romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Sunday, July 24, 2011

राज्य (४)

भाग ३ इथे वाचा
संध्याकाळ झालीय.बापाने कॉटवर मस्त ताणून दिलीय.घोरतोय.आई खाली जमिनीवर बसून भाजी निवडतेय.तिची मधेच कुठेतरी बघत तंद्री लागते, मोडते, पुन्हा तंद्री लागते असं चाललंय.
एक चष्मा लावलेली, उंच, किडकिडीत तरूणी घाईघाईत बाहेरून येते, चपला काढते, खांद्यावरची ऑफिसबॅग खाली ठेवते.समोर बघते तर आईची कुठेतरी बघत तंद्री लागलेली.
“वा! वा!-” मुलीचा आवाज पुरूषी आणि वरच्या पट्टीतला.ती टाळ्या वाजवण्याच्या बेतात असताना आई तिला अडवते.बाप झोपलाय ते दाखवते.
“मरू द्ये ग!.. आयला! उद्या तीन हजार साल उजाडेल आणि अजूनही चित्रं तेच! पुरूष निवांत झोपलाय! बाई बसलीए निवडत आणि स्वत:चं डोकं चिवडत!.. ह्याना काय झालंय?”
आई काही बोलत नाही.मुलगी डोक्यावर घट्टं बसवलेला हेअरबॅंड काढते.
“काही झालेलं नाही ना अजून?”
“गार्गी! असं काय बोलतेस? त्याना किती कौतुक आहे तुझं आणि तू-”
“कसलं कौतुक? हॅऽऽ.. शिकवलं, नोकरी लावली, जपलं ते बाजारात चांगला भाव यावा म्हणून!.. आयला! नोकरी आहे म्हणजे कुणीही करून घेणार आणि वर त्या बाशिंग बांधलेल्या खोंडाला स्कूटर, कार, फ्रीज नायतर फ्लॅट द्यायला पैसे नकोत खर्चायला? ते कुठून येणार?- माझ्याच नोकरीतून! मुलीच्या! यांच्या बापाचं काय जातंय?.. आयलाऽऽ”
“काय गं सारखं आयला! आयला! बरं दिसतं का ते मुलीच्या जातीला?”
“आलीस शेवटी जातीवर? आय्- एवढं सारखं सारखं आयला आयला म्हणून तुझ्या डोक्यात काही प्रकाश पडत नाहीच! अगं यांचीच ढाल करून यांच्याशीच कसं लढायचं ते समजणार नाही तुला!- आणि जमणार तर नाहीच! रहा अशाच.. वर्षानुवर्षं!”
आई आश्चर्यचकीत झालीय.
“काय बोलतेस गार्गी!.. मी समजतेय तू ह्यांच्याच बाजूची! तेही तुला इतकं जपतात! माझ्या कधी लक्षातच नाही आलं! कमाल आहे बाबा तुम्हा दोघांचीही!” हात जोडून वर करते.कोपरापासून जोडल्यासारखे.पुन्हा भाजी निवडणं चालू.
गार्गी मोठमोठ्याने तिच्या पुरूषी आवाजात हसायला लागते.
“हॉऽऽ हॉऽऽ हॉऽऽ हॉऽऽ समझनेवालेको इशारा काफी होता है हॉऽ हॉऽऽ”
त्या आवाजाने बापाची झोप मोडलीय.तो कुशीवर होऊन इकडे तिकडे पहायला लागतो.चटकन भानावर येत नाही.भानावर आल्यावर टुणकन् उठून बसतो.गार्गीचा नूर एकदम बदललेला.
“होऽऽ पापाऽ पापाऽऽ”
तो उठून उभाच रहातो.कॉटपासून लांब होतो.
“बस! बस! गार्गी! दमून आली असशील! पाणी आणतेस का? मलाही तहान लागलीय!”
गार्गी लाडीकपणे बापाच्या खांद्यावरून हात टाकते.
“काय म्हणताय पपा! आज लवकर येऊन झोपलात न चक्कं!”
ते प्रेम बघून आई आत जायला निघते.
“आईऽ आम्हाला जरा पाणी देतेस नं आणून?”
आई जोडगोळीकडे पहात जोरजोरात मान हलवते.
“हो! हो! आणते हं! आणते! बर्फ घालून आणते!” आई आत जाते.
“मग काय पपा! काय विशेष?” बाप निर्लज्जासारखा हसतो.
“हॅ हॅ हॅ हॅ! बस! बस इथे!” ती कॉटवर बसते.तिच्याबाजूला बसतो.
“मग? काय म्हणतंय ऑफिस?”
“म्हणतंय काम करा! सतत काम करा! काम नसलं तर काम करायचं सोंग करा! ऐंशी टक्के लोकांनी मजा करा! वीस टक्क्यांनी पिचत रहा!”
“आणि पगाराचं काय?” बापाची नजर बेरकी झालीय.
गार्गीला त्याला काय म्हणायचंय ते कळलंय.तिही खोटी खोटी हसते.
“हाऽ हाऽ तुमच्याकडे सुपुर्द! झाला की लगेच!.. त्याचीच वाट पहाताय ना?” गार्गी लाडात आल्यासारखी.बापही खोटं खोटं हसतो.आतून आई आलीय.पुन्हा चित्रपटातल्या कुलीन स्त्रीच्या अभिनिवेषात.
“घ्या! पाणी गारेगार!”
“थॅंक्यू! थॅंक्यू! तुमचं कर्तव्य तुम्ही व्यवस्थित पार पाडता आहात! आणि त्याबद्दल तुमचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे!” बाप आणि गार्गी एकाच सुरात बोलतात आणि हसतात.
सर्कशीत तारेवरची कसरत करून आत जाणारय़ा मुलीसारखं त्या दोघांना अभिवादन करून आई आत जाते.
“चिअऽऽर्स! हा! हा! हा! हा!ऽऽ”
दोघंही सेलिब्रेशनच्या मूडमधे.त्याचवेळी दारात राजू.त्यांच्याकडे बघत उभा...

2 comments:

भानस said...

वाचतेय... :)

विनायक पंडित said...

तुम्ही वाचताय म्हणून मी लिहू शकतोय! :)