निशीच्या खांद्यावर मजबूत हाताची पकड पडली.बंड्या त्याच्या खुर्चीच्या पाठीवर आपला दुसरा हात ठेऊन उभा होता.एकशे एकाव्यांदा दचकून निशीने समोरच्या काळ्या काचेत बघितलं.खालचा बंड्याऽऽ... म्हणजे आता कंबक्तीच...
“काय करतूस?”
“का-काय- काही नाही-काही नाही!”
“भडव्याऽऽ यून किती टाईम झाला.. ××× करत काय बसलाईस?”
“कु-कुठे-कुठे-काही नाही!”
“त्येच ×××लं म्हन्तो मी.. त्या समूर..पाववाल्या आन् त्या काळ्या काकडीच्या गप्पा ऐकतूस व्हय?”
“ना- नाही हं साहेब.. अजिबात नाही-नाही”
“मला सांगतुईस व्हय रं भाडखाऊ.. आज ××लेत व्हय मला?... चल!”
“कु-कुठे-कुठे? कुठे?”निशीला घाम फुटून श्वास लागला होता.
“आऽरं चाऽलऽ ऊठ!”
“ये-येतो साहेब- पण-कु-कु-”
“कोंबडं हैस व्हय रं! कुकुकु- चल च्यामायला कॅशमदी! मेनला.पेमेंटमदीऽऽ”
“मे-मेन कॅश!- स-स-साहेब-साहेब-
खालच्या बंड्यानं आपली पकड मजबूत ठेवली नसती तर निशी दाणकन् खाली जमिनीवरच आपटला असता.आता जागेवरून हलणं भागच होतं.निशीनं मनातल्या मनात सुपेचं स्मरण केलं.अडीअडचणीला निशी सुपेकडे जायचा.सुपे पत्रिका बघून, हात बघून शंकानिरसन करायचा.उपाय सुचवायचा.जप मनातल्या मनात चालू केल्यावर निशीला सुचलं.आपले प्रयत्नं सोडता कामा नयेत.उठता उठता थुंकी आवरत तो म्हणाला,
“सा-सा-साहेब-पण टोकेकर-”
“तो भडवा सायेब झालाय आज! ऑफिसरची एक्टिंग हे त्येला!”
“स- साहेब पण मिसाळ-”
“तुला भड्व्या कोन कोन सिनियर हाय त्ये बरूबर म्हाईत! मिसाळ ब्येनं बस्लंय तुज्या आदीच कांपुटरवर! तुज्या मायला तुजं ध्यान त्या पाववाल्याकडं आन् काळ्या काकडीकडं-”
“पण-साहेब-भा- भाई-”
“त्याच्या आयला लागला ×× त्याच्या- तू चलतुस का लाऊ तुला पन-”
“आ- आलो-साहेब- जरा- टॉयलेट-”
“जा मूत भडव्या आन म् येऽऽ”असं म्हणून खालचा बंड्या भर चौकात खदखदा हसावं तसा ग्राऊंडफ्लोअरवरच्या त्या हॉलच्या मधोमध उभा राहून हसला.कोपरय़ातून वीरकर आणि इतर शिपाई बंधूंचा प्रतिध्वनी मागोमाग आलाच.निशीऽऽ निशीऽऽ असं ओरडून कर्मचारीगणही त्यात सामील झाला.
टॉयलेटमधे शिरला तेव्हा निशीचे धाबे दणाणले होते.किंवा धाबे दणाणल्यामुळे त्याला टॉयलेटकडे यावं लागलं होतं.मोकळा होता होता तो झाल्याप्रकाराची संगती लावू लागला.
आज मार्गशीर्षातला गुरूवार.नेमका मार्गशीर्षातला पहिला दिवस.नेमका.कधी नव्हे तो.गेला आठवडाभर लोकांची गटारी.काल मोहरम की ईद की काय ती सुटी.परवा लाईट नव्हते म्हणून सगळे कामं टाकून गूल.नेमका डिसेंबरचा पहिला आठवडा.पहिला आठवडा म्हणजे कॅशमधे तोबा गर्दी.ही पर्वणी साधून नेहेमीप्रमाणे रहाटेने मारलेली दांडी.मेन कॅश काऊंटरवरच्या.पेमेंट करणारय़ा.लाखांमधे...
भाईला बसायला सांगितलं तर- कोण रहाटे? कुठली कॅश? कुठला काऊंटर? असं विचारून खडबडलेल्या चेहेरय़ावर इतके अनभिज्ञ भाव आणेल की आजूबाजूचे सगळे नुकतेच अलिबागहून आलेले आहेत.आणि निर्लज्ज उर्मट चेहेरय़ाने हसत बघत राहील.
परब कळव्याहून, इतक्या लांबून येतो म्हणजे उपकारच.त्याला नेमके जुलाब होत असतील किंवा थंडी भरून आलेली असेल. ’असं पहिल्यांदाच झालं!’ असंही तो नेहेमीप्रमाणे म्हणेल.
दिलीपला नेमकी लंचअवरमधे साखरपुड्याचे फोटो काढायची ऑर्डर असेल.आपण राष्ट्रपतींचे फोटो काढायला जाणार असल्याच्या थाटात तो ते सांगेल.
’ऑन द स्पॉट’ कॅशवरून डाका, दरोडा, लाख, खाक अशा शब्दांचा वाक्यात उपयोग करून भलत्याच अर्थाची म्हण बनवेल.ती खदाखदा हसून किंवा चिडून कानठळ्या बसवणारय़ा आवाजात सुनवत राहील.पर्यायानं बंड्या थंडा होईल.
उत्तम शिंदे कॅश वरून यॅस, फॅस असं काहीतरी जुळवून ज्योक तयार करेल.तो सांगताना दहादा विसरेल.हे सगळं करताना तो सतत तोंड पसरून स्वत:च आपल्या ज्योकवर हसत बसेल.इतका हसेल की समोरचा गप बसेल.
मनू मुत्तमवार, ’कॅशमधे बस!’ या मार्गावरची गाडी भलत्याच मार्गावर घेऊन जाईल.तोंड पाडून, एरंडेल प्यालासारखं हसून, नको तेवढं इंग्रजी बोलून, प्रमाणाबाहेर विनम्र होऊन, अनेक चित्रंविचित्रं स्थानकांवरच अडकून राहील.
जयदेव मिसाळ कामात फास्ट.फास्ट म्हणजे त्याच्यासारखा तोच.असं त्याचं मत.केसांवरून हात फिरवत सगळ्यांच्या आधी येऊन, रिकामी जागा हेरून, अलाऊन्स साधून त्यानं एव्हाना, म्हणजे तासाभरात सगळं काम संपवत आणलेलं असेल.त्याला कसं उठवणार?
कबनुरकर, सावंत, काळे पोरंबाळंवाल्या बाया म्हणून बादच!
रहाता राहिले टोकेकर.त्याना ऑफिशिएटिंग.एक्टिंग.
म्हणजे मग...
टॉयलेटमधे मोकळं होता होता निशी इथपर्यंत आला आणि पुन्हा दचकला.कितव्यांदा कुणास ठाऊक.च्यायलाऽऽ... पळालं पाहिजे लवकर कॅश केबिनमधे नाही तर बंड्याचे चिमटे...
कितव्यांदा कुणास ठाऊक निशीने धूम ठोकली आणि तो लॅचशी खडखड करून, झपकन् बंद-उघड होणारय़ा दाराशी झटापट करून कॅश डिपार्टमेंटमधल्या मेन पेमेंट काऊंटर केबिनमधे शिरला.प्रमाणाबाहेर उंच असलेल्या खुर्चीवर चढून बसताना एखाद्या मनोरय़ावर चढावं तसा श्वास त्याला लागला...
No comments:
Post a Comment