romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Sunday, August 24, 2008

नाटक:संघटन:एका दृष्यातला काही भाग...

रंगमंचाचा प्रेक्षकांच्या डाव्या बाजूचा भाग हळूहळू उजळू लागतो.अंधुक उजेडात हर्षल बसला आहे एका ठोकळेवजा आसनावर प्रेक्षकांकडे तोंड करून,निर्विकार.
त्याच्या डाव्या बाजूला तुरूंगाच्या गजांची भिंत.प्रेक्षकांच्या उजव्या बाजूचा रंगमंचाचा भागही उजळू लागतो तेव्हा तोच व्हिडियोकॅमेरामन डाव्या खांदयावर कॅमेरा घेऊन तसाच दबकत गजापर्यंत आलाय.थोडावेळ थांबून तो कॅमेरा हर्षलवर फोकस करत असताना असिस्टंट धावत येऊन स्टॅंड ठेवतो,लोगो असलेला माईक देतो,धावत निघून जातो.कॅमेरा खांद्यावरून खाली स्टॅंडवर ठेवत असताना पहिल्यांदाच व्हिडियोवल्याचा चेहेरा दिसतो.तो सौरभ आहे.माध्यमप्रतिनिधीपण अंगात पूर्णपणे मुरलेला.पूर्वीपेक्षा आमूलाग्र वेगळया केश-वेशभूषेत.हर्षल घरगुती वेषभूषेत,दाढीचे खुंट वाढलेला.
सौरभः(डोळा कॅमेऱ्याला लावूनच) हर्षल शिंदेऽ आर यू रेडी हर्षल शिंदे?(हर्षल मान डोलवतो) अरेऽ मग कॅमेऱ्यात बघा ना!-
हर्षलः(शांतपणे) सर मागच्यावेळी तुम्ही असंच प्रोफाय-प्रोफाय-काय त्ये चांगलं दिसतं म्हणून-
सौरभः(आठवून खूष होऊन हसत) ओके!ओके!आपण तुमचं हे फायनलंच करून टाकू पोश्चर-
हर्षलः(हैराण होत) काय?-
सौरभःपो-पो-हर्षल शिंदेऽ-हर्षल शिंदे! खूप कमी वेळ आहे आपल्याकडे!न्यायालयाची परवानगी घेता घेता सव्वा हात हुं!-आता आणि बेअदबी-अवमान वगैरे आपल्याकडूनसुध्दा होण्याआधी-(माध्यमातल्यांसारख्या हुकुमी टाळया वाजवत कॅमेऱ्यामागूनच) चलाऽचलाऽ हं!(माईक सरसावत)-आजच्या 'पडद्याआडून' या कार्यक्रमात आपण भेटत आहोत श्री. हर्षल शिंदे यांनाऽशहरातल्या मध्यवर्ती तुरूंगाऽऽत! तेव्हा हर्षल शिंदे!आपल्या न्यायालयीन कोठडीत गेल्या सहा महिन्यात ही कितव्यांदा मिळालेली वाढ?
हर्षलः(हाताच्या बोटांनी मोजायचा प्रयत्न केल्यासारखा,कंटाळून सोडून देत) मोजायचा कंटाळा आला आता.
सौरभःहहहह…ठीक.आता उशीरा जॉइन झालेल्या आमच्या वाहिनीच्या प्रेक्षकांसाठी-प्रकाश पवारसाहेब घरात तुमच्या वर रहात होते.तुमच्या घरातून वर जायला जिना होता.विसर्जनादिवशी तुम्ही मध्यरात्री वर गेलात.प्रसादाला नारळ घेण्यासाठी पवारसाहेब घरी आले होते,विसर्जनावेळचं हे नेहमीचं.आधीच त्यांचं पिस्तुल प्राप्त केलेल्या तुम्ही ते
त्यांच्यावरच फायर केलंत-पण तीन गोळया झाडल्यागेल्यानंतर ते मिसफायर झालं-उरलेल्या गोळया सुटल्याच नाहीत.बरोबर?
हर्षलःमला आता त्यावेळी(जोर देत)-सहा महिन्यांपूर्वी-काय झालं ते नक्की आठवत नाही!-
सौरभःयेस!येस!इथे इथे महत्वाच्या तीन आणि जास्तीत जास्त अनेक थेअरीज निर्माण होतात शिंदे.व्यक्तिगत वैमनस्यातून तुम्ही गोळया झाडल्यात.पवारसाहेबांवर दुसऱ्या कुणीतरी गोळया झाडल्या,आणि ते तुम्ही आपल्या अंगावर घेतलंत.पवारसाहेबानी स्वतःच स्वतःवर गोळया झाडून घेतल्या-तुम्ही त्यांचं काही खास रहस्य फोडाल असं त्याना वाटलं म्हणून-आणि इतर अश्या अनेक थेअरीज.पवारसाहेबांचे आणि तुमचे नक्की कसे संबंध होते?
हर्षलः(निर्विकार) ते मी अनेकवेळा सांगितलंय-
सौरभः(ड्रॅमॅटिक) आता आता सांगा हर्षल शिंदे!-शहराजवळ दूरवरच्या एका उपनगरातल्या एका आश्रमवजा शुश्रुषागृहात डोळयांची उघडझाप करून पवारसाहेबानी कोमातून बाहेर आल्याचे नुकतेच संकेत दिलेत-ही ताजी घटना पडद्याआडूनच्या या आधीच्या विशेष भागात आम्ही-
हर्षलःते मला नेहमीच वाईट वागणूक देत-घालून पाडून बोलत-
सौरभः(अधिक ड्रॅमॅटिक) का पण का का?
हर्षलःते मी योग्य वेळी-
सौरभः-न्यायालयात सांगेन.हाहा!(रहस्यात घुसत असल्याचा जरा जादाच अभिनय करत) हर्षलजीऽ त्याचवेळी आणखी एक महत्वपूर्ण,अतिशय गंभीर आणि चांगलीच धक्कादायक अशी घटना घडली.ताईसाहेबांचा अपघात!(कॅमेऱ्यातच बघत हात मागच्यामागे जोरात विंगेत फलकावत) संज्याऽऽ इते ब्रेक मारायचाय रे कमर्शियऽलयेऽ कळलं का?(विंगेतून 'येसबॉऽस' असे वेगवेगळया स्वरातले तीनचार आवाज) तर शिंदेसाहेऽब या घटनांचा परस्परसंबंध काय? म्हणजे आहे काय?असला तर तो काय?आणि अर्थातच कसा?(हर्षल कॅमऱ्याला सरावलाय,चेहेरा विविध सूक्ष्म कोनांतून फिरवत दाढी खाजवतो) शिंदे! हे विविध मूडदर्शन शेवटी ठरलंय आपलं.दोन विशिष्ट घटनांचा-
हर्षलःया जगाच्या पाठीवर घडणाऱ्या कोणत्याही दोन महत्वाच्या घटनांमध्ये परस्परसंबंध असतोच असतो.
Post a Comment