romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Tuesday, August 26, 2008

देवळातलं पुराण

आजी देवळात पुराण ऐकायला निघायची.हातात भरड भरतकाम केलेल्या कापडाची बनवलेली छोटीशी पिशवी.त्या छोट्याश्या पिशवीत बसायला लागणारं सुती दीड फूटी चौरस आकाराचं पटकूर.हळदीकुंकवाची कुयरी, काळ्या सालीचे मोठे फुटाणे.देवळात सवाष्णींची भेट झाली की एकमेकींना हळदीकुंकू लावलं जायचं.पण नुसतं हळदीकुंकू नाही.सोबत कधी फुटाणे कधी पेढे कधी साखरफुटाणे द्यायचे, घ्यायचे.देवळातून परत येताना त्यात भर असायची करवंदांची-काळी मैना!-काळी काळी मैना! डोंगरची मैना!-अश्या हळ्या देणारय़ा हातगाडीवाल्यांकडून किंवा टोपलीत करवंदांचे डोंगर रचून ते विकणारय़ांकडून घेतलेल्या करवंदांची.कधी पिशवीत भर असायची टपोरय़ा जांभळांची! चैत्र महिन्यात पानात गुंडाळलेली आंबेडाळ.घरी गेल्यावर सगळ्या नातवंडांना समोर बसवून हे सगळं वाटण्याचा आजीचा कार्यक्रम असायचा… पुराण ऐकायला आम्हीही आजीबरोबर.चुळबुळ न करण्याची, आवाज न करण्याची शपथ घेऊन आणि ती सत्रांदा मोडून.मग आजी डोळे मोठे करून रागे भरायची.कधी शू:ऽऽऽ करून तोंडावर बोट ठेवून कावायची.मग आम्ही एकटक पुराण सांगणारय़ा गाडगीळबुवांकडे बघत बसायचो.जांभळा कद नेसून आसनावर बसलेले गाडगीळबुवा.आसनासमोरच पुराण ठेवण्याचा लाकडी स्टॅंड, फुलीच्या आकाराचा.मखमली सॅटीनच्या पिवळ्या किंवा जर्द लाल फडक्यात बांधलेली पोथी त्या स्टॅंडवर ठेवलेली.गाडगीळबुवा वयस्कर, उघडे, अंगावर रेशमी उपरणं.त्यातनं दिसणारे त्यांच्या अंगावरचे पांढरे केस आणि जानवं.डोक्यावर चांगलंच टक्कल.कधी त्यावर जांभळा रेशमी रूमाल बांधलेला.गाडगीळबुवांची भीती वाटायची.त्यांचे डोळे निळे, निळ्या बुबुळांच्या कडा वयोमानाप्रमाणे चांगल्याच पांढरय़ा झालेल्या.जाड रिंग पांढरी.भुवया पांढरय़ाफेक, वाचता वाचता मान वर करून प्रतिसादासाठी श्रोत्यांकडे बघताना हे वैशिष्ट्यपूर्ण डोळे श्रोत्यांवर रोखल्यासारखे आणि म्हणूनच आम्हा मुलांना भीतीदायक वाटणारे.बुवांना सततची सर्दी.पुराण सांगता सांगता नाक अनावर झालं की पंच्याच्या रूमालात खुपसून छीं:ऽऽऽ… त्याना सतत तपकीर ओढायची सवय.पिनड्रॉप सायलन्स ठेवायची जबाबदारी आमच्यावर म्हणून टेन्शनही खूप यायचं.साधं शिंकायचं, खोकायचं तरी दहादा विचार करावा लागे…
Post a Comment