romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Wednesday, July 27, 2011

राज्य (५)

भाग ४ इथे वाचा!
अवाक् राजू स्वत:शीच बोलू लागतो.
“मी माझ्याच घरात आहे की शेजारय़ांच्या? ग्लासात पाणीच आहे की दुसरंच काही?.. हे सेलिब्रेशन कसलं? आनंदाचं की शोकाचं?”
गार्गी त्याच्याकडे बघून हसतेय.
“काय राजू? पिणार का?”
“पिऊ की नको.. असं चालंलय माझ्या मनात!”
“म्हणजे नेहेमीसारखंच!”
“बरोब्बर! पण आज मला झालाय ओवरडोस-”
आता बाप बापाचं कर्तव्य पार पाडण्याच्या भूमिकेतून पुढे सरसावलाय.
“राजू! तुला किती वेळा सांगितलंय-”
“सॉरी पितामह- आपलं हे पिता-पिता-पिताश्री! मला झालाय ओवरडोस तो डोक्यावर ओझं वहाणं बरं की तेच ओझं हातानं ढकललं तर ते चांगलं या विचारांचा!.. डोक्यावर ओझं असलं तर एक तरी बरं की डोकं इतर कशासाठी वापरायला नको! ओझं धरण्यात हात अडकलेले! म्हणजे काही करायलाही नको! उलट.. हाताने गाडी ढकलायची म्हणजे इनवेस्टमेंट आली! लायसन्सची लपडी आली! ट्रॅफीक जॅमची कटकट आली! हातगाडी पार्क कुठे करायची ही सुद्धा चांगलीच अडचण आणि-”
आता मोठ्या बहिणीच्या भूमिकेतून गार्गी सरसावलेली.
“राजूऽ अरे एवढा विचार करून चालत नाहीऽ एवढं स्वत:ला कोसून-”
“आम्हाला डोकं दिलंय देवानं भगिनीश्रीऽ ते आमच्याच या धडावर विराजमान आहेऽ त्यात सदान्कदा काही न काही भरत असतं-”
बापाला राजूनं एवढं बोलणं अभिप्रेत आणि मान्य दोन्ही नाही.
“मोठे शहाणे होताएत चिरंजीव दिवसेंदिवस! पुस्तकं वाचताएत ना!”
कायम राजूला समजावणं हे गार्गीचं आवडतं काम.
“राजूऽ अरे कशाला एवढं शिणवायचं स्वत:लाऽ”
“काय करू ताईश्री! मला शिकायचंय! सुधारायचंय! मला तुझ्यासारखी- ह्यांनी लावली तशी- नोकरी कुणी लावणार नाही! माझं कौतुक, फुकटचं, तर कुणीच करणार नाही! मला याच घरात रहायचंय! कशातच प्राधान्य नाही, आरक्षण नाही! आणि आता तर काय..”
“कायऽ काय झालंऽ”
“बाबांना प्रमोशन मिळालंय ताई! आता त्याना हक्काची जागा मिळतेय!”
बाप दचकलाय आणि गार्गी त्याच्या अंगावरच झेपावलीय.
“होऽ पपाऽऽ खरंचऽऽ पार्टी हवी हं आम्हालाऽ हांऽऽ”
बाप तिच्याकडे बघून निर्लज्जासारखा हसतो.राजूवर डोळे मोठे करतो.राजूला आता चेव आलाय.
“आता त्याना स्टेशनपर्यंत जायला नको! लोकल पकडायला नको! रेटारेटी नको! ऑफिसमधे जायला नको आणि काम तर नकोच नको!- ते कधी हवं होतं म्हणा!”
“म्हणजेऽऽऽ”
“आता हातगाडीची मालकी विभागून!”
बापाचा आता मात्र स्फोट होतो.
“राजूऽऽ फार होतंय तुझं! अजून जमिनीतून वर नाही आलास तर एवढं? दबून रहायचंस तू! अजिबात डोकं वर काढायचं नाही! कळलं नं? काडीची अक्कल नाहिए तुला! पढतमूर्ख नुसता! विचार करून करून काही होत नसतं, तर-”
शेजारी बसलेली गार्गी अचानक उठून बाजूला गेलेली बघून बोलायचा थांबतो.गार्गीचे डोळे विस्फारलेले.
“बाबा म्हणजेऽऽ तुम्ही.. तुम्हाला काढलं शेवटीऽऽ”
“काढलं!.. काढलं बिडलं काही नाही गं.. नुसतं आपलं ते- हे-”
“घरी बसवलं गं ताई! आणखी त्रास होऊ नये म्हणून!.. कंपनीला!- नाही नाही!- मी आपला.. माझा चौकोन उघडून बसतो पुस्तकांचा! काय आहे की.. माझं आपलं.. मला तो चौकोन उघडून बसलं की डोक्यात काहीतरी भरता येतं.. काय आहे की डोक्यात सतत विचारांचं आत बाहेर चाललेलं असलं की मी नॉर्मल असतो.निर्णय काय घ्यायचाच असं नसतं! की घ्यायचा? घ्यायलाच हवा का? घेता येतोच? की नाही? की-”
राजू पुटपुटत खोलीच्या डाव्या कोपरय़ात आपलं पुस्तक उघडून बसतो.
गार्गीला गहिवर आलाय.तिच्या डोळ्यात पाणी.
“पपा.. मला बोलला नाहीत.. हे असं झालेलं.. निदान शोक तरी मनवला असता होऽऽ काय हे गप्पा मारत बसले मीऽ पपाऽऽ”
बापाच्या गळ्यात पडते.त्याच्या बेरक्या नजरेत थोडी चलबिचल.गार्गी एकदम बाजूला होते.
“बरं झालं म्हणा.. एखाद्या गरजू मुलीला तरी नोकरी मिळेल!”
“काय म्हणालीस?”
“काही नाई हो बाबा! काई नाही! उद्या.. उद्या मला जरा लग्नाला जायचंय एका मैत्रिणीच्या आणि साडी इस्त्री केलेली नाही! तुम्ही जरा इस्त्री करता का?”
“मी!!! मला सांगतेस तू?”
“का? सांगू नको? मग आता तुमचा उपयोग काय? ही वरची कामं आता तुम्हीच करायची! स्वत:च्या हाताने इस्त्री करायला जमत नसेल तर लॉंड्रीत नेऊन करून आणा! आणाल ना प्लीजऽऽ आईऽऽ पानं घ्यायची काय गं? भूक लागलीये मरणाचीऽ”
गार्गी आत निघून जाते.बाप चुळबुळत उभा.राजूचं डोकं पुस्तकातच आहे पण अंत:चक्षू गार्गी-बाप यांचं काय चाललंय इकडे.तो संधी साधतो.
“आधी करावे! मग भरावे!
आधी काढावे! मग बसवावे!-”
बाप चिंताग्रस्त.मांडी घालून कॉटवर बसलेला.
“गुळाचा गणपती जैसा! लाल पाटावरी!”
तत्काळ बापाची मांडी मोडते.
“राजूऽऽ”
बाप ओरडल्याबरोबर राजूनं अंग चोरून घेतलंय आणि त्याचा आवाज खाली आलाय.
“करावे पालन सर्वांचे! पसरावी चादर!
मग पायाखालून हळूच, काढून घ्यावी!”
बाप रागारागाने उठून उभा राहिलाय.काय करावं त्याला सुचत नाही.तो धुमस धुमस धुमसतोय..
Post a Comment