romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Monday, August 25, 2008

माझं आजोळ...

गाडगीळबुवा पुराण सांगायचे.त्यांच्यासाठी एक लाकडी आसन होतं.वर कमानीचा आकार असलेली तीन फुटी पाठ.बसायला बसमधे तीन जणांची सीट असते तेवढी लाकडी सीट.हे आसन बंद करता यायचं.फोल्डिंग.फोल्डच्या ठिकाणी खिडकी उघडून लावतात तसल्या कड्या.लाकडी सीट किंवा पाठ टेकायचा लाकडी भाग फोल्ड करायचा असेल तर मागून बिजागिरी.आसन दिवसभर रिकामं.आम्ही मुलं त्यावर हात फिरवून घ्यायचो.बसून घ्यायचो.मऊ गुळगुळीत चकचकीत पॉलिश केलेलं ते आसन रामाच्या देवळाच्या बाहेर,व्हरांड्यात होतं.अनेक म्हातारय़ा आणि काही म्हातारे संध्याकाळी पुराण ऐकायला रामाच्या देवळाबाहेर जमायचे.सगळ्या म्हातारय़ा नऊवारीत, म्हातारे धोतर, सदरा, कोट, टोपी घालून.बायकांमधल्या एक चतुर्थांश ते निम्म्या बायका लालभडक आलवण नेसलेल्या.तोंडाची बोळकी झालेल्या.भीतीदायक वाटणारय़ा.कुणाच्या हनुवटीवर दोन-तीन लांबलचक केस.कुणाला चक्कं दिसतील इतक्या मिश्या.रोखून बघताहेत असं वाटणारे डोळे.डोक्यावरचा पदर सतत खाली ओढणं आणि सरकवत रहाणं.पदराचं पन्हाळं सतत कपाळावर आल्यामुळे डोळे आणखी भेदक वाटणारे.बागुलबुवा आला रे आला म्हणून घाबरायला व्हायचं त्यातली कुणी समोरून येताना.त्यातल्या काही स्मार्ट.पदर कानामागे अडकवून व्यवस्थित.खूपच वय झालेल्या काहींच्या बसल्याजागी विचित्र हालचाली.तोंडांच्या.हातापायांच्या.बोटांच्या.त्या हालचालींवर वयोमानामुळे त्यांचं नियंत्रण गेल्यासारख्या.हा काय प्रकार?ह्याच अश्या का?असे प्रश्न लगेच मनात.मग आम्ही सतत त्यांच्या डोक्यावरच्या पदरावर टपून बसणं.खरंच केस आहेत की नाही यांना?या म्हातारय़ांच्या डोक्यावर केसंच नसतात असं घरातून सांगितलं गेलेलं तोपर्यंत.मग उत्सुकता.टक्कल आहे?की नुसतेच खुंट?... पुढे अनेक वर्षांनी जेव्हा कळलं केशवपनाचं वगैरे, अंगावर सरसरून काटाच आला!भयंकर करूण वाटायला लागल्या सगळ्या.मग घरच्या बोलण्यात बोडक्या म्हणून उल्लेख आला त्यांचा की प्रचंड खटकायचा.मोठे होत गेलो तश्या त्या नाहीश्याच झाल्या… माणसावेगळा कुणी विचित्र प्राणी आहे असं वाटायचं त्या वावरत असताना. म्हातारपणामुळे,परिस्थितीमुळे बरय़ाचश्या कंबरेतून वाकलेल्या.म्हातारपणामुळे शरीराला विचित्र ठिकाणी विचित्र बाक आलेले.माणसावेगळा कुणी विचित्र प्राणी.माणसानंच आपल्यातून वेगळा काढलेला… लहानांना अप्रूप.मोठ्यांच्या त्या खिजगिणतीतही नसल्यासारख्या… तर अश्या त्या म्हातारय़ा,म्हातारे पुराण ऐकायला जमणारे.रामाच्या व्हरांड्यात-रामाच्या पायरीवर.ठसठशीत कुंकू लावलेल्या माझ्या आजीसारख्या बायकाही बरय़ाच त्यात.कपाळावर आधी रूपयाएवढं गोल मेण लावायचं.फणेरपेटी उघडल्यावर तिच्या झाकणामागच्या आरश्यात बघत हे मेण नीट लावून झालं की त्या मेणावर आरश्यात बघत बघतच कोरडं लालभडक कुंकू चेपायचं.लालभडक गोल सूर्यासारखा होईपर्यंत.रोज देवळात पुराणाला जायच्या आधी तयारी करताना फणेरपेटी म्हणजे सखीच.त्यात केसांना लावायच्या पिना, आकडे, मेणाची डबी, कुंकवाची डबी, फण्या दोन-तीन प्रकारच्या, त्यात केसातली जनावरं शोधणारी एक… फणेरपेटीचं झाकण उघडलं की झाकणाच्या आतल्या बाजूला असलेल्या आरश्यात डोकावण्यासाठी नातींची गर्दी.झाकण उघडलं की खोबरेल तेलाचा येणारा कधी खरपूस कधी कुबट असा वास… नाती तेलात लिडबिडलेल्या फण्या उचलण्यासाठी घाई करणारय़ा… घाई नटायची, घाई आजीबरोबर पुराणाला जायची…

No comments: