romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Tuesday, July 29, 2008

ती १

एकोणचाळीसाव्यावर्षी तिला तिच्या बारावीच्या सर्टिफिकीटची गरज लागली.एका डिप्लोमासाठी.अर्हता बारावी.पुढे पदवी मिळवली असली तरी बारावीचं सर्टिफिकीट मस्ट. विद्यापिठाचा नियम.पदविकेची दोन वर्ष होत आलेली.पुढचं वर्ष शेवटचं.आत्ता संस्थेनं सांगितलं, आणून द्या लवकर नाहीतर खरंच प्रॉब्लेम होईल.एफ वायचं आहे,एस वायचं आहे,टी वायचं तर आहेच पण बारावीचंच पायजे!आणि ते तर नाही! गेलं कुठे? त्याच्या छायांकित प्रति आहेत. पण त्या नाही चालत. ओरिजनलच पाहिजे!
ते आहे.कुठे आहे ते ही आठवतंय.फाईलचा रंग, तिचं टेक्च्शर, ते तिथेच का आहे, त्याबरोबर आणखी काय आहे, काय नाही सगळं तिला आठवतंय. पण
मग सुरू झाला भुंगा. इतर अनेकवेळी डोक्यात अखंड सुरू होतो, संपतो - पुन्हा दुसरा सुरू होण्यासाठी- तसाच. काय करावं? मूळ हरवलंय डुप्लीकेट द्या म्हणून अर्ज करावा? कॉलेजकडे? तिकडे नाही मिळालं तर उच्च माध्यमिक शालांत परिक्षा मंडळाच्या
कार्यालयात? देतील ते वीस वर्षापूर्वीचं? किती पैसे भरावे लागतील? पैश्याचं काय एवढं महत्वाचं नाही म्हणा- कुठे असतं ते मंडळाचं कार्यालय? ते तिथेच असेल अजून? नाहीतर कुठे असेल? कॉलेजमधे मिळेल सहज? की ओळख लागेल कुणाची? कुणाची? कुणाची काढता येईल? बाबा असते तर चुटकी वाजवून चटाचट नावं सांगितली असती दहापंधरा.
असते तर-तर काय इथे आल्यावर गाडी अडत होती तिची.अडत होती, फाटे बदलत होती.नसते फाटे आणि नसते फराटे,आठवणींचे.
मग नेहमीच असह्य होत होतं सगळं.भडकाच उडायचा.त्यात तेल ओतायला वास्तव होतंच.सगळयांचं असतं तसंच पण तरीही बोचतं प्रत्येकाला, तसंच.मग त्या भडका उडण्याचाही कंटाळा आला.काय होईल ते जाईल.स्वाभिमान, स्वतःवरचा विश्वास, खरेपणावरचा विश्वास सगळं जागं झालं.
का नाही जायचं आपल्या घरी? तिनं- तिनं सगळं आपल्या ताब्यात ठेवलंय म्हणून? कोण ती? या पुढच्या विचारांच्या प्रवासात कचाकचा दात चावणंच प्रामुख्याने होत राहिलं. असहायता आणि खंत.खऱ्या बाजूचं काहीही न चालू शकल्याची.
जे चालवू शकले असते व्यक्तिशः आणि सगळे मिळून तर सहजच, ते ही गप्प बसले.गप्प म्हणजे गप्पच.थोडीफार कुजबुज आपापसात.अन्याय झालाय असं कुठेतरी पुसटसं मतप्रदर्शन केल्यासारखं.त्यातल्याच कुणालातरी कधीतरी आलेली अन्यायाची चीड.स्व चं भान काहीवेळ तरी सुटल्यामुळेच.बस्सं!
मग तिनं स्वतःला व्यवस्थित गोळा केलं.अशाप्रकारच्या प्रसंगात नेहमी स्वतःला करत असे तसं.मग तिनं दिवस ठरवला.वार ठरवला.घरच्याना आपण त्यावेळी बाहेर असण्यामुळे काही त्रास होणार नाही असा.का नाही जायचं आपल्या घरी? जायचंच!
ते सगळं पूर्वीचं नेहमीच स्वप्नात येई.आता आठ वर्षांनीे त्या आपल्या घरी जाण्याचं पक्कं झाल्यावर तिला नव्यानं स्वप्नं पडू लागली.स्वप्नं पडणं - कुठल्याही स्वरूपाची- तिला नेहमीच आवडत.भीतीदायक स्वप्नं पडली तरी जागं झाल्यावर हे आता तरी खरं नाहीये हे जाणवून मनोरंजन होतंच.आपल्या त्या घरी गेल्याची,वावरल्याची,रमल्याची ती स्वप्नं तिला पडत राहिली.वर्तमानातली आणि भूतकाळातली.इतकी की प्रत्यक्ष तिथे पोहोचल्यावरही हे एक स्वप्नंच आहे असंच तिला वाटत राहिलं.बराच काळ.
हे केवळ स्वप्नं बघितल्यामुळेच होत नव्हतं तर मधे फार मोठा काळाचा टप्पा पार पडला होता.सगळयाच अर्थांनी फार मोठा.मुख्य म्हणजे तिथे पाऊल ठेवायचंच नाही हे पक्कं ठरलं होतं.तेव्हा- आठ वर्षांपूर्वी.आणि आता असं कारण समोर आलं की जाणं भागच पडलं. का नाही जायचं?असं वाटलं उलट. तिनं जायचं ठरवलं आणि ती शांत झाली.जाण्याच्या दिवसाच्या आदली रात्र काही उलट सुलट स्वप्नांची गेली.उठल्यावर मागे पुढे असं झालं थोडं.निव्वळ शांतता कुठे असते जगात.शेवटी असत असेल कुणास ठाऊक.पण तेंव्हाही उरलेल्या वासनांचं तांडव रहातंच म्हणे.मग ठीक आहे असं मनाशी म्हणत बाहेरच्या दिवाणावर पायावर पाय घेऊन चेहेरा लपवलेल्या बुजगावण्याकडे बघितलं न बघितल्यासारखं करत ती व्यवहार्य शांती बरोबर घेऊन बाहेर पडली.
Post a Comment