ढाम ढाम तिडकिट तिडकिट… डोक्यात घण बसायला लागले आणि मी उठलो.घड्याळात बघतो तर अडीच.हे कधीचे अडीच? अरे ही तर रात्र! भर मध्यरात्र! गणेशोत्सव गेला, नवरात्र सरली, दिवाळी आली कधी गेली कधी? मग आता एवढ्या रात्री हा नाशिकबाजा कुणाचा? खिडकी बंद करून घेतली.नोव्हेंबर अर्धा सरत आला तरी ती बंद करायला लागत नव्हती.थंडी आता पुढच्याच वर्षी पडणार बहुतेक! तर खिडकी बंद केली.पंखा फूल्लं आहे ना? चार-चारवेळा बघितलं! ढाम ढामच्या कानठळ्या तसाच! या आवाजांची सवय कशी होत नाही आपल्याला? आणि हे डेसिबलचं क्रुसिबल मिरवणारे सगळं होऊन गेल्यावर कसे जागे होतात? तात्विक प्रश्न उभे राहिले.असले प्रश्न उभे करून काही उपयोग असतो का? माझं झोपेतंच असलेलं सुप्त मन मलाच छळायला लागलं.शेवटी खिडकी उघडून शिव्यांची लाखोली वहात (स्व त: ला च!) बाहेर डोकावलो.
मनूच्या सोसायटीतून आवाज येत होता.चार-पाच इमारतींच्या त्या सोसायटीत असंख्य हॅलोजनांच्या प्रकाशात गुलाल उधळून पोरं मनसोक्तं नाचत होती.त्यांच्या तारूण्यातल्या कैफाचा हेवा करावा तेवढा थोडाच.तेच माझ्या हातात होतं.माझा कैफ, वास्तवाचे चटके बसून बसून (ते कुठे बसले हे वेगळं सांगायला पाहिजे का?) कुठल्या कुठे नाहीसा झाला होता.छातीतल्या कफाने उचल खाल्ली.सळसळत्या तारूण्याचा तो अविष्कार डोळे फाड-फाडून बघत, कान खाजवत मी तसाच उभा राहिलो.दिग्मूढ की काय म्हणतात त्या अवस्थेत.पण आता माझ्याच काना-डोक्यातून ढाम ढाम आवाज यायला लागले.खिडकी बंद करून अंथरूणावर येऊन झोपलो तर चादरीतून, गादीतून ढाम ढाम.बाजूला सहचारिणी.तिला ढाम काय किंवा तडाम काय सगळं सारखंच.तिचं घोरणंही आता ढाम- आपलं हे- चांगलंच ठाम स्वरात चालू राहिलं.आता उजाडल्यावर मनूची खबरबात घेणं भाग होतं.
सकाळी उठून मनूच्या सोसायटीचं गेट पार करतो न करतो तोच मागून गलका ऐकू आला- साहेब आले! साहेब आले! मागे बघतो तर हीऽऽ गर्दी!
गर्दीतल्या एकानं कंपाऊंडवर ढकललंच मला आणि सिनेमातल्यासारखी एक अलिशान गाडी सोसायटीच्या आवारात उभी राहिली.एखाद्या महाकाय पक्षाचे पंख हवेत उघडावेत तशी तिची दारं वर उचलली गेली.पांढराशुभ्र हाफशर्ट, पांढरी फूलपॅंट, पांढरय़ा चपला घातलेले मनूसाहेब एका दरवाज्यातून बाहेर आले.कपाळावर भलामोठा उभा कुंकवाचा पट्टा आणि हाताला जाडजूड लाल धागे बांधून नुकतेच देवदर्शन (देव कुठला हे ज्याचं त्यानं ओळखायचं) करून आलेले.दुसरय़ा दरवाज्यातून उतरले काळ्या कपड्यातले दोघे.एके ४७ की ५१ की ५७ की काय ते घेऊन.साहेबांचा जयजयकार संपला आणि काय आश्चर्य! साहेब माझ्याकडेच झेपावले.मला मिठी मारली.कोण म्हणतं साहेब झाल्यावर साहेब जनतेला विसरतात? सुदाम्यासारखं माझ्या डोळ्यात पाणी तरारलं.माझ्या विरलेल्या पॅंटीच्या खिश्यात पोहे सापडताएत का ते मी चाचपू लागलो.
साहेब जिवणी फाकवून हसत विचारत होते, “कॅऽऽय…कसं काय? हे नेहेमीसारखं वेषांतर नाहीए हं! निवाससेवक झालोय मी निवाससेवक!”
अधिक भाबडा(?) होऊन माझ्यातल्या सुदामानं विचारलं, “म्ह-म्हणजे?”
साहेब म्हणाले, “वागाच्ये पंजे… अरय़े यड्या, आमच्या सोसाय्टीनं मला येकमुखानं निवडलंय निवाससेवक म्हणून! आता मी उद्धार करणार!”
मला उद्धार करणं म्हणजे लाखोली वहाणं हेच माहित.मी आ वासला नेहेमीप्रमाणे.
साहेब म्हणाले, “तोंड मिट.आता सगळ्या सोसाय्टीचं कल्याण!” असं म्हणून त्यांनी गाडीकडे बघितलं.म्हणाले, “कशी आहे?” मी सोसायटीकडे बघत होतो.इमारतींचा रंग उडालेला.भिंतींना भेगा.वरच्या मजल्यावर रहाणारे पावसात भिजत नसतील, स्लॅबमधून पाऊसच आत येत असेल.साहेबांनी माझं तोंड खासकन वळवलं, ओरडले, “अरे इकडे बघ! मुद्दाम सफेत गाडी घेतली, नाय तर लोक म्हणायचे काळ्या पैशाची म्हणून!” “तू-तुम्ही घेतली? माझा अडाणी प्रश्न… माझ्या डोक्यावर टप्पल मारून साहेब म्हणाले, “सामान्यच रहा तू नेहेमी.सोसायटीवाल्यांना घ्यायला लावली.नाय तर म्हणालो, कुटलीच कामं होणार नाहीत!”
मनूसाहेबांच्या भाषेत आता बरय़ापैकी रांगडेपणाही आला होता.साहेबांनी माझ्या खांद्यावरून हात घालून मला पुढे ओढलं. “चल!” म्हणाले.मधेच थांबून जयजयकार करणारय़ांना हात दाखवला.भाडोत्री मोर्चेवाल्यांसारखे हात दाखवणारेही थांबले. साहेबांचं चालू झालं, “साल्यांना एकत्र यायला नको कधी.कामं कोणी करायची यावरून नेहेमी हमरातुमरी.सोयी सगळ्या पाहिजेत.संडासची टाकी वहायला नको.पाणी वर चढवायचा पंप बिघडायला नको.चोरय़ा व्हायला नकोत.भिंतीतून, छपराच्या स्लॅबमधून गळती नको.इमारतींच्या आवारात कचरा नको.अरे म हवंय काय?” गुटख्याची पुडी करकचून फाडून तोंडात रिकामी करायला म्हणून साहेब थांबले आणि मी डाव साधला- “पण सहजासहजी घेऊन दिली त्यांनी गाडी?” साहेबांनी तोंड वर केलं. “सॅहॅजॉसॅहॉजी…” तोंडातला गुटखा जिभेने एका बाजूला करून ते पुढे म्हणाले, “त्यांचे सगळे प्रॉब्लेम्स आणखी कठीण करून ठेवणं भाग पडलं!” मी विचारलं, “म्हणज्ये?” बावळट ध्यानाकडे बघावं तसं माझ्याकडे बघत साहेब म्हणाले, “ड्रेनेजचं काम चालू केलं, अर्धवट ठेवलं.पंप नुसता खोलूनच ठेवला.भिंतींना पराती बांधून भर दुपारी ठोकाठोक चालूच ठेवली.पण लोकांची सहनशक्ती चिकार!” असं म्हणून त्यांनी गुटख्याची पिचकारी मारली.पायरीवरच.पुढे बोलायला लागले, “मी त्यांच्यापेक्षा चिवट.शेवटी खोललेल्या ड्रेनेजच्या झाकणात एक म्हातारा पडला आणि एका बाईच्या पाठीत भिंतीवर भर दुपारी ठोकाठोक करणारय़ांची छिन्नी बसली आणि माझं काम सोप्पं झालं!”
आता मी संवाददाता झालो.म्हणालो, “मुदत किती?”
साहेब म्हणाले, “पाच वर्षं!”
मी विचारलं, “त्यानंतर?”
साहेब म्हणाले, “पुन्हा प्रॉब्लेम्स आणखी कठीण!”
“मग?” –मी विचारलं.
ते म्हणाले, “मुदतवाढ!”
“मुदतवाढीच्या टर्ममधे नवीन काय?” मी विचारलं.
ते म्हणाले, “मला नवीन फ्लॅट आणि निवाससेवक परिषदेची स्थापना!”
मी विचारलं, “त्याने काय होणार?”
ते म्हणाले, “प्रगती!”
मी दुरूस्ती केली, “निवाससेवक परिषदेच्या स्थापनेनं काय होणार?”
“तेच सांगतोय ना! निवडणूक होणं बंद!” मला मूर्खात काढत ते म्हणाले.
मी तरीही घेतला वसा सोडला नाही, विचारलं, “त्यानंतर?”
ते म्हणाले, “एक इमारत माझ्या नावावर!”
मी म्हणालो, “शाब्बास!”
ते म्हणाले, “मग आख्खी सोसाय्टी- हा सहनिवास- माझ्या मालकीचा!”
साहेब आणखीही पुढे बरंच म्हणत होते आणि मी श्वास घ्यायला जागा शोधत होतो!
2 comments:
अभिनंदन! अभिनंदन! अभिनंदन!
आभार!
Post a Comment