Friday, January 14, 2011
प्रेम: एक हुरहूर
माणूस आणि प्रेम यांचं नातं अतूट आहे.माणूस आपली परिस्थिती, भोवताल, आलेली वेळ, काळ, वाढणारं वय या सगळ्या आणि इतर कितीतरी परिमाणांमधून प्रेमाच्या अनेक छटा अनुभवतो.अनेक वेळा प्रेम होतंय हे समजेपर्यंत प्रेमाची जादू संपून गेलेली असते.माणसाला प्रेम करून घ्यायला खूप आवडतं.ते दिल्यानं वाढतं हे त्याच्या लक्षात येत नाही.निर्मळ प्रेमाचा ओघवता स्त्रोत असणारे म्हणूनच या जगात महान ठरतात.
प्रेमाबद्दल सतत इतकं सांगून झाल्यावरही अजून काही सांगायचं उरतंच.प्रेम नक्की काय आहे? माणूस अजून शोध घेतोच आहे.एवढा प्रगत झालेला असूनही प्रेम या शब्दाची व्याख्या करणं त्याच्या आटोक्याबाहेरचं राहिलं आहे.
सर्वसाधारणपणे ’प्रेम’ म्हटल्यावर स्त्री-पुरूषांमधले नाजूक भावबंध हेच त्याचं रूप डोळ्यांसमोर येतं.अनेक हिंदी सिनेमांनी, कथा-कादंबर्यांनी कवितांनी प्रेमाला सतत खतपाणी घातलेलं आहे.खरंच! प्रेमाचा हा एवढा भाग जरी विचारात घेतला तरी त्याचा पसारा बघून चकीत व्हायला होतं.स्त्री-पुरूषांमधलं प्रेम हे बाप-लेक, आई-मुलगा, आजी-नातू अश्या नात्यांमधलंही असतं पण आपल्याला प्रेम म्हटल्यावर सहजपणे दिसतं ते स्त्री-पुरूषामधलं आकर्षण.नैसर्गिकरित्या हे आकर्षण निर्माण होतं, वाढतं, खुंटतंसुद्धा.हे प्रेम म्हणजे केवळ लैंगिक आकर्षण असतं असं नाही.
पुरूषात जे आहे ते स्त्रीत नाही आणि स्त्रीत जे आहे ते पुरूषात नाही.नैसर्गिकरित्याच पूर्णपणे परस्परावलंबी असे हे जीव आहेत.त्यामुळे ’प्रेमबिम सब झूठ आहे’, ’आपल्याला प्रेम वगैरे काही ठाऊक नाही’ असं म्हणणारे लोकांपेक्षा स्वत:लाच फसवत आलेले आहेत.प्रेमात नैराश्य आल्यानंतर काही काळ असं वाटणं स्वाभाविक आहे.दुर्दैवाने ज्यांच्या वाट्याला मात्र सतत प्रेमातल्या दु:खाचीच बाजू आली आलीय किंवा हेकेखोरपणे, आपल्या स्वभावाला मुरड न घालता आल्यामुळे जे सतत या दैवी देणगीपासून लांबच राहिलेत त्यांच्याएवढं दु:खी या जगात कोणीच नसेल.
पैसा, मानमरातब, दर्जा असं काहीही नसलं तरी एक वेळ चालेल, पण प्रेम नाही, ते देण्या-घेण्याची पात्रता नाही म्हणजे माणसाकडे काहीच नाही.
माणूस वयात येतो आणि त्याला प्रेमाची हुरहूर लागते.मुली मुलांकडे बघितल्यावर उगीच कॉन्शस होतात.मुलं आजुबाजूला एखादी जरी मुलगी असेल तर उगाच आपण स्मार्ट असल्याचं दाखवतात.आजकाल मुलं-मुली अधिक मोकळेपणानं मिसळतात.तो मोकळेपणा निखळ मैत्रीचाही असतो.मोकळेपणाने दुसरंच टोक गाठलंय की काय असंही काही वेळा जाणवतं.
पूर्वी एकमेकांना अहो-जाहो करणं, वर्गात मुलामुलींना वेगवेगळं बसवणं किंवा सरळ सरळ मुला-मुलींच्या वेगवेगळ्या शाळा काढल्या गेल्या.एकत्र शिक्षणपद्धतीत वर्गात गप्पा वाढतात म्हणून एक मुलगा, एक मुलगी एका बाकावर बसवण्याची शिक्षा (?) दिली जायची.मग एकाचवेळी नकोनकोसं आणि हवंहवसं वातावरण तयार व्हायचं.आज मोकळेपणानं एखादी मुलगी एका मुलाला तू मला आवडतोस असं म्हणू शकते.तो आवडतो म्हणजे लगेच झालं असंही नसतं.आज मैत्रीचा धागा दिसतो तो पूर्वी लुप्त होता.मैत्री आहे असं सांगणंसुद्धा ईऽऽऽ असा प्रकार होता.विरूद्ध लिंगाच्या व्यक्तीशी मैत्री करावीशी वाटणे ही हुरहूरीची सुरवात.मजा म्हणजे पूर्वीपासून आजतागायत सगळेच जण या स्थितीतून गेलेले असतात आणि तरीही बारा-तेरा वर्षाच्या मुला-मुलीसंदर्भात निखळ असं जरी काही दिसलं तरी प्रत्येक माणसातले आई-बाप लगेच जागे होतात.काय ही पोरं! काय यांचं वय! अभ्यास करायच्या वयात हे काय?... पण हे वयच तसं असतं.प्रेमानं आपली जादू दाखवायला सुरवात केलेली असते.हे प्रेम अर्थात असं लगेच जुळतं असंही नाही.कुठेही गेल्यावर, कुणीही आवडल्यावर हुरहुरणं, तिचं किंवा त्याचं आपल्याकडे लक्ष आहे का नाही ते बघणं, असेल तर ते आणखी वेधून घेणं, हसणं, बोलणं, चेष्टामस्करी करणं इथपर्यंत या वयात प्रेमाची मजल असते.शाळा-कॉलेजातला ’अभ्यास’ नावाच महाप्रचंड राक्षस हे वय, ही हुरहूर गिळण्याच्या पवित्र्यात नेहेमीच असतो.या राक्षसाला वळसा घालून किंवा त्याला खाकोटीला मारून पुढे जाणारेही असतात.पण प्रेम लगेच सापडत नाही.काही काळ हुरहूरीचा जो सिलसिला चालू रहातो त्याला ’क्रॉसवायर्स’ असं म्हटलं जातं.आपल्याला जो किंवा जी आवडत असते, ती-तो आपल्याकडे ढुंकूनही बघत नसतात.ज्यांना-जिला आपण आवडत असतो त्यांचा पिच्छा सोडवणं यात आपल्याला नाकेनऊ येत असतात.
या वयातल्या प्रेमाची व्याप्ती दिसणं, हुशार असणं किंवा स्मार्ट दिसणं, बोलणं, मनापासून मदत करणं आणि ग्रुपमधल्यांनी चिडवणं किंवा डिवचणं यापुरती असते.मग डेट्स, भ्रमणध्वनि किंवा शक्य असेल तर चॅटवर तासनतास घालवणं.रूसवे फुगवे, आणा-भाका घेणं, पुढच्या आयुष्याचे बेत (!) ठरवणं इथपर्यंत सगळं ठीक असतं.हा एक प्रकारचा भातुकलीचा खेळ असतो.तो अतिशय सच्चा असतो.पण आयुष्यात त्याहीपेक्षा वेगळं काहीतरी आहे याचं भान तेव्हा नसतं.स्वभावानुसार जवळ आलेले हे प्रेमी अतिजवळकीने परस्परांमधले दोष कळून वेगळेही होतात.पण नैराश्य रहातं आणि या वयातलं हे नैराश्य आयुष्यावर फार मोठा आघात करू शकतं.दोन जीवांनी या वयात प्रेमात पडून हा असा प्रवास पूर्ण केल्यावर माणसामाणसांत जागे झालेले आई-बाप खरे असतात असं अशावेळी वाटायला लागतं.हे आई-बाप आणखी प्रकर्षाने खरे वाटतात, जेव्हा ही कोवळ्या वयातली मुलं लैंगिक आकर्षणाला बळी पडतात.आता प्रेमाच्या वादळाला सुरवात झालेली असते!...
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment