इकडे भाई हरवल्ये आणि तिकडे बंड्याभोवतालच्या त्या गर्दीखालून कबनुरकर, सावंत आणि काळे बाहेर पडल्या.इतक्यात बाहेर पडले नसते तर गर्दीत कमीतकमी विनयभंग तरी झाला असता असे भाव कबनुरकरच्या चेहेर्यावर होते आणि झाला असता तर फक्तं आपलाच झाला असता अशी खुषीही त्यापाठोपाठ उमटली.चेहेर्यावरच्या वांगाच्या टिकल्यांमधून ती खुषी चेहेर्यावर सर्वत्र उतरली.मग जिवणी उघडली जाऊन समोरचे पिवळे पटाशीचे दातही आत मावेनासे झाले.कबनुरकर हसू लागली होती.
सावंत बाहेर आली ती ब्लाऊजवरची साडीची बॉर्डरलाईन चापूनचोपून बसवत, कुठे काही दिसत नाही ना याची चार चार वेळा खात्री करत.“मी गेली गंऽऽ”असं म्हणत ती चालू पडली.तरातरा चालत वर जाणार्या जिन्याजवळ गेलीसुद्धा.
काळे भांबावल्यासारखी.हातात पाण्याची रिकामी बाटली.रंगहीन पंजाबी ड्रेस घातलेली. “आईशप्पत!” असं म्हणून तिनं नेहेमीप्रमाणे तोंडावर हात ठेवला.एकदा गर्दीकडे, एकदा काऊंटरला टेकलेल्या परबकडे, एकदा कोपर्यातल्या पाठमोर्या तंद्रीतल्या भाईकडे बघत राहिली.’ऑन द स्पॉट’ टॉयलेटकडे चालता झालेला.“एऽऽ ऑन द स्पॉटऽऽएऽऽ”त्याला हाका मारत काळे पुढे झाली पण ऑन द स्पॉटला अशी हाक मारलेली आवडत नसे.तो फेंगडे पाय टाकत चटकन् ’जेन्ट्स’ मधे दिसेनासा झाला.तितक्यात कबुनरकरने काळेच्या दंडाला चिमटा काढला.काळे लहान मुलाच्या पार्श्वभागावर चिमटा काढल्यावर ते जसे ओरडेल तशी चित्कारली.म्हणजे नेहेमीसारखंच.“एऽआईक् नं! तर ’हा’ काल जाता जाता म्हणाला होता, लवकर येईन.पण साफ विसरलाच गं! बघ नं! –आणि बबड्याचे पेन्सिल कलर्स, कुकरचं गास्केट, मेथीची जुडी काही काही आणलंन् नाई गं! केवढी पंचाईत माझी माहितीए! -आणि आईंचं आमच्या तुला माहितीए ना, नुसत्या बसून राहिल्या मी येईपर्यंत- आणि बबड्या झोपेपर्यंत तुला सांगूऽऽ -सारखा अशी झोप, अशी झोप! शेवटी मी सांगितलं त्याला! तू काय करायचं ते कर! मी अशीच झोपणार!”कबनुरकरचा ’माझी माणसं, माझं घर’ चा पहिला एपिसोड सुरू झाला.काळेच्या दंडाला हिसके, चिमटे आणि थापट्या बसतच राहिल्या.त्या दोघी ’लेडिज’ कडे सरकल्या तसा कबनुरकरचा आवाज अधिक अधिक खाजगीत जाऊ लागला.
टॉयलेटला जाणार्या त्या वाटेवरच वीरकरांचं टेबल होतं.त्यांच्याभोवती शिपाईबंधू जमलेले.स्लीप्स, चेक्स यांचं बंडल बांधत वीरकर सहकार्यांचे मनोरंजन करत.आताही वीरकरांनी ’तू काय करायचं ते कर! मी अशीच झोपणार!’ एवढंच कबनुरकरच्या तोंडचं वाक्यं ऐकलं आणि मंडळात खसखस पिकायला वेळ लागला नाही.
अशावेळी निशिगंध गोरंबे काय करत होता?... निशिगंध गोरंबे!... रहस्यकथेच्या नायकाला शोभेल असं ते नाव.निशी म्हणून त्याला जग ओळखत होतं.चाळीस एक वर्षाचा, बुटका, जाडा.बरेचसे केस पिकलेले.केसांना तेल आहे, नाही.ते विंचरलेले काय धुतलेही आहेत, नाहीत असे.डोळ्यांवर जाड काचांचा, जाड फ्रेमचा चष्मा.
सगळे बंड्याजवळ आणि हा हंड्याजवळ.हंड्याजवळ म्हणजे बंड्यापासून दूर कुठेतरी.कुठेही पण बंड्यापासून जास्तीत जास्त दूर.कालच बंड्याने सणसणीत दम भरला होता.उशीरा येण्याबद्दल.वर छातीवर सणसणीत चिमटा काढून बंड्या खदखदून हसला होता.निशी हो, हो, नाही, नाही म्हणत आधीच घाबरलेला.त्यात बंड्याचा हात आता आपल्या पॅंटीच्या दिशेने येतोय हे कधी नव्हे ते आधीच कळल्यामुळे निशीने धूम ठोकली.बंड्या, त्याच्याजवळ उभे वीरकर, सकाळपासून रात्रीपर्यंत तिथेच असणारा ग्राहक म्हातारा ’मालिक’ आणि तीन चार टगे जोरजोरात हसले होते.
मग आज निशी लवकर आला.सगळ्यांच्या भाषेत भल्या पहाटे.म्हणजे सव्वादहा वाजता.मार्गशीर्षं सुरू झालेला.घरात भयानक गडबड.वडलांना कालच हॉस्पिटलमधून डिसचार्ज दिलेला.आईची कंबर धरलेली.सत्तर-ऐंशी वय म्हणजे हे कॉमनच.घरात परंपरा.श्रावण होताच.आता मार्गशीर्षं.कधी नाही ते सकाळी लवकर, म्हणजे सहा वाजता उठून निशीने बेत रांधला.वरण, भात, कोशींबीर, भेंड्याची भाजी, पोळ्या.तूप, लिंबू आहेत की नाही बघितलं.सोवळ्यानं.बंड्याचा दम आठवून आठवून कालपासून दमायला झालं होतं.निघाला.बंड्या रंगात आला की पॅंट पकडून पोटाला जोरदार चिमटा काढायचा.निशीला आज तो चुकवायचा होता...
No comments:
Post a Comment