romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Tuesday, November 29, 2011

नॅनोरिमोचा जल्लोष!

आंतरजालावरचा माझा वावर तसा अलिकडचा म्हणायला पाहिजे. अगदी अलिकडचा नव्हे पण आंतरजालात पार डुबकी मारून काही शोधणं मला या ना त्या कारणानं तेवढं शक्य झालेलं नाही असा माझा अनुभव. इतर अनेकांप्रमाणे माझंही शिक्षण पडत धडपडतच.

तेव्हा नॅनिरिमो अर्थात NaNoWriMo बद्दल तुम्हाला सगळ्याना माहित असेलच. मला गेल्यावर्षी नॅनोरिमोबद्दल कळलं. नॅनोरिमो हे एक संकेतस्थळ आहे एका पत्रकारानं बनवलेलं. काहीतरी लिहून बघणारय़ाला कधीतरी मोठं लिखाण करावं असं अगदी आतून वाटत असतं. तो ते कबूल करो अथवा ना करो. असं लिखाण सहजासहजी करणं शक्य असतंच असं नाही. ते इतरांपर्यंत पोचणं तर लिखाण करत असताना दुरापास्तच वाटत असतं. त्या पत्रकारालाही तसंच वाटत असलं पाहिजे. सर्वात आधी तुम्हाला गंभीरपणे घ्यायचीच कोणाची इच्छा नसते. तयारी तर नसतेच नसते. अशांनी काय करावं? त्या पत्रकारानं काय केलं?

त्यानं नॅनोरिमो नावाचं दालनच उघडलं. NaNoWriMo अर्थात National Novel Writing Month या नावानं. ते उघडल्यालाही बारा वर्षं झाली. हे तेरावं वर्षं. गेल्यावर्षी मला दिसलं तेव्हा ज्ञात झालं. गेल्यावर्षी, यावर्षी इंग्रजी तसंच मराठी वर्तमानपत्रातून ते जाहीरही झालं आणि तुमच्याआमच्यासारख्या अनेकांपर्यंत ते पोचलं.

दरवर्षीचा नोव्हेंबर महिना हा राष्ट्रीय कादंबरीलेखनमास म्हणून ह्या संकेतस्थळावर साजरा केला जातो. याच्या प्राथमिक अटी म्हणजे नोव्हेंबर महिन्याच्या १ तारखेपासून ३० तारखेपर्यंतच्या ३० दिवसांमधे कादंबरीलेखनाचे ५०००० शब्दं लिहायचे अर्थात १६६७ शब्दं रोज! बस्स! लिहित सुटायचं!

गेल्यावर्षी इंग्रजीत लिहायचं म्हणून घोटाळत तिथेच थांबलो. यावर्षी आणखी शोध (?) घेतला असता असं लक्षात आलं की जगातल्या कुठल्याही भाषेला हे दालन सताड उघडं आहे! मग म्हटलं वाघिणीच्या दुधापेक्षा आपल्या आईच्या भाषेत लिहिलेलं काय वाईट?

लिहावं का? जमेल? रोज दाबून बसलो तर किती शब्दं लिहून होतात याचा अंदाजच नव्हता. ५०००० म्हणजे तर खूप लांबचा टप्पा वाटला. नुसतं जाहीर करायचं म्हणजेही फारच वाटलं. यांचं काहीतरी भलतंच!!! अशापासून कुठल्याही प्रतिक्रिया अगदी घरापासून दारापर्यंत आल्या असत्या. त्यामुळे माफ करा दोस्तांनो पण हे जाहीर करून संगतीलाही कुणाला घ्यायचं डेअरिंग झालं नाही! आईच्यान सांगतो!

हूऽऽन जाऊद्या येकदाचं! असं म्हणून बसलो. सर्वात आधी सुचणं, मग पोटापाण्याच्या टायमाशी संधान बांधणं, मग संसारी (?)  गृहस्थाच्या अथ पासून इतिपर्यंतच्या सगळ्या अडचणी, अकस्मात लिखाणाला होणारी एखाद दिवसाची दांडी, अपरिहार्य लग्नंसमारंभ ते अस्मादिकाचा अत्त्यंत साधेपणानं (????) पार पडलेला वाढदिवस. काय काय आणि किती सांगावं या उत्सवी माहोलात रमणारय़ा या जीवाविषयी!

एक कसं घडत गेलं माहित नाही पण टेन्शन नेहेमीसारखं डोक्यावर बसलं नाही खरं. दुसरं म्हणजे सगळी कामं करत हेही केलं. नेहेमीसारखा मी माझं लिखाण करणारच काहीही झालं तरी असा हट्ट धरला नाही.

खूपच वर्षांपूर्वी सुचलेलं एक बीज मात्र हाताशी होतं हे खरं. महत्वाची पाच पात्रं तयार होती. साधारण घटना मनात होत्या. अगदी जराशी सुरवात इथे केलेली होती.

तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा लाभलेल्या होत्याच. माझ्याकडून असं काही पूर्ण व्हावं ही सगळ्यांचीच, विशेषत: त्या सर्वव्यापी तत्वाची इच्छा असावी. 

आज माझे ५१३६५ शब्दं आणि अर्थातच गुरूजनां प्रथमं वंदे! या माझ्या लेखनाचा पहिला खर्डा पूर्ण झाला!
कधी एकदा तुम्हाला सांगतो असं झालंय आज! जवळजवळ महिनाभराचा माझा इथला उपवास आज संपवतो आहे.
लोभ आहेच, तो वृद्धिंगत होत रहावा ही नम्र विनंती!

Monday, November 7, 2011

मैत्रसंवाद

"तुझं बरंय बाबा
घट्ट उभा असतोस
निश्चल स्थितप्रज्ञासारखा
कुणाच्याही भानगडीत नाहीस
मी सुद्धा जेव्हा तुझ्याशी बोलायला, भेटायला, मस्ती करायला येतो
तेव्हाही तू ढिम्मच!
असा कसा रे तू?..
मी आक्रसलेला असतो तेव्हाही
लांबवर तू दिसतोस, तो ही तसाच
नेहेमीसारखाच. बोल ना रे ढंप्या!
तुला माहितीए त्या पाचजणींना सांभाळताना
त्यांच्याबरोबर खिदळतानाही
मी तुला कधीच विसरत नाही
स्वत:च्या बायका, त्याही, इतक्या, असूनही
मी तुझ्यासारख्या मित्राला विसरत नाही
याचे तुला काहीच वाटत नाही?..
तुला कसं सांगू?
आभाळ कोसळताना मला नाही रहावत रे!
मी दिल्यात तुला धडका किती वेळा
कबूल आहे मला!
तू तेव्हा तुटतोस, कधी कमी, कधी जास्त
कधी मागे मागे जायला लागतोस
पण माझ्या चंचलपणाला आवर तूच घालतोस!
तेव्हा माझ्या वडीलमित्रा
मी काय म्हणतो
तुला भावनाच नाहीत का?
अरे रहाटगाडगं असतंच की
कधी उचंबळायचं, कधी खवळायचं
कधी शांत तर कधी मस्ती करायची
सगळं आवश्यक असतं आयुष्यात!
आनंद द्यायचा, आनंद घ्यायचा
आपली कर्तव्य ही तर पार पाडायचीच असतात रे प्रत्येकाला!
आभाळ कोसळताना मला का रहावत नाही
हे मी तुला सांगायला पाहिजे का?
अरे काळे नभ म्हणजे माझीच लेकरं!..
मी तुला मानतो ते यासाठी की
माझा उपसर्ग कुणाला तू पोहोचू देत नाहीस
मी उफाळल्यावर तू मला सांभाळतोस
आणि मी रोडावलो तरी
तू दूर पण ठाम उभा असतोस
माझ्यासाठी, एकटा..
मी तुला हे सगळं आज का सांगतोय माहितीए
मलाही हल्ली महत्व कळायला लागलंय
ठामपणाचं, स्थितप्रज्ञेचं, भावना काबूत ठेवण्याचं
अरे जहाजंसुद्धा केव्हा एकदा
तुझ्याजवळ येतो असं म्हणतात
तेव्हाही- स्पष्टंच सांगतो- मी जळतो तुझ्यावर
अरे, मी यांना वाहून नेतो, सांभाळतो
आणि यांना ओढ मात्र तुझीच!
पण तू आहेसच तसा हे ही मला पटतं
अरे मग व्हाय डोन्च्यू एक्सप्रेस?
तू बोलत का नाहीस? बोल!"
"बोलतो बोलतो बाबा बोलतो
फक्त तु़झ्याशीच बोलावसं वाटतं
कारण तुझ्याशिवाय मी नाही
आणि माझ्याशिवाय तू नाहीस
पण एकेकाचं आयुष्यंच असं असतं बाबा!
नाही नाही.. हा नुसता कडवटपणा नाही
एखाद्याने नुसते वास्तवाचेच चटके सहन करायचे असतात, सतत!
आणि सर्वांगानं फुलणारय़ा
दुसरय़ा एखाद्या जीवनाला बघत रहायचं असतं
जमलंच तर सांभाळायचं, मदत करायची
त्याच्याशी स्पर्धा नाही करायची
शेजारी शेजारी उभ्या असणारय़ा, हे खरं
पण धावमार्ग आणि मर्यादा
वेगवेगळ्या असणारय़ा धावपटूंमधे
असते का स्पर्धा?
आणि सगळ्यांनीच स्पर्धा करायची म्हटल्यावर
बघे कोण? टाळ्या वाजवणारे कोण?
धावून दमलेल्या खेळाडूंना विसावा पुरवणारे कोण?
आणि त्यांना शिकवणारे तरी कोण?..
हा धीरगंभीरपणा, शांतपणा, समंजसपणा, स्थितप्रज्ञा
तुला काय वाटतं, आपोआप आलंय सगळं?
हे असलं नुसतं दिसतं सगळ्यांना
पण त्या मागचं, त्या मागचं नाही बघत कुणी!
शिवाय एकेकाचा स्वभाव असतो
न बोलता आपलं काम करत रहाण्याचा
याचा अर्थ आतून तो ओला नसतो
असं काही नाही!
आतला ओलेपणा, सतत दाखवायला लागलो सगळ्यांना
तर नाही कुणाचे डोळे ओलावत
स्वत: न अनुभवलेल्या गोष्टींनी
कोण ओलावणार सांग!
हे बौद्धिक होतंय मान्य आहे मला
मी तुझा वडीलमित्र आहे म्हणून
चान्स घेतोय असंही नाही
तेव्हा, ऐक!
नशीब म्हण, ईश्वरेच्छा म्हण, दैवी शक्ती म्हण
तुझ्यासारख्यांना त्याचं पूर्ण वरदानच असतं!
तुझा मोठेपणा हाच की
इतकं चांगलं चाललेलं असूनही
तुझं माझ्याकडे लक्ष गेलं
तू मला मुक्याला बोलतं करायला लागलास..
तुझ्यासारखे  रगेल, रंगेल, दुसरय़ाना उपयोगी पडणारं
आणि यशस्वी आयुष्य जगणारे
माझ्यासारख्यांना निगेटीव्ह म्हणतात
ते पहिलं, तू तरी डोक्यातून काढून टाक
कित्येकांना वास्तव कशाशी खातात
हे आयुष्यभर जाणवत नाही-
सुमार बुद्धिमुळे म्हण किंवा बेसुमार नशीबामुळे म्हण!..
तेव्हा, आता तुला माझं रूप हळू हळू
उलगडायला लागेल..
ही लहान लहान गोजिरवाणी रूपडी, ही युगुलं, हे पेन्शनर्स
संध्याकाळी असं हे सगळं जगच
माझ्या अंगाखांद्यावर असतं
सांग ना कुणाला आनंद वाटणार नाही!
हा असा आनंदी असताना
मी काय करतो माहितीए
मी तुझ्यात माझं प्रतिबिंब न्याहाळत असतो
आंगाखांद्यावरच्या जगासकट!
कळलंय तुला हे कधी?..
तू माझ्याशी मस्ती केल्यावर
मी ढासळतो असं तू म्हणतोस
पण अरे मी तुझ्यातच थोडा थोडा
मिसळत असतो, हे नाही तू पाहिलंस!
आणि तू आखडतोस, रोडावतोस तेव्हा
-मला माहितीए, तुझ्या हातात नाहिए ते-
मी ठाम उभा तर असतोच
पण आतल्या आत तू लवकरात लवकर
माझ्याशी खेळायला यावास म्हणून
मनोमन प्रार्थना करत असतो
तुझा विरह मला डागण्या देत असतो
हे तुला समजलंय कधी?..
मला खात्री आहे तुला हे
कधीना कधी जाणवलं असेलच
कारण तुझ्या लक्षात आलंय?
मी हा असा आणि तू तसा
म्हणूनच आपली मैत्री आहे
आणि अशीच मैत्री अखंड टिकते!..
आता तुझ्या आणखीही एक लक्षात येईल
जगात अशाश्वत असं काहीच नसतं
असं म्हणतात
पण मी अभिमानाने म्हणतो आहे!
आमची मैत्री अशाश्वत आहे!
तुझ्याबरोबर फक्त मी आहे
आणि माझ्याबरोबर फक्त तू आहेस!
मैत्री ही अशी असते
हे जगाला सांगणं
मला तुझ्यामुळेच शक्य आहे!!!"