romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Monday, July 11, 2011

मोहिनी आणि कबीर (४)

भाग ३ इथे वाचा!
“सफाई द्यायचीए तुम्हाला?”
“ते माझ्या वकीलाचं काम आहे मिस्- मिस् जेलर!... तुम्ही ड्युटीवर नसताना खास मला भेटायला आलाहात... माझी विचारपूस करताहात... तुमचा माणसावर विश्वास आहे म्हणता... मी सांगेन ते खरं वाटेल तुम्हाला?
“कबीर! माणसावरचा माझा विश्वास शेवटपर्यंत राहील! तुमच्या डिटेल्समधे मला स्वारस्य नाहिए, तरीही तुमची तुमच्या दृष्टीने काही बाजू असेल ती ऐकून घ्यायची आहे!
कबीर हसतोय, “मला काही बाजू आहे म्हणता?”
“जनावराच्या वागण्यालाही काही मोटिव्ह असतं कबीर!”
“शाबास! शाब्बास! मला जनावरच बनवून टाकलंत! थॅंक्यू!”
“नो मेंशन प्लीज! आय एम सॉरी, मी, तुम्हाला जनावर नाही म्हणाले! बुद्धी नसलेला प्राणीही काही एक हेतूनं वागतो! तुम्ही तर बुद्धिवान, एक संवेदनशील कलाकार, यशस्वी-”
“तुम्ही माझं कौतुक करताय का मला जोड्याने मारताय?”
“ह ह ह... ते समजण्याइतके चतुर तुम्ही आहात कबीर पण तरीही... शरीर... ह्या वस्तुपलिकडे तुम्हाला नाही जाता आलं!”
कबीरला हे थेट बोलणं अपेक्षित नसावं.तो चमकतो.मोहिनी त्याचे भाव निरखतेय, “वा!... तुम्ही चांगला अभिनयही करता तर!”
कबीर स्वत:शी बोलल्यासारखा पुटपुटू लागतो, “शरीर... शरीर... त्या पलिकडे काही असतं?”
“बरंच काही!...”
कबीर सुस्कारा सोडतो.मग अचानक सरसावतो, “तुमचं- तुमचं लग्नं झालंय?”
“त्याचा काय संबंध आहे इथे?”
“ओके! ओके! तुमचं वय काय असेल?- ओ! अगेन आय एम सॉरी!- माझा अंदाज सांगतो.तीस-पस्तीस...”
“पुढे?”
“असं समजूया तुमचं लग्नं अजून झालेलंच नाही किंवा झालेलं असेल तर तर तुमच्या या नोकरीमुळे, तुमच्या नवरय़ापासून तुम्हाला लांबच रहायला लागलंय सतत...”
“ओके! मग?”
“विस्फोट नाही होत तुमचा?”
“माझ्या विस्फोटाचं काय ते बघायला माझी मी समर्थ आहे कबीर!... आपण तुमच्याबद्दल बोलतोय, तुमचा विस्फोट झाला असं गृहित धरूया! अशा विस्फोटाच्या वेळी तुम्ही काय केलंत?”
“विस्फोट!... माझा विस्फोट दूरच राहिला मिसेस- मिस- जेलर!... भलत्याच ज्वालामुखीला मला सामोरं जावं लागलं!...
मोहिनी बारकाईने कबीरकडे पहात एक खुर्ची सरकवून घेते.बसते.
“कधीची गोष्टं ही?... बसा कबीर तुम्हीही हवं तर! बसा!”
“नाही... ठीक आहे... नुकताच... स्कूल ऑफ आर्टला जायला लागलो होतो! हट्टाने!... शिकवण्या करून मॅट्रिक झालो... बाप सिनेमाची पोस्टरं रंगवायचा, दारू पि-पिऊन मरून गेला!... आई आणि मी... मॅट्रिक झालो, ओळखीनं एका सोन्याचांदीच्या पेढीवर सेल्समन म्हणून लागलो... चांगलं चाललं होतं... काही कामासाठी शेटच्या घरी जावं लागलं एक दिवस... तिथे होता तो ज्वालामुखी... मी सोळासतरा वर्षाचा, ती... माझी आई शोभेल... स्वत:च्या अभोगीपणाचा सूड उगवायला तिला मीच सापडलो-”
“तुम्हाला बरं वाईट निश्चित कळत होतं तेव्हा कबीर!”
“बरं आणि वाईट... सोळा वर्षाचा चवताळलेला तरूण एवढंच माझं अस्तित्व होतं तेव्हा... मला झुलवून झुलवून खिदळणारय़ा शेटाणीवर माझ्याकडून एक दिवस हल्ला... त्याच्या दुसरय़ाच दिवशी चोरीचं बालंट येऊन मला माझी नोकरी गमवावी लागली...”
“हे सगळं होण्याआधी तुम्ही शांतपणे काही गोष्टी शेटच्या कानावर घालू शकला असता! शेटची मर्जी होती नं तुमच्यावर?”
“पहिल्याच भेटीत तिनं... सज्जड दम भरला होता... मला शिक्षण पूर्ण करायचं होतं... नोकरी सोडून भीक मागत फिरावं लागलं असतं...”
“पुढे-”
“नोकरी सुटलीच! का सुटली याचं कारण कुणाला सांगू शकत नव्हतो... मग काही रात्री रस्ते किंवा भिंती रंगवायला मिळाल्या तरच पोट भरत होतो... त्याच दरम्यान नफिसा माझा आयुष्यात आली... माझ्या क्लासमधली...”
कबीर बोलता बोलता थांबला.शून्यात गेला.मोहिनीला त्याला काही वेळ देणं भाग होतं...

No comments: