आडगावातलं जुनं पुराणं सभागृह.कधी काळी गेरूने सारवलेल्या पण आता रंग उडालेल्या भिंतीं.भिंतींवर काढलेल्या कधीकाळच्या महिरपी आणि त्यात देवदेवतांची चित्रं. महिरपींना छेद देणाऱ्या भिंतींना पडलेल्या भेगा.कोळशापासून कुठल्याही माध्यमातून लिहिलेले सल्ले, पुसट घाणेरडा मजकूर आणि चित्रं, प्रेमपात्रांची नावं, बदामी आकार आणि त्यात घुसलेले बाण इ.इ.पासून राजकीय घोषणा आणि शासकीय घोषणांच्या विडंबनांपर्यंत बरीच गिचमिड.पार्श्वभूमीच्या अश्याच भिंतीवर मधेच कुठेतरी असल्यासारखं बंद दार.गडद गेरू रंगाची चौरस आकाराची भलीमोठी चौकट.प्रत्येक कवाडाचे तीन तीन भाग आयताकृती आणि जाड लाकडी कडा असलेले.पितळी जाड बिल्ले ठोकलेले.अशा पार्श्वभूमीवर तो आणि ती.
ती डाव्या बाजूला जुनाट लाकडी खुर्चीवर बसलेली.डाव्या बाजूच्या विंगेतून येणाऱ्या खिडकीच्या प्रकाशस्त्रोतात.पारोशी वाटणारी.खुर्चीच्या लाकडी हातांवर भलंमोठं नोटपॅड ऍडजेस्ट करत त्यावर मनःपूर्वक लिहित असलेली.डावा हात कानांपर्यंत असलेल्या पूर्णपणे फुलारलेल्या केसांमधे.लिहिताना थांबून विचार करता करता केसातून हाताच्या नखांमधे पोहोचलेल्या वस्तू इ.कडेही बारीक लक्ष पुरवते.अति संथ हालचाली.चेहेरा आणि शरीर गब्दुल काळं.पुरूषी.मधून मधून मात्रं डोळयात बुध्दीची चमक डोकावते.वय चाळीस ते पंचेचाळीशीच्या दरम्यान पण जास्त वाटणारं.
तो पांढराफिकट आणि फेमिनाईन.प्रचंड ऍक्टिव्हपणाचा वारसा घेतल्यासारखा वॉर्मअप करणारा.सकाळी फिरायला जाण्याच्या अपटूडेट पोषाखात.बायकी स्वरात गुणगुणणारा.
हालचाली करताना त्याने मानेला दिलेले झटके विचित्र वाटतात.त्याला तालाचे अंग अजिबात नसल्यासारखे आणि त्यामुळे झटके ऍबनॉर्मलीटीकडे झुकणारे.तोही तिच्याच वयाचा पण जास्त तरूण वाटणारा.
दोघांच्या मधे तिचं बेडिंग अस्ताव्यस्त पसरलेलं तर त्यालाच चिकटून असलेलं त्याचं बेडिंग व्यवस्थित आवरून ठेवलेलं.
अंगमेहनत करता करता त्याला तिचं अजूनही पसरून राहिलेलं अस्ताव्यस्त बेडिंग सारखं खुपू लागतं.विशेषतः आपल्या अतिव्यवस्थितपणे रचून ठेवलेल्या अपटूडेट बेडिंगकडे लक्ष जा-जाऊन जरा जास्तच खुपू लागतं.पण ते सरळ सांगण्याऐवजी तो एक व्यायामप्रकार ठरवून करत बेडिंगला अडखळल्यासारखे करतो.
तीः (एकाग्र असलेली, दचकून पण संथपणे) काय रे?
तोः (पुटपुटत) काय म्हणजे काय बेडिंग
दोन पायांच्या बेचक्यातून तिच्या प्रतिसादाकडे बघत रहातो.ती 'सावकाश' असं म्हणून एकाग्र तिच्या कामात.तो गंभीर.त्याचं गुणगुणणं थांबलेलं.व्यायामप्रकार करता करता पुन्हा पुन्हा तिच्या अस्ताव्यस्त बेडिंगकडे आणि पर्यायाने तिच्याकडे लक्ष जाऊन त्याचा पारा चढतोय.ते स्वतःच स्वतःच्या लक्षात येऊन तो दीर्घश्वसनाचा उपाय योजतो आणि नॉर्मल होतो.पुन्हा गुणगुणू लागतो.त्याच्या चेहेऱ्यावर आता स्मित आलंय.मग एकदा तिच्याकडे आणि तिच्या बेडिंगकडे पहात तो हसू लागतो.त्याचं हसणं हसता न येणाऱ्याचं खोटं खोटं हसणं वाटतं.ते तुटक तुटकही आहे.
तीः (त्याच्या हसण्यात रस घेत पण स्वतःच्या कामातच संथपणे) काय रे!
तोः हहहहहह… ते बेडिंग बदल आता तरी!
तीः (कामात गुंग) हं बदल बदल अदलाबदल
तोः (आपल्याच उद्गाराचे हे उत्तर समजून लहान मुलासारखा त्रागा करत) ए नाही हं नाही
अजिबात नाही! ना ही!! माझ्या अपटूडेट बेडिंगची आणि तुझ्या या (खोचकपणे)
या पुरातत्वी बेडिंगची अजिबात अदलाबदल होणार नाही!
No comments:
Post a Comment