पत्रकार इटक्याल आण्णासाहेबांच्या घरी आला. आपल्या न्यूज एजन्सीनं दिलेलं पत्रं त्यानं आण्णासाहेबांना सादर केलं आणि काहीही न बोलता त्यानं खिशातलं अत्त्याधुनिक भ्रमणध्वनिवजा यंत्र बाहेर काढलं, त्यातल्या ध्वनिमुद्रण विभागाची कळ दाबली आणि म्हणाला, “बोला!”
आण्णासाहेब त्याच्याकडे पहात राहिले. हातातल्या पत्राची घडी टेबलावर ठेवून त्यानी शेजारच्या शिसवी खुर्चीकडे हात केला, म्हणाले, “आधी बसून घ्या!” इटक्याल तसाच घुम्यासारखा बसला. आण्णासाहेबांनी आतल्या खोलीच्या दारात उभ्या असलेल्या राधाबाईंकडे पाहिलं. त्या आत गेल्या. आण्णांनी तशीच दुसरी खुर्ची ओढून घेतली, आवाज न करता आणि तिच्यावर बसले. दोघांच्या मधे टेबलावर इटक्यालनं नुकताच ठेवलेलं त्या अत्त्याधुनिक ध्वनिमुद्रणयंत्राकडे निर्देश करत ते म्हणाले, “सध्या बंद करा हे!” इटक्यालनं तोंडानं मच् असा आवाज करत ते यंत्र स्वत:जवळ ओढलं आणि ओढत असतानाच सफाईने ते बंद केलं. मग त्यानं आण्णांकडे पाहिलं. आण्णा त्याच्याकडे रोखून बघतच होते.
“माफ करा पण आज तुम्ही मनापासून नाही आलाहात माझी मुलाखत घ्यायला!”
“तसं नाही सर..” असं म्हणत इटक्यालनं एक नि:श्वास टाकला.
“तुमचं नाव इटक्याल. बरोबर आहे नं माझं उच्चारण?”
“हो सर!”
“म्हणजे.. मधे टेलिफोनबूथ वाटण्यासंदर्भातला घोटाळा बाहेर काढलात तो तुम्ही!”
इटक्यालनं नुसतीच मान डोलावली. आण्णांनी त्याच्याकडे बघितल्यावर त्याला औपचारिक प्रेसछाप हसावं लागलंच.
“मग बरोबर आहे! माझ्यासारख्या यकश्चित स्वातंत्र्यसैनिकाची मुलाखत घेण्यात तुम्हाला काय इंटरेस्ट असणार?”
“नाही! तसं ना-“
“नाही कसं? एक ढोबळ मुलाखत. उच्छृंखल रंगीत पुरवणी सजवण्यासाठीची. पार्श्वभागी तिरंगा. ऑफसेट सफाई. दरवर्षी एक नवीन स्वातंत्र्यसैनिक. घ्या! कॉफी घ्या!”
“पेपरचं काम म्हणजे..” पुन्हा प्रेसछाप हसत इटक्यालनं राधाबाईंनी नुकत्याच आणलेल्या ट्रेमधून कॉफीचा कप घेतला. आण्णांना एक कप देऊन राधाबाई दिवाणावर बसल्या. सगळ्यात आधी आण्णांनी कॉफीचा कप, ती जवळजवळ एका घोटात पिऊन खाली ठेवला आणि राधाबाई नेहेमीसारख्या हसल्या. खाकरत आण्णासाहेब म्हणाले,
“इटक्याल.. तुम्ही डिसइंटरेस्टेड आहात.. याचं आणखी एक कारण सांगू?”
इटक्यालला ’हो’ म्हणणं भाग पडलं. त्याला हे काम झटपट उरकायचं होतं पण म्हातारा खट वाटत होता. इतर फ्रीडम फायटर्ससारखा गलितगात्र नव्हता. उतावीळ नव्हता स्वत:बद्दल बोलायला. आण्णा त्याला निरखत होते… (पुढे चालू)
No comments:
Post a Comment