romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Friday, February 14, 2014

देवराय (२)

भाग १ इथे वाचा!
पुष्पी देवरायकडे पहात राहिली आणि हरवली... श्रावणात दिसला होता गेल्या... तो सुद्धा घाईगर्दीत... आज बर्‍याच वर्षांनी ती त्याला जवळून पहात होती... ती काही बोलणार इतक्यात, "थांब! चहा ठेवतो!" असं म्हणत तो हसत हसत उठला देखील...
त्याचं हसणं... ते नाही बदललं... रोप वाढतं, जुन होतं, त्याचा वृक्ष होतो, तो वठायलाही लागतो... पण त्याचं सत्व तेच रहातं... तसं त्याचं हसणं... पुष्पीच्या घरात शिरताना... गेली कित्येक वर्षं...
कित्येक वर्षापूर्वी पेढे वाटायला आलेला देवराय तिला उगाच आठवला... गच्च भरलेल्या अल्बममधून एखादं छायाचित्रं सहज बाहेर डोकावावं तसा... कमर्शियल आर्टचा डिप्लोमा पास झालो म्हणून!... चाळीत जातीनं प्रत्येकाला पेढे देऊन, मोठ्याना वाकून नमस्कार करून आशिर्वाद घेत होता... कुणी अभिनंदन केलं रे केलं की याचं सुरू... "अरे मग! दिवाळीत तोंडात बोटं घातलीवती, पुष्पा आणि तिच्या मैत्रिणींनी रांगोळी बघून! सुसाट वारा असतानासुद्धा हात थरथरत नव्हता की चिमूट पसरत नव्हती इकडे तिकडे! काय पुष्पा!?"
त्याचा दणदणाटी आवाज ऐकून बाहेर येणार्‍या पुष्पाला हो हो म्हणण्यावाचून गत्यंतर नव्हतं... त्याआधी येणारं हसू तिनं महत्प्रयासानं तिनं दाबलं... आत्ताही, ते चित्र बघत असतानाही ते तिच्या चेहेर्‍यावर उमटलं...
"अरे एवढंच नाही! सगळ्या पोरींनी माझ्याच भरतकामाच्या क्लासात नाव घातलवतं उन्हाळ्याच्या सुट्टीत!"
अशी पुस्ती जोडून स्वत:च हसायला लागला. पुष्पीनं पेढा घेतला आणि विचारलं,
"देवा, मार्क किती पडले?"
"मार्काचं काय घेऊन बसलात? रिझल्ट डिक्लेअर करताना सगळ्यात आधी माझंच नाव पुकारलं बाबुरावानी!!"
"बाबु.. रा... व...?" चाळीतलं कुणीतरी गोंधळलेलं...
"प्रिन्सिपॉल रे आमचे! माझ्या पोर्टेट काढण्यावर जाम खूष आहेत हं! शिवाय-"
पुष्पी मनातल्या मनात हसली. पटकन म्हणाली, "जरा बस हं! चहा ठेवते!"
"आतच दे गं पाठवून! आणि खाजाही पाठव जिजीनी आणलेला! बर्‍याच दिवसात पाठवला नाहीत घरी!" असं म्हणत आजोबांच्या खोलीत शिरलासुद्धा...
"नमस्कार करतो आबा!"
"असू दे, असूदे... अरे पायाबिया नका पडू आता माझ्या- कोण रे... देवराय का? काय म्हणतोस बाबा?"
कपाळावरचं हाताचं पन्हाळं मिटत, कपाळ चोळत, डोळे किलकिले करत आजोबा त्याच्याकडे पहात राहिले.
’पास झालो! हे घ्या पेढे!"
"ठेव! ठेव! पुष्पे एऽऽ पुष्पेऽऽ..."
"येतेय ती चहा घेऊन!... अजून कपाळ चोळताय आबा! मी आल्यावर नेहेमी आठवण होते काय? हा हा हाऽ"
"नाही रे बाबा! असंच! सवय! वाचत होतो. भिंग लाऊनसुद्धा दुखतंच डोक्यात! तू मारलेल्या विटीमुळे नाही रे बाबा!"
"काय तापलावतात आबा तेव्हा!"
"अरे बसलीवतीच तशी! पण तू ती तीनदा उडवून हवेत टोला मारला होतास हे कळल्यावर राग गेलासुद्धा! क्रिकेटच्या जमान्यात विटीदांडूचं महत्व तेव्हाच कमी होत होतं! आता ’विटीदांडू’ असं म्हटल्यावर श्रीचा मुलगा ’व्हॉऽ पपाऽ" म्हणत बावळटासारखा तोंड बघत रहातो!!"
"हाऽहाऽहाऽ... आपण जपत रहायचं आबा! आता वेळ मिळत नाही. पूर्वी मी शिकवत होतो, मुलाना आटापाट्या, मुलींना लगोरी, सागरगोटे-"
"हो रे हो! श्लोक्सुद्धा म्हणून घ्यायचास!"
"आबा तुम्हीच मला ’भटू’ म्हणायला सुरवात केलीत!"
"म्हणजे काय! नुसते श्लोक, आर्या, पुराणातल्या गोष्टीच नाही तर दिसायचास सुद्धा अगदी भटाब्राह्‍मणासारखा! काय रे... कानावर जानवं ठेऊन बहिर्दिशेला जाताना पोरं चिडवतात का रे अजून?"
"काय लक्ष द्‍यायचं आबा! चालायचंच! संध्या करायला लागलो तेव्हा घरचे सुद्धा हसायला लागले होते!"
पुष्पी चहा करता करता ऐकत होती... तिला आठवलं... अति शुद्ध आणि स्पष्ट बोलायला सुरवात केली होती त्यानं तेव्हा ती चिडवायची, तो रागवायचा, गोरा चेहेरा लाल व्हायचा... पण जरा वेळानं स्वत:च काहीतरी बोलणं काढून, मागचं सगळं विसरून, बोलायला यायचा...
चहाचे भरलेले कप घेऊन ती आबांच्या खोलीत गेली तेव्हा दोघांच्या गप्पा ऐन रंगात यायला लागल्या होत्या... ती आत आली आणि जोरात खाकरली... नुसतं सांगितलं असतं दोघांना तर ठेव, घेतो आम्ही असं म्हणाले असते आणि जरावेळानं तिलाच हाका मारून चहा गरम करायला लावला असता...
चहा पितानाही देवरायचं तोंड चालूच होतं... रात्री झोपेतसुद्धा तो बडबडायचा म्हणे!... पुष्पी स्वत:शीच हसली आणि  स्वत:चा कप तोंडाला लाऊन खिडकीला टेकली...    (क्रमश:)