निशी नेहेमीसारखा मागे मागे पहात लोंढ्याबरोबर स्टेशनवर उतरला.गर्दीत कोण पुरुष किती देखणा आहे हे बघत.निशीच्या मागचा पायावर पाय पडल्याने सणकला.लोकलमधे चढण्या, प्रवास करण्या आणि उतरण्याच्या व्यायामाने तो आधीच हिंस्र झालेला.त्याने निशीच्या टपली मारली.“×××× युपीसे आते है साले मरनेको...”
निशी, आता बायका दोन्ही हाताने साडी उचलून चालतात, चालताना कंबर हलवतात, तसा दोन्ही हाताने पॅंट वर धरून जिना चढू लागला.सगळीकडे भिरीभिरी बघत.काही ऑफिसमधले, काही ओळखीचे झालेले खूष झाले ते बघून.सक्काळ सक्काळ साऽऽला मस्तऽ टाईमपास... त्याच्यावर ज्योक करत ग्रुप पुढे निघाला.निशी मुद्दाम मागे राहिला.सगळ्यांची आपुलकीने विचारपूस करत.ब्रिजच्या विरूद्धं टोकाला तो फुटपाथवर कधी उतरला ते ग्रुपला नाक्यावर पोचल्यावरही समजलं नाही.
निशी पुन्हा भिरीभिरी लगालगा चालत खाऊच्या गाड्या शोधत या वेगळ्या रस्त्याने निघाला.पाच रूपयाला चार इडल्या मिळणार्या गाडीसमोर उभं राहून त्याने पंधरा रूपये खर्चं केले.दोनदा चटणी ओतून घेतली.ओठावर साचलेले इडलीचे कण चेहेराभर रूमालाच्या बोळ्याने पसरवत हाऽऽशऽऽहाऽऽशऽहूऽऽ करत पुढे निघाला.पुन्हा भिरीभिरी टुकूटुकू बघत...
नेहेमीच्या मुतारीत शिरल्याशिवाय नेहेमीसारखंच गत्यंतर नव्हतं.शिरतो तर बाजूलाच नेहेमीप्रमाणे उभा ग्राहक म्हातारा, काळा, जाडा, सफेद कपड्यातला मालिक.पॅंटच्या चेनवरून हात फिरवत.निशीकडे मिष्कील नजरेने बघत.गालात जीभ फिरवत.विचित्रं स्मित करत.रोखून बघत.निशीनं हडबडून नजर काढून घेतली.मालिक आवाज करून हसला.तोपर्यंत दोघांच्या पुढ्यातले दोघेही रिकामे झालेले.एकदमच.मागचे हे दोघेही मुतारीत वर चढले.निशी नेहेमीप्रमाणे पॅंटच्या चेनशी झटत.मालिक गालात जीभ घोळवत निशीकडे टक लाऊन.
निशीला संपूर्ण रिलॅक्स व्हायला दोन मिन्टं लागली.त्यानंतरच त्याचं इकडे तिकडे लक्षं गेलं.बाजूलाच मालिक.तो अजून बघतोय.नजर आणखी विचित्रं.निशीला नेहेमीसारखंच पुन्हा एकदा तीव्रतेनं जाणवलं, हा... मालिक, मुतारीत येऊन सगळं जग जे करतं ते न करता भलतंच काहीतरी करत उभा असतो.नक्की!...
सामान आत ढकलून घाईघाईत चेन लावताना निशीची चेन नेहेमीसारखी उघडी रहायला लागली.पॅंट जुनी झालीय... घड्याळाकडे लक्षं गेलं आणि तो अक्षरश: पळत सुटला...
पळताना अचानक त्याच्या लक्षात आलं, अरे… आपण आज हा ट्रान्सपरंट शर्टं घातलाय! आतल्या बनियनची लाईन आणि त्यात कसतरी कोंबलेलं अंगही दिसणारा.तो पटकन् शेजारच्या खुराडेवजा बहुमजली चाळीत शिरला.जिन्याजवळच्या आडोश्यात उभं राहून त्याने खसाखसा अंगातला शर्ट काढला.खांद्यावरच्या बॅगेत बोळा करून कोंबला.बॅगेतला घडीत चुरगळलेला रंगीबेरंगी शर्ट काढून त्याच्याशी झटायला त्याने सुरूवात केली.“सालाऽ हातगाडीवाला दिखताय् ऽसालेऽ कैसे ऐशमें रहते आजकल!” जिन्यावरून उतरणारा माणूस असं म्हणाला आणि कशीबशी शर्टची बटणं लावत, पॅंटची चेन पुन्हापुन्हा वरखाली करून बघत निशीने तिथूनही धूम ठोकली.
ढुंगणाला पाय लाऊन धावत धावत घामाघूम होत तो कचेरीत पोचला तेव्हा सव्वादहा वाजत आले होते.इतक्या लवकर- पहाटे- पोचूनही तो सही करायला मस्टरजवळ गेला नाही.मस्टरमागे खालचा बंड्या.त्यात यावेळी ऑफिसात दोनचार जणांशिवाय कोणीच नाही, म्हणजे बंड्या चेकाळणार.
भलत्याच रस्त्याने, दोन काऊंटर्सच्या सांध्यामधून वाट काढत बंड्याला दिसणार नाही अशा बेताने तो खुर्चीजवळ आला.मान पूर्णपणे खाली घालून.लगबगीने खुर्चीवर बसला.डोळ्यावरच्या सोडावॉटर काढून शर्टच्या वरच्या खिशात कोंबलेला रूमालाचा बोळा काढून आपला चेहेरा खसाखसा पुसायला घेतला.सोडावॉटर पुन्हा डोळ्यावर चढवताना त्याला समोर पिलरवरच्या काळ्या चकचकीत काचेत स्वत:चा चेहेरा, केस, खांदे, रंगीबेरंगी शर्ट, त्याच्या कोपरापर्यंत येऊन लोळणार्या बाह्या दिसल्या.रिनोवेशन करून सगळीकडे अशा चकचकीत काळ्या काचा बसवल्यापासून निशी सतत हैराण होत होता.सतत आपलं प्रतिबिंब बघून बघून.शॅ: असं करून तो समोरचं प्रतिबिंब चुकवायला जाई.दिशा बदले.तर, तो बघे त्या त्या दिशेला काळी चकचकीत काच आणि तेच ते प्रतिबिंब...
फायनल शॅ:ऽऽ करून तो उठला.उठावंच लागलं.तेही बंड्याला दिसणार नाही अशा बेताने.
बंड्या पॅंट खाजवत टॉयलेटकडे निघालाय.हे दिसल्यावर तो चटकन् जाऊन मस्टरवर पटकन् सही करून आला.कोपर्यातल्या वीरकरांनी निशीऽऽ... अशी मारलेली आरोळी चुकवत तो कपाटामागच्या टेबलाजवळ आला.टेबलावर चेक्सचा भला मोठा ढीग.सवयीने तो चटकन् पुढे झाला.लक्षात येताच तेवढ्याच त्वरेने मागे झाला.कुणाच्या लक्षात आपली हालचाल आली असेल का? असं वाटून भांबावून त्याने आजुबाजूला बघितलं.दोनचार जणांशिवाय कोणी काळं कुत्रं अजूनही आलं नव्हतं.ग्राहकही चाणाक्षं झाले होते.कर्मचारी बंधुभगिनींची वेळ समजून घेऊन त्यानी आपली वेळ मागे लोटली होती...
No comments:
Post a Comment