romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Thursday, July 21, 2011

राज्य (३)

भाग १ इथे वाचा आणि..
भाग २ इथे!
बाप आता कॉटवर ऐसपैस बसलाय.हातातल्या वर्तमानपत्रानं वारा घेत.तंगड्या लांब पसरलेल्या.बैठक बदलतो.मांडी घालून बसतो.जोरजोरात वारा घेतोय.हातातलं वर्तमानपत्र वाचायचा प्रयत्न करतो.आणखी उकडायला लागलंय.वर पंख्याकडे बघतो.पंख्याच्या रेग्युलेटरकडे बघतोय.तोवर आई आतून खांद्यावरून पदर घेऊन कुलीन स्त्रीसारखी येते.
“फुल्लं आहे पंखा अगदी! इकडे आज जास्तं उकडणं झालंय का? बर्फाळलेलं थंड पाणी आणू? इकडून घेणं होईल?”
तो तिच्याकडे नुसता बघत राहिलाय.त्याला हे नवीन असावं.
“इकडून काहीच बोलणं होत नाही! का स्नानाची योजना करू?”
“कुणाच्या?”
“इश्! हे काय बोलणं झालं? इतकं उकडतं आहे इकडे म्हणून इकडून होणार आहे का आंघोळ असं-”
“कुणाच्या नावानं?”
“मी तरी आहे अजून जिवंत! हे घरही आहे! तेव्हा-”
त्याचवेळी आतून राजू आलाय.जेवून.कपड्याना हात, तोंड पुसत, स्स स्स करत.त्याला बघताच आईचा स्वर हळूवार होतो.
“जेवलास राजू?”
राजू मान उडवतो.चपला चढवायला जातो.
“चाललास खेळायला जेवल्या जेवल्या?”
राजू जोरजोरात नकारार्थी मान हलवतो.
“स्स.. स्स.. खेळायला कुटला? स्स.. स्स.. आपल्याला आता खेळाची जरूर नाही तर स्स.. हाऽऽ पुस्तकांची आहे! लायब्ररीत चाल्लोय! हेऽऽ पिताश्री.. आधीही कॉलेजला पाठवायला तयार नव्हते! शिकून कुणाचं भलं झालं नाही, पैसे कमवून आणायला शिक म्हणतात! स्स.. आता तर काय सगळा आनंदच!.. तरीही स्स हाऽ.. माझ्या नशिबात स्स.. एवढं सिन्सियर असूनही.. शिकायचं आहे की स्स.. नाही? मी हमाल व्हावं की भाड्याने हातगाडी चालवायला घ्यावी? स्स हाऽ.. एवढं तुम्ही ठरवा तोपर्यंत स्स.. रहातो पुस्तकात बुडून! आज अभ्यास होईल की नाही? आवश्यक ती संदर्भपुस्तकं मिळतील?.. मिळतील का?.. की नाहीच?”
स्वत:शीच पुटपुटत चपला सरकवून चालू पडतो.आई बापाकडे पहाते.बाप पुन्हा एकदा घाम पुसतो.आई राजू गेलेल्या दिशेने पहात रहाते.हळूहळू तिच्या डोळ्यात पाणी जमा होऊ लागलंय.ते पुसत ती आत जायला वळते, तोच-
“मी.. मला जरा-” आई पाठमोरी तशीच थांबते.
“कोकम सरबत हवंय!.. साखर जरा जास्त घाल!.. बर्फ असेल आपल्याकडे तर थोडं जास्तच पिईन!”
ती जायला लागते.
“आणि- मिरी-मसाला टाक जरा!.. मोठ्या ग्लासातच दे!”
ती निघून जाते.बाप हुश्श करून लोडाला टेकून बसलेल्या संस्थानिकासारखा ऐसपैस कॉटवर बसून वारा घेत बसलाय..
Post a Comment