romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Tuesday, July 29, 2008

सुखाने नांदू लागले... एक सुरवात...

आडगावातलं जुनं पुराणं सभागृह.कधी काळी गेरूने सारवलेल्या पण आता रंग उडालेल्या भिंतीं.भिंतींवर काढलेल्या कधीकाळच्या महिरपी आणि त्यात देवदेवतांची चित्रं. महिरपींना छेद देणाऱ्या भिंतींना पडलेल्या भेगा.कोळशापासून कुठल्याही माध्यमातून लिहिलेले सल्ले, पुसट घाणेरडा मजकूर आणि चित्रं, प्रेमपात्रांची नावं, बदामी आकार आणि त्यात घुसलेले बाण इ.इ.पासून राजकीय घोषणा आणि शासकीय घोषणांच्या विडंबनांपर्यंत बरीच गिचमिड.पार्श्वभूमीच्या अश्याच भिंतीवर मधेच कुठेतरी असल्यासारखं बंद दार.गडद गेरू रंगाची चौरस आकाराची भलीमोठी चौकट.प्रत्येक कवाडाचे तीन तीन भाग आयताकृती आणि जाड लाकडी कडा असलेले.पितळी जाड बिल्ले ठोकलेले.अशा पार्श्वभूमीवर तो आणि ती.
ती डाव्या बाजूला जुनाट लाकडी खुर्चीवर बसलेली.डाव्या बाजूच्या विंगेतून येणाऱ्या खिडकीच्या प्रकाशस्त्रोतात.पारोशी वाटणारी.खुर्चीच्या लाकडी हातांवर भलंमोठं नोटपॅड ऍडजेस्ट करत त्यावर मनःपूर्वक लिहित असलेली.डावा हात कानांपर्यंत असलेल्या पूर्णपणे फुलारलेल्या केसांमधे.लिहिताना थांबून विचार करता करता केसातून हाताच्या नखांमधे पोहोचलेल्या वस्तू इ.कडेही बारीक लक्ष पुरवते.अति संथ हालचाली.चेहेरा आणि शरीर गब्दुल काळं.पुरूषी.मधून मधून मात्रं डोळयात बुध्दीची चमक डोकावते.वय चाळीस ते पंचेचाळीशीच्या दरम्यान पण जास्त वाटणारं.
तो पांढराफिकट आणि फेमिनाईन.प्रचंड ऍक्टिव्हपणाचा वारसा घेतल्यासारखा वॉर्मअप करणारा.सकाळी फिरायला जाण्याच्या अपटूडेट पोषाखात.बायकी स्वरात गुणगुणणारा.
हालचाली करताना त्याने मानेला दिलेले झटके विचित्र वाटतात.त्याला तालाचे अंग अजिबात नसल्यासारखे आणि त्यामुळे झटके ऍबनॉर्मलीटीकडे झुकणारे.तोही तिच्याच वयाचा पण जास्त तरूण वाटणारा.
दोघांच्या मधे तिचं बेडिंग अस्ताव्यस्त पसरलेलं तर त्यालाच चिकटून असलेलं त्याचं बेडिंग व्यवस्थित आवरून ठेवलेलं.
अंगमेहनत करता करता त्याला तिचं अजूनही पसरून राहिलेलं अस्ताव्यस्त बेडिंग सारखं खुपू लागतं.विशेषतः आपल्या अतिव्यवस्थितपणे रचून ठेवलेल्या अपटूडेट बेडिंगकडे लक्ष जा-जाऊन जरा जास्तच खुपू लागतं.पण ते सरळ सांगण्याऐवजी तो एक व्यायामप्रकार ठरवून करत बेडिंगला अडखळल्यासारखे करतो.
तीः (एकाग्र असलेली, दचकून पण संथपणे) काय रे?
तोः (पुटपुटत) काय म्हणजे काय बेडिंग
दोन पायांच्या बेचक्यातून तिच्या प्रतिसादाकडे बघत रहातो.ती 'सावकाश' असं म्हणून एकाग्र तिच्या कामात.तो गंभीर.त्याचं गुणगुणणं थांबलेलं.व्यायामप्रकार करता करता पुन्हा पुन्हा तिच्या अस्ताव्यस्त बेडिंगकडे आणि पर्यायाने तिच्याकडे लक्ष जाऊन त्याचा पारा चढतोय.ते स्वतःच स्वतःच्या लक्षात येऊन तो दीर्घश्वसनाचा उपाय योजतो आणि नॉर्मल होतो.पुन्हा गुणगुणू लागतो.त्याच्या चेहेऱ्यावर आता स्मित आलंय.मग एकदा तिच्याकडे आणि तिच्या बेडिंगकडे पहात तो हसू लागतो.त्याचं हसणं हसता न येणाऱ्याचं खोटं खोटं हसणं वाटतं.ते तुटक तुटकही आहे.
तीः (त्याच्या हसण्यात रस घेत पण स्वतःच्या कामातच संथपणे) काय रे!
तोः हहहहहह… ते बेडिंग बदल आता तरी!
तीः (कामात गुंग) हं बदल बदल अदलाबदल
तोः (आपल्याच उद्गाराचे हे उत्तर समजून लहान मुलासारखा त्रागा करत) ए नाही हं नाही
अजिबात नाही! ना ही!! माझ्या अपटूडेट बेडिंगची आणि तुझ्या या (खोचकपणे)
या पुरातत्वी बेडिंगची अजिबात अदलाबदल होणार नाही!

गुरू रिसोर्ट्स

नाना, भाऊ, बापू, आण्णा आणि वीरेंद्र ह्या सगळयांच्या एकत्र येण्यामुळे हे संकुल उभं राहिलं. कुणा एकानंही ते सहज उभं केलं असतं.तेवढी ताकद आणि उमेद त्या प्रत्येकात होती पण मग संघटन या क्रियेला काय महत्व उरलं असतं? शिवाय संघटन झालंय हे पोहोचायलाही पाहिजे.नुसतं एकमेकांच्या मनात आणि थोडयाफार जनांत असून उपयोग नाही.जमानाच तसा आलाय.मग योग्य योजना आखून, शिस्तबध्द पध्दतीने, जवळजवळ धूर्तपणेच म्हणायला हरकत नाही, गुरू रिसॉर्टची आखणी झाली.तेवढं पुरे होतं.परिश्रम,पैसा सगळं सगळं होतंच.
पैकी वीरेंद्र ग्रामीण भागाचं प्रतिनिधित्व करणारा.रांगडा.शैलीनं अर्थातच आक्रमक.अण्णा निमशहरी भागाचा प्रतिनिधी. नाना राज्याबाहेरचा,राज्यातले जे परराज्यात स्थायिक झाले त्यांचा नायक.भाऊ महानगरातल्या पांढरपेश्या चाकरमानी नोकरदारांचा नेता.बापू महानगरातल्याच पण उच्चमध्यमवर्गीय, नवश्रीमंत, त्याचबरोबर नुकतेच खालून वर असे जे मध्यमवर्गात प्रवेश करणारे होते त्यांचा अध्यात्मिक दिशादर्शक.परराज्यातला नाना म्हातारा,वृध्दं म्हणता येईल असा.भाऊ म्हातारा म्हणता येईल पण वृध्दं नव्हे. निमशहरी अण्णा वयस्कर पण म्हातारा नाही. बापू प्रौढ तर वीरेंद्र चांगलाच तरूण.
विविध वयोगटातल्या या अभिजनांनी समाजातले वेगवेगळे घटक नुसते आपलेसे केलेले नाहीत तर त्या त्या घटकांनी त्याना डोक्यावर घेतलंय.प्रत्येकाची जादू निराळी.त्यानं संमोहित होणारा घटक वेगवेगळा.पण म्हणूनच प्रत्येकाला लोकप्रियता आणि प्रत्येकाची लोकप्रियता अबाधित. असा मास हिस्टेरिया क्रिएट करणं ही काही खाऊची वस्तू नव्हे. अनाडयातल्या अनाडयाने डोक्यावर घेणं ही चेष्टा नव्हे.इथे अनाडी हा शब्द फक्त अशिक्षित आणि निरक्षर लोकांसाठीच वापरला आहे असं समजायचं काहीही कारण नाही.
अश्या पाच जणांनी एकत्रं येऊन गुरू रिसॉर्टस् हे संकुल उभारणं ही अत्यंत महत्वपूर्ण घटना. त्या संकुलाचं उदघाटन हा त्या घटनेचा कळसाध्याय.उदघाटनाचा दिवस गुरूपौर्णिमा हा गुरूपंचकाच्या योजनाबध्दपणाचा कळस.तर उदघाटन समारंभाला कोणत्याही भक्ताला येण्यास मज्जाव हा त्यांच्याच धोरणीपणाचा परमोच्च बिंदू.यातलं उदारपण म्हणजे उदघाटनानंतर हे संकुल भक्तांचच तर होणार.उदघाटन समारंभालाच भक्त जमले की समारंभाला साधेपणा रहाणार नाही. शांतताभंग, कदाचित शिस्तभंग इ.इ.मुद्देही महत्वाचेच. सगळयाआड, वेगवेगळया गुरूंचे भक्त एकत्र जमल्यावर त्यांचं आपापसात काय होईल हा मुद्दासुध्दा नक्कीच बिनमहत्वाचा नव्हता.ते एकमेकांवर आपटतील, थडकतील, संघर्ष होईल की त्यांच्यातही जागतिकीकरणाचे वारे वाहून असलं काहीच होणार नाही,काही काही कल्पना न करता येण्यासारखं.

ती १

एकोणचाळीसाव्यावर्षी तिला तिच्या बारावीच्या सर्टिफिकीटची गरज लागली.एका डिप्लोमासाठी.अर्हता बारावी.पुढे पदवी मिळवली असली तरी बारावीचं सर्टिफिकीट मस्ट. विद्यापिठाचा नियम.पदविकेची दोन वर्ष होत आलेली.पुढचं वर्ष शेवटचं.आत्ता संस्थेनं सांगितलं, आणून द्या लवकर नाहीतर खरंच प्रॉब्लेम होईल.एफ वायचं आहे,एस वायचं आहे,टी वायचं तर आहेच पण बारावीचंच पायजे!आणि ते तर नाही! गेलं कुठे? त्याच्या छायांकित प्रति आहेत. पण त्या नाही चालत. ओरिजनलच पाहिजे!
ते आहे.कुठे आहे ते ही आठवतंय.फाईलचा रंग, तिचं टेक्च्शर, ते तिथेच का आहे, त्याबरोबर आणखी काय आहे, काय नाही सगळं तिला आठवतंय. पण
मग सुरू झाला भुंगा. इतर अनेकवेळी डोक्यात अखंड सुरू होतो, संपतो - पुन्हा दुसरा सुरू होण्यासाठी- तसाच. काय करावं? मूळ हरवलंय डुप्लीकेट द्या म्हणून अर्ज करावा? कॉलेजकडे? तिकडे नाही मिळालं तर उच्च माध्यमिक शालांत परिक्षा मंडळाच्या
कार्यालयात? देतील ते वीस वर्षापूर्वीचं? किती पैसे भरावे लागतील? पैश्याचं काय एवढं महत्वाचं नाही म्हणा- कुठे असतं ते मंडळाचं कार्यालय? ते तिथेच असेल अजून? नाहीतर कुठे असेल? कॉलेजमधे मिळेल सहज? की ओळख लागेल कुणाची? कुणाची? कुणाची काढता येईल? बाबा असते तर चुटकी वाजवून चटाचट नावं सांगितली असती दहापंधरा.
असते तर-तर काय इथे आल्यावर गाडी अडत होती तिची.अडत होती, फाटे बदलत होती.नसते फाटे आणि नसते फराटे,आठवणींचे.
मग नेहमीच असह्य होत होतं सगळं.भडकाच उडायचा.त्यात तेल ओतायला वास्तव होतंच.सगळयांचं असतं तसंच पण तरीही बोचतं प्रत्येकाला, तसंच.मग त्या भडका उडण्याचाही कंटाळा आला.काय होईल ते जाईल.स्वाभिमान, स्वतःवरचा विश्वास, खरेपणावरचा विश्वास सगळं जागं झालं.
का नाही जायचं आपल्या घरी? तिनं- तिनं सगळं आपल्या ताब्यात ठेवलंय म्हणून? कोण ती? या पुढच्या विचारांच्या प्रवासात कचाकचा दात चावणंच प्रामुख्याने होत राहिलं. असहायता आणि खंत.खऱ्या बाजूचं काहीही न चालू शकल्याची.
जे चालवू शकले असते व्यक्तिशः आणि सगळे मिळून तर सहजच, ते ही गप्प बसले.गप्प म्हणजे गप्पच.थोडीफार कुजबुज आपापसात.अन्याय झालाय असं कुठेतरी पुसटसं मतप्रदर्शन केल्यासारखं.त्यातल्याच कुणालातरी कधीतरी आलेली अन्यायाची चीड.स्व चं भान काहीवेळ तरी सुटल्यामुळेच.बस्सं!
मग तिनं स्वतःला व्यवस्थित गोळा केलं.अशाप्रकारच्या प्रसंगात नेहमी स्वतःला करत असे तसं.मग तिनं दिवस ठरवला.वार ठरवला.घरच्याना आपण त्यावेळी बाहेर असण्यामुळे काही त्रास होणार नाही असा.का नाही जायचं आपल्या घरी? जायचंच!
ते सगळं पूर्वीचं नेहमीच स्वप्नात येई.आता आठ वर्षांनीे त्या आपल्या घरी जाण्याचं पक्कं झाल्यावर तिला नव्यानं स्वप्नं पडू लागली.स्वप्नं पडणं - कुठल्याही स्वरूपाची- तिला नेहमीच आवडत.भीतीदायक स्वप्नं पडली तरी जागं झाल्यावर हे आता तरी खरं नाहीये हे जाणवून मनोरंजन होतंच.आपल्या त्या घरी गेल्याची,वावरल्याची,रमल्याची ती स्वप्नं तिला पडत राहिली.वर्तमानातली आणि भूतकाळातली.इतकी की प्रत्यक्ष तिथे पोहोचल्यावरही हे एक स्वप्नंच आहे असंच तिला वाटत राहिलं.बराच काळ.
हे केवळ स्वप्नं बघितल्यामुळेच होत नव्हतं तर मधे फार मोठा काळाचा टप्पा पार पडला होता.सगळयाच अर्थांनी फार मोठा.मुख्य म्हणजे तिथे पाऊल ठेवायचंच नाही हे पक्कं ठरलं होतं.तेव्हा- आठ वर्षांपूर्वी.आणि आता असं कारण समोर आलं की जाणं भागच पडलं. का नाही जायचं?असं वाटलं उलट. तिनं जायचं ठरवलं आणि ती शांत झाली.जाण्याच्या दिवसाच्या आदली रात्र काही उलट सुलट स्वप्नांची गेली.उठल्यावर मागे पुढे असं झालं थोडं.निव्वळ शांतता कुठे असते जगात.शेवटी असत असेल कुणास ठाऊक.पण तेंव्हाही उरलेल्या वासनांचं तांडव रहातंच म्हणे.मग ठीक आहे असं मनाशी म्हणत बाहेरच्या दिवाणावर पायावर पाय घेऊन चेहेरा लपवलेल्या बुजगावण्याकडे बघितलं न बघितल्यासारखं करत ती व्यवहार्य शांती बरोबर घेऊन बाहेर पडली.

Monday, July 28, 2008

संस्कार

बैठं काम,दोन चार वेळ चमचमीत खाणं,बुडाखाली खाजगी किंवा सार्वजनिक दळणवळणाची साधनं,लिफ्टस् इत्यादी 'गरजा' असणारा माणूस जादूची कांडी शोधतो.क्षणार्धात शरीर तरूण,सडसडीत दिसावं यासाठी.अपरिहार्यपणे व्यायामाकडे वळावंच लागतं.त्यात खंड पडत रहातो.पुरेसा परिणाम दिसायला वेळ लागतो.निदान प्रयत्न करतोय हे समाधान सुरवातीला आशा देणारं असतं.
असे अनेक वळसे घेत घेत एके सकाळी मी सूर्यनमस्कार घालायला उभा राहिलो.बारा नावं अजिबात आठवत नाहीत यानं आलेलं पंक्चरलेपण झटकून ॐ सूर्याय नमः म्हटलं आणि लगेच 'एक!' चा ध्वनी माझ्या जिभेवर उभा राहिला.एक ते बारा असे कडकडीत आकडे मनातल्या मनात म्हणत हात जोडणे,ते वर घेणे,ओणवे होऊन बोटांची अग्रं जमिनीवर टेकणंमला सगळं व्यवस्थित आकडयांबरहुकूम आठवत होतं.पहिला खणखणीत एक! आठवल्यापासून मी आणखी एका वेगळया जगात गेलो.
नक्की वय आठवत नाही,पण आठ-दहा वर्षांचा असेन.उपनगरात काँक्रिटचं जंगल नुकतंच धीम्या गतीनं हातपाय पसरू लागलं होतं.छोटे-मोठे पडीक प्लॉटस् बरेच असायचे.आमच्या घरासमोरच्या अश्याच एका पडीक मैदानावर काटेरी झुडपांची काटछाट करून संघाची शाखा भरायची.माझ्या घरात संघाचं वातावरण अजिबात नव्हतं.मैदानात काय चाललंय या उत्सुकतेने मैदान आणि रस्ता यांच्या सांध्यावर बसून समोरच्या दृष्यात बालसुलभ कुतहुलाने रममाण होत राहिल्यावर स्वयंसेवकांनी शाखेत सामील करून घेतलं असण्याची शक्यता आहे.
संध्याकाळची शाखा एका वेगळया जागेत भरू लागली आणि मी नियमीत तिथे जाऊ लागल्याचं नीट आठवतं.माहित नसलेले मैदानी खेळ,देशभक्तीपर आणि वीररसाची गाणी,केवळ संघाची अशी प्रभाव पाडणारी गाणी ही मुख्य आकर्षणं.या शाखेची सूत्रं एका आमच्यापेक्षा मोठया मुलाकडे सोपवली गेली.काळसर वर्णाचा,मध्यम पण भक्कम बांध्याचा,मध्यम उंचीचा असा तो होता.मी माध्यमिक शाळेत जेमतेम प्रवेश केलेला,त्याची शाळा संपत आलेली.मला तो जास्त मोठा वाटायचा.तुकतुकीत अंगकांती,केसांना बऱ्यापैकी तेल,फुगा पाडलेला.त्याचे वडील संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक होते.त्याचे दोन लहान भाऊही त्याच्याबरोबर यायचे.
मला नीट आठवतं,तो ज्या भागात रहायचा तिथल्या बुरूडकाम करणाऱ्या कुटुंबातल्या मुलांना तो आपल्याबरोबर घेऊन जायचा.त्या लहानग्यांना मराठीही धड येत नव्हतं,संस्कारांची तर बातच नाही.तो मात्र नेटाने त्याना ने-आणायचा,त्याना शिकवायचा प्रयत्न करायचा.
त्याचं शिस्तबध्द ध्वजारोहण करणं मग कवायत,खेळ,दंडाचे हातशाखाचालक सगळयात प्रवीण.गांभीर्यपूर्वक,शिस्तीत सगळं करून घ्यायचा.कडक,कठोरही असायचा आणि जेव्हा कधी हसायचा तेव्हा प्रेमळही वाटायचा.मोठया भावासारखा.वेगवेगळी पदं,गीतं म्हणताना गोल करून बसलेल्या स्वयंसेवकांत तो मध्यभागी असायचा.ध्यानमुद्रेत बसल्यासारखा ताठ बसून डोळे मिटून घ्यायचा.त्याचा स्वर बऱ्यापैकी अनुनासिक पण मोकळा होता.गाणं म्हणताना कधीही अडायचा नाही.आवाज खणखणीत,वरच्या पट्टीतला.संस्कृतसुध्दा ओघवतं.याहीपेक्षा मला माझ्या त्याही वयात जाणवलेला त्याचा विशेष आठवतो तो म्हणजे गाताना तो विलक्षण आर्त होत असे.तो सगळया कृती करत असताना भारून गेल्यासारखा वाटे.अशी माणसं आजुबाजूच्या इतर माणसांनाही भारून टाकत असतात.
पाठमोरं होऊन एकमेकाला दोन्ही हातांनी घट्ट धरून कडी करायची.असे दोन गट तयार करून दोन वेगवेगळया कोपऱ्यातून येऊन एकमेकांवर धडकायचं, हर हर महादेव अशी गर्जना करत.हा आमचा सर्वात आवडता खेळ.अशावेळी
मस्तीखोर पोरांच्या अतिरेकी कारवायांना उधाण.शाखाचालक अशावेळी खेळ हा खेळच ठेवायची पुरेपुर काळजी घ्यायचा.माझ्या वयातल्या मुलांचा तो नायकच झाला.त्याने एकदा भारदस्त आवर्तनं घेत बिगूल वाजवला-याला येतं तरी काय काय?नंतर आम्हा पोराटोरांसकट सगळे त्या बिगूलात हवा फुंकत होतो.बेंबीच्या देठासकट.तरी पूंऽऽक असा आवाज येणंही मुष्कील होत होतं!
प्रत्येक गोष्टीत इतका जीव ओतणारा,करत असलेल्या कामानं प्रचंड भारून जाणारा माझ्या आयुष्यातला तो पहिलाच माणूस.
सूर्यनमस्कार घालायला गेलो आणि विस्मृतीत गेलेल्या आमच्या त्या नायकाची एक! अशी आज्ञाच ऐकू आली.पाठोपाठ त्यानं घोटवून घेतलेला एक आणि एक पवित्रा,एक आणि एक पायरी धडाधडा आठवली.मग तो,त्याचं भारलेपण,आर्तता, त्याचं नाव,संख्येने मोठं कुटुंबं,कौलारू चाळीतली जेमतेम खोली,कष्टं करणारे आईवडील,ही भावंडंसुध्दा.अशा परिस्थितीतही सांघिक कार्याचं बळ याना कुठून मिळत असेल? तेही इतक्या भारलेपणाने, आर्ततेने, जीव ओतून.संस्कारांचं बळ…संस्कारीत करत रहाण्यातलंही… आजच्या जमान्यात त्याची दुर्मिळताही मग लक्षात आली.आमच्या शाळेत त्या मुलाचं ड्रॉइंग सगळयात चांगलं आहे हेही त्याच दरम्यान कधीतरी कळलं होतं.पुढे तर त्याचं नाव पेपरातूनच यायला लागलं.
मी हे स्फूट लिहिलं त्या आठवणींनंतर.या आठवणीतला तो नायक म्हणजे व्यक्तिचित्रण या चित्रकला प्रकारात जागतिक पुरस्कार मिळवणारे वासुदेव कामत! वासुदेव कामत हॅटस् ऑफ टू यू!!!

Sunday, July 6, 2008

१४ फुटांचा त्रिवार निषेध!

हॅलोऽहॅलोऽ… हां! ऑं? छ्या! बिझी नेटवर्क! हे जमिनीवरचे लोक कुणालाही मामा किंवा ते-हे- अहो मंडळी- मंडळी म्हणजे मंडळ या शब्दांचे अनेकवचन! - तुम्ही जमिनीवरचे आम्हाला चांगले दोन अक्षरी फुल्या फुल्या बनवण्यात माहिर आहात! आता आम्हाला पाण्यात पाहणं सोपय तुम्हाला! कारण आम्ही पाण्यातलेच!
हे चौदा फुटांचं काय नवीन नाटक काढलयत मंडळी- आय मीन मंडळांनो!
आम्ही याचा ठाम निषेध करत आहोत.अहो, जुलै उजाडलाय, आम्ही आमच्या अर्काईव्ह्ज मधे उदंड साठवलेल्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या पेवर ब्लॉक्सचं काम चालू करून पूर्ण करत आणलंय आणि तुम्ही सगळ्यांनीं मिळून हे चौदा फुटांचं लिमिट काय काढलंत!
देवधर्माला कधीकाळी लिमिट असतं काय राव?
पुराणकाळी आमच्या या इथे जे चर्नींग झालं- आठवतंय ना? की विसरलात? तरूण सभासदांना सांगू? ते चर्नींग, मेरू पर्वताची रवी, वासुकीची दोरी, मंथन आणि चौदा रत्नं!
हा १४ आकडा काही पिच्छा सोडेना राव! पण मेरू, वासुकी इ. नावं बरोबर का चूक ते तुम्हीच त्या संशोधन संस्थेतून शोधून काढा, हो! पण तिच्यावर हल्ला करण्याआधी हं!
मंथन महत्वाचं बघा!तर त्या मंथनाला काही लिमिट होतं काय राव?
आणि हे कसलं चौदा फुटांचं लिमिट?
अहो, वाढता वाढता वाढे ही आपली संस्कॄती तरी लक्षात घ्या!
उंची वाढवा! इथे खाली काय प्रदूषण-ब्रिदूषण होत नाय!
झालं तरी तुम्ही मरत नाय!
पुढच्या पिढ्या मेल्या तरी तुम्हाला त्यांचं खाली काय वर काय?
मेल्या नाहीत तर विचित्र होऊन जगतील! पण जगतील!
ती मंथनाची आयडिया तेवढी “त्याना” पास ऑन करा.फारच झालं तर ते करतील मंथन! मोकळा करतील तळ आणि गाळ आणि होतील बांधकाम व्यावसायिक!भर घालायला आणखी वेगळे “ते” करतीलच मदत.
आम्ही काय इथे करू याचा विचार करण्यापेक्षा आम्हाला बाजारात कोणी आणायचं- भूमिपुत्रांनी की परप्रांतीयांनी त्यावर तुम्ही परिवार महाचर्चा वगैरे कंटिन्य़ू ठेवा.ते महत्वाचं आहे.”त्याना” आणि तुम्हाला दोघांनाही.
तो चौदा फुटांचा हट्ट मात्र सोडा!
चौदा फुटांखालचं काहीही आम्ही इथे खाली अलाव करणार नाही असा आमच्या जनरल बॉडीमधे ठराव केलाय हे सांगूनही तुम्ही बधणार नाही?
मग कोप झाल्यावर काय काय होईल त्यासाठी तयार रहा!
एवढं सगळं करण्यासवरण्यापेक्षा, समंजसहो, तुम्हीही का नाही करत निषेध?
आम्हीही करू आणि अवघे धरू -काय ते आपलं हे-
तेव्हा आम्ही चौदा फुटांच्या त्या भलत्या सलत्या अश्या लिमिटचा कडक शब्दात निषेध करत आहोत!
आणखी एक! आम्ही पाण्यात जिथे जमेल तिथे घर करून रहातो.आमच्या घराला ग्रील्स नाहीत.आमच्या घराला दारच नाही तेव्हा डांबरानं ते काळं काय करणार तुम्ही! शिवाय पाण्यात डांबरलेलं कधीतरी वर येतच हे पूर्वापार सत्य आहे.खोटं वाटत असल्यास तुमचं तुम्हीच तपासून बघा!
शिव्यागाळी तर पाण्याखाली तळीगाळी पोहोचतच नाहीत!
त्यापेक्षा चौदा फुटींचा कडक निषेध करा राव! करा राव!
काय म्हणता? कालच बेडूक नक्षत्रं लागलंय?
मग तर त्वराच करा डरांव! - आपलं हे राव!
चौदा फूट लिमिटचा कायमचा निकाल लाऊन टाका!
चला! तुमच्या नादात माझं माझ्यापेक्षा छोट्याला खाण्याचं राहिलंच बाकी! इथे खाली असंच चालतं बरंका!जीवो जीवस्य जीवनम!
चला येतो!
निषेध! निषेध! निषेध! चौदा फुटांचा निषेध!

नाटक, साहित्य आणि मनोरंजन होणं, विचार करायला लावणं…

मला एक माणूस म्हणून, एक प्रेक्षक म्हणून विचार करायला लावणारं नाटक आवडतं.एक लेखक,अभिनेता म्हणून मात्र असं वाटू लागलं आहे की विचार करायला लावणारं आणि करमणूक करणारं असे दोनच स्पष्ट भेद या माध्यमात नाहीत.विचार करायला लावणारं नाटक फक्त जे संवेदनशील म्हटले जातात त्यांच्यापर्यंत किंवा केवळ विचारवंतांपर्यंत पोहोचून उपयोगी नाही.सामान्य लोकांपर्यंत म्हणजेच जास्तीत जास्त लोकांपर्यंत विचार करायला लावणारा हा विचार पोहोचवायचा असेल तर सामान्य प्रेक्षकांना पचेल असं ते नाटक असायला हवं.ते तसं आहे हे त्यांच्यापर्यंत पोचायला हवं तरच ते नाट्यगृहाकडे येतात.

अभिनेता म्हणून माझा ज्या पहिल्या मुख्य धारेतल्या नाटकाशी संबंध आला ते ’झुलवा’ हे नाटक (१९८७) देवदासींच्या समस्येवरच्या कादंबरीवर आधारित आहे.लेखक श्री.उत्तम बंडू तुपे यांनीं एका जोगती जमातीतल्या कुटुंबाबरोबर राहून त्या अनुभवावर ती कादंबरी लिहिली असं ते मनोगतात म्हणतात.
अजगर वजाहत यांच्या मूळ उर्दू नाटकाचं रूपांतर ’राहिले दूर घर माझे’ या व्यावसायिक नाटकात (१९९६.कलावैभव) ’कासिम’ या मुस्लिम कुटुंबप्रमुखाची भूमिका माझ्याकडे आली.फाळणीनंतर पुन्हा पाकिस्तानात गेल्यावर आणि तिथल्या हवेलीत आश्रय घेतल्यावर हवेलीतली न हटणारी ताबेदार वृध्द हिंदू स्त्री या दोघांमधला झगडा या नाटकात आहे.

माझ्या मनाला भिडणारे विषय नाटक, वृत्तपत्रातलं सदर, कथा, कादंबरी याद्वारे मी प्रकट केलं आहे, करतो आहे.पहिलं लिखाण ’आवर्त’ हे दोन अंकी नाटक (प्रकाशक: म.रा.साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई, मार्च२००१, नवलेखक अनुदान योजना) आहे.यात “करियर आणि संसार” हा आज सनातन होत जाणारा झगडा मांडायचा प्रयत्न आहे.अगदी अलिकडे बंगळूरू इथल्या सर्वेक्षणात आयटी क्षेत्रातल्या विवाहविच्छेदांचं गंभीर स्वरूप उघड झालं आहेच.
संभोग या शब्दाचा प्रत्यक्ष अर्थ (दोन्ही भागीदार सारखेच समाधानी) समाजामधे अजिबात दिसत नाही.’विषमभोग’ या दोन अंकी नाटकात हे वास्तव एक स्त्री जेलर आणि एक बलात्कारी खुनी कलाकार यांच्या झगड्यामधून मांडायचा प्रयत्न आहे.नेहरू सेंटर नाटककार कार्यशाळा, मे २००२ मधे ज्येष्ठ नाटककार श्री.सतीश आळेकर यांच्यासमोर या नाटकाचं वाचन केलं.याच नाटकाला जाने’०८ मधे गंगामाई वाचन मंदिर, आजरा या शंभर वर्षें जुन्या संस्थेचा नाट्यलेखन पुरस्कार मिळाला.
’संघटन’ या दोन अंकी नाटकात आजच्या तरूणाईला सार्वजनिक उत्सवामधून संघटित करून ज्या स्वार्थी आणि मूल्यहीन राजकारणाचा भाग बनवलं जातं त्याचं चित्रण करण्याचा प्रयत्न आहे.
अगदी अलिकडे २१ जून’०८ ’कन्या’ या दीर्घांकाचा प्रयोग प्रबोधनकार ठाकरे लघुनाट्यगृह, बोरिवली इथे झाला त्याची पार्श्वभूमी एका गाजलेल्या बलात्कार प्रकरणाची होती.त्या घटनेतली सनसनाटी वगळून एका स्त्री आश्रमशाळेच्या पार्श्वभूमीवर विविध वयोगटातल्या स्त्री पात्रांद्वारे आजवरच्या एकूण स्त्रीच्या प्रवासाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न आहे.ती शोषित मुलगी स्वत: स्वत:च्या पायावर उभी रहाण्याचा निर्णय कसा घेते हा प्रवास आहे.सध्या या दीर्घांकाचं दोन अंकी नाटकात रूपांतर करण्याचं काम चालू आहे.

२००१ हे वर्षभर ’वृत्तमानस’ या सायंदैनिकात ’माणूसपण’ हे साप्ताहिक सदर लिहिलं ज्यात मनू हे एक वरवर विनोदी वाटणारं पात्र घेऊन बदलत्या मूल्यांचं, नागरी समस्यांवर सोपी सोल्युशन्स काढणारया मानसिकतेचं चित्रण करण्याचा प्रयत्न आहे.

’उत्सव’ ही माझी पहिली लघुकथा अक्षर दिवाळी २००२ (संपादक: निखिल वागळे) या अंकात प्रकाशित झाली.आजच्या उत्सवांचं वाढतं भयानक होत जाणारं स्वरूप पाहणारय़ा, अनुभवणारय़ा तळागाळातल्या एका संवेदनशील माणसाचा दुभंग मानसिक अवस्थेपर्यंतचा प्रवास यात आहे.
’डेडलाईन’ ही लघुकथा ग्रंथाली चळवळीच्या रूची मासिकाच्या मे २००३ च्या अंकात प्रकाशित झाली.यात एका वृध्द स्वातंत्र्यसेनानीचं आजच्या परिस्थितीवरचं उपरोधिक दु:खं आणि १५ ऑगस्टची मुलाखत केवळ डेडलाईनसाठी असणारी पत्रकारिता असा विषय आहे.
गेल्या वर्षीच्या ’मुक्तसंवाद’ दिवाळी अंकात ’अनावृत्त’ ही कथा प्रकाशित झाली आहे.ही एक काल्पनिका आहे.समाजातली लैंगिकता अचानक एक दिवस समाजात वावरून गेलेल्या नग्नं स्त्री देहाद्वारे उघड होते (अश्लीलता पूर्ण टाळून, केवळ मानसिक प्रवास) असा या कथेचा विषय.

’पुलाखालून बरंच’ ही कादंबरिका, जुलै २००६.अक्षर मानव, पुणे यांच्याद्वारे प्रकाशित झाली आहे.यात उड्डाणपूल संस्कृतीद्वारे महानगरात होणारी घडामोड चित्रित आहे.पुलाखाली तयार होणारं अवकाश, ते व्यापणारे वंचित, जगडव्याळ अजगरी यंत्रणा आणि भविष्यात वंचितांकडून वाढत जाणारी आंदोलनं आणि आक्रमणं यांचं सूचन आहे.
मनोरंजन हा मूळ पाया असणारय़ा साहित्य, नाटक, चित्रपट (उदा.आशुतोष गोवारिकरांचे चित्रपट) ह्या माध्यमांमधे प्रेक्षकाला विचार करायला लावण्याची ताकद निश्चितपणे आहे.