romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Tuesday, July 29, 2008

गुरू रिसोर्ट्स

नाना, भाऊ, बापू, आण्णा आणि वीरेंद्र ह्या सगळयांच्या एकत्र येण्यामुळे हे संकुल उभं राहिलं. कुणा एकानंही ते सहज उभं केलं असतं.तेवढी ताकद आणि उमेद त्या प्रत्येकात होती पण मग संघटन या क्रियेला काय महत्व उरलं असतं? शिवाय संघटन झालंय हे पोहोचायलाही पाहिजे.नुसतं एकमेकांच्या मनात आणि थोडयाफार जनांत असून उपयोग नाही.जमानाच तसा आलाय.मग योग्य योजना आखून, शिस्तबध्द पध्दतीने, जवळजवळ धूर्तपणेच म्हणायला हरकत नाही, गुरू रिसॉर्टची आखणी झाली.तेवढं पुरे होतं.परिश्रम,पैसा सगळं सगळं होतंच.
पैकी वीरेंद्र ग्रामीण भागाचं प्रतिनिधित्व करणारा.रांगडा.शैलीनं अर्थातच आक्रमक.अण्णा निमशहरी भागाचा प्रतिनिधी. नाना राज्याबाहेरचा,राज्यातले जे परराज्यात स्थायिक झाले त्यांचा नायक.भाऊ महानगरातल्या पांढरपेश्या चाकरमानी नोकरदारांचा नेता.बापू महानगरातल्याच पण उच्चमध्यमवर्गीय, नवश्रीमंत, त्याचबरोबर नुकतेच खालून वर असे जे मध्यमवर्गात प्रवेश करणारे होते त्यांचा अध्यात्मिक दिशादर्शक.परराज्यातला नाना म्हातारा,वृध्दं म्हणता येईल असा.भाऊ म्हातारा म्हणता येईल पण वृध्दं नव्हे. निमशहरी अण्णा वयस्कर पण म्हातारा नाही. बापू प्रौढ तर वीरेंद्र चांगलाच तरूण.
विविध वयोगटातल्या या अभिजनांनी समाजातले वेगवेगळे घटक नुसते आपलेसे केलेले नाहीत तर त्या त्या घटकांनी त्याना डोक्यावर घेतलंय.प्रत्येकाची जादू निराळी.त्यानं संमोहित होणारा घटक वेगवेगळा.पण म्हणूनच प्रत्येकाला लोकप्रियता आणि प्रत्येकाची लोकप्रियता अबाधित. असा मास हिस्टेरिया क्रिएट करणं ही काही खाऊची वस्तू नव्हे. अनाडयातल्या अनाडयाने डोक्यावर घेणं ही चेष्टा नव्हे.इथे अनाडी हा शब्द फक्त अशिक्षित आणि निरक्षर लोकांसाठीच वापरला आहे असं समजायचं काहीही कारण नाही.
अश्या पाच जणांनी एकत्रं येऊन गुरू रिसॉर्टस् हे संकुल उभारणं ही अत्यंत महत्वपूर्ण घटना. त्या संकुलाचं उदघाटन हा त्या घटनेचा कळसाध्याय.उदघाटनाचा दिवस गुरूपौर्णिमा हा गुरूपंचकाच्या योजनाबध्दपणाचा कळस.तर उदघाटन समारंभाला कोणत्याही भक्ताला येण्यास मज्जाव हा त्यांच्याच धोरणीपणाचा परमोच्च बिंदू.यातलं उदारपण म्हणजे उदघाटनानंतर हे संकुल भक्तांचच तर होणार.उदघाटन समारंभालाच भक्त जमले की समारंभाला साधेपणा रहाणार नाही. शांतताभंग, कदाचित शिस्तभंग इ.इ.मुद्देही महत्वाचेच. सगळयाआड, वेगवेगळया गुरूंचे भक्त एकत्र जमल्यावर त्यांचं आपापसात काय होईल हा मुद्दासुध्दा नक्कीच बिनमहत्वाचा नव्हता.ते एकमेकांवर आपटतील, थडकतील, संघर्ष होईल की त्यांच्यातही जागतिकीकरणाचे वारे वाहून असलं काहीच होणार नाही,काही काही कल्पना न करता येण्यासारखं.
Post a Comment