पुढे काय होणार आहे हे भरतला पुरेपूर कळून चुकलं होतं..
शस्त्रक्रियेमुळे कदाचित शरीराला धोका संभवत होता पण भरत नावाच्या विजनरीला त्यापुढचा धोका दिसत होता. तो काही अतिरंजित चित्रपटाचा नायक नव्हता त्यामुळे नक्की काय होणार आहे हे लक्षात आल्यावर, धक्का बसूनही त्याचे विचार त्याच त्या बिंदूवर फार काळ रेंगाळले नाहीत.
त्याच्या पूर्णपणे व्यावसायिक वृत्तीनुसार अडचणींवर उपाय कसे करायचे ते ठरत होतं. व्यापारी वृत्तीनुसार दोन पावलं मागे कसं यायचं, वेळीच धोका ओळखून सुरक्षित वळण कसं घ्यायचं ते ठरत होतं. आपल्या अडचणीचं निदान काय आहे हे डॉक्टरकडून कळल्यावर आणि त्याचे परिणाम काय आहेत ह्याची व्यावहारिक जोडणी मनात झाल्यावर म्हणूनच कदाचित त्याच्या मनाची अवस्था वेडीपिशी झाली नसावी.
शस्त्रक्रिया करण्याच्या निर्णयात शारीरिक धोका जरूर होता पण शस्त्रक्रिया केल्यामुळे होत असलेली वाढ जमिनदोस्त होणार होती. त्यामुळे सगळंच भुईला मिळण्याची शक्यता होती आणि तो धोका जास्त गंभीर स्वरूपाचा होता. सगळं मनासारखं होत रहाणं, भरभराट, अचूक आणि योग्य निर्णयशक्ती, जगज्जेतेपण, हे सगळं भुईला मिळणं म्हणजे.. किती वेगानं ते भुईला मिळेल? पटापट सगळ्या गोष्टी उलटून, विस्कटून, बूमरॅंगसारख्या आपटून? काय काय होईल?.. अशा पूर्णपणे नकारार्थी विचारांच्या वेटोळ्यात जास्त वेळ रहाणं ही भरतची वृत्ती कधीच नव्हती. त्यानं त्याच्या पद्धतीनं प्राप्त परिस्थितीत योग्य उपाय मनाशी योजला होता. परतीच्या विमानप्रवासात शेजारच्या सीटवर निजलेली अर्धांगी जागी होण्याची तो वाट बघत होता.
ती जागी झाल्यावर सहज इकडचं तिकडचं बोलता बोलता त्यानं यापुढे भरतनं गाडीतली मागची सीट स्विकारणं आणि अर्धांगिनीनं पुढील सीट, चालकाची सीट घेणं रंगानी उद्योगसमुहाला कसं आवश्यक आहे हे तिला पटवायला सुरवात केली. हे सगळं ऐकताना तिचा निर्देश ज्या ज्या वेळी भरतच्या चालू दुखण्यावर येई तेव्हा भरत निरनिराळ्या तरल पद्धतीनं- चालू दुखणं तेवढं गंभीर नाही पण भविष्याचा विचार करता आळीपाळीनं चालकाची सीट घेता यायला हवी, विश्वास फक्त एकमेकांवरच आणि कोणावर ठेवणार?- अशा दिशेनं जाई.
अर्धांगिनीच्या असलेल्या बुद्धिला आश्वस्तं करणारं असं हे सगळं होतं. तिला पटणारं आणि तिच्या सगळ्या शंका कुशंका आणि प्रश्न मिटवणारं.
पुराणकाळापासूनची व्यापारी परंपरा असलेल्या सधन कुटुंबात तिचा जन्म झालेला होता. आघाडीच्या उद्योगसमुहातली चालकाची सीट अनपेक्षितपणे समोर आल्यावर तिच्याही अनुवांशिक चित्तवृत्ती चांगल्याच फुलून आल्या. ती भरतच्या चालू दुखण्याचं तिला वाटणारं गांभीर्य विसरून त्याच्याबरोबर चर्चा करण्यात मश्गूल झाली. रंगानीसमूहाचं उद्योगजगतातलं स्थान, त्याबद्दलचे तिचे अभिप्राय, मतं, सल्ले ऐकून भरतही अवाक् होण्याच्या स्थितीपर्यंत आला.
विमानप्रवास संपेपर्यंत अशा तर्हेने भरतच्या अर्धांगिनीनं रंगानी उद्योगसमूहाच्या स्टेअरिंग व्हीलचा ताबा घेतलाही.
असं होतं. उद्योग आणि राजकारण यासारख्या क्षेत्रात सहज होतं.
परतल्यावर मग भरत रंगानीनं व्यवस्थित आणि सुरक्षित वातावरण निर्मिती केली. प्रसार माध्यमांसमोर तो फक्त अर्धपुतळ्याएवढाच दिसू लागला. वावरण्याचं काम अर्धांगिनीवर सोपवू लागला. भरतचं कमरेतून प्रमाणाबाहेर झुकून उभं रहाणं, बोलणं, वावरणं लपलं. अजून लावण्य टिकवलेल्या त्याच्या अर्धांगिनीवर लागलेल्या नजरा बघून मात्र पूर्णरूपाने वावरलो असतो तरी लपलो असतो असं भरत रंगानीला वाटल्याशिवाय राहिलं नाही.
पण हे वावरणं जवळजवळ रोजचंच असल्यामुळे पुढचं पाऊल उचलणं भरतला भाग होतं. चाणाक्ष पत्रकारांच्या पाप्पाराझी शोधपत्रकारितेसमोर त्याच्या अर्धपुतळा स्वरूपाचा टिकाव लागला नसता, उलट सगळंच बिंग बाहेर फुटलं असतं.
पुढचं पाऊल होतं प्रसारमाध्यमासमोरची आपली गैरहजेरी संयुक्तिक आहे असं भासवण्याचं.
मग आपल्या दोन दर्शनांमधली लांबी वाढवणं आणि वाढलेल्या प्रचंड जागतिक व्यापामुळं रंगानी उद्योगसमूहाचे सर्वेसर्वा कार्यालयीन कामात आणि बैठका, सभांत व्यस्त आहेत अशा प्रकारची निवेदनं प्रेसला देणं याचा यशस्वी अवलंब केला गेला.
असं करत करत भरत स्वत:ला एका पोलादी म्हटल्या जाणारय़ा पडद्याआड नेत होता आणि चक्कं मोकळा होत होता.
असं करून तो काय साधत होता?
अशा पद्धतीने मोकळा झालेला भरत रंगानी प्रचंड ओढीने आफ्रिकन वन्यजीव अभयारण्यातल्या त्या निवडक उद्योजकांसाठीच असलेल्या विश्रामसंकुलातल्या आपल्या कुटीकडे धाव घेत होता.
भरतचं हे काय चाललं होतं?
भरतलाही ते उमगत नव्हतं.
समोर आलेल्या अडचणीतून जराही नुकसान करून न घेता मार्ग काढला, अर्धांगिनीला आपल्या गादीवर बसवलं, त्यामुळे आपोआप मोकळेपण आलं आणि विश्रामधामसंकुलाकडे धाव घेतली; असं होत होतं?
की त्या वैद्यकीय तज्ञानं निदान केल्यापासून किंवा त्या आधीपासूनच विश्रामसंकुलाची प्रचंड, अनवार ओढ लागल्यामुळे स्वत:ला मोकळं करून घेतलं जात होतं?
हा वानप्रस्थाश्रम होता? इतक्या लवकरचा?
यातलं खरं काय होतं?
विश्रामसंकुलातल्या आपल्या कुटीत बसून तासन्तास निद्राध्यानस्थ होणं. ते झालं की गवाक्षातून, व्हरांड्यातून, अंगणातून सभोवतालच्या अभयारण्याकडे एकटक बघत तासन्तास ध्यानस्थ होणं हे भरतच्या बाबतीत खरं झालं होतं.
जेव्हा जेव्हा स्नान करावसं वाटेल त्या त्या वेळी कमरेवरची वाढ निरखत रहाणं हे ही.
इकडे सत्तेपुढे अर्धांगिनीला भरताचा विसर पडत चालला होता.
स्त्रित्वाचं वेगळंच परिमाण लाभल्यामुळे रंगानी उद्योगसमूह अनेकार्थांनी अधिकाधिक समृद्ध होतं होता. देशातल्या तमाम पौरूषत्वाचं नैसर्गिक आकर्षण त्याला निश्चित हातभार लावत होतं.
अशातच भरतानं दयाबुद्धिनं संचालक मंडळावर बसवलेला तो दूरचा अस्वस्थं चुलतभाऊ भरताच्या अर्धांगिनीशी संधान बांधू लागला. कारण निश्चित कळलं नसलं तरी आपला मुख्य अडसर दूर होतो आहे हे न समजण्याइतका दुधखुळा तो नक्कीच नव्हता. मूळ रक्त रंगानी घराण्याचं होतं.
असंही होतं. उद्योग आणि राजकारणात निश्चित होतं.
दोन्ही क्षेत्रं अनेकार्थानं वेगळी करणं कठीण.
गवाक्षात, व्हरांड्यात, अंगणात झुकत चाललेल्या कमरेनं बसत, वावरत, एकटक अभयारण्याच्या मोठ्या शून्यात बघत ध्यानस्थ होत रहाणं या सततच्या क्रियेनं की काय भरतच्या अंगावरली लव चांगलीच वाढत चालली. स्वदेशातून प्रचंड ओढीने तो विश्रामसंकुलात कायमचा म्हणावा असाच रहायला आला होता. तीच ओढ त्याला आता अभयारण्याबद्दल वाटू लागली. विश्रामसंकुलाचे सुरक्षारक्षक मात्र सीमा तोडण्यास आपल्याला अटकाव करत आहेत असं त्याच्या लक्षात आलं.
इकडे प्रसारमाध्यमांनी सनसनाटी बाईट मिळवला. एका महत्वाकांक्षी पत्रकाराला भरताची अर्धांगिनी आणि नात्याने दूरचा तो चुलतभाऊ एकांतात सापडले. तशी बोंब त्याने ठोकली.
पौर्णिमेच्या एका उबदार मध्यरात्री भरत नावाचा तो नर विश्रामसंकुलाच्या सुरक्षारक्षकांची नजर चुकवून जेव्हा अभयारण्यातल्या एका विशिष्ट गर्द अशा भागात पोहोचला तेव्हा अनेक वानर त्याला अनेक झाडांवर मौजेने बसलेले आढळले.
काही लाल होते, काही काळे होते, काही गोरे होते, काही निमगोरे. उंची, चेहेरेपट्टी, हावभाव यांतही विविधता असलेले.
स्त्री वानरांची संख्याही लक्षणीय होती.
आनंदाचे भरते आले त्याला ते दृष्य पाहून.
भरताने आपल्या गुफ्फेदार फरसारख्या शेपटीचा गोंडा कुरवाळला. तो उत्साहाने सरसरला. त्यांच्यात जाऊन बसला. हसला.
इकडे देशातल्या परंपरेप्रमाणे तो दूरचा चुलतभाऊ भरताच्या गादीवर सर्वार्थाने जवळ जवळ बसलाच.
आजची सगळ्यात ठळक बातमी अशी आहे की तो नवा समूहप्रमुख देशातल्या एका नावाजलेल्या अध्यात्मिक गुरूकडे ध्यानधारणा, जप इत्यादींचे धडे घेत आहे..
समाप्त. (खरं तर मागील पानावरून पुढे चालूच.)
No comments:
Post a Comment