romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Monday, June 13, 2011

धबधबे! सिरसीतले!

धबधबे अर्थात वॉटर फॉल्स ही निसर्गातली अशी आश्चर्यजनक गोष्टं आहे की जिच्या मोहात कोण पडत नसेल तरच नवल! मुळात पाण्यात खेळणं हीच माणसाच्या दृष्टीनं आनंदाची गोष्टं.आज तो वॉटर पार्कस् निर्माण करून त्यात जाऊन बारा महिने त्याचा आस्वाद घेतोय.पाणी ह्या वस्तूचं स्वरूप दिवसेंदिवस कसं होत जाणार आहे ह्याचा विचार या आनंदाच्या वेळेला नको करूया! सध्या अनेक ग्रुप्स् पावसाळा सहलीसाठी नेहेमीच्या किंवा नव्या, फारशी ये-जा नसलेल्या धबधब्यांच्या शोधात निघाले आहेत, त्या सगळ्यांना मन:पूर्वक शुभेच्छा!P180511_17.43
मे महिन्याच्या मधल्या आठवड्यात सिरसी या उत्तर कर्नाटकातल्या गावाला आणि आजूबाजूच्या परिसराला भेट दिली, अनुभव ट्रॅवल्सच्या कूलर समर दौरय़ात.दोन केवळ वाहणारय़ा पाण्याची ठिकाणं आणि दोन धबधबे बघितले, अनुभवले!
अनेक धबधब्यांच्या या परिसरात जोग फॉल, अनचेली फॉल आणि सातोडी फॉल हे तीन धबधबे बघायची योजना होती.यापैकी जोग फॉलला पाणी नाही म्हणून तिकडे जाणं रद्द झालं.P180511_11.10 अनचेली फॉल हा नुसता बघण्याचा धबधबा आहे.टेंपो ट्रॅवलर्स थेट अनचेली फॉलपर्यंत जातात पण तरीही पुढे जंगलातली वाट चालत मार्गक्रमण करावं लागतंच.मोठ्या बसेस टेंपो ट्रॅवलर्स पोचतात तिथपर्यंतही पोचत नाहीत.पुढचा मातीचा रस्ता चालून जातच अनचेली फॉल गाठावा लागतो.जंगलाने वेढलेला हा रस्ता.परिसरातल्या या आणि इतर कुठल्याही निसर्गरम्य ठिकाणी जाताना जंगलातून वाट काढणं अपरिहार्य आणि तितकंच आनंददायी आहे.ह्या वाटा आणि ही जंगलं इतकी व्यवस्थित कशी काय राखली गेली आहेत याचं राहून राहून आश्चर्य वाटतं.ती निसर्गानं स्वत:च राखली आहेत!
अनचेली फॉलकडे जाणारा रस्ता हा चांगलाच उताराचा आहे.अर्धा रस्ता आपण चालून जातो आणि उरलेला अर्धा रस्ता आपल्याला अक्षरश: दरीकडे नेतो.या ठिकाणी व्यवस्थित पायरय़ा आणि दोन्ही बाजूला लोखंडाचं दणकट रेलिंग आहे.P180511_11.25हे रेलिंग संपल्यावर समोर हीऽऽ मोठी दरी आणि समोर दिसणारय़ा अनचेली धबधब्याच्या सतत वहाणारय़ा दोन-तीन शाखा.मे महिन्याच्या मध्यावरही संततधार असलेल्या.हे दृष्यं मनोरम आहेच पण त्यापेक्षाही हुरहूर लावणारं आहे कारण त्या धबधब्यापर्यंत आपण पोचू शकत नाही!
ही हुरहूर प्रमाणाबाहेर भरून काढतो तो सातोडी फॉल!खरंतर हा फॉल अनुभव ट्रॅवल्सच्या शेड्यूलमधे नव्हता.सातोडी फॉलची छायाचित्रं खूप लांबून घेतली आहेत.या फॉलमधून सातोडी नदी उगम पावते आणि या नदीत मे महिन्याच्या मध्यावर इतकं पाणी बघून चकीत व्हायला होतं.विशेषत: पाण्याची कमतरता असलेल्या प्रदेशातून येणारय़ा लोकांना! एक मस्त आखीवरेखीव पायवाट, निसर्गानंच निर्माण केलेली, मस्त जंगलातून जाणारी, दोन्ही बाजूला वाहणारे ओहोळ असलेली पार केल्यावर एक चबुतरा बांधलेला आहे, सामान, कपडे आणि ज्येष्ठं नागरिकांना विश्रांती घेण्यासाठी.सातोडी फॉलचं लांबून दर्शन घेताना कधी एकदा तिथे पोचतोय असं होतं! कारण धबधब्याखाली आबालवृद्धांचा आनंदोत्सव साजरा होत असतो.आपण अतिउत्साहानं दरीत उतरतो.भले मोठे पाषाण आणि दोन पाषाणांमधे तेवढ्याच मोठ्या खाचा असलेला हा रस्ता पार करताना नाकेनऊ येतात.पाषाणांवरून पाय घसरत असतात, वर ऊन तळपत असतं, खाचेमधे घाण पाणी साचलेलं असतं. कधीकधी दोन शिळा पार करताना मधे आडवा ओंडका टाकलेला असतो.त्यावरून हे अंतर पार करणं हे शहरातल्या फूटपाथ संस्कृतीतल्या नागरिकांना, विशेषत: ’विशाल’ महिलांना चांगलंच जड जातं.
P190511_14.25
खाली बघत हे सगळं पार करत आपण एकदम धबधब्यासमोर येतो आणि पंचमहाभूताचं हे चार पुरूष उंच कातळावरून धबाधबा कोसळणारं रूप बघून दिग्मूढ होऊन उभेच रहातो! यात पुढे जावं की इथेच दर्शन घेत रहावं हा भीतीचा भाग असतोच.कुटुंबातल्या लहानथोरांचं एकमत होतं आणि मग भल्यामोठ्या दगडांमधून आधी घोट्यापर्यंत, मग कमरेपर्यंत, मग छातीपर्यंत पोचणारय़ा पाण्यात आपण उतरू लागतो.दोन भल्या मोठ्या पाषाणांमधून वाट काढू लागतो.ते पंचमहाभूत आपल्याला ओढून घेतंय की काय असं वाटत असतं.आपोआप एकमेकांचे हात धरून साखळी केलई जाते.आपली शहरी अदब अजूनपर्यंत राखून ठेवलेले, रिझर्व्ड अर्थात स्पष्टं शब्दात सांगायचं तर माणूसघाणे शहरी आता पूर्णपणे एकमेकांच्या परिचयाचे होतात.निसर्गं काय काय घडवून आणतो?P190511_15.15
आजूबाजूच्या पाण्यात इंद्रधनुष्यं बघून लहानांइतकेच थोरही लहान होतात.त्या चार पुरूष उंच कातळाला टेकतात.वरून पाठ सडकवून काढणारं पाणी बदाबदा अभिषेक करत असतं.आधी डोकं आणि मग पाठ, मग सगळं शरीर आणि अर्थात त्याआतलं मन हा अवर्णनीय सोहळा साजरा करत रहातं.लहान मूल घाबरून बाहेर निघाली तरी मोठी मंडळी लहानाहून लहान होतात.आणखी कोपरे, दगडातल्या बसायच्या जागा शोधू लागतात.त्याना तासभर झाला तरी या सगळ्यातून बाहेर यायचंच नसतं.कुणाला छायाचित्रं घ्यायची असोशी उरलेली नसते.कुणाला परतण्याची घाई नसते.शहरातल्या चिंता कुठल्यातरी खुंटीला टांगून सगळे जीव या स्वर्गीय वर्तमानात पंचमहाभूताच्या सान्निध्यात रममाण होऊन गेलेले असतात!
मग कधीतरी भूकेची जाणीव होते.वर चबुतरय़ाकडे जाऊन कोरडं व्हायचं असतं.कुलकर्णी बाईंनी केलेल्या मिष्ठानंयुक्त भोजनाचा आस्वाद घ्यायचा असतो.अनुभव ट्रॅवल्सने हे पर्यटकांच्या सुग्रास जेवणाचं व्रत इथेही सांभाळलेलं असतं!
P190511_15.15_[01]
Post a Comment