romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Friday, July 15, 2011

ग्लोबल झालिंया कळे...(११)

भाग १० इथे वाचा
आपल्याला आलेल्या रागाचा आपल्या कामावर परिणाम होता कामा नये याची काळजी टोकेकर (अति) काळजीपूर्वक घेत असत.गेलेल्या कदमला नंतर कधीही सुनवता येईल असा विचार करून ते आत्ता आपल्यासमोर काय काम आहे? या विचारावर आले आणि मग निशीकडे वळले, “हं काय गोरंबेऽ”
निशी आता इकडे तिकडे पहायला लागला.टोकेकर कधीही एकाच प्रकारे संबोधत नसत.म्हणजे निशी तर निशी कायम, असं नाही.निशी, निशीगंध असं वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या वेळी.निशीला गोरंबे या त्याच्या आडनावानं आख्या जगात कुणीच हाक मारायचं नाही.टोकेकर सोडून.निशीचा ऊर नेहेमीप्रमाणे धपापत होता.श्वासाला धुमारे फुटल्यासारखा त्याचा श्वासोच्छवास नेहेमीच होत असे.
“आधी तू जरा लांब उभा रहा.हं!... अरे! हे असं-” सर्वप्रथम टोकेकरांच्या अंगात गाडगेबाबा संचारले.त्यानी केबिनमधलं ते एवढसं डेस्क साफ करायला घेतलं.त्यावरचे ऐवज ते न्याहाळू लागले.महत्वाचे असलेले आणि नसलेलेही.दोन्ही सारख्याच जागरूकतेने.
“हेऽहेऽ आंजर्ल्याचं प्रिंट आऊट आणिऽ हेऽ करकेरय़ाऽ–” -निशी.
“थांब थांब हे आंजर्लेकरचं कशावरून? आणि हे करकेराचं?” मूलभूत संशोधन करणारय़ांना मूलभूत प्रश्न उभे करायची सवयच असते.टोकेकर अपवाद नव्हते.प्रिंट आऊट्स ते उलटसुलट करून बघायला लागले.जवळ, दूर असं धरून गुप्तहेरासारखे न्याहाळू लागले.निशीला वाटायला लागलं आता बहुतेक हे वास घेऊनच छडा लावणार कुणाचा प्रिंट आऊट कुठला याचा.
“अरे! अरे! हा कॉम्प्युटर प्रिंट आऊट आहे-”
“होऽ मगऽ मगऽ”
“अरेऽ वरच्या कोपरय़ात कुणाच्या कामाचं हे प्रिंट आऊट आहे त्याचं नाव छापलेलं असतं! हऽहऽ लक्षातच आलं नाही माझ्या हऽहऽ”
निशीला आता अनावर जांभया यायला सुरवात झाली.
“ही कुणाची कॅश?-”
“बॅं- बॅंकेचीऽ ऑऽहॉऽऽ-”
“ते खरं रे पण कुणाची कुठली? तुझी, त्या ह्याची आणि त्या...”
सगळ्या नोटा सारख्या.म्हणजे मूल्यं वेगवेगळं पण तरी सारख्याच.बंडलं सारखी.निशीनं गोंधळलेल्या अवस्थेत सगळी कॅश एकत्र केलेली.प्रत्येक कॅशियरची कॅश वेगवेगळी ठेवली असती तर प्रत्येकाची आणि एकूण अशी कॅश लवकर टॅली झाली असती.आता प्रॉब्लेम आणखी अवघड.
कमावलेल्या शांतपणे ’असू दे! असू दे’ म्हणत टोकेकरांचे हात, डोकं, मन- सगळं सरावलेलं- चालू झालं.निशी उभ्या उभ्या पेंगू लागला.काम चालू असताना टोकेकर झालेला प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा ते तोंडाने सांगत होते.कॉम्प्युटर लॉग आऊट होऊ नये म्हणून काळजी घेत होते.कॉम्प्युटरवरून फिगर मिळवत होते.कॅश काऊंट करत होते.बंडलं बांधत होते.निशी हूं हूं असे हुंकार भरत डुलक्या काढत होता.
पंधराव्या मिन्टाला सगळे फरक बिरक शोधून टोकेकरांनी संपूर्ण कॅश टॅली केली.निशीच्या चुका पांडेकडून चेक्स मागवून दुरूस्त केल्या.हि ज्याची जबाबदारी तो कॅश इनचार्ज पांडे या सगळ्याकडे पाठ फिरवून आलेल्या पाहुण्याबरोबर हास्यविनोद करतच राहिला.
निशीचं नशीब बलवत्तर होतं.चुका दुरूस्त होण्यासारख्या होत्या.निशीला खड्ड्यात घालणारय़ा नव्हत्या.निशी आता पूर्णपणे जागा झाला.पुढचा मार्गशीर्ष गुरूवार तरी इमानेइतबारे पाळण्याचं त्यानं स्वत:च स्वत:ला वचन दिलं आणि आधी मनोमन सुपेला साष्टांग दंडवत घातला... स्वत: जगलास आणि मलाही जगवलंस रे बाबा...

...थॅंक्यू! थॅंक्यू! अच्छाऽ पांडेजीऽअच्छाऽकनवाळेजीऽ– आपलं हे कनवाळेऽ अरे होऽ पांडेजीऽमेहेमानजी को भी अच्छेऽ थॅक्यू!” सगळं झाल्यावर टोकेकरच सगळ्यांचे आभार मानत सुटले.एटिकेट्स पाळण्याचं त्यांचं लिमिटही जरा वेगळंच होतं.
“अच्छेऽअच्छेऽऽहॅऽहॅऽहॅऽ...” पांडेजी पुन्हापुन्हा खुदखुदत राहिले.
तेव्हा कदम त्याचं कटिंग आटपून परतत होता, अगदी वेळेवर आणि आता घरी जायच्या वेळेला लफडा नको असा सावध पवित्रा घेत टोकेकर त्याला बघून टॉयलेटकडे धावले...
Post a Comment