रविवार सकाळ.सकाळचे दहा वाजलेले.मी कधीही न मिळणारय़ा साखरझोपेत.जोरजोरात वाजणारा रिक्षाचा हॉर्न.तो कानठळ्या बसवणारा असूनही अजून मी उठत नाही म्हणून चवताळलेली बायको.असे सगळे पापग्रह राशीला एकत्र आल्यानंतर मला अंथरूण सोडावच लागलं.
खिडकीबाहेर पहातो तर नवी करकरीत रिक्षा.बाजूला उभा स्वच्छ पांढरय़ा कपड्यातला तिचा मालक कम चालक.नेव्हीमधल्या पायलट, कमांडरसारखी त्याची कॅप.दोन्ही हातांचा कर्णा करून माझ्या खिडकीच्या दिशेने त्याच्या माझ्या नावाने हाका.डोळे चोळत ते आऊट ऑफ फोकस, अंधुक दिसणारं दृष्य दिसावं म्हणून मला माझी झोप उडवावीच लागली शेवटी.
मी पुन्हा नीट पहातोय खिडकीतून तर आता कमांडर गायब.मी मनाशी म्हणतोय- अरे, हे काय दिवास्वप्न?- तर दारावर बेल.दार उघडतो तर समोर ’कमांडर’! मी (नेहेमीच्या) भांबावलेल्या चेहेरय़ाने काही विचारणार इतक्यात त्याने कॅप काढली आणि मी उडालोच! मनू!! मी आश्चर्यानं विचारलं, “हे रे काय?” जिवणी फाकवत, फवारा उडवणारं हास्य करून तो म्हणाला, “लोकांच्या सेवेसाठी!” मी म्हणालो, “सोडलीस नोकरी?” मला टप्पल मारून तो म्हणाला, “अरे नोकरी करून लोकं काय काय करतात! शिकतात.खरवस विकतात.शेअर्सची उलाढाल (!) करतात.एजन्सी चालवतात.राजकीय पक्षांचे संघटक होतात.मी रिक्षा घेतली.परप्रांतीयांना ठसन द्यायची आणखी एक संधी! चल!” असं म्हणून तो मला ओढायलाच लागला.मी माझी सुटणारी लुंगी सावरतोय.भोकाभोकांचा बनियन लपवायची धडपड करतोय हे लक्षात यायला त्याला वेळ लागला.माझ्या पार्श्वभागावर चापट मारून त्यानं मला मग आत ढकललं.मी कसाबसा शर्ट चढवला.पॅंट कमरेवर सरकवली नाही तोपर्यंत बायकोने डाव्या हातात पिशव्या आणि उजव्या हातात पैसे कोंबले.एकबाजूने मनू ओढतोच आहे.नेहेमीसारखा, कुठेलेही पर्याय नसलेला मी मनूच्या रिक्षेसमोर उभा ठाकलो.तिला घातलेला हार, लावलेले गोंडे न्याहाळतोय तोपर्यंत मनूनं मला सीटवर ढकललंच.रिक्षाच्या आत लावलेले गोंडे, झिरमिळ्या माझ्या नाकातोंडात जाऊन मी सटासटा शिंकतोय न शिंकतोय तोपर्यंत ढॅण ढॅणऽऽ ढॅण असा राक्षसी संगीताचा तुकडा माझ्या उजव्या कानात गिरमिटासारखा फिरतोय.बॅलन्स (माझा) डावीकडे केला तर डाव्या कानात गिरमिट.माझा चेहेरा आधीच केविलवाणा.आता सिनेमातल्या ए के हंगलपेक्षा बापुडवाणं होऊन मी समोर पाहिलं तर समोरच्या, मागचं ट्रॅफिक दिसावं म्हणून लावलेल्या आरशात दिसतोय मीच पण माझे ओठ लालचुटुक! डोळे फाड-फाडून पहातोय तर आरशावर नुसतेच ओठ.अलिबाबाच्या गुहेत शिरल्यासारखा मी मनूच्या रिक्षाचं ते अंतरंग बघायला लागलो.बघायला काय लागलो? ते सगळं माझ्या डोक्यात, डोळ्यात आणि कुठे कुठे आपोआपच घुसत होतं म्हणा! आता संगीत आणखी वाढलं.त्यापेक्षाही वाढला त्या कुठल्याशा एफेम वरच्या, त्या आरज्ये की डीज्येचा भेसूर हिंदी कम इंग्लिश कम कुठल्याशा भाषेतला तारस्वर.मी डोळे मिटले तरी ते किलेकिलेच रहात होते.दोन्ही कानांवर गच्च हात ठेवले.मला तसं बघून मनू नेहेमीसारखा विजयोन्मादानं हसला आणि त्यानं माझं लक्षं वेधून घेतलं. “कशी आहे?” माझ्या कानाजवळ आपलं थोबाड आणून तो ओरडला.एका कानावरचा हात सोडून मी दोन बोटं जुळवली आणि ’छाऽऽन!” अशी खूण केली.मनूनं उजव्या हाताच्या तर्जनीचा- पहिल्या बोटाचा- आकडा केला.तो दोन डोळ्यांच्यामधे लावला.मग तोच आकडा ओठाजवळ नेऊन त्याचे मुके घेतले आणि वाकला.स्टार्टर हाताने वर ओढल्याबरोबर मला कानावरचे दोन्ही हात सोडून मिळेल तो आधार पकडावाच लागला नाहीतर मी रिक्षाबाहेर फेकलाच गेलो असतो.मनूची रिक्षा नुसती सुरूच झाली नव्हती तर ती हवेत जणू उडायलाच लागली.मी पिशव्या आणि पैसे गच्च मांडीत धरून बसलो.लहानपणी जत्रेत गोल गोल फिरून चक्कर आणणारय़ा घोड्यावर कसंबसं गच्च बसत होतो, जीव मुठीत धरून.त्याची आठवण येऊन मजा येत होती.हे मेरी गो राऊंड आत्ता तरी फुकट होतं.
माणसं, रस्ता, दुकानं, इतर वहानं भिरीभिरी मागे पडत होती.सोबतीला झिनच्याक एफेम.सगळंच झिंग आणणारं होतं.मला हे अभूतपूर्व स्वप्नं दाखवणारा जादूगार माझ्या पुढेच बसला होता.आरशातून माझ्याकडे आणि बाहेरच्या त्या जुलमी दुनियेकडे हसत हसत पहात पुढे पुढे जात होता.
रिक्षा पुढे येईल ते भेदत जात होती.वळणावरच्या आजीआजोबांना तिचा अंदाजच आला नाही.ते भेलकांडले.आता काय होतंय म्हणून मी वाकून पहातोय तो रिक्षा पुन्हा वळली आणि त्या आजीआजोबांचं काय झालंय हे पहाण्यापेक्षा स्वत:ला सावरण्याच्या कामात मी गुंतलो.मनूच्या चेहेरय़ावर विजयी हास्य कायम होतं.आता रिक्षा करकचून थांबली.काहीही प्रयत्न न करता मी रस्त्यावर आलो.मनूनं माझी गचांडीच पकडली, म्हणाला, “कॅय? कशी वाटली सफर?” मी पुन्हा दोन्ही बोटं घट्टं जुळवून छाऽऽन! अशी खूण केली.
एखादा डिस्कोबार असावा रिक्षांचा तसा तो रिक्षास्टॅंड होता.एका खांबावर भला मोठा युनियनचा बोर्ड.रंगीत.रिक्षांच्या तीन चार रांगा.तरी माणसं उभीच.स्टॅंडवर रिक्षा आली रे आली की तिच्याभोवती घोळका जमायचा.लहान मुलंबाळं कडेवर असलेले घामाघूम बायका-पुरूष, म्हातारे कोतारे, आजारी, अपंगांना घेऊन येणारे गरजू.सगळ्यांचे चेहेरे भिकारय़ांपेक्षा लाचार.मला कळेना पैसे द्यायची तयारी असूनही ह्यांचे चेहेरे हे असे का?
एक आजी मनूकडे आल्या.मिनिमम भाडं.मनू म्हणाला, “एरिया माहित नाही!” आजी म्हणाल्या, “कशाला चालवतोस?” मनूनं शांतपणे पुढच्या रिक्षाकडे हात केला.आजी धावल्या.
कडेवर बाळ, हातात बॅग असलेली बाई पुढे झाली.रस्त्याचं काम चालू.मनू म्हणाला, “रिक्षा उधरकी नही!” बाई म्हणाली, “फिर क्या लंडन जाओगे?” मनू हसला.म्हणाला, “हो!”
एवढ्यात एक पायानं अधू माणूस कसाबसा पुढे झाला.त्याच्या हातात पुस्तकांचा भलामोठा गठ्ठा.मनूनं मान हलवली- नाही! लंगडा म्हणाला, “का?” मनू म्हणाला, “वजन आहे!” लंगडा म्हणाला, “मग काय हत्तीवरून नेऊ?” मनू हसला.म्हणाला, “तुझी मर्जी!”
आता घोळका वाढला.मनू शांतपणे मान हलवत राहिला.
घोळक्यातून एक रागावलेला तरूण सरसावला.त्याची बहीण आजारी.तरूण मनूच्या अंगावर आला.मनूनं त्याला एक लावली.तरूण उताणा पडला.वर पहातो तो युनियनचा बोर्ड!
शेवटी एअरपोर्टचं भाडं मिळालं.मनूनं मला पुढे त्याच्याजवळ बसवलं.मी स्वप्न भासणारय़ा जत्रेत नव्यानं शिरणार होतो आणि मनूची रिक्षा लोकांच्या सेवेसाठी धावणार होती.
No comments:
Post a Comment