार-पाच एकांकिका स्पर्धेत प्रयोग झाले.ढोल आणि मोठी झांज असं या एकांकिकेला पार्श्वसंगीत होतं.या एकांकिकेत चार जणांपैकी एक अशी भूमिका मी केली.लेखक दिग्दर्शक मीडीया झाला होता.पुढे आणखी एका वेगळ्या अभिनेत्याने हा मीडीआ साकारला.नंतर मलाही एकदा हा मिडीआ करायला मिळाला.माणसाने केलेला निसर्गाचा नाश माणसावरच उलटतो हा या एकांकिकेचा विषय होता.चार जणांचे एकेका ओळीचे एकामागोमाग येणारे यमकबद्ध संवाद.त्यावर मीडीयाचं निरूपण.जंगलातून चाललेला सगळ्यांचा प्रवास.दिवसा.रात्री.संवाद हे या एकांकिकेचं वैशिष्ट्यं.विशेषत: मीडीयाची स्वगतं.ती बोलताना खूप भारावून गेल्यासारखं वाटायचं.हा मिडीआ वेगवेगळ्या मार्गाने मला बघायला मिळाला.एकांकिका करताना खूप एनर्जी लागायची.सगळेच जण आदिमानवासारखे दिसणारे म्हणून की ग्रीक एकांकिकेचं स्वरूप म्हणून, पण हे सगळं लाऊड होतंय हे करताना जाणवायचं. बघायला आलेले मित्रं, लोक एकांकिका संपल्यावर आम्हा सगळ्य़ांकडे आ वासून बघत रहायचे.आम्ही काय सॉलिड करतोय म्हणून हे असे बघताएत की यांना काहीच कळलं नाही म्हणून? की हे सगळं कश्याला करायचं असं यांना वाटतंय? एकांकिका करताना मजा यायची करून झाल्यावर प्रश्नं पडायचे…

3 comments:

Shraddha Bhowad said...

तुम्ही नाटकांची नावं दिली असती तर कदाचित संदर्भासहीत कळलं असतं.
काही नाटकं नाटक संपल्यानंतर झालेल्या चर्चांनी तुकडया-तुकडयाने कळतात.
याच वर्षी आलेलं ’गेली एकवीस वर्षं’ असंच absolutely डोक्यावरून गेलं.पण दोन-तीन आठवडयात चार-पाच वेगवेगळ्या प्रकारे कळलं.
समजली नाहीत पण काहीतरी ग्रेट बघितल्याचा feel मला बहुतेक वेळा एलकुंचवारांची नाटकं बघितल्यावर आला.
मोहीत टाकळकरचं ’तू’ समजायला बोजड असलं तरी ग्रेट वाटलं.

Prasad Kulkarni said...

फ़ारच छान लिहिलय..

विनायक पंडित said...

अभिप्रायाबद्दल मन:पूर्वक आभार!
श्रद्धाजी ’अभिलेख’ ही मालिका लिहिताना माझी एकूण लर्नींग प्रोसेस मांडायची असं ठरवून लिहितो आहे.काय शिकलो ते मला कळावं.कुणाला त्याचा काही उपयोग झाला तर तोही व्हावा.नाटका-एकांकिकासंबंधींच्या डिटेल्सपेक्षा मी शिकण्याच्या प्रोसेसवर फोकस करायचं ठरवलं आहे.बाकी, मी ’न कळणारी नाटकं’ याच पोस्टमधे लिहिल्याप्रमाणे वेगवेगळी मतं प्रत्येकाला असणारच.आपण मत मांडलंत मन:पूर्वक आभार!