येणार येणार म्हणून गाजत असलेलं सर्क्युलर अखेर आलं आणि खालच्या बंड्यानं जोरदार हाळी दिली, “येऽऽ आलं रं आलंऽऽ”
नुकतीच सही करणारी, सही करून पंख्याचा वारा शोधत घाम पुसणारी, सकाळच्या फ्रेश गप्पा मारत अक्वागार्डभोवती जमलेली-पाणी भरून घेणारी; अशी सगळी कर्मचारी मंडळी खालच्या बंड्याच्या भोवती जमली.
खालचा बंड्या अडमिनिस्ट्रेशन बघायचा.गावरान.धूर्त.कळकटपणाचं सोंग घेतलेला.तो वरच्या मजल्यावरच्या लोन्स आणि अडव्हान्सेसवाल्या मॅनेजरला ’वरचा बंड्या’ म्हणायचा.केबिनवाल्याला ’आतला बंड्या’.सगळी पोरं ’ह्या’ ला ’खालचा बंड्या’ म्हणायची.
क्लिअरिंगवाला टपाल घेऊन आला.खालच्या बंड्यानं ते उघडलं.खालच्या बंड्याच्या मानेत स्प्रिंग बसवलेली असावी.सतत सगळ्याच गोष्टींवर नजर ठेवताना त्याची मान बगळ्यासारखी हाले.आता टपाल चाळतानाही तसंच.खालच्या बंड्याभोवती गर्दी वाढायला लागली.सगळ्यात पुढे, खालच्या बंड्याला खेटून टेन्शनमूर्ती टोकेकर.कानाला लावलेलं मशिन त्यानी लगेच पाळीला चिमटा घेऊन ऑन केलं.सवईनं टकलावरून हात फिरवत फिरवत ते इतके वाकून बघायला लागले की त्यांच्या खांद्यावर हात ठेऊन उभा असलेला मनू मुत्तमवार वैतागला,“ओऽ सिनियर सीटीझन! आडवे काय पडताय बंड्यावर? पाताळात जायचा तो!”
“पाताळात की पातळात?”गर्दीतल्या कुणीतरी डाव साधून घेतला पण टोकेकरांच्या कानात ते काही शिरलं नसावं.नंतरचा जोरदार हशा त्यांच्या कानात शिरला आणि ते गर्दीतल्या एक एक माणसाकडे बघत राहिले.
असले विनोद नेहमी उत्तम शिंदे करायचा आणि त्यावर नेहेमी स्वत:च जास्त हसायचा.त्याचं हसणं सगळ्यात शेवटी संपायचं.टोकेकरांचा नेहेमीच गोंधळ होतो म्हणून तो मुद्दाम हसणं वाढवत न्यायचा.टोकेकर पूर्ण कॉन्शस होईपर्यंत तो थांबायचा नाही.
परब नेहेमी गर्दीपासून लांब.काऊंटरला टेकून.हाताची घडी घालून.लोक त्याला इन्स्पेक्टर परब म्हणायचे.परबला सगळ्यांची गंमत बघण्यात रस.कोण काय करतो, तो ते का करतो, नक्की कशासाठी; असा त्याचा ट्रॅक.आपल्याशी बोलणारा काहीतरी लपवून ठेऊनच सांगतोय हे त्याच्या मनात पक्कं.आत्ताही हा खालचा बंड्या उल्लू बनवतोय.असलं सर्क्युलर काय येतंय काय? सगळे बिनडोक उगाच गर्दी करून उभे राहिलेत- अशा अर्थाची उपरोधिक कम तुच्छतेची नजर त्या सगळ्यांकडे टाकून छद्मी हसत तो पंख्याखाली सरकला.
“क्यों परब! मोहल्लेमें गर्दी, चार आनेका भाव?”’ऑन द स्पॉट’ने आल्या आल्या परबच्या पाठीवर थाप मारली आणि स्वत:च ख्याऽ ख्याऽ करून हसला.हा अमराठी.पूर्वीच्या हिंदी सिनेमातल्या खलनायकांसारखी पालुपदं वापरायचा.“ऑन द स्पॉट-गोल्डस्पॉट!”हे नेहेमी.सगळे त्यालाच ’ऑन द स्पॉट’ म्हणायचे.
त्याच्या पाठोपाठ दिलीप आला.कॅमेर्याची बॅग सांभाळत.उन्हात काळा होणारा चष्मा गळ्यात लटकवत.त्याचा चेहेरा सदैव फोटो काढण्यासारखा.आपल्याला सगळं कळतं असं समजणारा दिलीप ती गर्दी पाहून भांबावला.चक्कर आलेल्या बंड्याला बहुतेक जागं करताएत म्हणजे बंड्याचे फोटो घेता येतील, या चाणाक्ष व्यवहारी विचाराने त्याचे डोळे चमकले.पण आता बहिर्दिशेला जाण्यात शहाणपणा होता नायतर पंचाईत झाली असती.बॅग ठेऊन स्वत:च्या शहाणपणाच्या ऐटीत दिलीप टॉयलेटकडे वळला.
मग आले भाई.बाजूच्याच बिल्डिंगमधे रहाणारे म्हणून सगळ्यात शेवटी येणारे.“भाई”ही त्याना मिळालेली उपाधी.त्यांच्या कर्तृत्वाची पावती.मध्यमवर्गीयांचा भाई म्हणजे अगदी गेम वगैरे वाजवला नव्हता कुणाचा पण चांगलीच जरब.सध्या सिंह थंड झालेला.पिकनिक्स अरेंज करायला लागलेला.ध्यानी पिकनिक, मनी पिकनिक.अवघे विश्वचि पिकनिक. ’च्यूत्यासारखे काहीतरी इश्यूज् हवेच असतात’ अशा अर्थाची थंड कुत्सित नजर बंड्याभोवतालच्या गर्दीकडे टाकून, एका कोपर्याथत हाताची घडी घालून भाईंनी ध्यान लावलं.या शनिवारची पिकनिक.पटवापटवी सुरू करायला पाहिजे.कस्टमर्सकडून पिकनिकसाठी डोनेशन्स, ’स्टफ’ची सोय, खाणं, चखणा... भाई हरवल्ये...
No comments:
Post a Comment