romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Monday, July 28, 2008

संस्कार

बैठं काम,दोन चार वेळ चमचमीत खाणं,बुडाखाली खाजगी किंवा सार्वजनिक दळणवळणाची साधनं,लिफ्टस् इत्यादी 'गरजा' असणारा माणूस जादूची कांडी शोधतो.क्षणार्धात शरीर तरूण,सडसडीत दिसावं यासाठी.अपरिहार्यपणे व्यायामाकडे वळावंच लागतं.त्यात खंड पडत रहातो.पुरेसा परिणाम दिसायला वेळ लागतो.निदान प्रयत्न करतोय हे समाधान सुरवातीला आशा देणारं असतं.
असे अनेक वळसे घेत घेत एके सकाळी मी सूर्यनमस्कार घालायला उभा राहिलो.बारा नावं अजिबात आठवत नाहीत यानं आलेलं पंक्चरलेपण झटकून ॐ सूर्याय नमः म्हटलं आणि लगेच 'एक!' चा ध्वनी माझ्या जिभेवर उभा राहिला.एक ते बारा असे कडकडीत आकडे मनातल्या मनात म्हणत हात जोडणे,ते वर घेणे,ओणवे होऊन बोटांची अग्रं जमिनीवर टेकणंमला सगळं व्यवस्थित आकडयांबरहुकूम आठवत होतं.पहिला खणखणीत एक! आठवल्यापासून मी आणखी एका वेगळया जगात गेलो.
नक्की वय आठवत नाही,पण आठ-दहा वर्षांचा असेन.उपनगरात काँक्रिटचं जंगल नुकतंच धीम्या गतीनं हातपाय पसरू लागलं होतं.छोटे-मोठे पडीक प्लॉटस् बरेच असायचे.आमच्या घरासमोरच्या अश्याच एका पडीक मैदानावर काटेरी झुडपांची काटछाट करून संघाची शाखा भरायची.माझ्या घरात संघाचं वातावरण अजिबात नव्हतं.मैदानात काय चाललंय या उत्सुकतेने मैदान आणि रस्ता यांच्या सांध्यावर बसून समोरच्या दृष्यात बालसुलभ कुतहुलाने रममाण होत राहिल्यावर स्वयंसेवकांनी शाखेत सामील करून घेतलं असण्याची शक्यता आहे.
संध्याकाळची शाखा एका वेगळया जागेत भरू लागली आणि मी नियमीत तिथे जाऊ लागल्याचं नीट आठवतं.माहित नसलेले मैदानी खेळ,देशभक्तीपर आणि वीररसाची गाणी,केवळ संघाची अशी प्रभाव पाडणारी गाणी ही मुख्य आकर्षणं.या शाखेची सूत्रं एका आमच्यापेक्षा मोठया मुलाकडे सोपवली गेली.काळसर वर्णाचा,मध्यम पण भक्कम बांध्याचा,मध्यम उंचीचा असा तो होता.मी माध्यमिक शाळेत जेमतेम प्रवेश केलेला,त्याची शाळा संपत आलेली.मला तो जास्त मोठा वाटायचा.तुकतुकीत अंगकांती,केसांना बऱ्यापैकी तेल,फुगा पाडलेला.त्याचे वडील संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक होते.त्याचे दोन लहान भाऊही त्याच्याबरोबर यायचे.
मला नीट आठवतं,तो ज्या भागात रहायचा तिथल्या बुरूडकाम करणाऱ्या कुटुंबातल्या मुलांना तो आपल्याबरोबर घेऊन जायचा.त्या लहानग्यांना मराठीही धड येत नव्हतं,संस्कारांची तर बातच नाही.तो मात्र नेटाने त्याना ने-आणायचा,त्याना शिकवायचा प्रयत्न करायचा.
त्याचं शिस्तबध्द ध्वजारोहण करणं मग कवायत,खेळ,दंडाचे हातशाखाचालक सगळयात प्रवीण.गांभीर्यपूर्वक,शिस्तीत सगळं करून घ्यायचा.कडक,कठोरही असायचा आणि जेव्हा कधी हसायचा तेव्हा प्रेमळही वाटायचा.मोठया भावासारखा.वेगवेगळी पदं,गीतं म्हणताना गोल करून बसलेल्या स्वयंसेवकांत तो मध्यभागी असायचा.ध्यानमुद्रेत बसल्यासारखा ताठ बसून डोळे मिटून घ्यायचा.त्याचा स्वर बऱ्यापैकी अनुनासिक पण मोकळा होता.गाणं म्हणताना कधीही अडायचा नाही.आवाज खणखणीत,वरच्या पट्टीतला.संस्कृतसुध्दा ओघवतं.याहीपेक्षा मला माझ्या त्याही वयात जाणवलेला त्याचा विशेष आठवतो तो म्हणजे गाताना तो विलक्षण आर्त होत असे.तो सगळया कृती करत असताना भारून गेल्यासारखा वाटे.अशी माणसं आजुबाजूच्या इतर माणसांनाही भारून टाकत असतात.
पाठमोरं होऊन एकमेकाला दोन्ही हातांनी घट्ट धरून कडी करायची.असे दोन गट तयार करून दोन वेगवेगळया कोपऱ्यातून येऊन एकमेकांवर धडकायचं, हर हर महादेव अशी गर्जना करत.हा आमचा सर्वात आवडता खेळ.अशावेळी
मस्तीखोर पोरांच्या अतिरेकी कारवायांना उधाण.शाखाचालक अशावेळी खेळ हा खेळच ठेवायची पुरेपुर काळजी घ्यायचा.माझ्या वयातल्या मुलांचा तो नायकच झाला.त्याने एकदा भारदस्त आवर्तनं घेत बिगूल वाजवला-याला येतं तरी काय काय?नंतर आम्हा पोराटोरांसकट सगळे त्या बिगूलात हवा फुंकत होतो.बेंबीच्या देठासकट.तरी पूंऽऽक असा आवाज येणंही मुष्कील होत होतं!
प्रत्येक गोष्टीत इतका जीव ओतणारा,करत असलेल्या कामानं प्रचंड भारून जाणारा माझ्या आयुष्यातला तो पहिलाच माणूस.
सूर्यनमस्कार घालायला गेलो आणि विस्मृतीत गेलेल्या आमच्या त्या नायकाची एक! अशी आज्ञाच ऐकू आली.पाठोपाठ त्यानं घोटवून घेतलेला एक आणि एक पवित्रा,एक आणि एक पायरी धडाधडा आठवली.मग तो,त्याचं भारलेपण,आर्तता, त्याचं नाव,संख्येने मोठं कुटुंबं,कौलारू चाळीतली जेमतेम खोली,कष्टं करणारे आईवडील,ही भावंडंसुध्दा.अशा परिस्थितीतही सांघिक कार्याचं बळ याना कुठून मिळत असेल? तेही इतक्या भारलेपणाने, आर्ततेने, जीव ओतून.संस्कारांचं बळ…संस्कारीत करत रहाण्यातलंही… आजच्या जमान्यात त्याची दुर्मिळताही मग लक्षात आली.आमच्या शाळेत त्या मुलाचं ड्रॉइंग सगळयात चांगलं आहे हेही त्याच दरम्यान कधीतरी कळलं होतं.पुढे तर त्याचं नाव पेपरातूनच यायला लागलं.
मी हे स्फूट लिहिलं त्या आठवणींनंतर.या आठवणीतला तो नायक म्हणजे व्यक्तिचित्रण या चित्रकला प्रकारात जागतिक पुरस्कार मिळवणारे वासुदेव कामत! वासुदेव कामत हॅटस् ऑफ टू यू!!!
Post a Comment