romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Sunday, August 24, 2008

विवाहातल्या समस्या

घटस्फोट हे वैवाहिक समस्येवरचं उत्तर आहे की ती आणखी एक समस्या आहे?
आपल्या समाजात सुरवातीला घटस्फोटाचा खूप बाऊ केला गेला, अजूनही केला जातो आणि विवाहबंधन टिकवण्याला महत्व दिलं जातं. असं बंधन खरंच टिकतं का? जबरदस्तीने ते टिकवणाऱ्या व्यक्तिला (या व्यक्ती म्हणजे पुन्हा जास्त करून स्त्रियाच) आपण ते महतप्रयत्नाने टिकवून ठेवल्याचं समाधान कदाचित मिळेल पण असं मारून मुटकून प्रयत्न करून, असंख्य प्रहार झेलून या व्यक्तिच्या मनाची अवस्था काय झालेली असेल? ते नॉर्मल राहिलं असेल? मग हे बंधन टिकवण्याला काय अर्थ?
आज समाजामधे घटस्फोटाचं प्रमाण वाढलेलं दिसतं. तो आता बाऊ राहिलेला नाही. यात वर सांगितलेल्या विचारसरणीचा महत्वाचा भाग आहे. अर्थातच हे प्रमाण आर्थिक स्वावलंबन आणि अधिकाधिक व्यक्तिस्वातंत्र्य या दोन्हींच्या ओढीमुळे अधिक वेग घेतं झालं आहे.
मग घटस्फोटानंतर पुढे काय? पर्याय तीन.
आयुष्यभर एकटं रहाणं. पुन्हा दुसरा जोडीदार शोधून विवाहबंधनात अडकणं किंवा मग लग्न न करताच एकमेकाबरोबर रहाणं. हे एकमेकाबरोबर रहाणं बिनसलं की प्रत्येकानं वेगवेगळया कुणाबरोवरतरी अर्थातच लग्नाशिवाय एकत्र रहाणं. कदाचित कंटाळा येईपर्यंत असं जोडीदार बदलत आयुष्य जगणं.लीव्हइन रिलेशनशीप.
ही लीव्हइन रिलेशनशीप आज लोकप्रिय होताना दिसतेय आणि यापुढे समाजात
ती मान्यता पावेल असंही वाटतंय.
काही जण यापुढचंही भाकीत करतात.आजच्या पाश्चिमात्य देशांसारखी किंवा विवाहसंस्धा अस्तित्वात येण्यापूर्वी मानवसमूहात कदाचित असणाऱ्या मुक्त लैंगिक अवस्थेसारखी आपल्या समाजाची यापुढची अवस्था रहाणार आहे.अर्थातच हे सगळं अचानक होणार नाही.काही पिढयांचा अवकाश यात नक्कीच जाईल.
हे ग्राह्य धरलं तर आपण एक वर्तुळ पूर्ण करून पुन्हा त्याच जागी येणार आहोत.
बॅक टू स्क्वेअर वन.
इथे एका धाडसी विधानाला आपण सामोरे जातो.
कामप्रेरणा या माणसाच्या प्रमुख आदिम प्रेरणेचं आणि वैवाहिक समस्या यांचं जवळचं नातं आहे. अर्थात हे उघड सत्य आहे कारण मानसशास्त्राचा उद्गाता डॉ.सिग्मंड फ्रॉईड याच्या सिध्दांतानुसार माणसाची प्रत्येक कृती हीच मुळी त्याच्या कामप्रेरणेतून उद्भवत असते.
एक वर्तुळ पूर्ण करून आपण पुन्हा त्याच जागी आलो आहोत की काय असं वाटल्यानंतर आणखी एक प्रश्न पडतो.
माणसाची कामप्रेरणा ही आपण आजतागायत समजतो तशी मोनोगॅमस म्हणजे एक पुरूष आणि एक स्त्री याच संबधाधिष्ठीत आहे की ती पॉलीगॅमस म्हणजे इतर प्राण्यांप्रमाणे मुक्त लैंगिकता या प्रकारात मोडते?
समाजात मुरलेल्या पुरूषसत्ताक जीवनपध्दतीला निश्चित हादरे बसू लागलेले आहेत.स्त्रिया अधिकाधिक स्वतंत्र होऊ लागल्या आहेत.समाजातले लैंगिक मापदंड आजवर पुरूषांनीच ठरवले.एका पुरूषाचं अनेक स्त्रियांशी संबंध ठेवणं या गोष्टीचा फारसा बाऊ केला जात नाही.
स्त्रियांवर अन्याय करणारी पुरूषसत्ताक पध्दती उद्या मोडीत निघू लागली आणि मातृसत्ताक पध्दती रूजू लागली तर समाजात कश्या प्रकारची लैंगिकता आकार घेऊ लागेल?
हे सगळं दूरवरचं आहे म्हणून ते नाकारता येईल. कुणाला ते अतिरंजित, आक्षेपार्ह किंवा या ठिकाणी अनुचितही वाटू शकेल. पण वैवाहिक समस्यांचा विचार करताना सुरवातीला म्हटल्याप्रमाणे संपूर्ण पार्श्वभूमीचा विचार करणं आवश्यक आहे. समाजबदलाच्या संभाव्य दिशांचा अंदाजही घेणं तितकंच जरूरी आहे. मग आणि मगच वैवाहिक समस्यांबद्दल ठोस असं काही समजून घेता येईल.
Post a Comment