romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Friday, July 8, 2011

ग्लोबल झालिंया कळे...(१०)

भाग ९ इथे वाचा
... सव्वापाच वाजून गेलेले.पसारा आणखी वाढलेला.आले किती गेले किती देवाला माहित.नाहीतर सुपेला.हरे राम हरे हरे... कुठून सुरवात करावी हे निशीला समजत नव्हतं आणि आता सुरक्षारक्षक, कॅशप्यूनही काट्यावर आलेले...
सिंगल लॉक, डबल लॉक म्हणजे नोटांची बंडलं, सुट्या नोटा, नाणी सगळं समोर, सभोवार पसरलेलं.चष्मा काढत, पुन्हा घालत, डोक्यावरच्या करड्या केसांमधून मळ जमलेली नखं खुपसून खुपसून निशी हैराण झाला.मग कॅशप्यून कदमनं सुचवलं म्हणून बरीच खुडबुड करत शेवटी एकदाची प्रिंट कमांड दिली.त्याने केलेल्या रोखीच्या आदानप्रदानाची गोळाबेरीज मेन प्रिंटरवर कागदावर उतरणार होती...
दुपारी चारसाडेचारपर्यंत शाखेत अंधार पसरतोच.बाहेर रस्त्यावर, इतरत्र अजून लख्ख उजेड असतो.आस्थापनखर्च कमी होण्यात आतला अंधार-चारसाडेचारचा हातभारच लावतो.
जुन्या ब्लॅक अ‍ॅंड व्हाईट सिनेमात पडक्या भूतबंगल्याचा रखवालदार जसा अर्धवट अंधारात वावरताना दिसतो तसे टोकेकर आता आतल्या-शाखेतल्या अंधारात वावरताना दिसत होते.इकडे तिकडे बघत.कशासाठी? आपण बॅंकेने नेमून दिलेल्या वेळेआधी बाहेर पडतोय हे कुणी पहात नाहिए ना, हे बघण्यासाठी? की कशाचा तरी रहस्यभेद करण्यासाठी? कसला?...
पडक्या भिंतीवरून रखवालदाराचा क्लोज उगवावा तसे टोकेकर निशीच्या केबिनच्या काचेतून डोकावले.न बोलता पहात राहिले.चुळबुळणारा निशी असहाय्यपणे रोख रकमेचे वाटे चिवडत मोजायचा प्रयत्न करत होता.नोटांचे डिनॉमिनेशन्स लिहून घेत होता.खोडत होता.एकदा तर त्याने बोटाला थुंकी लावून त्यानेच खोडण्याचा प्रयत्न केला.छॅ:ऽऽऽ करून नैराश्याला वाट करून देत असतानाच त्याला समोरच्या काचेतून डोकावणारे टोकेकर दिसले आणि तो दचकला.त्याचा मूळचा आणि रोखीच्या आजच्या व्यवहारानंतर झालेला असा एकूण अवतार तसंच त्याचं दचकणं एवढं भयंकर होतं की त्या सगळ्याने टोकेकरही दचकले.दचकवा-दचकवीच्या या खेळानंतर नेहेमीच्या अतिसमंजस स्वरात टोकेकर म्हणाले,
“काय रे निशिगंध... डिफरन्स लागतोय?”
“अंऽआंऽऽअंऽ...” असे निरर्थक आवाज फक्त निशीलाच जमायचे.
“काय विचारतोय मी... टॅली होत नाहीये का?”टोकेकरांचं अतिसमंजसपणाचं अपर लिमिट बरंच वरचं होतं.निशीला कोण एवढं समजून घेणार?
“होऽअहोऽस्स्... बघा हो... काय सुचतच नाहीयेऽ... ही त्याची- त्या आंजर्ल्याची कॅश... ही त्या करकेरय़ाची... माझी कुठली?... ही... का ही?... हे... प्रिंट आऊट पण असं आलंय... आकडे सोडून सगळं नीट दिसतंय... ह्या काळ्या मुंग्या आहेत की आकडेच... हेऽ... फसवलं हो त्या बंड्यानं... मला कॅशमधे बसवलं... स्सऑऽ– नाहिये ना कुठे इथे?... नाहीतर हजामत... हा शेजारचा आंज्या आणि हा कानडी ×××-ऑ-”
“मदत करू का?... अं? करू मदत?”
टोकेकर अतिसमंजसपणाकडून सौजन्यशीलतेकडे वळत.तसे ते वळले आणि निशीने पुन्हा काही निरर्थक उच्चारांची पुंगळी हवेत सोडली.
“अरे हो! पण तुझ्या साहेबांना- तुमच्या कॅशच्या इनचार्ज ऑफिसरला विचारावं लागेल.त्याची परवानगी घेतल्याशिवाय मी आत, केबिनमधे येणं हे बॅंकेच्या नियमांना-” टोकेकर अतिसौजन्यशीलतेच्या मळ्यात आता तळ्यात-मळ्यात करू लागले.नेहेमीप्रमाणेच.
“ओ-ओ-तुमच्याऽयलाऽ टोकेकर! घुसा घुसा आता केबिनमधे ×××! हा ×××××× बारा वाजवनार आमच्ये इतेच!-”
“घॉसा! घॉसा!”
आधी कॅशप्यून कदम करवादला, पोटाला चिमटा बसल्यासारखा आणि मागोमाग सुरक्षारक्षक कनवाळेनी तोबरा भरून अनुमोदन दिलं.तरीही-
“बघ रे निशिगंध... हे सांगताहेत घुसा म्हणून पण उद्या बॅंकेने काही ऑब्जेक्शन घेतलं तर-”
आता कदम खसपटलाच.
“ओऽ तुमच्यायलाऽऽ ऽ#$%&*!@#$%&*!:;’”#$@!~&*... च्यामारी-”
“खॉक् खॉक् खॉऽऽ” सुरक्षारक्षक कनवाळे.
“च्यामारीऽऽ आतापरेंत सलूनमधी पोचून दोन चार कटिंगपन झाली आस्ती!”
कदम फावल्या वेळेत बॅंकेत काम करायचा.
“पांडेजी आ सकता हुं मैं अंदर- कॅशकेबिनमें?” टोकेकर विनम्रता वगैरे कोळून प्यालेले.
“हाये हाये ह्ये बगा कनवाळे! ओऽ टोक्येकरऽ तुमच्याऽऽआताऽ ‍^@#$$$$!%^&*+###@@!&&&!!ऽ–”
“जॉऊ द्येऽरे कॉदम जॉऊ द्ये- खॉ खॉक् खॉ:ऽऽ”
“बगा ना बगाऽ च्यामारीऽ परपरांतीयांना बगा लोनी लावतात कश्येऽ ओ ओ टोक्येकर ह्ये परपरांतीय हगले ना...”
कदम नावाच्या भूमिपुत्राचा संताप आता अनावर झाला.
कॅशचा ऑफिसर पांडे अगदी शेवटच्या पिंजरय़ात- केबिनमधे आपल्या मेव्हण्याबरोबर बसला होता.पांडे ’नुकताच’ बदली होऊन आलेला.मेव्हणा ’अगदी नुकताच’.मुलखाची ख्यालीखुशाली, मेव्हण्याला आकर्षून घेणारं शहराचं मोहकपण या सगळ्यावरची त्यांची चर्चा चांगलीच रंगात आली होती.
“हाऽहाऽहाऽ आइये टोकेकरजीऽऽ आइयेऽऽ आपहीका तो है कैस कैबन! हॅऽहॅऽहॅऽहॅ”
पांडेजी आपल्या प्रांताला जागून मिठ्ठास बोलले आणि हास्याची लकेर त्यानी उगाच चांगलीच वाढवत नेली.
पण आता टोकेकर कदममधे अडकले होते.तो वैतागून तिथून निघून गेलाय.पूर्णपणे.हे बघून ते कनवाळेना म्हणाले,“हाऽहऽहऽ... काय शिबीर आहे कदमचं? की संचलन?”
“खॉऽऽखॉक्ऽखॉक् कुटलं होऽ आनि येक कटिंग भाद्रून येतो म्हनलाऽ तुमी व्हा आत हॉ हॉ”
“माझी बिनपाण्याची करायला बघत होता...”
टोकेकर तीव्र नाराजीने कदम गेलेल्या दिशेकडे बघत मनातल्या मनात दातओठ खात राहिले.मग चपापून त्यानी इकडे तिकडे बघितलं.आपण मनातल्या मनात कदमचा केलेला उद्धार कुणापर्यंत पोचला तर नाही ना अशी शंका त्याना वारंवार येत राहिली...

No comments: