मनू:मी उभा आहे!
मी:ते दिसतंच आहे! (वात्रट हसणं) तू मनू आहेस,हा तुझा आणखी एक चावटपणा आहे,मी तुला ओळखलंय.
मनू: (तरीही गंभीर) मी उभा आहे.
मी:च्यायला मग बस की!आज काय पहिल्यांदाच आलाएस?
मनू:मला वेळ नाहीए बसायला,मी उभा आहे!
मी: (मनूला निरखतो,तो सिरियस,मी पुन्हा वात्रट) काय?कुठलं घोडं मारायला जायचंय आज?
मनू: (आणखी गंभीर) राजा,ही चेष्टेची वेळ नाहिए.बरीच कामं पडलीएत.महापालिकेची निवडणूक लढवायला जाणं म्हणजे घोडं मारायला जाणं नव्हे.तुझ्यासारखा सुजाण मतदार जर असा बोलायला लागला-
मी: (उडालेलाच) काय म्हणालास? थांब!थांब!थांब!तुला तिकिट मिळालं शेवटी? (सिनेमातल्या बालनटानं हिरोच्या हाताला हिसके मारावेत तसं)कुणी दिलं? कुणी दिलं सांग मनू!सांग!
मनू: (सिनेमातल्याच “मनमोहन कृष्ण” प्रमाणे निर्विकार डोळे, नजर ऑडियन्सकडे फिरवत) कठीण आहे!या महानगरातली जनता प्रौढ झाली आहे असं मला वाटत होतं. (पुन्हा माझ्याकडे बघत) अरे कुणाकडून तिकीटं घ्यायची?सगळे राजकीय पक्ष कसे आहेत?
मी:सगळे एकजात एका माळेचे मणी!
मनू:आहेत ना?त्यांनी काय भलं केलंय?
मी: (चवताळत) गटारीत टाकलं रे महापालिकेच्या! ते ही अंडरग्राऊंड!
मनू:पोरांना खेळायला ग्राऊंड्स आहेत?
मी:अंडरग्राऊंड?
मनू: (समजूतदारपणे) नाही रे राजा, प्ले ग्राऊंड्स!
मी: (तडफडून) सगळी मैदानं विकासकांच्या घश्यात!हेच लोकसेवक, हेच विकासक!आता आमची पोरं सतत टीव्हीच्या डोक्यावर! नाहीतर आमच्या!
मनू:बरं!अत्यावश्यक सेवांचं काय?
मी: (करवादून) मेवा रे मेवा! मेवा खाण्यासाठी कुठून कुठून जमा होतात!-
मनू:कुठून?कुठून?
मी:यादी तर बघ सगळ्यांची यावेळची!अर्ध्याच्या वर परप्रांतीय,अर्धे नगरसेवकांचे पित्ते, नातेवाईक,बायका,मुलं,आया,बहिणी,भाऊ.सगळ्यांचं विभागातलं कार्य म्हणजे-(प्रचंड चिडल्यामुळे शब्दच फुटत नाहीत)
मनू: (माझ्या खांद्याला थोपटत,शांतपणे) कुणी बदलायचं हे चित्र?
No comments:
Post a Comment